मला भेटलेल्या वल्ली- दिनू भटजी

Submitted by वर्षू. on 2 May, 2011 - 03:33

ही कथा माझे काका श्री भास्कर लेले यांनी लिहिलेली आहे. ती जशीच्या तशी त्यांच्याच शब्दात इकडे देत आहे. माझ्या काकांची व्यक्तीचित्रे मांडण्याची लकब मला फारच भावते. या व्यतिरिक्त कविता,चारोळ्या,उखाणे लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या लेखनातून विनोदाआड असलेलं कारुण्य , हळूच डोकावून जातं.

दिनू भटजी

त्या काळी सबंध शहरात सायकलवर उघडबंब फिरणारे दिनूभट एक असामान्य व्यक्तिमत्व होते.
डोळ्यांना मोतिबिंदु पश्च्यात लागलेला जाड भींगांचा भक्कम फ्रेमचा चश्मा.स्वैर वाढलेल्या भिवयांच
काळ्या-करड्या रंगाच जाळं -- कथ्थारंगी फ्रेम !
आखुड धोतरा खाली मांसल पोटर्‍यांवर सुद्धा केस. पायात भक्क्म, कोकणी वहाणा.
उंचपुरा धिप्पाड बांधा.साठी केंव्हाच उलटलेली पण पाठीचा कणा ताठ. सायकलवर स्वार असताना
तोंडाने सतत श्ल्लोक-मंत्रोच्चार सुरू असायचे .डावीकडे-उजवीकडे मान वळवून ओळखीच्या लोकांचे
अभिनंदन करताना अंगठ्यानी घंटीचा नाद-- एक लकब.
जवळून बघणार्‍याला, स्थूल-गोर्‍या कांतीच्या पृष्ठभूमिवर मॊठ्या किल्ल्यांचा जुडगा अडकवलेलं
जानवं आणि सबंध अंगावर पसरलेलं पांढर्‍या-कुरळ्या केसांच जाळ वार्‍यावर भुरभुरताना दिसायच.
मनगटाला स्टेन्लेस च्या सैल चेनचं घड्याळ आणि काळ्या धाग्यांच वलय. हॅंडलवरचा हात अभिवादन
करताना ऊंच-खाली झाला कि चमकुन दिसायच. चालता-बोलता हिमनग !
व्यवसायाला अनुरूप बोलघेवडा स्वभाव. धार्मिक ग्रंथांच नातं वर्तमानाशी जोडण्याच कसब लक्षात येणारं.
गुरुजी,फार पूर्वी धोतरावर सदरा-बंडी व्यवस्थित घालत.स्थानिक समाजाच्या सार्वजनिक गणपतिची
संपूर्ण दहा दिवस - स्थापने पासून विसर्जना पर्यंत समग्र पूजा तेच करीत. भारदस्त पण अनुनासिक, गोड-आकर्षक स्वर.
लहानपणी ध्रुपद गायन शिकले होते असे ऎकिवात आहे.
महायुद्धाच्या होरपळीत महागाई वाढली. अकरा ऎवजी बिदागी एकवीस मिळावी असा त्यांनी प्रस्ताव केला. समाजानी
अमान्य करून कुणा नवख्याची नेमणूक केली. सामाजिक-वैयक्तिक संबंधांच्या परकोटाला भेगा पडल्या. गुरुजींनी
अपमानाच्या विरोधात दहा दिवस उपोषण केलं आणि उरल्या आयुष्यात निधड्या छातीवर त्या अपमानाचे व्रण समाजाला नित्य दिसावे म्हणून त्या वस्त्रांचा त्याग केला.
आमच्या लहानपणी गुरुजींकडून पूजा वगैरे क्वचित. तरिही दिनूभट खूपदा घरी येत. वडिलांचे विद्यार्थी म्हणून आणि वडिलांची
सामाजिक प्रतिष्ठा जबरजस्त म्हणून.
दाराशी सायकल कलती करून स्टॅंड वर ठेवतानाच "कांकां" अशी अनुनासिक आरोळी.काकूला-_ आईलापण आदर- कौतुक होतच.
वडील त्यांच्या पाठीवर प्रेमळ थाप देताना त्याना "रोठ्या" म्हणून संबोधायचे;दोघांच्या हास्याच्या गडगडाटानी सगळा आसमंत हादरायचा.आईनी दिलेला दुधाचा पेला ओठांना न लावता सलग धार ओतून संपायचा मिशांचे झुपके आधि हाताने आणि मग पंच्यानी पुसले कि निघायची तयारी. आत पर्यंत ऎकू जाईल अशा ऊंच स्वरांत "बरय कांकू" म्हणून सायकलवर टांग ! ते दृष्य बघण्या सारख असे. मागच्या चाका मागून ओणवून हॅंडल धरायच. एक पाय ऍक्सलला लागलेल्या पिन वर ठेवला कि दुस्र्‍या पायाने जमीन रेटून गति घेतली कि सीट गाठायची !
एकदा आईच्या आग्रहास्तव सत्यनारायणाच्या पुजेला मलाच बसावं लागलं.पूजा सांगणार गुरुजीच. रोजगार अधिकारी म्हणून माझी ख्याति त्याच्या कानी होती.म्हणून मला भास्करराव संबोधन. कौटुंबिक स्वाथ्य त्यांना कमिच.एक मुलगा जेमतेम अकरावी झाला पण उनाड. दुसरा जन्मांध ! एका पुतण्याला आधार दिला; पण तो निकृष्ठ पत्रकारितेच्या गुंत्यात उपाशीच.वडिलोपार्जित वाड्याच्या कोपर्‍यात रहात. अशी जुजबी कथ्हा माहित होती.सढळ हातानी दक्षिणा द्यायची मनांत होतच.
पूजा सांगताना गुरुजी मधेच स्वतःची करूण कथा सांगू लागले. त्यांचे ते अनुनासिक करूण स्वर आजही बेचैन करतात.
"कांय सांगू, गोखल्यांच्या रंगूशी लग्न झालं आणि कुंडलीतल्या शनिचं थैमान सुरू झालं.... अक्षद वहा आणि पळीनी पाणी सोडा.हं!
हा शनि अंत पाहणार भस्करराव-- माझा अंत..एक दीर्घ निश्वास या नंतर भरधाव उच्चारलेले मंत्र !पुन्हा स्टेशन बाहेर सिग्नल आभावी थांबण्यासाठी धीमी चाल! " माझं नाही__ या मुलांच बस्थान नीट बसावं असं कांहीतरी करा भास्करराव.तुमचं काय ते आय्ट्या कि काय तिथे ट्रेनिंग मधे प्रवेश मिळवून दिलवाल तर ऋणी होईन__ कांकू याss ! प्रसाद-आरती करू. हो,दिरंगाई नको. मनातला विषाद असा मोकळा. मदतीच्या आश्वासनामुळे त्यांच्या चेहेर्‍यावर उमटलेल्या समाधानाला कर्पुर-चंदनाचा लागलेला टिळा
माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे.
अनेक वर्षांनंतर त्यांच्या जुन्या वाड्याच्या एका खोलीत__ थंड गार फर्शीवर दिनूभैय्यांचं थंड पार्थिव आदर सन्मानानी पाहणार्‍या अनेका पैकी मी होतो. त्या थंड अंधारात पार्थिवाला जखडून-चिकट्लेली एक सावली दिसली. शनिने पिछा सोडला नसावा या कल्पनेने शहाराच आला.
भास्कर २९-४-२०११

--

गुलमोहर: 

.

वर्षु नील - खरोखरच आपले आभार. काकांचे लिखाण नेटवर टाकलेस ह्यात खरोखरच आपले कौतुक.
काका छान लिहितात. आणि मुख्य म्हणजे ते आपण उजेडात आणले.ह्याला फार मोठी किमत आहे काकांना सा. न.
काकांची शैली उत्तम आहे कोठेतरी कधीतरी त्यांनी लिखाण केले असावे असे दिसते
परत आपणास धन्यवाद !!

जुन्या जमान्यातली जवळपास सगळी माणस अशीच होती. प्रामाणिक, कर्तव्यकठोर आणि मनाने मात्र तितकीच प्रेमळ किंवा हळवी.

वर्षू, सुंदर आहे तुझ्या काकांचं शब्दांकन. दिनूकाका एक व्यक्ती म्हणून समोर उभे राहिले. अजून यायला हवं होतं... म्हणजे त्यामागचा माणूस अधिक कळला असता.

“त्या थंड अंधारात पार्थिवाला जखडून-चिकट्लेली एक सावली दिसली. शनिने पिछा सोडला नसावा या कल्पनेने शहाराच आला.” ....... मनाला स्पर्श करून गेला हा शेवट.
व्यक्तीचित्रण देखील अगदी नेटकं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
(या वयात तुमचे काका इतकं चांगलं लिहू शकतात ही विशेष गोष्ट .... माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा.)

वर्षू तै, अगदी साध्या सरळ पण नेमक्या शब्दात थेट आतपर्यंत जावून पोचणारं लेखन ! कुठेही साहित्यिकी बडेजाव नाही की कुठला आव नाही....... साधं सरळ, भिडणारं लेखन !
दादशी सहमत, अजुन यायला हवं होतं. !!

छान लिहीलय! Happy
ऐन इन्ग्रजी अमदानित, बदलत्या कालखन्डाची चाहूल घेऊनही त्यावर माण्ड ठोकू न शकलेले असे अनेक दिनूभटजी गावोगावी दारिद्र्यात खितपत टाचा घासत "पण मानानेच" होत्याचे नव्हते झाले, त्यान्ची दखल या लेखाने घेतली गेली पाहून समाधान वाटले.