इ.स. १०००० - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2011 - 03:48

प्लॅटफॉर्मच्या बाहेर भयातिरेकाने पाच वेळा उडी मारूनही १६९९ पुन्हा आतच खेचली गेली. गोप तुफान आवाजात रामरक्षा म्हणत असतानाच पेंगुळल्याचाही अभिनय करत असल्याने त्याने गोळी खरच खाल्ली की नाही खाल्ली हे १६९९ ला समजत नव्हते. कारण तिची चीप स्पष्ट संदेश देत होती की तो असंबद्ध पण संस्कृतमध्ये बोलत आहे आणि १६९९ चे डोळे तर तिला सांगत होते की ४६३४४ झोपाळला आहे.

तंत्रज्ञानावर मानवी बुद्धीने मिळवलेला पहिला विजय होता तो!

पृथ्वीपासून भयानक मेगासॉनिक वेगाने निघालेला ठिपका आता जवळ जवळ येऊ लागल्यासारखे वाटत होते. त्याचा आकार वाढू लागला होता. निळा रंग स्पष्ट होऊ लागला होता. काही क्षणातच आपल्याला भयानक अंताला सामोरे जावे लागणार हे १६९९ ला समजले.

सर्व गर्व, दुराभिमान आणि श्रेष्ठत्वाची भावना त्यागून तिने गोपच्या जवळ येऊन त्याला गदागदा हालवले.

"वाचव रे.. मला वाचव.. ते आता येतील.. त्यांना सांग की मी तुला काही त्रास दिला नाही.. तो ६४१ चा राजकुमार मला पळवायला आला होता... पण मी त्याला हुसकावून लावले.. तू म्हणशील तशी वागले.. तुलाच पृथ्वीवर जायचे नव्हते... सांगशील ना... सांगशील ना.. जागा हो.. प्लीज जागा हो... "

गोपची रामरक्षा क्षीण होत चालली होती. अभिनय वाखाणण्याजोगा होता त्याचा! १६९९ आता एखादी शिडी किंवा फळी शोधू लागली. मगाशी असाच एखादा ऑब्जेक्ट गोपला मिळू नये अशी तिची इच्छा होती. पण आता तिला स्वतःला तो हवा होता. प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाण्यासाठी! ते यान यायच्या आत मरून जाण्यासाठी! मेलेल्या माणसाचे पॉईंट्स कापायचे नाहीत अशी प्रथा असल्याने मरताना १६९९ कडे साडे आठ लाख पॉईंट्स असणार होते. तिला त्यामुळे दुर्गती मिळणार नव्हती. पण यानातील लोकांना ती सापडली तर जिवंतपणीच तिचे सगळे गुण त्यांनी कापून घेतले असते वेगवेगळे आरोप ठेवून आणि मग तिला पापी घोषित करून तिचा भयानक अंत केला असता. मग मात्र तिला दुर्गतीच मिळाली असती.

गोपला मधेच गदागदा हालवत होती ती! मधेच गोपच्या मनातील विचारांना समजून घेण्यासाठी चीप तपासत होती. पण त्यावर रामरक्षेच्या संस्कृतामुळे घोळ होत होता. काही समजत नव्हते. मधेच आत जाऊन काही ऑब्जेक्ट मिळतो का ते बघत होती. कक्षेबाहेर जाण्यासाठी! मधेच यान कुठवर आले ते पाहात होती.

जिवाच्या आकांताने हे सगळे करत असतानाच तिला एक चमत्कारीक वस्तू मिळाली. हा प्लॅटफॉर्म मंगळाच्या कक्षेतील होता. एखादा चंद्र असावा तसा! हे तिला माहीत नव्हते. तिला वाटत होते की हा प्लॅटफॉर्म स्वतंत्र आहे व स्थिर आहे. मात्र ती वस्तू! त्या वस्तूवर चक्क चित्र होते. प्लॅटफॉर्म तांबूस रंगाच्या ग्रहाभोवती फिरत असल्याचे! याचाच अर्थ सरळ होता! कोणत्याही कारणाने जर प्लॅटफॉर्म स्वतःच्या कक्षेपासून थोडासा जरी ढळला तरी अतीप्रचंड वेगाने मंगळाकडे खेचला जाणार होता. स्वतःची मंगळाभोवती फिरण्याची कक्षा सोडून तो जर मंगळाच्या बाजूला आला तर मंगळाकडे खेचला जाणार! आणि बाहेरच्या बाजूला गेला तर स्पेसमध्ये भरकटणार! भरकटताना गुरू ग्रहाच्या कक्षेत जाण्याची शक्यता सर्वाधिक होती.

तब्बल सहा सेकंद! सहा सेकंद भूत पाहावे तशी १६९९ त्या गोल वस्तूकडे पाहात होती. पुढच्याच क्षणी ती कंट्रोल रूममध्ये धावली. बाहेर गोप आता काय करत आहे याकडे तिचे शुन्य लक्ष होते. तिला एकच गोष्ट करायची होती. ती म्हणजे हा प्लॅटफॉर्म वायूवेगाने मंगळाकडे सरकवणे! कारण अचानक येत असलेला हा प्लॅट्फॉर्म पाहून मंगळावरील यंत्रणा मोठमोठे अलार्म्स वाजवून हा प्लॅटफॉर्म हवेतच रोखणार होत्या. आणि तो १६२२ चा प्लॅटफॉर्म आहे हे लक्षात आल्यानंतर तो सहीसलामत मंगळावर उतरवून घेणार होत्या. एकदा तो तिथे उतरला की १६९९ ला आपल्या पॉईंट्सचे प्रिडेथ फायनल रेकॉर्डिंग करता येणार होते. त्यानंतर तिला भयानक अंत देणे कुणालाच जमणार नव्हते कारण तिचे 'फायनल रेकॉर्डेडे प्रिडेथ पाँईट्स' हे एखाद्या संतासारखे असणार होते. थॅन्क्स टू गोप! त्यामुळेच तिला गुणहीन करून मारणे हे त्यांचे ध्येय होते.

ही 'गुण' ही काय संकल्पना होती ते एकदा नीट बघायला हवे.

जन्माला येताना मिळालेल्या दहा लाख गुणांपैकी हजारो गुण जात असत व येतही असत. मरताना किती गुण होते यावरून तो माणूस किती चांगला वागत होता हे ठरायचे. सर्वाधिक गुण असणारा श्रेष्ठ ठरायचा व सर्व मानवजात त्याचा मृत्यू लांबवण्यासाठी व त्याला अधिकाधिक नीट ठेवण्यासाठी झटायची. मात्र १६९९ ने गोपच्या सहाय्याने मानवजातीला फसवून इतके गुण मिळवले होते की ते दहा लाखापेक्षाही वाढून आता जवळपास सोळा लाख झालेले होते व इतके गुण एखाद्या महान संताकडेच असणे शक्य होते. एकदा हे गुण रेकॉर्ड झाले की १६९९ ही हयात मानवजातीतील गोप या ८०-११ च्या अंशाखालोखाल सर्वश्रेष्ठ मानव ठरणार होती. आणि ती तशी नाही हे सिद्ध करण्यासाठी अफाट खटाटोप करावे लागणार होते. ज्यांना असा आरोप करायचा होता त्यांना आधी स्वतःचे यच्चयावत गुण एजंट्सकडे जमा करावे लागणार होते. त्यानंतरच केस उभी राहू शकणार होती. याबाबत त्या मानवजमातीने भारताची न्यायप्रणाली स्वीकारलेली होती. भारतात आरोपीने गुन्हा केला आहे हे सिद्ध करावे लागायचे. सिंगापूरमध्ये आरोपीला सिद्ध करावे लागायचे की त्याने गुन्हा केला नाही. पण भारतासारखी न्यायप्रणाली असल्यामुळे १६९९ने गुन्हा केलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागणार होती. गोपसारख्या श्रेष्ठ मानवाला साक्षीदार म्हणून उभे करण्यास एजंट्स परवानगी नक्कीच देणार नव्हते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर असलेल्या उपकरणांमध्ये जे रेकॉर्ड झाले त्यावरूनच ती केस चालवता येणार होती. पण १६९९ ने हुषारीने तेथील सर्व उपकरणे बंद ठेवलेली असल्याने त्या उपकरणांवर काहीच रेकॉर्ड झालेले असणार नव्हते. एक आणि एकमेव सुगावा म्हणजे पृथ्वीवरील अ‍ॅन्टेनाजना समजलेली बाब की ६४१ चा एक मानव लपून छपून तेथे पोचलेला होता ही! पण तो का आला होता हे समजू शकत नव्हते. म्हणजे १६९९ च्या परवानगीने आला होता की चोरून आला होता हे! आणि १६९९ नक्कीच असे म्हणणार होती की तो तिच्या नकळत आलेला होता. या सर्व गोष्टींमुळे १६९९ वरील आरोप सिद्ध होणे दुरापास्त होते. त्यामुळेच तिला पकडल्या पकडल्या गुणहीन करणे हे १६२२ व त्याच्या त्या यानातील इतर सर्व सहकार्‍यांचे एकमेव ध्येय होते.

आणि १६९९??

वयाच्या ऐंशीव्या वर्षी एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसू लागली होती. आत्तापर्यंत मधेच झळकून जाणारे तिचे ते जख्खड भेसूर रूप आता अजिबात दिसत नव्हते. याचे कारण काय? तर एकच....

... स्पेस प्लॅटफॉर्मची कक्षा डिस्टर्ब करून त्याला मंगळाकडे कलवणारे स्विच... तिला दिसलेले होते..

शी हॅड वन द बॅटल!

याचेही कारण दिलचस्प होते. पृथ्वीवरून या प्लॅटफॉर्मकडे सुसाट वेगाने निघालेले यान व्हाया मंगळ येऊ शकत नव्हते. कारण त्याला 'गुरुत्वाकर्षण विरोधी' अशी जी शक्ती पृथ्वीवर दिली जायची त्या शक्तीचा उपयोगच मंगळाजवळून येताना संपला असता. ते सरळ मंगळाकडे खेचले गेले असते. त्यामुळे त्याचा मार्ग लांबचा होता. लांबून येतानाही चुकून गुरूच्या किंवा गुरूच्या एखाद्या चंद्राच्या कक्षेत जाऊ नये म्हणून अत्यंत काळजीपुर्वक मार्ग आखण्यात आलेला होता. वेग कितीही भयंकर असला तरीही मार्गच इतका लांबचा होता की वेळ लागणारच! भारत इंग्लंड फ्लाईट व्हाया अमेरिका नेण्यासारखे होते ते! आणि १६९९ इथेच अ‍ॅडव्हान्टेज मिळवत होती. कारण तिने एकदा त्या प्लॅटफॉर्मची कक्षा बदलली की ती सुसाट वेगाने मंगळाकडे झेपावणार होती. आणि ते यान त्या मार्गात येऊच शकत नव्हते कारण ते मंगळावर जाताना नीट न जाता सरळ मंगळावर जाऊन आपटले असते. कारण त्याचा मार्ग बदलून ते मंगळाकडे नेणे म्हणजे अफाट वेगावर कोणतेही नियंत्रण न राहणे! कारण पुथ्वी ते प्लॅटफॉर्म हा प्रचंड प्रवास तोही लांबच्या मार्गाने कव्हर करण्यासाठी असलेला तो वेग होता. तसेच त्या यानाची स्वतःची गुरुत्वशक्ती या प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त होती. त्यामुळे प्लॅटफॉर्मच यानाला जाऊन चिकटणार होता. पण मंगळाचे तसे नव्हते. मंगळाची गुरुत्वशक्ती यान आणि प्लॅटफॉर्मच्या पटीत अब्जावधी पटीने जास्त होती. दोन्ही अंतराळ ऑब्जेक्ट्स मंगळावर जाऊन धडकणार होते. पण प्लॅटफॉर्म १६२२ चा असल्याने मंगळावर तो व्यवस्थित पार्क करून घेण्यात येणार होता. यान पार्क करणे शक्यच नव्हते कारण मुळातच यानाचा स्पीड इतका होता की ते येत आहे हे समजेपर्यंत ते येऊन धडकले असते. आणि डिस्ट्रॉयही झाले असते. इतकेच काय तर त्या यानामुळे मंगळावरील जमीनीचा तो संबंधीत भागही प्रचंड अ‍ॅफेक्ट झाला असता. आणि मुख्य म्हणजे ते यान मंगळावर नेमके कुठे आपटणार यावर कुणाचेच नियंत्रण असू शकत नव्हते.

एका जबरदस्त थराराला सुरुवात होणार होती. आणि त्याची कर्ती करविती होती... १६९९!

गोप क्षीण आवाजात रामरक्षा म्हणत असतानाच अवकाशात पाहात होता. अचानक काहीतरी बदल झाल्यासारखा वाटला.

ते यान अचानक भलतीकडेच निघाले. ते गुरूच्या एका चंद्राच्या कक्षेबाहेरून जाऊन येथे येणार आहे हे गोपला ज्ञत असणे शक्यच नव्हते. त्यामुळे तो निराश झाला. हे कसलेतरी भलतेच यान असणार असे त्याला वाटले. आता असहाय्य झालेला गोप रडू लागला. तोवरच अशी परिस्थिती आली की पोटात गोळाच आला. आणि कोरडी उल्टी झाली. इतकी जोरात चक्कर आली की काही समेजचना! तुफान वेगाने खाली कोसळत आहोत असे त्याला जाणवू लागले.

कारण १६९९ ने स्विच ऑन केलेले होते. आणि प्लॅटफॉर्म हळूहळू रेडियल कक्षेतून बाहेर येतानाच अचानक मंगळाच्या गुरुत्वशक्तीपुढे शरण जाऊन तुफान वेगाने मंगळाकडे जाऊ लागला होता. अंधारी येणे म्हणजे काय ते गोपला समजू लागले. तरीही कसाबसा तो पाहू लागला. आता तर यान दिसतच नव्हते. अचानक मगाशी दिसेनाशी झालेली पृथ्वी पुन्हा दिसली. हे बहुधा धरणीमातेचे शेवटचेच दर्शन असे गोपला वाटले. पण हातही जोडता येत नव्ह्ते. हातांनी काहीतरी घट्ट धरून ठेवलेले होते त्याने! तितक्यातच मागे भेसूर हास्य ऐकू आले. गोपने कसेबसे मागे पाहिले. पोटातील गोळ्याची व्याप्ती अफाट वाढलेली होती. 'खाली पडतानाची असहाय्यता' ही एकच भावना आता मनात राहिलेली असतानाच गोपला ते दिसले. अशीच कशाला तरी धरून कशीबशी उभी राहिलेली १६९९ गोपकडे पाहून उपहासाने भेसूर हासत होती. तिचे ऐंशी वय आता स्पष्ट जाणवत होते असा तो चेहरा झालेला होता. आनंदाच्या शिखरावर असावी ती!

आपण रडून मदत मागायला हवी हेही गोपला सुचत नव्हते. अफाट वेग! फक्त अफाट!

आणि काही सेकंदांनीच... ते भयावह दृष्य... ते भयावह दृष्य दिसले गोपला!

आयर्न पावडर! आयर्न ऑक्साईड! तांबुस तांबुस! एक अवाढव्य गोळा! ज्याचा संपूर्ण गोलाकार नजरेत मावत होता. हाच ग्रह त्याने अगदी नुकताच जवळून पाहिला होता, पाहिला कसला होता, त्यावर तो राहिला होता.

मंगळ! .......मंगळ वॉज निअरिंग!

मंगळ! जेथे पहिल्यांदा जातानाही गोप स्वेच्छेने गेलेला नव्हताच, पण निदान मानवी नियंत्रण तरी होते जाण्यावर! आता कशाचेच नियंत्रण नव्हते.

१६९९ च्या हासण्याने आता सातमजली स्वरूप धारण केलेले होते. गोप हतबलपणे डोळे रोखून गिळायला तयार झालेल्या त्या मंगळाच्या जवळ येणार्‍या गोळ्याकडे पाहात होता.

खूप लहानपणी त्याने एकदा चार फुटी मातीच्य ढिगार्‍यावरून मारलेली उडी आणि मोठा झाल्यानंतर एकदा एका लहान मुलाला गंमत म्हणून दाखवण्यासाठी जिन्याच्या सहाव्या पायरीवरून खाली मारलेली उडी ही त्याच्या उंचीवरून पडण्याची आजवरच्या ८०४० वर्षातील रेकॉर्ड्स होती. सव्वीस हजार किलोमीटर्सवरून पडण्याचे रेकॉर्ड तो आज करणार होता.

तेवढ्यात १६९९ किंचाळली. तिच्या चीपवर आलेला संदेश जोरात वाजला आणि गोपलाही ऐकू आला.

'तुम्ही मंगळावर नाही... डिमॉसवर चालला आहात....स्विच ऑफ करून रेड मास्टर ऑन कर.. त्याशिवाय वाचणार नाहीस... "

डिमॉस! टेरर! केवळ टेरर!

जेथे मानवजमातीचे यच्चयावत क्लोन्स ठेवलेले होते. बर्फाळ अवस्थेत! जेथे जाण्यासाठी आणि जिवंत येण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असणे अत्यावश्यक होते. मंगळाचा एक भयानक उपग्रह! जो मंगळापासून साधारण तेवीस एक हजार किलोमीटरवर असावा! मंगळ जवळ येताना दिसत असला तरीही आपण डिमॉसकडे चाललेलो असू यावर १६९९ चा पूर्ण विश्वास होता.

त्याही परिस्थितीत लडखडत ती आत धावली. आता धावण्याला काही अर्थच उरलेला नव्हता. कारण पाय उचलेपर्यंत प्लॅटफॉर्म कित्येक किलोमीटर पुढे जात होता.

पण ती नियंत्रण कक्षात पोचलीच! तिथले अनेक दिवे उघडझाप करून कर्कश आवाज करत होते. हा प्लॅटफॉर्म निर्माण झाल्यापासून आजवर त्याना इतिहासात काम करावे लागले नव्हते. पण आज करावे लागत होते.

एक भयंकर वेग! आणि एका स्क्रीनवर दिसणारा एक विशिष्ट आकाराचा गोळा! त्या गोळ्यावरच्या अ‍ॅन्टेनाज मंगळावरच्या अ‍ॅन्टेनाज इतक्या पॉवरफुल नव्हत्या. प्लॅटफॉर्म खूप जवळ पोचेपर्यंत तेथे कुणाला कळणारच नव्हते की प्लॅटफॉर्म जवळ आलाय. अर्थात, कुणी टक लावून अवकाशात पाहात असले तर समजले असते म्हणा! पण तेथे इनमीन तेराशे माणसे होती.

१६९९ ने रेड मास्टर ऑन केला आणि निरिक्षण केले. वेग अचानक साठ सत्तर किलोमीटर पर अवर इतक्या कमी पातळीला आला. बाहेर गोपच्या जीवात जीव आला. पुण्यातील कर्वे रोडवर रात्री दहा नंतर या वेगाने त्याला काही वेळा स्कूटर चालवता आलेली होती. तीही मित्राचीच, त्याला काय परवडणार होते म्हणा!

रेड मास्टर हे खरोखरच मास्टर डिझाईन होते. कक्षेतून प्लॅटफॉर्म चुकून ढळल्यास वेग नियंत्रित करून हव्या त्या दिशेला प्लॅटफॉर्म नेण्याची सोय देणारे उपकरण! त्यात गुरुत्वशक्तीच्या बाहेर जायची शक्ती नव्हतीच! फक्त वेगावर नियंत्रण होते. त्यामुळे निदान दिशा तरी देता यायची. मग विरुद्ध दिशेला नेत राहायचा प्लॅटफॉर्म! हळूहळू गुरुत्वशक्ती विरळ विरळ होत चालली की एका विशिष्ट क्षणी तो मूळ कक्षेत आणता यायचा. पण हे करायला खूप वेळ लागायचा. कित्येक आठवडे वगैरे! अर्थात १६२२ या १६९९ च्या साहेबालाही हा अनुभव नव्हताच. कारण प्लॅटफॉर्म कधी ढळलाच नव्हता. पण अंदाज होता की सहा महिने जर त्याच वेगात दिशा बदलत ठेवली तर मूळ कक्षेत येता यावे. अनेक क्लिष्ट गणिते करून या निष्कर्षाप्रत तो आलेला होता. हे अर्थातच १६९९ ला माहीत नव्हते. डिमॉसपासून दूर जायचे या एकाच भावनेने प्रेरित होऊन ती दिशा बदलू लागली. तितक्यातच तिला गोपने मागून धरून खेचले आणि लांब फेकले. अचानक असा हल्ला होईल याची तिला कल्पनाच नव्हती. पण आता गोपने चूक केलेली होती. १६९९ ने त्याला एक मोठा शॉक देऊन अद्दल घडवली. गोप बेशुद्ध पडला. आता १६९९ मुखत्यार होती विश्वात कुठेही तो प्लॅटफॉर्म न्यायला!

मात्र आता वेग खूपच कमी होता. दिशा बदलली तरी डिमॉसच्याच कक्षेत आपण येत आहोत हे जाणवत होते. १६९९ जितकी हुषार होती तितकीच मूर्ख! एवीतेवी अडकणारच तर प्रिडेथ फायनल पॉईंट्स रेकॉर्डिंग तरी करू या विचाराने तिने मूर्खासारखे रेड मास्टर ऑफ केले. डिमॉसवर जाऊन गुण रेकॉर्ड करायचे आणि मग १६२२ ची वाट पाहात बसायचे असा तिचा प्लॅन होता.

प्लॅटफॉर्मला पुन्हा वेग आला. १६९९ ने बाहेर पाहिले तेव्हा मगाशी दिसणारा मंगळाचा अवाढव्य गोळा आता दूर दूर जात होता. प्रवास सुरू होता एका निर्जीवतेच्या उपग्रहाकडे! जेथे असलेले क्लोन्सही निर्जीवच होते.

तेवढ्यात १६९९ चे लक्ष आणखीन एका काचेच्या कपाटात बंद असलेल्या बटणाकडे गेले.

'इमर्जन्सी लॅन्डिन्ग ऑन मार्स'

ताडकन कशाने तरी ती काच फोडून तिने ते बटण दाबले. कर्कश्श आवाजाने नियंत्रण कक्ष आणि प्लॅटफॉर्म दुमदुमला! पुन्हा वेग धारण केला प्लॅटफॉर्मने! आणि आता तो तांबुस गोळा दुप्पट वेगाने पुन्हा जवळ येऊ लागला. डिमॉस हा उपग्रह निराश झाला असावा. कारण आज त्याला सजीवतेचे भक्ष्य मिळणार होते ते रद्द झाले होते.

इमर्जन्सी लँडिंग ऑन मार्स या यंत्रणेतील बाकीचे घोळ १६९९ ला माहीतच नव्हते. ते बटण दाबले की मंगळावरही संदेश पोचतो आणि तिथून चार नवी याने अवकाशात झेपावतात हे तिला माहीत नव्हते.

१६२२ चे यान केव्हापासूनच दिसेनासे झालेले होते. ते गुरूच्या कोणत्यातरी उपग्रहाची कक्षा टाळून इकडे येणार होते मगाशी! पण हा प्लॅटफॉर्मच मंगळाकडे चाललेला आहे म्हंटल्यावर ते निकामी झाले की काय या आनंदात १६९९ बागडू लागली.

अडाणी होती ती! १६२२ किती पोचलेला आहे याची कल्पना तिला असणे शक्यच नव्हते.

ती पाहात होती मंगळाकडे! जवळ जवळ येणार्‍या मंगळाकडे!

तितक्यात गोपला पुन्हा शुद्ध आली. तो निपचीत पडून होता. त्यला शुद्ध आलेली पाहून छद्मी हासत १६९९ म्हणाली...

"मंगळावर गेलास की इलाज करू हां? तोवर गपचूप पडून राहा... "

अचानक एक अत्यंत आकर्षक दृष्य दिसले दोघांना! मंगळाच्या एका बाजूने एक लहानसा गोल वर वर येत होता.

गोपने विचारले.

"ते... ते काय आहे???"

"फोबोज... मंगळाचा दुसरा चंद्र... मंगळाच्या पश्चिमेला उगवतो आणि ११ तासातच आपली फेरी पूर्ण करून पुन्हा पश्चिमेला उगवतो... त्याच्याचवर हायड्रोजन आणि ऑक्सीजन एकत्र करून ते पाणी फवारण्याची यंत्रणा आहे... "

"फोबोज.. म्हणजे??"

१६९९ मागे वळून गोपकडे पाहात खदाखदा हासली. एखाद्या चेटकिणीसारखी दिसत होती ती आत्ता!

"फोबोज म्हणजे पॅनिक.. पॅनिक... भीती... भय... "

गोपने पुन्हा पुटपुटत रामरक्षा सुरू केली. पण यावेळेस १६९९ त्यावर वैतागली नाही. ती बघत होती एखाद्या सुंदर बिंदूसारख्या दिसणार्‍या लांबवर असलेल्या फोबोजकडे! कृत्रिम पाण्याच्या प्रचंड साठ्याकडे!

"पृथ्वी कुठंय?"

गोपचा तो प्रश्न ऐकून खरे तर १६९९ उत्तर देणार नव्हती. गोपला पृथ्वी दिसूच नये असे तिला वाटत होते. पण झाले असे की प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिने पटकन एका दिशेला पाहिले.

प्रशांत आणि अटलांटिक महासागरामुळे मिळालेला निळा रंग असलेला त्या दृष्य अवकाशातील तो एकमेव आकाशी रंगाचा ठिपका! अवघ्या अवकाशातील सर्वात सुंदर ठिपका!

"पृथ्वी कुठली आली इथे?... आपण उलट्या बाजूला आहोत"

असे वळून म्हणणार्‍या १६९९ ला हात जोडून काहीतरी पुटपुटणारा गोप नेमका पृथ्वीकडेच पाहात आहे हे दिसल्यावर तिच्यातील द्वेषभावना पुन्हा जागृत झाली. ति गोपला पुन्हा अद्दल घडवणार तितक्यात...

... भयानक आवाज करत..

बाहेर काहीतरी आल्यासारखे जाणवले..

आणि केवळ दोन क्षणातच... सहा माणसे आत आली...

१६९९ ला त्यांनी घेरले आणि तिच्यावर शस्त्र रोखले...

त्यातल्या एकाने तिची गुणांची चीप हातात घेतली तशी १६९९ अभद्र आक्रोश करू लागली.

इमर्जन्सी लॅन्डिंग ऑन मार्स या बटनाचा प्रताप होता तो! चार याने आणि त्यातून सहा माणसे आलेली होती. चारही यानांना असलेल्या यंत्रणेमुळे ती याने व हा प्लॅटफॉर्म शुन्य गतीने एकाच ठिकाणी थांबलेला होता.

आक्रोश करत असलेल्या १६९९ ला पाहून सगळेच तुच्छ लेखत हासत होते तिला! ती आता एखाद्या हडळीसारखी विद्रूप दिसू लागली होती. तितक्यातच एक जण म्हणाला. तो बहुधा नेता असावा त्या इतर पाचजणांचा!

"१६२२ आणि एजंट्स असोसिएशनने पॉईंट्सची चीप जप्त करायला सांगीतलेली आहे.. तुझी केस पूर्ण होईस्तोवर ही चीप अशीच आमच्याकडे राहील... "

१६९९ ला बांधून ठेवण्यात आले. तिच्याकडच्या सगळ्याच चीप्स जप्त करण्यात आल्या. आता तिच्या मनातील प्रत्येक विचार सगळ्यांना समजत होता. त्यामुळे सावध होऊन तिने मानवजमातीची प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली.

"६४२ ही माझी गॅलक्सी आहे. ६४२ मधील सर्व नागरिक हे माझे बंधुभगिनी आहेत..." वगैरे!

या प्रतिज्ञेमुळे तिचे विचार नीटसे समजेनासे झाल्यामुळे एकाने तिला फटका लावला. तेव्हा गोपने त्यांना सांगितले की एका एकट्या बाईला मारता काय! त्यामुळे ते सर्व चूपचाप बसले.

खरे तर १६९९ ने अख्ख्या मानवजमातीचाच गुन्हा केलेला होता. सगळ्यांना फसवलेले होते तिने!

काही मिनिटातच बाहेर बराच हल्लकल्लोळ ऐकू आला. गोपने उठून बसून पाहिले तर चक्क...

... आयर्न ऑक्साईड!

मंगळ आलेला होता.

सर्वांनी मंगळून घेतले.

आत एका हॉलमध्ये सर्वजण जमलेले होते. आश्चर्याचा तीव्र धक्का म्हणजे १६२२ तिथेच उपस्थित होता. मात्र त्याचे स्थान आज सर्वोच्च नव्हते. सर्वोच्च स्थानावर होता एक एजंट! त्या एजंटचे नाव होते ८२६!

सगळे जमा झाले. १६९९ ला जखडून पेश करण्यात आले. गोपला एका आरामदायक खुर्चीवर बसवले होते. त्याची बडदास्त चांगली होती. अजूनही ते सगळे त्याला ८०-११ चाच अंश समजत होते.

८२६ बोलू लागला.

८२६ - मी... मंगळावरील अपव्यवहार, भ्रष्टाचार, फसवणूक, शब्द न पाळणे, वाईट हेतून भलावण करणे या संबम्धीत असलेल्या गुन्ह्यांसाठीचा सर्वोच्च एजंट ६४२०००००००८२६! आमचे सर्वाधिकारी २३२ यांना नमन करून.. ही केस चालवण्याची मुभा देत आहे.

एक सुनसान गांभीर्य पसरलेले होते.

१६२२ उठला. तो ८२६ समोर नमला. तसेच २३२ या सर्वाधिकार्‍यासाठी असलेल्या एका रिकाम्या खुर्चीसमोरही नमला!

बोलू लागला.

१६२२ - आदरणीय एजंट ६४२ - ८२६, आदरणीय सर्वाधिकारी ६४२ - २३२ यांचे पवित्र स्मरण करून तसेच आपल्या अधिकारांसमोर व छत्रछायेला नम्रपणे नमन करून मी माझी केस मांडत आहे.. परवानगी दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे....... '१६९९'! १६९९ ही माझी अनुयायी... प्राचीन संस्कृती संशोधन या क्षेत्रात मला आजवरचे सर्वाधिक म्हणजे दिड लाख गुण मिळालेले असून मी त्या क्षेत्रातील सर्वाधिकारी आहे.. माझ्याकडे अनेक अनुयायी असून ते ६४२ मध्ये सर्वत्र विखुरलेले आहेत व माझ्या मार्गदर्शनाखाली सृष्टीच्या रहस्यांचा अभ्यास करत आहेत.. १६९९ ही माझ्या पृथ्वी या शाखेतील एक अनुयायी.. सुरुवातीला आम्हाला तिच्यातील स्पार्क जाणवला.. धडाडीची वृत्ती व तल्लख बुद्धी यांच्या जोरावर आमच्या पृथ्वीशाखेत तिने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले... मानवजमातिसाही असलेल्या प्रत्येक कायद्याचे काटेकोरपणे पालन करून तिने स्वतःचे जवळपास साडे आठ लाख गुण आजही अबाधित ठेवलेले आहेत हा एक विक्रमच म्हणायला हवा.. पुरावा म्हणून ती आम्ही जप्त केलेली चीप आपल्यासमोर सादर केली जाईलच..

तर या १६९९ बद्दल पूर्ण विश्वास असल्यानेच आम्ही तिच्यावर ही कामगिरी सोपवली... ६४२-४६३४४ हा मानव आम्हाला सापडला त्याला आता काही वर्षे झाली... तो बेशुद्धावस्थेत होता.. आम्ही त्याला प्रिझर्व्ह केले व तो आजही जिवंत आहे.. आपल्याला माहीत आहेच की हा मानव जिवंत आहे हा एक चमत्कारच आहे... कारण तो आठ हजार वर्षे जिवंत आहे... पण आता सगळ्यांनाच ते रहस्य समजलेले आहे की तो कसा काय जिवंत राहिला असावा.. हा मानव, म्हणजे ४६३४४ हा कुणी साधासुधा मानव नसून तो चक्क ८०-११ या आपल्या महान संतांचा अनुयायी आहे.. म्हणूनच तो इतका प्रदीर्घ काळ आजच्य मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी जिवंत राहिला...

या मानवाबद्दल ही अध्भुत माहिती नसताना आम्हाला तो एक सामान्य मानवच वाटत होता.. त्यामुळे प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी त्याला आम्ही येथेच, म्हणजे मंगळावर आणलेले होते... पण काही कारणारे पृथ्वीवासीय व मंगळवासीय यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.. परिणामतः सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला माझ्या स्पेस प्लॅटफॉर्ममध्ये हालवले.. तेथेच हालवता यावे यासाठी मी कायदेशीर परवानगी काढलेली असून त्या परवानगीची प्रत आधीच आपल्यासमोर सादर केलेली आहे ही केस उभी करतानाच! तर त्याला तेथे नेण्यासाठी आम्ही आमच्यातील सर्वात कार्यक्षम व बुद्धिवान अनुयायांपैकी एक अशा असलेल्या १६९९ ला सिलेक्ट केले... तिने त्याला तेथे नेलेही...

हे दोघेही सुरक्षित आहेत असे आम्हाला समजले..

मात्र काहीतरी घोळ झाला.. संपर्कच तुटला तिथला... पहिल्यांदा आम्हाला भीतीच वाटली... पण नंतर समजले की ६३४४ या महान मानवाला शांतता हवी आहे.. पण नंतर अजिबातच संपर्क नाही म्हंटल्यावर आम्ही हवालदिल झालो होतो.. बरं.. तिथे जाणे काही अगदिच सहज नाही... अनेक परवानग्या काढाव्या लागतात.. अनेक फॉर्मॅलिटीज असतात... आणि पुन्हा तयारी... पण आम्ही त्या परवानग्याही काढल्या.. शेवटी काहीच संपर्क होत नाही म्हणून मीस्वतः तिथे गेलो तर ४६३४४ यांनी मला आदेश दिला की ते सुखात आहेत व मी तिथून निघून जावे.. म्हणून मी निघून आलो.. पण येताना मी रिमोटने तेथील यंत्रणेत काही बदल केले आदरणीय ८२६"

हे वाक्य ऐकून बांधलेल्या १६९९ च्या चेहर्‍यावर न बघावेत असे हिंस्त्र भाव आले व ते भावही एका कॅमेर्‍याने टिपले.

८२६ - पुढे बोला..

१६२२ - तर पुढे... त्या यंत्रणेमार्फत मला असे समजले की ४६३४४ हे स्वखुषीने तेथे राहात नसावेत.... म्हणून मी पुन्हा निघण्याची तयारीऑ केली तितक्यात....

८२६ - ....??

१६२२ ने मान खाली घातली..

८२६ - तितक्यात काय १६२२??

१६२२ - सर... तितक्यात माझ्या त्या प्लॅटफॉर्मवर .... ६४१ चा..एक... मानव आला.... सर...

८२६ चा चेहरा रागाने लालबुंद झाला..

८२६ - ते आम्हाला माहीत आहेच... पण... तो तुझ्याच प्लॅटफॉर्मवर आला याचा अर्थ...

१६२२ किंचाळला..

१६२२ - नाही नाही... मी फितुर नाही सर... प्लीज ऐकून घ्या.. आपण सर्वज्ञनी आहात...मी खोटारडा असतो तर आपल्याला लगेचच समजले असते...

८२६ - पुढे बोल...

१६२२ - तर सर.. त्या ६४१ वाल्याला पकडण्यासाठी... आम्ही या यानांमधून निघालो.... तितक्यात जाणवले की तो बहुतेक सूक्ष्मरुपाने पळून गेला..

८२६ - हे तू.. गुरू आणि शनीवर कळवलेस....???

१६२२ - पार नेपच्यूनपर्यंत कळवले सर...

८२६ - मग??

१६२२ - सर... त्याचा वेग...

८२६ ताडकन उभा राहिला आणि चवताळून म्हणाला..

८२६ - त्यांचा वेग जास्त आहे.. त्यांची ताकद जास्त आहे.. त्यांचे सगळेच जास्त आहे.. किती दशके ऐकणार आम्ही हे?? किती तयारी करतो आपण प्रगतीची... काय करता काय तुम्ही शास्त्रज्ञ???

१६२२ - माफ करा सर... पण.. प्रयत्न चालू आहेत आमचे.. तो वेग अ‍ॅचिव्ह करण्याचे...

८२६ - पुढे?? पुढे काय झाले??

१६२२ - सर... अचानक १६९९ ने ... प्लॅटफॉर्मचा मार्गच बदलला.. ती मंगळाकडे यायला निघाली आणि त्या प्रयत्नात चुकून डिमॉसकडे ओढली जाऊ लागली...

८२६ - बापरे... डिमॉसकडे?? ... मग???

१६२२ - आम्ही तिला ते सांगितल्यावर तिने पुन्हा मार्ग बदलला... पण.. नंतर तिने... इमर्जनसी लॅंडिंग ऑन मार्सचे बटन दाबले सर.. आणि.. मग इथल्या यानांनी तिला.. पकडून इथे आणले..

८२६ - ओक्के... हं... समजले आता... आता मला सांग... नक्की केस काय आहे हिच्यावर??

१६२२ ने विजयी मुद्रेने सर्व अभागृहातील उपस्थितांकडे पाहिले.

१६२२ - सर... क्रमांक एक.. ४६३४४ या महा मानवाला किडनॅप करून त्याचा आणि आमचा संपर्क नष्ट करणे... क्रमांक दोन.. ६४१ वरील एका मानवाशी फितुर होऊन त्याला ६४२ मध्ये प्रवेश देणे.. माझ्या खासगी स्पेस प्लॅटफॉर्मचा वाटेल तसा दुरुपयोग करणे... ४६३४४ या महान मानवाच्या मार्फत जास्तीत जास्त पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न करणे व पॉईंट्स मिळवणे.. जबरदस्तीने माझा प्लॅटफॉर्म मंगळावर आणणे.. संपर्क तुटल्यामुळे आपल्याला अनेक याने पाठवण्याची जबरदस्त तयारीकरावी लागणे.. असे भयानक आरोप आहेत सर १६९९ वर!

८२६ - भयानक.. खरेच भयानक.. अशा फितुरांना बोलायची संधी नाकारण्यात येत आहे.. तसेच.. ४६३४४ या महान मानवाला आमच्या संस्कृतीत चक्क कोर्टात यायला लागावे याबद्दल दिलगीर आहोत व त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बुध ते शनी येथे कोठेही वास्तव्य करता येईल याची तजवीज करत आहोत... इतर कुणाला याबाबत काही बोलायचे नसेलच असे गृहीत धरून आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की.. १६९९ ने ६४२ वरील मानवजातीचा घोर अपराध केलेला आहे व तिला या गुन्ह्याची शिक्षा म्हणून...

"थांबाSSSSSSSS"

दचकलेच अख्खे कोर्ट!

४६३४४ हा महान मानव अधिकाराने बोट दाखवून ८२६ ला गप्प करत होता. सगळेच हादरून त्याच्याकडे पाहात होते. अगदी १६९९ सुद्धा!

गोप बोलू लागला.

"या बाई इतक्या चांगल्या आहेत की तुम्हाला कल्पना येणार नाही... ६४१ मधील तो माणूस मला पळवणार होता.. यांनी त्याला जखडून ठेवले.. मला त्यापासून दूर ठेवले... आणि त्याला माझ्यापासून.. नाहीतर मी आत्ता ६४१ वर असतो... यांनी मला काहीही त्रास दिला नाही... उलट सतत सांगत होत्या की १६२२ पृथ्वीवर न्यायला आले होते तर आपण जायला हवे होतेत... ते इतके चांगले आहेत... आपण कशाला त्यांचा हिरमोड केलात??"

"काय???"

दचकून १६२२ एकदा गोपकडे, एकदा १६९९ कडे तर एकदा एजंट ८२६ याच्याकडे पाहात होता. संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालेले होते...

"सतत म्हणत होत्या की ... मला हे अतिरिक्त गुण नकोत.. हे मला तुमच्यामुळे मिळालेले आहेत... माझ्या कर्तृत्वावर नाही मिळाले.. माझे माझे साडे आठ लाख की काय तितके गुण मला पुरेसे आहेत.. तसेच असेही म्हणत होत्या की तुम्ही पृथ्वीशी संपर्क ठेवा... "

"एक मिनिट.. एक मिनिट.. "

१६२२ मध्ये पडला.

"मला एक सांगा सर.. असे जर होत होते तर त्यांनी प्लॅटफॉर्मची कक्षा का बदलली??"

"पृथ्वीवरून काहीतरी यान की काही निघाले म्हणून घाबरल्या त्या..."

हेही पटण्यासारखेच होते.

सगळेच अवाक झाले होते. तोवर कुणीतरी ८२६ च्या आदेशावरून १६९९ च्या दोरांच्या गाठी सोडल्या व तिला बंधनमुक्त केले..

" नाही नाही.. पण मग आमच्याशी बोलायला काय झाले??"

"एकटी बाई अवकाशात आहे म्हंटल्यावर घाबरणार नाही होय?? "

"त्यात काय घाबरायचंय?? पोचलेली बाई आहे ती...."

"अहो मी तिच्या बरोबर नाही का?? मला काही झाले तर तिला सोडले असतेत का तुम्ही??"

हेही साले पटले सगळ्यांना!

"पण मग मी आधी आलो होतो तेव्हाच माझ्याबरोबर का नाही आलात तुम्ही दोघे??"

"मला नव्हतं यायचं?? तुम्ही कोण सांगणार??"

चपराक बसली उगाचच त्या बिचार्‍या १६२२ ला!

आता ८२६ मधे पडला.

८२६ - महान मानव ४६३४४... आपल्याला असे तर नाही म्हणायचे की १६९९ निरपराध आहे??

४६३४४ - अक्षरशः तेच म्हणायचे आहे..

गोपपुढे कोण बोलणार? आता १६२२ डोळ्यांवरून बोटे फिरवून रडू लागला. कारण खोटी केस उभी केल्याबद्दल त्याला आता शिक्षा मिळणार हे निश्चीत झाले. ते जाणून गोप म्हणाला..

गोप - एक मिनिट एक मिनिट.. म्हणजे पृथ्वीचे एक मिनिट बर का?? हे कशाला रडतायत?? ह्यांचं बरोबरच आहे की?? काहीच संपर्क नाही म्हंटल्यावर मला काही झाले तर नाही आणि चुकून १६९९ यांची बुद्धि फिरली तर नाही ना या शंकेने त्यांनी सर्व प्रयत्न केले.. उलट त्यांचं कौतुक करायला हवं... १६९९ यांनी माझी अपार काळजी घेतली आहे आणि १६२२ यांनी मानवजमातीच्या भल्यासाठीच सगळे प्रयत्न केलेले आहेत...

हा आणखीन तिसराच प्रकार! आता १६२२ ओठ विलग करून हसू लागला तसे अख्खे सभागृहच ओठ विलग करून हासू लागले. हळूहळू ८२६ ही हसू लागला तसाच! मग ते पाहून.. बर्‍याच सेकंदांनी.. आपण वाचलो यावर विश्वास बसला तसे.... १६९९ ने चाचरत चाचरत आपल्या दोन बोटांनी हळूच स्वतःचे ओठ विलग करून पाहिले कुणी काही बोलते की काय... पण गोपच म्हणाला की 'बाई गं हास तू हवी तेवढी'... मग काय विचारता... सगळ्यांचेच जबडे वासले...

सभागृह 'असे आवाज न करता' हासत असतानाच अचानक खाली मान घालून गोप म्हणाला..

"आणि यांनी मला... वेळच्या वेळी.. पाणीही दिले बरं का??...आणि... शॉक वगैरेही नाही दिले मला... यांना बिचार्‍यांना निर्दोष सोडून द्या"

सगळेच स्तब्ध झाले. तशी १६९९ एक एक पाऊल टाकत बिचकत गोपपाशी आली...

तिला आता रडू येत होते.. पण.. ती डोळ्यावरून बोटे फिरवत नव्हती आता..

म्हणाली..

"दु:ख झाले की... रडताना... ..."

सगळेच ऐकत होते... ८२६ सकट....!!

गोप १६९९ कडे टक लावुन बघत होता...

घळघळा रडत १६९९ गोपच्या समोर कोसळत म्हणाली...

"दु:ख झाले की.. रडताना.. डोळ्यातून पाणी का येते ते... समजले मला.. "

गुलमोहर: 

मागच्या भागात इतकी संवेदना नव्हती.....की प्रतिसाद द्यावा!

१०००० मधली मानव जमात (अर्थात कथेतील) अत्याधुनिक असली तरी...यात 'पॉईंट्स' सिस्टममुळे खुपच घोळ जाणवत आहे.
म्हणजे खोटे बोलुन-फसवुनही 'गुण' मिळवले जातात, आणि आयुर्मर्यादा वाढवली जाते...ज्यात इश्वरी अंश मुळीच नसतो. इथे १६९९ नामक चोरालाही तेवढाच मान मिळतो, जेवढा त्याकाळातल्या खर्‍याखुर्‍या 'सदआचरण' असणार्‍या साधुसंताला मिळतो. अशा प्रकारे जगण्यालाच काय मरणालाही 'अर्थ' नाही.

ही 'पॉईंट्स' प्रणाली काही पट्ली नाही...भुषणराव..!

हे संवाद आवडले.
हे तू.. गुरू आणि शनीवर कळवलेस....???
पार नेपच्यूनपर्यंत कळवले सर>>

त्यांचा वेग जास्त आहे.. त्यांची ताकद जास्त आहे.. त्यांचे सगळेच जास्त आहे.. किती दशके ऐकणार आम्ही हे?? किती तयारी करतो आपण प्रगतीची... काय करता काय तुम्ही शास्त्रज्ञ??? >>

आणि यंत्रेणेची कार्यप्रणाली कार्यरत असतानाचे धावते वर्णन.

! अवघ्या अवकाशातील सर्वात सुंदर ठिपका! >> एक गोड स्मित उमटले. असे Happy आणि खर सांगतो एक प्रकारचा 'अभिमान' वाटला 'पृथ्वीवासी' होण्याचा.

एकुण, हा भाग आवडला 'भुषणराव'.
आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद!*

अरे?

मी मायबोलीला आल्यापासून आज पहिल्यांदाच असे होणार म्हणून वाट पाहात बसलो होतो की कादंबरी विभागात काहीही नाही. पण नेमका आपण प्रतिसाद देऊन ते होणे टाळलेत. Lol

मित्रांनो, फारश्या कुणाला यात इन्टरेस्ट नसल्यामुळे नियमीतपणे लिहीत नाही आहे. कृपया राग नसावा.

सर्व नवीन प्रतिसादकांचेही आभार!

-'बेफिकीर'!

इन्टरेस्ट नसल्यामुळे !!!!!!!!!

१० वा थोडा बोअर झाला भाग. म्हणजे, जास्त काही घड्ले नाही, पण पुढच्या भागाची वाट पहातो आहे आम्हि लोक. तुमच्या कथा ना साठि मा.बो. ला नाव घातले. तुम्हाला खुप यश मिळेल, तुमच्या कथा खुप सुंदर आणि मनाला भिडणार्या असतात,

मस्त भाग आहे हा!!! वाचला होता, पण प्रतिसाद द्यायचे राहून गेले होते, हे लक्षातच नाही आले.... आत्ता पाहिले, तेंव्हा समजले. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. Happy

भुषणराव, छान जमलाय हा भाग.... खुप खुप दिवस झाले, मायबोलिवर यायला जमले नाहि. स्प्रिंट डिलिव्हरि होति.....
आज वाचतो पुढचे सगळे भाग....... आणु नविन कादंबरि हि सुरु झालिय Happy