आदर्श चालढकल

Submitted by SHANKAR_DEO on 18 May, 2011 - 00:57

सामाजिक न्याय आणि स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारणा-या सरकारी टोपलीतील आंबे आतून किती सडलेले आहेत याचा ढळढळीत पुरावा म्हणजे आदर्श घोटाळा होय. जागतिकीकरण, बाजारीकरण आणि उदारीकरण या वरवर अत्यंत गोड गोड वाटाणा-या तीनचाकी गाड्या सगळ्यांनाच कुठे घेऊन जात आहेत याचे प्रत्यंतर दरदिवशी येथे मिळत आहे. एकदा आदर्श घोटाळा उघड झाला आणि महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावे त्यात आली. त्यापठोपाठ काही लष्करी अधिकारी व सरकारी बाबूही गुंतलेले आढळून आले. काहीजणांच्या सासूबाईंच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाल्याचे दिसून आले. मग हा साधा घोटाळा नसून ब्रह्मघोटाळा आहे हे उघड झाले आणि तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर चौकशी सुरु झाली. आदर्श प्रकरणामुळे सरकारी कारभार भ्रष्ट्राचारात किती खोलवर बुडालेला आहे हे जसे कळले तसे अशा गोष्टी करताना वरीष्ठ नेत्यांना व अधिका-यांना कशाचीच लाज वाटत नाही हेही जनतेसमोर आले. हे सारे घोटाळे करण्यासाठी ब-याच जणांची मदत घ्यावी लागते व ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना ह्या ना त्या रुपाने मोबदला द्यावा लागतो. हे सगळे माहीत असलेल्यांनी एकापाठोपाठ एक घोटाळे करत आदर्शचा ब्रह्मघोटाळा तयार केलेला आहे हे सत्य आहे. आमच्या हातात सत्ता आहे मग आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? अशा मिजाशीत राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधिश वावरत आहेत. भुके कंगाल जनतेचे नेते व सत्ताधारी कोटयाधिश आहेत. पण त्यान्ची हाव अजून तसूभरही कमी झालेली नाही. घोटाळ्यामागून घोटाळे तयार करताना मागचे पुरावे नष्ट करण्याची काळजी सरकारी कर्मचारी घेतात आणि कुणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय हे घडून येणे अशक्य आहे. कार्यालयातून कोणत्या फाईली आणि कागदपत्रे गहाळ करायची याची माहिती वरच्या अधिका-याला असते. आणि हे करत असताना "शिपायाने फाईल गहाळ केली" या विधानावर कुणाचातरी विश्वास बसेल काय? आता तर संगणकाची हार्डडीस्कही मिळत नसल्याचा गोष्टी पुढे येत आहेत. एकूणच आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत चालढकल कशी करता येईल असा प्रयत्न सरकारी यंत्रणा करत आहे. ज्या प्रकरणात वरचे अधिकारी व सत्तधारी गुंतलेले असतात त्य भानगडीत असेच घडते. प्रत्यक्ष सीबीआय चौकशीस उशिराने सुरुवात झाली. मग सीबीआयचे सर्वच कागदपत्रे व महत्वाचे पुरावे आधीच का ताब्यात घेतले नाहीत. याचे उत्तर कुणीच देत नाही. आदर्शची जमीन कुणाची याचीच खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. आणि यातून काय निष्पन्न होणार हे जनता जणतेच आहे. महान लोकशाहीतील महान नेत्यांनी केलेले असे महान घोटाळे याची चौकशीही महान असणार..

गुलमोहर: