मिसळ...!

Submitted by के अंजली on 26 March, 2011 - 06:06

थोडी सागर निळाई थोडे शंख नी शिंपले.... रिंग वाजली आणि मी मोबाईल कानाला लावला.
"हॅलो"...
" मी रेश्मा बोलतेय गं.." (माझी गुजराती मैत्रीण)
"हां बोल गं..काय म्हणतेस?"
"बाहेर आहेस का...?"

आता आजुबाजूने असंख्य गाड्यांचे हार्नस, पँ पँ करणार्‍या रिक्शा,बसचे आवाज, माणसांचा कोलाहल.. फ़ेरीवाल्याचा आवाज हे काय घरात असणारै??

"हो गं..बाहेरच आहे..रिक्षासाठी लाईनमध्ये उभी आहे.बोल काय म्हणतेस?"
"अगं तू त्या दिवशी,मागे,परवा नाही का(?) मला एक रेसीपी सांगीतलेलीस...!"
ही नेहमी असा बोलण्याचा गोंधळ करते...!
"हां हां.. कोणती गं?"
"अगं ते नाही का उसळसारखं... मुगाच भिजवून ते गं..(उसळसारखं काय,उसळच सांगितली मी तीला...!)
"हां त्याच काय?"
"अगं मला आज मटकीची मिसळ करायची आहे तर परत सांग ना त्याची रेसीपी..!"
"बर सांगते..."
..."ओ मॅडम पुढे सरका"...मागचा माणूस मला म्हणाला..
"काय म्हणालीस?"
"तुला नाही गं.. "
"ऎक सांगतेय..मटकी भिजवलीस ना??" मी खात्री करुन घेतली.
"हो, मोड पण आलेत छानसे.."
"बरं, छान!"
"कढईत तेल तापव.आंणि त्यात मोहरी,जीरे,हळद,(भाँsss...) इथे बसचा हॉर्न मोठ्यांदा वाजला..
आणि कडीपत्ता टाक..चांगला तडतडू दे."
हळदीनंतर काय टाकू म्हणालीस..?"
"हिंग हिंग...!"
"बरं...आणि कांदा?? कांदा घालू?"
एवढ्यात माझा नंबर आला..मी पुढे सरकले..
"कांदा...?" रिक्षावाल्याकडे पहात मी बोलले..
? त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक बघीतलं..!
"कांदा? कांदा नको.घालूस.. वेगळीच चव येते त्याने.."
मी मोबाईल आणि डोकं सांभाळत रिक्षात बसले... रिक्षावाल्याने मुकाट्याने रिक्षा चालू केली..
"अगं मागच्या वेळेला टाकलेला.. छान आलेली चव..घरातल्या सगळ्यांना आवडलेली उसळ ती..."
"बरं मग टाक.. पण बारीक चिरुन टाक.."
"बरं. पुढे सांग.."

"मॅडम कुठे जायचय....?"
"आलं आलं.." रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली..एवढ्यात आलं?? "तो म्हणाला..
"तुम्हाला नाही हो..तुम्ही चला...!"मी त्याला म्हटलं..

"अगं आलं,लसुण,मिरची आणि कोथिंबीरीच वाटण टाक त्यात.."
"पण त्याआधी चांगली फ़ोडणीवर परतून घे मटकी..मीठ न घालता..मी तिला म्हटलं..
"आणि झाकणात पाणी टाकून शिजू दे जरावेळ.."
"कशात? ढाकणात?"
"अगं ढाकणात नाही गं झाकणात,,झ झ झर्‍याचा..!"
"हां झाकणांत म्हण ना मग.."(?)
"आणि टोमॅटो टाकू?"
"टोमॅटो?" मी पुन्हा रिक्षावाल्याकडे पाह्यलं. तो त्याच्या नादात रिक्षा चालवत होता..पण आता चेहेर्‍यावर जरा काळजी दिसत होती.
"बघ हवा असेल तर टाक.. पण आमसूल नाहीतर चिंच टाकलीस ना कोळून तर छान चव येईल.."
"कोळून म्हणजे कशी?"
एव्हाना मीच काहीतरी कोळून पितेय असं मला वाटायला लागलं होत.
रिक्षा चौकात आली होती.सिग्नलला थांबली..
ही काहीतरी सांगेल या अपेक्षेने त्याने माझ्याकडे पाह्यलं..
"त्यापेक्षा टोमॅटोच टाकते..!"
मी परत टोमॅटोत..!
"मागच्या वेळेला टाकला होता तेंव्हा छान चव आलेली. घरातल्यांना सगळ्यांना आवडली.."
"मग टाक ना............!टोमॅटो टाक, बटाटा टाक घरातल्या सगळ्या भाज्या टाक...घरातल्या सगळ्यांना आवडेल ग बाई... हे मी अर्थातच मनात म्हटलं...
"हं,आता थोडास्साच गुळ घाल सगळ्यात शेवटी आणि छान शिजल्यावर गरमागरम फ़ुलक्यांबरोबर वाढ.." इति मी..

"अगं नाही मी पाव आणलेत त्याबरोबर द्यायला." ती म्हणाली
अरे हो मी विसरलेच होते..!
"आणि खाउन नंतर सांग मला कशी झालीये ते.."मी समारोप करत म्हटले
हो नक्की सांगेन..थँक्स गं...ठेऊ फ़ोन?आल्यावर बोलूच...!!!
तुमच्या माहीतीकरता म्हणून सांगतेय..ही रेश्मा नावाची मैत्रींण माझ्या बिल्डींगमध्ये वरच्याच मजल्यावर रहाते, पण मी येईस्तोवरही तीला धीर नव्हता..
तरी तिला तर्री सांगायची राहूनच गेली.. असो..

मी फ़ोन ठेवल्याचे पाहून...

मॅडम कुठे न्यायची रिक्षा..?रिक्षावाल्याने मला विचारलं..!!

कुठे न्यायची...??
म्हणजे??मी याला सांगीतलच नाही की काय? आणि तरीही हा इथवर आला कसा?
कुठेही न वळता सरळ नाकासमोर चाललाच कसा? आमच्या संभाषणात आडकाठी न आणता शांत बसला कसा??

मला भरुन भरुन आलं...!
दाटल्या गळ्याने म्ह्टलं....सरळं जाऊन डावीकडे.........!!!

गुलमोहर: 

भरतजी,जिप्सी आणि बाबु Happy
खूप धन्यवाद,
प्रयत्न पहिलाच आहे, तरीपण तुमचे हसरे चेहेरे पाहून जरा धीर आलाय...! Happy

"मॅडम कुठे जायचय....?"
"आलं आलं.." रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली..एवढ्यात आलं?? "तो म्हणाला..
"तुम्हाला नाही हो..तुम्ही चला...!"मी त्याला म्हटलं..

>> Lol

वर्षाराणी ,चिमण धन्यवाद,
>>गोंधळ वाढवता आला असता, खरयं, मलाही वाटतयं तसं Happy

Pages