थँक्स फॉर द मायटोकाँड्रीआ, मॉम!

Submitted by लसावि on 7 May, 2011 - 03:44

आपली प्रत्येक पेशी (cell) अनेक यंत्रांनी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि कार्यक्षम कारखान्याप्रमाणे आहे. पेशीचे केंद्रक (nucleus) म्हणजे त्याचा व्यवस्थापक, ज्याच्या आदेशाप्रमाणेच सगळी कामे होणार. परितालिका (cell membrane) आहे सुरक्षा अधिकारी, कारखान्याचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करणारी. गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मीक रेटीक्युलम आणि रायबोसोम हे या कारखान्याचे कनव्हेअर बेल्ट्स कम प्रॉडक्शन मॅनेजर, तर वेगवेगळ्या प्रकारचे एंझाइम्स, प्रोटीन्स आणि आरएनए हे सुपरवायझर्स आणि कामगार!

मात्र या सगळ्या व्यापाला लागणारी उर्जा पुरवणारे उर्जाकेंद्र मात्र एकच- मायटोकाँड्रिआ!
आपण जे अन्न ग्रहण करतो त्यात साठवलेली रासायनिक उर्जा आपल्याला जशीच्यातशी वापरता येत नाही. उदा. तुम्हा काहीतरी बोलायचे आहे, तर या कृतीसाठी लागणारी उर्जा तुम्ही तुमच्या पेशीतील ग्लुकोज/ प्रथिनांपासून थेट मिळवू शकत नाही. त्यासाठी या पदार्थातील उर्जा ऑक्सिडेशनच्या मदतीने 'अ‍ॅडोनोसिन ट्राय-फॉस्फेट अर्थात एटीपी (ATP)' या रेणूंमध्ये रुपांतरीत करावी लागते. शरीरात होणारी प्रत्येक घटना उर्जेसाठी याच रेणूंवर अवलंबून असते त्यामुळे त्यांना 'शरीरातील उर्जेचे चलन (Energy currency)' असेही म्हटले जाते. अन्नाचे ऑक्सिडेशन आणि एटीपीची निर्मिती मायटोकाँड्रिआतच प्रचंड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पेशी आणि अर्थातच संपूर्ण शरीरासाठी त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.

पण हे मायटोकाँड्रिआ आपल्या पेशीत येतात कुठून? आपण आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या गर्भात फक्त एका पेशीपासून (zygote) करतो. त्या पहिल्या पेशीतले मायटोकाँड्रिआ कुणाचे असतात? ते असतात फक्त आपल्या आईचेच!!!
मानवी शुक्राणू (sperm cell) ही एक अत्यंत खास प्रकारची पेशी आहे. स्त्रीची अंडपेशी (ovum or egg cell) शोधून, फलनाची प्रक्रिया (fertilization) पूर्ण करणे या कामासाठी त्यांची रचना अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. एखाद्या माश्याप्रमाणे अत्यंत वेगाने 'व्हिपलॅश अ‍ॅक्शन'ने अंडपेशीपर्यंत पोचण्यासाठी शुक्राणूंना प्रचंड उर्जा लागते. ती अर्थातच त्यांच्या मध्यभागात (mid-piece) एकवटलेल्या मायटोकाँड्रिआकडून मिळते. मात्र जेंव्हा एखादा शुक्राणू फलनाच्या प्रक्रियेत असतो तेंव्हा मात्र त्याचा मध्यभाग अंडपेशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे फलनानंतर तयार झालेल्या आपल्या पहिल्या पेशीत आपल्या शुक्राणूतील (वडिलांचे) मायटोकाँड्रिआ अजिबात नसतात. केवळ अंडपेशीतील मायटोकाँड्रिआच पुढे नवीन तयार होणार्‍या पेशीत जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीतील, आपल्याला सतत उर्जा देणारे सर्व मायटोकाँड्रिआ फक्त आणि फक्त आपल्या आईचीच देणगी असतात!

आता प्रश्न हा आहे की हे आपल्याला कळले कसे? मायटोकाँड्रिआचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे जो आपल्या केंद्रकातील डीएनएपेक्षा वेगळा आहे आणि त्याचे कामही स्वतंत्रपणे चालते. या डीएनएमधील घटकांची क्रमवारी (DNA sequencing or mapping) लावता येते. अशा क्रमवारीचा अभ्यास केला असता हे स्पष्ट होते की तुमच्या मायटोकाँड्रिआच्या डीएनएची क्रमवारी, तुमच्या आईच्या मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या क्रमवारीशी तंतोतंत जुळते. पण ही क्रमवारी तुमच्या वडिलांच्या क्रमवारीपेक्षा वेगळी असते. याचाच अर्थ हा की आपला प्रत्येक मायटोकाँड्रिआ केवळ आपल्या आईकडूनच आलेला असतो.

विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते.

या मातृदिनी त्या मातेचे स्मरण करु आणि म्हणू ' थँक्स फॉर द मायटोकाँड्रिआ, मॉम!'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीपा:
१] काही कोटी वर्षापूर्वी मायटोकाँड्रिआ हे स्वतंत्र जीव असावेत आणि नंतर मोठ्या पेशींनी त्यांना आपले कायमचे रहिवासी बनवले, अशी एन्डोसिंबायोसीस थिअरी आहे.
२] मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या मदतीने तुम्हाला तुमचे पूर्वज शोधता येणे आता शक्य आहे. खालील लिंकला भेट द्या- https://genographic.nationalgeographic.com/genographic/lan/en/participat...

गुलमोहर: 

ग्रेट.. किती खोलात जाऊन संशोधन झालेले आहे.

मला तर हे मायटोकाँड्रिआ म्हणजे आपण आपला जीव म्हणतो तेच असावेत असे वाटते. यांनी उर्जा देणे बंद केले तर मानवी शरीराचा कारखान बंदच पडेल की.

जबरी!! हे असलं काही शास्त्रीय परिभाषेतील ज्ञान इंग्रजीतून वाचताना अनेकदा (मला तरी) जाम बोअर होतं किंवा बाऊन्सर जातं. पण तू खूप सोप्या प्रकारे उलगडून सांगितलं आहेस. त्यामुळे चक्क कळाले!!! धन्स! Happy

हे फार छान झालं! मातृदिनी यापेक्षा चांगले काही असू शकत नाही आगाऊराव!

उत्तम लेखाबद्दल धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सर्वांना धन्यवाद!!!
विशेषतः अकु, सगळा लेख लिहिल्यावर मलाही तो फार तांत्रिक आणि किचकट झालाय की काय असे वाटत होते.
याच थीमवर 'सेव्हन डॉटर्स ओफ इव्ह' हे उत्तम पुस्तक आहे, पण त्यातील थिअरीला अजून पूर्ण मान्यता मिळालेली नाही.
रच्याकने, मराठी प्रतिशब्द आठवताना फेस आला राव!

मस्त लेख!
रिडर्स डायजेस्ट च एक `Know Your Body' नावाच छोट आणि सर्वांना समजेल + आवडेल अस पुस्तक वाचल होत. त्याचीच आठ्वण झाली.
अजुन अश्याच प्रकारची माहिती वाचायला खूप आवडेल.

जियो !! क्या बात है !
एकदम सोप्या भाषेत आणि खूप छान लिहिलंय सगळं !
खूप्पच आवडला लेख....आणि मातृदिनाशी सांगड तर एकदम सही.
मराठी प्रतिशब्द आठवताना फेस आला राव! >> १०० % सहानुभूती. Happy

आगाऊ, खुप छान माहिती एकदम सोप्या भाषेत आहे. खराखुरा शिक्षक आहेस तु. ज्ञानपिपासु आणि पुन्हा त्याचे संकलन करुन ज्ञानकण शोधणार्‍यांपर्यत पोचवणारा.

उत्तम माहिती. Happy
मराठी प्रतिशब्द आठवताना फेस आला राव! >>> Lol 'परितालिका (cell membrane) ' हे वाचल्यावरच तुझ्याबद्दल मनात (नितांत वगैरे :फिदी:) आदर दाटून आला होता. Wink

दिनेशदा Lol
आगावाला योग्य प्रतिशब्द नाही आठवला तर ती आद्य, महा'मॉम'ही रागवेल त्याला Proud

मस्त रे आगावा.. सोप्या भाषेत लिहिले आहेस अगदी.
मी लिहिणारच होतो sever daughters of eve बद्दल.. हे पुस्तकपण अगदी सोप्या व रंजक शैलीत लिहिले आहे..

Pages