गाज (१)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. पिवळ्यापासून नारंगी-तांबड्या-लालभडक रंगांच्या असतील नसतील तेवढ्या छटा प्रदर्शन मांडून बसल्यागतच. एखादं माणूस, झाड किंवा सावलीचा तर प्रश्नच नाही. जिवंतपणाचे कुठचेही चिन्ह नाही. ते ओसाड माळरान होतं, की वाळवंट, की एखादं बेट की काहीतरी तसंच. पण या अशा वैराण जागेत त्याला स्वतःचं अस्तित्व एकदम भगभगीत आणि एखाद्या दुखर्‍या जागेसारखं किंवा जखमेसारखं सटसट करत कळवळायला लावणारं आणि एकदम क्षुद्र-क्षुल्लक वाटल्यागत. या सार्‍यात आपण का आहोत- असा विचार करत असतानाच जवळच ती पडकी खोली अचानक उगवल्यागत दिसल्यासारखी. खोलीत तर्‍हेतर्‍हेचे रसायनांचे दर्प भरून राहिलेले आणि बाहेरच ते उजाड ऊन आतमध्ये आणखीच चटके दिल्यागत जाणवणारं. खोलीतही सावली नाही, म्हणाजे कमालच आहे, आणि शिवाय ते बाहेर दिसणारे जमिनीचे पोपडे तर इथे थरचे थर रचून ठेवल्यागत. त्यामुळे ती खोली आणखीच कोरडी, भयाण, भणंग झाल्यासारखी. रिकामी खोली असूनही आपल्याला त्यात जागा नाही म्हणजे ही आणखीच मोठी कमाल..
***

नेहेमीचंच स्वप्न रीतसर पाहून झाल्यावर तो रीतसर जागा झाला. मग तेच ते स्वप्न पाहून जाग आल्यावर तसंच गादीवर उठून बसणे. अस्वस्थ होऊन सर्वांगाला आलेला घाम तसाच टॉवेलने खसाखसा पुसणे. तसंच उठून जन्माची तहान लागल्यागत दोन तीन ग्लास घटाघटा पाणी पिणे. आणि मग झोप न आल्याने विचार करत बसणे.

संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर निघाल्यानंतर तो नेहेमीप्रमाणे निर्जन बेटावर एकटा असल्यागत खालमानेने विचार करू लागला. जरा घाई केली का आपण? अजून तर फायनल इयरचा रिझल्टही नाही. आणि घाई झाल्यागत मिळाली ती नोकरी पटकन स्वीकारून का टाकली? घरी सारे सांगत होते. काही दिवस शांत बस. विश्रांती घे. निदान रिझल्ट लागेपर्यंत तरी. पण आपल्याला घर खायला उठलं असतं. रिकामा वेळ म्हणजे संकटच. नको नको त्या विचारांनी डोक्यात झिम्मा खेळण्यापेक्षा काहीतरी काम करावं, हे बरं.

पण आता हे काम म्हणजे इथल्या ऑफिसमध्ये नसून कंपनीच्या एका प्रोजेक्टवर पोस्टिंग. तेही इथून तीनशे किलोमीटरवरच्या एका साखर कारखान्यावरच्या साईटवर. कधीही न पाहिलेल्या गावात. लोक, भाषा, वातावरण.. सारेच अनोळखी. याआधी हेच काय, पण कुठचेच काम केलेले नाही. पण बोरूले म्हटले, चिंता नाही. लेबरला विश्वासात घेऊन काम करून घेणे सर्वात महत्वाचे. बाकी तांत्रिक गोष्टी असतात- त्या तुला माहिती आहेतच. चीफ इंजिनियरला आपण आधीच भरपूर मदत केलेली आहे. तोही आपल्याला करेलच. शिवाय मी आहे. रोज फोनवर बोलणे होईलच आपले. पहिले दोन तीन दिवस सोमनाथ तुझ्यासोबत असेल- तुझे तिथले सारे थोडेफार स्थिरस्थावर होईतोवर.. इत्यादी.

दुसर्‍या दिवशी सोमनाथने सारी तयारी करून दिली. हा बोरूलेंचा जुना माणूस. कंपनीचे बर्‍यापैकी सारे माहिती असलेला. ऑफिसमध्ये अकाऊंटिंगबरोबरच बोरूलेंचा पीए, असिस्टंट, मदतनीस, हरकाम्या.. अशा सार्‍या भूमिका निभावणारा. स्टील प्लेट्स, छोटी मोठी मशिन्स आणि आणि रोज लागणारे काँन्झ्युमेबल आयटेम्स- असं बरचसं सामान आधीच साईटवर गेलं होतं. आता सोबत न्यायची आवश्यक कागदपत्रे, फाईल्स, ड्रॉईंग्ज, जुना पत्रव्यवहार, फोन नं. आणि पत्ते यांची यादी, प्रोजेक्टचे सारे डिटेल्स- असं बरंच काय काय सोमनाथ गोळा करत होता. ते करता करता शार्दूलच्या प्रश्नांना उत्तरे देत होता, माहिती सांगत होता. शार्दूल मनातली खळबळ आणि गोंधळ बाहेर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत सोमनाथच्या चेहेर्‍याकडे बघत होता. हा सोमनाथ म्हणजे बोलून चालून मोकळा आहे. आपले बहुधा जमेल याच्याशी. आणि बराच आधारही होईल याचा.

सारा बाडबिस्तरा घेऊन तो निघाला, तेव्हा आजूबाजूचे अनेक लक्ष कामांना घाईघाईने निघणारे आणि रस्त्यांत, सिग्नलच्या चौकांत शक्य तितके एकमेकांना खेटून चालणारे अनेक लक्ष लोक त्याने हपापल्यागत पाहून घेतले. हेच लोक आपलं बेट असणं जपतात खरं तर. यांच्याशिवाय आपल्या त्या सुरक्षित, दुसर्‍या कुणालाही प्रवेश नसणार्‍या, स्वतःपुरत्या भक्कम दगडी तटबंदी करून बांधलेल्या चिरेबंदी किल्ल्यासारख्या बेटाला काहीच अर्थ नाही. अख्खे जग निर्जन झाल्याच्या आणि तिथे आपण एकटेच पडल्याच्या भयस्वप्नानेच आपण नखशिखांत हादरतो. खरंच तसं झालं तर काय होईल? ही गर्दी, हे किडामुंग्यासारखे रस्त्यावर वळवळत फिरणारे अनंत जीव आपल्याला हवेत. आपल्या त्या प्राणपणाने जपलेल्या बेटासाठी.

हे असे इतक्या संख्येने लोक तिथे असतील की नाही? असायला हवेत. असायलाच हवेत. आपलं एकटं असणं गोंजारायला हवंय त्यांनी. ते बेट आपलं जीव की प्राण आहे.
***

बाबांच्या गावची गजबज पण तो असाच त्रयस्थ राहून पण समृद्ध होत असल्यागत बघत राहायचा. पायली दोन पायलीभरून बाजरीच्या बदल्यात घरातली खंडीभर डोकी वर्षभर कात्री वस्तर्‍याने साफ करणारा बारकू न्हावी नेहेमी म्हणायचा- ताई, अभ्यास केल्यागत बगतोय बगा तुमचा नातू माझ्या कात्री वस्तर्‍याकडे. शिकून मोठा हो बाबा, दुसरं भारी काम करावं कायतरी तुमच्यासारक्या हुशार पोरांनी. ह्ये आमचं धोकटी नि वस्तरा म्हणजे काय खरं व्हवं. शार्दूल गालात हसला की त्याला आणखीच मस्त वाटे. असंच अभ्यास केल्यागत तो एकाग्र होत सार्‍या गावचे आकाशकंदील, सार्‍या गावच्या गुढ्या, मिरवणूका, लग्ने, मयती- इतकेच काय- पण लवणात चरणार्‍या शेळ्या-मेंढ्या आणि सारखी पाण्याच्या हातपंपावर खेळणारी, तिथेच आंघोळ करणारी भिल्लाची पोरं पण बघायचा- हे बारकूला ठाऊक नसावं. गावाला लागून एक छोटा घाट होता, आणि त्या घाटात चिराईदेवी नावाचं ग्रामदैवत होतं. तिथली भितीयुक्त शांतता त्याच्या इतकी अंगावर येई, की पटकन गावात चला म्हणून तो अप्पांच्या मागे धोशाच लावे. एस्टीतून जातानाही तो त्या देवळाकडे पाहणं टाळून आजूबाजूचे डोंगर आणि अंजनाची-बोरांची दाट झाडं टक लावून बघत राहायचा. एकदा ते तसंच बघत असताना तो साराच्या सारा देखावा स्टॅच्यू केल्यागत डोळ्यांत स्थिरावला. गाडीचा आवाज येईना, आणि आजूबाजूच्या लोकांचाही. भणभणत खिडक्यांतून आत शिरणारा वारा देखील जागीच गोठून गेल्यागत स्तब्ध. तसा तो धडपडून जागेवरून उठत हवालदिल होऊन बाबांना विचारू लागला- बाबा, आपण नक्की मागे जातोय, की पुढे??

डोंगराई नावाच्या आणखी एका देवीच्या नवसापासून झाला म्हणून डोंगर नाव असलेला त्याचा एक चुलतभाऊ होता. तो म्हणाला- चिराईमातेच्या चमत्कारामुळेच तुला असं झालं.

गाडीचा वेग खूपच कमी झाल्याची जाणीव होऊन 'आपण मागे जातोय की पुढे?' या त्याच्या तोंडातून अभावितपणे निघून गेलेल्या प्रश्नावर सोमनाथ त्याच्याकडे गोंधळून पाहू लागला तसा शार्दूल ओशाळे हसला. मग सोमनाथ त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला- खंबाटकी घाटात आहोत आपण. कधी आला नसशील ना इकडे? सातारला पोचू आपण आता थोड्या वेळात.
***

सातारा, कराड, कोल्हापूर येऊन गेल्यानंतर ऊसाचे लांबच लांब मळे सुरू झाले आणि वातावरणातला तो चांगलाच ओळखीचा असलेला ओलाकंच हिरवागच्च वास नाका-छातीत त्याने भरून घेतला. पुढे वेस ओलांडून गाडीने निपाणीही ओलांडले आणि कानावर पडणारे कानडी आणि कानडी हेलातले मराठी बोलणे ऐकून आणि दुकानांच्या पाट्या बघून आपण कानडी मुलूखात शिरलो असल्याचं त्याला कळलं. सोमनाथ बेळगाव जिल्ह्याच्या त्या खूप जुन्या सीमाप्रश्नाबद्दल काही तरी बोलत राहिला.

मग दूरवर कारखान्याचे धुराडे दिसू लागले. महाराष्ट्रातल्या कारखान्यांसारखेच याही कारखान्याचे नाव नदीच्या नावावरून ठेवलेले. नदीच्या पाण्यावर पोसलेल्या ऊसामुळेच तर एखाद्या स्वतंत्र संस्थानासारख्या वाटणार्‍या या कारखान्याचे चक्र अव्याहत चालणारे. त्या मायबाप नदीच्या ऋणात राहणेच पसंत असल्याचे दाखवणारी ही त्या नदीच्या नावावरून कारखान्याचे नाव ठेवण्याची पद्धत- आता पुन्हा विचार केल्यावर फारच भारी वाटली त्याला. रस्त्याने ऊस वाहून नेणारे ट्रक्स, ट्रॅक्टर्स, बैलगाड्या आणि त्यांवर थकून स्थितप्रज्ञ होऊन बसलेले ऊसतोड करणारे लमाणी मजूर कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्याच्या खूणा दाखवत होते. आणखी पुढे गेल्यावर कारखान्याच्या त्या भव्य धुरकट पांढर्‍या शेड्स हळूहळू नजरेच्या पट्ट्यात आकार घेऊ लागल्या आणि मळीचा तो गोड-आंबट वास तीव्र होऊन नाकात शिरला. शुगर मिलचा तो संथ कानाशी गुणगुणल्यासारखा आवाजही हळूहळू वाढत जास्त धीरगंभीर आणि जास्त मोठा येऊ लागला, तशा कारखान्याला लागून असलेल्या वस्तीच्या खुणा दिसू लागल्या. कारखान्यात निरनिराळ्या जागांवर काम करणार्‍या लोकांच्या कॉलन्या, मग बस-स्टॉप. त्याच्याशेजारी सुंदरसे गणेशमंदिर. मग दुकानांची, हॉटेलांची रांग. मध्येच पोस्ट ऑफिस, हॉस्पिटल, शाळा आणि बँक यांच्या पाट्या..

किती वर्षे झाली होती त्याला हे सारे वातावरण इतके जवळून पाहायला, अनुभवायला!

सार्‍या वातावरणात भरून राहिलेला तो मळीचा वास नक्की हवासा वाटतोय की नकोसा- हे त्याला ठरवता येईना. त्या वासासोबतच जाणत्या-अजाणत्या वयातल्या लाखो आठवणींनी त्याच्याभोवती फेर धरला होता. भारल्या मनानेच तो आजूबाजूला बघून सार्‍या परिसराचा अंदाज घेत असतानाच सोमनाथ म्हणाला, चला शार्दूलराव. आ गया अपना ठिकाणा. हे आपले गेस्टहाऊस. इथे तुम्ही आता राहणार. मग डोळे मिचकावून तो म्हणाला- किती महिने-वर्षे ते माहीती नाही!

वर्षे?- धसका बसल्यागत तो डोळे विस्फारून विचारू लागला.
तसा सोमनाथ म्हणाला- घाबरू नकोस रे बाबा. वर्षे वगैरे नाही. पण प्रोजेक्ट सहा-सातच महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असले, तरी हा साखर कारखाना आहे, हे लक्षात ठेव. मॅनेजमेंटमधली आणि ऑपरेशन्स रिसर्चची तमाम सारी गृहितके, नियम, थेअर्‍या इथे झक मारतात. हे सहकारी प्रकरण आहे. इथे संचालक मंडळ असते. चेअरमन असतो. मध्येच चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, बिले पास करणारा चीफ अकाऊंटंट, मॅनेजिंग डायरेक्टर इत्यादी असतात. या सार्‍यांचे देणे घेणे आणि त्यावरूनचे रुसवेफुगवे असतात. शिवाय आपल्याच कंपनीसमोर मध्ये मध्ये प्रश्न उभे ठाकून उशीर होऊ शकतो. आणि शेवटी ज्यांच्याकडून काम करवून घ्यायचेय ते कामगार. बाकी सारे सुरळित असल्यावरही कामगारच अडून बसले तर संपलंच!

शार्दूलचा काळजीत पडलेला चेहेरा बघून त्याला हसू आले. मग त्याच्या पाठीवर थोपटल्यासारखे करत सोमनाथ म्हणाला- चिंता करू नकोस. इथे तू एकटाच बघणारा असलास, तरी तुला सोबत आम्ही सारे आहोत. इथून दूर तीनशे किलोमीटरवर, ऑफिसमध्ये असलो तरी. सारे नीट, ठीक होईल. खरे तर हा कारखाना चांगला आहे. वातावरण चांगले आहे. सगळ्याच दृष्टीने. इथे लवकर रूळशील तू. आणि उलट इथून सारे सोडतानाच तुला वाईट वाटेल. डोंट वरी फ्रेंड.

सोमनाथ इथे याआधीही बरेच वेळा कामानिमित्त येऊन गेला असावा. तो अगदीच सराईतासारखा वावरत होता. दुतर्फा मोठी झाडे असलेल्या त्या गेस्टहाऊसच्या रस्त्याने चालताना तो कारखान्याबद्दल आणखी काय काय माहिती सांगत होता. बोलत ते गेस्टहाऊसपाशी आले, तेव्हा शार्दूलला मस्त प्रसन्न वाटलं. 'सी' आकाराची बैठी कौलारू इमारत. समोर व्हॉलीबॉल सहज खेळता येईल एवढे मैदान. मग या मैदानाच्या चारही बाजूला विविध छोटी मोठी फुलझाडे फळझाडे. सोमनाथने गेस्टहाऊस मधे सारे काही बघणार्‍या मारूतीशी ओळख करून दिली. हसर्‍या चेहेर्‍याने गेस्टहाऊसमध्ये सर्वांना हवे नको ते बघणारा, गोड कानडी हेलातले मराठी बोलाणारा, सारखी लगबग करणारा मारूती त्याला आवडून गेला.

मिळालंय की आमाला तुमच्या कंपनीचं पत्र. आमच्या चीपेंजिनेर सायबाचं पण. ह्ये तुमचं खोली बगा सायब्रा. काय लागलं सवरलं का नाय- तेवडं सांगा. आमी हाओच बगा हित्तं. आता शारपं सात्त वाजता डायनिंग हाल चालू होतंय बगा. आता फ्रेश व्हा जावा नि यावा तिकडं मंग आवरून सावरून- मारूती अखंड बोलत होता नि सोबत प्रचंड लगबग करत कामेही उरकत होता. डायनिंग हॉल नीट लावणे. गाद्या गिरद्या उशा चादरी इत्यादी सामानाची सारखी हलवाहलवी. पिण्याचे पाणी भरून ठेवणे. कारखान्यातल्या रात्रपाळीवरच्या काही मोठ्या साहेब लोकांना डबे पाठवण्याची तयारी. गेस्ट हाऊससमोरच्या झाडा-रोपांमध्ये सोडलेल्या पाण्याची नळी इकडून तिकडे फिरवणे. तसे करताना त्या झाडांना गोंजारणे. मध्येच स्वयंपाकघरात डोकावून त्या बायकांना देवी, बाई, आक्का, ताई अशी संबोधने वापरून काय काय सूचना. हरकाम्यांना काय काय सांगून कामाला पिटाळणे. या सार्‍यासोबत आलेले फोन अ‍ॅटेंड करून "जी सरं.. तगोंडा बरीत्तिवरी सायबरू.. कुडतान री.." हे चालूच.

शार्दूलने रूम बघितली आणि त्याला आवडलीच ती. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर तळं दिसत होतं, आणि त्याला लागून एकाच बाजूला गणेशमंदिर आणि छोटीशी बाग. मग त्यापलीकडे कारखान्यातल्या ऑफिसर लोकांच्या टुमदार घरांची कॉलनी.

ती तशी घरे आणि प्रत्येक घरासमोरची स्वच्छ नीटनीटकी अंगणे, त्यांत लावलेली फुलझाडे पाहून पुन्हा ओळखीच्या बेटावर आल्यागत त्याला झालं. शाळेत असताना दाभाडी कारखान्यावरच्या सुरेशकाकांच्या घरी तो जात असे, तेव्हाच्या मावळतीच्या सोनेरी प्रकाशात उजळलेल्या पायवाटा आणि कडेच्या झाडांच्या एकमेकींशी खेळत असलेल्या, अंधार वाढत जाईल तशा दिव्यांच्या उजेडात गूढ होत गेलेल्या सावल्या त्याला आता आठवल्या. सुटीच्या दिवसांत त्या झाडांच्या, गल्ल्यांच्या आणि अंगणाच्या साक्षीने रंगलेले अनेक खेळही आठवले. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बेभान रंगणार्‍या खेळांच्या पार्श्वभूमीवर तोच तो आधी असह्य होणारा आणि नंतर आपला वाटणारा मळीचा वास. एक्झॉस्ट व्हॉल्वमधून अधून मधून निघालेल्या- अख्खा आसमंत भरून टाकणारा वाफेचा प्रचंड आवाज. मिलिंग सेक्शनची समुद्राच्या गाजेसारखी भासणारी दुरवरून येणारी अखंड धीरगंभीर गुणगुण. कामाच्या पाळ्या बदलल्यानंतरची सारा परिसर जागा करून टाकणारी कामगारांची लगबग. कुठूनही दिसणार्‍या, चोवीस तास धूर ओकणार्‍या चिमण्या, आणि दिवाळी असल्यागत लावलेले चिमणीवरचे आणि सार्‍या शेडवरचे दूरवरून दिसणारे जांभळट पांढर्‍या प्रकाशाचे दिवे..
***

जेवणाआधी कारखान्यात जाऊन त्यांनी काही औपचारिक गोष्टी पार पाडल्या. आत जाऊन चीफ इंजिनियर बशेट्टींना सर्वात आधी भेटणे. सव्वा सहा बाय सव्वा तीन फूटांचा त्यांचा देह आणि ढग गडगडल्यागत त्यांचा आवाज पाहून त्याला उगीचच त्याच्या कापसे गुरूजींची आठवण आली. मावा चघळत, तोंड वर करत त्यांनी जमेल तसे काय काय समजावून सांगितले. सिक्युरिटीच्या माणसाला बोलावून या दोघांसाठी शिवाय कामगारांसाठी म्हणून कायम स्वरूपी गेटपास बनवून घेतले. जिथे काम करायचेय, त्या साईटवर प्रत्यक्ष नेऊन बरेच काय समजावणे, सूचना. शिवाय त्यांच्या कामासंदर्भात हाताखालच्या लोकांनाही तशाच घरघरत्या भारदस्त आवाजात आज्ञावजा सूचना. इतकी वर्षे मिलिंग सेक्शनमध्ये काढल्यावर त्यांचा आवाज आपसूकच मोठा झाला असावा. दूरवर, कारखान्याच्या बाहेर समुद्राच्या अखंड लाटांसारखी वाटणारी ती मशिन्सची गुणगुण आता इथे आत आल्यावर फारच भयंकर वाटत होती. त्यामुळे हे साहेबच काय, पण तिथल्या कामगारांसकट सारे जण एकमेकांशी ओरडूनच बोलत होते.

तिथे तासभर काढून आवश्यक ती कामे उरकून ते मेन गेटच्या बाहेर आले, तेव्हा अंधार पडला होता. मग जेवण झाल्यावर कारखान्याच्या बाहेर एक चक्कर मारावी म्हणून ते बाहेर पडले. तळ्याकडून मंदिराकडे, मग कॉलनीतून कारखान्याच्या मागच्या बाजूला जाऊन कारखान्याला प्रदक्षिणा घालून ऊसाच्या गाड्या प्रवेश करतात तिथे थोडा वेळ थांबून मग मुख्य रस्त्याने पुन्हा समोरच्या बाजूला येऊन, दुकानांची, हॉटेलांची, टपर्‍यांची भलीमोठी रांग पार करून मग फॅक्टरीचे ऑफिस, आणि ऑफिससमोरची मस्त बाग. थोडी विश्रांती म्हणून तिथेच ते बसले.

उद्या पाडवा. इथे त्याला उगादी की असलंच काहीतरी म्हणतात म्हणे. उद्या साईटवर काम सुरू होणार..

विचार करत तिथे बसल्यावर आणि कारखान्याच्या चिमणीकडे आणि त्या आता काळ्या धुरकट रंगांत दिसणार्‍या मोठ्याच्या मोठ्या शेड्सकडे बघितल्यावर शार्दूलला पुन्हा ती धीरगंभीर गुणगुण जाणवली. एखाद्या बापाने मायेने लेकरांना मिठीत घ्यावे, तसा त्या संपूर्ण एखाद्या गावाएवढ्या परिसराला कारखान्याने पंखाखाली घेतलेय, असा भास त्याला झाला.

आजवर कधीच माहित नसलेले एखादे नवे बेट अचानक सापडल्यावर व्हावे, तसे स्तिमित झाल्यागत तो त्याकडे पाहत राहिला.

टाकावा इथेच तंबू. छान आहे हे बेट. इथं बहुतेक नाही पडणार ते संपूर्ण जगात आपण भणंगासारखे एकटेच असल्याचं हादरवून टाकणारं भयस्वप्न. हे नव्याने सापडलेलं बेट इतक्यांना सांभाळतंय. आपल्याही सांभाळून घेईल. आपणही समजून उमजून घेऊ त्याला..
***
***

क्रमशः
***

विषय: 
प्रकार: 

वा:! साजिरा, वातावरणनिर्मिती अफाट केलीयस. एक खूप मोठा कॅनव्हास रंगत जाताना दिसतोय. 'गाज' नावातच जिंकून घेतलंस. प्रलय घडवण्याचं सामर्थ्य असलेलं मौन!
'क्रमशः' वाचून आनंद होण्याची माझी पहिलीच वेळ असेल. Happy

मस्त रे Happy

अजून काही जणांनी लिहायचं मनावर घेतलं तर 'तो' रतीब तरी कमी होईल किंवा दुर्लक्षित तरी राहील.
क्रमशः का असेना पण लिहित रहा. Happy

छान Happy

साजिरा,

अभिनंदन ! आपले नवीन लेखन वाचायला मिळणार आता! अप्रत्यक्षरीत्या माझ्यावर टीका करण्यात जो आनंद मिळत आहे तो मिळूदेत लोकांना, कारण तसे म्हणण्याशिवाय माझ्या हातात काहीही नाही.

पहिला भाग कंटाळवाणा वाटला. पण ज्या अर्थी प्रलयाच्या सामर्थ्याचे मौन आहे त्या अर्थी माझे काहीतरी चुकत असावे. वातावरण निर्मीती जुनाट शैलीची आहे. ओलागच्च हिरवाकंच वास वगैरे असे कित्येक प्रकार रटाळ आहेत.

मळीच्या वासाशी आयडेंटिफाय होणे फार सहज होते मला करण आमच्या कंपनीच्याही डिस्टिलरीज आहेत.

मला कथा लक्षात आली नाही. हा दोष कथेचा असू शकत नाही. मी कोणत्याही दुषित पुर्वग्रहाने लिहीत नाही कारण आपल्यात पुर्वग्रह असण्याचे काही निमित्तच नाही. तेव्हा स्पष्ट व प्रामाणिक प्रतिसाद मानावात अशी विनंती!

भडक लेखन केलेकीच ते आकर्षक होते असे माझे मत आहे असे काही प्रतिसाद येतील असे आगाऊपणेच लिहीत आहे त्याबद्दल क्षमस्व! मला तसे म्हणायचे नाही आहे. आपली हरकत नसल्यास मी या कादंबरी / क्रमशः लेखनावर प्रतिसाद देत राहणार आहे.

एवढे सगळे स्पष्टपणे लिहिण्याचे कारण सांगायची गरज नाही हे माहीत आहे तरी असे म्हणावेसे वाटते की आपले बाकी सर्वच लेखन मला आवडते म्हणून येथे असे लिहीले.

चुभुद्याघ्या.

-'बेफिकीर'!

"साजिरा" या नावातच मला आकर्षण आहे. मागच्या काही कथा वाचल्या आणि आवडल्या. ववीला इतर मायबोलीकरांची मुल सुध्दा साजिराकाका म्हणुन हाक मारत होती तेव्हापासुन हे काहितरी वेगळच रसायन आहे हे जाणवतय.

खुप काळानंतर पण एका सुंदर कथानकाचा प्रारंभ झालाय अस वाटतय. तुमची लेखन शैली उत्तम आहे. योग्य वेळ घेउन पण वेगाने क्रमशः पुढे न्या.

खूप दिवसांनी काही चांगल वाचायला मिळालं माबो वर .. Happy आवडलच, ते चित्रमय शैली लिहिलय ना वर पूनमने, अगदी तसच वाटलं, दृष्ये डोळ्यापुढून सरकली..
क्रमशः .. पुढचा भाग कधी?

पुर्वग्रहीत दृष्टीने ज्याप्रमाणे टीका अंमळ जहालतेकडे वळते, त्याप्रमाणेच कौतकाचं मापही उत्तुंगतेकडे जाणं ओघानेच येत असावं.

सुरुवात वाचुन कथा ' माणुस नावाच्या बेटा' बद्दल नविन काहितरी सांगेल असं वाटलं.

बेफिकीरचा प्रतिसाद अंशतः पटण्यासारखा आहे. सतत एकामागुन एक येणारी लँडस्केप्स वाचतांना कंटाळा जाणवला. वर्णनांमधे खरच तोचतोचपणा जाणवतो. सुरुवातच आहे. पुढे कदाचित छान पकड घेइलही. वाट पाहुया. श्रीमंत निराश नक्कीच करणार नाहीत. Happy

सुरुवात आवडली...वातावरणनिर्मिती छान...:)
पुढच्या भागांची उत्सुकता.

झकास !

Pages