सावट - ५

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2011 - 05:21

पंचनाम्याचा असा विनोद होतो हे पब्लिकने पहिल्यांदाच पाहिले.

दिवे गावातील धार्मिक गृहस्थ व गणेश मंदिराची व्यवस्था पाहणारे गोवर्धन आपटे उर्फ आपटे आजोबा यांची वयाच्या ऐंशीव्या वर्षी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या! हा अपघात घातपात असल्याचा संशय आल्यावरून संपूर्ण चौकशी केल्यानंतर असे आढळले की रोज पहाटे आपटे आजोबा नदीवर स्नानाला जायचे. मात्र आज पहाटे नदीवर पोचताच त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले व स्वतःचे शरीर पेटवून दिले. या आत्महत्येचे कारण आयुष्यात आलेले वैफल्य असे त्यांनी एका कागदावर त्यांच्या घरात लिहून ठेवलेले आढळले. आपटे आजोबा हे दिवे गावात अत्यंत धार्मिक गृहस्थ व आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून ज्ञात होते. गणेश मंदिराचे व्यवस्थापन व त्यावर उदरनिर्वाह असे त्यांचे साधेसुधे आयुष्य होते. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ते अनेक ग्रामस्थांना अध्यात्मिक सल्ले देऊन त्यांच्या आयुष्यातील अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी उपाय सुचवत व त्याचा मोबदला घेत नसत. मात्र काल त्यांनी प्रथमच श्रीमती कौशल्याबाई पेंडसे या महिलेकडून काही रक्कम घेऊन त्यांच्या घरात पूजा करण्याचे योजले. श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांचे दिवे गावात लहानसे गेस्ट हाऊस असून तेथे एकुण चार सज्ञान भाडेकरू व एक लहान मूल राहते. या गेस्ट हाऊसमध्ये काही बाधा असल्याच्या समजावरून श्रीमती कौशल्याबाई पेंडसेंनी शांतीची पूजा करण्यासाठी आपटे आजोबांना पाचारण केलेले होते. आपटे आजोबा तेथे सायंकाळी साडे सात वाजता गेले व त्यांनी मोबदला म्हणून एक्केचाळीस हजार पाचशे रुपये मागीतले जे कौशल्याबाईंनी त्यांना दिले. त्यानंतर आपटे आजोबांनी स्वगृही परतून अशी चिठ्ठी लिहून ठेवली की शुभ कार्याचे आयुष्यात प्रथमच पैसे घेतल्यामुळे मला माझे मन खात आहे व मी या आयुष्यात केलेल्या सर्व सत्कृत्यांवर पाणी पडलेले आहे. अशा परिस्थितीत आत्महत्या हा एकच उपाय उरलेला आहे जेणेकरून मला माझी ही सर्व पुण्यकर्मे पुढील जन्ममृत्यूच्या फेर्‍यात घेऊन जाता येतील. हे लक्षात घेऊन मी नदीच्या काठावर उद्या पहाटे चार वाजायच्या सुमारास स्वतःला जिवंतपणीच अग्नी देऊन आत्महत्या करणार आहे. या प्रकरणी कुणीही दोषी नसून पोलिस खात्याने कुणालाही अडचणीत आणु नये अशी विनंती! श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांच्याकडे आपटे आजोबांनी कोणती पूजा केली नाही. उलट त्यांनी एक्केचाळीस हजार पाचशे रुपये श्रीमती कौशल्याबाईंना परत दिले जावेत असे चिठ्ठीत लिहीले आहे. एका साक्षीदाराच्या मते आपटे आजोबा रात्री पावणे अकरा वाजता त्यांच्या खोलीतून अनेक पिशव्या हातात घेऊन कोठेतरी निघालेले दिसले होते. मात्र चौकशीअंती ते दिवे गावात कोठेही गेल्याचे आढळले नाही. तसेच श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांच्या गेस्ट हाऊसवर कसून चौकशी व तपासणी केल्यानंतरही असेच आढळले की आपटे आजोबा पुन्हा तेथे गेलेले नव्हते. चौकशीत असे दिसून आले की श्रीमती कौशल्याबाई पेंडसे म्हणत आहेत की अकरा वाजता आपटे आजोबा पुन्हा त्यांच्याकडे आले व एका बंद खोलीत त्यांनी पूजा केली. मात्र ती बंद खोली काल कुणी पूजेसाठी वापरलेली असावी असा कोणताही पुरावा दिसत नाही. ती बंद खोली कित्येक वर्षे बंदच असावी अशी त्या खोलीची परिस्थिती आढळून आली. पुढील तपासासाठी गेस्ट हाऊसवरील सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र कुणालाही आपटे आजोबा पुन्हा अकरा वाजता आल्याचा काहीही पुरवा देता आला नाही. मात्र प्रत्येकजण हेच म्हणत आहे की ते आलेले होते. हा काहीतरी मिळून केलेला बनाव आहे कि काय या दिशेने तपास करता असे आढळले की या सर्वांचे गेस्ट हाऊसमध्ये भूतबाधा असल्याचे एकमत आहे व त्यामुळे त्यांचे कोणतेच म्हणणे ग्राह्य धरता येत नाही. आपटे आजोबा पुन्हा आले होते हा या सर्वांचाच एक भ्रम असावा ही बाब सावेळ्याच्या स्थानिक पाटलांना न पटल्यामुळे पुन्हा कसून चौकशी झाली तेव्हा गेस्ट हाऊसवरील एक भाडेकरू अजित कामत यांना भूतबाधा झालेली असल्याचे इतर सर्व भाडेकरू व श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांचे मत आहे असे आढळले. एकंदरीत, सर्व साक्षी व पुरावे गृहीत धरून व भूतबाधा हा समज निखालस खोटा असल्यामुळे त्यातील कोणत्याच प्रकारावर लक्ष न देता आम्ही स्थानिक पंच असा निकाल देत आहोत की आपटे आजोबांचा मृत्यू ही एक सरळ सरळ आत्महत्या असून त्यांच्याकडील रुपये ४१,५०० हे श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांचे असल्याचा काहीही पुरावा नसल्यामुळे ती रक्कम सरकारजमा होत आहे व या प्रकरणी कुणालाही दोषी ठरवण्यास कोणताही सबळ पुरावा हाती लागलेला नाही. मात्र दिव्याचे पोलिस पाटील श्री. झुंबरराव गोरे हे पुढील तपास करत राहणार आहेत. दिवे गावातील एक भगत स्वरुपाचे काम करणारे काका थोरात यांचे निधन होणे, त्यानंतर त्यांचे प्रेत उठून बसल्याची अफवा उठणे, धावाधाव व चेंगराचेंगरी होणे, ते प्रेत शोध घेऊनही न सापडणे आणि त्याबाबत दोन्ही गावांमध्ये उलट सुलट चर्चांना ऊत येणे या सर्व पार्श्वभूमीवर आपटे आजोबांचा मृत्यू हे एक प्रकारचे गूढच आहे असे मानायला वाव असला तरी कायद्यातील कलमांनुसार य बाबींवर अवलंबून राहणे शक्य नाही व आपटे आजोबांच्या मृत्यूच्या कारणमीमांसेत त्या बाबी समाविष्ट हे कायद्यानुसार चुकीचे ठरेल. आपटे आजोबांचा मृत्यू ही बाब पंचनाम्यात एक स्वतंत्र बाब म्हणूनच तपासली गेलेली आहे व तो मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे आम्हाला आढळले आहे यावर सर्व पंचांचे एकमत! आज दि. ***** रोजी लिहून देणार ******* साक्षीदार **** व ****!

आपटे आजोबांच्या अंत्यविधीला रांग लागली होती. पंचनाम्यामुळे ही आत्महत्याच आहे हे सर्वांच्या मनावर ठसलेले असले तरी कुजबूज चालूच होती की आपटे आजोबांना बहुतेक काका थोरातने मारले असावे.

सलग तीन दिवस तीन मृत्यू आणि तेही भयानक मृत्यू होण्याची दिवे व सावेळे गावाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ! मनीषा काकडे जळून मेली. पाठोपाठ काका थोरात गेला आणि पुन्हा त्याचे प्रेत जिवंत होऊन ते अदृष्य झाले. काका थोरातच्या प्रेताचा शोध पाटलांकडून चालूच होता. तोवर आपटे आजोबा निवर्तले, तेही स्वतःला जाळून घेऊन! दिवे गावाचे काही खरे नाही हे प्रत्येकालाच पटू लागले होते. दिवे गावातील गणेश, मारुती व दत्ताच्या मंदिरासमोर अनेक नवस बोलले जाऊ लागले. प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. लोक एकत्र होऊ लागले. रस्त्यावरून फिरताना आरती करू लागले. आपटे आजोबांची बातमी ही दिवे आणि सावेळेसाठी जरी मोठी बातमी असली तरी नाशिकच्या वर्तमानपत्रांमध्ये एक लहानसा चौकोनच मिळाला त्या बातमीला! पण तेही वाचून अनेक लोक दुसर्‍या दिवशी दिव्याला येऊन गेले. अनेकांना आपटे आजोबांच्या उपायांचा अनुभव आलेला होता. काका थोरातचे महत्व दिवे, सावेळे आणि पंचक्रोशीतच होते. पण आपटे आजोबा त्यांच्या पावित्र्यामुळे दूरपर्यंत प्रख्यात होते.

या सगळ्या प्रकारात एक गोष्ट मात्र झाली. श्रीमती कौशल्याबाई पेंडसे यांचे गेस्ट हाऊस ही बाधित वास्तू आहे हे गावकर्‍यांचे ठाम मत झाले. परिणामतः मावशींना बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नमा तेथे येऊन दोनच दिवस झालेले होते. पण नवीन संस्थेत तिच्याशी कुणी बोलण्याचेही सौजन्य दाखवले नाही. बदनाम झाल्यामुळे अजितची नोकरी गेलेली होती. सतीशला आता प्रश्न होता की कामावर जायचे कसे? कामावर गेलो तर घरी काहीतरी प्रकार होणार! आपटे आजोबांच्या प्रकरणात त्याच्यावर शिंतोडे उडले नव्हते हेच तो खूप समजत होता. खरे तर दिवे गावाला अजितही एक शांत, सभ्य तरुण म्हणून माहीत होता. पण आपटे आजोबांच्या मृत्यूनंतर उठलेल्या आवयांमध्ये अजित हाच खरा बाधा झालेला माणूस आहे हे गावात पसरलेले होते.

गेस्ट हाऊसमधून बाहेर पाय टाकावा तर कुणी बोलतही नाही आणि आत बसावे तर भीती अशी मनस्थिती होती प्रत्येकाची! काल पहाटे आपटे आजोबा गेले त्यानंतर पंचनामा रात्री लगेच पार पडेल असे कुणाला वाटलेही नव्हते. पण आडगाव असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे कुणाची फिर्यादही नाही, कुणी संशयितही नाही आणि आजोबांची चिठ्ठी या कारणास्तव तो पंचनामा अक्षरशः एकदाचा उरकण्यात आला होता. मात्र पोलीस पाटील झुंबरराव गोरे हा उलट्या खोपडीचा माणूस होता. वर्षानुवर्षे शांतच असलेल्या दिवे गावात त्याला आयती संधी चालून आलेली होती. चक्क एक आत्महत्या कम खून कम भूतबाधा?

किती हसावे तेच त्याला समजत नव्हते. चेहरा कोरा ठेवणे जमत नव्हते. प्रसंग गंभीर असला तरी पंचनामा करताना तो मधूनच हासत होता. त्याला हसू येत होते तिसर्‍याच गोष्टीचे! पंधरा वर्षे सावेळे आणि दिवे या गावात पोलिस पाटील म्हणून काढल्यावर आज पहिल्यांदाच अशी घटना झाली होती की जी सरळ सरळ गुन्हा असूनही आत्महत्या म्हणून रजिस्टर्ड झालेली होती आणि तरीही पुढचा तपास करण्याचा अधिकार झुंबरला आहे असे नमूद करण्यात आले होते. परवाच झालेल्या मनीषा काकडेच्या मृत्यूत किंवा काका थोरातच्या मृत्यूत त्याला काहीच मिळाले नव्हते. उलट काका थोरातचे प्रेत हे असे उठून बसलेले पाहून तो स्वतःच पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटला होता. पण आपटे म्हातारं मेलं तेच अफवांचे पीक पिकवून! भूत काय, बाधा काय, अजित कामत म्हणजे मेलेला माणूस काय! काय वाट्टेल ते! एक विद्वान तर बोलताना चक्क म्हणाला होता की काका थोरात गेस्ट हाऊसमध्ये राहायला लागला आहे.

झुंबर नुसता जोरजोरत हासत होता. आत्ता तो पाटीलकीची वस्त्रे कायद्याला तात्पुरती अर्पण करून नामूच्या गुत्यावर बसला होता. आजूबाजूला फक्त दोनच प्येत्ताड होते. बाजी आणि रामोशी! नामू एकटाच वेटर कम मालक कम गल्लेवाला कम सबकुछ असल्यामुळे तोही गप्पा ऐकतच होता.

झुंबरला या प्रकरणात पहिल्यांदाच काहीतरी घबाड जाती लागण्याची चिन्हे दिसू लागली होती.

झुंबर - बाज्या ***... ती मावशीबी भूत हाये म्हन्तोस तू???

बाजी - काय प्रश्नय काय?? च्यायला रस्त्यात तिला पाहायचो ना मी?? डोळं म्हन्जी नुसती आग.. बघवत न्हाय..

झुंबर - पर भूत म्हन्जी पाय उल्टं अस्तात ना?

बाजी - साहेब भुतांचे परकार हायेत येगयेगळे.. इधवा बाई आस्ली तर पाय उल्टं नसत्यात..

झुंबर - पर हा परकार काय समजत न्हाय.. च्यायला थेरडं चिठोरं ल्हिवून म्येलंन.. आन भूत कुट्टं तर म्हनं गेस्ट हावसात..

रामोशी - मी बोलू काय??

झुंबर - आता ह्ये काय पार्लामेंटे काय तवा?? आरं बोल त्वंडाला यील त्ये.. मला बी जरा पडदाफाश करायचाच हाये..

रामोशी - साहेब तुम्ही ह्यो नाद द्या सोडुन..

झुंबर - आन??

रामोशी - आनि काय?? नाद सोडून द्या बस्स्स...

झुंबर - आन तित्तर धरत फिरू व्हय तुझ्यागत??

रामोशी - ह्ये भूत खरंय...

झुंबर - कशावरून??

रामोशी -मला योक सांगा.. म्हातारीकडं चाळीस हजार कुटलं??

झुंबर - अरे पैकाय म्हून भूत खर व्हय??

रामोशी - न्हाय न्हाय.. काय लिखापढी न्हाय.. काय पावती न्हाय.. आन थेरड्याकडं हिनं त्ये पैसं दिलं आसं त्यो ल्हिऊन ठिवतोय.. आन भल्या फाटंचा उठून घेतूय जाळून सवताला.. तिच्यायला आसं कुटं आस्तं काय??

झुंबर - मला येक सांगा... त्ये समदेच बामन काय??

नामू - न्हाय.. त्यो कामत म्हून जो हाये ना?? त्यो मासं खानाराय..

झुंबर - बामनाला भूत लागतंय काय??

नामू - छ्या! भूतालाच बामन लागंल..

झुंबर - म्हन्जी त्यो कामत भूत म्हनायचा..

नामू - काय बा... मला तर आता मीबी भूतच वाटतूय..

झुंबर - तू हायेसच की भूत भडव्या.. तवा तं चालतुय गुत्ता..

रामोशी - साहेब.. मी म्हन्तो तुम्ही योक राउंड माराच थित्तं...

झुंबर - कधी??

रामोशी - ह्ये आत्ता हितनंच जायचं.. पायजंल तर मीबी येतु.. रामोश्याला भूत काय न्हाय करत..

झुंबर - आसं प्यालेलं थितं जायचं व्हय?? मायला ड्युटीवं पीत न्हायत..

रामोशी - लयच कायदा नगा पाळू साहेब.. भूताचा परकार हाये.. मनात जरा धाडस पायजलंच की.... म्हून घ्यावी लागतीय..

झुंबर - नाम्या .. तू काय म्हन्तूस??

नामू -मी न्हाय बा यायचो असल्या जागी.. आन धंद्याच्या टायमाला?? ह्यॅ..

झुंबर - आर नरसळ्या मी जान्याबाबत काय म्हन्तूस??

नामू - लय येळा जा की?? तुम्ही पाटिल हाये.. कवा बी तपासाला जाऊ शकताय..

झुंबर - पर पिऊन??

नामू - पिणं गुन्हा न्हायच हाये.. पाजण गुन्हाय...

झुंबर - बाज्या.. तुझं काय म्हननं??

बाजी - आता आख्खं गांव झपाटलय थितं पोलिस पाटील चवकशी नाय व्हय कर्नार?? जायलाच हवं... समद्येच जाऊ की... मी बी येतुय...

झुंबर - तुम्ही माझ्या मागं मागं र्‍हा! काय?? कोन इरोध बिरोध क्येला तर द्यायच्या द्वान ठिवून.. तुझ्यायला म्हनायचं तपासात अडथळा आनतूस?? आत घालंन गजाच्या.. काय? समदं घर तपासायचं.. काय वाटंल ते उचलून आनायचं संशयास्पद वस्तू म्हून.. आन मग हित्तं येऊन बघू वाटणीचं.. त्यात पुन्न्हा त्ये मिटवायचं कायतरी घ्यायचं.. काय?? भूत बित नसतंय.. मान्संच यड्यावानी र्‍हातात उभी भूत म्हून.. आन बाकीच्यांची फाटतीय बिनकामाची..

निघालं त्रिकूट! भलतीच जास्त झाल्यामुळे कोण कुणाला आधार देतोय तेच समजत नव्हतं! अर्ध्या तासाने गेस्ट हाऊसच्या बाहेर येऊन थांबले.

आजचा सर्व दिवस अजित त्याच्या खोलीत बसलेला होता. हा माणुस एका पूर्ण दिवसात बाथरूमला गेला नाही यावरून तो भूत असण्याबाबत इतरांची अधिकच खात्री पटलेली होती.

अर्चनाच्या खोलीत मावशी, सतीश, अर्चना, मनू आणि नमा कसेबसे बसलेले होते. खूप चर्चा चाललेली होती. अर्चनाचे रडून रडून डोळे सुजलेले होते. मावशीही रडत होत्या. सगळ्यांनीच जागा सोडायची, मावशींनी नाशिकला जाऊन एखादे असे गिर्‍हाईक बघायचे ज्याला या गेस्ट हाऊसचा काहीही इतिहास माहीत नाही किंवा माहीत असला तरी त्याला काही देणेघेणे नाही. किंवा मग ही वास्तू सरकारजमा करून त्या बदल्यात काहीतरी उदरनिर्वाहाचे साधन मिळवून आयुष्यभर निवांत राहायचे.

सतीशने दिवे गावातच एखादी जागा पाहायचे ठरवलेले होते. त्याला त्याचा जॉब आत्ता सोडता येणार नव्हता. तो दिवे गावातच राहण्याचे ठरवत असल्यामुळे आपोआपच मावशींना मोह होत होता की गेस्ट हाऊस न विकताच त्याही त्याच्याबरोबर राहतील आणि मग पुढे कधीतरी बघता येईल गेस्ट हाऊसचे! नमाला फारसा प्रॉब्लेम नव्हता. ती येथे येऊन दोनच दिवस झालेले होते. त्यातही तिला झालेला पहिल्या दिवशीचा त्रास आता होत नव्हता. तिला येथे काम नाही मिळाले तर कुठे ना कुठे मिळणारच होते. शी वॉज अ बिगिनर! सतीशचे तसे नव्हते. पण तरी नमा इथेच राहायला तयार होती, जर काम मिळाले आणि एखादी जागा स्वस्तात मिळाली तर! मग त्या केसमध्ये ती आणि मावशी बरोबर राहायचे ठरवत होत्या. कुणाच्याच प्लॅन्समध्ये अजित कामत हे नांवच नव्हते.

अजित कामत! आपल्या खोलीत बसून भेसूर हासत होता तो! पण आवाज न करता! कारण आता त्याची शिक्षा संपलेली होती. परवाच रात्री अजित कामतच्या शरीरात प्रवेश केल्या केल्या काका थोरातने अनेक वर्षांपासून न भागलेली भूक भागवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला होता. आजवर अजितने बहिणीप्रमाणे मानलेल्या अर्चना वहिनीला अजितच्याच शरीरात शिरून त्याने मिठीत घेतलेले होते. त्याच्या अमानवी शक्तींमुळे ती काही काळ भुललेली होती. त्यांच्यात संबंध आलेले नव्हते. पण ते आलिंगन मावशींनी पाहिलेले होते. आणि मावशींनी ते अर्चनाला सांगितल्यावर तिने रडून आकांडतांडव केला होते. हे पाहून मावशींना ते आलिंगन हाही एखादा भूतबाधेचाच प्रकार असावा असे मान्य झाले होते. मात्र काका थोरातला ज्या शक्तीने अजितचे शरीर दिले होते तिने संतप्त होऊन काका थोरातला अद्दल घडवली होती. म्हणूनच आपटे आजोबांची पूजा झाल्यावर दार उघडून अजितने सगळ्यांना दर्शन दिले तेव्हा त्याच्या अंगावर असंख्य जखमा झालेला होत्या. आणि गेल्या काही तासात अघोरी प्रयत्न करून काका थोरातने स्वतःचे शरीर पुन्हा व्रणहीन व्हावे असा वर त्या शक्तीकडून मिळवलेला होता. त्यामुळेच तो आता आनंदाने भेसूर हासत होता. यापुढे अर्चनाकडे बघायचेही नाही हा निर्णय त्याने घेतलेला होता. ती चूक झाली व एकदाच झाली, यापुढे होणार्नाही हे त्याने तय शक्तीला विनवून विनवून सांगितले होते. त्या शक्तीने दिलेल्या जखमा भयंकर होत्या. असह्य होत्या. त्यामुळेच शक्य होत नसतानाही अजितने सहा तास एका पायावर उभे राहून प्रयत्नपुर्वक त्या शक्तीचा जप करून तिला प्रसन्न करून घेऊन त्या जखमा नष्ट करून घेतलेल्या होत्या.

आता तो शांतपणे आतमध्ये बसून पुढचा विचार करत होता. या वास्तूत येण्याचे त्याचे प्रयोजन फार फार वेगळे होते. ज्या घरात पाच माणसे आहेत व त्यातील प्रत्येकजण एकमेकांचा रक्ताचा नातेवाईक असणे योग्य नाही अशा वास्तूत येण्याचे त्याचे फार फार वेगले कारण होते. कारण अशा वास्तूतच ते होणार होते. आणि ते होऊ नये यासाठी काका थोरातरुपी अजित कामत निकराचा प्रयत्न करणार होता. या पाचजणांपैकी सर्वात सुदृढ असे पुरुषी शरीर त्याला आता प्राप्त झालेले होते. स्मशानातील तानाचा सूड घेतला म्हणून ती शक्ती आणखीनच प्रसन्न झालेली होती व त्यामुळे अजित कामतला आता खरा सुगावा लागलेला होता.

त्यामुळेच तो अत्यंत आनंदात होता.

आपण कोठे आलो आहोत, आपल्याला काय करायचे आहे आणि ते कसे करायचे आहे या प्रत्येक गोष्टीची त्याला जाणिव झालेली होती.

त्याला मावशी, सतिश, अर्चना, मनू आणि नमा यंची आता फिकीरच नव्हती. तो आता दिवे गावावर अवलंबूनच नव्हता. त्याचे काहीच वाईट होणार नव्हते आता!

आणि त्याच क्षणी....

.... त्याच क्षणी प्रमुख दारावर थाप पडली..

जोराची थाप!

"अय थेरडे... ऑठ.. अय... दार उघSSSSSSड... "

झुंबर गोरे!

रामोशी आणि बाजीला साथीला घेऊन घबाड मिळवण्याच्या दृष्टीने आलेला होता.

अचानक अजित कामत आत गंभीर झाला. केवळ तीन क्षण! आणि चौथ्या क्षणीच पोट धरधरून हसू लागला. याही वेळेस त्याची हासण्याची नुसतीच अ‍ॅक्शन होत होती. आवाज येतच नव्हता.

मात्र अर्चनाच्या खोलीत बसलेले सगळेच जण गळाठलेच! हे काय आता नवीन संकट??

नेतृत्व अर्थातच सतीशकडे असल्याने तो सावधपणे उठला. त्याने घरातील एक काठी हातात घेतली आणि दाराकडे सरकला. मागून या तिघीही बायका बिचकतच दोन पावले पुढे आल्या.

सतीशने दारामागे उभे राहात विचारले..

"कोण??????"

"पाटीSSSल.. गावचा पोलिस पाटीSSSSSSल.. दरवाजा उघSSSSSड???"

"काय.. काय पाहिजे आहे???"

"************* दार उघड... "

शिवीगाळ ऐकून खरे तर सतीश हादरलाच होता. पण बायकांसमोर काहीतरी तरी धीर धरायलाच हवा होता. त्याने भीत भीत दार उघडले.

भप्पकन देशी दारूचा भपकारा आत आला. तिघांचे अवतार पाहून बायकाच काय, सतीशही चरकला अन मागे झाला. झुबर स्वतःच्या बापाचे घर असल्यासारखा आत आला आणि मागोमाग बाजी आणि रामोशी!

"काय क्काय हाये घरात ते समदं दावायचं.. परत्येक खोली.. परत्येक कपाट.. परत्येक माळा.. ही तपासनी हाये.. इरोध करेल त्याच्या **त ** घालंल.. पहिल्यांदा हीच खोली.. "

बंद खोलीवर झुंबरने लाथ घातली तशा मावशी मागे पळाल्या किल्या आणायला..

त्या गेल्या तरी तो लाथा मारतच होता. अजितची खोली अजूनही बंदच होती. सतीशने झुंबरला मवशी चावी आणतायत असे सांगितले तेव्हा तो एका बाजूला थुंकला आणि लाथा मारायचा थांबला.

तोवर रामोशीने बोळात पडलेली मनूची एक गाडी लाथेने उडवली आणि उगाचच शिवीगाळ केला. नमा आणि अर्चना भेदरून एका कोपर्‍यात उभ्या राहिल्या. झुंबरचे हे वागणे अत्यंत उद्दाम होते. पण त्या विरुद्ध दाद मागायला गावात एकही घर उरलेले नव्हते. प्रत्येकाच्या दृष्टीने या घरात आता भुते होती केवळ!

मावशींनी ती खोली उघडली. झुंबर आणि दोघे आत गेले तसा सतीशही आत गेला. त्या खोलीत दिवा नसला तरी बाहेरचा थोडा उजेड येत होता. झुंबरला दिसले की त्या खोलीत सर्वत्र जळमटे आणि धूळ होती.

तो भडकला आणि त्याने सतीशला गचांडी धरून पुढे ओढले.

"काय रे *****... इथे त्या थेरड्याने पूजा क्येली व्हयं? आ?? ** बनवताय काय डिपार्मेन्ला??"

मावशी आणि अर्चना मधे पडल्या. त्यांना झुंबरच्या ग्रीपमधून सतीशला बाजूला काढता येईना! झुंबरला आणखीनच चेव चढला. तोवर बाजीने अर्चनाच्याच घरात जाऊन तिच्या देव्हार्‍यातले एक लहानसे चांदीचे निरांजन उचलून आणले अन झुंबरला म्हणाला..

"साहेब.. ह्ये बघा.. भुतांकडं द्येव आन द्येवाची निरांजनं बी.. काय अर्थंय काय ह्याला??"

"ते जप्त कर पहिलं... रामोश्या.. तू बी बघ कुटं कुटं काय लपवलंय भडव्यांनी... "

सतीशची गचांडी सोडत झुंबर उद्गारला. रामोशी नमाच्या खोलीत घुसला. पाठोपाठ हादरलेली नमाही स्वतःच्या खोलीत गेली. तिचे खोटे गळ्यातले एका टीपॉयवर होते.. रामोशीने कसलाही विचार न करता ते खिशात टाकले. ते खोटे आहे आणि ते घेऊ नका असेही म्हणण्याचे नमाचे धाडस झाले नाही. तोवर रामोशी लहान कपाटाकडे वळला. त्यात नमाचे पैसे होते. पाच हजार! ती धडपडत पुढे झाली आणि तिने रामोशीला रोखायचा प्रयत्न केला. त्याने तिला सरळ ढकलून दिले. तिचा धीर आता संपला. ती फक्त बघत राहिली. रामोशीने डोळ्यांदेखत तिचे पैसे खिशात टाकले. दारूने बेभान झालेल्या त्या टोळक्याला पोलिस पाटलानेच घर लुटले अशी केस होईल हेही लक्षात राहिलेले नव्हते. निर्लज्जपणे नमाकडे पाहून हासत रामोशीने तिला दारातून दूर ढकलले आणि बाहेर येऊन स्वयंपाकघरात धावला. खिशातल्या पैशांबद्दल तो झुंबरसाहेबांनाही काहीही सांगणार नव्हता. इकडे बाजी अजूनही अर्चनाच्या खोलीत तपासणीचे नाटक करत होता. त्यामुळे सतीश आणि अर्चना तेथे धावलेले होते. झुंबर चालत चालत मावशींच्या खोल्यांकडे जात होता.

बाजीलाही थोडी कॅश मिळालीच. मात्र त्या क्षणी सतीशने त्याचा कडाडुन विरोध केला तसा बाजीने रुद्रावतार धारण केला व मोठ्याने शिवीगाळ करू लागला. हे आवाज ऐकून शेजारच्या जोंधळे वहिनी दाराच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या. बोळात कुणीच नसल्यामुळे त्यांना हे आवाज ही एक भुतातकीच वाटत होती आधी, पण त्यातच अर्चना आणि सतीशचे आवाज आल्यावर त्यांना हा काही वेगळाच प्रकार असल्याचे जाणवले. मग त्यांनी एक पाऊल आत टाकायचा निर्णय घेतला.

मात्र बाजीचा आवाज ऐकून झुंबर इकडे आला नाही. त्याला समजले की ही शिवीगाळ आणि दमबाजी घाबरवण्यासाठी अत्यावश्यक असल्यामुळेच चाललेली आहे. त्याने मावशींच्या खोलीत पाऊल टाकले... मागोमाग मावशींनीही...

मात्र त्याच क्षणी...

.... इकडे बोळात जोंधळे वहिनी... आपल्या खोलीतून घाबरून रडत येत असलेली नमा.. बोळात आलेल्या बाजीकडून कॅश घ्यायला धावलेला सतीश आणि मागोमाग अर्चना... आणि स्वयंपाकघरात काहीच न मिळाल्यामुळे पुन्हा बोळात येत असलेला रामोशी..

असे सगळे बोळात असताना.. बहुतेक मावशी तेथे नाहीत हे पाहून...

अजितच्या खोलीचे दार उघडले..

खलास!

अत्यंत भयानक नजरेने अजित कामत बाजी आणि रामोशीकडे बघत होता.. उजव्या हाताच्या बोटाने त्याने त्यांना खूणावत सांगीतले..

"काय काय उचललंस ते खाली टाSSSSक... टाक खालीSSS.. "

अजितचे ते स्वरूप पाहून कशी कुणास ठाऊक पण सतीश, अर्चना, नमा आणि जोंधळे वहिनी.. कुणालाच भीती वाटली नाही.. खरे तर... किंचित आधारच वाटला अजितचा.. नेहमीसारखाच दिसत होता तो...

मात्र.. !!!!!!!!!!!!!!

रामोशीची नजर निर्जीव झालेली होती... स्तब्ध खिळल्यासारखा तो एकटक अजितकडे पाहात होता.. क्षण दोन क्षणातच त्याला भान आले आणि त्याने किंकाळी फोडली.. खिशातले सगळे जमीनीवर टाकले आणि अक्षरशः पाय लावून पळत सुटला दारातून... त्याची देशी त्याच क्षणी उतरलेली होती...

फक्त दारातून बाहेर पडताना त्याला एकच अडथळा जाणवला.. तो म्हणजे बाजी... बाजी स्वतःजवळची प्रत्येक वस्तू जमीनीवर टाकून देत अजित कामतकडे भयंकर घाबरून बघत रामोशीपेक्षाह वेगात दाराबाहेर पळत सुटला होता..

त्यांना पळून जाताना पाहून सगळ्यांच्याच मनावरचे प्रचंड ओझे उतरलेले होते..

... अजितच्या करारी नजरेला घाबरून ते दोघे निघून गेले याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता.. तेवढ्यात मावशी आल्या आणि म्हणाल्या..

"गेला बाई एकदाचा... "

झुंबर गोरे मागून कुठून गेला कुणाला समजेना!

मात्र... सगळ्यांचेच गैरसमज होत होते हे फक्त अजितलाच माहीत होते..

कारण...

रामोशी घाबरण्याचे कारण फार फार वेगळेच होते... त्याला अजितच्या जागी दिसली होती...

मनीषा काकडे... तशीच.. ऐंशी टक्के जळलेली...

आणि बाजीचे कारण तर त्याहून वेगळे होते...

कारण ज्या माणसाच्या आत्महत्येसंदर्भात तपासणी करायला आपण आलो आहोत तो थेरडा आपटे जिवंत कसा हेच त्याला समजत नव्हते...

आणि.. त्याचवेळेस गुत्यावरचा नामू मात्र सुसाट वेगाने सावेळे गावाकडे पळत सुटला होता...

सावेळ्याच्या पोलिस पाटलांना... गंगाधर देशमुखांना ती बातमी कळवायला.. की...

'अती मद्यपानामुळे दिव्याचे पोलिस पाटील झुंबरराव गोरे यांचा गुत्यापाशीच मृत्यू'

गुलमोहर: 

मी दुसरी.
थोडा मोठा भाग टाका. हि मला ही ५% आवड्ली नाहि मात्र ९५% आवड्ली. थोडासा बे.फि ट्च कमी वाटला.
बाकी झक्कास. अजुन छान लिहिण्याचा प्रयत्न करा.
पु.ले.शु.

बापरे....
काय वेग आहे कथेत......
पुढे काय होइल याची उत्सुकता लागली आहे.

pakad dhili zalii...........raao .... Sad ........

suravatichi prastavna kami zali asti tar jara jaast vaachaylaa milale asate....

भुषणराव,

नमस्ते!

खुप दिवसनी मायबोलिवर आलो...कारण ८-१० दिवस मी कामानिमीत्त बाहेर होतो आणि खर् सान्गतो मला ते १०००० नाही आवडले. हे माझे वयक्तिक मत आहे. कारण ती कथा मला निर्जीव वाटली. जी मजा ओल्ड मन्क, सोलपुर, पेन्ढारकर, बोक्या मध्ये होती ती १०००० मध्ये नाही आलि माफ करा ..........
मी मायबोली चा सदस्यच मुळी तुमच्या मुळे झालो.
तुमच्या बोक्या कदुन मला खुप आपेक्षा होत्या. बघा पुर्ण करता आली तर्.............मज़़ज्जाआआ येइल.

सावट.....झक़क्क्क्क्क्क्क्काआआआआआआआआआअस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!.
सगळी टेस्ट परत आली. आगदी महिन्याभराच्या उपवासानन्तर झणझणीत तांबडा रस्स्स्साआआआआआआआआआ हाणावा अस्सा.

पुढ्च्या भागाच्या प्रतिक्शेत.........

अमित

मस्त...

खुप सुन्दर. ऱोज रात्री झोपताना घाबरते ही कथा वाचल्यापासुन. रोज म्हणते, उद्या नाही वाचणार आणि सकाळी लगेच वाचायला घेते. तुमच्या कथा म्हणजे न सुटणार व्यसन आहे.

वा! मस्तच! अजितच्या शरीरात वास्तव्याला आलेला काका थोरात किमान मावशींच्या कुटुंबासाठी तरी धार्जिणाच ठरला म्हणायचा... Happy
भीती नाही वाटली, पण आवडला आजचा भाग. रोज भीती वाटलीच पाहिजे, असे थोडीच आहे नाही का? विषयाच्या विस्तारासाठी अधून मधून असेही भाग आलेले चालतील... धन्यवाद!

'अती मद्यपानामुळे दिव्याचे पोलिस पाटील झुंबरराव गोरे यांचा गुत्यापाशीच मृत्यू' >> सही, म्हणजे भुताने पोचवले का त्यांना गुत्यापर्यंत? हा भाग बाकींपेक्षा फास्ट झालाय कारण बर्‍याच गोष्टी कव्हर केल्यात.

छानच

भुषणराव, कथा अगदी कडेवर घेउन लिहताय असे स्पष्ट दिसत आहे या भागात. अगदी जीव ओतुन खरडत आहात Happy . एक अवकाश कायम राखला आहे या भागाने. गुढता कायम राखली आहे. त्यामुळे येणार्‍या भागांची आणी पुढे काय होणार याची उत्सुकता सतत प्रचंड ताणली जात राहते.

कशीही गुंडाळुन न टाकता कथेला पुर्ण न्याय देउन कथा कशी पुढे सरकते, ते हा भाग दाखवुन देतो. आणि लेखकाचे वैचारीक कौशल्यही.

भाग लहान असला तरी या भागाने आपले पुर्ण कर्तव्य निभावले आहे भुषणराव. आपले दैनंदिन कामं साभाळुन या अश्या विषयांत विचाररत राहुन रोज एक भाग देत राहणे म्हणजे काय खायचे काम नाही.

कादंबरी अगदी व्यवस्थीत पुढे जात आहे घटनांचा सयंम राखुन.

धन्यवाद!*

अतिशय सुन्दर कादम्बरी !पण मनिषा काकडे नाव बदला कारण खरच माझ्या एका गोड सखीचे ते नाव आहे.तिला उदन्ड आयुष्य लाभो.

हि कादंबरि पण भन्नाट चालली आहे बेफिकीरराव !
माफ करा पण मलाहि काहि कारणास्तव प्रतिसाद द्यायला जमत नव्हतं!
पुढच्या भागाची वाट बघतोय!

प्रतिक्रिया क्रमांक ६,७,८, १३, १४, १७, १८ नंतर माझी पण प्रतिक्रिया

बेफिकीर
तुम्ही चांगले साहीत्यिक आहात. तुमची शैली आणखी विकसित होत जाणारै हे नक्की ! तुमच्या प्रगतीला माझ्या नेहमीच सदिच्छा असणारेत. ही कादंबरी पण मी एका ओघात वाचून काढणारै.. लवकर पूर्ण होउ द्या !

आज कुठे राहीलात?
शनीवार, रविवार.....................?
आज तरी येउ देत सावट -६.............
प्रतिक्षेत......................

Pages