कोकण : तर [ Ferry service ]

Submitted by भाऊ नमसकर on 22 April, 2011 - 22:55

आता कोकणात सर्वत्र पूल व्हायला लागलेत; ऐलतीर व पैलतीर याची गंमत तडीपार होतेय. तरीची होडी आता मासेमारी करूं लागलीय. माडांच्या बागेतून मुरडत, बागडत तरीकडे धावणारी पायवाट पूलाकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याला बुजून अंगावर गवत पांघरून दडत्येय. आठवडा बाजाराच्या दिवशी डोक्यावर टोपल्या घेऊन तरीची आधीची फेरी पकडायला तुरुतुरु धावणार्‍या बाजारकरणी आता टायमातली येस्टी पकडायला स्टॉपवर ठाण मारतायत. एक वेळ गावच्या इथ्यंभूत माहितीचा संदर्भग्रंथ असणारी व पिढ्यानपिढ्या दिवसरात्र तत्परतेने सेवा देणारी नदीकांठची तरवाली कुटूंबं आपली ओळखच गमावून बसलीयत. तरपर्व संपतय व त्याला तरणोपाय नाहिय; एकंदरीतच, नदीकांठचा 'रोमान्स'भरा संपर्कबिंदूच आता इतिहासजमा होतोय !

creek.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊ, नेहमीप्रमाणेच सुरेख. होडीच्या बाजूला तो आडवा दांडा जोडलेला असल्याने, होडी उलटत नसे, हो ना ? मालवणला किल्ल्यात जायला अशा तरी होत्या.
गोव्यात पूलाचा खर्च नको म्हणून सरकारच मोठ्या फेरीज चालवते. त्यात फक्त वाहनाचे तिकिट काढावे लागते, माणसं फुकट नेतात.

भाऊ ,ग्रेट .झाडांचे डीटेल्स ,एकुण वातावरण मस्त .
दिनेशदा ,टीम गोवा ,खर आहे ,मी शिवनीला अशा फेरीतून गेले आहे .

नदीकांठचा 'रोमान्स'भरा संपर्कबिंदूच आता इतिहासजमा होतोय ! >>> भाऊ Sad
नेहमीप्रमाणेच अप्रतिम चित्र, त्यातले बारकावे.. क्या बात है. ही सर्व चित्रं तुमच्या ब्लॉगवर आहेत कां?? काही मित्रांना लिंक पाठवायची असल्यास एकच लिंक पाठवता येईल.

<< होडीच्या बाजूला तो आडवा दांडा जोडलेला असल्याने, होडी उलटत नसे, हो ना ? >> होय, दिनेशदा; होडी उलटत नाही व लाटा असतील तर ती कमी हेलकावते. 'उलांडी' म्हणतात त्या होडीच्या जोडकामाला. [ मालवणला आता किल्ल्यात जायला इंजीन लावलेल्या होड्याच बव्हंशी वापरतात ]
<< गोव्यात पूलाचा खर्च नको म्हणून सरकारच मोठ्या फेरीज चालवते. >> ते 'वाफारे' गोव्याची एक खासियत आहेत ! आता कोकणात दाभोळच्या खाडीवरही दाभोळ ते वेलदूर [एनरॉन प्रकल्पाजवळ] अशी सेवा सुरू आहे.
<< ही सर्व चित्रं तुमच्या ब्लॉगवर आहेत कां?? >> भ्रमरजी, ही कोकण मालिका खास मायबोलीकरताच
केलेला प्रयत्न आहे; शिवाय, माझा ब्लॉग सध्या 'डॉर्मंट' स्थितीतच आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

मस्त. ते टॅब्लेट-पेन चं जमवलंत का?

तरीतून एकदाच फिरलेय मी मालवणच्या जवळ खोताचे जुवे म्हणून बेट आहे तिथे जायला.

चित्र बघून दादा मडकईकरांच्या कविता आठवल्या.

भाऊ...

चित्र खरोखर अप्रतीम... लहानपणी 'तारकर्ली'च्या तरी वरसून 'मालवणा'त मावशी कडे सुट्टी घालवक जाण्याची आठवण ईली...

कोकणचो विकास होणा ही काळाची गरज असली, तरी ह्या विकासासाठी 'माणुस़की, आपलेपणा...' जपणार्‍यो ह्यो नैसर्गीक गोष्टी 'विकासा'च्या नावाखाली गडप होणां, ही 'कशाची गरज' म्हणाक येयत???...

लहानपणी 'तारकर्ली'च्या तरी वरसून 'मालवणा'त मावशी कडे सुट्टी घालवक >> अगदी अगदी!!! मी गेल्लय नेवाळेत्सून देवबागात.. आणि येताना कर्लीत. तुझ्या मावशीकडे पण गेल्लय असां आठावतां रे विवेक! Happy

विवेकजी व भ्रमरजी,
आमचे माड पैलतीरी देवबागेत असल्याने तिथे जाण्या-येण्यासाठी आमची घरचीच होडी होती ; आपण म्हणता ती नेवाळीपासून अगदी तारकर्लीपर्यंतची खाडी आम्हा भावंडांची पूर्ण परिचयाची व घरोब्याची. तेवढ्या परिसरातच नेवाळी, दुतोंड, कर्ली व तारकर्ली अशा चार तरी होत्या. तारकर्लीचा पूल झाल्यापासून तिथली वर्दळ साफ रोडावली व अगदी खाडीकांठच्या उतारूंमुळेच त्या 'तरी' आता जेमतेम तग धरून आहेत.
<< ह्यो नैसर्गीक गोष्टी 'विकासा'च्या नावाखाली गडप होणां, ही 'कशाची गरज' म्हणाक येयत???... >> विवेकजी, एकदां भर पूरातून वालावलची तर पार करायचा माझ्यावर प्रसंग आला होता; नंतर अचानक खूप आजारी झालेल्या नातेवाईकाला नदीपलिकडे डॉक्टरकडे नेण्याची निकड निर्माण झाली होती; दोन्ही वेळीं 'पूल असता तर' हा प्रार्थनासदृश विचार मनात आलाच होता ! मला वाटतं विकासाची कांहीतरी किंमत मोजावीच लागते; पण जे गमावलं त्याची खंत वाटणं मात्र स्वाभाविक व गरजेचं असावं.

सुरेख!

भाऊ, चित्रातून हा इतिहास जिवंत ठेवताहात तसा शब्दबद्धही करुन टाका ना. माझ्याच आठवणी आता इतिहास झाल्या हो. काळ झपाट्याने बदलला.
त्याबद्दल खेद नाही. विकास हवाच. पण...

टीम गोवा, मी गेलोय त्यातून. पक्ष्यांचे अभयारण्य आहे ना तिथे ?

<< चित्रातून हा इतिहास जिवंत ठेवताहात तसा शब्दबद्धही करुन टाका ना. >> दिनेशदा, सूचना चांगली आहे; विचार करतो. सध्या तरी इतिहास जिवंत ठेवण्यापेक्षा माझ्या 'सिस्टीम'मधेच भिनलेलं
कोकण जरा बाहेर काढून स्वतःला कसं वाटतं तें पहावं, एवढाच स्वार्थी व संकुचित हेतू आहे ! Wink
दिनेशदा, रुणुझुणू व प्रज्ञा१२३ - धन्यवाद.

भाऊ एकदम मस्त चित्र....

उटंबर अंजर्ला आणि अंजर्ला हर्णै ह्या तरी पण बहुतेक बंदच झाल्यात आता... दापोलीतून आंजर्ल्यात कड्यावरच्या गणपतीला जायला पूर्वी तरच होती... मस्त वाटायचं त्यातून जायला.. पण दोन पूल झाल्यावर बहुतेक बंद झाली ती वाहतुक..

भाऊ, अप्रतिम चित्र. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या..

>>>मी गेल्लय नेवाळेत्सून देवबागात.. आणि येताना कर्लीत.
अगदी Happy
भ्रमर, विवेक.. कर्लीतून देवबाग, नमस असंख्यवेळा गेलो असेन होडीतून..
एकदा चांदण्या रात्री फिरायची अनिवार इच्छा आहे. स्वर्गसूख आणि काही नाही.

मी पण केलाय अश्या प्रकारचा प्रवास, मालवण जवळ मासुर्णे गावाजव़ळ भरतगड ते भगवंतगड चा तरीतून प्रवास करावा लागतो.

Bharatgad03.jpg

Pages