ऐतिहासिक व निसर्गरम्य देवपूर

Submitted by sudarshankulthe on 13 April, 2011 - 06:24

इतिहासात अनेक शूर व धाडसी व्यक्ती तसंच विरक्त-वैरागी संतमंडळीही होऊन गेली. अशा काही महान पुरुषांच्या पाऊलखुणा नाशिक जिल्ह्यातही लपून बसलेल्या आहेत. ह्या खुणा शोधून काढायच्या म्हणजे इंटेरीअरला फिरलं पाहिजे. नाशिक्च्या सिन्नर तालूक्यातलं देवपूर हे असंच एक ऐतिहासिक गाव...

....

इ.स. १७६१. १४ जानेवारीला अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्घ झालं. या लढाईत मराठ्यांचा दारूण पराभव झाला. भाऊसाहेबांनी बखरीत म्हटलं आहे की, दोन मोहोरा गळाल्या, सव्वा लाख बांगडी पिचली, चिल्लर आणि खुर्दा किती उडाला ह्याची गणतीच नाही, मराठे इतके घाबरले की झाडास बांधावे तरी झाडासहीत पळतील! अशी गत झाली. या सर्व गदारोळात दोन व्यक्ती बचावल्या. त्यापैकी नाना फडणवीस अंगाला राख फासून बैराग्याच्या झुंडीत घुसले तर महादजी शिंदे तोफेचा गोळा लागल्यानं जखमी अवस्थेत पडले होते. राणेखान हे शिंद्यांच्याच फौजेत पखालीवरून पाणी वाहण्याचं काम करीत असतांना त्यांनी तातडीनं महादजींना उचलून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांचे प्राण वाचवले. शत्रूपासून लपतछपत मैलोगणती प्रवास करत राणेखानानं महादजींना आपल्या मुलखात आणलं. मुस्लीम असूनही राणेखानानं दाखवलेल्या स्वामीनिष्ठेमूळेच वाचलेल्या महादजींनी त्यांना सरदारकी बहाल करून त्यांना अनेक बक्षिसं आणि जहागिरीही प्रदान केली. त्यात सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते या गावांचा समावेश होता. या गावांपैकी देवनदीच्या किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न देवपूर गावाची राणेखानानं वास्तव्यासाठी निवड केली. राणेखानानं देवपूरात अनेक वास्तूंचं बांधकामं केलं. संपूर्ण देवपूराला कोट बांधून त्यात दिवाणखाना, नगारखाना, कबुतरखाना, दारुखाना, मशीद आणि मंदिरंही बांधली. गावाला लगटून असलेल्या देवनदीच्या पलिकडच्या तीरावर कोट बांधून तिथं बडाबाग नावाचं शाही कब्रस्तान बनवलं. या बडाबागेतच आज आपल्याला राणेखानाची भव्य कबर बघायला मिळते.

नाशिक-सिन्नर-शिडीर् मार्गावर सिन्नर पासून साधारण बारा-पंधरा किमी अंतरावर देवपूरचा फाटा फुटतो. ह्या फाट्यावरनं चार किलोमीटर आत गेलं की आपण देवपूरला पोहोचतो. गांव तसं छोटं. गावातल्या घरांना असणारे दगडी चिऱ्यांचे ओटे, पुवीर्चे जुने दरवाजे, भिंतीतले कोनाडे असं सर्व नजरेत पडल्यावर गावाच्या ऐतिहासिकतेची जाणीव होते. गावातच राणेखान वास्तव्यास होता ती हवेली आजही आहे. हवेलीचं दगड विटांचं मजबूत बांधकाम आपल्याला आकर्षूण घेतं. हवेलीच्या समोरच सुंदर दगडी कमान असलेलं अजून एक बांधकाम दिसतं. एक पुरातन मशीद आणि तिला खेटूनच हनुमानाचं मंदिर आहे. राणेखानाच्या काळात कुठलाही जात-धर्म भेदभाव नव्हता असं गावकरी सांगतात. हवेली बघायची. पण सद्यस्थितीला ही हवेली अतिशय मोडकळीस आलेली आहे, किंबहूना आता तिचे फक्त अवशेषच उरलेले दिसतात. मोठं प्रवेशव्दार, दगडी कमानी, भिंतीतले कोनाडे, शिल्लक राहिलेल्या खांबांवरची डिझाईन्स, हे बघतांना राणेखानाच्या ऐश्वर्यसंपन्न हवेलीची कल्पना येते. राणेखानाच्या कर्त्तृत्त्वाची ओळख सांगणाऱ्या या वास्तूंची त्यांच्या वंशजांनी मात्र काळजी वाहिलेली दिसत नाही. शासन आणि गावकऱ्यांकडूनही या वास्तूंच्या पदरी उपेक्षाच पडलेली दिसते. नजीकच्या काळापर्यंत हवेलीत विड्या वाळण्याचा कारखाना चालायचा त्यानंतरही गोडाऊन म्हणूनही वापर झाला असं कळतं. हवेलीतील ग्रंथसंपदा, जुनं उंची फनिर्चर, मोठाल्या कारंज्यांचे संगमरवरी नक्षीदार दगड आणि मौल्यवान वस्तूही पळवण्यात आल्यात. आता तर काही ठिकाणी हवेलीचं लाकूड आणि चिरेही बांधकामासाठी काढले गेलेत. असो, ज्यांनी ह्या वास्तूंची रचना करून इतिहास केला त्याच इतिहासात या वास्तू नष्ट करणाऱ्यांचंही नांव लिहिलं गेलं पाहिजे. पुढच्या पिढीपासून या वास्तू वंचित ठेवणाऱ्यांनी मात्र राणेखानाच्या कबरीला तेवढं सोडून दिलंय. कदाचित तिथून काही संपत्ती मिळणार नसावी!
गावाच्या पलिकडे देवनदीच्या किनारी कोट बांधलेला दिसतो त्यात शाही कब्रस्तान आहे. यात राणेखानाच्या अम्मी-आब्बा आणि त्याच्या पदरी असलेल्या नर्तकीच्याही कबरी आहेत. राणेखानाची कबर हे अत्यंत देखणं बांधकाम आहे. आठ-दहा फुट उंचीच्या ओट्यावर ही भव्य कबर उभी आहे. पुवेर्कडे तोंड असलेल्या या इमारतीच्या चारही बाजूंना कोरीव दरवाजे असून भिंतीतले कोनाडे, नक्षीदार वेलबुट्टी, खिडक्या, छतावरील घुमट आणि मिनार असा हा वास्तूकलेचा सुंदर नमुनाच आहे. २२ डिसेंबर १७९१ ला राणेखान अल्लाहला प्यारे झाले. या जुन्या वास्तू आजही त्यांच्या स्मृती जागवतात. पास्ते गावाजवळचं माळरान आजही राणेखान कुरण म्हणून ओळखलं जातं. राणेखानाला माथा टेकवायचा. नदीकाठचा कोट आणि त्याचं प्रवेशद्वार बघायचं. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत जर कधी आलात तर या परिसरात भरपूर संख्येनं असलेले मोर नृत्य व गुंजारव करतांना दिसतात. त्यामुळे वास्तूकार तसेच इतिहास तज्ञांबरोबरच पक्षीमित्रांसाठीही देवपूरची भेट अनोखी ठरू शकते.

देवपूर गावात बाबा भागवत नावाच्या महान संताचं समाधीस्थळही आहे. या समाधीस्थानाची वास्तूही छान आहे. जुनं लाकूड आणि विटांनी बांधलेल्या इमारतीत बाबा भागवतांची समाधी असलेला पवित्र गाभारा, गाभाऱ्या समोरचं सभामंडप, लाकडी छत आणि उंची झुंबरं असं हे देऊळ सजलेलं आहे. या समाधी मंदिराची देखभाल आणि सेवाकार्य त्यांचे सातव्या पिढीतले वंशज ह.भ.प. दिगंबर महाराज बघत आहेत. बाबा भागवतांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. दिगंबर महाराजांकडून भागवत बाबांची महती आणि इतिहासही कळतो. मुळच्या नगरसूलला राहणाऱ्या महादेवबुवा व त्यांच्या पत्नी उमाबाई हे कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जात असतांना गरोदर असणाऱ्या उमाबाईंना अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या, तेव्हा रस्त्यात असणाऱ्या देवपूर गावी त्यांना पुत्र जन्माला झाला. हाच पुत्र पुढे महान संत बाबा भागवत म्हणून नावाजला. प्रपंचात राहूनही बाबांनी परमार्थ साधला. गोरगरीब, शेतकरी, कष्टी जनता यांना मदत करण्यात त्यांनी आपलं आयुष्य खचीर् पाडलं. त्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कानावरही बाबा भागवतांची ख्याती पोहोचली. पेशव्यांनी या भागातल्या त्र्यंबकराव डेंगळ्यांच्या हस्ते बाबांसाठी त्या काळात दोन हजार रुपये व वस्त्रं पाठवून दिले, असाही उल्लेख आहे. बाबा भागवतांनी मात्र हे दान जनतेच्या कल्याणासाठी लावून दिलं. बाबांच्या जीवनातले अनेक चमत्कारिक प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतात. वावीचे शाहीर संत परशराम हे बाबा भागवतांचे शिष्य. पेशव्यांच्या काळात अय्याशीचं वातावरण असल्यानं जनता भजन-किर्तनात रमत नाही असं बघून बाबांनी परशरामाला लावण्या व शाहिरी करून त्यातून जनजागरण कर असं सुचवलं आणि परशराम हे शाहीर म्हणून प्रसिद्घ झाले. चैत्र वद्य तृतीया ही बाबा भागवतांची निर्वाणतिथी. या दिवशी इथं मोठी यात्रा भरते. पूवीर् नाशिकमधली सर्वांत मोठी यात्रा भरायची त्यात एक हजार बैलगाड्या यायच्या असं सांगितलं जातं. अशा एकेक आठवणी, प्रसंग, उल्लेख देवपूरशी जोडलेले आहेत. त्यामूळे देवपूर भेट संस्मरणीय ठरते. नाशिकहून शिडीर्ला जाताना थोडं आडबाजूला वळून देवपूर भेट करायला हरकत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुदर्शन, मला वाटतं बखरीतला उल्लेख "दोन मोत्ये गळाली" असा आहे.
आणि मोरांचा तो केकारव, या बारीकश्या चूका, नजरचुकीने झाल्या असतील.
बाकि लेख छान आहे.