कोकण, भरल्या डोळ्यातलं...!

Submitted by kalpesh.Gosavi on 9 June, 2011 - 09:29

... अगदी निघेपर्यंत कोकणाचं आभाळ डोळ्यांत साठवून घेत होतो...
परवाच्याच पावसाने स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात अगदी शुन्यात डोळे लावून बसावं, तरी ध्यान लावून बसण्याचं सुख मिळतं…!
...ही समाधी तुटली ती स्टेशनवरच्या अनाउन्समेंटने...!

मुंबईकडे जाण्याची ट्रेन अगदी बघता बघता समोर येउन थांबली अन् खांद्यावर पिशव्यातलं भरलं कोकण घेउन मी ट्रेन मध्ये चढलो...

गाडीत लगबगीने आपापल्या पिशव्या, आंब्य़ाच्या पेटया जपून ठेवणारा कोकणी माणूस...! बरोबर असणारया म्हातारया आजी आजोबांना आधी जागा करुन देणारा कोकणी माणूस...! गाडी सुटताना स्टेशनवर सोडायला आलेल्या घरच्यांच्या हातात, निरोपाचा...प्रेमाचा हात ठेवणारा कोकणी माणूस...! सारं विस्मयकारक...!
गाडी स्टेशनातुन सुटताना, खिड़कीतनं बाहेर काढलेल्या हातातून जेव्हा आपल्या माणसांची बोटं सुटतात तेव्हा नात्यांचा खरा अर्थ उमगतो...

आमच्या ट्रेन ने वेग पकडला होता... पण मन मात्र मागेच कोकणात अडकून पडलं होतं...! गेले कित्येक वर्ष मी हे अनुभवतोय...! शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं की बैचेन व्हायला होतं. मागे पडणारया झाडांगणिक, आणि मागे पडणारया जामिनीगणिक या मातीतल्या जुन्या आठवणी पुन्हा डोक्यात जमा होतात. जुन्या दिवसांतला कोकणातला पाऊस भरल्या डोळ्यातून बरसू लागतो...!

शाळेच्या दिवसांत तर आम्ही कोकणात जून उजाडेपर्यंत राहत असू. कोकणातून में महिन्यात निघालेला मुंबईकर मागे राहिलेल्या मुंबईकरांना " पाउस घेवन येवा रे मुंबईत " असा मालवणीत गमतीदाखल म्हणायचा.

“ कोकणातला पाऊस म्हणजे एक चित्रच आहे माझ्यासाठी ”. कोकणात पाऊस हा मुंबईच्या जरा आधीच यायचा...! नित्यनेमाने...! अगदी वचन दिल्यासारखा...! पण पावसाच्या आधी मात्र सारं कोकण लगबगायचं त्याच्या तयारीसाठी. वाडीवाडीतली माणसं येत्या पावसात घरात कुठे पाणी ठिबकू नये म्हणून लगबगीने घरावरची कौलं परतताना दिसायची. घरासमोरच्या अंगणातला नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेला माटव (छत) काढला जायचा. पावसाच्या आधीची पूर्वतयारी म्हणून चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं घराबाजुच्या पडवीत शाकारलेल्या जागेत, भिजणार नाहीत अशी ठेवण्यात येत. में महिन्यात झाडावरुन काढलेल्या रतांब्याची सुकून कोकमं होईपर्यंत सारं अंगण लाल व्हायचं. पाऊस घराच्या पडवीपर्यंत येऊ नये म्हणून कौलांना धरून झावळ्या (नारळाच्या सुकलेल्या फांद्या) बांधण्यात येत. कोकणी माणसांच्या पायांना ह्या दिवसांत थारा नसायचा.

ह्या सगळ्या लगबगीतच त्या दिवसांत आभाळात अचानक गाजू लागे. वाडीतली माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. परसातली नारळ-सुपारयांची झाडं हवेबरोबर जोरजोरात हालत. सारं आभाळ पाखरांचं होउन जायचं. भर दिवसा वाडीमध्ये काळोख दाटायचा...! कोकणातलं आधीच काळोख घर अगदी मिट्ट होउन जायचं. गाजणारया ढगांबरोबर घरातली लाईट गेली की गावची काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे अगदी घरभर लावी...!

कोकणातला पाऊस मी कधी शांत येताना पाहिलाच नाही. ढगांचे प्रचंड आवाज करीत " मी आलोय " अशी बहुतेक गर्जनाच करत तो यायचा… आणि बघता बघता आभाळातून सारा आनंद पावसाच्या रुपात कोकणावर बरसू लागे. सारं कोकण वर्षाची आंघोळ केल्यासारखं हर्षभरित होउन जायचं...! पावसालाही कोकणात बरसताना मुक्त मोकळी जागा मिळायची. त्यालाही येथल्या मातीचं होताना बहुदा आनंद होत असावा…! लाल मातीच्या रस्त्यांवरून लाल पाण्याचे छोटे छोटे ओहळ रस्त्याबाजूने आपली जागा करुन वाहू लागत. वाडीमध्ये कुठेतरी फिरत असलेला घरातला तांबडा कुत्रा पावसातून धावत येउन अंगणात जोरात अंग झाडून हळूच पडवीत घातलेल्या उबदार गोणपाटात शिरायचा. सुकत घातलेल्या कोकमांनी लाल झालेलं उन्हाळ्यातलं अंगण स्वच्छ धुवून जायचं. अंगणातल्या परसातला फणस पावसामुळे धुतला गेल्याने नवा कोरा दिसू लागे. घरातली पांढरी मांजर अंग चोरून शेपटी जवळ घेउन कोपरयात बारीक डोळे करुन बसून राही. शेणाने सारवलेल्या जमिनीला हलकासा ओलावा यायचा. आईच्या हाताला धरून मग मी आतल्या स्वयंपाकघराच्या चुलीजवळ जाउन बसायचो. चुलीतल्या निखारयांची धग पावसात अंगाला हवीहवीशी वाटायची.

लाल- नारिंगी निखारयांवर राख जमली की गावची काकी मग कोपरयात ठेवलेल्या कळकट्ट लोखंडी नळीने फुंकून निखारयातून आग फुलवायची. नळी फूंकताना त्या नळीतून येणारा आवाज मला प्रचंड आवडायचा. मग मी पण काकीच्या हातून ती नळी घेउन निखारयांवर धरून ती फूंकत असे. गावचे काका तेवढयात कुठून तरी वाडीतून पावसातून भिजुन येत. भिजल्या अंगावरची थंडी जावी म्हणून मग काकी त्यांच्या सोबत आम्हालाही चुलीवरून उतरवलेला गरम कोरा (बिना दुधाचा) चहा देत असे. बाहेर पाऊस सुरु असताना, हा कोरा चहा पितानाची गंमतच न्यारी असायची. दुपारी सुरु झालेला पाऊस संध्याकाळ पर्यंत यथेच्छ बरसायचा. पावसात, गावच्या झाड़ीझुडूपातून सरपटणारी जनावरं बाहेर पडतात म्हणून गावचे काका आम्हांला घराबाहेर पडू देत नसत. रातकिडयाचे आवाज संध्याकाळ पालटली कि तीव्र होवू लागायचे... घराच्या पाणवठयावर नळाजवळ बेडकांचं ओरडणं सुरु होई…

रात्रीची जेवणं झाली कि रॉकेलच्या दिव्याजवळ बसून आई-बाबा, काका-काकीच्या गप्पा रंगायच्या. आईच्या उबदार मांडीवर डोकं ठेवून, सारवलेल्या जमिनीवर पाय पसरून झोपताना आयुष्य कसं सुरक्षित वाटायचं?

या सगळ्या ओल्या दिवसांमध्येच एक दिवस मुंबईला परतण्याचा दिवस उजाडे. गावची काकी गावाकडची भेट म्हणून कागदांच्या पुडयामध्ये घरची कोकमं, तांदळाच्या पिठाचे लाडू, चुलीत भाजलेले काजू, सुकवलेले फणसाचे गरे वगैरे वगैरे बांधून द्यायची. विकत घेउन दिलेल्या महागड्या गिफ्ट्सपेक्षा या सारया गोष्टीत कित्ती कित्ती प्रेम असतं? एकीकडे काका घरच्या कलमाचे हिरवट आंबे पेटीमध्ये भरण्यात दंग असत. गावातला कोणी एक गावकरी, जायच्या दिवशी कोकमाचा रस बाटलीत भरून आम्हाला द्यायला म्हणून घेउन यायचा. शेजारच्या घरातली आजी प्रेमाने बनवलेले शेंगदाण्याचे लाडू, फणसपोळी वगैरे बांधून आपल्या पुतण्याकड़े वगैरे माझ्यासाठी पाठवायची. कावराबावरा होवून या सारयाकड़े मी पाहत राही. या सर्व खाऊचा आनंद न वाटता, आता ही सगळी माणसं, हे घर वर्षभरासाठी तुटणार या विचाराने मन गहिवरून जायचं. घराच्या देवासमोर नारळ ठेवून, पाया पडून आई-बाबा भरल्या पिशव्या खांद्यावर टाकायचे. घरातली काकी-काका, भाऊ-बहिण आम्हाला वाडीबाहेरच्या एस.टी. थांब्य़ापर्यंत सोडायला येत. घरातला तांबडा कुत्रा शेपटी हलवत अध्येमध्ये अस्वस्थपणे घुटमळत असे. पावसाची रिपरिप चालु असायची. खांद्यावरचा पदर तोंडावर धरून गावची काकी माझ्या डोक्यावरून हात फिरवून स्वत:चे पाणावलेले डोळे पदराने पुसायची. काका अचानक कसे शांत शांत व्हायचे. उगाच इकडे तिकडे घुटमळत फिरायचे. आजूबाजुच्या झाडांझाडांत, पानापानांत, महिनाभर खेळलेल्या, फिरलेल्या मातीत सारा जीव विखुरला जायचा...! पावसातून भिजून नवी कोरी झालेली, मुंबईला जाणारी एस.टी. समोर येउन थांबायची. आणि आम्ही एस.टी. सुटेपर्यंत घरच्यांना हात दाखवित बसायचो...!

चालू झालेल्या एसटीत बसून मी खिड़कीतून मागे पडणारं गाव पाहत बसे. हातातून काही निसटुन जातंय असं काहीसं वाटायचं. शेजारच्या आजीने दिलेला लाडू, आई जेव्हा पुड़ी खोलून मला द्यायची तेव्हा लाडू खाताना गावी गेल्यागेल्या कवटाळून घेणारी आजी सतत डोळ्यासमोर दिसायची...! “ सारं कोकण एक चित्र बनून रहायचं डोळ्यासमोर ”. माणसांचं चित्र...! नात्यांचं चित्र...! निसर्गाचं चित्र...! आठवणींचं चित्र...!

- या कोकणानेच मला डोळसपणे सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकवलं. मधाळ माणसं दाखवली. दरवर्षी नित्यनेमाने कोकणातल्या घरी घेउन जाणारया आई-बाबांमुळे मला कोकणातल्या मातीची ओढ़ लागली. येथल्या मालवणी भाषेशी, संस्कृतीशी, भजनांच्या सुरावटींशी, सण-उत्सवांशी, घराशी, निसर्गाशी, माणसांशी मी कायम स्वत:ला जोडत राहिलो. चित्रकार म्हणून माझं चित्र या सारया जगण्यात शोधत राहिलो.

आपल्यापैकी प्रत्येकाचंच जगणं हे असंच एखाद्या चित्रासारखं असतं. प्रत्येकाचा मुलुख वेगळा, माती वेगळी, माणसं वेगळी...! पण चित्र हे असंच काहीश्या अनुभवातनं आकार घेत घेत पुढे सरकणारं....!

स्पर्धेच्या या धावपळीत, गतिमानतेच्या युगात आपण सारेच जेव्हा आपल्या मनाला हवी असलेली शांतता हरवू लागतो, तेव्हा पुन्हा एकदा आपल्या माणसांत जावं. आपल्या मातीत रुजावं...! निसर्ग पाहावा. जुनी नाती नव्याने वाचावीत...! स्वत:शीच शांतपणे बोलावं…! या सारया गोष्टी आपल्या जगण्याला नवे रंग देतात. आपलं प्रत्येकाचं चित्र पुन्हा नव्याने रंगवण्यासाठी.....

- एव्हाना ट्रेनच्या खिड़कीतून दिसणारया हिरव्या रंगाच्या जागी आता मुंबईचे ब्रिज अन् इमारती दिसू लागल्या होत्या. उतरण्यासाठी ट्रेन मधल्या प्रवाशांची लगबग वाढली होती. महिनाभरात पाहिलेलं कोकणातलं सारं आभाळ डोळ्यांत भरून राहिलं होतं.....

- कल्पेश गोसावी.
(अक्षरसुलेखनकार)

गुलमोहर: 

छान लेख Happy सुट्टी संपत आल्यावर आई आणि आम्ही भावंडं निघालो की बेढ्यात आल्यावर मागे वळून पहायचो तर आज्जी पायठणीवर डोळ्यांना पदर लावून हात हलवून निरोप देताना दिसायची. मामी व मामेभावंडं बेढ्याबाहेरच्या दिव्याच्या खांबापर्यंत सोडायला यायचे. मामा एस्टी स्टँडात सोडायला यायचा. आता आजी, मामा, मामी यांपैकी कुणीही उरलं नाही Sad पण अजून नजरेसमोर जसेच्यातसे येतात.

गाडीत लगबगीने आपापल्या पिशव्या, आंब्य़ाच्या पेटया जपून ठेवणारा कोकणी माणूस...! बरोबर असणारया म्हातारया आजी आजोबांना आधी जागा करुन देणारा कोकणी माणूस...! गाडी सुटताना स्टेशनवर सोडायला आलेल्या घरच्यांच्या हातात, निरोपाचा...प्रेमाचा हात ठेवणारा कोकणी माणूस...! सारं विस्मयकारक...! >>> यावरील रैना व नीधपच्या प्रतिसादाला अनुमोदन.

<< माफ करा पण यात काय विस्मयकारक आहे ? कोकणी नसणारे पण इतर भागातील लोकंही हेच करतात की. >> आई एस्किमो असो कीं आफ्रिकेतली पिग्मी, तिला आपलं बाळ जगात अद्वितीय असल्यासारखंच असतं; तिला 'काय आहे ग तुझ्याच बाळाचं एवढं वैशिष्ठ्य ' असं विचारायचं कीं ही भावना वैश्वीक आहे हे माहीत असूनही तिच्या स्वतःच्या बाळावरच्या त्या आत्यंतिक मायेने त्यापुरतं भारावून जायचं व तृप्त व्हायचं !
रैनाजी व नीधपजी, मीही कोकणाबद्दल कधी तरी भावूकतेने लिहीतो; पण कुणीही आपल्या कुठल्याही गांवाबद्दल वरच्यासारखं छान लिहीलेलं वाचलं , तरी तेंही मला खूप भावतंच.

नाही पटलं हे भाऊ.
कोकणातला माणूस कोकणाबद्दल भावूक असतो. असावा. पण त्या भरात अनेक गोष्टी फक्त कोकणातल्याच आणि कोकणी माणसातच हे म्हणणं कोकणी माणसाच्या नजरेतून ठिक असेलही पण बाकीच्यांना असे प्रश्न पडूच शकतात.
आंब्याच्या पेटीऐवजी अंजिरांची किंवा अजून कसलीतरी करंडी घेऊन हेच बाकी सगळे करणारी माणसे मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा दिसलेलीच आहेत. अजून कुणाला विदर्भात, खानदेशात, गडचिरोलीत, चंबळच्या खोर्‍यात, खासी-गारो टेकड्यांच्या परिसरात, गोबीच्या वाळवंटात, होनोलुलूमधेही दिसली असतीलच की.

>>> तिच्या स्वतःच्या बाळावरच्या त्या आत्यंतिक मायेने त्यापुरतं भारावून जायचं व तृप्त व्हायचं ! <<<<
कोकणी माणसाला कोकण किती प्रिय आहे यात समोरच्याने भारावण्यासारखं/ तृप्त होण्यासारखं काय आहे? प्रत्येकालाच आपली जन्मभूमी तेवढीच प्रिय असते हो.

कोकणावर माझं पण भरपूर प्रेम आहे. गैरसमज नसावा.

<< प्रत्येकालाच आपली जन्मभूमी तेवढीच प्रिय असते हो. >> माझंही म्हणणं तेंच आहे. जेंव्हां मी कोकणाबद्दल लिहितो त्यावेळी तितक्याच आर्ततेने विदर्भ, खानदेश .............होनोलुलूबद्दल तिथल्या कुणी लिहिलेलं मला तीव्रतेने व सहज भावतं. आईची उपमा म्हणूनच दिली; तिला तिचं बाळ अद्वितीय वाटतं याची आत्यंतिकता तिच्यापुरती एवढी प्रचंड असते कीं 'मग इतरांची बाळं काय कमी असतात का ' हा प्रश्नच उदभवत नाही; पण त्याचबरोबर जगातल्या कुठल्याही आई- बाळाचं नातं अगदी आंतून तिलाच खरं उमजलेलं असतं !
नीधपजी, नाही पटत ? कदाचित माझ्याच डोक्यात याबद्दल घोळ असेल !

छान लेख.. Happy माझं गाव मुंबईपासून २ तासावर आहे.. पण बाकी अनुभव अगदी असाच.. आजही तिथून पाय निघत नाही इकडे यायचं म्हटल्यावर..
र.च्या.क.ने. युवाचेतनामधली तुमची मुलाखत पाहिली.. छान होती.. पु.ले.शु.

पुर्ण वाचताच आला नाही, पाणी आणंलत डोळ्यात..... या वर्षाच्या पहिल्या पावसाची सर कोकणातच अनुभवली, मस्त दहा दिवस राहुन आले, आणि आज हे वाचलं सगळ्या आठ्वणी ताज्या असताना.. सर्वांना गावावरुन आणलेले आंबे, फणस दिले.. कोकणात ट्रेन ने जाणं यासारखा प्रवास नाही.... खुप खुप खुप छान लिहिलय.... अप्रतिम, निवडक १०त

कल्पेश, निवडक दहात. खूप आवडलं. हे सर्व अनुभव आम्ही लहानपणी घेतलेत त्यामुळे त्यातले प्रत्येक प्रसंग अगदि आत्त आत्ता अनुभवतोय असे वाटले.
रच्याकने त्या लोखंडी नळीने आम्ही भाजलेले काजूसुद्धा छान, अखंड फोडायचो .
खूप पाऊस येताना छत्र्या उघडून त्या पडवीवर एकमेकांना जोडून ठेवायच्या, आणि त्याखाली जाऊन बसायचे आणि स्वकष्टाने भाजून फोडलेले खमंग काजुगर खायचे! आहाहा! काय आनंद असायचा त्यावेळी.

<<चालू झालेल्या एसटीत बसून मी खिड़कीतून मागे पडणारं गाव पाहत बसे. हातातून काही निसटुन जातंय असं काहीसं वाटायचं.

अगदी मनातलं लिहिलत. कुठेतरी एक गावापासून दूर जाण्याची हुरहूर पण दुसरीकडे मुंबईतल्या जलद आयुष्याची आठवण. काय करावं काही सुचत नाही. असो.

छान लेख आहे.

कल्पेश, फार फार सुंदर जमलय शब्दं-चित्रं.

<<आपल्यापैकी प्रत्येकाचंच जगणं हे असंच एखाद्या चित्रासारखं असतं. प्रत्येकाचा मुलुख वेगळा, माती वेगळी, माणसं वेगळी...! पण चित्र हे असंच काहीश्या अनुभवातनं आकार घेत घेत पुढे सरकणारं....! <<>>
आणि शेवटी हे निव्वळ कोकणाचं न रहाता प्रत्येकाच्या अनुभवजगतातल्या निवांतपणाच्या ठिकाणाशी जोडलत... सुंदर.
चित्रकार आहात... पण शब्दंचित्रंही किती परिणामकारक झालय... जियो!

खुप छान लिहिलंय. अतिशय विस्मयजनक, विस्मयकारक वर्णन. Happy आम्ही भाग्यवान आहोत; आमची नाळ कोकणाशी जोडली गेलीय...

खांद्यावर पिशव्यातलं भरलं कोकण घेउन <<< व्वाह!

बरीच वर्ष इथे येणं झालं नव्हतं त्यामूळे हा लेख वाचता आला नव्हता. खरतर बिटेलचा खूप आभारी आहे हा लेख वर आणल्याबद्दल.
वाचायला सुरुवात केली आणि सगळ्या आठवणी आपोआप अवतीभोवती गोळा होत गेल्या.
कल्पेश, भाग्यवान आहात. जे मनात येतं ते तसच कागदावर उतरणं सहजसाध्य नाही. तुम्हाला ते साधलय. कुंचला आणि लेखणी दोन्हींच्या मदतीने.
(आमचे भाऊही या दोन्हींचा प्रभावी वापर करतात. :))
फार सुंदर झालाय लेख.

आणि हो... भाऊंशी १००% सहमत. Happy

Pages