"व्हॉट आर यु गाइज अप टू इन शिकागो?"

Submitted by megrev94 on 19 May, 2011 - 16:41

"व्हॉट आर यु गाइज अप टू इन शिकागो?"

असा सवाल व्हीसा ऑफिसरने मला केला आणि काय उत्तर देऊ असा प्रश्न पडला, कारण माझं शिकागोचं ज्ञान "भूगोलाच्या पुस्तकातला कत्तलखाना, आणि सीअर्स टॉवर् " ह्याच्या पलीकडे नव्हतं. माझा गोंधळलेला चेहेरा पाहून त्याने हसून एक सल्ला दिला," मुली, निव्व्वळ दिलखुलासपणे शिकागो फिर, शिकागो कधीच कुणाला निराश करत नाही." हे वाक्य माझ्या मनात इतकं खोलवर कोरलं गेलं कि, "ओहेर विमानतळावर" पोचल्याक्षणीच माझ्या मनाने पसंतीचा कौल दिला. तिथून सुरु झालेला हा "शिकागोनुभव" आपणा सर्वांनाही मिळावा, ह्यासाठी हा लेख प्रपंच.
पण तत्पूर्वी जाणून घेऊ जरा ह्या शहराच्या पूर्व इतिहासाबद्दल. नावात काय आहे म्हणताना नावातच गावाचं गुपित असतं हेच सत्य आहे, म्हणूनच शिकागो नदीच्या काठी पिकणाऱ्या कांद्याच्या मूळ फ्रेंच shikaakwa (" Stinky Onion")नावावरून "शिकागो" हे नाव जन्माला आले सागरासमान भासणाऱ्या "मिशिगन लेक" च्या काठावर वसलेले हे गाव सुमारे १७७० सालच्या आसपास वसाहतींना आकृष्ट करू लागले. ४ ऑगस्ट १८३० रोजी "शिकागो महानगर पालिकेची" स्थापना झाली ह्याच दरम्यान "यांकी वसाहतगारांनी" शिकागोची भौगोलिकता जाणून घेऊन आजूबाजूच्या भागांना जोडता येणारे रस्ते बांधून व्यापार-उदिमाचे नवे क्षेत्र म्हणून ‘शिकागो’ नावारूपाला आणले. 'इलिनॉय-मिशिगन कनाल' व 'गलेना-इलिनॉय रेल्व्वे" ह्यांची स्थापना १८४८ साली होऊन "शिकागोची" औद्योगिक घोडदौड इतकी वाढली कि १८७० पर्यंत "शिकागो" शहराची गणना जगातील इतर मोठ्या शहरात होऊ लागली, पण १८७१ साली अशी एक हृदयद्रावक घटना घडली कि ज्यामुळे "शिकागो" च्या पत्रिकेतील सगळे ग्रह उलटे सुलटे झाले, ती घटना म्हणजे "दि ग्रेट फायर ऑफ शिकागो".संपूर्ण भस्मसात झालेल्या ह्या शहराने जन्म दिला एका नव्या दिमाखदार "शिकागोला", आणि गगनाला हात टेकणाऱ्या "स्काय-स्क्रेपर" इमारतींना. अमेरिकेच्या वास्तुशिल्पविद्येत अमुलाग्र बदल करून, "न्यूयॉर्क" शहराशी टक्कर देत शिकागो शहर पुन्हा एकदा उन्नतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागले. ३ मिलियन एवढी लोकसंख्या असलेल्या ह्या शहराला नेहमीच "सेकण्ड सिटी" असं संबोधलं गेलं आहे, पण तरीही माझ्यासारख्या प्रत्येक शिकागो प्रेमी माणसाच्या हृदयात शिकागोचं स्थान अढळ आहे. एका नजरेत मनाला भिडणारा शिकागोचा आवेग मला तर प्रेमानुभूती देऊन जातो. प्रत्येक वेळी नवीन भासणारा मिशिगन लेकचा किनारा, वेगवेगळ्या ठिकाणाहून अनुभवायला हवाच. वाऱ्याच्या वेगाने downtownच्या ओघवत्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन तर बघा!
कला आणि कल्पकता ह्याचा मिलाफ आपल्याला जागोजागी दिसून येतो, जशी Art institute, Museum of contemporary art आणि नवीनच साकारलेले The Bean हे शिल्प म्हणजे ह्याची उत्तम उदाहरणे आहेत. वास्तुशिल्पातला चमत्कार म्हणजेच "Willis Tower" (पूर्वीचा Sears) त्याच थाटात शिकागोला सलाम ठोकत उभा आहे. मी तर 'Willis Tower' आणि 'John Hancock' इमारतींना शिकागोचे भालदार चोपदार म्हणते. उत्कृष्ट वास्तुशिल्पकला अनुभवायची असेल तर 'शिकागो रिव्हर' मधून बोटीची सफर घेता येते, ह्या तासाभराच्या सफरीत इतिहासाची कितीतरी पाने उलटून पाहता येतात. इतिहासावरून आठवलं कि, ज्यांचा इतिहास मोठा कठीण आणि काळा असतो त्यांना तो पुसून स्वतःचं भविष्य नव्यानं लिहिताना वेदना होतातच, अगदी तसंच काहीसं शिकागो बाबत झालं "माफिया,गुंडगिरी आणि भ्रष्टाचार" ह्यांनी पोखरलेल्या अवस्थेतून जगातील काही मोठ्या आणि यशस्वी शहरांच्यात नाव घेता येण्याजोग्या उत्तम स्थितीपर्यंतचा खडतर प्रवास शिकागोने केला आहे, त्यात अनेकविध लेखक,कलाकार, तंत्रविशारद ,संगीतकार,राजकारणी लोकांचा समावेश आहे. शहराची बांधणी ही नुसती एककल्ली न होता अतिशय खुल्या अश्या मनोवृत्तीचं दर्शन इथे होतं. मला सगळ्यात प्रिय असणारी जागा म्हणजे "Grant Park" तिथलं Millennium Park, Buckingham Fountain प्रत्येक वेळा नवीन अनुभव देऊन जातात. "अध्यक्ष बराक ओबामा" ह्यांचा अमेरिकेच्या राजकारणाचा नवा अध्याय "Grant Park" च्या प्रांगणातच सुरु झाला. शिवाय Field Museum, Shed Aquarium, Adler Planetarium, Science and Industry Museum, Children’s Museum सारखी प्रसिद्ध museums शिकागो सफरीची रंगत आणखीनच वाढवतात. शिकागोबद्दल बोलताना "Cubs, White Sox, Blackhawks, BullsआणिBears" ह्यांना विसरून कसं चालेल? आपलं 'बृहन महाराष्ट्र मंडळाचं' १५ वं अधिवेशन ज्या भव्य अश्या "मकॉर्मिक सेंटर" मध्ये संपन्न होणार आहे, त्याच्या लगतच्याच परिसरात "बेअर्स" चे "सोल्जेर्स फिल्ड" स्टेडीयम आहे. शिकागोची शान म्हणजे 'नेव्ही पिअर', तिथे वाऱ्याशी गप्पा मारत १५ मजली उंच "फेरीस व्हील" मध्ये बसल्यावर जेव्हा सगळं "शिकागो शहर" आपल्या समोर दिसत नं तेव्हा "ह्याच साठी केला होता अट्टाहास" ह्या ओळी खऱ्या वाटू लागतात. जुन्या नव्या सगळ्याची सांगड साधणारं हे 'शिकागो' आता इतकं विस्तारलं आहे की जवळपास ५० छोटीमोठी उपनगरं बाळगून आहे. घरातल्यांना,बाहेरच्यांना आपलंसं करणारं हे माझं माहेरघर सध्या तयारीत आहे ते 'बृहन महाराष्ट्र मंडळाच्या' १५ व्या अधिवेशनाच्या! मंडळी हे ऐतिहासिक शहर आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे! अधिवेशनाच्या अधिक माहितीसाठी ह्या नवीन संकेतस्थळाला वारंवार भेट द्या, ऑगस्ट १५ रोजी ह्या संकेतस्थळाचे नुतनीकरण झाले असून ते नव्या रुपात आपल्या भेटीला येत आहे. जसं शहर तशी उत्साही माणसं आम्ही, तेव्हा हा माहेरचा कौतुक सोहोळा अनुभवायला नक्की या पुढल्यावर्षी २१ ते २४ जुलै रोजी!
-रेवती ओक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"माफिया,गुंडगिरी आणि भ्रष्टाचार" ह्यांनी पोखरलेल्या अवस्थेतून

या काळातील अमेरिकेतील एक लोकप्रिय धमकीचे वाक्य - 'I have relatives in Chicago'. म्हणजे माझी कुरापत काढू नकोस, कारण...

खरंय डेव्हॉन, स्वामीनारायण, अरोरा बालाजी, लेमाँट ही टेंपल्स, उपनगरातली हॉटेल्स (बांबु गार्ड्न, वगैरे) बरंच र्‍हायलय व्हो. पण हरकत नाही किती कव्हर करणार.

!!! अधिवेशनासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

रेवती.. तू बॄमम मंडळावर आहेस का? उत्तर 'हो' असे असल्यास, काही महिन्यापूर्वी 'उउवि' निमित्ताने मला फोन केला होता ती पण तूच का?

कशी चाललीय तयारी? आता जेमतेम दोन महिने राहिले.
तुम्हा सगळ्यांना या अधिवेशनासाठी शुभेच्छा आणि आमच्यातर्फे धन्यवाद..

विनय

फारच छान परिचय. शिकागो खरंच सुरेख आहे आणि तुमचं शहराबद्दलच प्रेम अगदी जाणवतंय. शुभेच्छा.

एका कमिटीत माझे काका-काकीपण दिसतायत. Happy