कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा

Submitted by छाया देसाई on 9 April, 2011 - 08:21

राधा न ती ,ना राहिला तो श्याम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा

सातत्य नाही राहिले संजीवनी ना राहिली
संकल्प डगमगता तसा ना ठाम पहिल्यासारखा

पर्वा कुणाची ना कुणा जो तो मनस्वी या इथे
आता कुणी ना होतसे बदनाम पहिल्यासारखा

सत्यात नजरेआडची स्वप्नेच स्वप्ने राहिली
स्वप्नात खासा भासतो विश्राम पहिल्यासारखा

आता कुणी ना सोडवे ते प्रश्नही रस्त्यावरी
होतो कुठे शहरात चक्का जाम पहिल्यासारखा

उठतो उशीरा सूर्यही येताच संध्या बावरे
छाया प्रकाशाचा नसे मुक्काम पहिल्यासारखा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पर्वा कुणाची ना कुणा जो तो मनस्वी या इथे
आता कुणी ना होतसे बदनाम पहिल्यासारखा>>> व्वा! मस्त!

आता कुणी ना सोडवे ते प्रश्नही रस्त्यावरी
होतो कुठे शहरात रस्ता जाम पहिल्यासारखा>> चांगला शेर! (रस्त्यावरीही प्रश्न ते असे करून वाचून पाहिले)

(अवांतर - जाम हा शब्द मराठीत 'जाम वैताग आला' अश्या अर्थाने वापरला जाणे, हिंदी / उर्दूत मद्यप्याला या अर्थाने आणि इंग्रजीत 'अडकलेला' या अर्थाने यापैकी या नवीन तरही उर्दू व इंग्रजी अर्थाने तो वापरला गेल्याचे दिसते. प्राजू यांनी उर्दू अर्थाने वापरला आहे. अर्थात, मराठीतला 'जाम वैताग' हा 'जाम'ही मराठी नाहीच, असे वाटते. नक्की माहीत नाही.)

मक्त्याबाबतः. त्यातील 'छाया' हा शब्द 'प्रकाशाचा' या शब्दापासून स्वतंत्र लिहून / वाचून पाहिला.

तसेच, त्यातील पहिला मिसरा मला लक्षात आला नाही. कृपया सांगावेत.

(ही आपली माझी वैयक्तीक मते आहेत व केवळ चर्चा म्हणून दिली. चुभुद्याघ्या.)

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल सर्वांची आभारी आहे .
बेफिकीरजी योग्य ते बदल केले आहेत .आपल्या अमुल्य सुचनासाठी विषेश आभार.
मक्त्यातल्या पहिल्या मिसर्‍याचा अर्थ असा की सूर्य[अभिप्रेत अर्थ -कर्ता पुरूष्]आता पहिल्यासारखा राहिला
नाही .त्याच्या आचरणात शिथीलता आली ,सांजवेळी तोच बावरू लागला.

छान गझल.

छाया,

बेफिकीरांना मक्त्यातल्या पहिल्या मिसर्‍याचा अर्थ कळाला नाही असे म्हणायचे आहे. मलाही तेच वाटले.

पर्वा कुणाची ना कुणा जो तो मनस्वी या इथे
आता कुणी ना होतसे बदनाम पहिल्यासारखा

बहोत बढिया ...

सुंदर गझल

उठतो उशीरा सूर्यही येताच संध्या बावरे
छाया प्रकाशाचा नसे मुक्काम पहिल्यासारखा

हे तुम्ही माझ्या मनातलं लिहिलं आहे. सुरेख गजल.