सावट - ७

Submitted by बेफ़िकीर on 18 May, 2011 - 02:37

अडसुळ आणि पब्लिक पळून जाताना पाहिले तेव्हा गावालाही धक्का बसला. गेस्ट हाऊस पेटवून टाकावे किंवा त्या भागात अजिबात वावर ठेवू नये अशा विचारापर्यंत लोक आलेले होते. पेटवण्याची इच्छा असणारे खूप आक्रमक होते, पण गस्तीस आलेल्या नव्या पोलिसांच्या भीतीने गप्प होते इतकेच! अडसुळ आणि माने वगैरे अधिकारी काय पाहिल्याने भिऊन पळाले असतील हेच गावकर्‍यांना समजत नव्हते. गेस्ट हाऊसबाबतचे गूढ अधिकाधिक गडद होऊ लागलेले होते. आजवर शांत आणि दुर्लक्षित असलेले दिवे गाव गेल्या चार दिवसांपासून अचानक हादरू लागले होते. भीती! भीती, भय, दहशत अशा प्रकारच्या भावना प्रथमच गावाच्या मनात येऊ लागल्या होत्या. काका थोरातचे उठून पळून गेलेले प्रेत नक्कीच गेस्ट हाऊसमध्ये आलेले असणार असे प्रत्येकाला वाटत होते. सर्वत्र चर्चा, वादावादी यांना ऊत आला होता. पोलिस जमावांना पांगवत होते व तंबाखु चुन्याची देवाणघेवाण करत एकमेकांतही चर्चा करत होते. साहेब लोक पळून गेल्याने आता त्यांच्यावर अधिकच जबाबदारी होती. त्यामुळे पोलिसांपैकीही कुणी गेस्ट हाऊसपासून पन्नास मीटरच्या आतही येत नव्हता.

त्याच वेळेस आतमध्ये तो भीषण प्रकार चाललेला होता. अजित स्वतःच म्हणत होता की त्याने स्वतःलाच खलास केले. भीतीने गाळण उडाली होती सगळ्यांचीच! आणि अजित तर जिवंत होता. मनूला अजितकाका असा का दारात पडला आहे हे समजत नसल्याने त्याने जाऊन काकाला हाका मारल्या तेव्हा अजित त्या हाकेने एकदम घाबरून किंचाळला. हा उद्रेक पाहून लहानग्या मनूला प्रचंड भीती वाटली व तो घाबरून रडू लागला. अर्चनाने त्याला पटकन ओढले आणि आत निघून गेली.

नमा, मावशी आणि सतीश! एकाच्यात हिंमत नव्हती अजितला हाकही मारण्याची! त्याचा चेहरा, त्याच्या डोळ्यातले ते प्रेतासारखे भाव आणि वेगळाच आवाज! आणि त्याचे ते म्हणणे...

"सहनच होत नव्हता मला तो.. शेवटी कसाबसा खलास केला त्याला.. अजित... अजित कामत..."

खूप हालचाली करून पळून जायचे असावे पण पाय जमीनीवरून उचलायचीही ताकद राहिली नसावी अशी अवस्था होती सगळ्यांची!

त्यातच... स्वतःच्याच दारात पालथा पडलेला अजित हालला!

भयानक दृष्य! त्याचे ते पालथे असताना उताणे होणे हे आपोआप झालेले होते.. पालथा माणूस उताणे होताना एका हाताने जमीनीला रेटा तरी देतो किंवा कोपराने किंवा पायाने रेटा देत तरी वळतो... अजित आपोआप पालथ्याचा उताणा झाला होता.. यंत्रासारखा... आणि उताणे झाल्यामुळे त्याचे डोळे दिसू लागले... आजूबाजूला एकही दिवा लावलेला नसूनही.... म्हणजे दिवा लावायचे लक्षातही राहिलेले नव्हते कुणाच्या... संधीप्रकाश संपून रात्र सुरू झालेली होती... आणि असे असूनही अजितचे डोळे मात्र दिसत होते सगळ्यांना.. अजितही दिसत होता.. एकमेकांना ते अंधुक दिसत असले तरी अजित स्पष्ट दिसत होता..

अजितचे डोळे! प्रेताचे डोळे असावेत तसे!

हा तोच अजित जो रोज यावेळेला अर्चनाची किंवा मावशींची थट्टा करून सगळ्यांना हासवायचा.. मनूला खेळवायचा.. आज असा पडलेला होता.. स्वतःच्याच दारात.. मलाच मीच मारले असे म्हणत होता.. आणि.. तो ज्याच्याकडे बघेल त्याचे त्या नजरेने पाणी पाणी होत होते...

अजितची मान आपोआप वळली.. पडल्यापडल्याच... आणि नजर मावशींवर रोखली गेली..

मावशींना पोटात गोळा आल्याची जाणीव झाली.. अक्षरशः मटकन खाली बसल्या त्या... तोवर अजितची मान वळत वळत त्याची नजर आता सतीशवर रोखली गेलेली होती...

लहान मुलासारखा चेहरा झाला होता सतीशचा! भीतीने थरथरत होता तो! त्यातच अजितने ती कृती केली...

स्वतःच्या चेहर्‍यावर स्मितहास्य आणत अजितने सतीशला जवळ यायला खुणावले..

सतीशला आता नजरही हटवता येत नव्हती आणि सहनही होत नव्हते ते निमंत्रण!

"ये ना.. इथे ये??"

अजितने त्याच विचित्र अवस्थेत मान ठेवून सतीशला पुन्हा विनवले..

सतीश अजूनही खिळून उभा होता..

"नाही येणार?? .. का रे?? .. मी नायनाट करीन या सगळ्यांचा.. अगदी खरंच करीन.. पण.. तू ये ना इथे... ये.. अरे ये ना.. ये नाSSSSS"

स्मितहास्य जाऊन शेवटच्या 'ये ना' पर्यंत एक हिंस्त्र ओरड आली होती अजितच्या तोंडावर... जणू तो स्वतः काहीच हालचाल करू शकत नव्हता.. त्याला सहाय्य हवे होते आणि सतीश ते देत नव्हता.. त्यामुळे प्रचंड घाबरून आणि संतापून ओरडावे तसा अगतिकपणे अजित ओरडत होता.. "ये नाSSSS"

हमसाहमशी रडत सतीश भीतीने खाली बसला. कारण हवेचा दाब त्याला अजितकडे सरकवू लागला होता. एकेका सेन्टिमीटरने सतीश बसल्या बसल्याच ओढला गेल्यासारखा अजितकडे सरकू लागला होता.. अजित आता पुन्हा आशाळभूत चेहरा व्हावा तसा प्रेतवत स्मितहास्य चेहर्‍यावर घेऊन लाडीक आवाजात म्हणत होता... ये ना... ये इकडे... !!!

सतीशने आता एक खांब धरला पाण्याचा! पण त्याची ग्रीप सुटलीच! आता अजित त्याच्यापासून केवळ सहा सात फुटांवर होता.. काहीही आशा राहिलेली नव्हती आता.... नमा आणि मावशी निर्जीव वस्तू असल्याप्रमाणे सतीशच्या सरकण्याकडे आणि अजितच्या अभद्र आवाजातील ये ना ये ना अशा आग्रहाकडे खिळून पाहात होते..

नशीब! नशिबाची साथ असली तर काहीच संकट येऊ शकत नाही..

"अहोSSSS.. आत या ना.. याला तुमच्याच जवळ यायचंय.. "

अर्चना खोलीतून सतीशला आत बोलावत होती... तिने खोलीतला दिवा लावलेला असल्यामुळे बोळातही आता प्रकाश पसरला होता..

आणि मनूला बाबांकडे जायचे असल्याने तो हट्ट करत होता व अर्चना सतीशला बोलावणार होती.. त्याप्रमाणे तिचा आवाज बोळात आला .... त्याच क्षणी..

सतीशच्या शरीरावरचा हवेचा दाब नष्ट झाला... पावित्र्याचा एक झरा वाहू लागावा तशी बोळातली हवा जाणवू लागली.. मात्र...

अजित कामत किंचाळत आत निघून गेला.. त्याने दारही लावले नाही..

कशातून तरी सुटका झाली असावी असे वाटले प्रत्येकाला!

मावशी आणि नमा आता बोळातच बसून एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडू लागल्या.. आतमध्ये अर्चना आणि सतीश एकमेकांच्या मिठीत गच्च अडकलेले होते... अर्चनाची आसवे मनूला दिसू नयेत म्हणून सतीशने कडेवर घेतलेल्या मनूचे तोंड दुसरीकडे वळवले होते...

मात्र मावशी आणि नमाच्या रडण्याचा आवाज जाणवताच दोघेही बोळात धावले..

"काही नाही... काही नाही झालं.. रडू नका.. "

सतीशने धावत जात धीर द्यायचा प्रयत्न केला...

त्याला आणि अर्चनाला पाहून तर मावशींना आणि नमाला अधिकच जोर आला रडायला.. आता अर्चनाही ओक्साबोक्शी रडू लागली..

नुकतेच... सावट येऊन गेले होते...

"या क्षणी इथून निघू आपण... चला... या क्षणी निघू.. "

अर्चना सतीश आणि मावशींना गदगदा हालवत म्हणाली...

मावशी कोरड्या ठण्ण नजरेने जमीनीकडे पाहू लागल्या.. काहीच कारण नसताना एक अभद्र सावट पडलेले होते गेस्ट हाऊसवर...

पुण्यकर्मे करूनही मावशींना नशीबाने या मुक्कामावर आणलेले होते... पण तरीही अर्चना म्हणते त्यात अर्थ होता.. मावशींनाही मान्य होते... येथून निघायलाच हवे... जसे आहोत तसे.... नेसत्या वस्त्रानिशी..

सकाळपासूनच सगळ्यांनी खरे तर निघायची तयारी केलेली होती... त्यामुळे आत्ता पटापट हातात सामान घेणे शक्य होते... अवजड वस्तू.. जसे फर्निचर वगैरेचा विचारही मनात येत नव्हता...

एकमेकांना आधार देत सगळेच दारापाशी आले.. मनू अजूनही रडतच होता... घरात काहीतरी भयानक चाललेले आहे इतके त्यालाही समजत होतेच...

आणि ते झाले..

सगळे आतून बंद असलेल्या दारापाशी पोचणार तोच...

... सर्र र्र र्र ...

दारावरून काहीतरी आत वाहत आले.. काय होते ते समजायला एक क्षणही लागला नाही कुणाला...

इट वॉज पेट्रोल....

सतीश आणि नमाच्या तर पायांवरही काही पेट्रोल सांडले.. भीतीने सगळेच दहा पावले मागे सरकले तोवर बोळातील एका भिंतीवरून पलीकडच्या बाजूने असेच पुन्हा पेट्रोल ओतले गेले...

आणि त्याच क्षणी ... मगाचचे सर्व अशक्त रूप त्यागून तीरासारखा अजित त्याच्या खोलीच्या दारात आला आणि कर्कश्श किंचाळला...

"भाडखाSSSSव... एकेकाची *******"

दोन तीन क्षण काहीच झाले नाही... बाहेरच्या बाजूला काही पावलांचे झटझट आवाज आले... काहीशी चोरटी धावाधाव असावी असे... हे सगळे जण भीतीने थरथरत भिंतींना चिकटलेले होते...

आणि अजितने खच्चून ओरडून मावशींना सांगितले...

"सगळे जण माझ्या खोलीत बसा.... नाहीतर.. खलाSSSस व्हाSSSSल.. "

त्याच्या खोलीत जायची कुणाचीच हिम्मत नव्हती...

पण नमाला सुचले... तिच्या खोलीत तरी जाण्यात काही अडचण नव्हती...

मधे उभा राहिलेल्या अजितला टाळून प्रत्येकाने नमाच्या खोलीत धाव घेतली आणि.. दार लावून खिडकीतून सगळे बाहेर बघू लागले.. मनू आता अधिक रडत होता पण त्याच्याकडे कुणाचे लक्षच नव्हते..

आणि त्याच क्षणी तो बोळा आला.. बोळातील भिंतीवरून पलीकडच्या बाजूने एक जळता बोळा आत आला.. आणि त्याच क्षणी आणखीन दोन बोळे आले आणि बाहेर खूप धावाधाव व्हावी तसे आवाज..

पण भीती याची वाटत नव्हती कुणालाच... भीती याची वाटत होती की...

ते तीनही बोळे अजितने स्वतःच्या अंगावर झेललेले होते... आणि..

अजित नखशिखांत जळत होता.. अक्षरशः हंबरडा फोडून किंचाळत होता... बोळात धावत होता... पण बोळात आधीच पेट्रोल सांडलेले असल्यामुळे ... तो जाईल तेथे आग लागत होती.. एक मात्र होते.. त्य आगीच्या एका ज्वाळेचीही धग या खोलीपर्यंत पोचत नव्हती...

हळूहळू सगळा बोळच पेटला..

आगीने एकेक बिंदू भस्मसात करायला सुरुवात केली... अजित तर आता न ओरडताच नुसताच धावत होता.. भिंतीला चिकटणेही त्याला आता शक्य नव्हते कारण भिंतीच पेटलेल्या होत्या..

आणि परवा आपटे आजोबा गेले ती खोली आगीने वेढली... ज्वाळांचा एक विशिष्ट आवाज असतो तसा येऊ लागला...

पाठोपाठ शेजारची.. म्हणजे अर्चना आणि सतीशची खोली ज्वाळांनी वेढली...

रडावे की ओरडावे की किंचाळावे की हतबल होऊन बसून राहावे हे यांना ठरवता येत नव्हते आता..

डोळ्यासमोर संसार उध्वस्त होताना दिसत होता...

आणि त्यातच.... सावट... एक सावट पसरू लागले..

तेच ते.. तेच नेहमीचे आवाज... किंचाळ्या... धावाधावी... जीवघेणे पाठलाग... हंबरडे फोडूण रडणे.. वार होणे.. घुसमटता आक्रोश... जिवाच्या आकांताने सैरावैरा धावणे.. आलं आलं असे भीतीयुक्त उद्गार... बाहेरून एखादी प्रेतयात्रा चालली असावी असे गांभीर्य... पावलांचे शेकडो आवाज..

फक्त आज त्या सगळ्यात एक वेगळेपण होतं... एकच...

... ते म्हणजे... हे सावट खरंखुरं होतं... दृष्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत होतं..

प्रत्यक्ष!

आणि ते दृष्य पाहून बोबडी वळायची वेळ आली होती..

बोळात भरपूर प्रकाश दिसत होता.... पण ज्वाळांचा नाही... कंदिल होते भरपूर... अजित पेटल्याचे दृष्य आता या दृष्यात मिक्स झालेले होते...

हा काळ कुठला ते लक्षात येत नव्हते... पण माणसांनी ल्यायलेली वस्त्रे तरी १९०० च्या आसपासचा काळ दाखवत होती.. नऊवारितल्या बायका.. धोतर आणि बंडी घातलेले पुरुष..

आणि... शी: ... तो म्हातारा..

भीतीने प्रेतवत झालेला तो म्हातारा... असेल नव्वदीचा तरी.. संपूर्ण टक्कल... हिरवे भेदक डोळे... पण आत्ता भीतीने साकळलेले.. अंगावर अमानवी अत्याचारांच्या खुणा... त्याच्यापासून तर सगळेच दूर धावत होते.. अनेक बायका धावत होत्या.. किंचाळत होत्या... हे सगळे बोळातच घडताना दिसत होते..

अनेक वटवाघुळे.. घुबडे.. आणि तीन विचित्र पक्षी... ते पक्षी माणसासारखे बोलून हासत होते..

"मरा भडव्यांनो आता.. "

पक्षी ओरडत होते...... त्यातल्याच एका पक्ष्याने म्हातार्‍याच्या एका गालात तीक्ष्ण चोच खुपसली...

म्हातारा ते हाल सहन न होऊन धरतीवर कोसळला.. तेवढ्यात तिथे एक माणूस आला.. तो ओरडत होता..

"आलं... आलं.."

त्या बरोबर एका बाईने भिंतीवर हात आपटून बांगड्या फोडल्या आणि भयंकर आक्रोश सुरू केला..

तीन माणसांनी दोन घडे भरून सोने आणि काही द्रव्य पळवून नेलं घाईघाईने.. तेवढ्यात बाहेरून एक बोळा येऊन पडला.. तो म्हातार्‍याच्याच अंगावर पडल्याने पक्षी खदाखदा हासू लागले..

त्यातच बाहेरून आलेल्या एका तलवारधारी पुरुषाने एका गर्भारशी स्त्रीच्या पोटात पाते खुपसले.. ते पाहून म्हातारा किंचाळून उठला.. पण एका माणसाने त्याच्या खांद्यावर वार केला..

ती मृत स्त्री मृतावस्थेतच भयाण हासत होती आणि तिचा अविकसित गर्भ आता पक्ष्यांच्या ताब्यात गेलेला होता..

ज्वाळांनी आता तो भाग वेढू लागला होता...

एका कुमारिकेला म्हातार्‍यासमोर आणून चौघांनी विवस्त्र केले व ते त्याच्यासमोरच तिच्यावर अत्याचार करू लागले.. म्हातार्‍याला दोघांनी धरून ठेवलेले होते..

परत कुणीतरी तसंच ओरडलं.. "आलं... आलं.. "

सहा माणसे एका वाहनावरून आल्यासारखी तेथे प्रकटली.. त्यातील एक होते आपटे आजोबा... बरेच तरुण दिसत होते ते.... आणि त्यांच्या हातात असलेल्या तलवारीत म्हातार्‍याचा एक सहा वर्षाचा नातू मरून अडकून पडलेला होता...

ते दृष्य पाहून मात्र म्हातार्‍याने जीव खाऊन उठायचा प्रयत्न केला.. ती सहा माणसे कोण होती ते समजत नव्हतं.. पण जे काही "आलं आलं" असं म्हंटलं जायचं ते याच सहाजणांबाबत असणार हे समजू शकत होतं..

त्यातच आणखीन तीन जण आले आणि काही द्रव्य लुटून घाईघाईने घेऊन गेले.. जाताना तेही खदाखदा हासतच होते.. अनेक बायका आता विलाप करू लागल्या... मात्र अचानक काही माणसांनी त्यातील प्रत्येक स्त्रीला फरफटवत म्हातार्‍यासमोर आणून तिचा गळा चिरल होता.. त्या पाठोपाठ काही लहान मुलांनाही ठार केलेले होते..

जिच्यावर अत्याचार झाले त्याच कुमारिकेने उठून एक शस्त्र हातात घेतलं आणि म्हातार्‍याच्या छातीवर एक वार केला.. अविश्वासाने म्हातारा तिच्याकडे पाहात असतानाच त्याचे अवयव कापायला सुरुवात झाली.. कितीतरी वेळ कत्तल चालली होती त्या म्हातार्‍याची.. कितीतरी जण वार करत होते..

जवळपास पाच ते सहा मिनिटे... म्हातारा ओरडूही शकत नव्हता..

आणि शेवटी... अचानकच सगळे दचकून बाजूला झाले होते... दरारा वाटून मान तुकवून भिंतीला चिकटले होते.. कारण..

बाहेरून तो हासत हासत आत येत होता...

... काका थोरात!

फक्त... एक वाक्य मात्र काका थोरातला त्या म्हातार्‍याच्या शरीराच्या अनेक तुकड्यांमधूनही ऐकू आले..

"मी येईन... पुन्हा येईन मी... "

आणि त्याच क्षणी... इकडे अर्चना किंचाळून बेशुद्ध झाली आणि खाली कोसळली...

ते पाहून सगळेच तिच्या काळजीने तिच्या भोवती बसलेले असतानाच...

सावट!

सावट निघून जात असल्याची जाणीव होऊ लागली.. कसे काय कुणास ठाऊक.. पण अचानक रात्री नेहमी यायचा तसा मस्त थंड वारा आत आला.. रस्त्यावरचे आवाज ऐकू येऊ लागले.. नमाने अर्चनाच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवले.. अर्चनाही आता नॉर्मल दिसू लागली होती...

खरे तर प्रत्येकाच्याच मनातून ते सावट आता निघून गेलेले होते...

कसे ते कळत नव्हते.. पण या क्षणी मागच्याच मिनिटाला पाहिलेल्या घटनांची भीती तर वाटतच नव्हती...

.. पण.. उलट बोळ व्यवस्थित दिसत होता.. आग लागल्याचे एकही चिन्ह नव्हते..

फक्त एकच गोष्ट.... खूप खूप खटकन होती... अंगावर सरसरून काटा आणत होती..

अजित कामत!

जळून काळा ठिक्कर पडलेला देह घेऊन अजित कामत खोलीच्या दाराशी आलेला पाहून सगळ्याच बायका किंचाळल्या.. मनू तर रडून आईला बिलगलाच... सतीश धक्का बसून अजितकडे पाहात होता...

अजितच्या देहालाही जळका वास येत होता.. अजून त्याच्या शरीरातून धूर बाहेर पडत होता... पण.. त्याही परिस्थितीत हासला तो... अत्यंत भयानक वाटले त्याचे ते हासणे सगळ्यांना..

"गेलं... आज तरी घालवलं मी त्याला.. पण केव्हाही येईल हरामखोर.. पण मी आहे.. "

अजित काय बोलला तो संदर्भही समजला नव्हता कुणाला.. मात्र तेवढे बोलून तो खोलीत निघून गेला..

दोन तास! दोन तास सगळे जसे होते तस्सेच बसलेले होते.. पाणीही प्यायले नव्हते कुणी.. मनू झोपून गेला होता.. अर्चना पडून राहिलेली होती..

रात्रीचे दहा वाजले होते.. मगाशी जायला निघालो तेव्हा इतका भयंकर प्रकार झाला हे माहीत असूनही.. सतीश खूप धीर धरून म्हणाला...

"चला मावशी... एकेकजण सटकूयात... आज रात्री इथे राहणे मूर्खपणा आहे.. इथे एक क्षणभरही थांबणे मूर्खपणा आहे... चला.. "

कसाबसा एकेक जण उठून नमाच्या खोलीच्या दारातून आत आला.. आणि मुख्य दाराकडे पावले टाकू लागला..

अजित त्याच्या खोलीत होता.. दारात नव्हता हेच भाग्य...

आणि सगळे दारापाशी पोचले आणि सतीशने हात उंचावून कडीला स्पर्श केला तेव्हा...

एक अत्यंत उपहासगर्भ आणि हिडीस हसू ऐकू आले मागून...

"चाललात??? जा.. खुशाल जा बरे?? मला वाटले की... "

सगळेच हादरून मागे अजितकडे पाहात होते...

"मला वाटले.. उद्यापर्यंत तरी थांबाल.. मनूचा वाढदिवस आहे ना तिसरा??.. म्हणून.. त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून मी... चोर पोलिस खेळायला.... पोलिस आणला होता... तो दिला असता त्याला... "

इतके म्हणून अजित खदाखदा हसू लागला... भीतीने गाळण उडालेली असतानाच सतीशने कशीबशी कडी काढली दाराची...

आणि... समोरचे दृष्य पाहून... प्रत्येकालाच समजले...

या गेस्ट हाऊसमधून बाहेर जाणे कदापी शक्य नाही..

कारण तो खराखुरा पोलिस हातातील काठी दाखवून म्हणत होता...

"चलाSSSS.. चला.. आत चला.. बाहेर संचारबंदी आहे.. गावात काय काय चाललंय माहितीय ना?? बाहेर पडायचं नाही आत्ता... चलाSSSSS"

यात विशेष काहीच नव्हतं.. गावात गस्त होतीच पोलिसांची.. आणि कदाचित झालेले प्रकार बघून खरच रात्रीची संचारबंदी केली असली तरी त्यात विशेष वाटण्यासारखं काहीच नव्हतं...

विशेष वाटण्यासारखी गोष्ट वेगळीच होती...

हातातील काठी हालवून आत जायचा दम भरणारा पोलिस..

....झुंबर गोरे होता..

गुलमोहर: 

बाबो.......
शेवट भयानक....

तुकडे पडलेला म्हातारा आणि काका थोरात. .असा युद्ध रंगणार वाटत

तेच ते.. तेच नेहमीचे आवाज... किंचाळ्या... धावाधावी... जीवघेणे पाठलाग... हंबरडे फोडूण रडणे.. वार होणे.. घुसमटता आक्रोश... जिवाच्या आकांताने सैरावैरा धावणे.. आलं आलं असे भीतीयुक्त उद्गार... बाहेरून एखादी प्रेतयात्रा चालली असावी असे गांभीर्य... पावलांचे शेकडो आवाज..

.....वातावरणनिर्मिती मस्त....वाचताना सगळ घडत आहे अस वाटतय....छान प्रयत्न...

....झुंबर गोरे होता.....बाप रे.....

भयन्कर आहे हे सार...

सावरी

खूपच छान. वाचताना घटना प्रत्यक्ष डोळयासमोर घडताहेत असे वाटत होते. लेखनशैली मस्तच आहे.

हा काळ कुठला ते लक्षात येत नव्हते... पण माणसांनी ल्यायलेली वस्त्रे तरी १९०० च्या आसपासचा काळ दाखवत होती.. नऊवारितल्या बायका.. धोतर आणि बंडी घातलेले पुरुष..

आणि... शी: ... तो म्हातारा..

भीतीने प्रेतवत झालेला तो म्हातारा... असेल नव्वदीचा तरी.. संपूर्ण टक्कल... हिरवे भेदक डोळे... पण आत्ता भीतीने साकळलेले.. अंगावर अमानवी अत्याचारांच्या खुणा... त्याच्यापासून तर सगळेच दूर धावत होते.. अनेक बायका धावत होत्या.. किंचाळत होत्या... हे सगळे बोळातच घडताना दिसत होते..
>>> या काळात गुपीत दडलंय तर....

अगदी 'सावटी-सुंदर' वळण घेत आहे कथा. Happy

एकदम सुरवाती पासुन जरी कोणताही भाग वाचयला घेतला तरी कोणत्याही भागात 'ओंगळवाणा' वा 'निरसतेचा' 'स्पर्श' देखील होत नाहीय भुषणराव.

आपली कल्पना शक्ति 'मानविय आणि अमानविय' यांमध्ये खरंच जबरदस्त समतोल राखुन आहे.

धन्यवाद!*

मस्तच
बेफिकीरजी, प्रत्येक भागात नवीनच काहीतरी समोर येत आहे....
पुढचा अंदाजच बांधता येत नाही आणि यातच तुमच यश आहे.
आता पुढचा भाग कधी ?

बापरे...काय भिषण चाललीये कथा...पोटात गोळा आला अगदी...
छ्या मी भयकथा वाचून कधीच घाबरत नाही...पण आता मात्र कसंतरी व्हायला लागलंय....
आता पुढच्या कथा वाचेन का नाही हे सांगता येणार नाही

बेफिकीर अतिशय छान फुलवत नेत आहात हि कथा. अगदी मागच्या दोन कथेत बेफिकीर अगदी हरवलेले वाटत होते. हा एकदम बेफिकीर टच वाटत आहे. तुमच्या प्रवाही लेखनाची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे.
- जुना पंखा

बेफिकीरजी, वर्णन खुप छान करत आहात. वाचतानाच एवढी भिती वाटते आहे - तुम्हाला लिहिताना कसं वाटत असेल.. असे वाटून गेले..
वाचताना भिती वाटतेय. तरीपण - पुढील भागाच्या प्रति़क्षेत.