कोsहम?

Submitted by सखी राधा on 28 March, 2011 - 03:28

कोsहम? मी कोण आहे ?
अनादि अनंत काळापासुन माणसाला हा प्रश्न सतावित आला आहे . आपण जन्मास कां आलो? मृत्यु म्हणजे काय? मृत्युनंतर आपले काय होते? ह्या सुर्य चंद्राला कोणी निर्मिले? फुलांमध्ये रंग कोणी भरले? कोकिळेला सुर कोणी दिले? आईला माया कोणी शिकवली? असे अनेक प्रश्न आपल्या भोवती फेर धरुन नाचु लागतात . आणि मग त्याला उत्तर सापडते 'सोsहम ! ' 'शिवोहम ' मी तोच आहे, मीच शिव आहे .पण मग मी कोण? , तो कोण ? शिव कोण ? असे प्रश्न त्याला पडतात . कधी त्याला चिंतनातुन , मननातुन उत्तर सापडल्यासारखे वाटते , तर कधी तो ह्या उत्तरांबद्दल ही साशंक होतो .
नासदीय सुक्तात सांगितल्या प्रमाणे प्रारंभी सत ही नव्हते आणि असत ही नाही , अंतरिक्ष नव्हते कि त्यापलीकडचे आकाश ही नाही रात्र ही नहती, दिवसही नव्हता . जे होते ते एकटेच वायुशिवाय श्वासोच्छवास करित होते.त्या परब्रह्मालाच अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्या एकत्वातुन अनेकत्वाची सृष्टी निर्माण झाली.एकोsहं बहु स्यामआणि मायेचा उदगम झाला .स्त्व , रज, तमोगुण युक्त ह्या मायेपासुन आकाश, आकाशात स्पंदन होऊन वायु ,वायुत घर्षण होऊन अग्नी, अग्नीतुन जल व जलापासुन पृथ्वी निर्माण झाली.ब्रह्मांडात सुक्ष्म रुपाने माया राहु लागली. सृष्टीत जलचर , खेचर ,पक्षी आंणि भुचर निर्माण झाले .निर्गुण निराकार सगुण साकारात आले आणि त्या साकाराला जेथुन आपण आलो त्याची ओढ लागली . त्या निराकारातच सगळ्या सुखांच आगार आहे ह्याची त्याला खात्री पट्ली आणि त्याचा त्या अनंताचा शोध सुरु झाला . नाना धर्म , पंथ . मार्ग , साधना त्याला शोधण्यासाठी निर्माण झाल्या. मार्ग वेगवेगळे पण लक्ष्य एकच.
भारत भुमी ही देवांची भुमी म्हट्ली जाते , ह्या भुमीत असलेल्या जीवांना मुसळ्धार पाऊस, नद्यांचे महापुर , भयानक भुकंप , जाळ्णारा अग्नी, प्रचंड वादळाने स्तिमित केल. निसर्गाच्या ह्या रौद्र रुपांनाच त्याने पंचमहाभुत म्हणुन सुरुवातीला पुजायला सुरुवात केली .ह्या रौद्र शक्तींची उपासना त्यांच्या पासुन संरक्षण मिळावे म्हणुन त्याने सुरु केली.
ह्या रुद्र शक्तीलाच [देवतेलाच] पुढे 'शिव' स्वरुप प्राप्त झाले . ह्या शिवाला आर्य आणि आर्येतर सर्वांनीच मनापासुन स्विकारले .
क्रमशः

गुलमोहर: 

ह्या गहन विषयावर लिहण्या एवढी विद्वत्ता माझ्याकडे नक्कीच नाही पण त्या अनादि अनंताची ओढ मात्र आहे .
मी कोण आहे? ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. शैव व नाथपंथाचा गेली अनेक वर्षे माझा अभ्यास सुरु आहे. नाथपंथाबद्दल विशेषतः गोरक्षनाथांबद्दल समाजात अजुनही पुर्ण माहिती नाही . 'विषयविध्वंसक वीर ' अशी ज्ञानेश्वर माउलींनी ज्यांची स्तुती केली त्या गोरक्षनाथांबद्दल लिहण्याची इच्छा आहे पुढे सर्व नाथ समर्पणमस्तु!

>>पण त्या अनादि अनंताची ओढ मात्र आहे

सखी, हीच ओढ हा लेख वाचायला मला इथे घेऊन आली. पण पहिला भाग फारच छोटा वाटला.

उपक्रम खूपच छान, उत्तमच ! या भौतिक गोष्टींच्या भडिमारात या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलस यातच तुझे वेगळेपण जाणवते. (संसारत्याग न करता | प्रपंचउपाधि न सोडिता | जनामध्ये सार्थकता | विचारेची होय || तस्मात विचार करावा | देव कोण तो वोळखावा | आपुला आपण शोध घ्यावा | अंतर्यामी || - समर्थ रामदासस्वामी)
लेखातील सर्व विचारांशी सहमत.
गोरक्षनाथांविषयी म्हणशील तर काय स्वरुपाची माहिती समाजात नाही - ते केव्हा, कुठे कसे जन्मले, काय चमत्कार केले याविषयी सर्वसाधारण लोकांना कुतूहल असते. पण कबीर म्हणतात - "जाति न पूछो साधू की, पूछ लिजिये ज्ञान" हेच खरे आहे. तसे काही लिहिलेस तर बरे असे वाटते.
पुढील लेखांविषयी नक्कीच उत्सुकता आहे.
या उपक्रमाकरता विशेष अभिनंदन.

शशांक मनापासुन धन्यवाद !!! ह्या लेखाला प्रतिसाद येइल हेच अपेक्षित नव्हत.ह्या विषयावर माबो वर लिहु कि नको ह्या द्विधा मनस्थितीतच हा लेख लिहिला त्यामुळे तो कदाचित मंदार म्हणतो त्या प्रमाणे खुप त्रोटक हि झाला असेल ,पण तुझ्या प्रतिसादामुळे उत्साह वाढला !!! माणसाने धार्मिक असण्यापेक्षा अध्यात्मिक असायला हव अस मी मानते . अध्यात्म हा गहन विषय आहे , अध्यात्म म्हणजे आत्म्याचे अध्ययन ! भारत ह्या शब्दाचा अर्थ ही तोच आहे ना , 'भा' -तेज , ज्ञान , अध्यात्म , रत- मग्न असणारी म्हणजे भारतीयाची व्याख्याच मुळात अध्यात्मात मग्न असणारी अशी आहे, मग आपण आपली ही ओळ्ख विसरत चाललो आहोत का? हा एक छोटासा प्रयत्न आहे त्या ओळ्खीचा , माबोकरांनी गोड मानुन घ्यावा Happy

चांगला जमलाय लेख!
ब्रह्मांडाच्या वर सुक्ष्म रुपाने माया राहु लागली. >> infinity च्या पलीकडे काहीच नसते. जे काही असते ते सर्व infinity मध्येच सामावलेले असते. आणि ही infinity मायेचीच निर्मिती आहे ती त्यापेक्षा निराळी कशी?

नाथपंथाबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

माधव माया वेगळी नाहीच , होऊ हे शकत नाही , सर्व चराचराला जिने व्यापुन टाकलय आणि जिच्या पाशातुन कोणीच सुटल नाही अशी ही महामाया आपल्याला बंधनात अडकवुन पुन्हा आपल्या स्व स्वरुपाकडे जाण्याच्या वाटा रोखुन ठेवते. संपुर्ण ब्रह्माडंवर ती साम्राज्य करु लागली असा त्याचा अर्थ होतो जर तो वेगळा लागत असेल तर क्षमस्व !

ओह, मला 'वर' म्हणजे ब्रह्मांडाच्या बाहेर असा अर्थ वाटला. पुढच्या लेखाची वाट बघतोय.

>>पण त्या अनादि अनंताची ओढ मात्र आहे

सखी, हीच ओढ हा लेख वाचायला मला पण इथे घेऊन आली...
मस्त जमलाय लेख.. पुढिल लेखांच्या प्रतिक्षेत..

सखी पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत, पण तत्पूर्वी "विषयविध्वंसक वीर" चे स्पष्टीकरण मिळु शकेल काय?
***जर संबंधित विषयावर सविस्तर लेख येणार असेन, तर वाट बघण्याची तयारी आहे***

"विषयविध्वंसक वीर" म्हणजे ज्याने "विषयाचा म्हणजे षड्रिपुमधल्या कामाचा विध्वस केला आहे असा "