वाट..

Submitted by निवडुंग on 29 June, 2011 - 15:56

आठवतंय तुला?

घनगर्द काळ्याकुट्ट अंधारात,
तुझा हात हातात घेऊन,
मोजून पावलं टाकताना,
हरवून गेलेलो आपण.

कुठुनसा असंख्य काजव्यांचा थवा,
क्षणार्धात सर्वकाही उजळवत,
घेऊन गेलेला आपल्याला,
रेतीभरल्या त्या अज्ञात वाटेवर.

समिंदरावर सांडलेल्या पार्‍याची,
पखरण करणार्‍या अल्लड लाटांचा,
अव्याहत गुंजणारा खळखळाट,
मनभर मुरवत पहुडलेलो आपण,
पौर्णिमेच्या चंद्राच्या उबदार कुशीत.
कधीही न विलगण्यासाठी..

आताशा ती वाट,
काटयांमध्ये कुठेतरी हरवलीय म्हणे..

आजही एखादा चुकार काजवा,
आपलं सर्वांग पेटवत,
शोधत असतो तिच्या खुणा.
रात्रभर.

मागत असतो शेवटचं देणं.
काट्यांपलिकडची ती एक बंदिस्त लाट,
अन् पौर्णिमेच्या चंद्राचा एक छोटासा कवडसा..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!

आशय सुंदर..!
समिंदर, उगाचंच
समुद्राने प्रवाहीता राहील.
.....
घनगर्द काळ्याकुट्ट अंधारात
पौर्णिमेच्या चंद्राच्या उबदार कुशीत...?
अल्लड लाटांचा, खळखळाट?
(मित्राच्या कवितेची एक ओळ आठवली
"आपण दोघे बसलो होतो सदाफुलीच्या झाडाखाली")
राग आला तरी हरकत नाही..बदलाची अपेक्षा ...अन्यथा क्षमस्व!

मुक्ता, ट्यागो, चिमुरी, निखिल, पल्ली,
खूप खूप आभार..

शाम, प्रतिसादाबद्दल आणि सुचनेबद्दल खूप आभार.
राग येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

शाम, आपण कधी कोकणातल्या एखाद्या छोट्याश्या खेड्यात गेला आहात कधी? जिथे एक सुंदरसा बीच असतो. उशिरा रात्री बीच वर फिरायला जावं म्हणून तुम्ही एका ग्रामस्थाला बीच कडे जाणारा रस्ता विचारता, आणि तो एका छोट्याश्या रस्त्याकडे बोट दाखवतो. आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा असतात, पायाखाली लाल मातीच्या रस्त्यावर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सांडलेला असतो. तुम्ही चालत राहता त्या रस्त्यावरून. हळूहळू प्रकाश कमी व्हायला लागतो, पायाखालची माती ही बदलत असते, रस्ता एखाद्या पांदीमधून गेल्यासारखा असतो. आजूबाजूला गर्द झाडी असते, अगदी डोक्यावरही. ती इतकी दाट असते की चंद्राचा प्रकाशही तिथे पोचू शकत नसतो. अंधार वाढत राहतो, रस्ता अजूनही संपलेला नसतो. डोळ्यात बोटं घातली तरी काही दिसणार नाही अशी परिस्थिती असते. हातातल्या टॉर्च किंवा मोबाईलच्या उजेडात चालत राहावं लागतं. दूरवर फक्त अस्पष्टसा लाटांचा आवाज ऐकू येत असतो. पण समोर काही दिसत नाही. एकदम "स्पूकी सिचुएशन" असते. तुम्ही तसंच पुढे चालत राहता, आणि समोरची झाडी बाजूला सारली, की निसर्गाचं ते अद्भूत रूप दिसतं. डोळयात न मावण्याजोगं. समोरच तुमचा चंद्र उभा ठाकलेला असतो, लाटांवर लाटा चंद्राचा प्रकाश घुसळून टाकत असतात. सर्व काही मात्र शांत असतं, लाटांचा हा खेळ चालू असतो तेव्हा. त्या हसत असतात, बागडत असतात, खळखळत असतात. त्या क्षणाला तुम्ही फक्त स्वतःला नशिबवान मानत त्याचे मनी आभार मानत राहता, हा एवढा सुंदर ठेवा याची देही याची डोळा पाहायला मिळाल्याबद्दल.

I hope you understood what I meant to say.

तरीही फक्त रचनेत विरोधाभास वाटत असेल, तर असेलही. मी अमान्य करत नाहीये ते. पण मला तेच अपेक्षित आहे, जे मी लिहिलं आहे, आणि त्यात बदल करावासा वाटत नाही मला..

मागत असतो शेवटचं देणं.
काट्यांपलिकडची ती एक बंदिस्त लाट,
अन् पौर्णिमेच्या चंद्राचा एक छोटासा कवडसा..

प्रत्येकाच्या जीवनातला हा क्शण अगदी जिवन्त् पण मरणाच्या वाटेवर...........सुरेख, खुप गर्भितार्थ आहे या ओळित.............

आजही एखादा चुकार काजवा,
आपलं सर्वांग पेटवत,
शोधत असतो तिच्या खुणा.
रात्रभर.

मागत असतो शेवटचं देणं.
काट्यांपलिकडची ती एक बंदिस्त लाट,
अन् पौर्णिमेच्या चंद्राचा एक छोटासा कवडसा..

हे खूप आवडलं!

एकदम चित्रमय कविता...
पण कवीला विरोधाभास का अपेक्शित आहे ते जाणून घ्यायला आवडेल...

शेवटचं देणं कळले नाही मला Sad

बागे, योगिता, साती, मनिषा_माऊ,
खूप खूप आभार..

क्रांति, आनंदयात्री, मिल्या,
आपले प्रतिसाद मिळाले म्हणजे कविता धन्य..

मिल्या,
विरोधाभास अपेक्षित नाहीये हे मी आधीच शाम यांना उत्तर देताना स्पष्ट केलंय. फक्त तसे शब्द वापरल्यामुळे विरोधाभास वाटतोय किंवा वाटू शकतो असं मला म्हणायचंय..

आणि कवितेत अजून वेगळा अर्थ पण अपेक्षित आहे, रूपक म्हणा हवं तर.. काजवा हा "फक्त काजवा"च नाहीये इथे, म्हणून ते शेवटचं देणं. Happy

ते सगळं सरळ अर्थाने कवितेत आलं असत तर सजायला इतका वेळ लागला नसता मला.
तशी समजही कमीच आहे माझी.
मी समुद्र फक्त दिवसा बघितलाय..तोही दोन-चारदा.. bad luck
बरं,चर्चा पुरे..उगाचंच मी शहाणा की तू? असं व्हायला नको.
पु.ले.शु..!

आजही एखादा चुकार काजवा,
आपलं सर्वांग पेटवत,
शोधत असतो तिच्या खुणा.
रात्रभर. >>> संपुर्ण कवितेत हेच कडवे आवडले.. भावले...!

शाम.. Happy
Actually I had not expected you (or anyone for that matter) to understand that discrepancy!
समज कमीचा काहीच संबंध नाही इथे! आपल्या कविता वाचलेल्या आहेत मी. आपण नक्कीच फार सुरेख लिहिता..
मला पण इथे मी शहाणा आहे आणि दुसरं कोणी नाही असं मुळीच दाखवायचं नाहीये!
मी फक्त माझा एक अनुभव सांगितला..
लोभ असू द्यावात.
आभार!

जाता जाता एक मित्र म्हणून सल्ला - पौर्णिमेच्या रात्री समुद्र नक्कीच पाहा, आवडेल तुम्हाला याची खात्री आहे मला!

चातका,
तुझा प्रतिसाद आला, पोस्ट करत असताना, खूप आभार मित्रा.. Happy