अपूर्ण स्वप्ने उरी हजारो

Submitted by निशिकांत on 23 June, 2011 - 05:55

अपूर्ण स्वप्ने उरी हजारो रडावयाची, हसावयाची
करावया पाठलाग त्यांचा हवी तयारी उडावयाची

सुडोल बांधा, सतेज कांती हवीहवीशी जगास सा-या
उगाच का जाहिरात करता उद्याच गोरे दिसावयाची ?

तणाव इतका प्रचंड आहे उदास सारे सभोवताली
अनेक करती उगाच धडपड क्लबात जाउन हसावयाची

चढाव गेला, उतार आला, तनामनाने विरक्त व्हावे
जडीबुटीने कधी उभारी मिळेल का वाढत्या वयाची ?

वृथाच लंबोदरास केल्या नमून मी सर्वदा विनवण्या
प्रसन्न नाही कधी, तरीही मलाच उर्मी पुजावयाची

नसून चणचण, असून अडचण,घरात माझी जयास वाटे
तयास सांगा मला न इच्छा अता जराही जगावयाची

दिवाळखोरी घरात येता, नवीच मजला खुषी मिळाली
यतीम झालो मला न आता जकात आहे भरावयाची

जमेल तैसे जगून झाले झकास सारे म्हणून हसतो
उगाच नाही मला कुणाची कधी शिकायत करावयाची

विचार दोलायमान माझे, समुद्र "निशिकांत"ला खुणावी
पुन्हा उसळली मनातली ती जुनीच आशा सरावयाची

निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३

गुलमोहर: 

काका,

नसून चणचण, असून अडचण,घरात माझी जयास वाटे
तयास सांगा मला न इच्छा अता जराही जगावयाची

जमेल तैसे जगून झाले झकास सारे म्हणून हसतो
उगाच नाही मला कुणाची कधी शिकायत करावयाची
हे दोन फार आवडले..

नसून चणचण, असून अडचण - आह!!
Happy

तणाव इतका प्रचंड आहे उदास सारे सभोवताली
अनेक करती उगाच धडपड क्लबात जाउन हसावयाची

सुभान अल्लाह!!!

दिवाळखोरी घरात येता, नवीच मजला खुषी मिळाली
यतीम झालो मला न आता जकात आहे भरावयाची

क्या बात है...

चढाव गेला, उतार आला, तनामनाने विरक्त व्हावे
जडीबुटीने कधी उभारी मिळेल का वाढत्या वयाची ?

वाहवा...तुमच्या गझलेत तुम्ही फार छान मूड जपलाय आणी जीवनाचा इन्द्रधनुष्यच रेखाटलाय

विचार दोलायमान माझे, समुद्र "निशिकांत"ला खुणावी
पुन्हा उसळली मनातली ती जुनीच आशा सरावयाची

सरावयाची असेच म्हणायचे असावे निशिकांत यांना.

जी आशा सरणारी आहे,ती मनात पुन्हा उसळली अशा अर्थाचा मिसरा.

छान रचना काका.

<जमेल तैसे जगून झाले झकास सारे म्हणून हसतो
उगाच नाही मला कुणाची कधी शिकायत करावयाची>खास...उर्वरीत शेरही छानच म्हणा.

नमस्कार , मी प्रशांत धामणगांवकर, SBH LATUR MAIN.
B S मला ओळखतात (सोलापुर) .
मी बेफिकीरजींनी दिलेल्या व्रुत्तांतात विचारणा केली होती.

नम्स्कार निशिकांतजी
आपल्यामुळेच मी माबोवर लिहीण्याचा प्रयत्न करत आहे

तणाव इतका प्रचंड आहे उदास सारे सभोवताली
अनेक करती उगाच धडपड क्लबात जाउन हसावयाची
शेर छान जमला

नसून चणचण, असून अडचण,घरात माझी जयास वाटे
तयास सांगा मला न इच्छा अता जराही जगावयाची >>> निशिकांतजी मस्तच

अजून चांगली करता आली असती ही गझल... विचार करावा ....

वा!!