ओळखीचे रस्ते.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 27 May, 2011 - 00:13

कंटाळा आला की बाईक काढायची आणि कंटाळा येइपर्यंत भटकायचं हे आमचं ब्रीद असल्याकारणे आम्हाला मधूनच हुक्की येते. तशी आम्हाला कंटाळा यायला कुठलीही खास कारणे लागत नाहीत. कंटाळा आला म्हणुनही कंटाळा येवु शकतो आणि बाईकवरून उंडगायला जायचेय म्हणूनही कंटाळा येवु शकतो. अर्थात सौं. ना आमच्या या सवयी माहीत असल्यामुळे त्यांची मुक्ताफळे ऐकण्याचा प्रसंग वारंवार येतो. बरं या बायका पण विचित्र असतात. पावसाळ्यात तुम्ही कुठे निघालात की त्यांना लगेच तुमच्या बरोबर यायचे असते. खरेतर आम्हाला अशा वेळी एकट्यानेच बाहेर पडायची सुरसुरी आलेली असते, कारण सौभाग्यवती बरोबर असल्या की हजार बंधने येतात. जसे ४० च्या वर स्पीड गेला मागुन पाठीत कोपराने ढोसणे सुरू होते. दिसला धाबा बसलो हादडायला असे होत नाही. त्यांच्यासाठी एखादे हायजिनीक हॉटेल शोधावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यात मध्येच कुठेतरी दिसलेल्या गाडीवर तळली जाणारी गरमागरम भजी पोटाला तड लागेतो हाणता येत नाहीत. म्हणुन आम्ही कायम संधीच्या शोधात असतो. मॅडम माहेरी गेल्या (जर गेल्याच कधी तर) रे गेल्या की आमची सखी प्रिया आणि आम्ही निघालोच उंडगायला.

गेल्या पावसाळ्यातली गोष्ट. कुलकर्णीबाईंना आधीच एकदा खंडाळ्याच्या घाटातून फिरवून आणलेले होते. त्यानंतर खुशीने त्या पुण्याला आपल्या बहिणीकडे राहायला म्हणून गेल्या होत्या. चक्क चार दिवस ! तिसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे मॅडमचा फोन आला. "उद्या ये रे न्यायला !"
(इतर ठिकाणी ती एकटी फिरते, तिच्या मैत्रीणींबरोबर ट्रेक्स वगैरे करते. पण माहेरी गेली असली की मात्र परत आणायला आम्ही जातीनं यावं अशी तिची इच्छा (पक्षी: ऑर्डर) असते. यावेळेस मी जरा कडक शब्दात सुनावले...

"येइन मी (तुझा काका पण जाइल, न जावुन सांगतो कुणाला) पण बाईकवर येइन, बसने येणार नाही. कारण ती परत येणार तो वार होता रवीवार आणि रवीवारी संध्याकाळी स्वारगेटहून मुंबईसाठी बस पकडणे म्हणजे मोठे दिव्य असते. सुदैवाने पावसाचे दिवस असल्यानुळे तीने मान्य केले. मी पटकन फोन बंद करून टाकला. (न जाणो पुन्हा तिचा बेत बदलायचा आणि नको, बसनेच ये म्हणायची.) तो दुसर्‍या दिवशी सकाळीच चालू केला.

खरेतर मला भटकायला आवडतं आणि पावसात खास करून धबधबे, नद्या बघत बसण्यापेक्षा त्या पावसाने ओलेचिंब झालेले रस्ते न्याहाळणं, त्या रस्त्यावरून ८०-९० च्या वेगाने बाईक चालवणं हे खास आवडतं. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे पहाटे पहाटे साडे आठ वाजता घर सोडलं. पण आज अजुनही आकाश कोरडंच होतं. पनवेलच्या थोडं पुढं आल्यावर एका धाब्यावर पोटोबाला नैवेद्य दाखवला. खिशातला रुमाल काढून डोक्याला बांधला आणि घोड्यावर टांग टाकली. मनात धाक धुक होती "पाऊस नाहीच आला तर.....?"

पण धाब्यावरून पुढे निघालो आणि हळू हळू पावसाने आपल्या गाण्याला सुरूवात केली. पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो. वाईट अवस्था होते. गाडी चालवू? क्लच-अ‍ॅक्सेलरेटरकडे लक्ष देवु? की हेल्मेटच्या काचेवरून ओघळणारे पाणी टिपत बसू..... काही कळेनासे होते. अशा वेळी आजुबाजुने सुसाटत जाणार्‍या कार्सचा हेवा वाटतो, त्यांना काचेवर ओघळणारे पाणी पुसणारे वायपर्स असतात ना. पण पुढच्याच क्षणी एखादा थेंब कॉलरच्या मागून अलगद तुमच्या बनियनचे आवरण भेदून आतल्या उघड्या पाठीवर उतरतो आणि एक भन्नाट शहारा सगळ्या अंगावर उमटतो. मग लक्षात येतं.., "अरे हे सुख त्या कारमध्ये बसणार्‍यांच्या नशिबात कुठलं असायला?" मग आपोआपच आपलाही वेग मंदावतो आणि आपण त्या रिमझिमत्या पावसाला उपभोगत ती धुंदी जगायला लागतो.

पनवेल ते पुणे हा रस्ता पावसाळ्याच्या दिवसात खरंच वेड लावण्याइतका देखणा असतो. इथुन तिथून चिंब भिजलेला रस्ता, रस्त्याच्या कडेने पावसाचे मोती अंगा-खांद्यावर मिरवत उभी असलेली हिरवीगार झाडे आपलं लक्ष वेधून घ्यायला लागतात.

रस्ते..., हे रस्ते मला खुप आवडतात. मुळात मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यापेक्षा तिथे पोचण्यासाठी बघावी लागणारी वाट ती मोठी मस्त असते. डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत मधला जो काळ असतो ना तो खरा आनंद देणारा असतो. तिथे पोहोचण्यापेक्षा तिथे पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न जास्त आनंद देणारे असतात. ती असते एक धुंदी, एक कैफ ......! हा आनंद मला रस्ते देतात. मी बाईक चालवताना दर दहा मिनीटांनी मागे बघतो आणि मग लक्षात येते अरे आपण एकटेच नाही आहोत. हा रस्ता आहे ना आपल्या सोबतीला आणि तो शेवटपर्यंत असणारच आहे.

मग पुढे लांबपर्यंत पसरलेला रस्ता कापायला अजुन हुरूप येतो. अमित बोसच्या 'अभिलाषा' मधलं संजय खान आणि नंदावर चित्रीत झालेलं एक गाणं मला खुप आवडतं. रुसून चाललेल्या प्रेयसीला चिडवताना प्रियकर खोडकरपणे म्हणतो..
"वादीयां मेरा दाssमन, राssस्ते मेरी बाहे......., जावो मेरे सिवा तूम कहा जाओगे?"
कै. रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेलं हे मजरुहचं गीत आर.डी. ने असं काही सजवलय की पुछो मत !

सॉरी , थोडं विषयांतर झालं. पण रस्त्यांबद्दल बोलायला लागलो की असं भरकटायला होतं मला. आजुबाजुची हिरवाई अनुभवण्याच्या नादात कधी खोपोली क्रॉस केली कळालेच नाही. बाईक असल्याने एक्सप्रेस वे वर प्रवेष नव्हताच. तसेही बाईक असेल तर एक्सप्रेस वे च्या नादी लागुच नये माणसाने. जी मजा जुन्या हायवेवर येते ती ती एक्सप्रेस वे वर येत नाही. घाट चढता चढता सहज मागे लक्ष टाकले आणि.....

झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर...
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर...

मागच्या उतारावर हिरव्यागार झाडांच्या दाटीतून पाठलाग करणार्‍या रस्त्याची नागमोडी वळणे असली खल्लास दिसत होती की क्षणभर मनात आले आपल्या कर्व्हसचा अभिमान बाळगणार्‍या एखाद्या रुपगर्वितेला इथे आणून उभी करावी आणि म्हणावे ,"आता बोल?"

खंडाळ्याचा घाट एरव्हीदेखील वेड लावतो. इथले नागमोडी रस्ते, डोंगराच्या कुशीत मधुनच गायब होणारी त्याची वळणे मनाला विलक्षण आनंद देत असतात. वाटतं हा प्रवास कधी संपूच नये. त्यातही ऋतु पावसाळ्याचा असेल तर....! मग नकळत तुमचा राजेश खन्ना होवून जातो....

जिंदगी एक सफर है सुहाना.., यहा कल क्या हों किसने जाना........

अर्थात राजेश खन्ना होताना आपली खरोखरच अंदाजमधल्या राजेश सारखी अवस्था होवू नये याची काळजी प्रत्येकाने आपली आपणच घ्यायची असते. निदान मी तरी घेतो. घाटात ६० च्या वर जायचा मोह मी महत्प्रयासाने टाळतो. क्षणभर त्या मादक कर्व्ह्ज कडे एक घायाळ नजर टाकून पुढे निघालो. घाट आता कुठे सुरू झाला होता. सगळीकडे हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरलेले. जिकडे पाहाल तिकडे सृष्टीने हिरव्या रंगाची मनमुरादपणे उधळण केलेली होती. आता पावसाचा सडाका प्रचंड वाढला होता. त्यामुळे गाडी सरळ रस्त्याच्या कडेला लावली आणि पावसाचे उन्मुक्त नर्तन बघत तिथेच एका झाडाखाली बैठक घातली. पाऊस मनमुरादपणे बरसत होता. तिरक्या येणार्‍या पावसाने प्रचंड भिजवले तर होतेच. पण त्याच बरोबर झाडाच्या पागोळ्यावरून ओघळणारे पाणी एक वेगळाच अनुभव देत होते. थोडा वेळ थांबून पुढे निघालो. जायच्या आधी पुन्हा एकदा खाली घाटात दिसणार्‍या रस्त्याला हॅलो करायला विसरलो नाही.

इथून थोड्या वेळातच घाट संपणार. कारण अमृतांजन पॉईंट जवळाच आलेला होता. खरेतर इथुन निघायची इच्छाच होत नव्हती पण जाणे मस्ट होते. (नाहीतर सौभाग्यवतींची मुक्ताफळे ऐकावी लागली असती फुकट). नाईलाजानेच गाडीला कीक मारली आणि निघालो. अमृतांजन पॉईंट क्रॉस केला आणि बोगद्याकडे नजर टाकताना सहज वर ल़क्ष गेले. आणि मनात विचार आला यावेळी राजमाची पॉईंटवरुन हा रस्ता कसा दिसत असेल? यावेळेस मात्र मोह आवरला नाही आणि लोनावळा बायपासवरून गाडी आत घेतली व फिरून पुन्हा राजमाची पॉईंट गाठला. तिथून खालचा रस्ता, अमृतांजन पॉईंट सगळंच कसं झ्याक दिसत होतं.

हा जुना रस्ता पुढे खाली उतरून एका ठिकाणी मेन हाय वेला परत जोडला जातो. ते दृष्यही खुपच सुंदर होते.

इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

इथे अर्धातास थांबलो आणि मग पुढे पुण्याच्या मार्गाने निघालो. आत्तापर्यंत रमत गमत आल्याने ११.३० वाजुन गेले होते. म्हणलं 'कुलकर्णी, आता टंगळ-मंगळ' बंद करा, नाहीतर फुलं पडतील. गपचुप कॅमेरा सॅकमध्ये टाकला आणि सुसाट पुण्याकडे निघालो.

पुण्यात आल्यावर शिवाजी नगरच्या इंजीनीअरींग कॉलेजच्या टर्नला एका टपरीवर चहा प्यायला म्हणून थांबलो. तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पुरातन वटवृक्षाखाली बाईक पार्क केली आणि चहाच्या टपरीसमोर असलेल्या बाकड्यावर ठाण मांडले.

वरून रिमझिम पाऊस पडतो आहे. हातातल्या ग्लासातील गरमागरम कडक चहामध्ये मधूनच पावसाचा एखादा चुकार थेंब टपकन उडी मारतो....! शेजारी बाकड्यावर ठेवलेल्या कागदी डिशमधली भजी पावसाने भिजायच्या आत पटापट पोटात टाकत वर ग्लासमधला चहादेखील संपवायचा ही कसरत केलीय कधी? पावसाळा सुरू होतोय....

इच्छा असेल तर सांगा !

विशाल.

गुलमोहर: 

मस्त रे विशल्या !!

सेम हिअर ..फार आवडलं

गेल्या पावसाळ्यातली गोष्ट. कुलकर्णीबाईंना आधीच एकदा खंडाळ्याच्या घाटातून फिरवून आणलेले होते.

काय स्फोटक वाक्य आहे रे... आधी कळालम्च नाही. नंतर सावकाश सावकाश अर्थ कळाला तेव्हां तोंडातला चहाचा घोट फुर्रकन बाहेर आला

क्या बात है विशाल भाऊ. इस रंगीन मौसम की यादे रखने के लिए आज भी हम आलटून पालटून बरसते है मित्रा ! लग्नाआधी दोनच चिंब पावसाळे भेटले जे आजही मनातून निथळत असतात रे. लग्नानंतर शिवणापाणीचा खेळ. Sad

फोटो छानंच पण उगाचच वेगात गाडी चालवुन स्वतःचा अन दुसर्‍याचाही जीव धोक्यात घालण्यात फार थ्रील आहे असं मला तरी वाटत नाही.

मस्त रे विकु... सुप्पर्ब.. Happy
बाकड्यावर ठेवलेल्या कागदी डिशमधली (बारीकश्या पावसात जराशी भिजलेली Lol )भजी खाताना तू दिसलास सुद्धा.. इतकं मस्त वर्णन केलंस..

कुठला टर्न आहे हा शेवटचा? हॉस्टेलच्या मागचा का? मला टपरीवच्या चहाची जाम उबळ आलीय आता.. Sad

बाकी फोटो मस्त... आठवणी जागवल्यात. माळशेजच्या, ताम्हणीच्या, आंबोलीच्या... अशा वेळी बाईकच हवी मात्र. पण एका दिवसात भर पावसात ३५० किमी बाईक चालवल्यावर दुसर्‍या दिवशी काय होतं हे विचारायचं नाही.. Wink Lol

विशल्या, त्या कुळकर्णीबाईंच्या वाक्याने माझी(सुद्धा) विकेट घेतली.
लग्नापूर्वी आणि नंतरच्या पहिल्या काही वर्षांत ठरवून पावसात घाटात बाईकवरून गेलोय. मी चालवलीयेही...
एक सुंदर दुष्टपणा केलायस हे लिहून... पण जियो! त्या फोटोंनी मजा आया

मस्तच..

फोटो अतिशय सुंदर आलेत.... वर्णनही झक्कास. यावर्षी पावसाळ्यात भटकायला जायलाच हवे.. Happy

काढा काढा.. पिकनिक काढा . मज्जा Happy

फोटो खूपच सुंदर आलेत. ओले रस्ते अगदी खरेच वाटताहेत...

विशाल. पुढे कधी तरी पुणे सोलापूर रस्त्याबद्दल वाचायला मिळेल का ? एक दोनदा केलाय हा प्रवास. एकदा तर थेट पुढे हैद्राबाद पर्यंत केलाय. तेव्हातरी कंटाळवाणा वाटला होता. पण जाणकार माणसाच्या नजरेतून, बघायला आवडेल !

सहीच! याला म्हणतात प्रवासाची आवड! किंवा,
“Focus on the journey, not the destination. Joy is found not in finishing an activity but in doing it.”
“It is good to have an end to journey toward; but it is the journey that matters, in the end”
“Too often we are so preoccupied with the destination, we forget the journey.”

Pages