आठवणी

Submitted by UlhasBhide on 14 June, 2011 - 10:37

आठवणी

जखमा भरती, ठेउन जाती जसा त्वचेवर एखादा व्रण
घडल्या घटना कोरुन जाती मन-पटलावर तशी आठवण

आयुष्याच्या मार्गावरती संग सयींचा असे निरंतर
मित्र सोयरे साथ सोडती, आठवणी ना देती अंतर

कुठल्या वेळी स्मृती कोणत्या कशा जागती कुणा न ठाउक
डुचमळवोनी हृदयघटाला उठवुन जाती तरंग भावुक

आठवणींचे दाटुन येणे, सुप्त मनाचे जागृत चिंतन
या काळाशी त्या काळाची सांगड घालित विचार मंथन

कंटकापरी सलती कधि तर मोरपिसासम स्पर्श मुलायम
आठवणी हो जागृत जेव्हा, अनुभव देती त्या हृदयंगम

त्यांवर माझे प्रेम निरतिशय, आठवणी जन्माचे संचित
सदा स्मरो मज आठवणी या, कधी न हो मी त्यांना वंचित

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया

.... उल्हास भिडे (१४-६-२०११)

गुलमोहर: 

कुठल्या वेळी स्मृती कोणत्या कशा जागती कुणा न ठाउक
डुचमळवोनी हृदयघटाला उठवुन जाती तरंग भावुक >>>> हो अगदी खरंय्..उकाका.

त्यांवर माझे प्रेम निरतिशय, आठवणी जन्माचे संचित
सदा स्मरो मज आठवणी या, कधी न हो मी त्यांना वंचित >>> Lol Sweet Sweet

आवडली कविता..., Happy

आठवणींंच्या वेगवेगळ्या छटा छान टिपल्यात.

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया

आशय अस्वस्थ करणारा तर रचना सुंदर आहे..आणि आठवणी तिथेही सोबतीला असण्याची कल्पना एखादा हाडाचा कवीच करू शकतो.

आणि आठवणी तिथेही सोबतीला असण्याची कल्पना एखादा हाडाचा कवीच करू शकतो.>> किरण्य मलाही ही कल्पना अस्वस्थ करुन गेली.. Happy इथल्या आठवणी तिथे (अर्थात ती जागा असल्यास)....? नको......नाही.....नेवर....

बाप रे! अतिशय सुंदर कविता..
वाचत गेले तसं तसं वाटत गेलं की अरे थोड्या वेगळ्या प्रकारे का होईना पण सेम हेच विचार माझ्याही डोक्यात येतात.
फक्त शेवटची कल्पना मात्रं अतिशय सुंदर आहे... Happy

माझ्या आवडत्या १० त. Happy

सुंदर विचार उल्हासराव, अगदी आपल्या परिपक्व वयाला शोभणारेच!

लयही मस्तच!

(अवांतर - बुजुर्ग उर्दू शायर बशर नवाझ यांच्याबरोबरच्या एका मैफिलीत मी त्यांना विचारले की तुमच्या गझलसंग्रहाचे नांव - जी गझल बाजार या चित्रपटात गायली गेली - 'करोगे याद तो' असे का आहे? त्यावर ते म्हणाले की आयुष्यात 'आठवण' या शिवाय काहीही नसते. आपली ही कविता वाचून ते अधिकच पटले. खूप खूप शुभेच्छा!)

-'बेफिकीर'!

मस्त लय साधलीय.
पण आठवणी या विषयावर पद्य निबंध लिहिल्यासारखे वाटले.
विशेषतः काही काही शब्दप्रयोग जसे आयुष्याच्या मार्गावरती, जन्माचे संचित, वेगळ्याच पातळीवरचा शेवट इ. वाचताना.
दु:खद आठवणींना झुकतं माप दिलंय का? (पहिल्या ओळीपासून)

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया

खुप सुन्दर..... मनापासुन आवडल्या या ओळी..........

कुठल्या वेळी स्मृती कोणत्या कशा जागती कुणा न ठाउक
डुचमळवोनी हृदयघटाला उठवुन जाती तरंग भावुक

आठवणींचे दाटुन येणे, सुप्त मनाचे जागृत चिंतन
या काळाशी त्या काळाची सांगड घालित विचार मंथन

वाह एक्दम सुन्दर, सग्लिच कविता छान आहे पन या ओळी खूपच छान....

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया >>> अहाहाहा!!!! अप्रतिम कल्पना आहे!!! Happy
जे न देखे रवी ते देखे कवी!!!! Happy उकाका.... दी ग्रेट! Happy

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया

gr8....... gr8......gr8 !!

फारच छान!
लयीबद्दल तर बोलायलाच नको.. आणि शेवट तर आहाहा! मस्तच कल्पना!

(अवांतरः मन-पटलावर च्या ऐवजी, मनःपटावर हे कसे वाटेल?)

अप्रतिम कविता! लय, कल्पना, शब्दबंध सगळंच आगळंवेगळं.

शेवटच्या कल्पनेबद्दल मात्र माझं मत असं आहे,

जाते प्रवासाला तिथे काहीच नाही न्यायचे,
बांधून का देसी उगा ही आठवांची पोटली?

जखमा भरती, ठेउन जाती जसा त्वचेवर एखादा व्रण
घडल्या घटना कोरुन जाती मन-पटलावर तशी आठवण

या ओळीं नंतर खूप आठवणी जाग्या झाल्या...केवळ असंभव

उकाका, नेहमी प्रमाणेच अप्रतिम रचना... Happy

अंगावर कसे शहारे येतात,
जुन्या आठवणी सजवताना.
खरी कसरत तेव्हाच होते,
डोळ्यातील आश्रु लपवताना.