गेले मुंडे कुणीकडे..

Submitted by असो on 22 June, 2011 - 14:55

चला चॅनेलवाल्यांना दळण दळायला मुद्दा मिळाला अशीच भावना सध्याच्या भाजपामधील घडामोडींबाबत होणा-या वार्तांकनामुळे झाली होती. पण एक तर वेळ जायला हवा, कुठल्याही चॅनेलवर काहीच पाहण्यासारखं नाही म्हटल्यावर स्टार न्यूज लावून बसलो.

वेगवेगळ्या मुलाखतींमधे विलासरावांनी दिलेली मुलाखत लक्षणीय ठरली. "तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. मी काय बोलणार त्यावर ? असं मतप्रदर्शन करणं योग्य नाही. "

हे खरच खूप भावलं. विशेषतः ज्या पक्षाबाबत हे वक्तव्य त्यांनी केलं त्या पक्षातले लोक म्हणजे इतरांच्या प्रश्नात केवळ चोचच नाही तर संपूर्ण शरीरच घुसळून घेताना दिसतात. काहीही असो, भाजपामधे घडणा-या घडामोडींनी आनंद वाटावा अशी परिस्थिती नाही. देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

राज्य असो कि केंद्र, भ्रष्टाचार, अनाचार, स्वैराचार, गुंडागर्दी, माफियाराज चालू आहे असं दिसतं. लवासा असो, येरवड्यातल्या स. क्र. १९१ मधील ३२६ एकर शासकिय जमीन ( येरवडा जेल आणि मेंटल हॉस्पिटलसह) एका पुढा-याच्या ट्रस्टच्या नावे करण्याचं प्रकरण असो, आदर्श घोटाळा असो, लोहगाव येथील लष्कराची सत्तर एकर जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचे कारस्थान असो.... यादी संपता संपत नाही. केंद्रात याहून वेगळी परिस्थिती नाही. वेगवेगळ्या स्वराज्य संस्थात बिल्डरराज सुरू आहे. बागा, शाळा, मैदाने, नागरिक सुविधा केंद्रे, करमणुकीसाठी नाट्यगृहे, सिनेगृहे, सभागृहे यांच्यासाठी जागा शिल्लक ठेवायची तयारीच दिसत नाही. अनागोंदी या शब्दाचा अर्थ काय आहे हे पुण्यासारख्या ठिकाणी अनुभवता येतंय.

या परिस्थितीत विरोधी पक्षाचं काम चिंताजनक आहे. न्यायालयात केसेस टाकणे, पुरावे समोर आणणे, संसदेत पुराव्यासहित प्रकरणं उघडकिला आणणे यातलं काहीच होताना दिसत नाही. विरोधी पक्षनेत्याबद्दल पत्रकार चांगलं बोलत नाहीत. सत्ताधारी पक्षातीलच एक गट त्यांना कागदपत्र पुरवतो, विरोधी नेता पत्रकार परिषद घेऊन आरोप करतो.. मग आरोपी आणि विरोधी नेता यांचं एक स्नेहभोजन होतं आणि इथे कुठे धूर निघत होता याचा मागमूसही राहत नाही. सरकारला आपण जनतेचे विश्वस्त आहोत ही जाणीव पदोपदी करून देण्याचं काम आज विरोधी पक्षाकडून होत नसल्याने आज कधी नव्हे ते अण्णा, बाबा अशा कमजोर आणि अप्रगल्भ लोकप्रतिनिधींचं पीक आलेलं आहे.

एक विचारधारा म्हणून आपण काँग्रेसला मानत असू, राष्ट्रवादीला मानत असू, शिवसेनेला मानत असू, मनसे, भाजप , कम्युनिस्ट किंवा रिपाईला मानत असू.. विरोधी पक्ष म्हणून भाजपाचं महत्व प्रांजळपणे मान्य केलं पाहीजे. एखादा पक्ष, व्यक्ती यापेक्षा राष्ट्रीय हिताकडेच लक्ष द्यायला हवं.

भाजपाच्या समस्येचं नाव गोपीनाथ मुंडे आहे हे सांगायची गरज नाही. मुंडेंवर ही वेळ का यावी यावर आतापर्यंत वागळे आदि प्रभॄतींनी उसाचा चावून चोथा केला असेल. ही वेळ प्रत्येकावर येते. पण म्हणून जिथे सध्या घुसमट होतेय असं वाटतं तिथून दुसरीकडे जाऊन प्रश्न सुटणार आहेत का हे पाहणं सर्वात महत्वाचं ठरतं. मुंडे ही एक केस स्टडी आहे. बदलत्या सामाजिक, राजकिय परिस्थितीची. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आणि पक्षीय अभिनिवेश विसरून एक अभ्यास म्हणून आपण पाहणार असू तर व्यक्तिगत जीवनात देखील आपल्याला घेण्यासारखं काहीतरी या मंथनातून मिळेल अशी आशा वाटते.

पूर्वी नाराज नेत्यासाठी इतर पक्ष गळ टाकून बसायचे. आज मात्र मुंडेंसारखा नेता नाराज असूनही गळ टाकला गेला नाही. यामागे काय कारण असावं ? काँग्रेसची तत्वप्रणाली असं कुणी म्हटलं तर तो एक छानसा विनोद होईल !

खरं म्हणजे नारायण राणेंना साळसूदपणे काँग्रेसमधे जा असा सल्ला देणारे शरद पवार हे किती धूर्त आहेत हे आज कळतं. त्या अनुभवातून काँग्रेस शहाणी झाली असावी. महत्वाकांक्षी राणेंचं उपद्रवमूल्य काँग्रेसला सळो कि पळो करून सोडणारं होतं. असंतुष्ट व्यक्तीला एकदा सहानुभूती मिळते, पुन्हापुन्हा नाही हे राणेंना कळालं नाही. शिवसेनेते त्यांनी बंडाचा झेंडा उभारला तेव्हां पक्ष उभारणीच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली. पण नवीन घरात जाऊन सूनबाईने उद्यापासून माझ्या नियमाने घर चाललं पाहीजे असा आग्रह धरणे व्यवहार्य ठरतच नाही. परिणामी राणेंचे उमेदवार पाडण्यात काँग्रेसच्या शिलेदारांनी धन्यता मानली.

याच पार्श्वभूमीवर मुंडेचं बंड पाहीलं पाहीजे. आज ते अस्वस्थ असले तरी एकेकाळी पक्षात ते सर्वेसर्वा होते. ते थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राणेंपेक्षा ते उंचीने ( सर्वच बाबतीत) मोठे आहेत. असा नेता पक्षात आला तर काँग्रेसमधे ज्यांची अडचण होणार आहे त्यांनीच काँग्रेस हायकमांडला उलटपुलट सल्ले दिले असण्याची शक्यता आहे. पक्षातलेच लोक पक्षाचा फायदा होऊ देत नाहीत ते असं. सगळीकडं हेच तर चाललंय. मग ते इतर पक्ष असोत, कॉर्पोरेट विश्व असो, साहीत्य मंडळं असोत, नाट्यपरिषद असो कि सोसायटी ! माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो आणि तो सुरक्षित राहत असेल तर मग संस्थेचा स्वार्थ पाहतो. संस्था बदलता येते स्वार्थ नाही !

काँग्रेस निवडणुका कशी जिंकते हे शहरी माणसाला कळत नसलं तरी मुंडेंना कळतं. सत्तेच्या त्याच नाड्या त्यांच्याही ताब्यात ब-यापैकी आहेत. त्यातून ते लोकनेते आहेत. आज कोंग्रेसमधे एकही लोकनेता नाही. आपापल्या मतदारसंघाचे खुजे पंतप्रधान असं या पक्षाचं स्वरूप आहे तर संस्थानिकांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी ओळखली जाते. या चौकटीत मुंडेचं स्थान कुठेय ? खुज्या लोकात गेल्याने मुंडेंना अपशकून फार झाले असते. मुंडेंच्या मागे भाजपाचे बरेचसे लोक गेले असते तर सर्वात जास्त समर्थक असलेला पक्षातील एकमेव नेता असं त्यांचं पक्षातलं स्थान झालं असतं. सेनेने तर तुमच्यासाठी आमच्याकडे जागा नाही असं स्पष्ट सांगत प्रांजळपणा दाखवला. मनसे नवीन आहे. राष्ट्रवादीत अनेक समर्थ नेते आहेत. मुंडेंच्या हे लक्षात आलं असावं आणि बंड शमलं असावं.

प्रत्यक्ष व्यवहारात राष्ट्रीय हित वगैरे गप्पाच राहतात. लोक आपल्या संस्थेचं हित पाहू शकत नाहीत ते राष्ट्राचं काय हित पाहणार ? मुंडेंच्या या बंडाने सर्वच राजकिय पक्षांची संस्कृती चव्हाट्यावर आणली असली तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन वर म्हटल्याप्रमाणे इतरही क्षेत्रासाठी ही केस स्टडी लागू व्हावी.

इतर अनेक राज्यात सत्ता आलटून पालटून दिली जातेय. महाराष्ट्रात तसं होत नाहीये. त्यातून जहागि-या निर्माण होताहेत. ही वतनं , या जहागि-या खालसा करण्यात नेतृत्व अपयशी ठरत असताना मुंडेंच्या बंडाने विरोधाची धार क्षीण केली हे निश्चित.

युतीची ताकद कमी झालीये असं नाही. युतीच्या मतांमधे आणि काँग्रेसच्या एकत्रित मतात तीन टक्क्यांचा फरक आहे. मनसेमुळे तो फरक वाढला. गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष युती करता न आल्याने रिडालोसच्या मागे युतीने ताकद उभी केली. पण वजाबाकी करूनही मनसे प्रभावी ठरला. त्यामुळेच निव्वळ वजाबाकीवर समाधान न मानता रामदास आठवलेंना आपल्याकडे घेऊन युतीने बेरीजही केलीय. आत्ताच्या सरकारविरोधी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत. जनादेश यातून स्पष्ट होणार आहे. अशा वेळी मुंडेंनी निवडलेली वेळही बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.

आपणही जीव ओतून काम करतो. संस्थेला वर यायला हातभार लावतो. आपल्या शब्दाला वजन येतं. तोपर्यंत आपल्याला ती सवय लागून जाते. नोकरी मिळेपर्यंतचा दिवस आणि आत्ताचा दिवस यादरम्यान पुलाखालून पाणी वाहून गेलेलं असतं. अचानक बाहेरून नवीन बॉस येतो आणि मग त्याच्या हाताखाली काम करताना त्याचे हुकूम मानताना आपणच आपली घुसमट करून घेतो. संस्थेला मोठं करणं याचसाठी तर आपण इथं आहोत याचा विसर पडतो आणि अहंकार जागा होता. अहंकारी व्यक्ती विवेकाने काम घेईल असं नाही.

याचीच दुसरी बाजू म्हणजे संस्थेसाठी झटणा-याला नव्या आलेल्या अहंकारी बॉसने वाळीत टाकून संस्थेचं नुकसान करणे. या प्रकरणात संबंधिताने काय करावं हा खरा प्रश्न आहे. मॅनेजमेंटमधे संबंधिताला व्यक्त होण्यासाठी योग्य ते व्यासपीठ उपलब्ध नसेल तर मग समस्या खरंच जटील होत जाते. राज ठाकरे यांनी थोड्याफार प्रमाणात या प्रश्नाचं उत्तर दिलंय आणि कर्तबगारी दाखवल्यानं त्यांचा निर्णय योग्यच होता हे सिद्धही केलंय.

मुंडे पक्षात राहून नाराजी सोडून देऊ शकतील ? त्यांचं समाधान होईल ? कि त्यांनीही राजमार्गाने जावं ? जाऊ द्या ना, असंही आपल्याला कोण विचारतो ? तज्ञ बसलेत दळण दळायला. आपल्यापुढे कित्येक महत्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. मूंडे, देशमुख, राणे, पवार, सोनिया गांधी, अडवाणी इ. इ. थोडीच ना ते सोडवायला येणारेत ?

उद्या सकाळच्या मिटींगची तयारी करण्यासाठी हा लेख आता आटोपता घेतो. Happy

जयहिंद !!

अनिल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कधी नव्हे ते अण्णा, बाबा अशा कमजोर आणि अप्रगल्भ लोकप्रतिनिधींचं पीक आलेलं आहे.>>> असहमत.

बाकी मुंडेंनी आपलं फारच हसं करुन घेतलय सगळ्या भानगडीत. loss of potential....

विरोधी पक्ष म्हणून भाजपाचं महत्व प्रांजळपणे मान्य केलं पाहीजे.>>>> तेच तर भाजपला करता येत नाहीय म्हणुन यावेळी काँग्रेस निवडुन आलीय. जर खरोखर भाजपला सत्तेवर यायच असेल तर पहिल्यांदा चांगला विरोधी पक्ष म्हणुन काम करावे लागेल.

ज्या भाजपात ३० वर्ष यांनी काम केलं, पक्षउभारणी केली, काँग्रेसविरुध्द लढले (३० वर्ष)
त्या भाजपात आता मान मिळत नाही, कोणी विचारत नाही अशी कारणे सांगून बंड करायचे, स्वतःचे महत्व वाढवायचे. वरुन काँग्रेसमधे जाण्याची तयारी करायची.
मग इतके दिवस ज्यांच्या विरोधात लढलात (?) ते सगळे वाया गेले, असेच म्हणावे लागेल.
मग हे लढ्ण्याचे नाटक कश्यासाठी ?

एव्ह्ढ मात्र खरं की, गोपिनाथरावांची पत आता भाजपात नक्कीच उतरली. महाराष्ट्रातही त्यांच्या सोबत पक्षांतर करण्यास जास्त आमदार उत्सुक नव्ह्ते.

बाकी मुंडेंनी आपलं फारच हसं करुन घेतलय >> सहमत.

भाजपामधे घडणा-या घडामोडींनी आनंद वाटावा अशी परिस्थिती नाही. देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. >>
असहमत. पक्ष कोण्या एका व्यक्तिवर विसंबून नसतो. जरी गोपिनाथराव कॉंग्रेसमधे गेले असते तरी (कमकुवत)भाजपाला महाराष्ट्रत जास्त फरक पडला नसता. आणि देशाच्या दृष्टीने हि फार मोठी घटना झाली असती असे वाटत नाही.

सुंदर विश्लेषण आहे. संस्था, कंपन्यांमधे होणार्‍या गोष्टींची तुलना आवडली. या सगळ्या गोष्टींमधे ह्यूमन एलेमेंट महत्त्वाचा असतो, तो यात बरोबर आला आहे.

गडकर्‍यांना कोंडीत पकडण्या साठी ही हे नाटक असेल.. गडकरींना हे प्रकरण नीट हाताळता आले नाही... सुषमा स्वराज, अडवाणी ह्यांना प्रत्येक बाबतीत गडकरींना मदत करावी लागते हे दाखवण्यात ते यशस्वी झाले..

आमदारकी मिळुन जेमे तेम दिड वर्ष होतय. अश्यावेळेला कोण पक्ष सोडुन पक्षांतर बंदिच्या नियमात आमदारकी अडकवणार ?

मुंडेंच टायमिंग चुकल खर.

शेवटी अ( ह्?)स होत.

काँग्रेस काय किंवा भाजपच काय
शेवटी अ( ह्?)स होत.

गटा तटांना संतुष्ट करताना
जनहित साधायच तेव्हड राहुन जात

सत्ता की तत्व या द्वंद्वात
फक्त सत्ता या तत्वाचा जय होतो.

संविधानिक असो किंवा पक्षांतर्गत
फक्त सत्तेसाठी संघर्ष होतो

रथयात्रा संघर्ष यात्रा
सत्तेसाठी सगळ्या मात्रा

शेतकरी उभा जळतोय तेथे
सामर्थ्य नाही मुळी गात्रा

मुंडे तळागाळातून वर आलेले व लोकाधार असलेले नेते आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा आमदार व १ दा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

गडकरी आजवर कधी महानगरपालिकेची निवडणूक सुध्दा लढलेले नाहीत. ते कायम मागच्या दाराने (विधानपरिषदेत) आमदार होतात. त्यांच्यामागे जनाधार नाही.

गडकरींसारख्या अजिबात जनाधार नसलेल्या व्यक्तीला थेट राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष करणे हा एक मोठा विनोद आहे. त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी किंवा सुषमा स्वराज जास्त योग्य अध्यक्ष ठरले असते.

गडकर्‍यांची राजकारणाची स्ट्रॅटेजी नेहमीच चुकते. २००७ साली विदर्भात चिमूर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होती. हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. गडकरींनी तो हट्टाने शिवसेनेकडून मागून घेतला. न दिल्यास युती तोडण्याची धमकी दिली. शेवटी शिवसेनेने नितिनहट्ट मानला व भाजपच्या कल्याण मतदारसंघाच्या बदल्यात चिमूर भाजपला दिला. हमखास भाजप आमदार निवडून देणारा कल्याण मतदारसंघ गडकर्‍यांनी चिमूरसाठी शिवसेनेला दिला. नंतर चिमूरमध्ये भाजपचा पराभव झाला. म्हणजे कल्याणही गेला आणि चिमूरपण! २००९ मध्ये गडकर्‍यांनी मूर्खपणा करून गुहागर मतदारसंघ (जिथे भाजपचे डॉ. नातू १९८० पासून सातत्याने निवडून येत होते) शिवसेनेला दिला. त्यामुळे संतापलेल्या डॉ. नातूंनी बंड केले. शेवटी शिवसेना व नातू हे दोघेही पडले आणि ३० वर्षात पहिल्यांदाच राकॉ चा उमेदवार निवडून आला. गडकर्‍यांच्या मूर्खपणामुळे भाजपने कल्याण, गुहागर व चिमूर असे ३ ही मतदारसंघ घालविले.

आपण फार ग्रेट बॅकरूम स्टॅटेजिस्ट आहोत असा गडकर्‍यांचा गोड गैरसमज आहे. त्यांची स्टॅटेजी कायम अपयशीच ठरलेली आहे. स्वत:मागे कोणताही जनाधार नसताना मुंडेंसारख्या लोकनेत्याला पक्षातून घालविण्याचा ते गेली ५-६ वर्षे प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या मुलाचे लग्न एखाद्या संस्थानिकाच्या थाटात करून व त्यासाठी ५-६ कोटी रूपये खर्च करून गडकर्‍यांनी आपली एकंदरीत श्रीमंती दाखवून दिली आहे.

मुंड्यांऐवजी खरं तर गडकरींना पक्षातून काढले पाहिजे. एखाद्या आकड्यातून शून्य घालविले तर आकड्याची किंमत बदलत नाही. तसेच गडकरी गेल्यामुळे भाजपला काहिही फरक पडणार नाही. पण मुंडे बाहेर पडले तर महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व शून्य होईल.

अनिलजी,
लेख आवडला.
या लेखातुन तुमचा एकुण घडमोडींबद्दल दांडगा अभ्यास दिसतो
Happy

माझ्या मते मुंडेंच्या या सध्याच्या डावपेचामुळे/मागणीमुळे त्यांचा काही फायदा होईल न होईल पण त्यांच त्याहुन अधिक झालयं अस मला वाटतं.,शेवटी अशा दलबदलु नेत्यांवर जनता भरवसा ठेवताना थोडा विचार नक्कीच करेल.

मास्तुरे,

एक जमाना होता. संघर्ष यात्रा काढुन मुंडे यांनी रान पेटवले होते. त्याचे फळ म्हणुन उपमुख्यमंत्रीपद ४.५ वर्ष उपभोगले. त्याच्या जिल्ह्यात फक्त ते किंवा आता पंकजा निवडुन येते. बाकी सर्व राष्ट्रवादीचे आमदार आहेत. याला काय जनाधार म्हणायचा ?

फार काळ व्याजावर जगता येत नाही. मुद्दलात भर घालावी लागते.

भाजप हाच एक विनोद झालाय. लोकपाल. रामदेव इ प्रकरणे बघता सॉलिड कमबॅकची संधी आहे. पण पर्याय म्हणून जनतेने यांच्याकडे बघितले तर आण्णा चावतुया आणि नाना खांजळीना अशी आवस्था.

>>> फार काळ व्याजावर जगता येत नाही. मुद्दलात भर घालावी लागते.

मुंडे निदान स्वतः निवडून येऊ शकतात. गडकरी आयुष्यात कधी नगरसेवकाची निवडणूक सुध्दा जिंकलेले नाहीत. त्यांच्याकडे मुद्दलच नाही तर व्याज कोठून मिळणार? अशा शून्य जनाधार असलेल्या व्यक्तीने मोठा जनाधार असलेल्या दुसर्‍या नेत्याची कुचंबणा करून त्याला पक्षातून बाहेर पडायला भाग पाडावे हे भाजपचे दुर्दैव आहे.

गडकर्‍यांची आणि मनमोहन सिंगांची अवस्था सारखीच आहे. आयुष्यात कधीही निवडणू़क न जिंकलेले मनमोहन सिंग पंतप्रधान आहेत (त्यामुळे त्यांची बांधिलकी जनतेशी नसून त्यांना ज्यांनी त्या पदावर बसवले त्यांच्याशी आहे), तर, आयुष्यात कधीही निवडणू़क न जिंकलेले गडकरी प्रमुख विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

जनाधार नसलेल्यांना पक्षाध्यक्ष करण्याची भाजपची फार जुनी खोड आहे. वेंकय्या नायडू, बंगारू लक्ष्मण, कुशाभाऊ ठाकरे, जाना कृष्णमूर्ती इ. कधीही निवडून न आलेल्यांना अध्यक्ष करून भाजप अनेकवेळा पस्तावलेला आहे. तरीसुध्दा इतिहास विसरून अजिबात जनाधार नसलेल्या आणि महाराष्ट्राबाहेर कोणीही ओळखत नसलेल्या नितीन गडकरींना भाजपने आपले राष्ट्रीय अध्यक्ष बनविले. गडकरींना भाजपचा विस्तार देशभर करण्यापेक्षा महाराष्ट्रात आपले स्थान भक्कम करण्यातच इंटरेस्ट आहे. त्यासाठी मुंडेंसारख्या नेत्याला बाहेरची वाट दाखवून आपला मार्ग निष्कंटक करण्याची त्यांची योजना आहे.

गडकरींना अध्यक्ष बनविल्याचा भाजपला लवकरच पश्चाताप होईल. जेव्हा गडकरी मुंडेंबरोबरच भाजपची महाराष्ट्रात व देशात वाट लावतील तेव्हाच भाजप चाणक्यांचे डोळे उघडतील. पण तेव्हा खूपच उशीर झालेला असेल.

जनाधार नसलेल्यांना पक्षाध्यक्ष करण्याची भाजपची फार जुनी खोड आहे.
---- अध्यक्ष हा तालावर नाचणारा (कुणाच्या) बाहुला आहे...

मास्तुरेंच्या पोस्टाशी सहमत... मुंडेंना थोडाफार तरी जनतेचा आधार आहे.

जनाधार नसलेल्यांना पक्षाध्यक्ष करण्याची भाजपची फार जुनी खोड आहे.>>> जनाधार असलेल्या व्यक्तिला नाचवणे नाही म्हटले तरी जरा अवघड्च असते Happy

काँग्रेसला ती कला बर्यापैकी अवगत झाली आहे. Happy

थोडक्यात या देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाहीतर.. >>> असे घडू नये. काँग्रेसला पर्याय हवाच. राज्या राज्यात ते आहेत फक्त केंद्रात काहितरी सॉलिड व्हायला पायजे.

जनाधार नसलेल्यांना पक्षाध्यक्ष करण्याची भाजपची फार जुनी खोड आहे. >>>>> भाजपा काही करु शकत नाही, नागपूरातून आदेश आले की त्यांना झक मारत अध्यक्षाच्या नावाला संमती द्यावीच लागते.

केंद्रात काहितरी सॉलिड व्हायला पायजे.>>> सध्याच्या भाजपाकडे पाहता ते अशक्य कोटीतच मोडेल. खरं तर सध्याच्या परिस्थितीत भाजपाला सत्ताधार्‍यांविरुद्ध रान उठविण्याची संधी होती. पण गृहकलह मिटवण्यातच त्यांची सगळी शक्ती खर्च होताना दिसतेय.

ह.बा. यांच्या मताशी सहमत.

कॉन्ग्रेसलाच नव्हे तर कोणत्याही पातळीवरील निवडणूक प्रक्रियेमध्ये विरोधी पक्ष हा नेहमीच सक्षम असला तरच सत्ताधार्‍यांच्या बेलगाम सुटलेल्या वारूला प्रतिबंध बसू शकतो. म्हणजे उद्या दिल्लीत आजचा विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास कॉन्ग्रेस भुईसपाट होऊ नये. लोकशाही तत्वप्रणालीमध्ये "जनाधार" ही संकल्पना म्हणजे सत्तेवर आलेल्या पक्षास डोळे विस्फारून जाईल असा विजय मिळावा असे नसून देशाचा कारभार समतोल आणि विवेकाने चालविण्यासाठी विरोधी पक्षालाही जनतेच्यावतीने आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठी संसदेत सदस्यरुपी आवश्यक ती ताकद देणे गरजेचे आहे. लोकशाहीची निकोप वाढ त्याद्वारेच होऊ शकते.

आज श्री.नरेन्द्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि लोकप्रियतेविषयी भरभरून लिहिले बोलले जाते, असे असले तरी १८२ आमदार क्षमता असलेल्या भवनात कॉन्ग्रेससह ६५ आमदार विरोधी बाकावर असल्याने मोदीनाही 'मी म्हणेन ती पूर्व...' अशी भूमिका घेता येत नाही....(अर्थात ते तशी घेतही नाहीत, हा त्यांचा सूज्ञपणाच दर्शवितो.)

प्रमोद महाजन असताना त्यांच्या मदतीने मुन्डेनी खूप माजोरीपणा केलेला आहे. साहजिकच महाजन नसताना सूड म्हणून त्याना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न आता त्यावेळचे अन्याय ग्रस्त लोक करणारच.आतासुद्धा विनोद तावडे, मधु चव्हाण सारखा कष्टाळू आणि लोकप्रिय कार्यकर्ता सोडून हट्टाने मुन्डेनी त्या राजपुरोहितला मुम्बै भाजपचे अध्यक्ष केले. पुढे हा पुरोहित काय लायकीचा निघाला हे सगळानीच पाहिले आहे. सूर्यभान वहाडणे प्रदेश अध्यक्ष असताना ्महाजन-मुन्डे जोडगोळी त्याना जोड्याजवळ उभे करत नसत. वास्तविक चारित्र्याच्या दृष्टीने या जोडीची वहाडणे.न्च्या जोड्याजवळ उभे रहायची देखील लायकी नव्हती.
पुणे शहराध्यक्ष निवडताना त्यानी जो घोळ घातला त्याला तोड आहे काय?
पदाधिकारी नेमताना मु.न्डे.न्चे काही ’वेगळेच’ निकष असतात म्हणे....
असो. मु.न्डे आणि भाजप खड्ड्यात गेले तरी देशाला काय फरक पडतो?

बाजो

मान्य आहे. हे आता ऐकू यायला लागलय. प्रम असताना कुणाची बिशाद नव्हती असं बाहेर बोलायची. प्रम हे खूप उंचीचे नेते होते हा महाराष्ट्र भाजपाचा प्रॉब्लेम होता असं आता म्हणावं लागतय. त्यांच्यामुळेच भाजपाची उंची जास्त भासत होती पण ते झाड पडलं आणि अचानक झुडपं दिसू लागलीत. आता या झुडपांवर अन्याय झाला होता हे लक्षात येऊ लागलय ते हे सगळे नजरेत भरायला लागलेत म्हणून.

भाजपाचा कोणताही नेता घ्या, अगदी काँग्रेसचेही सगळे नेते घ्या. निवडणुकीला यातल्या कुणाचीही जाहीर सभा मुंडेंच्या सभेच्या वेळी त्याच गावात ठेवा आणि फरक पहा. महाजन देखील निवडून येत नसले तरी ते चांगले वक्ते होतेच. गडकरींच्या सभेला कार्यकर्ते आणि दोन पाच लोक जमतील असं वाटतं.

उमा भारतींचे भाजप प्रवेश आणि निष्कासन, गोपीनथ मुंडेंचं कुंपणाला शिवून माघारी येणं आणि शाहीद आफ्रिदीचे क्रिकेट संन्यास या गोष्टींसाठी वेगळा सांख्यिकी तज्ज्ञ हवा.