दारुड्याची पोरं दारुडीच..

Submitted by निवडुंग on 29 March, 2011 - 05:58

त्याच्या जन्माच्या किती तरी आधी पासून बाप दारुडा म्हणून सुप्रसिद्ध. हा बाळूत्यात, आणि त्याचा बाप दारूच्या गुत्त्यात. घरात सगळ्यात लहान आणि आधीच्या सगळ्याच पोरी म्हणून बापाचा लाडका तो. मोठा झाल्यावर त्याने असं ही ऐकलं होतं की हा नवसाचा दिवटा झाला म्हणून बापाला इतका आनंद झाला होता की पोराच्या आधी बाटलीचं तोंड बघितलं होतं बापाने. आणि मग अशी ही बाटली त्याच्या पाचवीला कायमचीच पूजली गेली. दारूचा गुत्ता म्हणजे काय हे समजण्याच्या कितीतरी आधी पासून बापासाठी दारू वाहिली त्याने. बापाची तलफ इतकी जोरदार होती, की कधीकधी दिवसा शाळेत बसलेल्या त्याला त्याची माय खोटंनाटं कारण सांगून घरी घेऊन यायची. आपल्याला मावशीच्या गावाला जायचंय आत्ता म्हणून वगैरे. खरं खोटं समजायच्याही पलीकडचं वय ते. एकदम हुरळत घरी यायचा तो माय सोबत गावाला जायचं म्हणून. घरी आल्यावर मात्र त्याच्या हातात रोज ठरलेली हिरवी वॉटरबॅग दिली जायची, आणि बापासाठी दारू आणायला गुत्त्यावर जायचंय तुला, हे सांगताना माय चा कंठ कधी भरून यायचा ते त्यालाही कळायचं नाही. अगदी हिरमसून आणि चिडून तसाच तो गुत्त्यावर जाऊन बापासाठी दारू घेऊन यायचा. मायचा जीव कितीही तीळ तीळ तुटत असला तरी ती बिचारी काय करू शकत होती? दारू नाही मिळाली तर घरात राडा ठरलेलाच. तो जसा जसा मोठा होत गेला, तसं तसं घरात भांडण, आरडाओरडा, गोंधळ, हाणामारी हे सगळं अगदी रोजचंच झालं त्याला. अंगवळणी पडून गेलं सगळं. बाप दिसला की प्रेम वाटण्याऐवजी कायम तिरस्कार, भीती, घृणा वाटायला लागली त्याला. बाप म्हणजे दारू, बाप म्हणजे त्रास आणि बाप म्हणजे त्याच्यापासून दूर कसं पळता येईल एवढंच त्याच्या मनावर कायमचं कोरल गेलं. तो दहा वर्षाचा असताना बाप असाच खूप दारू पिऊन मरून गेला. बाप मेला म्हणून थोडंसं वाईट वाटलं त्याला, पण कायमची पीडा गेली म्हणून कुठेतरी मनाचं समाधान पण नक्कीच झालं त्याच्या. आपण आपल्या बापासारखं दारूचं व्यसन लावून आयुष्याची राखरांगोळी करायची नाही हे त्याच्याही नकळत त्याने ठरवून टाकलं मनाशी..

============================================================

मित्र - "चल बे, आज दारू पिऊयात. परीक्षा संपलीये. लेट्स एन्जॉय.."
तो - "अरे बाबा, मी दारू पीत नाही. मला आवडत नाही दारू."
दुसरा मित्र - "अरे कसला झंडू आहेस बे तू, च्यायला दारूने काय होतंय? जरा चाखून तर बघ. मस्त वाटेल एकदम."
तो - "अरे पण, दारू वाईट आहे, एन्जॉय करायला दुसरं काही नाहीच का?"
मित्र - "अबे चमन, दारू ही अशी गोष्ट आहे, जी एन्जॉय करायला लागला की दुसर्‍या कशाचीच गरज पडत नाही."
तिसरा मित्र - "आणि तू तर असा बोलतोय की आपण काही पाप करतोय, सगळं जग पितं दारू. आज काल तर कार्ट्या पण पितात. स्टेटस सिम्बॉल आहे ते. तू नाही पिलास तर शामळू म्हणतील तुला सगळे."

त्याच्या नाही नाही म्हणण्यात आणि बाकीच्यांच्या एवढ्या सगळ्या भाषणबाजीत त्याच्यासाठी पेग भरला पण गेला कधीच. त्यानेही मग हो नाही म्हणत लावला तोंडाला. एकदम उग्र घाणेरडा दर्प बसला नाकात त्याच्या. पहिल्या घोटातच ओकारी आल्यासारखं झालं अगदी. गळ्यापासून अगदी आतड्यापर्यंत गरम गरम वाटत गेलं. आणि थोड्या वेळाने त्यालाही एकदम मस्त वाटायला लागलं. खरंच दारू म्हणतात तेवढी वाईट तर नक्कीच नाही. उलट रिलॅक्स वाटतंय. सगळं टेन्शन गेल्यासारखं. उगाचच आपण एवढा बाऊ करत होतो. कधीमधीच घेणार आपण तसंही. रोज पिऊन थोडेच पडणार आहोत बापासारखे? आणि मग पेग वर पेग रिचत गेले त्या रात्री.. फेसाळणार्या सोडाच्या बुडबुड्या सारखं मनाशी ठरवलेलं सगळं मनातंच विरून गेलं..

मग अश्या कित्येक रात्री येत गेल्या. कधी परीक्षा संपली, कुणाचा हार्टब्रेक झाला, कुणाची गाडी आली, कुणाला प्रोफेसरने झापलं, बोअर झालं, अगदी काहीच कारण नाही, तर काहीच करायला नाही म्हणून पण पेग रिकामे झाले.

============================================================

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा फोन खणखणला. पाहतो तर बहिणीचा कॉल. उचलावा की नाही हा प्रश्न पडला त्याला. नाही उचलला तरीही परत काळजीत पडतील सगळे. तसाच धडपडत बाटली बाजूला सारत तो फोन घेऊन गॅलरी मधे आला.

"हेलो, बोल ना, काय म्हणतेस?"
"काही नाही, सहजच फोन केलेला आज, कसं चाललंय तुझं? काय करतोयेस?"
"अगं काही नाही, असाच आत्ताच ऑफीस मधून आलोय, बसलोय रूम मधे, काही विशेष नाही." - त्याचा मद्यधुंद आवाज.
"जेवला की नाही अजून? बराच वेळ झालाय?"
"उम्म्म.. नाही अजून.. जाईन आता थोड्याच वेळात.."
त्याचं काय चाललंय हे तिला समजायलाही वेळ लागला नाहीच.. शेवटी त्याचीच बहीण ती..
"पार्टी चालू आहे का आज पण?"
"ह्मम्म्म.. थोडीशी.." त्याचा ओशाळवाणा सूर.
"अरे काय चालूये काय तुझं? आम्ही पण समजू शकतो, तुम्हाला फार कामं असतात. वीकेंडला एक दोन दिवस ठीक आहे, आता तर वीकडेजला पण पार्टी?"
"अगं असंच, प्रमोशन झालंय, त्यामुळे जरा जास्त कामं पण आहेत, टेन्शन पण आहे जरा.."
"अरे पण? इतकं काय टेन्शन असतं तुम्हाला? आम्ही पण जॉब करतोच ना? आम्हाला नसतं का टेन्शन? आम्ही तर नवरा पोरं घरंदारं सांभाळून जॉब करतो ना? तुमचं पण जगाच्या आक्रीतच असतं. जरा कुठे खुट्ट झालं की लगेच लागले दारू प्यायला. आम्ही करतो का असं? आम्हाला काही त्रास झाला की जावं का आम्ही पण दारूचे अड्डे शोधत लगेच?" - बहिणीचा त्रासीक सूर.
"तसं नाही गं.. पण आज असंच जरा.. जास्त नाही घेत आणि.. थोडीशीच चालूये.."
"ते काय असेल ते असो. अरे पण जरा लिमीटमधे कराव्यात सगळ्याच गोष्टी. आम्हाला पण कळतं की आजकाल सगळेच घेतात. आम्हीही ते आता नसत पटलं तरी मान्य केलंच आहे ना? घ्या, पण जरा प्रमाणात घ्या. अतिरेक नको कोणत्याच गोष्टीचा."
"ह्मम्म्म..."
"आणि उद्या हेच जर वाढलं तर समाज काय म्हणेल? दारुड्याची पोरं शेवटी दारूडीच निघाली?"

समाजाचं नाव घेताच त्याचं का कोण जाणे टाळकं हाललं..

"हे बघ.. मी समाज वगैरे काही मानत नाही. मी काय करतो किंवा काय नाही ह्याचं समाजाला काय घेणंदेणं? आपण एवढे हलाखीत दिवस काढले, तेव्हा कोणता समाज आला होता धावून पुढे आपल्यासाठी? तेव्हा एक बच्चमजी पण पुढे आला नाही मदतीला. आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे, तर समाजाला काड्या घालायचा काय अधिकार आहे? समाज गेला खड्ड्यात माझ्यासाठी.. मी काही जुमानत नाही कोणाला.."
"अरे पण, किती ही नाही म्हटलं तरी समाजाशी फटकून नाही वागता येत.. लागेबांधे जोपासावेच लागतात.. "
"गेला उडत समाज.. आणि आम्ही काय करतो तरी असं? थोडी फार घेतोच ना? दारू वाईट असं फार लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे आपल्या मनावर.. दारूने संसार उध्वस्त होतात वगैरे.. लोकं दारू पिऊन गटारात लोळतात हाच आपला समज आहे.. पण तसं काही नसतं.. रिस्पोन्सीबली दारू पिणारे पण बरेच असतात आणि आहेत. आणि आम्ही पण त्याच कॅटेगरीमधे आहोत. गटारात लोळणार्यातले नाही.. "
"बरं बाबा.. तुझ्याशी कोण वाद घालणार? आपल्या सर्व भावंडात तूच अतीहुशार आहेस.. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण प्रमाणात. एवढ्या हिकमतीने आपण सगळं साध्य केलंय, समाजात आपली प्रतिष्ठा आहे आता, आणि बापासारखे दिवस पुन्हा नको पुढे आणूस म्हणजे मिळवलं.. "

शेवटी कितीही दारूचं समर्थन केलं तरी बहीण काय बोलतेय हे अगदीच खोटं नव्हतं आणि हे त्याला ही पटतच होतं.. तो ही निरूत्तर झाला मग तिच्यापुढे..

============================================================

आज अडीच महिने होत आले त्याला सलग रोज दारु पिऊन. बापात आणि त्याच्यात आता काहीच फरक राहिला नव्हता. बाप देशी ढोसायचा तर हा विदेशी ढोसतो एवढंच काय ते वेगळं. सगळंच झुलत राहिलेलं त्याच्यासाठी. त्याचं शरीर, मन, प्रेम, निर्णय, सगळंच.

तिची शेवटची भेट आठवली त्याला. डोळ्यांनीच सगळं बोलून घेतलं होतं त्यांनी त्या दिवशी. किती गाढ प्रेम आहे एकमेकांवर. दोघांनाही ते कळत असून मग नुसतेच निरर्थक गोष्टींवर बोलत राहिलेले ते, अगदी त्या बोलण्याकडे काहीच लक्ष न देता. मनाचा वेगळाच संवाद चाललेला, आणि त्यातच दोघांनाही गुरफटून जायचं होतं. कायमचं.

आणि आज तिने शेवटी सांगितलं त्याला..

"आपलं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी, आपण कधीच एक होवू शकणार नाहीत. कधीच शक्य नाहीये ते."

त्या दोन वाक्यात सगळंच संपून गेलं त्याच्यासाठी. इतके दिवस घोंघावणारं वादळ आज अचानक शांत गपगार झालं. काहीच उरलं नाही आता. सगळं कसं थिजून गेलं त्याच्यासाठी. डोकं इतकं सुन्न झालं होतं त्याचं की सगळं काही यांत्रिकपणे घडत होतं त्याच्या हातून.

घरी येवून नेहेमीप्रमाणेच त्याने पेग भरला. आज त्याला बुडून जायचं होतं त्याच्यात. जशीजशी रात्र चढत गेली, तसेतसे पेग वर पेग रिचत गेले मग फक्त.

अचानक त्याला कुठूनशी कुजबूज स्पष्टपणे ऐकू आली.
"दारुड्याची पोरं शेवटी दारुडीच निपजतात.."

आणि मग आज का कोण जाणे त्याला स्वता:च्या बापाबद्दल पहिल्यांदाच आत्मीयता वाटायला लागली..

गुलमोहर: 

छान

खूप धन्यवाद मुक्ता मॅडम, जागोमोहनप्यारेजी, दक्षिणा मॅडम.. Happy
पहिलाच प्रयत्न होता इथे लिहिण्याचा, वाचक मात्र बर्याच दिवसांचा आहे.. Happy

श्रीकांतजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आवडले म्हणवत नाही, हा प्रतिसाद म्हणजे मला जे काय मांडायचं होतं ते बहुअंशी तरी जमलंय याची पावतीच आहे..

छान!

खूप धन्यवाद स्वाती२जी, रचुजी, डुआयजी.. Happy
(अवांतर - हे "जी" प्रकरण म्हणजे पोवाडा म्हटल्यासारखं वाटायला लागलंय मला आता.. Happy पण आदरार्थी आहे हे समजून घ्यालंच.. Happy )

एकदम सरळसोट... आवडली. शब्दांत, घटनांमधे, पात्रांमधे अजून फुलवता आली असती का?
मला वाटतं होय! पण कितीही छोटी असली तरी, विषय आणि शेवट परिणामकारक आहे.

खूप आभार चैत्राजी,

दाद जी,
पुर्णपणे सहमत आपणास. कथा अजुन नक्कीच फुलवता आली असती. लिहितानाही वाटलेलं तसं, पण जरा लांबली असती म्हणून आवरती घेतली. (तुम्ही हिला छोटी म्हणताय, याचं थोडं आश्चर्य वाटलं, मला तर वाटत होतं बरीच मोठी झालिये.. आणि वाचताना कोणी कंटाळून जाउ नये असाही विचार होता.. Happy असो..)

पात्र आणि घटना मुद्दाम कमी रेखाटल्यात, थोडं वाचकांच्या imagination वर सोडून दिलंय..

पहिलाच प्रयत्न होता असं काही लिहिण्याचा, प्रतिसादाबद्दल खूप आभार.. Happy