केशकर्तनकार म्हणून करियरला नवी संधी

Submitted by अर्चना सोंडे on 27 April, 2011 - 03:14

केशकर्तनाच्या पारंपारिक व्यवसायाकडे पाहिल्यास ह्या व्यवसायास आजही भारतात म्हणावी तशी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसून येत नाही. उत्तम केस कापण्याकरीता चांगल्यात चांगले कौशल्य आणि सजावट असलेले दुकान शोधण्याचा प्रत्येक भारतीय मानसिकतेचा प्रयत्न आपणास सर्वतोपरी पहावयास मिळतो. मात्र केशकर्तनकार बनणे (न्हावी) हा करिअर म्हणून उत्तम पर्याय ठरु शकतो अशी मानसिकता बाळगणारे पालक आणि करिअर म्हणून स्वीकारणारे तरुण फार अल्प प्रमाणात आढळतात. आजही या व्यवसायावर एका विशिष्ठ समाजाचीच मालकी परंपरा असून केशकर्तनाचा व्यवसाय हा अजुनही त्याच मागास तंत्रज्ञानाद्वारे केला जातोय. एकीकडे मागास तंत्रज्ञान आणि अकुशल कामगार तर दुसरीकडे जागतिकीकरणाने बदललेली व्यावसायिकतेची व बाजारपेठेची संकल्पना अशा कात्रीत सापडलेल्या पारंपारिक व्यवसायाला नवी दिशा व एक सकारात्मक दृष्टीकोण हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांना द्यायचा होता. व्यावसायिक-सामाजिक स्तरावर किर्ती प्राप्त करुन देण्याच्या स्वप्नाने झपाटलेला जावेद आजही नवनवीन प्रयोगात्मक कल्पनांना उजागर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय.
न्हावी या शब्दाला त्याला सामाजिक मान्यता प्राप्त करुन द्यायची होती आणि आहे. आजच्या घडीला जावेदच्या प्रोफेशनल हेअर स्टायलिंग आणि टेक्निक्स्मुळे त्याला आंतरराष्ट्रीय हेअर ड्रेसिंग जगतात मानाचे स्थान आहे. एक आंतरराष्ट्रीय ब्रॅंड म्हणून जावेद कधीच इस्टॅब्लिश झालाय.
या क्षेत्रात करियर करण्याची संधी तरुण पीढीला देण्यासाठी संपूर्ण भारतात जे.एच.एच.बी.एल (जावेद हबीब हेअर आणि ब्युटी सलोन लिमिटेड) ची शेकडो केंद्रे आहेत. त्याचबरोबर त्याने स्वतःची जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिट्यूट उभारली आहे. या इन्स्टिट्यूटमधून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन केशकर्तन व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहेत. तर मग आता तुम्ही सुध्दा केशकर्तनात करियरचा पर्याय निवडू शकता....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अर्चना , माझ्या भाचीने असाच केशकर्तनकारिचा कोर्स केला होता
त्यानंतर ती एका ब्युटी सलोन मध्ये नोकरी पण करत होती आणि उत्तम कमावत होती.
पगार आणि customers कडून उत्तम टिप्स मिळत.
आता तिने जॉब सोडला आहे. आणि ती हिंदी- मराठी मालिकांच्या कलाकारांचे केस कापायला जाते.
त्यांच्या लिस्ट वर तिचे नाव आहे. जेह्वा गरज पडेल तेह्वा ते फोन करून तिला बोलावतात.
मग तीला ज्या ठिकाणी शुटींग असेल त्या ठिकाणी जाव लागत.
मालिकेतल्या कलाकारांचे केस कापायला.या करीयर मध्ये पण उत्तम पैसा आहे.