'आहे का कुणी घरांत?'

Submitted by पल्ली on 4 June, 2011 - 06:33

आनंद लपलेला असतो छोट्या छोट्या गोष्टीत. मित्रांसोबतच्या ओव्हरनाईट गप्पा असो, तिच्यासोबत खुळ्यागत फुलं वेचणं असो, अगदी एकटे असताना बालकनीत उभे राहून नजर जाईल तिथवर विचारशून्य बघणं असो.... आनंद शोधला तर तो सापडतो... अगदी जवळ सापडतो. फक्त तशी दृष्टी आणि ईच्छाशक्ती हवी.....
बेडवर पडल्या पड्ल्या पुढे सरकत जाणारा चंदेरी ढग खिडकीतून पहावा... लिविंग रूममध्ये जुना फोटो आल्बम पहात हरवल्यागत बसावं.... बाल्कनीत तिच्या कंबरेभोवती हात टाकून नि:शब्द उभं रहावं. लहानपणी हरवलेलं मोराचं पिस आठवुन बघावं. नाहीच सापडलं तरी त्या जमवलेल्या; ढापलेल्या; सापडलेल्या रंगीत काचगोट्यांना पुन्हा एकदा मोजुन बघावं. आठवणी लपलेल्या असतात प्रत्येक वास्तूंत! प्रत्येक अंगणात!
स्वयंपाकघरांत केलेले आणि फसलेले प्रयोग, मग आईचा आरडओरडा... बराच वेळ टि.व्ही. पाहिला म्हणुन बाबांनी घातलेला धपाटा, मित्रांशी झालेली भांडणे, रुसवे-फुगवे......... सारं काही वास्तु पहात असते. प्रत्येक रूम बोलत असते, आपणच निट ऐकत नाही बहुतेक... वेड्यासारखे शोध घेत रहातो घराबाहेर , आपुलकीचा, प्रेमाचा शोध... तो तर घरातच लपलेला असतो सुगंधासारखा......
घर काही फक्त चार भिंती-दारं-खिडक्या ह्यांनी बनत नाही. ते बनतं सुंदर आठवणी आणि उद्याच्या आशा स्वप्नांनी. थोडीशी तडजोड, आपल्या माणसांसाठी घेतलेले कष्ट आणि खूप सार्‍या नाजूक अपेक्षांनी!
ती प्रत्येक आठवण जागवण्यासाठी आज स्वतःच्या घराचा दरवाजा ठोठावुन बघा... आज जरा स्वतःला आवाज देऊन बघा..... ते प्रत्येक छोटं छोटं स्वप्नं साकारण्यासाठी स्वतःवर थोडा विश्वास ठेऊन बघा... नकोश्या आठवणींची अडगळ काढून टाका आणि नकारात्मक विचारांची श्वास घुसमटवणारी धूळ झाडून टाका...
विचारा तर खरं एकदा स्वतःच्या मनाला, 'आहे का कुणी घरांत?'

गुलमोहर: 

व्वा...छान आहे....आठवणीची सुगंधी कुपी उघडायला हरकत नाही....आणी ते ही या वातावरणात्...मस्तय....नुसत्या विचाराने ही सुगंध दरवळलाय.....

सावरी

बघा... नकोश्या आठवणींची अडगळ काढून टाका आणि नकारात्मक विचारांची श्वास घुसमटवणारी धूळ झाडून टाका...
आजच एक पेशंट ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन नाकाला नळी लाऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरुन प्रवास करताना पाहिला. खरच त्या सिलेंडरच्या ओझ्यापेक्षा नकारात्मक विचारांचे ओझे किती जास्त असते.

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जुळला माझा आत दंग झालो...
(विजय फळणीकरांच्या सकाळच्या लेखात ह्या ओळी वाचनात आल्या.....)

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जुळला माझा आत दंग झालो...
>>>कवी सुरेश भट, संगीत रवि दाते, गायक सुरेश वाडकर. अल्बम अंतरंग Happy खूप मस्त आहे अल्बम!

आणि तूही छान लिहिलंयस. Happy

नेहमीप्रमाणे , सहजसुंदर !
<< विचारा तर खरं एकदा स्वतःच्या मनाला, 'आहे का कुणी घरांत?' >> खरंय. नाही तर आंतून "कोण हवंय ? ओळखलं नाही तुम्हाला !" असा प्रतिसाद यायचा.

छोट्या छोट्या गोष्टीत समाधान नाही वाटत हल्ली आपल्याला... लहानपणी कसं छोट्या छोट्या गोष्टीत धमाल असायची. जीव खाऊन दगडं बिगडं मारुन पाडलेले ते चिंचेचं एवढंसं बुटुक. पण केवढा अलभ्य लाभाचा आनंद असे त्यात! मैत्रिणीनं तिच्या बंगल्याच्या दारी असलेल्या एका दुर्लक्षित झाडाचं एक सुकत चाललेलं पण रंगीत पान माझ्यासाठी वहीत जपुन आणलं होतं.... तो अख्खा दिवस मी त्या पानाभोवती घोटाळत राहिले. वारज्याला रहायला असताना आमच्या चाळीमागे एक पाट वहायचा, त्या पाटापलिकडे १०-१५ मिनिटे चालल्यावर एक छोटी टेकडी लागायची, तिथे चमचमणारे दगड सापडायचे. ते गोळा करायला मी, दिप्या, दुधोणकरांचा भाई, संध्या गेलो होतो मोठ्ठी पिशवी घेऊन! गच्च भरुन आणली, स्वच्छ धुऊन अंधारात त्यात कुठे हिरा सापडतोय का म्हणुन किती शोध घेतला तेव्हा. वाटायचं एक जरी हिरा सापडला तर आईला देऊ. सगळी गरिबी दूर होइल.... खूप दिवस जपले होते ते चकाकते दगड... घर खाली करायची वेळ आली तेव्हा फेकुन द्यावे लागले शेवटी. आम्हालाच रहायला छत्र नव्हतं तिथं त्या दगडांना कोण जपणार? असलेच दगड आताशा मोठी किंमत मोजून घरात फॅशन म्हणुन ठेवतात... आहेत माझ्याकडे Happy खूप सारे.
पर्वती पायथ्याला लक्ष्मीनगरला राहायला होतो तिकडे पण त्या टेकडी वर लपाछपी खेळायला जायचो. एकदा खेळता खेळता खूप अंधार झाला. वाट हरवली. जाम घाबरले होते.... इतक्यात मावशी आणि आई दूर एका दगडावर बसल्यासार्ख्या अंधारात दिसल्या. जीव खाऊन पळत सुटले, जेव्हा वाट सापडली तेव्हा ती वाट सापडण्याचा आनंड केवढा विलक्षण होता.
चतुशृंगी च्या जत्रेत आईचा हात सुटला. मी हरवले. भोकाड पसरुन रडायची सवय तेव्हाही नव्हती, पण डोळ्यातुन खळाखळा पाणी वहायला लागलं... आई आता कधीच दिसणार नाही का? प्रचंड गर्दी आजुबाजुला, पण फार एकटं वाटलं. पोलिसांनी हाताला धरुन बसवलं एका उंच स्टुलावर. अनाउंन्समेंट चालवली होती. आईसाहेब कुठुनतरी गर्दी कापत आल्या, बाप रे! त्याक्षणी आईचा हात पुन्हा हातात आल्यावर नवजीवन मिळालं होतं.....
आता ते सगळ सुटलं. ते गाव. ती नाव. ते अमूल्य दगड. मैत्रीचं सुंदर पान आणुन देणारी ती. पाठीवरुन फिरणारा तो मऊ हात..... देवासमोर तेवणारा दिवा लावायला आताशा त्या सांजसमयाला मी तरी कुठे असते घरी? हरवल्यासारखी घरी येते. मला आताशा माझंच घर विचारत असतं, 'आहात कुठे मॅडम?'

नकोश्या आठवणींची अडगळ काढून टाका आणि नकारात्मक विचारांची श्वास घुसमटवणारी धूळ झाडून टाका...
विचारा तर खरं एकदा स्वतःच्या मनाला, 'आहे का कुणी घरांत?'

पल्ली...खल्लास केलंस!!!!!!!!

Happy सर्वांचे आभार
मी विचारलं माझ्या घराला, आहे का कुणी घरात?
घर म्हणालं,
उंबर्‍यावर उभं राहुन विचारु नये, का गं अशी दारात?
ये ना, आत ये. घर तुझंच आहे.......

आवडल.. खूपच छान...

जमल तर पहिला, दुसरा आणि तिसरा भाग एकत्र जोडून ठेव..एक सलग लेख वाचायला मिळेल...

मी विचारलं माझ्या घराला, आहे का कुणी घरात?
घर म्हणालं,
उंबर्‍यावर उभं राहुन विचारु नये, का गं अशी दारात?
ये ना, आत ये. घर तुझंच आहे.......

हे तर एकदम सही...

व्वा , खुप छान , अगदी खरं ' ते प्रत्येक छोटं छोटं स्वप्नं साकारण्यासाठी स्वतःवर थोडा विश्वास ठेऊन बघा'

Pages