त्या दिव्याखाली..

Submitted by राफा on 28 March, 2011 - 15:04


माझ्या घरासमोरच..

त्या पांढुरक्या, क्षीण दिव्याखाली
संध्याकाळी जमतात
रोज तीच ती..

जवळजवळ विझत आलेली माणसं.

सुरकुतलेल्या हातांची,
भेगाळ चेह-यांची,
कृश, थरथरणा-या शरीरांची

अजूनही जिवंत असणारी.. ती माणसं.

सुकल्या, पराभूत तोंडांनी
आजूबाजूला वाढणा-या अंधाराकडे बघणारी,

कुठेतरी शून्यात नजर लावून
आयुष्याच्या चुकलेल्या गणिताची
पायरी न पायरी मूकपणे
पुन्हा पुन्हा तपासणारी,

रोज एकत्र जमून, एक शब्दही न बोलता
तशीच परत जाणारी..

ती माणसं..

त्यांचे गेले ते बहुतेक दिवस
कठीण. शुष्क.
खड्यांसारखे..
वेचून वेचून फेकून द्यावेसे..
पण तेच आठवून आठवून सारवत बसतात

ती माणसं..
रोज संध्याकाळी..
त्याच पांढुरक्या क्षीण दिव्याखाली.

अचानकच,
मधेच कुणाला तरी आठवतो
कधीतरी आलेला, एखादा.. अगदी एखादाच,
शुभ्र तांदूळाच्या दाण्यासारखा एक दिवस.

त्या दिव्याखालच्या अंधाराला
मग दोन चार शब्द फुटतात
काही क्षण लकाकतात बोलणाराचे डोळे
काही क्षण तरारतात ऐकणा-यांची मने

आपण नियतीला आयुष्यात एकदाच
पण कसे अगदी साफ हरवले..
ती अस्पष्ट कहाणी ऐकताना
काहीसा सुखावून
तो दिवाही फरफरल्यासारखा वाटतो

काहीच क्षण..
मग पुन्हा अस्पष्ट प्रकाशात,
अंधार ठळक जाणवू लागतो..

..

तो डोक्यावरचा पांढुरका क्षीण दिवा,
आता लवकरच जाईल..

पण वाटतं,

तरीही जमतीलच रोजच्या रोज
ती माणसं..
तो नि:शब्द काळोखच बहुतेक
त्यांना उबदार वाटतो आताशा


विझत आलेला दिवा शेवटी शेवटी
अंधाराचा मित्र होत जातो..


- राफा

गुलमोहर: 

राफा मस्त लिहिलंयस.

काही दिवसांपुर्वी अश्याच एक माणसाला भेटलो रस्त्यात. शबनम खांद्यावर अडकवून रात्री असाच फिरताना पाहिलं तेव्हा सहज म्हणालो , "आहो आता वय झालं ना? अंधारात दिसणं सुद्धा कठिण जात असेल ना?" त्यावर तो इसम सहजपणे म्हणाला "अंधार झालाय आणि होतोय तो तुमच्यासाठी, आमच्यासाठी अजुनही उजेडच आहे" आणि मग माझ्या निरुत्तर देहाला काही सुचायच्या आतच तो इसम म्हणाला 'जाणिव राहुद्यात म्हणजे उणिव केव्हाच भासणार नाही'.
अंधारात तेजोवलय दिसावे ना तसा लख्ख अनुभव माझ्या डोळ्यांनी घेतला.
खरोखर 'त्याच दिव्याखाली' Happy