चीज मूग रोल

Submitted by मानुषी on 15 July, 2008 - 05:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सहित्यः १ वाटी मूग सालासकट (आक्खे/साबूत), ७/८ पाकळ्या लसूण, २/३ हिरव्या मिरच्या , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३/४ तयार पोळ्या, १/२ चमचा जिरे, थोडे तेल, मीठ , १/२ वाटी किसलेले चीज.

क्रमवार पाककृती: 

कृती: सकाळी हे रोल करायचे असल्यास आदल्या दिवशी मूग ४/५ तास भिजत घालावेत. रात्री फडक्यात बांधून ठेवावेत. म्हणजे सकाळी मोड येतील. (बाजरात मोडाचे मूग तयार मिळतात तेही चालतील.)
मिक्सरमध्ये मोड आलेले मूग, हिरव्या मिरच्या, लसूण , जिरे हे सर्व वाटावे. खूप गंधासारखी फाइन पेस्ट नको. पण मध्यम बारीक वाटावे. पाणी अंदाजे घालून धिरड्यासाठी बॅटर तयार करावे .त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. निर्लेप तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून धिरडे करून घ्यावे. साहित्यामध्ये ३/४ पोळ्यांचा उल्लेख आहे. त्या पोळ्यांच्या थोडा आतला साईज या धिरड्यांचा ठेवावा. एका पोळीवर गरम धिरडे ठेवावे. धिरडे गरमागरम असतानाच त्यावर सढळ हाताने किसलेले चीज पसरावे. हे चीज हळूहळू छान वितळते. पटकन गुंडाळी करावी. व त्याचे दोन किंवा तीन तुकडे करावे.
सॉस बरोबर सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
कोण किती पोळ्या खातील त्यावर अवलंबून आहे!
अधिक टिपा: 

टीप :१) हा पदार्थ डब्यात देण्यासाठी(शाळेच्या किंवा ऑफिसच्या) आयडियल आहे. हे रोल थंड झाले तरी छान लागतात.
२)मुगाचे बॅटर तव्यावर इतर धिरड्यांप्रमाणे आपोआप पसरत नाही. चमच्याने वरच्या वर पसरावे लागते.

माहितीचा स्रोत: 
स्वता:च करून पहिले. मुलांना डब्यात काय द्यायचे हा विचार करता करता सुचले.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
हे रोल थंड झाले तरी छान लागतात. >>> हे खरंय, स्वानुभव ! अर्थात मी पोळी वापरली नाही त्यात, चांगली कल्पना आहे ही. डब्यात न्यायचे असेल तर चटणी पण लावता येते आतून आवडत असेल तर.

मी करते हे रोल फक्त पोळी रोल नाही केली अजुन त्यात.

अरे व्वा, मस्त आहे रेसिपी. करुन बघते आता.

मी हे सँडविच करुन खाते. ब्रेड स्लाइसला क्रीम चीज स्प्रेड लावायचे. मग पुदिन्याची किंवा कोथींबीरीची चटणी. मग मुगाच्या धिरड्याचे ब्रेड्च्या आकाराचे काप करुन (वेळ नसेल तर सरळ पोळीची घडी करतो तशी घडी करुन) वरुन दुसरा ब्रेड लावायचा.
.
माधुरी, तुझी पोळीत चीझ घालुन रोल करण्याची कल्पना छान आहे. करुन बघते आता.

छान

हे वॉव.. माझ्याकडे दिवसाआड मूग असतातच मोड आलेले.. खूप छान आहे रेसिपी..
धिरडं पोळीत गुंडाळायची आयडिया फार आवडली.. धन्स मानुषी Happy

अरे.............. सर्वांना धन्यवाद!
सेनापती.........फोटोचं काय म्हणालात कळलं नाही!
आशू २९.............सहमत............मुलं काय करतील सांगता येत नाही.

फोटो नाहीत ते बरे आहे असे म्हणतोय... फोटो असले की जीव खाली-वर होतो... Happy नुसती पाककृती वाचून फार त्रास होत नाही. फोटो पाहून नक्की होतो.. Lol

ओह्.........असं होय......मला वाटलं आमच्या फोटोग्राफीला घाबरता की काय!
खरं आहे सेनापती........फोटो बघून जीव खाली वर होतो........! ओक्के......म्हणून तुम्ही संताच्या फोटोत एवढे चविष्ट पदार्थ नुसते दाखवताय!(कृ. दिवे घेणे!)
आणि जेव्हा केले तेव्हा माबोवर तशी नवीन होते. फोटोचं एवढं नव्हतं डोक्यात आलं!
पण आता जाऊच दे.......करीन आणि फोटो टाकीन!

मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पदार्थ बनवते . मूग, किंवा चना दाळ [भिजवुन, मिक्सरमधुन काढुन] किंवा बेसन भिजवुन त्यात मेथी, पालक किंवा कोथिंबीर चिरुन घालते. बाकी मसाला आवडीनुसार घालते.. शिळ्या पोळ्या असतील तर त्याच घेते. तव्याला थोड तेल लावुन त्यावर पोळी टाकायची त्याला ही पेस्ट लावायची. व अलगद पोळी उलटायची. व दुसर्या बाजुने पेस्ट लावायची. व झाकण ठेवायच. १ मिनि. ने झा़कण काढुन उलटवायच. २ मिनीटात खरपुस भाजल्या गेल कि खायला तयार. मूग- पोळी सॅडवीच. चटणी नसली तरी चालते.