असा ही वाढदिवस.

Submitted by शोभा१ on 7 April, 2011 - 07:11

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक विशेष उत्साहाचा दिवस. दिवस उजाडला की नविन कपडे घालून थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने दिवस न्हाउन निघायचा. मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांच्या शुभेच्छा मनमोकळेपणाने मिळायच्या. त्यावेळी भेटवस्तुंपेक्षा शुभेच्छा जास्त मोलाच्या होत्या. घरातली आई, आजी, ताई औक्षण करुन सगळ्यांना नमस्कार करायला लावायच्या. मंदिरात जाउन देवाचा आशिर्वादही घेउन यायचा. आई घरात काहीतरी गोड्-धोड आवडीच जेवण करणार असे मंगल आणि पवित्र वातावरण माझ्या डोळ्यांसमोर येते.

पण हल्ली वाढदिवसाचे स्वरूप पलटले आहे. आता वाढदिवस म्हटलं कि डोळ्यांसमोर झगमगते रंगीबेरंगी फुग्यांनी, फुलांनी, पताकांनी सजवलेला हॉल. स्वतःची श्रिमंती व मॉडपणा दाखवण्यासाठी आडव्या तिडव्या फॅशन करुन मराठीला कमीपणा देत सतत इंग्लिश फाडणारया बायका-पुरुष. ह्यात सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे क्रीमची सजावट केलेला मोठ्ठा केक, मेणबत्त्या पेटवून त्या विझवणे. आपली संस्कृती खर तर दिवा लावण्याला महत्व देते. म्हणुन इथे सगळं उलटंच.)नंतर इंग्रजी गाण्यावर ते केक कापणं, आणि केक एकमेकाना भरवताना तोडाला फासायचे. त्या केकेची नासधूस, सगळयांच्या तोंडावर, कपडयांवर, पायाखाली, सर्वत्र केकच साम्राज्य, आणि हे कमी म्हणून कि काय,थम्सअप उडवणे, आणि नंतर विविध खाद्यपदार्थ(आकडा न सांगणेच बरे)भरपूर घेऊन, एकमेकांना आग्रह करून, जास्त झाले म्हणून टाकून देणे. मनात असता, नसताना, हसून एकमेकांची स्तुती करणे, आणि खाऊन-पिऊन, नाचून पार्टी करणे. बाहेर पडल्यावर, (कधी कधी तिथेच) दुसरयांबद्दल कुत्स्तीत बोलणे,(यजमानाबद्दलही) खाण्याचा पदार्थाना नावे ठेवणे, (खाल्या मिठाला न जागणे) थोडक्यात काय? वेळ, पैसा, वस्तू, सगळ्याचा, अपव्यय. ह्याचा खर्च कमीत कमी ५०००/- रुपये तरी होत असेल (जास्तीत जास्त सांगवत नाही) (प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे वाढत जाणार.) ह्या पार्ट्या कधी कधी तीन/तीन असतात. एक पार्टी ऑफिसमधल्या लोकांसाठी, दुसरी पार्टी, आपल्या मित्र-मैत्रीणींसाठी, तिसरी पार्टी नातलगांसाठी.(आता पार्टी हॉटेलमध्ये दिल्यास हा खर्च किमान १००००/- ते १५०००/- रु. पर्यंत जात असणार.)

लहान मुलांचा वाढदिवस असेल तर घरी केक (औक्षण तर नसतच.)वगैरे आणून पार्टी(सोसायटीतल्या मित्र-मैत्रीणींसाठी.) वर्गातल्या मुलांसाठी, शिक्षकांसाठी, खाऊ, भेट वस्तू, (या रिटर्न गिफ्ट, भारीतली पेनं, लीड पेन्सिली, कंपोस-बॉक्स, पाउच, गोष्टीची पुस्तके, इ.इ.असतात.) एका तुकडीत अंदाजे ६० मुले असतात. शिक्षक, व इतर सेवक वर्ग धरून हा आकडा ७०/७५ वर जातो. प्रत्येकी १०/-रु खर्च धरला तरी ७००/७५० रु. खर्च होतात. परत नातलगांसाठी हॉटेलमध्ये पार्टी. ह्याचाही खर्च किमान ३०००/- ते ५०००/- रुपये होत असणार.(प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे वाढत जाणार.) आणि हे सर्व आपण कोणासाठी करत असतो तर, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, खायला प्यायला भरपूर आहे अशांसाठी. शाळेत मिळालेल्या भेटवस्तू, बहूतेक वेळा, वापरल्याही जात नाहीत. कारण दप्तरात सर्व वस्तू ४/४-५/५ असतात. तसेच ती वस्तू आवडलेली असते असेही नाही त्यामुळे कित्येक वेळा त्या इकडे तिकडे पडून शेवटी काचारापेटीच्या धन होतात.

मग लोक हो तुम्हीच विचार करा. असे आपण जे ५०००/- ते १००००/- रु. (घरातील एका माणसाच्या वाढदिवसाचा खर्च.) खर्च करतोय ते फक्त, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, आपण पार्टी दिली नाही तर लोक आपल्याला हसतील, कंजूस म्हणतील, किंवा आता हे बंद कस करायचं, यासाठीच करतो.याचवेळी काही माणसाना, काहीही खायलाही मिळत नसते. नेसायाला पुरेशे वस्त्र नसते. उपाशी पोटी, (कधी अर्धपोटी) अर्ध वस्त्रात, ही माणसे आपले जीवन कंठत असतात. आणि जगणे अशक्य झाले कि मरत असतात. आपण जर हे खाणे अशा लोकाना दिले तर त्यांची भूक भागेल. आपण जो हा अवाढव्य खर्च करतो, तो न करता या लोकाना कपडे, पांघरुण दिले तर त्यांची ती गरज तरी पूर्ण होईल. याच ५०००/-ते १००००/- त्यांच्या कितीतरी गरजा आपण पूर्ण करू शकू. एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात, वगैरे ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांसाठी जर आपण हा खर्च केला तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा केव्हाही तुम्हाला मिळालेल्या भेटींपेक्षा, वाढदिवसाची मिळालेली अमूल्य भेट असेल.

माझी कळकळीची विनंती आहे, आपण या गोष्टीचा जरूर विचार करावा. आपल्याबरोबर बाकीच्यानाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा. ज्यांची मुले आता शाळेत जाऊ लागणार असतील, त्यांनी प्रथम पासूनच शाळेत भेटवस्तू, खाऊ वाटणे चालू करू नये. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांनाच अनाथाश्रमात,
वृद्धाश्रमात घेऊन जावे व तेथे खाऊ/ वस्तू वाटप करावे. म्हणजे मुलांवरही चांगले संस्कार होतील. रंजल्या-गांजल्याना मदत करावी हे कळेल. (गरीबानाही चांगली वागणूक देतील.) आणि पैशाचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्या लक्षात येईल.

परकीयांचे अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतो. त्यांचे वाईट गुण आपण हमखास घेतो. पण त्यांच्याकडे असलेले गुण दिसू नयेत म्हणून डोळे झाकून घेतो. ते लोक मात्र आपले चांगले गुण घेत असतात. त्यांचे दातृत्व हा सद्गुण आपण नक्की स्वीकारू या. आणि आपल्या देशाच्या (खरंतर
घराच्या)सुधारणेत खारीचा वाटा उचलूया.

प्रतिक्रिया जरूर लिहा. फक्त स्वत:च्या मनापासून लिहा. दुसरयाला खिजवण्यासाठी, एकमेकांवर शिंतोडे उडण्यासाठी, वाद घालण्यासाठी, कोणी प्रतिक्रिया देणार नाही ही आशा आहे.
असो सुज्ञास जास्त सांगणे न लगे.

गुलमोहर: 

सध्याची वाढदिवस साजरी करण्याची पार्टी पूर्ण चूक आहे असं म्हणता येणार नाही, ते व्यक्तिसापेक्ष आहे. कारण तो ट्रेंड झालाय आजकालचा. लोकांकडे पैसे ही खूप झालेत त्यामुळे फक्त अशाच प्रसंगांमधून पैसे/दागिने/साड्या यांचे प्रदर्शन करता येते, त्यामुळे अगदी वादि/मुंजी पासून ते बारश्यांपर्यंत सर्व काही झोकात केले जाते. बँडबाजा डॉल्बी सुद्धा आजकाल या कार्यक्रमांचे सहभागी झाले आहेत. पैशाचा अपव्यय होतो हे खरं आहे, पण यात यजमानांना एक 'फिल गुड' फॅक्टर असतो तो समाधान देतो, बाकी काही नाही. लोक येतात, खातात्-पितात कुल्ल्यांना हात पुसतात निघून जातात. दुसर्‍या दिवशी दुसर्‍या प्रदर्शनात नाचायला मोकळे.

माझी कळकळीची विनंती आहे, आपण या गोष्टीचा जरूर विचार करावा. आपल्याबरोबर बाकीच्यानाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा. ज्यांची मुले आता शाळेत जाऊ लागणार असतील, त्यांनी प्रथम पासूनच शाळेत भेटवस्तू, खाऊ वाटणे चालू करू नये. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांनाच अनाथाश्रमात,
वृद्धाश्रमात घेऊन जावे व तेथे खाऊ/ वस्तू वाटप करावे. म्हणजे मुलांवरही चांगले संस्कार होतील. रंजल्या-गांजल्याना मदत करावी हे कळेल. (गरीबानाही चांगली वागणूक देतील.) आणि पैशाचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्या लक्षात येईल.

अनुमोदन. पण असे करणारे लोक स्वतःचे अनुभव लिहीतील याची शक्यता कमी वाटते.

अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईटच. मात्र निव्वळ आदर्श संस्कारांच्या जोडीला आजूबाजूच्या वातावरणात मुलांना चटकन मिसळता यावं याचे संस्कारही गरजेचे आहेत. मुलांच्या वयाचा विचार करता समवयस्कांबरोबर मौजमजा हा भागही गरजेचा आहे. त्यातूनच मुलं चलाख बनत जातात. दोन्हीचा ताळमेळ राखणे हे केव्हाही चांगले..

लेखाला १००% अनुमोदन....प्रत्येकानी स्वतःपासूनच सुरुवात केली तर काहीच अशक्य नाही.

या सगळ्याची जाणीव आजकाल बहुतांश लोकांना असतेच. शाळेत वर्गातल्या एखाद्याने अशी पार्टी दिली , की इतरांनाही छोट्या-मोठ्या प्रमाणात का होईना पण पार्टी करावीच लागते. बरं.... कोणाचं काही ठेवायला नको.....म्हणत गिफ्टला रिटर्न गिफ्टपण होतात. मोठ्यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही.

थोडक्यात काय, तर प्रत्येकाचं....कळतंय, पण वळत नाही असं झालंय. Happy

थोडक्यात काय, तर प्रत्येकाचं....कळतंय, पण वळत नाही असं झालंय.

अनुमोदन

आम्ही आपलं औक्षण करुनच वाढदिवस करतो. केक एवजी पेढे आणतो.

खुप छान विचार.
' परकीयांचे अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतो ' - या वाक्याशी सहमत
पुढे जाऊन मी असे म्हणेन की आपण वाढदिवस आपल्या जन्म तिथी प्रमाणे साजरा करायला पाहिजे. माझ्या ब्लॉगवर ' वाढदिवसा दिवशी म्हणायची प्रार्थना ' लिहिली आहे. ती जरूर वाचावी

अमोल केळकर

शोभा, छान लिहीलं आहेस, आणि तुझ्या विचारांनाही संपूर्ण अनुमोदन.

>>आपली संस्कृती खर तर दिवा लावण्याला महत्व देते. म्हणुन इथे सगळं उलटंच.
अगदी अगदी. जे जे पाश्चात्य ते ते छान, आणि जे जे भारतीय ते ते त्याज्य अशी फ्याशन आहे हल्ली.

भावना कळल्या पण लेख तेवढा पटला नाही. हाच युक्तिवाद लग्न, गणेशोत्सव, भारी गाड्या, उंची कपडे कशाबद्दलही करता येउ शकतो. आणि आपल्या लहानपणीच्या गोष्टिंशी तुलना करण्यात काही अर्थ नाही. (याच नाही तर कुठल्याही विषयात!)
दक्षिणाला अनुमोदन. >> ते व्यक्तिसापेक्ष आहे.
मितला अनुमोदन >> प्रत्येकानी स्वतःपासूनच सुरुवात केली तर काहीच अशक्य नाही.
शाळकरी मुलांमधे एक peer pressure मुळे काही गोष्टींना कधी कधी पर्याय नसेलही पण मोठ्यांनी इतर लोकं करतात म्हणून पार्ट्या करणं पटत नाही. (तुम्हाला आवडत असतील तर जरूर करा... )

आपल्याकडे वाढदिवसाच्या औक्षणाच्या वेळी पण पाळायच्या काही प्रथा आहेत. उदा. डोक्यावर कापुस टाकणे, त्या परत आणायला हव्यात.
खर्चाच्या किंवा वाढदिवस साजरा करण्याच्या बाबतीत अनुकरण कोणाचे करायचे याचे मार्गदर्शन मूलांना करणे गरजेचे आहे. वाढदिवसाला जर आईवडीलांनी काही वेगळे केले, तर त्याचा अभिमान कसा बाळगायचा. इतरांशी तुलना करणे कसे टाळावे, हे पण समजावून सांगावे लागेल. निदान पाचव्या वर्षानंतर तरी हे होणे गरजेचे आहे.

शोभा लेख छानच लिहला आहे तुम्ही Happy

<<अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईटच. मात्र निव्वळ आदर्श संस्कारांच्या जोडीला आजूबाजूच्या वातावरणात मुलांना चटकन मिसळता यावं याचे संस्कारही गरजेचे आहेत. मुलांच्या वयाचा विचार करता समवयस्कांबरोबर मौजमजा हा भागही गरजेचा आहे. त्यातूनच मुलं चलाख बनत जातात. दोन्हीचा ताळमेळ राखणे हे केव्हाही चांगले..>> अनुमोदन Happy

दिनेशदांना अनुमोदन Happy

<<ज्यांची मुले आता शाळेत जाऊ लागणार असतील, त्यांनी प्रथम पासूनच शाळेत भेटवस्तू, खाऊ वाटणे चालू करू नये. >> अनुमोदन
<<आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांनाच अनाथाश्रमात,
वृद्धाश्रमात घेऊन जावे व तेथे खाऊ/ वस्तू वाटप करावे. म्हणजे मुलांवरही चांगले संस्कार होतील. रंजल्या-गांजल्याना मदत करावी हे कळेल. (गरीबानाही चांगली वागणूक देतील.) आणि पैशाचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्या लक्षात येईल.>> शोभा हे अगदी मनापासून पटले Happy पण हे दिनेशदांनी म्हटले तसे मुलांमध्ये हे पाच वर्षानंतर नक्कीच शक्य आहे.

>> >>आपली संस्कृती खर तर दिवा लावण्याला महत्व देते. म्हणुन इथे सगळं उलटंच.
अगदी अगदी. जे जे पाश्चात्य ते ते छान, आणि जे जे भारतीय ते ते त्याज्य अशी फ्याशन आहे हल्ली.

<<< हे टोकाचं विधान नाही का झालं?

पूर्वी देखिल वाढदिवशी सूवर्णतुला करत, त्यात दानाचा भाग किती नि शो-ऑफ किती होता? वाढदिवशी सत्यनारायण किंवा दुग्धाभिषेक असे कार्यक्रम करून गरीबाला काही देतो की काय? दूध वाया जातं ते जातंच. आणि उजव्या हातानं दिलं तर डाव्याला कळू नये ना? मग त्याचे कार्यक्रम कशाला?

समाज अनेक लोकांचा, आर्थिक आणि सामाजिक स्तरांचा आहे. असे कसे ठरवलं तुम्ही की जे केक कापून साजरा करतात ते औक्षण करत नसतील? आणि मेणबत्ती विझवतो त्याचा दीपप्रज्वलनाशी काय संबंध.. मेणबत्ती नि निरांजन सारखच की काय?

माझी लेक सध्या ४ वर्षाजवळ आहे, तिच्या बर्‍याच मित्र मैत्रिणींच्या पालकांशी बोलते तेंव्हा जाणवणार्‍या गोष्टी -
१. बरेचदा तिथीनुसार वाढदिवशी, औक्षण, घरगुती गोडधोड, जवळपासचे नातेवाईक असा वाढदिवस साजरा करतात. मग मोठ्यांचे आशिर्वाद, देवळात जाणं वै. रितसर होतच. संस्कृती र्‍हास वै. होत नाही.
२. ठाण्यातल्या काही शाळा मुलांना चॉकलेट अथवा भेटवस्तू देऊ नका असेच सांगतात. त्याऐवजी, सूका मेवा अथवा बिस्कीटे वाटावीत असे सांगतात. ह्या गोष्टी अनेक असल्या तरी मुलांच्या अंगी लागतात.
३. एकाद्या नंतरच्या विकांताला मग केक, वेफर्स, पावभाजी, न्यूडल्स, समवयीन मित्र मैत्रिणी असं सेलिब्रेशनही होतं. तेंव्हा मात्र नीटशी परत भेट वै. दिली, घेतली जाते. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आपला आनंद वाटायला शिकतात ह्यातून मुलं. कुणा सवंगड्याला बरं नसेल तरी आठवणीने त्यांची परतभेट राखून ठेवणं असं मुलं करतात. वाढदिवसाच्या॑ तयारीत मुलांना सहभागी करता येतं. त्याचाही आनंद मिळतो मुलांना. बजेटनुसार मुलांना आपल्या अपेक्षांना मुरड घालावी लागते हे ही कळतं.
४. एका मैत्रिणीने जवळच्या अनाथाश्रमात ३रा वाढदिवस साजरा केला त्याचा त्या मुलीवर नकारात्मक परिणाम झाला. ह्या मुलांना इथे का ठेवलयं? ह्यांचे आई बाबा कुठे आहेत? ते त्यांना का सोडून गेले? तुम्ही पण मला सोडून जाणार का? मग आई ऑफिसला गेली की सारखी पिरपिर की आज आई घरी परत येईल ना?
५. एका मुलाचा ५वा वाढदिवस साजरा न करता त्याचा पालकांनी सामाजिक संस्थेला देणगी दिली, सेलिब्रेशनला फाटा दिला. आई वडिलांना कृतकृत्य वै., मुलानेही आधी पचवला हा बदल. पण नंतर इतर मुलांचे वाढदिवस, तुझे आई बाबा तुझे लाड करत नाहीत असे.. मे बी यु कांट अफोर्ड वै. इतकं ऐकलं त्याने की मग राग राग आणि कुढणं. माझाच वाढदिवस का? बाबाचा, आईचा का नाही? आजोंचा (६१वा) वाढदिवस आपण अजुनही केला होता ना? मग माझाच का नाही? समजावलं तरी ओरखडा उठलाच.

त्यामुळे १०-११ वर्ष, जेंव्हा मुले स्वतःबद्दल आणि कुटंबाच्या स्थिरतेबद्दल आश्वस्त असतात तेंव्हा असा उपक्रम करता येईल. आपण का असे केलय हे त्यांना नीट कळलं पाहिजे नी इतरांना ठमपणे सांगता अलं पाहिजे, नाही तर जडण घडण पेक्षा पडझडच होण्याची शक्यता जास्त.

सांगणं फार सोपं जातं की मुलांवर संस्कार वै. वै. पण मुलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा, वर्षातून एकदाच येणारा दिवस त्यांच्या आवडीनुसार साजरा केला तर काय बिघडलं? फक्त अतिरेक आणि अपव्यय टाळावा हे मात्र खरे.

शोभायात्रा काढून, आतिषबाजी करून संस्कृतीचे प्रदर्शन करणे आणि वाढदिवसाचे अवाढव्य शो ऑफ आणि अपव्यय करणं यात काहीच फरक मला तरी वाटतं नाही. त्याऐवजी दिवाळीच्या सुट्टीत जेंव्हा २-३ दिवस उत्सव असतो तेंव्हा मुलांना सेवाभावी संस्थेत नेणं. फटाके न फोडता, ते पैसे मुलांसाठी गोष्टीची पुस्तके, लेखन साहित्य असे काही घेऊन त्या संस्थेच्या वाचनालयाला देणं असे उपक्रम करता येतील आणि प्रदुषणही टळेल.

कुठचाही अपव्यय न करता पण मुलांचा आनंद हरवणार नाही हे बघून काही सामाजिक करता अलं तर बरं. म्हणजे केवळ मीच नाही तर माझे आईबाबा पण "आपला कौटुंबिक" आनंद इतर गरजूंशी वाटून घेतात हे जाणवेल.

>> शोभाताई, इतकं मोठ्ठ पोस्ट टंकलय त्याबद्दल क्षमस्व.. पण लहान मुलांनी तडजोड करायला शिकावं हे ऐकूनच कंटाळा आलाय. त्यात सांस्कृतिक र्‍हास वै. वै. पण.. अतिरेक कशाचाही करू नये नि सामाजिक भान ठेवावं.. पण ह्यात खलुभर दुधाची कहाणी विसरतात सगळे.. आधी घरच्या बालगोपाळांना द्या नि मग समाजाला द्यायला जा.
अस्थानी वाटत असेल तर सांगा मी उडवून टाकते इथून.

सर्वाना धन्यवाद.
<<<<भावना कळल्या पण लेख तेवढा पटला नाही. हाच युक्तिवाद लग्न, गणेशोत्सव, भारी गाड्या, उंची कपडे कशाबद्दलही करता येउ शकतो. >>>> हो. हे आवश्यकच आहे.
आणि आपल्या लहानपणीच्या गोष्टींशी तुलना करण्यात काही अर्थ नाही. (याच नाही तर कुठल्याही विषयात!)>>>>मी तुलना केलीच नाही. पण माझ्या मनातला वाढदिवस लिहिलाय मी.

जाईजुई, छान लिहिलय.
'खुलभर दुधाची कहाणी ' मी पण लहानपणापासून खूप वेळा ऐकलेय, त्यामुळे घरातील मुलाना काही न देता, बाहेरच्या मुलाना, लोकाना, द्या अस मी म्हटलेल नाही.
तसेच मी मुलाना तडजोड करायला सांगा अस कुठेच म्हटल नाही. फक्त वस्तूंचा अपव्यय, नासधूस टाळावी, आणि ज्याच्याकडे भरपूर आहे, त्यानाच आणखी दिल्यामुळे बहुतेक वेळा त्या वस्तूंचा ऊपयोग केला जात नाही.(हे मी स्वतः पाहिलेले आहे.) त्यापेक्षा त्याच वस्तू, ज्याना आवश्यकता आहे त्याना दिल्यास, त्याचा सदुपयोग तरी नक्कीच होईल.
शेवटी ज्याला जे पटेल, ते त्याने करावे. 'असंच वागा' असा आग्रह केलेला नाही आहे. असो.

>> फक्त वस्तूंचा अपव्यय, नासधूस टाळावी, आणि ज्याच्याकडे भरपूर आहे, त्यानाच आणखी दिल्यामुळे बहुतेक वेळा त्या वस्तूंचा ऊपयोग केला जात नाही.(हे मी स्वतः पाहिलेले आहे.) त्यापेक्षा त्याच वस्तू, ज्याना आवश्यकता आहे त्याना दिल्यास, त्याचा सदुपयोग तरी नक्कीच होईल.
<< अनुमोदन.

हे सगळे एका वयानंतर करता येईल असे मी म्हणतेय आणि त्यासाठी घरातल्या इतरांनाही आपल्या वागण्यातून हे सांगावे लागेल, एवढच.

<<<हे सगळे एका वयानंतर करता येईल असे मी म्हणतेय आणि त्यासाठी घरातल्या इतरांनाही आपल्या वागण्यातून हे सांगावे लागेल, एवढच.>>>अनुमोदन. Happy

ज्यांच्याकडे पैसे जास्त ते जास्त खर्च करतात ज्यांच्या कडे कमी ते कमी करतात........
थोडक्यात काय तर जे करायचे आहे ते करावे..प्रत्येकाला योग्य वाटते ते तो करनारच..शो ऑफ सुध्दा करावा..सगळे करावे..शेवटी तो वाढदिवस आहे..प्रत्येकाला तो साजरा करावा लागतो..प्रत्येक आई वडीलांना आपले मुल हा मोतीच वाटतो..म्हणुन हे सगळे केले तर काही वाद नसायला हवे उद्या अंबानीला म्हणाले तर तो करेल का,,?

पण........

हे सगळे करत असताना मुलांना त्यांच्या जवाबदारी ची नीट वागण्याची जाणिव करुन द्यावी...उगाच आई-बाबा वाढदिवसाला एवढे खर्च करतात म्हणुन शेफारु नये याची काळजी घ्यावी..खर्च करताना काय काय त्रास सहन करावा लागतो याची पुसट्शी जाणिव जरी दिली तरी पुरेसे असते....दुसर्यांना मदत करायला शिकवावे..मोठ्यांशी , सगळ्यांशी आदराने वागायला शिकवावे...
फक्त एवढे केले की..............

तुम्ही वाढदिवस थाटात साजरा करा या कसा ही करा........मुलांचे पाय जमीनीवरच राहतील...
.....

जाईजुई : पोस्ट आवडली आणि पटली सुद्धा.

शोभा : तुमच्या पोस्ट मधली कळकळ उमजली, पण पुर्णपणे पटली नाही. आजकालची मुलं पण बर्‍यापैकी समजूतदार झाली आहेत. या असल्या पार्ट्यांमधला पोकळपणा कळल्यावर, मुलंच आपणहून अशा पार्टीज् ला नको म्हणतात. हा माझा स्वतःच्या घरचा आणि इतर मित्र-मैत्रिणींकडचा अनुभव आहे.
अर्थात हा बदल फक्त एकाच घरापुरता करून फारसा उपयोग होत नाही.
त्याचप्रंमाणे आजकाल पुण्यात तरी बर्‍याच शाळांमध्ये वाढदिवसाला फक्त रंगित कपडे घालून जायला मुभा असते, गिफ्ट्स देता येत नाहीत किंवा खाऊ वाटता येत नाही.

राहता राहिली, गरिबांना मदत करण्याची गोष्ट. ती आपण वाढदिवस साजरा केला काय किंवा नाही केला काय, आपण करूच शकतो. इथे प्रश्न अशी दानत असण्याचा आहे. वाढदिवसाचा नाही.

शेवटी ज्याला जे पटेल, ते त्याने करावे. 'असंच वागा' असा आग्रह केलेला नाही आहे. >>>>>>> हे मात्र १०० % पटलं आणि आवडलं सुद्धा .............. Happy

अरुण ला अनुमोदन....हल्ली लोक यावर विचार करतात आणि भरपुर मदत ही करतात.विकेन्डस ला लोक मुलांना घेउन अनाथ आश्रम ,वृध्दाश्रमांना भेट देतात...मी अनुभवलय..मी स्वतः एका अनाथाश्रम व तिथल्या शाळेसाठी सेवा म्हणुन काम करते..तिथे मी १ली ते ४ थी च्या मुलांना इंग्रजी शिकवते..मला मदत करायला अनेक जण स्वेछेने पुढे आले. अनेक गृहिणींनी तिथे येउन शिकवण्याची तयारी दाखवली तर काहींनी शिकवलेही.अरुण ने म्हंटल्याप्रमाणे आजची मुलं ही समजुतदार आहे.आजही मी हे काम करते.कुठलीही अपेक्षा न ठेवता गरजु लोकांना मदत करुन खुप समाधान मिळत. एकदा करुन बघा.
<<शेवटी ज्याला जे पटेल, ते त्याने करावे. 'असंच वागा' असा आग्रह केलेला नाही आहे.>> पटलं

Pages