पातेल्यात माझे शब्द रटरट शिजत होते

Submitted by असो on 15 May, 2011 - 08:11

रखरखीत उन्हाचा जाच असह्य व्हायला लागला होता
मी गावाबाहेरच्या देवळाची वाट धरली. अस्माईच्या माळावरचं देऊळ
निर्मनुष्य.. निर्जन
असलाच कुणी चुकार फकीर.. घटका दोन घटकेला
नाहीतरी इथे बहुधा कुणीच नसे.

चिंचेच्या झाडाखाली फतकल मारली

आणि

सकाळपासूनच्या वणवणीने आलेला शीण निघून गेला.

टळटळीत दुपारी चिंचेची सावली !

मी फक्त बसून राहीलो. खूप वेळ..

असा कितव्यांदा बसलो असेन !
आणि आतून काहीतरी धडका मारून बाहेर येतयसं वाटू लागलं.

हे असं कितव्यांदा होत असावं ?

पोटात तसं काहीच नव्हतं, दहा पंधरा मैलाची पायपीट, उन्हाचा कडाका आणि आताची सावली !

मी गुंगत चाललो होतो..

पण झोपून चालणार नव्हत
हा एकांत.. मी असा निवांत

कदाचित आत्ताच...

हो आत्ताच वेळ असेल ती.

नेहमीप्रमाणे जाणीव होतं होती.. मन सांगत होतं..
तिच्या येण्याची लक्षणं !

गुंगीचा अंमल वाढत होता.

कदाचित तिच्या येण्याची वेळ झाली होती.

मी गुंगलो होतो का ? डोळा लागला होता का ?
डोळे चोळत उठलो तोच तिच्या स्पर्शाने...!
माझं डोकं तिच्या मांडीवर होतं. कधीपासून ही अशी बसलीये ?

कधी आली ? मला कधी झोप लागली असावी ?

माझ्या डोळ्यात प्रश्न उमटले. ती फक्त खुदकन हसली..
तिच्या हास्यात दुनिया मिळाली.

आज खूप दिवसांनी आलीस...मनात म्हटलं..

तिने उजव्या हाताची मनगटाची लयदार हालचाल करत माझ्यावर तर्जनी रोखली आणि ती खालच्या दिशेला नेत माझ्या तळहाताला स्पर्श करती झाली. मी तिची तर्जनी अलगद हातात घेतली. त्याबरोबर अंगाला लटके झटके देत ती उठली आणि उठतानाच तोल जाऊन मला बिलगली.

मी भान विसरत चाललो होतो.
बाहेत चक्क चांदणं पसरलेलं. चंद्रकोर हाताच्या अंतरावर दिसत होती. पायाखाली ढग होते आणि माझ्याबरोबर चक्क ती होती..

खूप दिवसांनी.. चंद्रकोरीकडे पाहत मनात विचार आले..

मी हा असा
बावळा..गबाळा
थकलेला..हरलेला
ती परीचे पंख लावून यायची
चंद्रकोर रिती होऊन जायची

मी भिकारी.. शब्दांचा
ती जादुची छडी फिरवायची
आणि चांदण्यांची बरसात व्हायची

मी वेंधळा, काळासावळा
दुर्मुखलेला, पीडलेला
ती
हसरी..लाजरी
सांजसावरी
नैनबावरी
रंगविभोरी
चैत्रपालवी
कृष्णमाधवी..!!

पण मी यातलं काहीच बोललो नाही. शब्दांची गरजच नव्हती. कदाचित तिला समजलं असावं सगळं..

समजलच होतं !!

पिठूर चांदण्यात तिच्याबरोबर चालत असताना ती पुन्हा बिलगली..अंग घुसळून आणि म्हणाली..

"ए दे ना रे पुन्हा मला..तो चंद्र..त्या चांदण्य़ा..आणि ते आकाश "

मला तिच चुंबन घ्यावस वाटल.. उगीचच शब्द शोधत राहिलो...

मी गुंगीत होतो का ? छे !
समजेनासं झालय. जमिनीवर उतरताना शक्तिपात होत होता. दुपार कलायला लागली होती.

पोटात आणि डोक्यात तीव्र कलकल सुरू झाली होती. अस्माईच्या माळाकडून गावाकडे पायवाटेनं येताना तांबूस छटांमधे अनेक आकार सोबत करत राहीले..

घरी हातपाय धुवून जमिनीवर फतकल मारली तेव्हा..

चुलीवर बायकोने चंद्र ठेवला होता

आणि चांदण्या चुलीत घालीत होती, भट्टी पेटवायला.. !

पातेल्यात माझे शब्द रटरट शिजत होते,

आकाशाला गवसणी घालणा-या कल्पनेचा धूर... त्या खुराड्यात भेसूर रूप घारण करीत होता.

कोळसा झालेल मन घेऊन ताटावरून उठलो.

तिला सोडायच हा निश्चय करूनच.....

नाहीतर मी तरी विझून जाव....प्रश्नच सुटतील..!!
पुन्हा बाहेर आलो..खुल्या आसमंतात..

वाटा वेड्यावाकड्या फुटत होत्या..
प्रत्येक वाटेवर ती खुणावत होती.

ती परीचे पंख लावून साद घालत होती. तिच्या पंखांनीच तर माझी कल्पना भरारी मारायची

आकाश
अवकाश
धरणी
अवनी
सारे सारे माझे असायचे
चांदण्यातून शब्द
टपटप ओघळायचे आणि
तिच्या गालाला खळीदार
हसू उमटायचे

असच होत नेहमी..मी पुन्हा पाघळून जातो.

मिठीत येऊन म्हणाली..आणलास का चंद्र?

मी म्हणालो थांब थोडी आग शांत होऊ दे..
मग अर्धवट जळालेले शब्द घेऊन फुंकर मारीत बसलो

ती अनिमिष नेत्रांनी पाहत राहीली. मी पाह्यलं..
तिचे पंखच छाटलेले होते..
कुणी ?
मला माहीत नव्हतं का ते !!

मी खोटं खोटं हसत बोललो

खूप पाणी वाहून गेलं नाही ?
आताशा उरल्यात त्या आठवणी
सांडलेल्या क्षणांच्या निरर्थक साठवणी

पण मला कळल मात्र नाही
पंख तुझे हरविले

कि

चांदण्यांचे आभाळ
चोरीस गेले ...?

वेदनेची एक झाक तिच्या टपो-या डोळ्यात उमटली.

ती अफाट क्षितिजाकडे झेपावली. मी दुबळ्या झोळीकडे पाहत राहीलो.

वास्तवाची जमीन आणि अमर्याद कल्पनांचं आकाश....
आणि त्या आकाशाला गवसणी घालणारी माझी ती... !!

पण

जमिनीला टेकलेले पाय मागे खेचत होते. त्या धुरकट खुराड्याकडे.

चुलीत चंद्र घालणा-या तिच्याकडे...

काय करू मी तरी ?
..एक जगू देत नाही आणि एक मरू देत नाही.

आणि ही आग घेऊन मी ही..... कवितेला जळू देत नाही.!!!

अनिल

गुलमोहर: