भरकटंती

Submitted by चिमण on 26 June, 2011 - 11:27

कुठे तरी काही दिवस तरी भटकंतीला जाऊ या असं कधी तरी कुणाला तरी वाटतंच. दुर्दैवाने, या वेळेलाही तसंच झालं! आम्ही दिल्याच्या ऑफिसात त्याच्या बायकोचा शिर्‍याचा प्रयोग चाखत होतो. आमचा एक मित्र, संदीप, अमेरिकेहून आला होता, त्याच्या बरोबर. इतर एनाराय मित्रांसारखीच त्याचीही, बायकोला चुकवून, आमच्या बरोबर टीपी करण्याची माफक अपेक्षा होती. परदेशातून आल्यावर एकदाचं बायका-पोरान्ना बायकोच्या माहेरी डंप केलं की बाजीरावांना रान मोकळं मिळतं. मग एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी बायको फारसं मनावर घेत नाही... किंबहुना तिलाही तेच हवं असतं. पण इथल्या सगळ्यांनी कामं टाकून त्यांच्यामागे धावावं असं या एनारायना का वाटतं? म्हणजे तसा एक काळ होता.. त्यांनी तिकडून आणलेल्या सिगरेटी आणि दारूत अवाजवी इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना वाजवी पेक्षा जास्त भाव दिला जायचा.. पण आता?

मक्या: 'ए हा संदीप सहलीचं एक प्रोजेक्ट करू या म्हणतोय!'.. कुठल्याही फालतू गोष्टीला 'प्रोजेक्ट' म्हणायची फ्याशनच झालीये हल्ली! आयटीत काम करून करून डोक्याची अशी मशागत होत असावी.. कटिंगला जाणे, एक प्रोजेक्ट! कोपर्‍यावरच्या दुकानातून दूध आणणे, अजून एक प्रोजेक्ट!

दिल्या: 'कुठं जायचं बोला? काश्मीर, सिमला, कोडाइकॅनाल, केरळ, उटी, कन्याकुमारी झालंच तर चतु:श्रुंगी?' दिल्यानं उडप्याच्या हॉटेलमधल्या वेटरच्या एकसुरी झपाट्यात मेन्यु सांगीतला.

संदीपः 'चतु:श्रुंगी?' चमचमीत मिष्टान्नांच्या पंक्तीत परिपाठादी काढ्याची अळी आल्यामुळे संदीपची गाडी हास्य दरीत कोसळली. आम्ही हा जोक खूप पूर्वीच 'सरताज' केला होता त्यामुळे आम्ही 'काय उगाच फालतू जोकला हसतो?' असे चेहरे केले.

दिल्या: 'हो. चतु:श्रुंगीला आमच्या अर्ध्या अर्ध्या दिवसाच्या खास बजेट टूर असतात.' दिल्याच्या तोंडून आता सराईत टूर ऑपरेटरची टुरटुर सुरू झाली.

संदीपः 'चतु:श्रुंगी चढून उतरल्यावर मग भेळ खाऊन परत यायचं का?'.. प्रत्येकाला टूरच्या पैशात फुकट काय काय आहे ते माहिती हवंच असतं.

दिल्या: 'भेळ खाणं ऑप्शनल आहे, तुमच्या बजेट प्रमाणे'.. कनवटीला डॉलर मिरविणार्‍या संदीपचा कचरा करण्याची संधी दिल्या कशी सोडणार?

संदीपः 'ट्रेकला जायचं का?... सिंहगड, तोरणा, राजगड, लोहगड'

'सर, एक सही हवी होती' मधेच दिल्याच्या ऑफिसातला एकजण सही घेऊन गेला.

मक्या: 'चिमण्या असेल तर ट्रेकला मी येणार नाही.'

संदीपः ('नाव चंद्रकला आणि अंगी पौर्णिमेचा घेर' अशा माझ्या नावाशी व्यस्त प्रमाण दाखविणार्‍या देहाला आपादमस्तक न्याहाळत) 'चिमण्या? तू ट्रेकला पण जातोस?'

मी: 'तसा मी बर्‍याच क्षेत्रात धडपडतो, पण कुठेच धड पडत नाही. पण ट्रेकला जायचं असेल तर मीच येणार नाही.'

संदीपः 'का रे बाबांनो?'

मी: 'कारण डोंगरावर रिक्षा मिळत नाहीत'.. डोंगर आणि रिक्षाचा संबंध लावता लावता संदीपच्या डोक्याची जिल्हा परिषद झाली.

दिल्या: 'ट्रेकला जाणं आणि भिकेचे डोहाळे लागणं यात काही फरक नाहीय्ये असं चिमणचं म्हणणं आहे!'

मी: 'अरे मागे आम्ही एका ट्रेकला गेलो होतो.. डोंगर चढून चढून माझी फासफूस झाली.. मला वाटत होतं तेवढा डोंगर चढून झाला की संपला ट्रेक.. नंतर कळालं की नुसता तेवढाच डोंगर नाही तर अजून तसे दोन डोंगर चढाय उतरायचे आहेत.. मग मात्र माझा धीर खचला.. मी भूक भूक सुरू केलं.. थोडं चरु या म्हंटलं.. मी डब्यातून गुलाबजाम, बाकरवड्या, पेढे बर्फ्या असं भरपूर आणलं होतं.. ते हाणल्यावर सगळे तिथेच आडवे झाले आणि ट्रेकचं पानिपत झालं. माझ्यामुळे ट्रेक बोंबलतो असा बिनबुडाचा आरोप हे लोक तेव्हापासून करतात.'

दिल्या: 'गपा रे! उगा शिरा ताणून ताणून बोलू नका!'

मी: 'नाही रे! मी शिरा खाऊन खाऊन बोलतोय!'

संदीपः 'बरोबर आहे. बरोबर आहे. नो ट्रेक. कुठे तरी निवांत पडायचंय. मस्त बियर ढोसायची. मनात आलं तर हिंडायचं नाही तर झोपायचं.. असं काही तरी पाहीजे.'

मक्या: 'अरे! मस्त सिमला कुलू मनाली असं कुठे तरी जाऊ या. तिथं हॉटेलात बसल्या बसल्या पण छान हिमालय दर्शन होतं. कुठं चढायची गरज नाही.'

मी: 'तिथपर्यंत जाऊन यायलाच ४ दिवस लागतील.'

संदीपः 'विमानाने जाऊन येऊ.'

मी: 'ए भाऊ! विजय मल्ल्या काही माझा सासरा नाही. आणि माझ्या सासर्‍याकडे खेळण्यातलं विमान पण नाही. त्यामुळे तू तिकीटं काढलीस तर मी फॅमिलीसकट येईन.' यावर सगळ्यांचं एकमत झाल्यामुळे विमान रद्द झालं.

दिल्या: 'बरं, मग कुठं जाऊ या?'

मी: 'तीन चार दिवसात कुठे जाऊन येणार? महाबळेश्वर?'

मक्या: 'नको. आमचा हनिमून तिथेच झाला.'

मी: 'तेव्हापासून तू त्याचा धसका घेतलाहेस काय?'

दिल्या: 'हां! त्या कटु आठवणींना धैर्याने, परत परत, सामोरा गेलास तरच तो आघात बोथट होईल.'

संदीपः 'मला पण महाबळेश्वर नको.'

मी: 'तुझा पण ह.मू. तिथेच झाला?'.. एक काळ होता जेव्हा सगळे महाबळेश्वरलाच हनिमूनला जायचे.

संदीपः 'हमू नाही रे. पण सारखं काय तिथंच जायचं?'

मी: 'अरे तुला तर नुस्तं ढेरी वर करून पडायचंय, वर बियर ढोसायचीय तर महाबळेश्वर काय नि गोठा काय, काय फरक पडतो?'

मक्या: 'आपण मुरुड जंजिराला जाऊ या का?'

दिल्या: 'चालेल. मी गाडी बुक करतो. किती सीटर करू या?'

मी: 'नको. गाडीचं तू नको बघू. तुझ्या गाड्या कधीही येत नाहीत'

दिल्या: 'काही नाही हां! नेहमी व्यवस्थित वेळेवर आलेल्या आहेत'.. दिल्यानं असं बोलणं म्हणजे जकात नाक्यावर व्यवस्थित पैसे खाणार्‍या बापाला 'तुम्हाला पैसे कमवायची अक्कल नाही' असं त्याच्याच चिरंजीवांनी ऐकविण्यातला प्रकार!

मी: 'हो का? मागे तू चांगली टेंपो ट्रॅव्हलर बुक केली होतीस. आणि आली एक जुनी पुराणी फाटकी मॅटेडोर, सिटं उसवलेली.. ती पण २ तास उशीरा! नुसत्या प्रवासालाच दुप्पट वेळ लागला आपल्याला, त्यापेक्षा घोडागाडीनं कमी वेळ लागला असता'

दिल्या: 'अरे होतं असं क्वचित कधी तरी'

मक्या: 'आणि ती दुसरी गाडी तू आणलेली? ती रस्त्यात दोन वेळा बंद पडली.. ती?.. त्यामुळे आपण 'रास्ता रोको' करतोय असं जाणार्‍या येणार्‍यांना वाटत होतं.. त्याचं काय?'

दिल्या: 'अरे गाडीला प्रॉब्लेम कधीही येऊ शकतो. एकदा तू सांगितलेली गाडी आली नाही म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन गेलो होतो. आठवतंय? तेव्हा तुझी पण गाडी बंद पडली होती की! आपण समजून घेतलं पाहीजे!'.. हा भुईनळा का त्या गाडिवाल्यांचा इतका कैवार घेतोय?

संदीपः 'डिझेलची गाडी नको. मला लागते'.

परत, सरांना 'सर'पण देणार्‍या ऑफिसातल्या माणसांपैकी एक, सरांची सही घेऊन गेला.

मक्या: 'मग रेल्वेने जाऊ या'

मी: 'पण बुकिंग तू करू नकोस. मागच्या दिवाळीत तू या वर्षीच्या दिवाळीच्या तारखांप्रमाणे बुकिंग केलं होतंस ते कुणाचंही कुटुंब विसरणार नाही. सगळा प्रवास मुंबईच्या लोकलच्या प्रवासासारखा वाटला होता. आठवतंय ना?'

मक्या: 'अरे तो एजंटाचा घोळ! मी काय करणार त्याला?'

मी: 'सांगितलं ना? बुकिंग तू करू नकोस.'

दिल्या: 'अरे पण मुरुड जंजिर्‍याला रेल्वे कुठे जाते? उगीच भांडू नका! आपण आपल्या गाड्या काढू!'

संदीपः 'गुड! पण एमटीडीसीच्या हॉटेलांमधे नको हां रहायला. कसली भिकार असतात!'.. हा संदीप म्हणजे एक 'वात'कुक्कुट आहे अगदी!

मक्या: 'बरं! मुरूडचं हॉलिडे इन मिळतंय का बघतो'

संदीपः 'अरे वा! तिथे हॉलिडे इन झालंय? मस्त!' बिच्यार्‍याला फिरक्या पण कळायच्या बंद झाल्यात!

दिल्या: 'हो! शिवाजी राजे जंजिर्‍याच्या इन्स्पेक्शनला आले की तिथेच रहायचे. त्यांच्या साठी तिथला महाराजा स्विट राखीव असायचा!'

मी: 'ए आरे, पावसाळ्यात कसले कोकणात जाताय? मी नक्कीच नाही येणार!'

संदीप: 'मुरूड नको? आयला एक साधी ट्रिप ठरवता येत नाही आपल्याला अजून?'

सगळेच थोडा वेळ शांत पडले. जांभया अनावर होत होत्या. शिर्‍यात काय घातलं होतं कुणास ठाऊक! अचानक मक्याच्या डोक्यात स्पार्क पडला.

मक्या: 'अरे नुस्तच पडायचंय, बियर ढोसायचीय तर पुण्यातल्याच एखाद्या हॉटेलात का नाही रहायचं?'

याला म्हणतात चाकोरी बाहेरचा विचार! आधी उगीचच विरोधासाठी विरोध केला तरी बाकीच्यांना पण तो पटलाच आणि आमची ट्रिप मुळशी जवळच्या एका रिसॉर्ट मधे सुफळ संपूर्ण झाली. ते व्हायचं एकमेव कारण म्हणजे ट्रिपला जाऊन नक्की काय करायचं हे सगळ्यांना क्लिअर होतं.. नो इफ्फस अँड बट्स!

वास्तविक, भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे बघून साळिंदरांना न्यूनगंड येतो. कारण नक्की कुठे जायचं, कधी जायचं, का जायचं, कोणी कोणी जायचं नि काय काय पहायचं हे सर्वानुमते ठरवायचं म्हणजे सत्राशे साठ सुयांच्या नेढ्यातून एकदम दोरा ओवण्याइतकं जटिल.. आणि ते जमलंच तर ती ट्रिप ठरवल्याप्रमाणे होणं म्हणजे सोन्याहून पिवळं, साखरेहून गोड, हिमालयाहून उत्तुंग वगैरे वगैरे! कारण, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा/कल्पना केवळ ग्रुपने जायचं म्हणून एका चौकटीत बसवता येत नाहीत. एखाद्या फॅमिलीची ठरलेल्या सर्व ठिकाणांना पसंती नसते, काहींना कमित कमी पैशात जास्तित जास्त बसवायचं असतं, काहींना ठरवलेली हॉटेलंच आवडत नाहीत, काही लोक इतर जनता वेळेवर तयार होत नाही म्हणून स्वतः मुद्दाम आणखी उशीर करतात.. अशी एक ना अनेक लक्तरं निघायला लागतात.. ट्रिप नंतर हळूच अमुक अमुक असतील तर आम्ही पुढच्या वेळेला येणार नाही अशा सूचना वजा धमक्या ऐकाव्या लागतात! म्हणून, 'काँप्रमाईझ मोड' मधली ट्रिप यशस्वी होत नाही.

एकूण काय? तर ट्रिपचा विषय निघाला की माझा मेंदू ट्रिप होतो आणि भटकंतीची होते भरकटंती!!

-- समाप्त --

गुलमोहर: 

मस्त Happy

अरे तुला तर नुस्तं ढेरी वर करून पडायचंय, वर बियर ढोसायचीय तर महाबळेश्वर काय नि गोठा काय, काय फरक पडतो>>>>> सर्वात आवडलेलं वाक्य Biggrin गोठा???? Biggrin

>>वास्तविक, भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे बघून साळिंदरांना न्यूनगंड येतो.

Rofl

चिमण,
नेहमीप्रमाणेच लेख एकदम हिट्ट Lol Rofl खूप हसले....
शाब्दिक कोट्या तर एक से एक आहेत, तु एखादी दर्जेदार विनोदी मालिका सहज लिहशील यात शंका नाही.

हमू Biggrin

Pages