परी आणि भूताची गोष्टं ---- जयनीत दीक्षित

Submitted by जयनीत on 26 June, 2011 - 09:46

एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.
वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू.
भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा.
परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही.
भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही .
परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी!
भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस.
परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टी विसरतो काय कुणी?
भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की. आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही.
परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील?
भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच.
परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज!
भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील.
परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना?
भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून.
परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील?
भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल.
बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही.
नाही फिरवणार! भूत म्हणाले.
मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली. परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले.
माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.
अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला.
सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात?
भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले. ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण!
पण! पण काय? परी म्हणाली.
हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.
(समाप्त)

गुलमोहर: 

Happy

खुप आवडली कथा.माझ्या साठी तरी खुप स्पुर्थीदायक आहे.
<<विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात.>>

ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. >>>

जयनीत आपल्या जवळजवळ सर्वच कथा-लघुकथा मी वाचल्या आहेत, त्यातच ही कथा अगदी मनापासुन आवडली. पुढेही अशा रचनेची आपल्याकडुन अपेक्षा आहे.

माझ्या तर्फे आपणास खुप खुप शुभेच्छा..! Happy

धन्यवाद!

चातकाशी सहमत.
जयनीत सहिच जमली आहे ही कथा.........कारण आयुष्याच सार सांगितल तु ह्या लघु कथेत.
>>अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. <<
झक्कास लाईन्स.......

>>परी आणि भुताचा संवाद(ओळखणार, नाही ओळखणार) लांबल्यासारखा वाटतो.
अनुमोदन. पण कथा खूप खूप आवडली. मस्तच

सगळ्यांना मना पसुन धन्यवाद. आणि जो संवाद लांबल्या सारखा वाटतोय त्याचे सुध्धा पुर्नलेखन करील. तो मलाही खटकत होताच. परत एकदा सगळ्यांचे मनापसुन धन्यवाद.

जयनीत आपल्या कथा छोट्या पण मार्मिक असतात. अगदी रविंद्रनाथांच्या गातांजली सारखे. ६० पानी पुस्तक पण नोबल पारितोशिक विजेते.

अतिशय मार्मिक कथा
<<जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.>>
फारच सुंदर कथासार
माणसांना एकमेकांबद्दल जेव्हा विश्वास वाटायला लागेल तेह्वाच भीती त्याच्या मनातून हद्दपार होईल .
खूपच छान

थोड्या शुद्धलेखनातल्या त्रुटी सांगू का ?
<<मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील.>>च्या ऐवजी
मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करीन . त्याला माझ्या राज्यात नेईन , त्याला छान सगळीकडे फिरवीन . मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन .>
अस पाहिजे.वाचताना बरोबर वाटत नाही. बाकी सगळी कथा अतिशय उत्तम आहे.

आवडेश

शशांक, सृष्टी, पद्मजा डॉ. अभिराम इतकी जुनी कथा शोधून काढून वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.