स्मरणे हातांची

Submitted by दाद on 10 July, 2008 - 19:52

कालिदास जयंती निमित्त साहित्य प्रकारांनी नटलेला एक सुंदर कार्यक्रम परवा सिडनीत झाला. एकापेक्षा एक वरचढ कलाकृती सादर झाल्या. दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम झाला. अगदी तीट लावण्यापुरतही काही सापडलं नाही..... इतका सुंदर.

दुसर्‍या दिवशी कौतुकादाखल तिथे राबल्या एका घरधनिणीशी बोलल्ये. तिची खंत ही की, ’ह्या इतक्या साहित्यिक कलाकारांचं कौतुक करायला आपल्याला एक सुंदर शब्दं सापडू नये... हे शब्दांचं दारिद्र्य माझ्यापास!’

’अगे, त्या सगळ्यांचा कौतुक सोहळा साजर करायला झिजल्या तुझ्या हातांचं कौतुक करण्याला शब्दं अपुरे पडतात. तिथे सादर झाल्या कलाकृती अन त्यांना मिरवलेल्यांचं करणं, त्यांच्या स्वत:साठी.
पण बाई, तुमचं राबणं? ते त्यांच्यासाठी, त्या साहित्य दिंडीला जमल्या वाचक, रसिक वारकर्‍यांसाठी... त्यांचे, तुमच्या त्या हातांचे मोठे आभार!’

हे तिला समजाऊ जाता मग आठवले असे अनेक हात...... ज्यांचं ऋण जन्म-जन्मांतरीचं, अभिमानाने मिरवू, उतराई होण्यासाठी पुन्हा पुन्हा येऊ असं!

आठवली एक माऊली. कॉलेजच्या दिवसात एका झक्कास घरट्याशी ओळख झाली. पिता एक गुणी गायक, दोन्ही मुली अप्रतिम वादक. कार्यक्रमांची प्रॅक्टिस करण्याच्या निमित्ते घरी अनेक वेळा जाणं झालं.
संगीतात अखंड बुडालेल्या ह्या घराचा ताल खर्‍या अर्थाने सावरला होता, काकूंनी. एकदा कधीतरी मी जरा लवकर पोचले. काकू घरी एकट्याच होत्या. माझ्या आगाऊ बडबड्या स्वभावामुळे मी विचारीत गेले अन त्याही सांगत गेल्या.
बोलता बोलता सहज म्हणाल्या, ’मीच एक अशी घरात. म्हणजे कलाकार नाही, अशी....’

का कुणास ठाऊक पण मनात असूनही तोंडून निघालं नाही, की, ’काकू, तीन तीन कलाकार संभाळणार्‍या मोठ्ठ्या 'जाणकार' कलाकार आहात. काय उगीच!’
वयाचा परिणाम असेल कदाचित.

खूप घर करून राहिलं ते वाक्य मनात. त्यांची ती खंत नव्हती. पण हे तिघं करतायत ते "काहीतरी खास" आहे अन आपण करतोय ते "नेहमीचंच" असा भाव नक्की होता.

आत्ता मोठी झाल्यावर कळतंय की एक कलाकार होणं सोप्पय. ते देवाघरचं देणं आहे. त्या साच्यातून तसे घडूनच येतात कलाकार लोक. पुढे त्या बीजांचं सिंचन करायचं अन फुलती ठेवायची आपल्या कलेची बाग.

पण त्यांना सावरणार्‍या, संभाळणार्‍यांचाही असा एक खास साचा देव तयार करतो, जास्तं मन लावून. त्यात एक थोडा कणखर बाप, एक निरंतर मातृत्व, काही मैत्र असं सगळच भरतो. जरा चूक झाली तर नुस्ता ह्याच जीवाचा खेळ नाही तर त्या कलाकारीचा बट्ट्याबोळ होणारय ह्याची पूर्णं जाणीव ठेवून घडवतो देव, ह्या संभाळणार्‍या हातांना.
सगळंच मोठ्या मापाने ओतावं लागतं मग, त्याला. हाती दिल्या कलाकारापेक्षा जास्तं बळ, धैर्य, शौर्य, अधिक ममत्वं, दया, क्षमा, शांती, भक्ती, समर्पण, जगण्याची अन जगवण्याची उत्कट असोशी... अन असं कितीतरी.

ह्या साच्यातून घडलेली कुणी सुनिताबाई मग पुलंसारखा सोळा कळा अंगी बाळगल्या बालकाचा आयुष्यभर संभाळ करत्ये.
अशीच कुणी वत्सलाबाई कुठल्याशा वळणावर चुकीच्या बाजूला वळलेला पं. भीमसेनांसारखा गायक हाती धरून परत मार्गावर आणते... त्यांची सोहं मधून ओंकार जागवण्याची ताकद मिळवून देते.

कुणी भानुमती कुमारजींसारखा मेरू खचताना सावरते, संगितातलं एक नवं क्षितिज उदयाला येता येता निघूनही जाते. अन वसुंधराबाईसारख्या कुणी त्या आभाळभर ठेव्याला टेकण्यासाठी धरा बनून आयुष्य वेचतात.

कुणी नीराताई, आयुष्यभरासाठी गोनिदांसारखा एक सोसाटा आपल्या पदराच्या मायेत हलके लपेटून घेतात अन वाचकांसाठी मिळत रहाते एक सदैव चैतन्यानं भरलेली झुळुक.

कुणी साधनाताई निखार्‍यांचा मळवट भरते आणि आपल्या अग्निफुलांच्या रोपांसाठी अखंड कार्य-तांडवात मग्नं अशा बाबांचा अन त्यांच्या भूतगणांचाही संसार तोलते, जपते... उगाळलेलं गंध, कणखर हातांनी हळूवार तोलावं, तस्सं.
घरी परतणार्‍या वादळांसाठी उंबर्‍यावर दिवली बनून तेवणार्‍या ह्या ज्योती!

हे जसे आठवले तसे, श्रीमती मृणाल गोरेंच्या समाजकार्यासाठी प्रोत्साहन देणारे, श्री बंडू गोरेंचे हात आठवले.
आठवले, इवल्या शिवरायांचं बोट घट्ट धरून हिंदूराष्ट्राच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणार्‍या जिजाऊवर विश्वास ठेवणारे, तिला बळकटी देणारे शहाजीराजांचे हात!
आठवले.....
वेड्या नामदेवाला समजावणारे, समजून घेणारे जनाईचे हात....
तुकोबांच्या पारिमार्थिक चालीची वाट मोकळी करून देणारे, त्यांचा संसार सावरणारे आवडेचे वेडे-बागडे ऐहिक हात.

अन लक्कन डोळ्यासमोरून वीजेसारखे चमकून गेले.... ’ताटी उघडा’ म्हणून टाहो फोडत.... झाकल्या संज्ञेच्या दारावर ठोठावणारे मुक्ताईचे हात.
लोकक्षोभाने त्रासून त्राग्याने कुडी सांडायला निघाला, जो तुम्हा-आम्हा सर्वांच्या जीवीचा जीवलग, ज्ञानिया! त्याला समजावणारी त्याची धाकुली, मुक्ता.

’अरे, वन्ही झालेल्या ह्या जनक्षोभावर तू शीतल जल मेघ होऊन बरसत का नाहीस? कुणाचे वाकुडे बोल तुला लागतात? ह्या सार्‍याचं निव्वळ साक्षी असावं, ते तुझं अंतर्मन असं डहुळतच कसं? दादा, आम्हा नाथ-पंथियांचं राज-गुह्य ते विसरलास? ह्या विश्वाच्या पाटवात गुंथलेला दोरा दुसरं-तिसरं काही नाही... जे तुझ्या आवडीचं वालभ, सत-चित-आनंदाचं रूप, तेच ते.... ब्रम्हं आहे, रे’.

त्या चित्कलेनं घातलेली साद ऐकून ज्याक्षणी ज्ञानदेवानं ’मी’पण सांडलं... त्याक्षणी पुढला सारा भविष्यकाळ त्या धाकुलीच्या हातांचा कायमचा ऋणी झाला....
जाणिवेच्या पलथडी झोकू जाणारा तो योगीराज तिच्याबळे ह्या थडीला आला.
तिनं परतवला, अवेळी अस्ताला चाललेला तापहीन मार्तंड.
भुईत गडप होऊन मातीमोल होऊ घातलेलं मोगर्‍याचं रोप... ज्याचा वेलू गगनावेरी जाणार होता अन त्याला फुटलेला धुमारा.... असा, की फुले वेचू जाता कळियांसी बहर यावा... त्या बीजाला तिनं वेळीच ऊब दिली.
तिनं विझू दिली नाही ती दिवली, जिनं पुढं नामदेवासारख्या अनेकानेक ज्योती चेतवल्या....

ते हात नसते तर.... तर आज आपण सगळे पोरके होतो!

गडे हो, ह्या अन अशा समर्थ हातांची ही स्मरणे, ह्यांना माझे कोटी प्रणाम!

समाप्त

गुलमोहर: 

किती दिवसांनी लिहिणं होतय इथे. येते, वाचते. पण...
मोडलेल्या बोटातली ताकद जपून वापरताना, इथे वाचलं तरी, मनापासून 'दाद्'ही देता येत नाही.
अगदी सुरसुरी येऊन लिहिलेलं हे. सगळी स्मरणं लिहायची झाली तर.... उरलेली बोटंही मोडून पडतील इतकी आहेत Happy
(स्मरणं अनेक! बोटं दहाच!)

सुंदर, सुंदर, अतिशय सुंदर!!
तुला दाद द्यायला माझ्याकडे चपखल शब्द नाहीत, ही माझी खंत!!
एखादा संथ लयीतला राग रंगत जावा, तस रंगत गेलय हे लिखाण!

कुठून ग सुचतं तुला हे? वाचताना आईबाबांचे हात आठवले. कधी मायेचा हात तर कधी जरबेची नजर. त्यातूनच तर घडतो नाही आपण. फार छान लिहितेस तू.

सुंदर !
हाताबद्दल वाचताना बोरकरांच्या सुंदर ओळी आठवून गेल्या.
......
देखणे ते हात ज्यांना निर्मीतीचे डोहळे
मंगलांनी गंधलेले सुंदरांचे सोहळे.

अतिशय सुंदर.

दाद, किती दिवसानी लिहिलंस गं! अतीशय अप्रतीम लिहिलेस! शब्द नाहित प्रतिक्रिया देण्यासाठी! जियो!!!

का कुणास ठाऊक.. या दादने लिहिलेले काही वाचलं की दोन मिनिटे स्तब्ध व्हायला होतं. काही सुचत नाही..!!!
--------------
नंदिनी
--------------

दाद अप्रतिम लिखाण, तुमचं लिखाण वाचलं आणि सोडून दिलं असं कधी होत नाही, अनेकदा वाचलं जातं आणि अजूनच आवडत जातं. Happy

दाद, बर्‍याच दिवसांनी आलीस... लिहिलंस.. आणि तृप्त करून सोडलंस.... आता पुढचे किती दिवस किती हातांची आठवण येत राहील....

अतिशय सुंदर.......

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

सुरेख!
खरंय, 'पडद्यामागच्यांची' दखल घेतली जात नाही, पण ते असतात म्हणूनच तर पडद्यासमोर इतका झगमगाट असतो!
हे तुला लिहायला सुचलं याबद्दल सलाम!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

तू लिहिलेलं काहीही वाचलं की निशब्द होते मी. प्रतिक्रिया द्यायला सुध्दा शब्द सुचत नाहीत. खरंच कलाकाराचा जीवनसाथी होणं म्हणजे सुळावरची पोळी.. खुप लहान-मोठ्या कलावंतांच्या बाबतीत हे अनुभवलं आहे मीही. अर्थात काही वेळा त्या कलाकाराला त्याची जाण असते. तर काही वेळा आपल्या कलेच्या अहंभावात तो/ती ही आपल्या जोडीदाराला कमी लेखतो/ते.

ह्या अन अशा समर्थ हातांची ही स्मरणे, ह्यांना माझे कोटी प्रणाम!.....
माझे सुद्धा कोटी प्रणाम.
सरीविना, पीएसजी, नंदिनि पूर्ण सहमत.

खूप सुंदर!! अप्रतिम!
उगाळलेलं गंध, कणखर हातांनी हळूवार तोलावं, तस्सं.
घरी परतणार्‍या वादळांसाठी उंबर्‍यावर दिवली बनून तेवणार्‍या ह्या ज्योती!
>>
अनुपम उपमा!! माझेही कोटी कोटी प्रणाम त्या हातांना..आणि त्यांचं इतकं मनापासून कौतुक लिहिणार्‍या तुझ्या हातांनाही , दाद!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

खरं तर एव्हाना सवय व्हायला हवी पण तुझ्या अलौकिक शब्दसंपदेने दर वेळेस तितकेच आश्चर्यचकित व्हायला होते. काय सुरेख लिहीतेस तू!

चांगला विषय.
कुठेतरी वाचलं होतं, 'झाडं दोन प्रकारची असतात - काही फुलणारी आणि काही जमिनीची ओल टिकवून ठेवणारी'. Happy
.
जाता जाता एक छोटीशी सुधारणा : पुलंच्या सौं.चं नाव सुनंदाबाई नव्हे, सुनीताबाई.

धन्यवाद सगळ्यांना. कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही? स्वाती, धन्स, गं. येत रहा बाई.
सुरसुरी येऊन लिहिलं की असं होतं.... (केव्हढा मोठ्ठा गाढवपणा होत होता)

दाद, अशक्य लिहितेस तू. नुसतं वाचलेलंही माझ्या निम्मं डोक्यावरुन जातं. Proud
माझ्या माहितीप्रमाणे सुनंदा हे नाव रणजित देसाईंच्या बायकोचं आहे.

दाद, बिषय अन उदाहरणे दोन्ही सुरेखच.
मला वाटतं कुमार गन्धर्वांच्या प्रथ्म पत्नी चे नाव भानुमती होतं.

दाद, विशय उत्तम, पण जरा थोडक्यात आटोपलस अस वाटल. अर्थात, सुरसुरी आल्या आल्या लिहीलेल आहेस म्हणतेस तर मग बरोबर आहे.
आणि काय ग, 'मोगरा फुलला' किती वेळा वाचले आहेस? Happy

ए दाद.... तुझे हात कुठे आहेत?

>>कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही?

तू सुरसुरी येउन लिहिलेलं, आम्हीही तसच सुरसुरीतच वाचलं ना, म्हणून Happy

दाद मस्त लिहीलंस गं..
खरंय कुणाचे हात कुणाचं भलं करुन जातील.. असेच आपल्या अनेकानेक लहानमोठ्या सामाजिक कार्य करणार्‍यांचे हात.. !
विंदांचे शब्द आठवले...
"देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हातच घ्यावे..."
देणार्‍याचे हात घेणं म्हणजे अवघड व्रत..
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

तेथे कर माझे जुळाती...
. . . . .

दाद, अप्रतिम. तुमच्या दोन हाताच्या दहा बोटांनी जमेल तसे हळूहळूच स्मरणे लिहा. तुम्ही काय करताय माहित आहे ! तुम्ही समाज ज्यांचे ऋण जाणत नाहिये त्यांना समोर आणताय. आपण ज्यांना, ज्यांच्या कलेला ओळखतो आहोत त्यांच्या कर्तृत्वामधे ज्यांचा वाटा आहे पण ज्यांचे जाहिर आभार कधीच मानले जात नाहित त्यांचे देखील आपणावर ऋण असतातच आणि आम्हाला तुम्ही अशा झाकल्या गेलेल्या व्यक्तींचे निदान आपापल्या मनात तरी आभार मानायला भाग पाडता आहात. तुमचे देखिल त्याबद्दल आभार !

दाद, खुपच सुरेख लिहिलेत. तुमचे लिखाण नेहेमीच वाचनीय असते. आणि तुम्ही दिलेली "दाद" ही Happy
.
जरा चूक झाली तर नुस्ता ह्याच जीवाचा खेळ नाही तर त्या कलाकारीचा बट्ट्याबोळ होणारय ह्याची पूर्णं जाणीव ठेवून घडवतो देव, ह्या संभाळणार्‍या हातांना >>>
बरोबर आहे. फक्त कलाकारच नाही तर इतरत्रही काही मोठे-जगावेगळे करणार्‍यांना असे कुणीतरी "सांभाळणारे हात" असतात.
.
पहिल्या दोन ओळी वाचुन, "मोगरा फुलला" ची आठवण झाली Happy

Pages