कदर ना जानी ना मोरा सैयाँ..

Submitted by निवडुंग on 26 May, 2011 - 10:28

कित्येक दिवसातून पुन्हा थोडंफार बोलायला सुरूवात केलेली तिने. पण त्याचा अहं आज त्याला काही स्वस्थ बसू देईना. इतके दिवस तडफडतोय तिच्याशी बोलण्यासाठी. तिला खरंच कळत नाही का? बोलू तर शकतेच ना ती? जग बोलू शकतं तिच्याशी आणि फक्त मीच का नाही? की तो जास्त गुंतू नये तिच्यात म्हणून तिने बोलणं बंद केलंय? काही का असेना? सगळं जणू कळत असूनही तो भयानक चिडला तिच्यावर. अगदी सगळं काही तुटेपर्यंत. तिने नेहेमीप्रमाणेच पडतं घेतलं. अवाक्षर ही न काढता त्याला मनमुराद भांडू दिलं. सगळं काही ओकून झाल्यावर तो ही थोडासा शांत झाला. आणि तिच्या दोन प्रेमाच्या गोष्टीत त्याचा राग कधी वितळून गेला हे त्याचं त्याला ही समजलं नाही.

आणि मग तिने कायमचं जायची गोष्ट काढली. तिचे ते शब्द वाचूनच त्याला उभं वारं सुटलं. ही जाणार म्हणतेय ही कल्पनाच त्याला करवेना. तिला बाहेर चाललोय सांगून कसंतरी तो ऑफीसच्या बाहेर पडला. डोळे अगदी भरून आले त्याचे. मनात काय चाललंय हे त्या निसर्गालाही कळून चुकलं होतं कदाचीत. सुसाट वारा सुटला होता. त्याला एकदमंच सगळं रितं रितं वाटायला लागलं. भयानक पोकळी जाणवायला लागली. आणि त्यातंच शोभाचं कदर ना जानी ना मोरा सैयाँ कानी पडत होतं. बिनती करत हूँ.. पैयाँ परत हूँ.. फिर भी एक ना मानी मोरा सैयाँ.. शोभाचे आर्त सूर त्याचं काळीज चिरत गेले अगदी. एकदम रडूच फुटलं त्याला. तरी कसंबसं सावरत विमनस्क मनस्थितीत तो नेहमीच्या टपरी वर पोचला. टपरीवाल्यानेही समजुतीने त्याच्या हातात चहा आणि सिगरेट ठेवली. एक दोन झुरके मारल्यावर तरी बरं वाटेल असा विचार करत होत तो. पण सगळेच रुसले होते त्याच्यावर आज जणू. काहीही केलं तरी आतून येणारे कढ थांबेनातच त्याचे. खरंच इतकं भांडण्याची तरी काही गरज होती का हा प्रश्न पडला आता त्याला. आज ती आहे, म्हणून भांडूही शकशील, ती पण पडतं घेईल, पण काही दिवसानंतर काय? ती जेव्हा नसेलच तेव्हा काय? ह्या विचारानेच त्याला कापरं सुटलं. एक संपली की लगेच दुसरी सिगरेट शिलगावली त्याने. पण जे काही काहूर माजलं होतं ते शांत होईना. खरंच काय मिळवतोय तिच्याशी भांडून हे त्याचं त्याला ही कळेनासं झालं आता.

तसाच लडखडत तो परत ऑफीसमधे आला. असं आपल्याला कुणी पाहू नये म्हणून एकटाच कॉन्फरन्स रूम मधे जाऊन बसला. तिची जायची वेळ झालेली. आता निघते म्हणाली ती. आणि पुन्हा एकदा सगळं काही दाटून आलं त्याच्या मनी. मला सोडून जाऊ नकोस असं एकदम अगदी खोलवरून म्हणावसं वाटलं त्याला. कधीच सोडून जाऊ नकोस असं. पण तिच्याही हातात काय होतं हा विचार करून मनाला आवर घातला त्याने. शेवटी नाही राहवून तरी तो म्हणालाच तिला. आज मला फार एकाकी वाटतंय. तू जाऊ नकोस. तिला ही जणू त्याच्या मनात काय चाललंय हे उमगत होतं. पण तिचेही हात बांधलेले. मी आहे तू नंतर मेसेज कर म्हणाली त्याला.

पडत्या फळाची आज्ञा पाळत लगेचच त्याने तिला मेसेज केला. थोडं फार अवांतर बोलून झालं पण त्याला अजिबातच राहवेना. डोळे एकदम भरून यायला लागले. अनामिक हुरहूर दाटायला लागली मनी. तसं तिच्या शिवाय त्याला समजून घेणारं होतं तरी कोण त्याच्या आयुष्यात? मग धडा करून तो म्हणालाच तिला. फार भरून आल्यासारखं वाटतंय आज. तिला ही त्याची अवस्था जणू कळून चुकली मग. आपल्या परीने ती त्याची समजूत घालायचा प्रयत्न करायला लागली. पण आज त्याचा बांध पूर्णपणे उन्मळून पडला होता. कितीही प्रयत्न केला तरी आसवं गळायची थांबेनातच त्याची. तसाच कसंबसं तिच्याशी बोलत राहीला तो. आणि आता ऑफीसमध्ये थांबून हसं करून घेण्यात काहीच अर्थ नाही, हे समजून बाहेर निघाला. वॉशरूममधे जाऊन कितीतरी वेळा तोंड धुवून झालं. पण लालभडक डोळे त्याची साथ सोडत नव्हते. तसाच सर्वांची नजर चुकवत कसातरी तो पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तीच टपरी आणि तोच चहा आणि सिगरेट. तिचे काळजीचे मेसेज येतंच होते. नको वाईट वाटून घेवू वगैरे वगैरे. जितकी ती मेसेज करत होती, तितकेच त्याला आतून कढ फुटत होते. शेवटी न राहवून तीच फोन करते म्हणाली. इतक्या दिवसातून तिचा आवाज ऐकायला मिळणार होता त्याला. पण तोच इतका रडवेला झाला होता की फोन उचलायचं ही धाडस होईना त्याचं. तिला नको म्हणून त्याने सुटका करून घेतली कशीतरी स्वता:ची.

तसाच थोड्या वेळाने घरी आला तो. पण अजिबातच करमेना त्याला. मग अगदी मनसोक्तच रडून घेतलं त्याने. चांगले डोळे सुजेपर्यंत. मग त्याला थोडं बरं वाटलं. भावनेचा भर जरा ओसरला होता. तिलाही काही चैन पडणारी नव्हती. वेळात वेळ काढून तिने उशिरा रात्री त्याला मेसेज केलाच. त्याच्या ओसाड वैराण तहानलेल्या वाळवंटात जणू वळवाचा पाऊसच पडत होता. फार फार भाग्यवान वाटलं त्याला तेव्हा. तीच आहे फक्त, जी कधीच त्याची साथ सोडणार नाही. त्याने कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी. हे त्याला पुन्हा नव्याने उमगत होतं आज. अगदी भरून पावल्यासारखं वाटलं त्याला. तिची आणि त्याची आयुष्यात भेट घडवून आणली याबद्दल मनोमन आभार मानले त्याने विधात्याचे. आणि मग तिच्याशी बोलताना मनातलं मळभ कधी नाहीसं झालं हे त्याचं त्यालाच कळलं नाही.

गुलमोहर: