ग्रीष्मानंतरचा गुलमोहर

Submitted by मंजिरी सोमण on 20 June, 2011 - 02:14

".......माझे पती एका झाडाच्या आडून माझ्याकडे पहात होते. फांदीला धरून रडत होते. पश्चातापाचे अश्रू मला दिसत होते. त्यांनी मला सोडलं, त्यावेळी माझ्या फाटक्या पातळाला गाठी मारून आयुष्याच्या वाटेवर येईल त्या परिस्थितीला तोंड देत मी इथपर्यंत आले होते आणि आज माझ्यासमोर पैलतीरावर माझे पती झाडाच्या आडोशाला फाटक्या धोतराला मारलेल्या गाठी लपवत उभे होते.......
आमच्या मधे गर्दीचा महासागर होता...... गर्दी माझ्यासाठी जमलेली, मला पहायला, एकदा तरी या 'माई' चा हात हातात घ्यायला धडपडणारी. मी गाडीत बसले. गाडी सुरू झाल्यावर मागे सरणार्‍या दृष्यात माझे पती होते. मला आत कुठेतरी अती समाधान, आसुरी का कायसा म्हणतात तो आनंद, सगळ्या भोगांचं श्रेय असं काय नी काय वाटत होतं.... आणि...... अचानक.... मनात लख्ख प्रकाश पडला..... मन म्हणालं, " नाही, सिंधूताई सपकाळ, चुकत्येस तू. या माणसाने तुला घरातून हाकलून लावलं नसतं तर आजचा दिवस तुला दिसला असता? त्याच्याच घरात आयुष्य सडून मेली नसतीस? हजार पोरांची आई होऊन तुला नाहीच का एवढं कळलं?".......

सुन्न करणारे हे शब्द होते सौ. सिंधुताई सपकाळ यांचे. ज्येष्ठ समाजसेविका, हजारच्या वर अनाथ लेकरांची माई, सिंधुताई! यातनांचे अनेक डोंगर पार केल्यानंतर ताठ मानेने जगणारी... जगायचं कसं हे शिकलेली आणि शिकवणारी एक मनस्वी स्त्री. चौथी पास असून जगाच्या शाळेत अनेक बर्‍या(कमी) वाईट(जास्त) अनुभवांच्या पी.एच.डी. चं गाठोडं पाठीला बांधून आपल्या विशाल पदराखाली निष्पाप पोरांना आसरा देणारी वात्सल्यसिंधू!

आयुष्याच्या आगीत तावून-सुलाखून झळाळून निघालेल्या तेजस्वितेला आमच्या ऋतूरंगचा ज्येष्ठ नागरिक संघ सत्काराच्या निमित्ताने बोलावतो काय आणि "आधी लक्षच दिलं नाही बघा, म्हटलं, कंटाळून नाद सोडतील, पण हे कसले चिवट, हटेचनात.." म्हणत आपल्या खास मिष्किल शैलीत माई ते आमंत्रण स्विकारतात काय आणि आम्हाला या व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग येतो काय... सगळंच विलक्षण!

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने सुरुवात होताना माई झाड कसं लावावं हे सहजपणे शिकवून जातात. जिथे मोठमोठे नेते रोपाकडे न बघता, कॅमेराकडे बघत पोझ देत ते रोपटं एकदाचं खड्ड्यात ढकलतात तिथे सिंधुताई हळूवारपणे रोप मातीत ठेवतात, हलक्या हाताने माती पसरून वरून मायेने पाणी शिंपतात. वर आणि हात पुसायला दिलेल्या नॅपकीन ला बाजूला सारून ' हे आणि कशाला' म्हणत बिनधास्त आपल्या पदरालाच हात पुसत स्टेजकडे चालत जातात. सुरूवातीचे नमस्कार चमत्कार पार पडल्यानंतर त्यांच्या ओघवत्या शैलीत उलगडत जाते अनुभवांच्या गाठोड्याची एक एक गाठ. त्यासाठी कधी बहिणाबाईंच्या कविता मदतीला येतात, तर कधी सुरेश भट, कधी गदिमा, तर कधी जनाबाई.

sindhutai.JPG" नऊ वर्षांची होते मी लग्न झाले तेव्हा, अन पती ३५ वर्षांचे... काय खतरा मिश्रण होते बघा..." दु:खाला विनोदाची झालर देत त्या सांगतात, " म्हशी-गाई वळायला जायची मी. कविता माझी सखी. कविता गाण्यांचा खूप षौक पण पती कवितांचे कागद जाळायचे म्हणून माझी हक्काची कविता जपायची बँक म्हणजे उंदराचं बीळ. काही काही कवितेचे कागद तर मी कचाकचा चावून खाल्लेत. पचवलीये कविता, रक्तात भिनलीये कविता."

नऊ महिन्यांची गरोदर असताना पतीने पोटावर लाथा मारून सिंधुताईला घरातून हाकलून लावले... का? आजतागायत माहिती नाही. मारामुळे बेशुद्ध पडलेल्या तिला मेली असे समजून फरफटत गोठ्यात नेऊन टाकले. ती वळायला नेणारी एक गाय तिच्यावर संरक्षण देत उभी राहिली आणि हंबरून हंबरून तिला उठवत राहिली. कशीबशी शुद्धीवर येत असताना तिला जाणवलं की आपल्याला बाळ झालंय आणि नाळ अजून तशीच आहे. काय करायचं, कसं करायचं? शेजारीच पडलेल्या एक दगड घेऊन नाळ ठेचून तोडली. माई सांगतात, " अजूनही इतक्या वर्षांनंतर तो नाळ तोडतानाचा झालेला आवाज माझ्या कानात घुमतो."
आठ दिवस पतीच्या घराच्या बाहेर बाळाला घेऊन ती ओली बाळंतीण वाट बघत बसली की कधीतरी आतल्या माणसांसारख्या दिसणार्‍या जनावरांना पाझर फुटेल आणि निदान माणुसकीच्या नात्याने तरी सुक्या भाकरीचे का होईना चार तुकडे पदरात पडतील, पण पदरी आली ती घोर निराशा. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. अंगावर पिती अवघी आठ दिवसाची पोर. तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणीला राहवलं नाही. रात्री तिच्यासाठी शिळ्या भाकरीचे कडकडीत तुकडे आणि संडासच्या टमरेल मधे पिण्यासाठी पाणी घेऊन आली आणि कुणी पाहू नये म्हणून अंधारात उभी राहिली. ते तुकडे कटा कटा चावून आणि वरती ते टमरेलमधलं पाणी घटाघटा पिऊन उठली सिंधुताई... "मी मरणार नाही, हरणार नाही. या लेकरासाठी मला जित्तं राहिलंच पाहिजे."
उठली, आशेने आईच्या दारात जाऊन उभी राहिली, वाटलं, निदान एकवेळ तरी पोटभर खायला मिळेल. आई म्हणाली, 'आज खाऊ घातलं तर उद्या भूक लागल्यावर परत इथेच येशील.' ही म्हणाली, "नको देऊस, जन्म दिलास, आता पुढचं माझं मलाच बघायला लागेल, नको देऊस, जा!"
तशीच चालत राहिली, स्टेशनवर आली, समोर जी गाडी दिसली त्यात बसली, फडक्यावर पोर टाकलं आणि पोटात आजवर दडवलेल्या, रिचवलेल्या, पचवलेल्या कविता, गाणी मदतीला आली. थोड्या वेळात पोटापुरतं शिळं-पाकं जमा झालं. थोडी थोडकी नाही, तब्बल ७ वर्ष भीकेवर गुजराण केली पण अनेक गणगोत जमले. अनेक निष्पाप, निराधार, अनाथ मुलं पदराखाली घेतली. त्यांना मायेचा हात दिला. जे आपल्या बाबतीत झालं ते आपल्या नजरेसमोर दुसर्‍याच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही हा ठाम निर्धार झाला. भीक म्हणून जे मिळत गेलं ते या सर्वांबरोबर वाटून टाकलं.
या सगळ्या प्रवासात एक 'स्त्री' म्हणून असलेल्या भितीशी दोन हात केले ते अनेक रात्री स्मशानात जागवून, कधी घुबडांबरोबर, कधी कुत्र्यांच्या सोबतीने, कधी अर्धवट जळणार्‍या प्रेताच्या संगतीत, तर कधी त्याच चितेवर कुठेतरी मिळालेल्या पिठाचे गोळे भाजून खात, आपल्या चिमुरडीला पोटाशी धरत, तर कधी जिवाच्या अकांताने टाहो फोडत!

कुठून आली ही जिद्द, हे धाडस, ही शक्ती, ही जगण्याची उर्मी? जिथून आली तिथून पण आज त्या शक्तीच्या, जिद्दीच्या, धाडसाच्या, उर्मीच्या जोरावर अक्षरशः हजारो मुलं निर्धास्त आहेत. जीव लाऊन आहेत. माई व्याख्यानाहून परत येईपर्यंत देवाजवळ दिवा लाऊन बसणारी ही निष्पाप मुलंच माईची आजची शक्ती आहे. जेवायला काही नसेल तर 'माई आम्हाला आज भूक नाही तू रडू नकोस' म्हणणारी ही समजूतदार पोरंच तिची जगण्याची उर्मी आहेत.

आज ज्या ठिकाणी सिंधुताई आहेत, तिथून मागे वळून बघताना त्या म्हणतात, " कुणा तिसर्‍याच बाईची गोष्ट तुम्हाला सांगतेय असं वाटतं. इतकी मी आता पुढे निघून आले आहे. सगळ्या जाणीवा बोथट होऊन गेल्यात. आता कशाचंच काही वाटत नाही, ना दु:ख, ना आनंद, ना खेद ना खंत. रडत बसले असते, खचले असते, तर कधीचीच मरून गेले असते. मग आज माझ्या लेकरांना माय कोण? त्या लेकरांसाठी जगले, जगतेय. ती पोरं, आणि माझी मुलगी ममता यांना घेऊन राहताना कधीतरी जाणवलं की मुलीला दुसरीकडे ठेवलं पाहिजे, माझ्यातली आई चुकेल, दुजाभाव करेल, त्या पोरांवर अन्याय करेल म्हणून लेकीला पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्ट च्या स्वाधीन केले आणि आज ती एम.ए. होऊन आश्रमाच्या कामात मला साथ देतेय. "

एका समारंभात त्यांच्या लेकीला प्रश्न विचारला की 'तुला तुझ्या आईबद्दल आज काय वाटतं?' सिंधुताई बिचकल्या, वाटलं, लेक कुठेतरी नाराजी व्यक्त करेल, माझ्या आईने मला दूर ठेवले म्हणून खंत करेल पण लेक म्हणाली, " मला माझ्या आईची आई व्हायचंय". माईच्या मनावरची सगळी ओझी उतरून गेली.

आज देशभर आणि परदेशात सुद्धा त्या व्याख्यानं देत जनजागृती करतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या हस्ते एक नाही, दोन नाही तब्बल २७२ पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक 'मी वनवासी' आज कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमात आहे, त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाला आहे पण सरकार कडून अजूनही त्यांच्या संस्थेला ग्रँट नाही. सरकार दरबारी त्यांच्या अनेक फायली धूळ खात पडून आहेत पण त्यांना विषाद नाही, वैषम्य नाही. निधीसाठी त्यांना गावोगावी फिरावं लागतं पण खंत नाही कारण त्यांची पूंजी म्हणजे त्यांचे गणगोत, जोडलेली माणसं, त्यांची लेकरं. त्याच बळावर त्या टिच्चून उभ्या आहेत. आपल्या व्याख्यानांमधून त्या स्त्रियांना मानसिक बळ देण्याचे काम कळकळीने करतात.
"बायांनो, जगा गं, ठामपणे स्वाभिमानाने जगा, तुम्हीच जगू शकता, जगवू शकता. पुरूष माणूस नाही ग बायांनो एकटा जगू शकत. देवाने आपलं पारडं त्या बाबतीत भारी ठेवलंय. अशा रडता काय, कुढता काय? संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभ्या रहा. सगळं निभावून नेण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे." हे पटवून देण्यासाठी त्या संसाराला सायकलची उपमा देतात.. "संसार म्हणजे दोन चाकी सायकल, पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं चाक म्हणजे बायको. चेनसकट पॅडल कुठे - मागच्या चाकाला, गियर कुठे - मागच्या चाकाला, ब्रेक कुठे - मागच्या चाकाला, ओझी वहायचं कॅरियर कुठे - मागच्या चाकाला, सीट कुठे - मागच्याच चाकाला, सायकलचा स्टँड कुठे - मागच्या चाकाला, कुलूप कुठे - तर ते सुद्धा बायांनो मागच्याच की ग चाकाला. सगळंच तुमच्या खांद्यावर आणि पुरूषाला काय..... 'हँडल घुमाओ, घंटी बजाओ'........." असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात मिष्किल, खट्याळ भाव चमकतात.

सगळ्या मानमरातबांनंतर तब्बल २२ वर्षांनी त्यांची सासर-माहेरची मंडळी त्यांना भेटायला आली तेव्हा माईंचे डोळे कोरडे ठण्ण राहिले. सासरच्या गावातल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला. आणायला गाडी पाठवली. हार तुर्‍यांनी स्वागत केलं, मोठा समारंभ केला. माईंना विरोधाभास जाणवत होता. अध्यक्षस्थानी पतीदेवांना बसवलं पण त्या अध्यक्षाला या प्रमुख पाहुण्याच्या डोळ्याला डोळा भिडवता येईना. कसंबसं भाषण उरकून त्या निघाल्या. प्रचंड जनसमुदाय जमलेला, ऐलतीरावर प्रसिद्धीच्या झोतात सिंधुताई सपकाळ आणि पैलतीरावर एकाकी झाडाच्या आडोशाला पश्चात्तापाचे जळजळीत आसू पित उभा दीनवाणा पती. या ऐलतीर-पैलतीरामधे गर्दीचा महासागर पण त्या महासागरापेक्षाही शतपटींनी वाढलेलं मनांचं अंतर. गाडीत बसल्यावर मनात पतीचा पश्चात्ताप बघून झालेला आसुरी आनंद आणि मग पडलेला लख्ख प्रकाश...... "सिंधुताई सपकाळ, चुकत्येस तू, हाच तो माणूस ज्याच्यामुळे तुला आजचा दिवस दिसतोय, त्याला विसरून कसं चालेल, त्याला डावलून कसं चालेल? "
गाडीतून उतरल्या, गर्दीतून वाट काढत पतीजवळ गेल्या, मायेने त्याचा हात धरला (भाषणात खट्याळपणे म्हणतात, 'एकदाच चांगला दाबून पण घेतला हात, काय माहित पुन्हा नाही मिळायचा'... एवढ्या दु:खानंतर शाबूत राहिलेली विनोदबुद्धी थक्क करते.), पदराने त्याचा चेहरा पुसला आणि म्हणाल्या, "चला माझ्याबरोबर... हा, पण आता ही सिंधुताई सपकाळ तुमची बायको नाही. ती आता फक्त आय आहे, माय आहे, लेकरू बनून रहा." काय प्रचंड जिगर पाहिजे!
त्या सांगतात, "आजही मी आश्रमातून कामासाठी बाहेर पडले की माझी लेकरं माझ्यासाठी देवाजवळ दिवा लावतात, आणि हे जे सगळ्यात मोठं लेकरू आणून ठेवलंय, ते एकटक माझ्याकडे पहात असतं. काय असतं त्या नजरेत? .... एक विनंती, एक आर्जव......
एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात..

ते घरटं माईंनी बांधलंय, सगळं विसरून, नवर्‍याला माफ करून, त्याची आई बनून. त्यांचं मन विशाल म्हणूनच त्यांचा पदर विशाल. त्यांना गरज आहे गणगोतांची, निधीची, प्रेमाची. आज सिंधुताई नावाचा गुलमोहर तगलाय, जगलाय, मोहरलाय. अतीव यातनांचा, दुर्दैवाच्या दशावतारांचा, दु:खाचा ग्रीष्म पचवून, चटके सोसून तो गुलमोहर बहरलाय. भोगाच्या रक्तवर्णी फुलांनी भरून गेलाय. संकटांमधे घुसून मुळं खोलवर रोवून अनेक निराधारांना हक्काची सावली, गारवा देत आज दिमाखात उभा आहे.

samruddha padar.JPG
स्वतःच्या अनुभवांचं गाठोडं उलगडून त्या आपल्याला गणगोत होण्याचं अवाहन करतात. शब्दशः पदर पसरून मदतीचा हात मागतात. या ग्रीष्मानंतर फुललेल्या गुलमोहराला, त्या मायमाऊलीला शतशः प्रणाम!

radha n sindhutai.JPG
(राधाने काढलेल्या त्यांच्या चित्रासोबत माई आणि राधा)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माईंच्या आश्रमाचा पत्ता :
सन्मती बालनिकेतन संस्था
शिवराज कॉम्प्लेक्स, बी-१, पहिला मजला,
मोईनतारा हॉस्पिटलच्या जवळ,
आशिर्वाद मोटर ड्रायव्हिंग स्कूल च्या वर,
हडपसर, पुणे - ४११ ०२८.

फोन नं : ०२०-२६८७०४०३, ९८८१३३७९१४.

गुलमोहर: 

मंजे, छान लेख Happy
ते फोटो जरा मोठे टाक. राधाने काढलेलं चित्र नीट दिसत नाहिये.<<<<<<अनुमोदन

मंजात्या,
छान लिहिलं आहेस. खुपते तिथे गुप्ते मध्ये सिंधुताईंची मुलाखत पाहिली होती. त्यांच्या मिस्किलपणाची आणि विनोदबुदधीची झलक त्यांच्या बोलण्यातून नेहेमीच दिसते.

त्यांच्या संस्थेची माहिती (नाव , स्थळ, कामकाज, विस्तार इ. विषयी) ला लेखात देता आली तर अ‍ॅड कर ना.

छान लिहीलं आहेस .... फोटो मोठे पाहिजे होते.

आणि निंबुडाला अनुमोदन .... त्यांच्या संस्थेची माहिती जर मिळाली तर अनेक लोक त्यांच्या कार्याला हातभार लावू शकतील.

मंसो, सुंदर जमलाय लेख. सिंधुताईंबद्दल कितीही लिहिल तरी कमीच आहे.
आवडल. अश्या व्यक्तिला जवळुन पहायचा योग आला, नशिबवान आहेस.
फोटो बद्दल सर्वांना अनुमोदन

आता त्यांच्या पुर्वायूष्यापेक्षा, त्यांची समाजसेवाच जास्त महत्वाची आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणही तो भूतकाळ विसरायला हवा.

सिंधूताईंची जीवनकहाणी माहीत असूनही वाचताना पुन्हा डोळे पाणावले.
फोटो मोठे हवेतच. शिवाय राधीनं काढलेल्या चित्राचाही नुसता एक फोटो टाक.

छान

सिंधुताईंचं आयुष्य म्हणजे खरोखरच इतरांनी प्रेरणा घेण्यासारखंच आहे. त्यांनी दिलेलं ते सायकलचं उदाहरण मिनोतीच्या सिंधुताईंवरच्या लेखातही वाचलं होतं.

Pages