अवचिता परिमळू (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)

Submitted by दाद on 21 June, 2011 - 22:39

"काय म्हणतेस काय? सुशील तसा नव्हता गं. बा‌ईंनी सरांच्यामागे कसा वाढवलाय त्याला... आपण बघितलंय, ना."

भारतात गेलं की अनेक नक्की नक्की करायच्या गोष्टींमधली ही एक मैत्रिणींना फोन करून ताजी खबर मिळवणे. मग जमेल तसं जमेल तितक्यांना भेटणे. त्यात आपल्या जिव्हाळ्यातल्या कुणाचं काही ऐकू आलं की आनंदाचे चित्कार, दु:खाचे नि:श्वास.....
नवरा चिडवतो यावरून. म्हणजे त्याचं असलं काही नसतं असं नाही पण "अगं संदीपचं पोट किती सुटलय, बघितलस का, किंवा वश्याचे केस माझ्यापेक्षाही गळलेत...." यापलिकडे चित्कार किंवा नि:श्वास नसतात नवर्‍यांच्यात.

आत्ता बोलत होते ती सुनंदाशी. मी, सुनंदा आणि सोनल! आमचं अगदी घट्ट गुळपीठ होतं, शाळेत असताना. आमच्या आयांनी वेळोवेळी आपापल्या लेकी निवडून घरात खेचून नेल्या नसत्या तर एकमेकींना पोचवण्यात आमचं आयुष्य गेलं असतं हे आ‌ई म्हणते ते अगदी खरंय.

ज्या सातपुते बा‌ईंबद्दल बोलत होतो, त्या आमचं दैवत होत्या, म्हणजे झाल्या. बा‌ई फक्त आठवी ते दहावीचे मराठीचे वर्ग घ्यायच्या. कधी कधी इतिहास, भुगोलही शिकवायच्या. आम्हाला आठवीला होत्या. नंतर सर, म्हणजे बा‌ईंचे मिस्टर अचानक गेले. त्यातून सावरायला त्यांना सहा महिने लागले. त्यांचा म्हणे प्रेमविवाह होता त्यामुळे दोन्ही घरून काहीच मदत नव्हती. शाळेने खूप संभाळून घेतलं त्यांना. आणि सावरल्या, त्या ही.

"ज्ञानेश्वरांच्या दृष्टांतांचा ओव्यांत वापर" अशा प्रकारच्या विषयावर त्यांचा प्रबंधही होता. ही आम्हाला खूप नंतर कळलेली गोष्टं. कॉलेजात का नाही शिकवलत? तर, सुरुवातीला लहान मूल आणि घरून आधार नाही त्यामुळे घराजवळची म्हणून शाळेत शिकवू लागल्या. सर गेल्यावर तर सगळा उत्साहच संपला.

दहावीला बा‌ई मराठी शिकवायला आल्या. त्यांच कुंकू, मंगळसूत्राशिवायचं रूप आम्हा सगळ्यांनाच खुपलं. आठवीत द्यायचे मी त्यांना आमच्या बागेतलं फूल. लक्षात न ये‌ऊन पहिल्या दिवशी सुंदर गावठी गुलाबाची तीन चार फुलं मी अगदी अभिमानाने त्यांच्या समोर धरली. मागून मुलींच्या रांगेतून दबक्या आवाजातल्या हाका ऐकू आल्या तेव्हा उशीर झाला होता. बा‌ईनी हसून फुलं घे‌ऊन टेबलावर ठेवली. मी एकदम चेहरा पाडून जाग्यावर जा‌ऊन बसले. वर्गात थोडी कुजबूज आणि एकदम शांतता. अजून आठवतं, त्यानंतर बा‌ईंनीच, मलाच काय पण अख्ख्या वर्गाला कसं समजावून सांगितलं.
"कुंकू, मंगळसूत्र नाही म्हणून बिचकलात का रे बाळांनो?" या त्यांच्या ’बाळांनो’ ने पुंडातल्या पुंड विद्यार्थ्याचे कंगोरेही बोथट व्हायचे थोडे.

"आयुष्य म्हणजे बदल बरं का, शारिरीक, मानसिक, भौगोलिक सुद्धा. एकाचा दुसर्‍यावर होतो परिणाम. कधी वर वर तर कधी सखोल. आता, तुमचे सर गेले हा बदल, माझ्यासाठी सखोलच. पण तुमची मराठीची शिक्षिका म्हणून इथे उभी आहे ती उज्वला सातपुतेच, तुमच्या सातपुते बा‌ई, पूर्वीच्याच.
आता उद्या एक मस्तशी रिकामी बाटली आणते. ती ठे‌ऊया या टेबलावर. आणलेली फुलं वाटलं तर द्या शिक्षकांना, नाहीतर ठेवा बाटलीत. बाटलीतलं पाणी बदलायचं काम, वर्ग प्रमुखाचं. म्हणजे कसं अगदी रेगेसरांना सुद्धा फुलं देता येतील तुम्हाला...."

वर्गात खसखस पिकली. रेगे सर हे पीटी चे सर, भयंकर विनोदी. आणि नुकताच तुळतुळीत गोट केला होता तासून.

आम्हाला पसायदान होतं दहावीला. ते नुसतं म्हणून दाखवताना बा‌ईंचा रुद्ध झालेला स्वर अजून आठवतो. त्यानंतर ज्ञानेश्वरांवर किती किती बोलल्या बा‌ई. आमच्यातले काही जण अगदी भारावून गेले पण जेव्हा पाच्- सहा तास हो‌ऊनही पसायदानाच्यापुढे बा‌ई जा‌ईनात तेव्हा मात्र ’मार्क’ध्यायी मुलं, मुलींची आपापसात चर्चा सुरू झाली. आम्हीही त्यात ओढले गेलो. चांगले मार्कं मिळवून चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळायला हवा- हा ध्यास चूक नव्हे.

शेवटी बा‌ईंना सांगितलं ते विनय देसा‌ईने. विनय खरच हुशार होताच पण त्यामुळे सगळं चटक लक्षात यायचं त्याच्या, त्यामुळे थोडा मस्तीखोरही होता. काहीतरी उगल्या सुरू असायच्या त्याच्या. एक दिवस सरळ उठून त्याने सांगितलं, "बा‌ई, पसायदान उलटीकडून पाठ झालिये माझी. किती दिवस तेच तेच शिकवणार? बाकीचा पोर्शन पुरा करायचायचाय की नाही तुम्हाला?"
आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात भिती दिसत होती. हा जरा जास्तच बोलला असं वाटलं, पण कुठेतरी "बरं झालं. बा‌ईंना कुणीतरी सांगायलाच हवं होतं... बाकीचा पोर्शन गुंडाळणार बहुतेक बा‌ई...." असही वाटत होतं. बा‌ई एकटक त्याच्याकडे पहात त्याला बोलू देत होत्या.

"आजसुद्धा पसायदान असेल तर मला लायब्ररीत किंवा लॅबमध्ये बसून दुसरा अभ्यास करू द्या. तशी चिठ्ठी आणलीये मी बाबांकडून", एव्हढं बोलून सगळ्या वर्गाकडे विजयी नजरेने बघत विनय खाली बसला.

बा‌ईंनी सगळ्या वर्गावर नजर फिरवीत विचारलं, "विनय सारखं अजून कुणाकुणाला वाटतं?" बा‌ईंची नजर चुकवत जवळ जवळ सगळ्या वर्गाने हात वर केला.
हसून बा‌ई म्हणाल्या, "अरे, मग काहीच हरकत नाही. आपण यापुढे परिक्षेच्या दृष्टीनेच शिकू. विनय, उभा रहा. तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतं मला. ज्ञानेश्वर म्हटलं की मी थोडी वहावते हे खरंय. पण ज्या पद्धत्तीने तू माझ्याशी बोललास ते चूकच. काहीही झालं तरी मी तुमची शिक्षिका आहे आणि तुम्ही विद्यार्थी. तेव्हा मगाशी जे बोललास तेच, पण वेगळ्या, विद्यार्थ्याला शोभेल अशा भाषेत बोलू शकशील? परत?"

उभ्या राहिलेल्या विनयल काय करावं ते सुचेना, त्याचे कान लाल झाले. पण काहीच न सुचून तो इतकच म्हणाला, "बा‌ई, चुकलो, सॉरी'.
'नव्हे रे", बा‌ई म्हणाल्या , "माझी माफी नंतर. तुझी चुक दाखवतेय असं नको समजूस. तुझ्या धाडसाबरोबरच वर्गाला हे ही दाखवून दे की तू तुझी ती शक्ती योग्य प्रकारे वापरू शकतोस. हं... बोल"
यावेळी विचार करून विनय शांत स्वरात म्हणाला, "बा‌ई, पसायदानात शिकण्यासारखं खूप असेल. पण ते आपण वेगळा वर्ग घे‌ऊन शिकूया का? ज्यांना इच्छा असेल ते त्या वर्गाला सुद्धा येतील. आपल्याला उरलेला पोर्शन लवकरत लवकर पूर्ण करायला हवा, प्रिलिम्स अगदी जवळ आल्या आहेत."

"शाब्बास रे शाब्बास", बा‌ई त्याच्याकडे बघत म्हणाल्या. प्रत्येकाने सोडलेला नि:श्वास शेजारच्याला ऐकू आला. "मग मी असा वर्ग घेणार असेन तर कोण कोण ये‌ईल बरं?"
एकही हात वर झाला नाही, सगळ्यांच्या माना खाली होत्या. चोरून एकमेकांकडे बघणार्‍या मुलांकडे बघत हसून बा‌ई म्हणाल्या, "सावकाश सांगा. एका विद्यार्थ्यासाठीही असा वर्ग चालवेन मी"

मोठं झाल्यावर कळतय्- एव्हढ्या तेव्ह्ढ्या कारणासाठी अहंकार दुखावला की आपलं नातं, आपली पोझिशन, हुद्दा.. काय मिळेल त्याचा फणा काढून कसे दंश करतो आपण.... बा‌ई म्हणून विनयचा त्याच्या नावासकट उद्धार करण्याची सुवर्णसंधी होती सातपुते बा‌ईंना. पण शिक्षकाच्या कर्मभूमीपासून तिळभरही न हलण्याचं सामर्थ्य कशानं दिलं त्यांना? ज्ञानेश्वरांनी?

त्यादिवशी घरी सांगितला हा प्रसंग. माझे बाबा, त्यावेळी राग आला त्यांचा, त्यांनी नाव घातलं माझं त्या वर्गात. मी जातेय म्हणून आणि बा‌ई आवडतात म्हणूनही सुनंदा आणि सोनलही जॉइन झाल्या. आम्ही बा‌ईंच्या घरी जा‌ऊ लागलो आठवड्यातून एकदा. त्यांची बोलण्याची हातोटीच अशी की कधी गोडी लागली कळलच नाही.

दहावीच्या सेंड़‌ऑफला बा‌ईंना भेटून रडणारी बरीच मुलं होती. आम्ही भेटलो तेव्हा म्हणाल्या, "एss, तुम्ही कशाला रडताय? पुढच्या आठवड्यात भेटणार आहात ना?"
म्हटलं खरच की. बा‌ईंशी आम्हाला जोडणारा ज्ञानेश्वरी-वर्गाचा दुवा होताच.
... आणि आम्ही शाळा सोडल्यावरही जात राहिलो, जमेल तसं.
आम्हाला बा‌ईंशी ज्ञानेश्वरीने जोडलं होतं की, बा‌ईंनी आम्हाला ज्ञानेश्वरीशी.....

बा‌ईंच्या घरात समोरासमोर दोन कपाटं होती, गोदरेजची, आरशाची. त्यांच्या मध्ये सोनलला उभं केलं बा‌ईंनी. तिची अनेकानेक प्रतिबिंब पडली होती, पुढा अन पाठमोरी दोन्ही.
कानडा वो विठ्ठलू कर नाटकू
येणे मज लावियेला वेधू....
यातल्या "समोरा की पाठिमोरा न कळे..." चं निरुपण करताना त्यांनी वापरलेली युक्ती होती. त्यातल्या द्वैत-अद्वैत भाव वगैरे काहीच त्यावेळी कळलं नव्हतं. पण आम्हाला कळावं यासाठी त्यांनी केलेला आटापिटा लक्षात आहे.

असंच एकदा आमच्याशी बोलता बोलता घरात गेल्या. त्या बाहेर आल्या आणि आम्ही तिघीही "सूss" "सूss" करून, कुठुनतरी आलेला बकुळीचा सूक्ष्म वास घ्यायचा प्रयत्न करत होतो. थोड्यावेळाने बा‌ईंनी बकुळीच्या फुलांची परडी बाहेर आणली. बा‌ईंनी त्यादिवशी "अवचिता परिमळू..." इतकं सुंदर विशद करून सांगितलं!

बा‌ईंनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एकदा मी म्हटलं की "ज्ञानेश्वरांनी अशी उपमा दिलीये की..."
बा‌ईंनी मला हाताने तिथेच थांबवलं. "ज्ञानेश्वर उपमा देत नाहीत, दृष्टांत देतात" मग त्यांनी दृष्टांत आणि उपमा यातला फरक सांगितला. त्यात दिसून आलं त्यांनी पचवलेली ज्ञानेश्वरी आणि त्यातले दृष्टांत.

बा‌ईंचं सांगणं अस मोठं मनोहारी असे. बरेचदा त्यांची घरातली कामं, स्वयंपाक वगैरे चालायचा आम्हाला शिकवताना. त्यांचं सगळच करणं अतिशय नेटकं होतं. सगळ्यात मला आवडायचं ते त्यांच्या घरातलं देवायतन. स्वच्छ घासलेली देवाची पितळेची भांडी, लखलखणारं निरांजन आणि त्यातली संथ ज्योत. त्याच्या प्रकाशात "कर कटेवरी" घे‌ऊन उभी वीतभर उंचीचीच पांडुरंगाची मूर्त. तिच्यासमोर ठेवलेली ज्ञानेश्वरीची पोथी.

बा‌ईंची अजून एक गंमत आठवते मला. त्यांच्या पुजेत मला कधीच हार, फुलं दिसली नाहीत. बाहेर त्यांची बाग अगदी फुलांनी लवू जात असे. आम्ही गजरे करण्यासाठी, माळायला वगैरे विचारून फुलं घेतलेलीही आवडायची त्यांना. विचारलही मी एकदा. तेव्हा म्हणाल्या, "मी कोण झाडावरचं खुडून, फूल देवाला अर्पण करणार?, झाडंही त्याचंच, अन फूलही त्याचंच... ही बाग तरी मी कुठे फुलवतेय?.... माझी आपली मानसपुजा, हं. तिथेच, झाडावरच अर्पण आहेत सगळी फुलं त्याला."
त्यानंतर कधीही झाडावरलं फूल कुणी पूजेसाठी तोडताना बघितलं की बा‌ईंच्या मानसपूजेची आठवण येते.

मला आठवतं, एकदा शाळेच्या मैदानावर खेळ चालले होते. इतक्यात कुंपण तोडून दोन बैल कसे कोण जाणे पण उधळत पटांगणात शिरले. जाम पळपळ झाली. शाळेच्या चार पायर्‍या कशाबशा चढून धापा टाकत मागे वळून पहातो तर, मंजिरीला मिठी मारून बा‌ई तिथेच उभ्या होत्या. मंजिरी, पोलियोने अधू मुलगी, बाजूला बसून खेळ बघत होती, गडबडीने पळण्याच्या नादात बैलांच्या उधळणीच्या पट्ट्यातच आली. सगळे शिक्षक, शिपा‌ईसुद्धा पळाले शाळेच्या आसर्‍याला. बैल जवळ जवळ घसटून गेले बा‌ईंना पण इजा न करता.

आम्ही धावलो बा‌ईंकडे... तेसुद्धा बैल गेटमधून पूर्णपणे रस्त्यावर गेल्यावरच. मंजिरी बा‌ईंच्या गळ्यात पडून रडत होती आणि बा‌ई समजावत होत्या तिला.
त्या दिवशी संध्याकाळी बा‌ईंबरोबर घरी परतताना विचारलं, "बा‌ई, भिती नाही वाटली तुम्हाला?..." यावर त्या म्हणाल्या होत्या, "भितीही आपल्याच मनात आणि धीरही तिथेच. खरतर धैर्य म्हणजेच खरे खरे आपण. भिती वाटायला लागली ना, की आपल्या आत आपल्यालाच शोधायला सुरुवात करायची. सापडतो आपण, आपल्यालाच हळू हळू. जातो कुठे? मग भिती उरतच नाही"

किती किती शूर वाटल्या होत्या बा‌ई आम्हाला तेव्हा! मोठ्ठं झाल्यावर त्यांच्या एकेक उद्गारांचा खरा अर्थं कळायला लागला.

सुनंदा कॅनडात शिकत होती. तिथेच तिने स्वत:चं लग्नं स्वत: ठरवलं. शेखर सा‌उथ इंडियन, पण दोन्ही घरात सगळं पसंत होतं. लग्नाची तारिख चार महिन्यांवर आली आणि शेखरची आज्जी वारली. त्यांच्या रिती नुसार वर्ष.भर लग्न हो‌ऊ शकणार नाही असं त्याच्या आ‌ई-वडिलांनी ठरवलं. सुनंदा आणि शेखरने फक्त सुनंदाच्या घरी सांगून रजिस्टर लग्न करायचं ठरवलं. आशिर्वादासाठी म्हणून सुनंदाने बा‌ईंना कळवलं. त्यावर बा‌ईंचं आलेलं पत्रंही तिने दाखवल मला. अजून जपून ठेवलंय तिने ते.

"नंदा (बा‌ई सुनंदाला नंदा म्हणायच्या), आपल्या आवडत्या माणसाबरोबर प्रत्येक क्षण घालवण्याची तुझी आणि त्याचीही इच्छा, गरज मी समजू शकते. आयुष्याच्या ह्या सुंदर प्रवेशासाठी माझ्यासारख्या कुणा शिक्षिकेचा आशिर्वाद तुला आवश्यक वाटतो.... तुझ्या सासू-सासर्‍यांचा नाही? त्यांचा अधिकार मोठा आणि पहिला, नाहीका?
शेखरला सांग. म्हणावं, जा आणि आ‌ई-वडिलांना मनव. हट्ट कर, विनव, पाया पड. तू ही जा त्याच्या बरोबर. बोल सासू-सासर्‍यांशी, मान तुकवावी लागेल, काही ऐकून घ्यावं लागेल, तुला. एकमेकांवरल्या प्रेमासाठी हे कराल का?
त्यांना न कळवता लग्नं करणं हा सोप्पा मार्गं झाला- त्याला मार्ग नाही, पळवाट म्हणायची. आ‌ई-वडील मुलाच्या निकराच्या हट्टापुढे वाकतातच. माझा आशिर्वाद आहे, ते ऐकतील तुमचं.
आणि त्या उपरांत त्यांनी नकार दिल्यास निग्रहाने वर्षभर लग्नाशिवाय वेगळे रहा. तुमच्यावरचे संस्कार ते पार पाडायला बळ देतील तुम्हाला.
छोट्याशा का हो‌ईना पण खोटेपणावर सहप्रवासाचं शीड उभारू नका, अशी माझी विनंती आहे तुम्हा दोघांना.
नंदा, तुला मी भेट दिलेल्या नव्या कोर्‍या पुस्तकाच्या पहिल्याच पानाचा कोपरा फाटला होता, आठवतं? पण किती हिरमुसली होतीस तू? तुझ्या सहजीवनाच्या पुस्तकाचंन पहिलं पान संपूर्ण, सुंदर, निखळ आनंदाचं असावं असं मला वाटतं."

सुनंदाने शेखरला समजावलं होतं. तिचा समजुतदारपणा पाहून शेखर हलला होता मनातून. दोघे चेन्न‌ईला जा‌ऊन, शेखरच्या आ‌ई-वडिलांना भेटले. त्यांना मनवून त्याच ट्रिपमध्ये लग्नही पार पडलं. आपल्या ह्या निर्व्याज कृतीने सुनंदा सासू-सासर्‍यांच्या गळ्यातली ता‌ईत झाली. मुद्दाम वाट वाकडी करून दोघे बा‌ईंना भेटून, नमस्कार करून गेले होते.

गेल्यावेळी भेटले तेव्हा चार वर्षाच्या लेकाला घे‌ऊन गेले होत्ये बरोबर. किती आनंदल्या होत्या बा‌ई. त्यांना फोन करून विचारलं ये‌ऊ का भेटायला? त्यांच्या स्वरातच आनंद नुसता भरून वहात होता, "अग, विचारतेस काय? येच तू. जाव‌ईबापू असतील तर त्यांनाही घे‌ऊन ये. असं का करत नाहीस? जेवायलाच ये ना दुपारी."
"जाव‌ईबापूंची" मलाच अडचण झाली असती, म्हणून मी लेकाला घे‌ऊन एकटीच गेले, म्हटलं खूप खूप गप्पा होतील बा‌ईंशी. बा‌ईंना दारात वघून चरकले. किती वयस्कर, थकलेल्या दिसत होत्या, बा‌ई. काळाचे बरेच घाव-डाव वाजलेले दिसत होते शरिरावर, चेहर्‍यावर. पण त्यांचं ते निर्मळ हसू तसच होतं.
मी वाकले आणि सुखी रहाण्याचा आशिर्वाद मिळवला. मला वाकलेलं बघून लेकही "बाप्पाला" नमस्कार करायला वाकला त्यांच्यापुढे. त्यांनी त्याला वरच्यावर उचललं आणि गळ्यात आलेला आवंढा गिळत म्हणाल्या "यशस्वी व्हा".

"तुझ्यावर गेलेयत चिरंजीव, हो ना गं?" मी एव्हाना त्यांच्या पलंगावर बसले होत्ये पाय खाली सोडून दोन्ही पाय हलवत, अगदी दहावीत बसत होत्ये, तश्शी. माझ्याकडे बघून म्हणाल्या, "बदलली नाहीस फार".

बा‌ई आता रिटायर झाल्या होत्या. त्याच दोन खोल्यांच्या घरात रहात होत्या. सुनंदाने सांगितलं होतं की, सुशील त्यांच्याकडे रहात नाहीये. सुशीलच्या बायकोच्या "हाय" सोसायटीच्या कोणत्याच कोपर्‍यात बा‌ईंना जागा नाही. आत्ता नुक्त्याच झालेल्या कंपनी टेक ओव्हरमुळे सुशील माझ्या नवर्‍याच्या हाताखाली काम करत होता आता. निर्लज्जासारखा फोन करून त्याने बा‌ईंची ओळखही आठवून दिली होती.
पातोळे, फोडणीची मिरची घालून कालवलेला दहीभात, लेकासाठी मुगाचं वरण आणि पापड.... अगदी दहावीच्या दिवसांची आठवण झाली. हात ताटात तसाच सुकवत गप्पा मारत बसलो होतो.

यावेळी, आम्ही तिघींनी ठरवून शाळेला बा‌ईंच्या नावाने देणगी दिली होती. शाळेची कंम्प्यूटर लॅब अपग्रेड करण्यासाठी तिचा विनियोग केला गेला. हा उद्योग बा‌ईंना कळलाच होता. "शाळेसाठी केलत तेच पुरे गं, माझं नाव कशाला आणि" असं भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या.

लेक बर्‍यापैकी मराठी बोलतो हे पाहून त्यांना खूप बरं वाटलं. एरवी म्हणुन दाखव म्हटल तर हज्जार नाटकं करणार्‍या लेकाने खळखळ न करता पसायदान म्हटलं. "आ‌ई, बाप्पा कुठेय? कुठे बसून म्हणू?" या त्याच्या प्रश्नावर मी त्याला बा‌ईंसमोरच बसवला.
हात जोडून डोळे मिटून स्वच्छ उच्चारात त्याने म्हटलेलं पसायदान बा‌ईंनाच काय पण मलाही हलवून गेलं. कधी कधी काही स्थळ, आणि माणसं, रोजच्या आयुष्यातल्या साध्या घटनांनाही वेगळेपण जडवतात, हे पटलं. बा‌ईंनी त्याला उचलून मांडीवर घेतलं आणि आश्चर्य म्हणजे माझ्या हनुवटीला हात लावून मुका घेतला.
म्हटलं, "हे काय बा‌ई?" तर म्हणाल्या, "फुले वेचिता बहरू कळियासी आला.... बरं?" हे मुलाचं अन आ‌ईचं कौतुक अगदी अगदी सुखावून गेलं.

सहजच असं दाखवत सुशीलची चौकशी केली आणि विषय आलाच होता म्हणून धीर करून विचारलं, "बा‌ई, ... ह्यांना सांगून सुशीलला काही..." मला तिथेच थांबवत बा‌ई म्हणाल्या, "मनातही आणु नकोस असं काही. मी आहे तशीच ठीक आहे. शेजार पाजार छान आहे, तुमच्या सारखे विद्यार्थी, विद्यार्थिनी ये‌ऊन जा‌ऊन असतात. सुशीलही फोन करतो अधून मधून. तब्येत छानच आहे माझी. अजून काय हवं? अशी काय काळजी घ्यायची असते गं? आणि दीपकराव सुशीलला सांगणार की आ‌ईकडे बघ?...."

त्यांनी हे शब्दात मांडल्यावर मला जाणवलं की किती वेडेपणा करत होतो आपण!
"अगं जुलुमाने कुणावर प्रेम करता येतं का? अगदी आपली जबाबदारी सुद्धा जुलुमाने निभा‌ऊ नये माणसाने. कराल ते काम देवपुजेसारखं सहज असावं. आपल्या मुलाचं आपण केलं ही काय फुशारकी सांगण्याची गोष्टं? तसंच आ‌ई-वडिलांचं करायला हवं ही कुणी दुसर्‍याने सांगण्याची गोष्ट नाही. आतून यायला हवं आणि घडायला हवं ते. आणि असं बघ, त्याचेही स्वत:चे काही ना‌ईलाज असतील ना? ते जा‌ऊंदे... त्यापेक्षा एक सांगितलं तर करशील माझ्यासाठी?"
मी आतूर हो‌ऊन ऐकू लागले. बा‌ईंसाठी काहीतरी करण्याची संधी?

"तुला विनय आठवतो? विनय देसा‌ई?" बा‌ई म्हणाल्या.
"बा‌ई, विनय कुणाला आठवणार नाही? तुम्हीच त्यला "धाडसी विनय" नाव ठेवलं होतं, आठवतं? सगळ्यात हुशार हो तो. शाळेत पहिला आणि बोर्डात आला होता एस्स्सेसी ला. पण मी काही वेगळंच ऐकलय त्याच्या बद्दल. काही ड्रग्ज ...'

'ऐक. विनय ड्रग-बिग घेत नाही. पण पूर्णपणे दारूच्या आहारी गेलाय. वडिलांनी अती धाक ठेवला, आ‌ईने अती लाड केले, तो स्वत्: अती हुशार होता. कॉलेजातल्या एका मुलीने त्याच्या पैशासाठी त्याला खेळवला. असो... काय झाल ते झालं. आता आ‌ई-वडील दोघांनीही वार्‍यावर सोडलाय त्याला. मी सगळी लाज गुंडाळून गेले होत्ये विचारायला. दोनदा म्हणे कृपामयीत ने‌ऊन घातला. ही काय भाषा झाली का गं? आपल्याच पोटच्या पोराबद्दल असं म्हणताना...
आता तिशीत पोचलेला हा मुलगा... एक उमदं आयुष्य फुकट जातय. परवा रवी सांगत होता, ८७च्या बॅचचा, मायक्रोसॉफ़्ट्मध्ये आहे तो? त्याला स्टेशनवर गाठून पैसे मागत होता भिकार्‍यासारखे. कुठे जा‌ऊ शकला असता हा मुलगा, कुठे आणुन सोडलं त्याला... सोडतोय कोण कुणाला म्हणा... आपणच आपले जाबदार."

थोडकं थांबून चाचरत म्हणाल्या, "दीपकरावांच्या ओळखी आहेत..... आणि मागे तूच म्हणत होतीस की त्यांची कंपनी अशा संस्थांसाठी बरीच मदत करते म्हणून. विनयला अजून एक संधी मिळाली तर बरं हो‌ईल, गं. मुक्तांगण, कृपामयी सारखी एखादी संस्था असेल तर त्यात तुमच्या ओळखीने माफक दरात त्याचं व्यसन..."

मी बा‌ईंच्या हातावर हात ठेवला. "काळजी करू नका बा‌ई, मी बघते काय ते. आणि तुम्हाला कळवेन हं"
शब्द सहज निघून गेले तोंडातून पण मन दुसर्‍याच विचारात गुंतल. स्वत:साठी काहीही न मागता कुण्या एका दारुड्या विद्यार्थ्यासाठी जीव तुटत होता, बा‌ईंचा. इतका अभोगी जीव माझ्या बघण्यात नव्हता.

दीपकनेही नेट लावला आणि विनयनेही साथ दिली. त्या निमित्ताने बा‌ईंशी बोलणं झालं तेच काय ते. मग आमच्या घरात आजारपणं सुरू झाली. रोजचं निभेना सरळपणे तिथे बा‌ईंचं काय लक्षात ठेवणार. थोडा जगाशी संबंध तुटल्यासारखंच झालं. मध्ये सुनंदाचा मेल आला बा‌ईंना बरं नसल्याचा. त्यावरही काही करता आलं नाही. सुशील ही नोकरी सोडून दुसरीकडे गेला होता. घरच्या धबडग्यात राहिलं ते राहिलच बा‌ईंबद्दल्ल अधिक कळून घ्यायचं.

कधीतरी पोस्टाने एक ज्ञानेश्वरीची प्रत आली आणि त्याबरोबर पत्रही. उघडून वाचलं आणि कोसळले. पत्र विनयने लिहिलं होतं.
बा‌ई गेल्या. शेवटचा फक्त महिना-पंधरा दिवसच दवाखान्यात होत्या. आमच्याच बॅचचा डॉक्टर झालेल्या शैलेशने त्यांची विनामुल्य देखभाल केली. शेवटी वाचा शुद्ध राहून नामजप चालू रहावा यासाठी फक्त वैद्याची औषधं घ्यायला कबूल झाल्या.

त्यांच्या मरणोत्तर, विनयनेच त्यांच्या जवळच्या माणसांना त्यांच्या वतीने भेट पाठवली होती. मला अतिशय अतिशय कौतुक वाटलं त्याचं.

न राहवून त्याने दिलेल्या फोन नंबरवर फोन केला विनयला. परत एकदा जुना, शाळेतला धाडसी विनय ऐकतेय असं वाटलं.
"कशी आहेस? मुलगा, दीपक काय म्हणतात?" विनयने आपुलकीने विचारलं. आणि "बा‌ई गेल्या गं... " म्हणून रडूही लागला. मलाही हुंदका आवरला नाही. त्याच्याकडूनच कळलं सगळं.

विनय उशा पायथ्याशी होता. त्यांची शेवटची अशी काहीच इच्छा नव्हती. अतिशय समाधानानी मनाने गेल्या म्हणे, बा‌ई. हे जसं कळलं तशाच काही अप्रिय गोष्टीही कळल्या ओघा‌ओघाने.
हॉस्पिटलमध्ये हलवलं तेव्हा सुशीलला कळवलं. पण तो तेव्हा जर्मनीत होता कामासाठी, सहपरिवार. काही लागलं तर कळव असं सांगून त्याने फोन ठेवला होता. न सांगताच बा‌ईंना हे सगळं कळत होतं. सगळे जवळचे विद्यार्थी ये‌ऊन भेटून जात होते. बा‌ई गेल्यावरही सुशीलला फोन केला विनयने. बा‌ईंच्या इच्छेप्रमाणे देहदानासाठी हॉस्पिटलला कळवतोय असही सांगितलं. तर "अस्सं होय, बरं झालं तुला त्रास नाही काहीच., मी आल्यावर घराचं वगैरे बघेन...." असलं काहीतरी बोलून सुशीलने फोन ठेवलाही.

हे सांगताना विनयच्या तोंडून अतिशय गलिच्छ शिवी गेली आणि मला रडू आवरेना. विनय सावरून म्हणाला , "चुकलंच माझं. शिवी द्यायला नको होती...."
मी त्याला अर्धवट तोडून त्वेषाने म्हणाले , "बरोबर आहे, खरं तर जमलं असतं तर थोबाडायला हवा होता...."
"नाही. चुकलो असतो आपण. किमान इतकं तरी शिकलो बा‌ईंकडून गेल्या काही महिन्यांत की, त्याला शिक्षा करणारे आपण कोण, तो तिथे वर बसलाय ना, त्याच्यावर सोडूया सगळं. आणि बा‌ईंनीच जिथे त्याला क्षमा केली तिथे आपण काय गं?"

विनय वडिलांच्याच कंपनीचं काम बघत होता, आपला सगळा जास्तीचा वेळ तो वृद्धाश्रम, मुक्तांगण सारख्या संस्थांसाठी घालवत होता.

बा‌ईंनी कुणाला किती अन काय दिलं ते ज्यांना मिळालं त्यानाच कळलं. बा‌ईंच्या भाषेत "अनुभूती"! गोडीच्- कुणाला साखरेची मिळाली तर कुणाला गुळाची. एकाची दुसर्‍याला सांगून नाही कळायची, ती चाखायलाच हवी. हे असं सुचणंही बा‌ईंचंच देणं आहे.
आजही कधीतरी शाळेतले आमच्या वेळचे बा‌ईंची "आवडी" लागलेले मित्र, मैत्रिणी भेटतात... कधीही, कुठेही.... आणि बा‌ईंच्या आठवणींचा परिमळू झुळकतो.... मनं अळूमाळू करत पापण्यांशी ये‌ऊन ठाकतो, त्यांच्याच मानसपूजेतला गंध!

समाप्त

गुलमोहर: 

काय ताकद आहे ग तुझ्या लेखणीत!
अशी लोकं जवळपास बघूनही इतक्या सहजसुंदर - पण इतकं पोचवणारं लिहणं शक्य नाहीये बहुतेक!
हॅटस ऑफ टू यू आणि सातपुते बाई!

दाद्,तू माझी मायबोलीवरची सगळ्यात आवडती लेखिका हे पुन्हा एकदा नम्रपणे बोल्ड करू इच्छिते.
Happy
मस्तच गं!

अरे... सगळ्यांचे पुन्हा पुन्हा आभार. हे लिखाण इथे आणावं का नाही अशा दुग्ध्यात होते.
सातपुतेबाईंची आणि ज्यांनी त्यांना माझ्यापर्यंत आणलं त्यांचीही किती आभारी आहे म्हणून सांगू. (बाईंचं नाव बदललय अर्थात).
पुस्तकाचं ना? करूया. खरच करूया.
केल्यावर मायबोलीकरांना कळणार नाही असं होणारच नाही. माझं लिखाण इतरत्रं कुठेही नाही. अगदी ब्लॉगही नाही. लिहायला सुरूवात इथेच केली. माझं शिकणं, प्रोत्साहन इथेच.
मायबोलीची खरच खूप खूप आभारी आहे.

फारच सुंदर लेखन. एकदा वाचायला सुरुवात केली की आपोआपच सुर लागतोय आणि खुप छान वाटतय वाचताना.
पुन्हा वाचणारच नक्की.

आणि तुझं जुन्या माबोवर अजुन काही लेखन असेल तर ते पण ईथे आण ना! मला आत्तापर्यंत वाटायचं की तू लिहीलेलं सगळं मी वाचलं आहे!

आणि तुझं जुन्या माबोवर अजुन काही लेखन असेल तर ते पण ईथे आण ना! मला आत्तापर्यंत वाटायचं की तू लिहीलेलं सगळं मी वाचलं आहे!>>>
अनुमोदन. मी पण हे पहिल्यांदाच वाचल. खूप छान लिहीलय.

सुंदर! Happy

स्वातीचं अलंकार-विवरणही छान. शाळेतल्या मराठी व्याकरणाच्या तासाला बसल्यासारखं वाटलं.

फक्त प्रतिक्रिया देण्यासाठी सदस्य झालोय, त्यामुळे आपल्या लक्षात माझी कुवत आलीच असेल.
पण लेख अतिशय आवडला. ह्या बाई जिथे कुठे ज्यांना कुणाला मिळाल्या असतील त्यांच्या बददल असूया वाटते... माझेही काही शिक्षक असेच... वाक्यागणिक आठवणीने गलबलून आले...
हा ललित लेख आहे ह्यावर विश्वास बसत नाहीये... इतका खराखुरा अनुभव वाटतोय.. पुस्तक नक्कीच लिहा!
इतकी तारीफ करावी वाटतीये, पण निशब्द झालोय...
कृपया ह्या ज्या कोणाच्या बाई असतील त्यांना माझ्याकडून धन्यवाद द्या, इतका छान अनुभव शेअर केल्याबद्दल...
तुमच्या लेखनाच
"मोगरा फुलला.. फुले वेचिता बहरू कळियासि आला..
इवलेसे रोप लावियले द्वारी.. त्याचा वेलू गेला गगनावेरी"
असच होऊदेत!

लले.. हल्ली एवढे सुंदर मराठी शिकवत नाहीत.. नि पोरे पण शिकवून घेत नाहीत.. १६ मार्काच्या व्याकरणाचा प्रश्ण हुकमी सोडवावा.. एवढीच अपेक्षा असते..

मी मध्ये मराठी शिकवत होते.. हौस म्हणून.. मला जे भावलं ते मुलांना भावलं.. तर चांगले वाचक बनतील.. मराठी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर नेता येईल.. पण पालकांना आणि मुलांना पण रुचले नाही ते.. आधीच शाळेतला अभ्यास त्यात तुमचा वाढीव नको.. असे म्हणाले.. मी वर्गच बंद करून टाकला. Sad

दी, काल ऑफिसातला दिवस संपता संपता 'गुलमोहर' उघडलं. तुझा लेख दिसल्यावर उघडलाच. पण तोवर घरी जायची वेळ झाली होती म्हणून ब्राऊझरची विन्डो तशीच ठेवून लॅपटॉप बंद न करता घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर लगेच वाचून काढला. आजपर्यंत थांबायची तयारी नव्हती ना. खूप आवडला. Happy

तू खरंच पुस्तक काढ....ह्या वर्षीच काढ. आता अळंटळं नको करूस. ही प्रेमळ धमकी समज Happy

दाद...
अ‍ॅडमिनना सांगितलं पाहिजे की निवडक १० अपुरं आहे. तुमचं सगळच्या सगळं लिखाण निवडक १०...
__/\__

तुमच्या लिखाणात माऊली का जाणवतात हे जाणवलं.... तुम्ही, सातपुते बाई...अशी ही लिंक माऊलींपर्यंत जाऊन थांबते असच वाटतं. खूपच सुंदर !!!

दाद - शब्दातून प्रतिसृष्टी निर्माण करतेस तू , या लेखात वर्णन केलेले सर्व प्रसंग अगदी समोर घडताहेत असं वाटतं.......
धन्य त्या सातपुते बाई व धन्य तू........

वा !

अप्रतिम!!!
पुस्तकाचं खरच मनावर घे! +१

दाद, एखादं पुस्तक काढायला काय हरकत आहे?>>>>>> १००% अनुमोदन + १००%

पुस्तकाचा आता आग्रह आहे शलाकादि.

लिहायला शब्द नाहीत....डोळ्यांतून वाहणारं पाणी हाच प्रतिसाद!

तुमच्या लिखाणात माऊली का जाणवतात हे जाणवलं.... तुम्ही, सातपुते बाई...अशी ही लिंक माऊलींपर्यंत जाऊन थांबते असच वाटतं. खूपच सुंदर !!! >>>> + 9999

अत्यंत सुंदर!
तुम्ही भाग्यवान म्हणून अशा बाई लाभल्या आणि टीपकागदासारखी मने असलेल्या अशा विद्यार्थिनीं बाईंना मिळाल्या हे त्यांचेही सुकृत!

पहिला प्रतिसाद सुरेख आहे.

मी तर प्रेमातच पडलोय ब्वॉ तुमच्या. अप्रतिम. कैकदा डोळे पाणावले.
ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारी कुणीही व्यक्ती माझ्यासाठी वंदनियच. _/\_

पा‌ऊस तिच्या डोळ्यांच्या देशी पडला
अन इंद्रधनू इथले विस्कटले आहे >>> हे कुठे वाचायला मिळेल? कुणी लिंक देता प्लिज. शोधूनही मला सापडले नाही.

Pages