मला भेटलेल्या व्यक्ती-२ - त्र्यिंबक बेलापूरकर

Submitted by वर्षू. on 9 May, 2011 - 01:34

त्र्यिंबक काका हे माझ्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र. त्यांच्या आत्मीयतेमुळे ते आमच्या कुटुंबाचा एक हिस्साच बनले होते.
त्यांना दिलेली ही श्रद्धांजली ,भास्करकाकाच्याच शब्दात.

त्रिंबक रावांच २८-४-२००८ रोजी निधन झालं.जबलपुरकरांवर नियतिचा क्रूर आघात.
सामान्यातील असामांन्य व्यतिमत्वाचा अस्त झाला!
हिदी भाषिक जबलपूर शहरातील मराठी आणि हिंदी भाषिकां मधील कणखर दुवा,सामाजिक-शैक्षणिक चळवळीचा आधार,आणि इतिहासाचा भक्कम साक्षिदार असं बहुमुखी व्यक्तिमत्व हरपलं.
महाराष्ट्र समाजाच्या विभिन्न संस्थांच्या कार्यकारिणींचे सक्रीय आधारस्तंभ अशी ओळख अपुरीच समजावी. ओळखी-अनोळखी कुटुंबांच्या कुठ्हल्याही अडचणित त्यांच्या हांकेला धावून मदत - हाच धर्म जोपासला अंतापर्यंत.
लहान-मोठे अनेक त्यांना तिंबूनाना म्हणायचे. प्रसंग लग्न-बारसं किंवा अन्य कौटुंबिक असोत- तिंबूनाना कितीही व्यस्त असले तरी हजेरी
लावायचे; आले नाहीत तर यजमानांनाच चुकल्या सारख व्हायच.
अंतयात्रांना सामान आणणं,ताटी बांधण्यापासून सर्व मदत आणि शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करण्याची पद्धत निर्विवाद परिणामकारक.
लहान-मोठ्यांशी जिव्हाळ्याचे संवाद हे वैशिष्ठ्य.
शहराच्या मध्यवर्ती भागातल्या वडिलोपार्जित वाड्यात वाट्याला आलेल्या जागेत वास्तव्य करून होते.
दाट वस्तीतला जुना वाडा.दिडीवजा बोळकंडी दरवाजा. दहा-पंधरा पावलं
पक्क्या भींतींच्या बोळातून पुढे गेलं कि फरशीबंद आंगण, त्यात मधोमध तुळशी वृंदावन; त्या परकोटात उजव्या कोपर्‍यात त्यांच बस्थान.
हो, एक विसरलो. प्रवेशाच्या बोळीत एक जुनी सायकल टेकलेली दिसली तरच तिंबूनाना घरी. एरवी कुठे गेलेत या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण.
रंग सांवळा,काटकोळी शरीरयष्टी, सदैव हंसमुख.आवाज इतका ठासून कि
गळ्याच्या तट्ट फुगलेल्या शिरा स्पष्ट दिसत. वेष असा कि "आंतरी नाना कळा" असल्याची खात्रीच पटावी. पायजंमा-सदरा पण क्वचित शर्ट-पॅंट.
स्नातक उपाधी घेऊन संरक्षण खात्यात- ऑर्डिनंस डेपो मधे नोकरीला होतॆ. नोकरी करीत असताना स्नातकोत्तर उपाधी सुमारे पन्नासाव्या वयाला घेतली.
त्यांच ऑफिस अदमासे १०-१२ मैल आणि वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ४.वहिनींनी दिलेला डबा घेऊन सहयोगींबरोबर सायकलने जायचं हा नित्यक्रम.
कारकून म्हटला कि वरिष्ठांची मर्जी राखणे हा कुलधर्म. पण त्रिंबकराव त्याला एकमेव अपवाद. ते सायंकाळी कार्यरत अशा बृहन महाराष्ट्र बॅंकेचे अवैतनिक प्रमुख सूत्रधार होते आणि एरवी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खासच. म्हणून वरिष्ठच वेळोवेळी त्यांची मदत घेत. असं असलं तरी आपल्या कार्यालयीन कामकाजात हेळसांड कधी होऊ देत नसत.
सार्वजनिक् गणेशोत्सव, दिवाळी-दसरा,नवरात्र-महालक्ष्मी अशा कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा.त्या मागे त्यांच्या पत्नीची प्रेरणा-कल्पकता उघडपणे मान्य करायचे. वहिनी मितभाषी असल्या तरी हंसमुख-लोभस स्वभावी होत्या.दुर्दैवाने गॅंगरिनचा धोका टाळण्यासाठी त्यांचे दोन्ही पाय गुढघ्याखाली कापल्यावर त्या अनेक वर्ष नैराश्याच्या छायेत होत्या.
माझा संबंध अनेक कारणांमुळे; मॊठ्या भावाचे जिवलग मित्र, वडिलांचे अनुयायी-भक्त,नाट्यसमाजाचे,संगितसमाजाचेप्रशंसक-पाठिराखे, व्यायामशाळेचे आग्रही अशा विविध क्षेत्रांत लुडबुडणारा मी
म्हणून. मला "भाक्या"च म्हणत. माझ्या नाटकांच्या तालमींना सुद्धा
रात्री उशीरा अनेकदा हजर असायचे.
वयाची पंच्यांशी ओलांडलेली असता देखील पत्नीची सुश्रुषा सेवा स्वतः करीत. वयोपरत्वे इतकी कठिण जबाबदारी तब्बल दहा वर्ष कपाळावर एकही आठी न आणता झेलली. पूर्वजन्मीचे योगीच म्हणायच आणि आपण नतमस्तक व्हायचं- दुसरं काय!
अशा प्रसंगी वहिनींच्या नजरेतल केविलवाण समाधान टिपण्याचं ओझरतं भाग्य मलाही मिळाल आहे.
स्वतः कॅंसर ग्रस्त असूनही आत्मियांच्या भॆटी करिता ८६-८७ वर्ष वयात नागपूर, ग्वाल्हेर प्रवास आणि तोही एकट्याने ! त्याच कर्मयोगीला साध्य होता.
आजाराच्या प्रकोपात बळी पडलेली त्यांची वाचा शेवटच्या क्षणी उर्जीत झाली आणि मुली-नातवंड,जावई अशा निकटवर्तियांशी क्षीण संवाद साधू शकली असं ऎकण्यात आलं.
शक्य आहे; यमदूतांना पाझर फुटावा हे त्या कर्मयोगीच्या तपश्चर्येचंच फळ निश्चित.
त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांति आणि समाजातील सर्व घटकांना प्रेरणा मिळो हीच इच्छा-प्रार्थना
भास्कर ३०-४-२००८
( आता भास्करकाकाने स्वतःची माबो आय डी तयार केलीये त्यामुळे यापुढे तो बहुतेक स्वतःच आपले लिखाण टाकण्यात सफल होईल.. )

गुलमोहर: 

.

>>वयाची पंच्यांशी ओलांडलेली असता देखील पत्नीची सुश्रुषा सेवा स्वतः करीत. वयोपरत्वे इतकी कठिण जबाबदारी तब्बल दहा वर्ष कपाळावर एकही आठी न आणता झेलली.

ह्या काकांना खरोखर शिसान. एरव्ही बायको जाऊन आठ्वडा झाला नाही तर संध्याकाळी नेहेमीसारखे पेग घ्याय्ला बाहेर पडणारे महाभाग सख्ख्या शेजारात मी पाहिलेत. Sad

हो गं स्वप्ना.. बायको चे पाय निकामी झाल्यावर ते स्वतः महालक्ष्म्या घरी बसवत आणी सगळा स्वैपाक साग्रसंगीत स्वतःच करत त्यांच्या मोठ्या वहिनींची मदत घेऊन (त्याही अश्याच वयाच्या आसपास..)
गेले ते जुने लोकं नं??

सर्कस

आठवणीं उजळण्याला कांही निमित्त लागतेच असे नाही;सहजच येतात आणि ओघात गुंता सुटत जातो.

लहानपणी घराजवळ मोठ्ठ गोल मॆदान होते.कधीकाळी तिथे बाजार भरत असावा म्हणून गोलबाजार असे नांवच पडले होते. मॆदानाच्या परिघाचा गोल रस्ता आणि त्या भोंवती सुखवस्तू कुटुंबियांचे प्रशस्त बंगले. कुंपणाच्या भिंतींच्या आत रंगीबेरंगी फ़ुलांची रोप आणि वेली.दोन किंवा तीन बंगल्यांना विभागणारे सार्वजनिक रहदारीचे रस्ते.

भव्य लोखंडी प्रवेशद्वार येणार्या-जाणार्यांसाठी उजाडल्यापासून उशिरा रात्रीपर्यंत उघडेच असायचे.आजच्यासारखे चोराचिलट्य़ांचे भय नव्ह्ते.अधिक कुटुंबे मराठी - डॉक्टर,वकिल,प्राध्यापक इ.

मॆदानात एका बाजूला मोठ्ठ कवठाच आणि दुसर्या बाजूला कदंबाचे असे दोनच वृक्ष फळांनी आणि फुलांनी सदॆव बहरलेले. कांही भागात स्वॆर उगवणारे गवत. पण मधोमध एका सधन व्यावसायिकाने हॊशी मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी उदारपणे करून दिलेली खेळपट्टी होती. गवत कापणारे कुणी कधिच दिसले नाही.मुक्त चरणारी खेचर-गुरंच सहकार्य करायची. वृक्षांवरच्या घरट्यांतले कावळे अन् घारी उजाडताच आकाशात घिरट्या घेऊन दूर निघून जायची.उलटी लट्कलेली वटवाघुळंच हलका लालिमा पसरु लागला कि मिटल्या डोळ्यांनी ते दृष्य टिपायची.

त्या मॆदानात सकाळी अन् संध्याकाळी तात्पुरता भगवा रोवून शाखा लागायची. अधुनमधुन प्रदर्शन भरायचे. प्रवेश मुक्त ही सोय.विविध वस्तूं-खाद्यपदार्थांचे स्टॉल, आकर्षक रोषणाई,मॊतकाकुवांमधे गरगरणार्या फटफटीचा भेदरवून टाकणारा आवाज, जादूच्या आणि स्वस्त जुगार-खेळांचा स्टॉल असायचे. आणी, अंधार झाल्यावर, ऊंच शिडीवरून स्वतःला पेटवून खालच्या विहिरीत उडी टाकणारा शूरमर्द अजून स्मरणात आहे.

मॆदानात क्वचित सर्कसीचा तंबू पडायचा.तो उभा होई पर्यंत मुले मोकळ्या जागेत गिल्ली-दंडा खेळायची.तंबूच्या बाहेर शिकारखान्याचे पिंजरे आले कि खेळ बंद.तासन्तास प्राणीच बघत.प्रत्यक्ष खेळांत दिसलेल्यांची ओळख पटतेकां ते पाहण्याचाच छंद. डरकाळी ऎकून घ्रराकडे धूम ठोकायची.

दप्तर घेऊन शक्यतो आधिच शाळेला निघायच आणि शिकारखान्याशी रेंगाळायच असा नित्यक्रम. सायकल चालविणार्या माकडापेक्षा वाघ,सिंह,चित्ता आकर्षक.काय ते सॊष्ठव,शक्ती आणि ती आयाळ !

सहजच आठवलं म्हणालो ते खरं नसल्याचे आता उमगल. सर्कसीतले वाघ-सिंह कधितरी म्हातारे होणार हे नव्याने जाणवले. एकेकाळी शरीर-बुद्धीचे कमावलेल सॊष्ठव आणि सॊंदर्य उतार वयात हलके-हलके कमी झालेल पाहून मनांत उमटले ते आठवणींचे स्वर. आयुष्यभर केली सर्कस आठवणींच्या गुंत्यातून बाहेर पडली.

व्यक्तीचित्रण जेवढं सुंदर जमलय तेवढंच गोलबाजारचं वर्णनही.
डोळ्यासमोर चित्रचं उभ रहातय.

गेले ते जुने लोकं >>>>>>>.वर्षू मी हेच लिहिणार होते.
अशी माणसं आता नाही सापडणार! भास्करकाकाच येताहेत माबोवर? ग्रेट!