मसाप मधील कविसंमेलनाचा बट्याबोळ!

Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2011 - 06:34

पुण्यातील साहित्य परिषद आज नेहमीप्रमाणेच गजबजली होती. काही बायका (प्रौढा हा शब्द संयुक्तिक असला तरीही रसभंग करणारा आहे असे त्याच बायकांचे खासगी मत) गजरे माळून 'मी नसते तर विश्वाचे, मराठी साहित्याचे आणि नेसलेल्या पैठणीचे काय झाले असते' अशा आविर्भावात कार्यक्रमाच्या ऑफिशियल वेळेआधी एक तासापासूनच लगबग करत साहित्य परिषद हादरवत होत्या.

दारातून आत येणार्‍यांचे चार प्रकार होते.

पहिला प्रकार म्हणजे ज्याला स्टेजवर कविता सादर करायची आहे तो! (यातही अनेक 'ती'च होत्या). या पहिल्या प्रकारातही तीन प्रकार होते. पहिला प्रकार म्हणजे नवशिका कवी! हा 'फाशी की निर्दोष सुटका' याचा निवाडा आजच असल्याचे भाव चेहर्‍यावर घेऊन आत येत होता. दुसरा प्रकार म्हणजे 'शेकडोवेळा कविता सादर केलेली असल्यामुळे निबर झालेला' कवी! हा जणू 'आज जे सादर करायचे आहे ते अजून रचलेच नाही आहे' अशा आविर्भावात आत येऊन आतील प्रत्येक व्यक्तीला ओळख दाखवून थाटात वावरत होता. तिसरा प्रकार म्हणजे 'माझी कविता आहे म्हणून इतके लोक जमले आहेत' असा चेहरा करून एका कोपर्‍यात केवळ शुन्यात बघत बसलेला कवी! हे कवींचे उपप्रकार झाले.

दुसरा प्रकार म्हणजे श्रोते! श्रोता आत येतानाच 'आज काय नवे खुळ आहे बघूयात' या भावनेने आत शिरत होता. त्याची प्रायॉरिटी एकच! पंख्याखाली जागा मिळणे! त्याला त्याचा कोणताही हात 'क्या बात है' च्या आविर्भावात फिरवायची इतकी सवय झालेली होती की समोर ओळखीचा माणूस आला काय किंवा मच्छर गुणगुणला काय, तो तसाच हात हालवत होता. अजून कार्यक्रम सुरू झालेला नसल्यामुळे 'चुकून क्या बात है म्हणायला उठणारा हात' तो दुसर्‍या हाताने दाबून धरत होता. त्यामुळे पंचाईत अशी होत होती की दुसरा हात 'क्या बात है म्हणण्यास उत्सुक झाल्यास' दोन्ही हात एकदम नमाज पढल्यासारखे साहित्य परिषदेच्या वरच्या अत्यंत कोंदट व 'हा मजला का आहे' असा प्रश्न मनात आणणार्‍या मजल्याकडे उचलले जात होते. असे अनेक श्रोते होते. श्रोत्यांमध्ये एक आणखीन प्रकार होता. 'आपल्याच कुणाची तरी आज कविता आहे' म्हणून कौतुक म्हणून आलेले काही श्रोते होते. ते फक्त कुतुहलाने सर्वांकडे पाहात होते. आपल्या कुटुंबातील कवीला ते अफाट टाळ्या वाजवून साहित्यिक धीर देणार होते.

तिसरा प्रकार म्हणजे आयोजक! यांच्यात असलेल्या महिला 'साहित्य परिषद हे माझे माहेर आहे' अशा वावरत होत्या. त्यांना कविता या प्रकाराशी काहीही देणेघेणे नव्हते हे त्यांच्या देहबोलीवरून सहज लक्षात येत होते. एकमेकींच्या साडीची चौकशी, आपली कित्ती कित्ती जवळची मैत्री आहे ना असे आविर्भाव करणे व सगळे माझ्याचकडे पाहात आहेत ना याची खातरजमा करणे हे त्यांचे मुळ हेतू होते. त्यांच्या चेहर्‍यावर 'आयोजक असण्याचा' तात्कालीन आनंद ओसंडून वाहात होता. शक्य असते तर त्यांनी तिथे 'मुन्नी बदनाम हुई' म्हणून सांस्कृतिक डान्सही केला असता. पण 'टिळक रोडवरील वाहतुक सुरळीत चालावी यासाठी सर्वांनी संयत वागावे' असा साहित्य परिषदेच्या घटनेतील एक वादग्रस्त व नेमका न समजेल असा नियम असल्यामुळे त्या आयोजक महिला पाय न हालवता जागच्याजागीच रवी घुसळावी तश्या हालत आनंद व्यक्त करत होत्या. 'ए हे गळ्यातलं नवीन का गं' या प्रश्नापासून सुरू झालेले त्यांचे संवाद 'मी नाही बाई स्लीव्हलेस घालत' पर्यंत पोचून साहित्य परिषदेत 'आजवरच्या सर्व साहित्य संमेलनातील अध्यक्षांचे जे फोटो लावलेले होते' त्या फोटोंचेही डोळे आपल्याकडे होतील इतक्या आवाजात दुमदुमत होते. त्यातील 'मी नाही बाई स्लीव्हलेस घालत' या विधानामुळे काही नवशिक्या कवींना त्याच वेळेस समजत होते की हे वाक्य बोलणारी व्यक्ती स्त्री आहे.

चवथा प्रकार म्हणजे अती शाहणे! यांचा पुर्वायुष्यात परिषदेशी काही ना काही संबंध आल्यामुळे व ते साहित्यातीलच जाणकार असल्याचा समज दूरवर पसरलेला असल्यामुळे 'भगवान बुद्धाने समस्त विश्वाला माफ करावे' असा चेहरा करून ते एकेका खुर्चीवर बसलेले होते.

सायंकाळी 'ठीक' सहा वाजता कवीसंमेलनाचा आरंभ होईल या पत्रिकेवरील विधानातील 'ठीक' या शब्दाची जागाच बदललेली असून तो शब्द 'कवीसंमेलनाचा' या शब्दाआधी हवा होता हे काही विडंबनकारांनी त्या गर्दीत म्हणून दाखवून संमेलनाआधीच टाळी मिळवलेली होती.

सव्वा सहा वाजता आयोजन समीतीचे प्रमुख लेले यांचे आगमन झाले. त्यांच्या चेहर्‍यावर 'वाळवंटातही मी धरण बांधू शकतो' असा आत्मविश्वास होता. 'पाण्याचे तेवढे बघा' हा भाव त्यांच्या सहाकार्‍यांच्या चेहर्‍यावर होता.

ते जे आले ते इकडे तिकडे न बघता सरळ स्टेजवरच गेले आणि एकदम माईकमध्ये म्हणाले..

"आत्तापर्यंत दोन कवी व्हायला हवे होते.. मी नाही म्हणून काय झालं??.. चला ताबडतोब सुरू करा कवीसंमेलन..."

'दोन कवी व्हायला हवे होते' हे वाक्य सासूने सुनेला 'दोन खोल्या पुसून व्हायला हव्या होत्या' असे म्हणावे अशा थाटातील असल्यामुळे सभागृहात जे नवशिके कवी आलेले होते त्यांच्या चेहर्‍यावर 'ह्यांनी आपल्याला रस्त्यावरून फिरणार्‍या भंगारवाल्याच्या गाडीवर बसवून त्या बदल्यात भोकाचे पैसे मिळवले असावेत' असे भाव आले.

धावाधाव इतकी झाली की 'आज ही स्टेजवर नसेल' असे ज्या महिलांबद्दल म्हणण्यात आले होते त्यातीलही तीन जणी स्टेजवर घुसल्या. त्यांना नम्रपणे परत पाठवताना आपला चेहरा जमेल तितका कडवट करत ऑफिशियली स्टेजवर असलेल्यांपैकी एक बाई म्हणाल्या:

"अमृता नेहमीच सूत्रसंचालन करते म्हणून आली होती... पण आज आम्हाला संधी दिली आहे.. म्हणून मी तिला विनंती करते की तिने समोर बसून मार्गदर्शन करावे... "

अमृता नावाच्या गलेलठ्ठ महिलेला खरे तर तिथून काढता पाय घ्यायची भावना मनात आलेली असूनही ती अभुतपुर्व सात्विक चेहरा करून पहिल्याच रांगेत 'मावली'!

लेले सुरू झाले.

"नमस्कार! मी दामोदर लेले, अखिल भारतीय मराठी काव्यप्रसार संघटनेचा अध्यक्ष आपल्या सर्वांचे स्वागत करतो. कार्यक्रमाला काहीसा विलंब झाला त्याबद्दल माफी मागून असे जाहीर करतो की त्या विलंबाची भरपाई म्हणून प्रत्येक कवीने आपली कविता पटापटा आटोपती घ्यावी. आज आपल्या कवीसंमेलनाचा विषय आहे 'माहेर'! माहेर हा प्रत्येकच स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय! सासरी नांदायला लागून साठ वर्षे झाली तरी तिचा जीव माहेरातच गुंतलेला असतो. चुकून वर्तमानपत्रवाल्यांनी हा विषय 'आहेर' असा छापलेला आहे. तरी काही कवींनी जर 'आहेर' या विषयावरच्या कविता आणलेल्या असतील तर त्यांचा आम्ही हिरमोड करणार नाही. वर्तमानपत्रवाल्यांना आम्ही पत्रातून आमचा निषेध कळवलेला आहेच. पण त्यांच्या व्यवसायात या मुद्राराक्षसाच्या गंमतीजमती होणारच! नशीब त्यांनी तो विषय 'बाहेर' असा लिहीला नाही. (सुरुवातीला आयोजक समीती व त्यामुळे संपूर्ण सभागृहाकडून हशा). नाहीतर जे आत आलेले आहेत त्यांना बाहेर जावे लागले असते. (आता हशाचा क्रम उलटा, कारण हसायला पाहिजे हे श्रोत्यांना समजलेले आहे). आज आपल्या या चौतिसाव्या मासिक कवीसंमेलनात एकंदर बावीस कवींचा सहभाग आहे. एकशे त्रेपन्न कवितांमधून आमच्या समितीने हे बावीस कवी निवडलेले आहेत. त्यातील... किती आलेत गं मधुरा??? आं?? हां.. त्यातील अकरा कवी येथे आलेले आहेत.. हे आमचे पन्नास टक्के यश म्हणायचे की त्या पन्नास टक्के न आलेल्या कवींचे अपयश हे देवालाच माहीत (हशा). तर मी आता रागिणीला विनंती करतो की तिने कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत.. "

रागिणी हे नाजूक नांव असलेली स्त्री वय वर्षे साठची असून उत्खननात सापडलेल्या अतीप्राचीन मूर्तीसारखी ओबडधोबड होती. मात्र तिच्या चेहर्‍यावरचे भाव 'मुलाकडचे बघायला आले आहेत' असे होते. तिचे खुर्चीतून उठणे व माईकपाशी येणे ही एक दीर्घ प्रक्रिया होती. माईक हातात येताच तिच्या चेहर्‍यावर 'बहिणाबाई आणि इंदिरा गांधी या दोन नावांनंतर माझे नाव घेण्यात येते' असे भाव आले. दामोदर लेल्यांकडे एक लाडीक कटाक्ष टाकून रागिणीबाई सुरू झाल्या.

"धन्यवाद दामोदर..... माहेर... "

'माहेर' या शब्दानंतर तिने एक असह्य पॉज घेतला. आता माहेर या विषयावर अजीर्ण होईपर्यंत चांगले ऐकायला लागणार हे नुकतीच माहेरवाशीण झालेल्या मुलीलाही समजेल इतका तो पॉज भीषण होता. रागिणीचा आवाजही संसदेच्या प्रवक्त्यासारखा कानाकोपर्‍याला दुभंगणाराच होता.

"एका शब्दात सगळं स्त्रीत्व जमा झालेलं आहे नाही?? माहेर... !!!"

दुसरा पॉज!

स्वप्नाळू डोळे, नजर साहित्य परिषदेच्या आढ्यावरील परिषदेइतक्याच जुन्या जळमटांमध्ये गुंफलेली आणि तिथे जणू आपले माहेरच असावे असे ओठांवर एक स्मितहास्य!

"मुलगी जन्माला येते.... तीच मुळी माहेरी... "

या विधानाची कोरोलरीच असू शकत नाही हा विचार श्रोत्यांच्या मनात हिंस्त्र शैलीमध्ये आलेला!

"ते रांगणं, टुकुटुकू इकडे तिकडे बघत अंगठा चोखणं, ते चिमणाळं, ती अंगाई, ते आईचे आईपण अनुभवण्याचा सोनेरी काळ, दादाने उचलून घेऊन पापा घेतल्यानंतर एक सुरक्षित भावना निर्माण होण्याचा तो सुखद अनुभव, आजीने हळूच बटव्यातील बुटी चाखायला लावून नंतर लगेच साखरेचे कणही चाटवणे, आजोबांच्या धीरगंभीर मुद्रेवर आपल्याला पाहून येणारी एक हलकीच स्मिताची रेषा, बाबांचे ते कामावरून आल्याआल्या आपल्याला कडेवर घेणे आणि खिडकीतून दिसणार्‍या त्या चिमण्या आणि ते विशाल आभाळ! ही माहेरची पहिली ओळख! मनातून न पुसला जाणारा असा एक ठसा! मराठीत या विषयावर अमाप साहित्यनिर्मीती होऊनही आजही ताजातवाना असलेला हा विषय! माहेर! तुम्हाला नाही असं वाटत?? की एकदा पुन्हा ते दिवस अनुभवावेत?? नाही वाटत की चिंचा पाडून खाताना फ्रॉक मळला हे बघून आईने दिलेला प्रेमाचा धपाटा पुन्हा खावा?? नाही वाटत की दादाचे पेन किंवा ताईचा रबरबॅन्ड लपवून त्यांना उशीर करावा आणि लब्बाडपणा केल्याबद्दल त्यांनीही एक धपाटा द्यावा?? नाही वाटत की आजोबा देवपूजा करत असताना त्यांच्या मांडीवर बसून सगळ्या देवांना फुले वाहावीत??

फुलांवरून आठवलं! चाफा हे माझं सगळ्यात आवडतं फूल! चाफाSSSSS... !!! नावातच एक शालीन गंध असलेले पिवळे धमक फूल! कोमेजले तरी सुगंध पसरवतच राहणारे! पसरवण्यावरून आठवलं! माझा नातू इतका पसारा करतो.. तुम्हाला नाही वाटत असा एखादा नातू असावा?? सुनबाई त्याला ओरडते पसारा करण्यावरून! मग मी तिला म्हणते... तू लहान असताना काय गं करायचीस?? अंहं! तुम्हाला वाटेल की रागिणी सासूगिरी करते... अज्जिबातच नाही हो?? आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत... अर्थात... हल्ली चांगली मैत्रीण मिळतेच कुठे म्हणा... (या वाक्याला समोर बसलेल्या अमृताकडे एक तुच्छ कटाक्ष)... मग घरातच मिळवावी लागते.. तमाम दुनियेत सासू सुनेचं वाकडं असल्याच्या वास्तवतेला आमचं घर हा एक मोठाच अपवाद... मुलाच्या लग्नात मी पाय धुवून घ्यायला नकार दिल्यापासूनच व्याह्यांना जाणवले... या बाई आगळ्यावेगळ्या आहेत... मनस्वी कवयित्री असल्या तरी त्यांच्यात एक दिव्य माणूसपणही आहे... दिव्य... खरच की... आमच्या शेजारच्यांनी त्यांच्या नातवाचं नावच दिव्य ठेवलंय.. इतकं गोड बाळ आहे म्हणून सांगू... माझं एक आहे.. सर्वांवर प्रेम करायचं... नाही का रे दामो....."

'नाही का रे दामोदर' हा प्रश्न विचारताना दामोदरकडे मान केल्यानंतर दामोदरने घुसमटणार्‍या हिंस्त्र पद्धतीने 'आवर आवर' अशी खुण केल्याचे पाहून उपरती होताच....

"तर माहेर... !"

आणखीन एक असह्य पॉझ!

"या विषयावर काय कविता करणार म्हणा?? पण आज आपल्याकडे.. पुण्यातील काही प्रतिष्ठित परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेले असे कवी आलेले आहेत.. तर चला मित्रांनो... पुन्हा एकदा माहेरी जायचा अनुभव घेऊ... पहिले कवी.... अय्या??? निनाद तूच पहिलायस की रे?????"

निनादचे नांव पहिले असणे हा जणू विनोद खन्नाने आपल्याला प्रपोज करण्यासारखा आनंद आहे असे भाव धारण करून मुरकत मुरकत रागिणीबाई स्थानापन्न झाल्या.

निनाद हा 'सभागृह मीच जिंकणार' या थाटात माईकपाशी आला. या संस्थेतर्फे आधी काही वेळा कविता सादर केलेल्या असल्याने त्याच्यात एक 'आय अ‍ॅम एक्स्पिरिअन्स्ड'वाला लूक होताच!

निनाद - पेपरवाल्यांनी केलेल्या चुकीमुळे माझीही चूक झालीय...

सभागृहात सौम्य हशा! पहिलीच कविता 'आहेर' या विषयावरची असल्याचे दामोदरपंतांना झालेले दु:ख त्यांनी 'अरे? मला अपेक्षित असलेला कॉल आला की' असे भासवून मोबाईल कानाला लावून कुजबुजत व्यक्त केलेले! अशा हालहवालीत निनादची कविता सुरू झाली.

गोडीगोडीतला असो वा शालजोडीतला
आहेर तो आहेरच

लग्नातला असो वा मुंजीतला
आहेर तो???? ..... आहेर तो आहेरच....

देताना दु:ख देणारा आणि मिळाल्यावर सुख देणारा
आहेर तो??? आहेर तो आहेरच

उकडत असतानाही रांगेत उभे राहून नवदांपत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी
तुम्ही आम्ही थांबतोच ना??
आहेर देतोच ना??
'आम्ही फुकट जेवलो नाहीत' हे सांगतोच ना?
म्हणून तर म्हणतो
आहेर तो?? आहेर तो आहेरच

काव्यात्म असो वा गद्यात्म
शिवराळ असो वा गुलाबी
आपण एकमेकांना सतत जो देत असतो
तो काय असतो??
म्हणून तर म्हणतो
आहेर तो??? आहेर तो आहेरच

आणि हो...

पेपरवाल्यांची चूक झाल असली तरी मी ऑनलाईन माझी चूक सुधारू शकतो बरं???

त्यामुळे???

माहेर ते माहेरच

धन्यवाद!

टाळ्यांच्या कडकडाटात निनाद खाली जाऊन बसला. रागिणीबाई उठल्या. त्यांचे उठून माईकपाशी जाणे यात होत असलेला विलंब लक्षात येऊन त्यांना जागच्याजागीच माईक पुरवण्यात आला तश्या त्या सम्राज्ञीच्या थाटात हासल्या.

रागिणी - खरा कवी तो... जो विषयावर स्वार होतो आणि त्याला दिशा देतो आशयाची... निनादने आहेरावरून कधी माहेरी नेले हेच लक्षात आले नाही आपल्या... धन्यवाद निनाद... तुझ्या कविता अशाच बहरत राहोत... काय उकडतंय नाही?? ई... तिथे पाल आहे... असो... तर पुढचे कवी... अरे?? कवी कसले?? या तर कवयित्री.... कवयित्री गुलबकावली अभ्यंकर... गुल???? ये...

यावर गुलबकावलीचे लाजणे पाहून 'ही गुल गुल झाली तर बरे होईल' असा विचार उपस्थितांच्या मनात आला.

गुल फारच गुलगुलीत होती. ती माईकपाशी आली आणि 'नुकतीच आवडत्या मुलाने तू किती सुंदर आहेस' अशी कॉम्प्लिमेन्ट दिलेली असावी असा चेहरा करत तिने सर्वांकडे पाहिले.

"मी गुल.... गुलबकावली अभ्यंकर.. माहेरची मनोहारिणी गद्रे... मी पेपर वाचतच नाही... त्यामुळे माहेर आणि आहेर असा गोंधळ झाला नाही... माझी कविता सादर करण्यापुर्वी सर्वांनी एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहावी असे मी नम्र आवाहन करते...."

"कुणाला गं???" - रागिणीबाई.. धसका घेतल्यासारख्या आवेशात!

"बाबू गेला... आता त्याचं भुंकण ऐकू न आल्यामुळे एक नीरव उदास पोकळी निर्माण झाली आहे..."

शंभराहून अधिक वर्षांचा ऐतिहासिक साहित्यिक वारसा असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्या संध्याकाळी एका पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला श्रद्धाजली अर्पण केली.

'धन्यवाद' असे म्हणून सर्वांना खाली बसायला सांगताना गुलबकावली यांच्या सावळ्या गालांवर काही निर्मळ अश्रूंच्या सरी ओघळलेल्या होत्या.

पुटपुटत व मुसमुसत त्या म्हणाल्या..

"बाबू गेला... अन माझी कविताही गेली... "

'तुमची कविता ऐकल्यावर बिचारा कुत्रा जाणारच की' असा निर्भीड विचार बहुतेकांच्या मनात असूनही समोरचे सेन्टि नाटक बघणे क्रमप्राप्त होते.

अचानक भोंग्यासारख्या आवाजात त्या माईकवर ओरडल्या..

"मला माफ करा... तो या जगात नसताना नाही मी कविता सादर करू शकत... माफ क ह र हा हा हा हा हा.... बाबूSSSSSSSSS... बाबू रेSSSSSSS"

गुलला खाली बसवून पाणी देण्यात आले.

आता सूत्रसंचालिका रागिणीबाईंना किमान डोळे पाणावल्यासारखे तरी दाखवायलाच लागले.

"मूक प्राण्यावरील या ओथंबलेल्या प्रेमाविष्काराने आज मसापचे सभागृहही द्रवले असेल... गुल.. तू आक्रोश करू नकोस... पुढच्या जन्मी तो नक्की तुझ्याच पोटी जन्माला येईल बघ... "

'ही बाबूवरची टीका आहे की गुलवरची' हे न समजल्यामुळे अनेक चेहरे त्रस्त दिसत होते.

"तर पुढचे कवी... विद्रोही कवितेचे तारू आपल्या सामर्थ्यशाली वाणीने नुसतेच दिशेला लावणारे नाहीत तर त्याला एक आवेगी वेग देऊन मागास वर्गाला ती स्वप्ने स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचे सामर्थ्य प्रदान करणारे व समाजातील तळागाळासाठी आपले सर्वस्व अर्पण करून सांजसमयी विश्वातील असमानतेवर कडक भाषेत ताशेरे ओढणारे .... आग्यावेताSSSSSSSळ....."

शनिवार वाड्यातील 'काका मला वाचवा' मधील शेवटचा 'वा'ही जितका लांबला नसेल तितका वेताळ मधील 'ता' लांबवून रागिणीताईंनी सभागृहात दहशत पसरवली.

कुणीच उठले नाही. ज्यांना 'आग्यावेताळ' कोण हेच माहीत नव्हते ते इकडेतिकडे बघू लागले तर ज्यांना ते माहीत होते ते आग्यावेताळ यांना खाणाखुणा करू लागले.

आग्यावेताळ! लालभडक बेडकासारखे डोळे, तोंडाला नुकतीच उतरली असल्याचा किंवा अजून चढलीच नसल्याचा वास, लालभडक शर्ट आणि त्याच रंगाची पँट आणि एका हातात कंगवा व दुसर्‍या हातात पेन! उंची पाच फुट! ताडकन उठले आणि कशाशीही संबंध नसल्याप्रमाणे माईकपाशी गेले. टिळक रोडवरून जात असलेल्या कुणालातरी शिव्या देत असावेत अशा हातवार्‍यांच्या भयानक आविर्भावात त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली.

"भिकारच्योत स्साले... सोन्यासारख्या बायकोला जाळतात आणि दुसरे लग्न करून पुन्हा आहेर घेतात??? तुमच्या **त जळकी लाकडे घालून ती विझवायला हवीत... असे करण्यापेक्षा बायकोला माहेरी का पाठवत नाही तुम्ही??? माझ्या निळेरी वस्तीत वाहणार्‍या गटारातील प्रत्येक झुरळाची शप्पथ... एक तर मी लग्नच करणार नाही.. केलं तर बायकोला माहेरी पाठवणार... नाहीतर मग लग्नात आहेरच घेणार नाही... जयहिंद... "

ताडताड चालत आग्यावेताळ जहाल नजरेने पुन्हा जागेवर येऊन बसला. त्याने माहेर या विषयावर काव्य रचले की आहेर हे पब्लिकला समजलेले नव्हते.

मात्र 'ते मलाही समजले नाही' असा स्टॅन्ड घेणे रागिणीबाईंना शक्यच नव्हते.

चेहर्‍यावरच अणूबॉम्ब फुटल्यासारखा विदारक भकास चेहरा करत त्या म्हणाल्या..

"वास्तव... फक्त जहरी आणि जहाल वास्तव ऐकलं आत्ता आपण... आग्यावेताळ... तुमच्या वाणीचे माहात्म्य उपस्थितांना आज समजले.. वास्तवापासून सदा दूर पळणार्‍या पुरुषजमातीला तुम्ही जे लेखणीने हतबल केलेत त्याची सर कशालाही येणार नाही ... भयंकर वास्तव... असो.. आता पुढचे कवी आहेत.. उमेश भटके... धनगर भटक्या जमातीतील उमेश यांनी मरठी कवितेवर जो ठसा उमटवलेला आहे.. त्यात त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभुतींचाच वाटा आहे.. हे त्यांची कविता ऐकून समजेलच... उमेश भटके.. "

उमेश टापटीपीतला कवी होता. बघून वाटणार नाही की पुर्वज भटक्या जमतीत होते. विलक्षंण देखणाही होता. रागिणीबाईंनी तरुणीप्रमाणे मुरकतच उमेशला सांगितले...

"उमेश तरन्नुम हं????? "

आपण गायचे आहे अशी फर्माईश उमेशला फारच आवडली.

"गाणारच आहे... ऐकाSSSSSS"

रेशमाच्या रेघांनी च्या चालीवर कविता सुरू झाली.

माह्यराच्या यादंनंSSSS
माझं मेंढरू काळंSSS
जिम्मिनित्तं खत्त मुळ्ळी घालंनाSSSSSSS
झित्तं हवं थित्तं कोन्नी हागंनाSSSSS

हिरवा हिरवा पाला त्याले चारला.... चारला..
दंडुकाबी योक पाठी हानला... हानला बाई हानलाSSSS
जागचंबी हालनाSSSS
मारुनीबी कुंथनाSSSS
झित्तं हवं थित्तं कोन्नी..........

टाळ्यांच्या कडकडाटात उमेश खाली येऊन बसला. या कवितेत 'माहेर' या शब्दाचा एकदा झालेला असंबद्ध उल्लेख सोडला तर बाकी सगळा 'आनंद'च होता. पण तरी टाळ्या वाजवणं हे मसापमध्ये बसल्यानंतरचं उच्च अभिरुचीच लक्षण समजलं जातं!

ही एक बीभत्स कविता आहे यावर मनातल्या मनात सगळ्यांचे एकमत झालेले असले तरी जाहीर तसे कोण बोलणार?

रागिणीबाई - विलक्षण गोडवाय रे तुझ्या आवाजात??? उमेशची कविता आपण ऐकलीच! माहेर आणि मेंढरू हे विषय ताकदीने गुंफले आहेत त्याने... ए अमृता???

समोर बसलेल्या अमृताबाईं दचकल्याच! आज हिच्याकडे माईकचा ताबा आहे म्हणून आपला पाणउतारा करते की काय ही बया असे त्यांना वाटले.

रागिणी - मला उमेशच्या कवितेवरून आठवले... तुझ्याही माहेरी मेंढरं होती ना गं?? तुझा दादा राखायचा का असं काहीतरी म्हणालीवतीस बघ..

झालं! बोंबललं सगळंच! आता रणरागिणी विरुद्ध चंडिका हा वाद होणार हे परिषदेच्या भिंतींनाही समजले.

अमृता - काय???? मेंढरं???? माझ्या माहेरी???

रागिणी - म्हणालीवती की नाही गं ही मधुरा???

मधुरा - इश्श्य! मेंढरं नाहीत काही रागिणीताई... गाढवं म्हणाल्यावत्या त्या..

अमृता - गाढवं व्यासपीठावर आहेत... माझ्या माहेरी नव्हती...

रागिणी - काय बोलतेस???

लेले - अहो...तुम्ही थांबा.. इथे तमाशा नकोय... कवीसंमेलन चालूय..

रागिणी - कवी संमेलन खड्यात गेलं.. ती तुला गाढव म्हणाली.. आणि आम्हाला दोघींनाही..

लेले - मसापच्या पवित्र व्यासपीठावर ही चिखलफेक योग्य नाही अमृता....

तोवर अमृता स्टेजपाशी येऊन तावातावाने अमुताचे बोल ऐकवू लागल्या.

अमृता - तुझ्या माहेरी गिधाडं... कावळे होते तुझ्या माहेरी... तू खेचरं हाकायचीस... तुझा भाऊ चिंगळ्या पकडायचा.. तुझी बहीण कासवाची अंडी शोधायची... माझं माहेर काढतेस???

गदारोळ वाढला. एक देवधर म्हणून अतीवृद्ध कॅटेगरीतील गृहस्थ समोर बसलेले होते. त्यांनी हयातभर मसापमधून साहित्यसेवा केलेली होती असे त्यांचे म्हणणे होते. पुर्वी कधीतरी ते प्रमुख कार्यवाह वगैरेच्या निवडणुकीलाही हारलेले होते. ते उठले. त्यांच्या चेहर्‍यावर शताकुनशतके तपश्चर्या केल्यासारखे पवित्र भाव होते. ते शोभणार नाही अशा वेगाने धक्का बसलेला चेहरा करून व्यासपीठाच्या जवळ आले आणि डोळे जमतिल तितके विस्फारून म्हणाले...

देवधर - अहो... हे काय??? या सभागृहाला एक वारसा आहे...

अमृता - कसला???

देवधर - साहित्याचा... माणुसकीचा.. एकमेकांप्रती आदर दाखवण्याचा.. सभ्यतेचा...

अमृता - मग तुम्ही इथे कसे काय??

देवधरांना त्या वयात तो धक्का सहन झाला नाही. ते छातीवर हात दाबत एका खुर्चीवर बसले.

रागिणी - दामोदर... हिला खाली जायला सांग... नाहीतर मी सूत्रसंचालनाचा त्याग करते...

लेले - अमृताSSSSS....

अमृता - ही कसली त्याग करणार?? आज सकाळचं कव्हरेज आहे म्हणून दहा वेळा लाळघोटेपणा करून आजचं सूत्रसंचालन मिळवलं... नाहीतर मीच करते नेहमी....

लेले - अमृताSSSSSS...

मधुरा - हे काय हे?? काय चाललंय काय हे???

लेले - अमृताSSSS...

रागिणी - हिच्या माहेरी गुरं हाकायचाच व्यवसाय होता.. म्हणून तर हिचं पहिलं लग्न मोडलं....

लेले - अमृताSSSSS

अमृता - अगं मी निदान मोडलं तरी पहिलं.. तू पहिल्याला घरी ठेवून जगभर फिरतेस....

लेले - अमृताSSSSSS

अमृता - तुझी कॅसेट अडकलीय का?? हिला बोल की???

लेले - रागिणीSSSSSSSS

रागिणी - देवधरांना धरा कुणीतरी... हिच्यामुळे त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आलाय..

चांगले उभे राहू पाहणारे देवधर पुन्हा छाती आवळत त्या कल्पनेनेच खाली बसले.

अमृता - हिला साधी जाहिरात देता येत नाही... माहेरचं आहेर झालंय ते हिच्यामुळेच...

सभागृहातील अनेक 'मान्यवर' व 'कवी' आता उभ राहून व्यासपीठाकडे हादरून बघत होते. कुणीतरी देवधरांना पाणी आणून दिले.

रागिणी - माहेरचं आहेर झालं तरी आहेरच्या कविता आल्या आहेत... तुला असा बदल झाल्यावर काय बोलायचं तेच समजलं नसतं...

लेले - रागिणीSSSSSSS

उमेश भटके - भांडू नका.. आजवर कित्येक कार्यक्रम गुण्यागोविंदाने केलेत..

अमृता - मी केलेत मी... गुण्यागोविंदा कुठला काढला?????

उमेश - अहो.. म्हणण्याची पद्धत आहे...

अमृता - पद्धती न कुंथणार्‍या मेंढरांना शिकव... माझी हयात साहित्यसेवा करण्यात गेलीय...

लेले - रागिणीSSSSS

रागिणी - अरे मी काही बोलतीय तरी का??? उगाच काय रागिणी रागिणी???

लेले - मधुराSSSSSSS

गुलबकावली - बाबूला श्रद्धांजली द्यायलाही ही नीट उभी राहिली नव्हती...

अमृता - का हो देवधर?? कुत्र्यांना श्रद्धांजली द्यायचा वारसा आहे का परिषदेचा???

देवधरांचा एक हात छातीवर व एक 'नको नको' अशा अर्थी हालत होता. डोळे मृत्यू समोर उभा असल्यासारखे!

मधुरा - देवधरांसारख्या भीष्माचार्याचा अपमान केलास तू अमृता???

एक कवी - ओ.. माझी कविता होणारे का?? नाहीतर जातो..

अमृता - अरे हाSSSSSड...

आग्यावेताळ - भिकारच्योत साहित्यकारांनो??? तुमच्या मय्यतीला गांडुळेही यायची नाहीत..

लेले - वेताSSSSSSSळ....

आग्यावेताळ - थुंकतो मी तुमच्या साहित्यसेवेवर... एक स्वस्त गुटखा खाऊन थुकतो...

आता लेले आणि आग्यावेताळची वेगळी जुंपली.

देवधर - माडगुळकर?? मला माफ करा... माझ्या उपस्थितीत या सभागृहाचा अपमान मी होऊ दिला.. प्रकृतीची साथ असती तर हे कधीच होऊ दिले नसते...

अमृता - हिच्या माहेरी वाणी ठिय्या देऊन बसायचे... चार चार महिन्याची उधारी असायची...

रागिणी - पण चोर्‍या नव्हते करत... तुझ्या बापासारख्या...

अमृता - माझा बाप तहसीलदार होता.. तुझा बाप खेकडे धरायचा...

मधुरा - तुमच्यातील एकही कुणी सोफेस्टिकेटेड नाहीये का??

झालं! रागिणी आणि अमृता मिळून आता मधुरालाच झापू लागल्या. तिकडे आग्यावेताळने लेलेच्या खानदानाचा उद्धार केलेला होता. देवधर काहीतरी पुटपुटत असावेत.

एक कवी - ओ... कविता होणारेत का जाऊ??...

लेले - तुला खरच वाटतंय अजून कविता होतील??

गुलबकावली - देवधरांना अ‍ॅडमीट करा...

वेताळ - या थेरड्याला कुठेही प्रवेश मिळणार नाही... माझ्या वस्तीत आला तर बारकी पोरे दगडी घाल्न ठेचतील..

देवधर बसलेले आडवे झाले खुर्चीत!

मधुरा - आजचे कवीसंमेलन रद्द करावे लागत आहे याबद्दल आम्ही दिलगीर आहोत...

अमृता - सुरूच कुठे झाले होते???

देवधरांनी कशीतरी ताकद एकवटली आणि पुन्हा उभे राहिले.

देवधर - बंद करा... बंद करा हा तमाशा.. मी इतका हीन प्रकार पाहिलेला नव्हता आजवर..

अमृता - तुमच्याच कर्माची फळं म्हणून आज पाहावा लागतोय!

अखंड गदारोळात सर्वांनी काढता पाय घेतला. दमल्यावर बायकाही भांडायच्या थांबल्या. सभागृहाबाहेर पडताना देवधरांच्या डोळ्यात पाणी होते.

अंधार झालेल्या सभागृहात आता फक्त अस्ताव्यस्त खुर्च्या आणि जुन्या सर्व साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांचे फोटो राहिलेले होते. सकाळ व इतर पेपर्सची माणसे आजचा गोंधळ खरडण्यात मग्न होती.

फक्त पूर्ण अंधार व्हायच्या आधीच... एका तस्वीरीतील पुलं दुसर्‍या तस्वीरीतील माडगुळांकरांकडे डोळा मारून बघत म्हणाले..

"आपण गेलो तेच बरं झालं नाही माडगुळकर???"

गुलमोहर: 

Lol Lol

दुसरा प्रकार म्हणजे श्रोते! श्रोता आत येतानाच 'आज काय नवे खुळ आहे बघूयात' या भावनेने आत शिरत होता. त्याची प्रायॉरिटी एकच! पंख्याखाली जागा मिळणे! त्याला त्याचा कोणताही हात 'क्या बात है' च्या आविर्भावात फिरवायची इतकी सवय झालेली होती की समोर ओळखीचा माणूस आला काय किंवा मच्छर गुणगुणला काय, तो तसाच हात हालवत होता. अजून कार्यक्रम सुरू झालेला नसल्यामुळे 'चुकून क्या बात है म्हणायला उठणारा हात' तो दुसर्‍या हाताने दाबून धरत होता.

माह्यराच्या यादंनंSSSS
माझं मेंढरू काळंSSS
जिम्मिनित्तं खत्त मुळ्ळी घालंनाSSSSSSS
झित्तं हवं थित्तं कोन्नी हागंनाSSSSS

भारीच आहे

आज येड्यासारखा हसलोय Rofl एखादं आवडलेलं वाक्य उद्दृत करणे अशक्य कारण सगळाच लेख अतिप्रचंड धम्माल आहे Rofl Rofl Rofl

hahagalomany.gif

Biggrin

Biggrin

माबोवरच्या कुठल्याच विनोदी लेखनाला इतका हसलो नव्हतो... मसापचे एकदोन अनुभव असल्याने चेहरे आणि कार्यक्रमही डोळ्यासमोर आला.... तुफान तुफान तुफान विनोदी झालय हे लेखन...

प्रिंटाऊट घेऊ का? पुढच्या कार्यक्रमाला आवर्जून जाऊन वाटतो सगळ्यांना. Biggrin

Biggrin बेफिजी, आज काय एकदम फॉर्मात!!! आहो किती हसवाल??? पोट दुखलं की हो.... मंदार म्हणाला तसं एक उद्दृत करणे अशक्य कारण सगळाच लेख अतिप्रचंड धम्माल आहे ... तरीही मी वाचता वाचताच कॉपी पेस्ट करुन ठेवलेली वाक्ये:

शक्य असते तर त्यांनी तिथे 'मुन्नी बदनाम हुई' म्हणून सांस्कृतिक डान्सही केला असता.>>> Rofl

त्यातील 'मी नाही बाई स्लीव्हलेस घालत' या विधानामुळे काही नवशिक्या कवींना त्याच वेळेस समजत होते की हे वाक्य बोलणारी व्यक्ती स्त्री आहे. >>> Proud

व्वा सहा वाजता आयोजन समीतीचे प्रमुख लेले यांचे आगमन झाले. त्यांच्या चेहर्‍यावर 'वाळवंटातही मी धरण बांधू शकतो' असा आत्मविश्वास होता. 'पाण्याचे तेवढे बघा' हा भाव त्यांच्या सहाकार्‍यांच्या चेहर्‍यावर होता. >>>:खोखो:

स्वप्नाळू डोळे, नजर साहित्य परिषदेच्या आढ्यावरील परिषदेइतक्याच जुन्या जळमटांमध्ये गुंफलेली आणि तिथे जणू आपले माहेरच असावे असे ओठांवर एक स्मितहास्य! >>>:हाहा:

"मुलगी जन्माला येते.... तीच मुळी माहेरी... ">>> Rofl

पूर्वी कधीतरी ते प्रमुख कार्यवाह वगैरेच्या निवडणुकीलाही हारलेले होते. ते उठले. >>> Biggrin

पण तरी टाळ्या वाजवणं हे मसापमध्ये बसल्यानंतरचं उच्च अभिरुचीच लक्षण समजलं जातं! >>> Proud

'ही बाबूवरची टीका आहे की गुलवरची' हे न समजल्यामुळे अनेक चेहरे त्रस्त दिसत होते. >>> Lol

माझ्या निळेरी वस्तीत वाहणार्‍या गटारातील प्रत्येक झुरळाची शप्पथ..>>> Rofl

रागिणी - मला उमेशच्या कवितेवरून आठवले... तुझ्याही माहेरी मेंढरं होती ना गं?? तुझा दादा राखायचा का असं काहीतरी म्हणालीवतीस बघ.. >>> ____/\____ Rofl

अमृता - तुझ्या माहेरी गिधाडं... कावळे होते तुझ्या माहेरी... तू खेचरं हाकायचीस... तुझा भाऊ चिंगळ्या पकडायचा.. तुझी बहीण कासवाची अंडी शोधायची... माझं माहेर काढतेस???>>> ____/\____ Rofl

उमेश भटके - भांडू नका.. आजवर कित्येक कार्यक्रम गुण्यागोविंदाने केलेत..

अमृता - मी केलेत मी... गुण्यागोविंदा कुठला काढला?????>>> ____/\____ Rofl

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

खुप दिवसांनी आज इतके हसलेय... धन्स बेफिजी Happy

एक कवी - ओ.. माझी कविता होणारे का?? नाहीतर जातो..>>>> भारीच लय मजा आली ...... Happy

Rofl Rofl Rofl

निखळ करमणूक..!

यावरून आठवलेलं..

व्यासपीठावरील एक कवी : अरे वा..! इतके श्रोते जमलेत कविता ऐकायला?
व्यासपीठावरील दूसरा कवी : हे श्रोते नाहीत. कवी आहेत..!!

Fantastic,
खुप दिवसांनी आज इतके हसलेय
Afterall u changed the track.
its very good to read that u entered in the laughing section.
You are simply gr8 what ever you write i enjoy it completely, it may be senti or comic.
Congrats once again
and thanks a ton for making me laugh for hours.

बेफिकीरजी, तुम्ही अष्टपैलू आहात Happy
थरारकथा, गझल, कविता, विनोदी लेखन - आता काय शिल्लक आहे बरं smiley_dontknow_01.gif
हां - भयकथा लिहीली आहे का?

Pages