ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध

Submitted by sudhirkale42 on 11 May, 2011 - 06:19

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध
१ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली!

मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता! पाकिस्तानी दुतोंडीपणा केवळ अमेरिका किंवा भारताबरोबरच्या संबंधाबाबतच होता असे नाहीं तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रजेबरोबरच्या बाबतीतही होता. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे पाकच्या पंतप्रधान युसुफ राजा गिलानींचे ’ड्रोन’ विमानांच्या वझीरिस्तानमधील हल्ल्यांबाबतचे अलीकडील विधान. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत सभासदांनी उठवलेल्या गदारोळाला उत्तर देताना त्यांनी 'आम्ही अमेरिकेला हे हल्ले बंद करायला ठणकावून सांगितले आहे' असे विधान केले पण दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना व मुत्सद्द्यांना सांगितले कीं ती फक्त 'बोलाचीच कढी' असून प्रत्यक्षात ते अशी बंदी घालणार नाहींत व द्रोणाचार्यांचे (’ड्रोन’ला मी तर ’द्रोणाचार्य’च म्हणतो) हल्ले त्यांनी चालूच ठेवावे.

पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात लेखकद्वय लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. (हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने जरूर वाचावे.) अगदी अयूब खान हे राष्ट्राध्यक्ष आणि जुल्फिकार अली भुत्तो परराष्ट्रमंत्री असताना (ते पुढे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षही झाले) पाकिस्तानने अमेरिकेची दोस्ती चालू असतानाच चीनशीही चुंबा-चुंबी चालू केली होती. पाकिस्तानने त्यावेळी सीटो (SEATO) आणि सेंटो (CENTO) या लष्करी संघटनांचे सभासदत्व स्वीकारलेले होते. असे असूनही अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली मैत्री ’जिवश्च-कंठश्च’ कधीच नव्हती. त्याचे कारणही पाकच्या दुटप्पीपणाबद्दल अमेरिकेला असलेला संशय हेच होते. भारताने सुरुवातीपासूनच कुणाच्याही लष्करी संघटनेचे सभासदत्व न घ्यायचे ठरविलेले होते-ना अमेरिकेचे व ना सोवियेत संघराज्याचे. त्यामुळे भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिका नेहमीच बुचकळ्यात पडलेली असायची.कारण भारत धड त्यांच्या कळपातही जात नव्हता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतका नगण्यही नव्हता! याचा परिणाम अमेरिकेच्या पाकिस्तानच्या मैत्रीवर होणे स्वाभाविकच होते व तसेच झाले. भारताविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा मिळविण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेशी मैत्री हवी होती. पण अमेरिका पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देत होती ती साम्यवादींशी (communism शी) लढण्यासाठी. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरायला अमेरिकेची बंदी असायची. अशा तर्‍हेने या मैत्रीत सुरुवातीपासूनच दोघांची तोंडे दोन दिशांना होती! आणि काळाबरोबर या दोन देशांमधील तणाव वाढतच गेला होता.

१९७१ सालचा बांगलादेशच्या निर्मितीच्या युद्धातील शर्मनाक पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला होता. आणि या युद्धात झालेल्या पराभवाबद्दल पाकिस्तानने अमेरिकेला योग्य वेळी मदत न केल्यावरून जबाबदार धरले. (तसे पहाता या युद्धात चीननेही पाकिस्तानला मदत केली नव्हती.) इंदिराजींच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध इतक्या झटपट आणि निर्णायपणे संपविले कीं कुणालाही विचार किंवा कृती करायला वेळच मिळाला नाहीं. पण या पराभवामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीत एक पाचर ठोकली गेली व ती पाचर आजही या दोन देशांतील संबंधांना एका ठरावीक पातळीपेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीं!

भारताने १९७४ साली "पोखरण-१"ची अण्वस्त्रचांचणी केली त्यामुळे पाकिस्तानला-व विशेषत: भुत्तोंना-धक्काच बसला! त्यांनी लगेच अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतीय अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळावे अशी गळ घातली. पण आपल्या शत्रुत्वाला भिऊन म्हणा किंवा आपल्याशी त्यावेळी शत्रुत्व पत्करायची अमेरिकेची तयारी नव्हती म्हणून् म्हणा, पण अमेरिकेने पाकिस्तानची ही विनंती मान्य केली नाहीं. हेन्री किसिंजर यांनी "भारताने अण्वस्त्र चांचणी केली ही वस्तुस्थिती पाकिस्तानने "fait accompli" म्हणून स्वीकारावी असा मानभावी सल्ला दिला. त्यावर भुत्तोंनी सांगितले कीं भारताने अणूबॉम्ब बनविला तर आम्ही (पाकिस्तानी जनता) पाने-गवत खाऊ, भुकेले राहू पण आम्हीही आमचा अणूबाँब बनवूच. आमच्यापुढे दुसरा कुठलाही पर्यायच नाहीं. भारताच्या अण्वस्त्राला आमचेही अण्वस्त्रानेच उत्तर असेल" ("If India builds the bomb, we will eat grass or leaves, even go hungry, but we will get one of our own. We have no alternative ... atom bomb for atom bomb.") यापुढे अमेरिकेवर विसंबणे बरोबर नाहीं म्हणून भुत्तोंनी चीनशी दृढ संबंध प्रस्थापित केले आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीत चीनचा सहभाग मोठाच होता! डॉ. खान यांनी विघटनशील अतिशुद्धीकृत युरेनियम युरोप व अमेरिकेच्या सहाय्याने बनविण्यात यश मिळविले असले तरी अणूबॉम्बची संरचना (design) त्यांना चीनकडूनच मिळाली होती! भुत्तोंनी आपल्या मृत्युपूर्व शेवटच्या निवेदनात म्हटले आहे कीं चीनशी संबंध जोडण्याचे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कारकीर्दीतील मोठे कार्य होते!

भुत्तोना फाशी दिल्यावर झियांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते, पण सर्वच पाकिस्तानी हुकुमशहा सुदैवी आहेत. ते अतीशय अडचणीत असतांना अशी एकादी घटना घडते कीं या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट पाकिस्तानला मस्का लावायची पाळी पाश्चात्यांवर येत आलेली आहे. सोवियेत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. रेगननी पैसा आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानात ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रेगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले. चीनच्या ’संयुक्त राष्ट्र संघटने’तल्या प्रवेशाच्या वेळी पाकिस्तानने तैवान ऐवजी चीनला अमेरिकेच्या मनाविरुद्ध समर्थन देणारी मध्यपूर्वेतील राष्ट्रांची फळी उभारून अमेरिकेविरुद्ध चीनला उघडपणे मोठीच मदत केली होती व ते उपकार चीनने आजपर्यंत लक्षात ठेवले आहेत. याचेच पारितोषिक म्हणून पाकिस्तानच्या अणूबॉम्ब निर्मितीत चीनने खूपच मदत केली.

धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा वाळीत टाकल्या गेलेल्या मुशर्रफना अल कायदाने केलेल्या ९/११ हल्ल्यानंतर जीवदान मिळाले आणि ते "दहशतवादाविरुद्धच्या युद्धा"चा खंदा पुरस्कर्ता व त्या युद्धातला अमेरिकेचे सच्चा साथीदार आणि बिनीचा शिलेदार म्हणून समजले जाऊ लागले. पण इथेही दुटप्पीपणा चालूच होता. मुशर्रफच्या "कुदेता"नंतरच्या खूपशा अत्युच्च नेमणुकीत अल कायदा व कडव्या इस्लामी लोकांचा सुळसुळाट होता. मुशर्रफ यांच्या काळात अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीला जणू एकाद्या "मॉल"चे, 'वॉल-मार्ट'चे स्वरूप आले व विक्रीचे काम जोरात सुरू झाले व ते तंत्रज्ञानही इराण, उ. कोरिया, लिबिया व इराक या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना देण्यात आले. पण अखेरीस ते अमेरिकेच्या लक्षात आले व त्यांनी जाब विचारताच मुशर्रफने डॉ. खानना 'बळीचा बकरा' बनविले व आपल्या पापांचा कबूली जबाब द्यायला लावले व देशाची माफी मागायला लावली.

ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बर्‍याच प्रमाणात या संबंधांत अंतराय येऊ लागला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच "जगातील सर्वात धोकादायक जागा" असा पाकिस्तानचा उल्लेख ओबामांनी खूप वेळा केला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुशर्रफ यांनी मारले नाहीं तर "अमेरिका आपली फौज पाठवून त्यांना मारेल" असेही वचन दिले होते. (अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले.) निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच १०० दिवसांनंतरच्या वृत्तपत्रपरिषदेतही त्यांना एका वार्ताहाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते कीं पाकिस्तानच्या हातातील अण्वस्त्रे सध्या तरी सुरक्षित असून नजीकच्या भविष्यकाळात पाकिस्तानचे सरकार कोसळून तालीबानचे किंवा अल कायदाचे सरकार राज्यावर बसेल अशी शक्यता अजीबात नाहीं. पण तिथले मुलकी सरकार फारच ठिसूळ (very fragile) असून त्या सरकारकडे शाळा, आरोग्य, कायद्याचे राज्य न्यायसंस्था यासारख्या मूलभूत गरजाही भागविण्याची क्षमता नाहीं म्हणून! (पूर्ण मुलाखत http://blogs.wsj.com/washwire/2009/04/30/transcript-of-obamas-100th-day-... किंवा http://www.huffingtonpost.com/2009/04/29/obama-100-days-press-conf_n_193... या दुव्यांवर वाचता येईल)

ओबामांना सुरुवातीला पाकिस्तानची मदत नाइलाजास्तव चालू ठेवावी लागली असली तरी एक तर्‍हेचे audit करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. (हे audit 'सार्वभौमित्वा'सारख्या 'उदात्त' कारणांसाठी पाकिस्तानला नको होते!) त्याच वेळी ही मदत देत असताना पाकिस्तानला "दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जोर हवा" असा तगादाही ओबामांनी लावला होता. त्यानुसार पाकिस्तानला 'स्वात' खोर्‍यात लष्कर पाठवून मोहीम आखावी लागली त्यात अनेक दहशतवादी (व प्रजाजनही) मारले गेले. पण हा जाच पाकिस्तानला पसंत नव्हता.

पाकिस्तानात पूर आल्यावरही अमेरिकेची मदत भरघोस नव्हती, याबद्दल पाकिस्तानने तक्रार केल्यावर "तुमचे श्रीमंत नागरिक कर देत नाहींत ते आधी वसूल करा" असा दबावही आणला.

ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या एका पाकिस्तानी नातेवाईकाने CIA खटला भरला व त्या बाबत पाकिस्तानातल्या CIA च्या Station Chief चे (जोनाथन बँक्स) नाव पाकिस्तानी अधिकार्‍यांनी गेल्या डिसेंबरमध्ये फोडून एक नवा पेच निर्माण केला व त्यामुळे बँक्सना परत जावे लागले. त्यांच्या जागी आलेल्या नव्या Station Chief चे नावही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

पकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. व या देशांच्या गुप्तहेर व लष्करी संघटना कशा दूर जात आहेत व एकमेकांचे कसे वाभाडे काढत आहेत याचे वर्णन करणारा एक सुरेख लेख पाकिस्तानच्या डॉन मध्ये छापून आलेला आहे तो http://tinyurl.com/4ydkwfl या दुव्यावर वाचायला मिळेल. रेमंड डेव्हिस प्रकरणापासून तर हे संबंध आणखीच बिघडले व लगेच ज. कयानींनी अमेरिकेला आपले "सल्लागार" (हेर) २५-४०% टक्के कमी करायला सांगितले आहे.

आता बिन लादेन पाकिस्तानात अगदी राजधानीपासून ५०-६० किमी अंतरावरील एका गढीवजा घरातच सापडला. जगातल्या दहा सर्वोत्कृष्ठ गुप्तहेरखात्यातल्या १ नंबरच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं. त्यामुळे बिन लादेन हे लष्कर व ISI च्या 'संरक्षणा'खाली त्यांच्याच एका सुरक्षित घरात रहात होता असे आरोप पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांतही होत आहेत! या अविश्वासामुळे ओसामांना ठार करण्याच्या मोहिमेची कांहींच माहिती पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून दिली गेली नव्हती. नौदलाच्या "सील"च्या या तुकडीने हेलीकॉप्टर्समधून येऊन ओसामांना ठार केले. ही हेलीकॉप्टर्स पाकिस्तानच्या राडारलाही न दिसता आत आली, चाळीस मिनिटे कार्यरत होती व बिन लादेन यांना व बरोबरच्या इतर कांहीं पुरुषांना ठार करून, स्त्रियांना व मुलांना तसेच सोडून तिथले सर्व दस्तावेज, संगणक, संगणकाच्या हार्ड डिस्क्स, फ्लॅश डिस्क्स वगैरे पुरावेवजा सर्व साहित्य घेऊन परत पाकिस्तानबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारला त्याबद्दल सांगण्यात आले. याच्या मिरच्याही सरकार, लषकर व ISI च्या नाकाला चांगल्याच झोंबल्या आहेत!.

पाकिस्तानातील डॉन एक्सप्रेस ट्रिब्यून सारख्या वृत्तपत्रांत खूप टीकात्मक लेख प्रसिद्ध झाले. नुसती संपादकीयच नव्हेत तर अनेक स्तंभलेखकांनीही पाकिस्ता सरकारची आणि लष्कर/ISIचीही रेवडी उडविली आहे. त्यापैकी कांहीं दुवे शेवटी दिलेले आहेत.
आता अमेरिकेचे सांसद उघड-उघड पाकिस्तानची मदत थांबविण्याबद्दल आग्रह धरू लागले आहेत. त्यावर कुरघोडी करण्यासाठी लगेच काल पाकिस्तानी संसदेपुढे भाषण करताना गिलानींनी चीनची "Pakistan's All-Weather Friend" अशी भलावण करून अमेरिकेला चीनचे बुजगावणे दाखविण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत.
अन्य दुवे:
The Emperors’ Clothes हा Cyril Almeida यांनी लिहिलेला लेख सर्वोत्तम आहे!
http://tinyurl.com/6zrwq2b (The curious case of Osama bin Laden-Hoodbhoy)
http://tinyurl.com/3ghxu8g (Imran Khan in “The Independent”)
http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/ (10 best intelligence agencies in the world)
http://www.pakalertpress.com/2010/07/31/10-best-intelligence-agencies-in... (10 best intelligence agencies in the world)
http://www.dirjournal.com/info/the-worlds-best-intelligence-agencies/ (10 best intelligence agencies in the world)
http://tinyurl.com/3yvtzq6 (David Cameron in Bangalore 28th July 2010)
http://tinyurl.com/3d5gj4u (Davis Miliband in Washington DC 30th April 2011)

Abbottabad Raid-Pakistan upset about being kept in the dark (by Kamran Yousaf-Express Tribune-4th May 2011)
http://tinyurl.com/3mp7jtt

Pakistan’s military and elite are holding it back: US analyst -The Express Tribune
http://tribune.com.pk/story/34519/pakistans-military-and-elite-are-holdi...

The best intelligence agency in the world ‘ISI’ (Siasi Pakistan-4 Aug 2010)
http://tinyurl.com/3m28t42
The Emperors’ Clothes A must-read article by Cyril Almeida in DAWN dt. 6th May 2011
http://tinyurl.com/3l76flh किंवा http://www.dawn.com/2011/05/06/the-emperors-clothes.html

DAWN editorial "Osama bin Laden" 3rd May 2011
http://www.dawn.com/2011/05/03/osama-bin-laden.html

जकार्ता पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेले माझे पत्रः
http://tinyurl.com/6axbcfg

कराचीच्या महंमद असीम या वाचकाचे सुरेख पत्र या दुव्यावर वाचा: http://tinyurl.com/3ee5u3y

माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा: http://tinyurl.com/69n7exb

गुलमोहर: 

लेख चांगला आहे.
भारताने सुरूवातीला नाटो आणि साम्यवादी राष्ट्रांपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्विकारले होते. तसच अमेरिकेची दंडुकेशाही पाहता इंदिरा गांधी यांच्या काळात रशियाबरोबरचे संबंध दृढ केले गेले. याचाच परिणाम म्हणून बांगलादेश निर्मितीच्यावेळी रशियाने वेळीच हस्तक्षेप करून अमेरिकेला पाकला मदत देण्यापासून रोखून धरले.

भारत रशियन कँपचा म्हणूनही भारतावर कारवाई झाली नाही. नाहीतर लिबिया, व्हिएतनाम सहित अनेक देशात त्ञा काळात अमेरिकेने एकतर्फी लष्करी कारवाई केलेली होती. अमेरिका नाहीतरी युनोला जुमानतच नव्हती. रशियाच्या धाकाने अमेरिकेला ब-याच कारवाया करण्यापासून रोखले होते.

अफगाणिस्तानमधे रशियन सैन्य घुसले तेव्हा रशियाचा आशियातला शिरकाव अमेरिकेला सहन झाला नाही आणि तालिबान आणि अल कैदाची निर्मिती अमेरिकेच्या पुढाकाराने झाली हे आता जगजाहीर आहे. या कारस्थानात आयएसआय पूर्वीपासून असली पाहीजे. पुढच्या अनेक घटना आणि अमेरिकेची संशयास्पद भूमिका पाहीली तर शंका बळावत जाते. पाकिस्तान अतिरेक्यांचं नंदनवन होत गेलं हा पाकच्या लष्कराच्या धोरणाचा एक भाग होता. पाकला अमेरिकन मदतीवर अवलंबून रहावं लागतं. ही मदत अमेरिका कधीही रोखू शकते. या परिस्थितीत पाक अमेरिकेला अंधारात ठेवून काही करत असेल असं वाटत नाही.

पण दोन्ही राष्ट्रांना सोयीचं व्हावं म्हणून तू कर मारल्यासारखं मी करतो लागल्यासारखं असं नाटक बेमालूम चालू आहे. अमेरिकेला लादेन हवा होता आणि त्याने पाकमधे आश्रय घेतल्याने पाकची पंचाईत झाली. अमेरिकेला खूष करावं तर लादेनला मानणारी पाक जनता दुरावते.. त्यातच विरोधकांना शह देण्यासाठी शरीयतचं टोकाचं राजकारण त्याच काळात खेळलं गेलं होतं. मूलतत्ववाद्यांची मदत घेण्यात आली होती. अशा काळात लादेनला पकडून देणं पाकला परवडण्यासारखं नव्हतं. पाकने हे सर्व अमेरिकेच्या कानावर घातलच असणार.. कारण याच काळात भारताकडून अमेरिकेला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याबद्दलचे पुरावे देण्यात आले होते अतिरेक्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स आणि लादेनचे नेटवर्क ही सर्व बातमी दिलेली होती.

तरीही दहशतवादाच्या युद्धात पाक हा आमचा एक महत्वाचा साथीदार आहे असं अमेरिका म्हणत राहीली. असं म्हणणारी अमेरिका भाबडी नक्कीच नाही.

आताही लादेनला मारल्यानंतर जे काही चित्र समोर येतंय ते रंगवलेलं असण्याची शक्यता असावी. अमेरिका खरच नाराज असेल तर पाकची मदत रोखून धरायला हवी होती.. तशी चिन्हे दिसत नाहीत. ही कृतीच खूपशी बोलकी आहे.

असं म्हणणारी अमेरिका भाबडी नक्कीच नाही.

काळे साहेब, मुकुंद, तुमचे पाकीस्तान ऐवजी इतर रस्ते शोधण्याबाबतचे विश्लेषण स्पृहणीय आहे. तुम्ही ते येथल्या टाईम, वॉल स्ट्रीट जर्नल, किंवा न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिन्ग्टन पोस्ट, मधे प्रसिद्ध करा. तुमची खूप हुषार म्हणून स्तुती होईल. तुम्हाला अमेरिकन स्वखर्चाने इतमामाने इथे बोलावून जेवणावळी देतील, व्याख्याने घडवून आणतील. टीव्ही वर मुलाखती होतील, फॉक्स, सीएनेन, सीएन्बीसी, पीबीएस सगळीकडे. भरपूर बिदागी देतील, पुलित्झरसारखे बक्षीस पण मिळेल. तुमचे वैयक्तिक कल्याण होईल.

पण अमेरिकन सरकार तुमचे काही ऐकेल अशी खोटी आशा बाळगू नका. अमेरिकेतले काही किस्से तुम्हाला पुनः कधीतरी सांगीन, पण सारांश असा की ज्या देशाची वकिलात इथल्या काँग्रेसमन्, सिनेटर्स, प्रेसिडेंट, इ. ना भरपूर नग्गद रोख लाच देईल त्याच देशाशी अमेरिका मैत्रीचे संबंध ठेवील. भारतीयांनी सर्व सेवा, प्रोग्रामिंग फुक्कट करतो म्हंटले तर ते आनंदाने घेतील, पण नग्गद रोख मिळेस्तवर भारताकडे कुणी लक्ष देणार नाही.

भारतीयांच्या अमेरिकेबद्दल भलत्याच कल्पना आहेत - अहो ते मानवता वाद, शांतता, वगैरे सगळी बाहेर सांगण्याची थोतांडे! फक्त आपण सर्वात हुष्षार, असे आत्मविश्वासपूर्वक ठासून सांगणे नि तसे बझ शब्द वापरणे पक्के माहित आहे त्यांना! त्यावर काय विश्वास ठेवता? इथे जो तो स्वतःपुरते बघतो! देश, जग गेले खड्ड्यात!

काय राव, गरीबाची टिंगल करताय्! मी माझी औकात ओळखून आहे!!
पण या प्रतिसादावरून आपले वास्तव्य अमेरिकेत आहे असा माझा समज झाला आहे. मी अमेरिकेत २ जूनपासून ५ जुलैपर्यंत आहे. कंहीं दिवस 'वॉशिंग्टन डीसी च्या'जवळ व शेवटी सान्फ्रान्सिस्कोला! तुम्ही भेटण्यासारखे असाल तर भेटायला आवडेल.
काळ
काळे साहेब, मुकुंद, तुमचे पाकीस्तान ऐवजी इतर रस्ते शोधण्याबाबतचे विश्लेषण स्पृहणीय आहे. तुम्ही ते येथल्या टाईम, वॉल स्ट्रीट जर्नल, किंवा न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिन्ग्टन पोस्ट, मधे प्रसिद्ध करा. तुमची खूप हुषार म्हणून स्तुती होईल. तुम्हाला अमेरिकन स्वखर्चाने इतमामाने इथे बोलावून जेवणावळी देतील, व्याख्याने घडवून आणतील. टीव्ही वर मुलाखती होतील, फॉक्स, सीएनेन, सीएन्बीसी, पीबीएस सगळीकडे. भरपूर बिदागी देतील, पुलित्झरसारखे बक्षीस पण मिळेल. तुमचे वैयक्तिक कल्याण होईल.

मुकुंद-जी,
बरीच नवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
A will will find a way असे म्हणतात. त्यावरून तुर्कमेनिस्तानचे तेल जरी नाहीं मिळाले तरी अमेरिकेतून वा पश्चिम युरोपमधून अफगाणिस्तानला जाणारी रसद जाऊ द्यायला अमेरिकेला "right of passage" मागता येईल का हे अमेरिकेने तपासून पहावे. (कदाचित पाहिलेलेही असेल.)
दुसरा मार्ग असा. एकदा कॅस्पियन समुद्रात उतरल्यावर कझाकस्तान व उझबेकस्तानमधूनही एक विकल्प निर्माण होतो. तेथील राजकीय परिस्थिती काय आहे हे मला माहीत नाहीं. कझाकस्तान रशियाधार्जिणा नसावा असा कयास आहे कारण तिथे माझे जुने 'बॉस' लक्ष्मी मित्तल यांचा पोलादाचा प्रचंड कारखाना आहे. (मी एक steelmaker आहे व एके काळी मित्तलांच्या कंपनीत Technical Chief म्हणून काम केलेले आहे.)
उझबेकिस्तानबद्दल मात्र कल्पना नाहीं.
या नव्या वैकल्पिक मार्गाबद्दल आपले भाष्य वाचायला आवडेल.

मैत्रेयी यांच्या म्हणण्यात तथ्य वाटतेय. ही बातमी बघा: पाकिस्तान -अमेरिकेत गुप्त करारः अमेरिकेने लादेन पाकिस्तानात असेल तर त्याला तिथे जाउन मारायचे, पाकिस्तानने अमेरिकेचा निषेध करायचा.
http://articles.economictimes.indiatimes.com/2011-05-11/news/29532428_1_...

Under the terms of the pact, Pakistan would allow US forces to conduct a unilateral raid inside its territory to look for bin Laden, his deputy Ayman al-Zawahiri and the al-Qaeda No 3. The Pakistanis, it was agreed, would protest strongly against the 'incursion,' for public consumption.

हा लपाछपीचा खेळ होता. आम्ही त्याला लपवुन ठेवणार, मग तुम्ही त्याला शोधायचे. आधीच बाहेर काढले असते तर १० वर्षे सोन्याची अंडी मिळाली नसती... थोडे खरचटले पण चालायचेच.

Pages