बोलक्या जखमा

Submitted by bnlele on 22 June, 2011 - 05:54

बोलक्या जखमा

ढगाळलेली, मरगळलेली संध्याकाळ.
गरगर फिरत्या वावटळी सारखे मनांत विचार. उदास आणि खिन्न करणारे.
बोलाव म्हटल तर जवळपास कोणीच नाही. सकाळ पासून फोनचा भरपूर वापर केल्याची जाणीव कायम.
काल मुंजी निमित्त घडलेल कौटुंबिक सम्मेलन आठवून भेटींचा आनंद घ्यावा वाटल. पण डोळ्यांसमोर वेगळीच दृष्य येऊ लागली.
रक्ताच्या नात्यांतूनही औपचारिक जवळिक दिसली आणि खेद-विषादाचे ढग-सावट उमटले. जिव्हाळ्याचा पाचोळाच सैरवैर उडताना दिसाला.
मन अजून उदास झाल.
कोळ्याच्या जाळ्यासारख संकीर्ण प्रत्येकाच जग. त्यातच रमंमाण! मुलगी-जावई,मुलगा-सून,आणि नातवंड यांच्या पलिकडे ते सर्व आता परके.
आजोबांना फक्त गोतावळ्यातील प्रत्येकाचा अभिमान. कारण म्हणाल तर त्यांची सांपत्तिक चंगळ आणि नातवंडांची शैक्षणिक प्रगती.कोणाची किती घरं आणि गाड्या आहेत, पगार किती लठ्ठ,येऊ घातलेल प्रमोशन-हुद्दा, उत्साहानी उगाळायचे हेच विषय. नवीन विषय असले तर ते म्हणजे नव्यान गिफ़्ट मिळालेले मोबाईल,रहात्याघरी आलेला ईंव्हर्टर, विदेषी गालिचा अशी अत्याधुनिक सामग्री आणि ते सर्व वैभव बघायला या अस आमंत्रण!
लहानपणी एकत्र कुटुंबात असताना भांडण-मस्ती,द्वेश-मत्सर, बढाई हे सगळ असायच पण थोडकंच. त्याची गोडी अजून्ही मनाच्या कोपर्‍यात रेंगाळते. वैभव काय? माहित नव्हत.दैनिक गरजा भागत होत्या. नजर मात्र आजूबाजूच दारिद्र्य टिपत होती.
दुर्भिक्ष्य नशिबी आलेली समवयस्क मुलं फ़ाटक्या-अपुर्‍या कपड्यात खांद्याला झॊळी घेऊन गल्ल्यागल्ल्यांतून भर दुपारच्या उन्हा-पावसात फ़िरताना पाहिली होती. हातात, भंगारातून उचललेल्या तुटक्या गाळण्यात तलम कापडाचा तुकडा टाकलेला. ते घेऊन घरांच्या-बंगल्यांच्या मोर्‍यांतून वाहून येणार्‍या अन्नाची शितं गोळा करीत. दोन लहानग्यांना ती सुबत्ता आपसात वाटून खाताना पाहिल्याच आठवल.
चक्री वादळात अशा अनेक आठवणींचा पाचोळा गरगरत पडताना दिसत आहे. नक्की कोणच्या झाडाचा ते कळायला हवं. खरं तर केला एवढाच पाचोळा ओळखू आला आणि वादळ आता क्षिण झालं आहे. म्हणून तूर्त थांबतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: