ती रात्र !

Submitted by कवठीचाफा on 7 July, 2008 - 13:13

टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं हं घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षीत घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतीक्रीया होती. नकळत त्याच्या तोंडुन एक शिवी निघाली, ही सुध्दा एक सहज प्रतिक्रीयाच. मुळात या असल्या वातावरणात एकट्याने एकच चाक असलेल्या बाईकची सोबत करत बसल्यावर कुणीही वैतागेलच. त्यात पंक्चर काढून आणायला गेलेला राक्या अजुन परतला नव्हता.

" साला, काय सगळे पंक्चर काढणारे आज संपावर गेले काय?" मनातल्या मनात बडबडून कंटाळलेला निल्या आता उघड संताप व्यक्त करत होता. एकतर तसे केल्याने त्याच्या मनातल्या संतापाला वाट मिळत होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लेकाचं होतं कोण त्याचा आवाज ऐकायला. एव्हाना पावसाने चांगलीच सुरुवात केली होती आणि त्याने आसरा घेतलेल्या झाडाचे संरक्षण त्याला फ़ारसावेळ लाभणार नव्हते. संध्याकाळ फ़ारशी झाली नसली तरी पावसामुळे चांगलेच अंधारुन आलेले होते. त्यातल्या त्यात कोरड्या दगडावर बसकण मारत निल्या आजच्या दिवसाच्या उडालेल्या फ़ज्जाबद्दल विचार करत राहीला.

उन्हाने तापलेला मे महीना सरला आणि पावसाने वातावरण चिंब करुन टाकले. पहीला पाउस करता करता जवळपास निम्मा महीना पावसाने झोडपुन काढला. आता या वर्षी पाउस जुन महीन्यातच काळ आणतो की काय असे वाटायला लागले. आणि जसा अचानक पावसाने भडीमार सुरु केला होता तसा गप्पकन थांबुनही गेला. इतके दिवस पावसामुळे हलचालींना आलेली बंधने एकदम गळुन पडली. एव्हाना निसर्गाने आपली रखरखीत दगडी- मातकट कात टाकुन नवीन हिरवेगार वस्त्र पांघरले होते, त्यामुळे मनांनाही एक उल्हास जाणवत होता. खास करुन तरूणाईला तर उत्साहाचा महापुर आल्यासारखेच झाले होते.
पाउस आपला रोज येउन शिंपण घालुन जात होता, ते मुसळधार धारा, हत्तीच्या सोंडांनी कोसळणं वगैरे काही नाही. त्यामुळे जवळच्या पिकनिक्सना बहर आला होता. तसे धबधबे कधी कुठेच कमी नसतात पण अश्या दिवसात दोन चार अधिक असतील तरी चालतील असे वाटत रहाते उगीचच ! अश्यावेळी हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे शंभर दिडशे किलोमीटर अंतरावरच्या कामाला तुम्हाला कैक स्वयंसेवक सापडतील. कारण एकच अश्या धुंद वातावरणात बाईक चालवणे म्हणजे कस्सला...... आनंद आहे हे तो अनुभव घेतलेलेच सांगु शकतील.
अश्याच एका संध्याकाळी निल्या बाहेर पडायची तयारी करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. " लेका आलो की कपडे तरी घालु देशील का नाही?" राकेशचे नाव बघताच त्याने थेट बोलुन टाकले.
" बबड्या त्यासाठी फ़ोन केला नाय रे, दुसरेच काम आहे."
" खडड्यात घाल तुझे काम आणि वरुन तु पण उडी मार. कुणाचे तरी काहीतरी हमालीचे काम असणार, मी नाय येणार हां सांगुन ठेवतो"
" आयला बरोबर ओळख...."
" मला वाटलंच होतं, साल्या तु काय तुझ्या नातेवाईकांच्यात दत्तक घेतलेला हमाल आहेस का रे ? आणि तुझ्या जोडीला आम्ही पण?" राक्याचे वाक्य पुर्णही न होवु देता निल्या बरसला.
" अरे साधे काम आहे........ " निल्या श्वास घ्यायला थांबल्याची संधी घेत राक्याने बोलायचा प्रयत्न केला.
" मरो ते साधेसे काम, दगडा, मागच्या वेळी असेच साधेसे काम करायला तुझ्या आत्याने बोलवलं आणि दिवसभर तिच्या घरातले सामान इकडे तिकडे हलवत बसलो का ? तर म्हणे घराचे इंटीरीयर चेंज करायचेय. नकोच ते," मागच्या आठवणीने कळवळून निल्या म्हणाला.
" लेका, ऐकुन तरी घेशील की नाही? अरे माझ्या मावशीचे एक पार्सल मुरुडला नेउन द्यायचेय फ़क्त" समजुत काढण्याच्या सुरात राक्या म्हणाला.
" आणि ते पार्सल काय ? तिचा तो मोडका पियानो तर नाही ना?"
" अबे, तो पियानो ती या जन्मात तरी कुणाला देईल का? अरे साधेसे खोके आहे रे, हलके आहे एकदम. आता तरी येशील?"
" आणि जायचे कसे? "
" विमानातुन, गाढवा तुला येतोस का म्हणुन विचारले तेंव्हाच तुझ्या टाळक्यात उजेड नाही निदान कवडसा तरी पडायला हवा होता की बाईकने जायचेय म्हणुन" आता वैतागण्याची पाळी राक्याची होती.
" आयला, बाईकने मुरुड? बोल कधी निघायचे?" निल्याच्या आवाजात उत्कंठा.
" उद्या सकाळीच, तयार रहा सातच्या आसपास मी येतोच तुला उचलायला"
" सकाळी सातला कन्फ़र्म, मी तयार असेन" निल्याची उत्सुकता आवाजातुन लपत नव्हती. आणि त्या उद्याचा आज कधी झाला ते कळलेच नाही.
जाताना सगळे ठीकठाक होते मस्त रायडिंगची मजा आणि निसर्गाचा अस्वाद घेत पोहोचले. दुपारी जेवण खाण झाल्यावर परत निघुन येताना मात्र वाटेतच पाउस चांगलाच भरुन आला होता, त्यामुळे घरी पळायची घाई चालली होती. आणि म्हणतात ना? जेंव्हा तुमाला घाई असते तेंव्हा अडचणींना तुमच्या वाटेत यायची घाई झालेली असते. तसेच झाले अर्धा रस्ता पार नसेल केला तर बाईकचा मागचा टायर पंक्चर. आता आली का पंचाईत? जवळपास गाव बिलकुल नाही, रस्ता एकदम सुनसान. थोड्या गाडीला, थोड्या रस्त्याच्या कंडीशनला आणि बाकी एकमेकांना शिव्या देउन झाल्यावर दोघांच्याही लक्षात आले की याने आपला प्रॉब्लेम सुटणार नाही. बाइकचे पंक्चर चाक नेउन कुठुन तरी पंक्चर काढुन आणणे गरजेचे होते नाहीतर पुढे सरकणे शक्य नव्हते. आणि त्यातही एक गोची, गाडी अशीच टाकुन जाणे धोकादायक होते. नाहीतर पंक्चर काढुन चाक आणायचे आणि उरलेली गाडी गुल्ल ! त्यामुळे तिथे एकाने थांबणे गरजेचे होते. या सगळ्या मनस्तापाला राक्या कारणीभुत आहे असे मनोमन मान्य करुन निल्याने पंक्चर काढून आणायचे काम राक्यावर सोपवले. मागे जाणार्‍या एका सुमोला हात करुन राक्या पंक्चर काढायला निघुन गेला. आणि निल्या गाडीच्या राखणीसाठी थांबला.
पण आता त्याच्या लक्षात येत होते की आपण चुक केली एखाद्या ठीकाणी एकटेच ताटकळत तासंतास उभे रहाणे म्हणजे काही कमी त्रासदायक काम नाही. हिच त्रासाची भावना हळुहळु संतापात बदलायला लागली होती. त्यात भरीला पाउस सुरु झाला होता तोही जोर धरण्याची लक्षणे होती. पुन्हा एकदा निरर्थक शिवी हासडत निल्याने हातातल्या घड्याळाकडे पाहीले. " आईच्या गावात, पावणेसात ? आता हा येतो की नाही? की येतो आपला सकाळीच आणि मी आपला कुडकुडतोय इथे झाडाखाली आणि झाड तरी कसले आहे कुणास ठाउक? पिंपळा बिंपळाचं असलं म्हणजे ?" कल्पनेनेचे त्याच्या अंगावर शहारा आला. आता झाडाकडे पहायचे टाळत तो आपला रस्त्याकडे नजर लाउन बसला.
एव्हाना पावसाने चांगलाच जोर धरला होता. निल्या बसलेल्या ठीकाणीही आता सरळसरळ पाण्याची धारच लागली, हे एक त्रांगडच असतं पावसापासुन संरक्षण मिळवण्यासाठी झाडाखाली थांबल की थोड्या वेळाने झाड पावसासमोर गुपचुप शरणागती पत्करुन आणखी जोमाने शरणार्थ्याला भिजवुन काढायचे काम करते, ते ही पावसापेक्षा जास्त जोमाने. अश्यावेळी तिथे निवार्‍याला थांबणार्‍याची गत 'धरल तरं चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी होवुन जाते. निल्याची अवस्थाही तशीच होती. मनातला राग वेगवेगळ्या शिव्यांच्या रुपाने बाहेर पडत होता.
शेवटी तासाभर असाच गेल्यावर समोर एक गाडी थांबली आणि त्यातुन एकदाचा राक्या ऊतरला.
निल्याच्या शिव्या खात खात एकदाचे चाकही बसवुन झाले आणि पुन्हा एकदा बाईक रस्त्यावरुन सरसरत जायला लागली. निल्या भडकल्यामुळे शांतच होता आणि राक्याला आता या असल्या मुसळधार पावसात गाडी चालवताना एकाग्र रहाण्यासाठी त्याचा फ़ायदाच होत होता. पण आज कुणाचेतरी किंवा दोघांचेही नशीब खराब होते. गाडीचे हेडलाईट झप्पकन विझले. डोळ्यासमोर अचानक गुडूप्प अंधार राक्याचा पाय खच्चकन ब्रेकवर, निल्याच्या मुखातुन कचकचीत शिवी.
" आईच्या गावात, आता रे ? " निल्या करवादला.
" पनवतीच लागली रे !" राक्याचे निराश उद्गार
" पुन्हा ट्राय करुन बघ आता इंजीन बंद केलेयस ना? बघ पुन्हा चालु करुन लागेल कदाचीत" निल्याची मुक्ताफ़ळे
" गाढवा, तो काय कंप्युटर आहे का एकदा टर्न ऑफ़ करुन चालु केल्यावर चुकुन प्रोग्राम चालु व्हायला?" मघापासुन कोंडलेला राक्याचा राग उफ़ाळुन आला. "दिड शहाण्या, पावसाच्या पाण्याने काहीतरी झोल झालाय बहुतेक"
" आयला आता काय करणार रे आपण?" कोकरु झालेला निल्या
" आता एखाद्या ट्रकची वाट बघायची, जे काय करायचे ते तो ट्रकच करेल" भेदरलेल्या निल्याची फ़िरकी घ्यायची संधी या ही प्रसंगी राक्याने सोडली नाही.
" ये गपे, कायतरी अभद्र बोलु नकोस"
" अरे, म्हणजे एखाद्या ट्रक टेंपोला हात करायचा, त्यांनी मदत केली तर त्यांच्या हेडलाईटवर आपण पुढे जाउ की नाही ?"
" हां असे बोल ना ! "
" निल्या, बथ्थडा, इतका टणक्या गडी तु आणि ईतका भित्रा कसा रे ?"
राक्या म्हणत होता त्यात तथ्य होते, बहात्तर किलोचा नियमीत व्यायाम केल्याने पिळदार बनलेल्या पावणेसहा फ़ुट उंचीच्या निल्याचा भित्रेपणात फ़ार वरचा नंबर होता. खास करुन काळोख हे त्याचं घाबरण्याच आवडीच ठिकाण, आणि आज तर काळोखाबरोबरच पावसाची भर पडलेली अश्या रात्री कुठल्यातरी सुनसान रस्त्यावर भले भले टरकतात तर निल्याची काय अवस्था होणार होती? केवळ जोडीला राक्या होता म्हणुनच आतापर्यंत त्याने गाणि म्हणायला सुरुवात केली नव्हती. हो ! भिती घालवण्याचे हे त्याचे एकमेव साधन.
" निल्या ! तुझ्या मोबाईलला रेंज आहे का रे ?"
" का ? घरुन कुणाला बोलावतोयस?"
" बावळटा, कोण येणारे ? घरी सांगतो उशीर होईल म्हणुन"
" आयला, खरचं रे माझ्या घरी पण सांगायला पायजे, पण किती उशिर होईल असे सांगु रे?"
" आता तुझ्या......, ते मी कसं सांगु? नायतर असं करुया" थोडा विचारात पडत राक्या म्हणाला.
"कसं करुयात?"
" असेच थोडे पुढे जाउ कुठेतरी आजची रात्र काढायला मिळाली तर सरळ उद्या पहाटेच निघु, नाहीतरी या असल्या पावसात गाडी विदाउट हेडलाईट चालवणं मुष्कीलच आहे रे !"
"तु म्हणतो तर तसं करु आता नाहीतरी साडेनऊ वाजत आलेयत" असल्या काळोखातला प्रवास अनायसेच टळत असलेला बघुन निल्याने अनुमोदन दिले.
दोघांनीही आपापल्या घरी फ़ोन करुन कळवुन टाकले की आजची रात्र ते एका मित्राकडे रहाणार आहेत आणि उद्या सकाळी निघणार आहेत म्हणुन. आता फ़क्त निवारा शोधायचे काम बाकी होते आणि तो ही लवकरच सापडला.
राक्याने गाडी अंदाजे आर्धा किलोमीटरही नेली नसेल तर त्यांना वाटेत एका ठीकाणी उजेडाची तिरीप दिसली. " चल इथेच चौकशी करु" म्हणुन राक्याने गाडी स्टॅडवर ओढली. आणि दोघेही त्या उजेडाच्या उगमाकडे निघाले.
ते एक बर्‍यापैकी मोठेसे जुनाट पध्दतीचे घर होते, जमिनी पासुन चार-पाच फ़ुटांपर्यंत त्याचा नुसताच दगडी पाया दिसत होता. घराच्या ओसरीत जाण्यासाठी त्यांना सात-आठ पायर्‍या चढून जावे लागले.
ओसरीत आल्यावर दोघांनाही अंदाज आला की आपल्याला वाटतेय त्यापेक्षा हे घर जास्त्च जुने आहे. त्यावेळी लाईट्स गेले होते की त्या घरात अजुन विज आलीच नव्हती याचा काहीच अंदाज येत नव्हता त्यांना दिसणारा तो उजेड एका कंदीलाचा होता रात्रीचा काळोख चांगलाच दाट असल्यामुळे कदाचीत तो दिसला असावा नाहीतर इतका मिणमिणता उजेड दिसणे जरा कठीणच होते. जुनाट पध्दतीच्या दोन पालांच्या अवजड दरवाजांपैकी एक पाल उघडेच होते. त्यामुळेच तर आतल्या कंदीलाचा उजेड बाहेर दिसत होता.
धडधडत्या छातीने राक्याने दारावरची कडी वाजवली, हे असले वातावरण आणि जोडीला हे असले जुनाट घर भिती नाही म्हंटल तरी थोडीशी मनात शिरकाव करणारच ना !
दोन वेळा कडी वाजवल्यावर आतुन कुणीतरी येत असल्याची जाणिव झाली. दाराचे दुसरे पालही उघडल्या गेले. समोरचे दृष्य जसे वाटले होते तसे नव्हते. दरवाजा उघडणारा माणुस चक्क झब्बा पायजमा अश्या वेषात होता. मनात दाटून येणारी भिती जरा कमी झाली. राक्याने आपली अडचण त्या माणसाला सांगीतली, त्यानेही काहीही अढेवेढे न घेता त्यांना रात्री आश्रय द्यायचे मान्य केले.
आपापले रेन-सुट बाहेरच काढून निल्या आणि राक्या घरात प्रवेश करते झाले. आतमधे प्रशस्त अशी बैठकीची खोली होती. आजुबाजुला आणखीही खोल्या असाव्यात पण ते काही घर पहायला आलेले नव्हते. त्यांना घरात घेणारा तरुण हातात पंचा घेउन आला, त्याचे आभार मानत दोघांनीही आपले डोके कोरडे केले. जरी रेन- सुट असला तरी कपडे भिजायचे राहीले नव्हते. पण ते आता अंगावरच सुकवायचे दोघांनी ठरवले, एका त्रयस्थाला जास्त त्रास देणे बरे वाटत नव्हते. पुन्हा एकदा तो तरुण हातात दोन ब्लॅंकेट घेउन आला आणि त्यांची ती ही समस्या काही प्रमाणात सुटली.
" काही खाल्लेत का?" राक्या आणि निल्याने दचकुनच वर पाहीले मघापासुन त्यांना मदत करणार्‍या त्या माणसाने प्रथमच काहीतरी विचारले होते.
" अं...... तसा आम्ही संध्याकाळी भरपुर नाश्ता केलाय त्यामुळे आता भुकच नाहीये खरं तर" आगदी निखालस खोट बोलत होता राक्या.
" नाही, संकोच नका करु, घरात मी नेहमीच बिस्किटं वगैरे ठेवतो त्यामुळे तुमच्यासाठी मला काही शिजवायला लागणार नाही, आणि मला तसा स्वयंपाक वगैरे करता येत नाही. त्यामुळे त्यावरच भागवावे लागेल" थोडं ओशाळवाण हसत तो म्हणाला आणि आत निघुन गेला पाच दहा मिनीटातच हातात बिस्किटे भरलेले ताट आणि चहाने भरलेले कप घेउन तो बाहेर आला. आता मात्र आजिबात संकोच न करता दोघांनीही चहा बिस्किटांवर ताव मारला. त्यांच्याकडे पहात त्यांचा यजमान आरामात एक एक घोट घेत चहाचा कप रिकामा करत होता. त्याच्या चेहर्‍यावर एक अजब समाधान पसरले होते.
चहा खाणे झाल्यावर दोघेही थोडे शांत झाले. आणि अश्यावेळी जे नेहमीच अनोळखी व्यक्तींमधे होते तशी एकमेकांची विचारपुस सुरु झाली. त्या माणसाने दोघांचीही ओळख करुन घेतली आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे तो इथलाच रहाणारा होता त्याचे नाव परशुराम होते.
"मला तुम्ही सरळ परशुराम म्हणुनच हाक मारु शकता ते नात्यांमधे गुंडाळलेले शब्द नकोत कारण एकदा तुम्ही इथुन गेलात की पुन्हा आपली भेट होणार नाही हे नक्की मग काही तासांचाच जर प्रश्न असेल तर आपण एकमेकांना नावाने का हाक मारु नये?" वरवर त्याचे बोलणे योग्यच वाटत होते तरी त्याचा स्वर जरा गुढच वाटत होता.
" तुम्हाला जर झोप येत असेल तर तुम्ही आतल्या खोलीत झोपु शकता. मला रात्री उशिरा झोपायची सवय आहे त्यामुळे मी इथेच वाचत बसतो" परशुराम म्हणाला.
" नाही हो, आम्हालाही तशी झोप येतच नाहीये आपण बसु इथेच गप्पा मारत जर तुमची हरकत नसेल तर." आतल्या खोलीत जाण्याच्या कल्पनेने निल्या बहुतेक टरकला असावा. तसाही आजुन तो जरा चाचरतच होता.
" हरकत नाही, मलाही बरेच दिवसात माणसांशी मनसोक्त गप्पा मारायला मिळालेल्या नाहीत" परशुरामचे पुन्हा एक गुढ वाक्य.
गप्पा सुरु झाल्या आणि नेहमिप्रमाणेच साध्या साध्या विषयावरुन असल्या पावसाळी गुढरम्य वातावरणात हमखास निघणारे भुताखेताचे विषय निघाले. एव्हाना निल्या चांगलाच टरकला होता. त्याने राक्याच्या जवळ हळुच सरकला.
" तुम्हाला कंटाळा आला नसेल तर तुम्हाला एक सत्यघटना सांगु का?" परशुराम विचारत होते.
"सांगा की, कितीवेळ नुसत्या दंतकथाच ऐकत रहायच्या" राक्या गप्पांमधे गुरफ़टत चालला होता. सत्यघटनेच्या नावाखाली एखादी अफ़वाच ऐकायला मिळेल याची खात्री होती त्याला.
" कदाचीत तुम्हाला हे खोट वाटेल पण खरंच घडलेली गोष्ट आहे ही" राक्याच्या मनातल ओळखल्या प्रमाणे परशुराम म्हणाले.
दोघेही काहीच बोलले नाहीत याचा अर्थ त्यांची मुक संमती गृहीत धरुन परशुरामने बोलायला सुरुवात केली.
ही साधारणपणे चाळीस बेचाळीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आजच्या इतके अधुनिकीकरण इकडे झालेले नव्हते. लोकांना आपले अधिकार माहीत नव्हते. गावातले लोक शेती सोडून फ़ारसे काही करत नसत. रहाणीमान जुने तश्याच विचारसरणीही जुन्याच, गावातले सरपंचपद गेले तिन पिढ्यांपासुन एकाच घराण्याकडे होते. कधी गावाने तक्रार केली नाही ना कधी शासनाने दखल घेतली नाही.
अश्याच या गावात एक देवडीकर म्हणुन कुटूंब रहात होते. गरीब नाही म्हणता येणार कारण एका ऐसपैस शेताचे मालक होते. गावातले घरही फ़ारसे मोठे नसले तरी व्यवस्थीत मोठे होते. रहाणारे फ़क्त दोनच जिव देवडीकर नवरा-बायको. लग्नाला चार वर्षे उलटून गेली तरी मुल होत नाही हे एकच दुखः त्यांचे काळीज पोखरत होते. डॉक्टर गावात नव्हतेच आणि असते तरी त्यांच्याकडे कुणी गेले असते की नाही याचा भरवसा नव्हता. लहानसहान आजारासाठी वैद्य होताच आणि मोठे आजार म्हणजे गावकर्‍यांसाठी आजार नसायचेच ते भुतबाधा, करणी असले काहीबाही असायचे. त्यासाठी भगत होताच. देवडीकर उभयतांचा प्रश्न यापैकी कुणालातरी सांगायलाच हवा होता. पण अश्यावेळी हमखास माणुस गोंधळतो तसेच दोघेही गोंधळले, आणि अखेर दोन्ही ठिकाणाहून मदत घ्यायचे ठरवुन टाकले.
अखेरीस त्यांच्या प्रयत्नाना यश आले. आणि घरात नवा पाहूणा येण्याची चाहूल लागली. काळ पुढे सरकत राहीला आणि देवडीकरांच्या घरात बाळाचे आगमन झाले. देवडिकरांच्या घरात आनंदाचा नुसता महापुर आला. पण हा आनंद फ़ार काळ टिकला नाही. कारण जन्माला आलेल्या त्या मुलाचे डोळे एखाद्या गोटीसारखे हिरवेकच्च होते. पण इतक्या काळाने अपत्यसुख लाभलेल्या त्याच्या आईवडीलांना त्याची पर्वा नव्हती बाळाचे बारसे मोठ्या थाटात केल्या गेले अर्थात गावातल्या बायकांची उपस्थिती कमीच होती. मोठ्या हौसेने त्याचे नाव ठेवल्या गेले सदाशिव. पण पुढे जे काही घडणार होते ते कुणालाच ठाउक नव्हते निदान देवडीकरांना तरी.
जसा जसा सदाशिव मोठा होवु लागला तसे तसे लोक त्याला आणि त्याच्या आईवडीलांना टाळायला लागले. कारण एकच. त्याची नजर! त्याच्या हिरव्यागार डोळ्यांकडे पहाताना अंगावर सरसरुन काटा आल्याखेरीज रहायचा नाही.
लोकांच्या या वागणुकीमुळे सदाशिवला मित्र असे कुणी नव्हतेच. एखादा मुलगा जरी त्याच्याशी मैत्री करायला पुढे सरसावलाच तरी त्या मुलाच्याच्या घरुन त्याचा असा काही समाचार घेतल्या जायचा की दुसर्‍या दिवशी सदाशिव दिसला की ते पोरगं आपला रस्ता बदलुन जात असे. एकटा पडलेला सदाशिव मग आपल्या घरातल्या गाई गुरांशी खेळत बसे. त्यांना चरायला नेणे, त्यांची देखभाल करणे यात तो आनंद मानत राहीला. अश्या एकट्या पडलेल्या मुलांना काही ना काही छंद लागतोच कारण तोच छंद त्यांचा एकटेपणा दुर करत असतो. सदाशिवला देखिल असाच छंद होता.
सदा पावा फ़ारच छान वाजवत असे, हे तो कसा शिकला ते त्याच त्यालाच माहीत पण तो उत्कृष्ट पावा वाजवत असे इतका मधुर की त्याचा पावा वातावरणात घुमायला लागला की पक्षांचा किलबिलाट देखिल थांबत असे. आजुबाजुला चरणारी गुरे देखिल चरणे विसरुन त्या सुरांचा आनंद लुटत असत. मग माणसे न भुलली तर नवलच. पण माणसाच्या मनात एकदा एखाद्या दुष्ट कल्पनेने घर केले की तो त्यातुन कधी बाहेर पडत नाही. गावातल्या भल्या बुजुर्ग म्हणवुन घेणार्‍या माणसांना त्याचा पावा म्हणजे वेताळाचे सुर वाटत. सदाच्या वडलांवर दबाव आणुन त्यांनी त्याचे पावा वाजवणे बंद करायला भाग पाडले. पण तरीही सदा आपला छंद गावाबाहेरच्या रानात पुरा करत असे.

दिवस, महीने, वर्षे सरत राहीली सदा आता तारुण्यात आला. आणि एक दिवस ते घडले सदाच्या पाव्याच्या सुराने वेडावुन सरपंचाची मुलगी सदाच्या प्रेमात पडली. वेळी अवेळी एकांतात त्यांच्या भेटी होवु लागल्या. आगदी लग्नाच्या आणाभाका घेण्याईतपत दोघांचा जिव एकमेकांवर जडला. पण पुन्हा सदाचं दुर्दैव त्याच्या आड आलं. सरपंचांच्या कानावर या गोष्टी गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचे घराबाहेर पडणे बंद करुन टाकले.
दोन प्रेमी जिवांची ताटातुट दोघांनाही सहन होण्यासारखी नव्हती. सदा आपल्या पाव्याच्या सुरावटीने तिला बोलावण्याचा प्रयत्न करत राहीला. आणि ती घरात कोंडलेल्या अवस्थेत त्याला भेटण्यासाठी तडफ़डत राहीली.
या ही गोष्टी सरपंचांच्या नजरेतुन सुटू शकणार नव्हत्याच त्यांनी आपल्या मुलीचे लग्न परस्पर आपल्या नात्यातल्या एका मुलाशी ठरवुन टाकले. याचा जाब विचारण्यासाठी जेंव्हा सदा त्यांच्या घरी गेला तेंव्हा त्याला सैतानाचा मुलगा म्हणुन हिणवुन सरपंचाने घराबाहेर काढले इतकेच नाही तर सगळे देवडीकर कुटूंबच वाळीत टाकायचा हुकूम दिला. हे सगळे सहन न होवुन सरपंचांच्या मुलीने घरात गळफ़ास घेउन आत्महत्या केली. त्याचे खापर मात्र सदावर फ़ुटले. सरपंचांचा दबदबा मोठा त्यांच्या एका ईशार्‍यावर सगळं गाव सदाच्या घराकडे त्याला संपवण्याच्या इराद्याने निघाला. पण सदा होता कुठे? तो सरपंचांच्या घरी त्यांच्या समोर उभा होता.
तिथुन पुढे जे काही कळते ते ऐकीवच आहे कोणी पाहीले कुणाला सांगीतले ते माहीत नाही. पण गावकरी तिथे पोहोचले तेंव्हा सरपंच निष्प्राण अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. आणि सगळ्या गावात बातमी पसरली की सरपंच्यांच्या घरात गेल्यावर सदाने रागाने फ़ुललेली आपली एक नजर सरपंचांच्या नजरेशी भिडवली आणि हे असे झाले. अर्थात या सांगो वांगीच्या गोष्टी पण सदा गावातुन नाहीसा झाला तो कायमचाच. अधे मधे तिन्हीसांजेच्या वेळी किंवा पहाट होण्यापुर्वी त्याच्या पाव्याचे सुर कानी पडत असत आणि त्याच दिवशी एखाद्याचे प्रेतही सापडत असे. मग गावकरी म्हणत की सदाची आणि त्या मरण पावलेल्या माणसाची नजरानजर झालेली असावी. ही गोष्ट पिढ्या दर पिढ्या पुढे सांगितल्या गेली आणि असे अनुभव पुढेही येत राहीले.
आजही लोक म्हणतात की सदा असाच आपल्या पाव्याने आपल्या प्रेयसीला बोलावण्याचा प्रयत्न करत असतो पण ती येत नाही पण जर चुकुन कुणी त्याला पाहीलेच तर त्याच्याशी नजर भिडताच त्या पहाणार्‍याचा मृत्यु होतो. गावात काय दंतकथा रहातील याचा नेम नाही पण एक खरं कधी कधी असा पावा वाजलेला मी ही ऐकलाय. शोधायला गेलो नाही हे खरं पण शोधणार तरी कुठे दरवेळी मला आवाज वेगवेगळ्या ठीकाणाहून येतो. आणि तशीही माझी हिंमत होणार नाहीच उगिच विषाची परिक्षा घ्याच कशाला ? नाही का ?

आपली कहाणी संपवुन परशुरामने राक्या आणि निल्या कडे पाहीले निल्या एव्हाना राक्याला पार चिकटून बसला होता. त्याच्याकडे पाहून हसत परशुराम म्हणाला " अरे , घाबरायच काय त्यात इतकं तो थोडाच तुमच्या समोर येउन पावा वाजवणार आहे, त्याला शोधायला जायच नाही इतकच आणि जरी दिसलाच तरी त्याच्या नजरेला नजर नाही द्यायची बस्स "

" आपण आता झोपुया का ?" हा विषय पुढे वाढू नये म्हणुन निल्याने प्रश्न केला "मला फ़ार झोप येतेय"
"अर्थात, माफ़ करा हं मी तुमचा फ़ार वेळ घेतला तुम्ही दोघे आतल्या खोलीत झोपु शकता" परशुराम दिलगीरीच्या स्वरात म्हणाला.
" नको आता नाहीतरी दिड वाजलाय चार-पाच तासांचाच तर प्रश्न आहे आम्ही झोपतो इथेच" बाजुच्या बैठकीवर ब्लॅंकेट पसरत निल्या म्हणाला. बाहेरच्या खोलीत आपण चारही बाजुने सुरक्षीत राहू हा त्यामागचा हेतू.
" तुमची मर्जी, काही लागलेच तर मला हाक मारा मी आहेच" असे म्हणुन परशुराम आतल्या बाजुला निघुन गेला.

" च्यायची, त्या परश्याच्या चांगलेच टरकवुन ठेवलेयन आणि आता स्वतः आत निघुन गेला" मघाचे उपकार भितीच्या ओझ्याखाली विसरुन निल्या वाचाळला.
" गप बे, ते सगळं खोटं होतं यार तोच म्हणाला ना शेवटी आता तु गप झोपणार आहेस की नाय " राक्या खवळला का ते त्यालाच माहीत. आणि सरळ आपले ब्लॅकेट अंगावर ओढुन झोपी गेला.
बाहेर आजुनही पाउस कोसळतच होता. भरीला या परशुरामने सांगितलेल्या तथाकथीत सत्यकथेची भर. घाबरलेल्या निल्याने झोपायचेच नाही असे ठरवुन टाकले आणि डोळे उघडे ठेउन पहात बसला. पण ते जास्त भयावह वाटायला लागले कारण कंदीलाच्या उजेडामुळे भिंतीवर पडणार्‍या सावल्या अश्यावेळी अक्राळविक्राळ वाटायला लागतात. घाबरुन निल्याने डोळे गच्च मिटून घेतले. आणि त्यातच त्याला झोप केंव्हा लागली ते कळलेच नाही. दिवसभर दमलेले शरीर आपला हक्काचा आराम मिळवत होते.

असा किती वेळ गेला कुणास ठाउक अचानक निल्याला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळेना पण मग सावकाश त्याला कालचा प्रसंग आठवला. आणि आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षात आले. मग आपल्याला जाग कशाने आली? मनात दुसरा प्रश्न. उत्तर सापडायला वेळ लागला नाही कारण जवळच कुठेतरी पावा वाजत असल्याचा आवाज येत होता. कालच्या आठवणीने त्याच्या अंगावरचा केस न केस तो आवाज ऐकुन ताठ झाला.
आवाज कुठेतरी जवळच येत होता. त्याने कानावर हात दाबुन घेतले पण तसे आपण फ़ार काळ राहू शकत नाही, त्याच्या कानावरचे हात अपसुकच सैल झाले आणि पुन्हा एकदा तो पाव्याचा आवाज कानात शिरला. हळू हळू त्याला निल्या सरावला परशुरामचे शब्द त्याला आठवत होते की 'तुम्ही त्याला शोधायला गेले नाही तर कसलीच भिती नाही म्हणुन' त्यामुळे निल्या जरा आणखी रिलॅक्स झाला. एक गोष्ट मात्र खरी की वाजवणारा बाकी पावा आगदी जिव ओतुन वाजवत होता. ते सुर ऐकता ऐकता निल्या तल्लीन होवुन गेला आणि त्या नादातच त्याने दरवाजा कधी उघडला ते त्याचे त्यालाही कळले नाही. बाहेर अंधार असुनही बर्‍यापैकी दिसत होते. तो तसाच मंत्रावल्यासारखा चालत चालत व्हरांड्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत आला आणि समोरच एक विसबावीस वर्षाचा मुलगा त्याच्याकडे पाठ करुन पावा वाजवण्यात गर्क झालेला होता. निल्याच्या पायाच्या आवाने असेल किंवा आणखी कशाने असेल त्याच्या एकाग्रतेत खंड पडला आणि त्याने पावा वाजवणे बंद करुन मागे वळून पाहीले. तक्षणीच निल्याला आपल्या चुकीची जाणिव झाली पण उशिर झाला होता. समोरच्या मुलाचे हिरवेगार डोळे त्याच्यावरच खिळले होते. त्या डोळ्यात कसलीच भावना नव्हती आगदी त्याला पाहील्याची सुध्दा. शुध्दीवर असतानाची हीच निल्याची शेवटची भावना नंतर डोळ्यासमोर साकळत येणारा अंधारच फ़क्त.

तोंडावर काहीतरी थंडगाऽऽर शिंपडल्याची जाणिव, आणि नाकातुन मेंदुला झिणझीण्या आणणारा मिरमीरीत वास, दोघांच्या एकत्रीत परीणामाने त्याने डोळे उघडले तर समोर परशुराम,"आयला, हा पण भेटला वाटतं त्याला?" मनातल्या विचारांचा त्यालाही ताळतंत्र लागत नव्हता. बाजुला कोण राक्या ? 'हा पण ?' काय सगळे एकदम आलो की काय? पण काय हे नक्की.
आणखी एक पाण्याचा हबका चेहर्‍यावर बसला आणि निल्या पुर्ण शुध्दीवर आला. आजुबाजुला लख्ख उजाडले होते परशुरामच्या घराचा व्हरांडा उजेडाने भरुन गेला होता. एव्हाना पाउसही थांबलेला होता. पण वातावरणात गारठा मात्र जाणवत होता.
" अरे , हे सगळं जाणवतय म्हणजे मी जिवंत आहे? त्या भुताच्या नजरेला नजर देउनही मी जिवंत आहे" निल्याचा आवाज टिपेला पोहोचलेला. जिवंत असल्याची जाणिवच केवढी सुखवह असते? नाही ?

" हो, हो , जरा सावकाश ! निलेशराव तुम्ही कालची गोष्ट जरा जास्तच मनाला लाउन घेतलत की ! " परशुराम म्हणाला. बाजुला राक्या हसु दाबत उभा,
" निलेशराव, तुम्ही उठा आणि चहा वगैरे घ्या जरा बरं वाटेल मग मी सांगतोच नक्की काय झाले ते" परशुराम निल्याला आधार देत म्हणाला.
भारावल्या सारखा निल्या घरात आला आणि परशुरामच्या हातातला चहाचा कप घेतला.
" त्याचे असे आहे निलेश सदाला तुम्ही पाहीलेत, असेच झाले ना ?"
" हो पण हे तुम्हाला कसे कळले?"
"निलेश सदा आत्ताही इथेच आहे," त्यांनी सदाच्या नावाने आतमधे हाक दिली
आतमधुन बाहेरच्या खोलीच्या चौकटीचा आधार घेत सदा बाहेर डोकावला. तेच आपले गोटीसारखे निर्विकार हिरवेकच्च डोळे घेउन. निल्याने उठुन पळण्यासाठी आधार घ्यायचा प्रयत्न केला. तोच त्याचा हात धरुन राक्याने त्याला थांबवले. राक्याला चक्क हसताना बघुन तो बावचळला.
" निलेश हा सदाशिव तुमच्या माझ्यासारखाच हाडामासाचा माणुसच आहे, त्याचे ते डोळे म्हणजे परमेश्वराने त्याची केलेली घोर चेष्टा आहे, असे जगावेगळे डोळे दिले पण त्यात नजर द्यायला देव विसरला आहे, सदाशिव पुर्ण अंधळा आहे त्यामुळेच त्याचे डोळे तसे काचे सारखे दिसतात." परशुराम सांगत होता. " तुम्ही उठून बाहेर गेलात तेंव्हा रात्र नव्हती तर पहाट झालेली होती, पावसामुळे दाटलेल्या काळोखामुळे तुमचा गैर समज झाला असेल"
"मग इतक्या सकाळी सदा तिथे.........."
"काय करत होता असेच ना ? अहो तो नेहमीच असा लवकर उठतो तोच नाही सारा गावच लवकर उठतो." परशुराम हसत म्हणत होता.
" सारा गाव? कुठे आहे गाव? आम्ही आलो तेंव्हा तर हे एकच घर दिसले आम्हाला." निल्याच्या या विधानावर काही न बोलता परशुरामने त्याला घराच्या मागच्या बाजुला नेले आणि छपरावरुन धुराचे ढग हवेत सोडणार्‍या कौलांच्या छपरांच्या गर्दीकडे पाहून निल्या गार पडला. काही विचारण्यासाठी त्याने तोंड उघडण्याच्या आत परशुरामने सांगीतले.
" काल रात्री तुम्हाला गाव दिसला नाही कारण इथे लोडशेडींगमुळे लाईटस नव्हते."
" निल्या, उशिर होतोय घरी जायला निघायचे नाही का ? " राक्याने विचारले.
"अर्थातच, पण एक शेवटचा प्रश्न विचारुन" राक्याने पुढे केलेला रेन-सुट चढवत निल्या म्हणाला. " तुम्ही काल रात्री सांगितलेली गोष्ट ?"
"अर्थातच खोटी, सदा माझा सख्खा भाउ आमचे आईवडील गेल्याच वर्षी गेले एका पाठोपाठ एक असे. मी शहरात नोकरीला असतो, आणि जशी सुटी मिळेल तसा इथे येत असतो, उरलेल्या वेळी सदा एकटाच असतो ईथे". हसत हसत परशुराम म्हणाले.
परशुरामचे आभार मानुन दोघेही रस्त्यावरच्या गाडीकडे आले. पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर बसला आणि गाडी घरचा रस्ता कापत निघाली.

" राक्या तुला माहीत होते रे परशुराम खोटे बोलतोय ते ?"
" छे, मला ते सकाळी तु डोळे फ़िरवल्यावर कळले"
" पण जर तो सदा मला दिसलाच नसता तर? परशुरामने सांगितले असते का रे खरे काय ते?"
"शक्यता कमी, कारण तो थट्टा करत होता आणि सकाळपर्यंत तो ते विसरुनही गेला होता "
" मग असे झाले असते तर राक्या एक शक्यता गृहीत नाही धरलीत तुम्ही, जर पुन्हा आपण अश्याच रात्री परशुरामच्या घरी आपण गेलो असतो आणि दरवाजा ठोकल्यावर जर तो सदाने उघडला असता तर?"
"तर?............"
"तर.........."
"तर मरो निल्या वडे खाणार का गरमागरम? बाजुच्या धाबा कम हॉटेलातला वास मस्त येतोय"
" आयला खरच रे भुक लागलीये खुप पण वडे तु देणार साल्या तुझ्यामुळे आता घरी शिव्या खाव्या लागतिल"
" मान्य एकदम मान्य पण वडे नुसते खा ! नेहमी सारखे फ़क्त पोटात सारु नको" खिदळत राक्या म्हणाला. आणि दोघेही चेष्टा मस्करी करत समोरच्या हॉटेलमधे शिरले.

गुलमोहर: 

सही रे चाफ्फ्या Happy
एका दमात वाचली बघ, सही हे Happy

चाफ्या जम्या रे Happy

मस्त आहे गोष्ट! आवडली!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

रात्रीचं वर्णन अफाट मस्त जमलय. श्वास रोखून वाचायला लागतं!! जियो!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

एकदम मस्त जमलीय गोष्ट!!मजा आली वाचायला!!!

चाफ्फ्या,सही रे.. मस्त जमलीये भट्टी कथेची..

भुताखेताची म्हणुन वाचायला घेतलि होति पण शेवटी अचानक गुगली पडली रे पण त्यामुळेच जास्त आवडली कथा.

एक भोचक सुचना : तु कधी कथासंग्रह काढायचा विचार केला नाहीस का ? Happy

सही रे चाफ्या मजा आला. छानच जमली.

ग्रेट रे चाफ्या. भोत आवड्या रे!!

आईशप्पथ!!! कसलं भयानक लिहितो रे तू??
गोष्ट संपेपर्यंत स्क्रीनवरून नजर हटली नाही

--------------
नंदिनी
--------------

चाफ्या, लई भारी......... एक खुळचट प्रश्न.... कसे काय तुला हे सुचते रे?

सर्वांनाच धन्यवाद माझी कथा सहन केल्याबद्दल Happy
नितिन, दोस्त, सुचत अस काहि नाही एखादी कल्पना ( म्हणजे आयडिया ! ) सुचते ती कथाबिज म्हणुन वापरतो आणि बाकी कथा लिहीत जातो बस्स !
काहीच्या काही लिहीतो ते तुम्हा सगळ्यांना आवडते हेच भाग्याचे Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

चाफ्फा, धमाल. तुम्ही लिहिणार म्हणजे काहीतरी अफलातून असणार एव्हढ आणि एव्हढच नक्की माहीत असतं वाचायला सरूवात करताना. बाकी प्रत्येक वेळी वेगळा अफलातूनपणा करता!
मस्त गोष्ट. झक्कास इस्टाईल!

कथा आवडली!! Happy सस्पेन्स भारी ठेवलायस.

अतिशय अप्रतिम लेखन. ओघवति भाषाशैली, बदलणारा थरार, शेवटी अचानक दिलेले वळण खरोखर जबरदस्त पण त्या मानाने कथेला प्रतिसाद कमी का मिळावेत ? इथे लोकांना भयकथा आवडत नाहीत का ?

चाफ्फा, मस्तच. फुल्ल आवडेश! मस्त सस्पेंस होता शेवटपर्यंत. असंच मस्त लिहीत रहा.

पूर्ण कथा एका दमात वाचून काढ्ली...

चाफा,
तुझ नाव बघून न चुकता कथा वाचते मी. मस्तच कथा. खरच, ते कथासंग्रहाच मनावर घे,

चाफा,

फार छान..मुख्य म्हणजे शेवट अनपेक्षित होता.

त्या "सिक्स्थ सेन्स" आणि "द अदर्स" यामुळे हल्ली गूढ कथा /चित्रपट यांचा शेवट थोडे वाचल्यावर्/पाहिल्यावर लगेच कळतो. याचा शेवट पण तसाच होणार कि काय असे वाटत होते. पण तसे झाले नाही यामुळे धन्यवाद!

तुमच्या कथा मी ऑफिसमधेच बसून वाचते ते बरंय..म्हणजे दिवसाढवळ्या..नाहीतर काही खरं नव्हतं माझं!
जाम काटा येतो वाचताना!!!!!!
मस्त!
..प्रज्ञा