माझा गांधीवाद आणि राजश्री

Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2011 - 01:46

वय वर्षे १६ असतानाचा हा शूळ! एका जवळच्या नातेवाईकांच्या म्हणण्याचा प्रभाव पडला. ते गांधीवादी होते आणि जयप्रकाश नारायणांबरोबर स्वातंत्र्यसंग्रामासंदर्भात तुरुंगात होते. त्यांच्या अपरोक्ष काहींना हे सांगून मी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आदर मिळवलेलाच आहे. इतकेच काय तर चापेकर हे माझ्या आईच्या आईचे चुलतबंधू होते. त्यामुळे रॅन्डसाहेबाला मीच 'गोंद्या आला रे' असे म्हणून एका गोळीनिशी उडवलेला आहे अशा आविर्भावात मी काही ठिकाणी वावरतो. पत्नीचे माहेरचे आडनाव गोखले (मी देशस्थ आणि ती कोकणस्थ, याचा पाहुणचारावर पडणारा प्रभाव मायबोलीवरील काहींनी माझ्या घरी येऊन प्रत्यक्ष अनुभवलेला आहेच, हे विषयांतर)! तर ती गोपाळकृष्ण गोखल्यांची पणती! पणतू या शब्दाचे स्त्रीलिंगी स्वरुप इतके फालतू का आहे हा वेगळा भाग!

अशी परंपरा मला लाभलेली.... आणि त्यातच आजही हयात असलेले ज्योतिषी एम कटककर हे माझे चुलत काका!

त्यामुळे मी अनेकदा 'क्रीम ऑफ सोसायटी' या आविर्भावात काही ठिकाणी वावरण्याचा प्रयत्न करतो. त्यातील असत्यता काही क्षणातच (इतरांना व त्यामुळे मलाही) जाणवल्यामुळे नंतर लगेचच सगळ्यांमध्ये मिसळूनही जातो.

मात्र ते 'जयप्रकाश यांच्याबरोबर कारावास' स्पेशल मावसोबा मला एक दिवस लेक्चर देत होते. 'द ब्युटी ऑफ लाईफ इज इन द सिम्प्लिसिटी विथ विच यू लिव्ह द लाईफ' असे सांगून त्यांनी मावशीने तळलेली मिरची व कांदा अशी सेपरेट दोन भजी ढकलली. मीही भजी खात खात प्रभावित होत शेवटी त्याच विचारांमध्ये घरी आलो. हे मावसोबा डॉ अश्विन वैद्य! मुळचे गुजराथी व गेले ६३ वर्षे कॅनडामधील सस्केटून येथे राहतात व सहा महिने भारतात येतात. असे सहा महिने भारतात येणे हा प्रकारही ते दोघे गेले एक्केचाळीस वर्षे करतात. तिकडे थंडी असल्यामुळे कायम थ्री पीस सूटमध्ये वावरतात. शुद्ध शाकाहारी, मद्याला कधीही न शिवणारे असे ते मेडिकल डॉक्टर आहेत व आडनांवही वैद्यच! आम्ही सगळे त्यांना भाई म्हणतो व मावशीला ताई मावशी, कारण ती सर्वात मोठी मावशी आहे. त्यांच्या या षड्मासी मातृभूमी व्रतामुळे आणि एकंदरच श्रीमंतीमुळे आमच्या आजोळच्या यच्चयावत व्यक्तींवर त्यांचा प्रभाव फारच मोठा होता. आता तो कमी होत असल्याची वदंता आहे.

आपण महात्मा गांधींप्रमाणे वागणे व आपल्या वागण्यातून इतरांनाही सत्य, अहिंसा, स्वावलंबन व साधेपणा ही तत्वे शिकवणे हे आपले आद्य आणि एकमेव कर्तव्य उरलेले आहे हे मला रस्त्यातच चालताना पटले आणि अर्थातच घरी गेल्यावर पहिला प्रयोग आईवरच होणार होता. माझी आई मला जेवढा धाक दाखवायची तेवढा कोणत्याही राजकैद्यालाही कुणी दाखवलेला नसेल. त्या खालोखाल धाक ती माझ्या वडिलांना दाखवायची. मला 'समजायला' लागल्यापासून 'माझे अस्तित्वात येणे' हा त्यामुळेच मला एक चमत्कार वाटतो.

महात्मा गांधींना तहान लागल्यावर त्यांच्या अनुयायाने त्यांना भांडंभर पाणी दिलं आणि त्यांनी त्यातील अर्धे भांडे पाणी पिऊन उरलेले पाणी स्वतःजवळ ठेवताच त्या अनुयायाने ते उरलेले पाणी फेकून दिले. ते पाहून गांधीजी म्हणाले की 'अरे असे फेकत जाऊ नकोस पाणी, तेच पाणी मी काही काळानंतर प्यायले नसते का?' हे कोठेतरी वाचलेले मला रस्त्यातच आठवले. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी घरी गेल्यानंतर मी तहान लागलेली नसतानाही अर्धे भांडे पाणी प्यायले आणि उरलेले पाणी स्वत:जवळ ठेवले. अजून आईला माझ्यात पडलेला थोर फरक जाणवला नव्हता.

"काय म्हणाली ताई मावशी??"

जमेल तितका सात्विक चेहरा करून मी उत्तरलो.

"विशेष काही मुद्दे निघाले नाहीत, अल्पोपहार, चहा व काही विचारांची देवघेव!"

माझे मराठी, हिंदी आणि इंग्रजी यावर सुरुवातीपासूनच प्रभुत्व असल्याचा माझा ग्रह असल्यामुळे व शुद्ध पुणेकर असल्यामुळे मी हे वरील वाक्य वयाच्या (अनुक्रमे) चौदानंतरच्या / दोन नंतरच्या कोणत्याही वर्षी बोलू शकलो असतोच!

'मुद्दे निघाले नाहीत आणि देवघेव' हे दोन उल्लेख नळाच्या आवाजात दुर्लक्षित राहिले असावेत.

कारण 'गांधीवाद' हा विषय माझ्या डोक्यात घोळत आहे याची चाहुल जरी आईला लागली तरी पुढच्याच मिनिटाला ती त्याचा 'आंधीवाद' करेल हे माहीत असल्यामुळे मी माझ्यातील महान बदल सूक्ष्मपणे परावर्तित करणार होतो.

एरवी आल्या आल्या सोफ्यावर लोळणारा मी आज लगेच एक चटई फरशीवर टाकून तीवर बसलो. उशी वगैरे मोह झालेच नाहीत माझ्या शुद्ध आत्म्याला! मात्र घातलेले कपडे जीन्स व टी शर्ट असल्याने ते बदलणे आवश्यक होते. एक पांढरी शुभ्र बंडी 'जिच्यात मी आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक बावळट दिसेन' याची खात्री असल्यामुळे जी कधीच वापरली नव्हती ती कपाटातून काढली आणि त्या बंडीकडे एक सात्विक दृष्टीक्षेप टाकून ती अंगात घातली. एक पांढरा पायजमा, जो निर्माण झाल्यापासूनच माझ्या कंबरेवर बसायचा मोह केव्हाचाच सोडून कपाटात संथारा घेतलेल्या जैन बाईसारखा बसलेला होता, तोही घातला. बाहेरून घालून आलेले कपडे व्यवस्थित हॅन्गरला लटकावून ठेवले.

अभ्यास या शब्दाला अध्ययन हा पर्यायी शब्द लगेच सुचल्याबद्दल स्वतःची पाठ अजिबात न थोपटता (कारण मोहावर नियंत्रण) एक पुस्तक घेऊन चटईवर बसलो. शेजारी 'अर्धे पाणी'वाले भांडे होतेच!

"ऊठ"

गांधीवाद प्रत्यक्षात आणण्याच्या मनीषेला लागलेला पहिला एकशब्दीय सुरुंग! "ऊठ"!

आईच्या हातात फरशी पुसायचे फडके व डोळ्यात 'आज बाई आलीच नाही' याचा क्रोध होता. नम्रपणा व मोठ्या माणसांप्रती आदर हे दोन गुण गांधीवादातील ठळकपणे जाणवणारे गुण आहेत याची वेळीच आठवण आल्यामुळे मी विनम्र चेहरा करून चटई हातात घेऊन आईचे तिसरे महायुद्ध पाहू लागलो. अजून तिला माझ्या मनात असलेल्या वैचारिक बदलांचा अंदाजच आलेला नव्हता. तिच्यामते मी तिला अत्यंत घाबरून पटकन उठलेलो होतो. वास्तविक पाहता 'ही आपली माता आहे व हिचा प्रत्येक शब्द जमीनीवर पडण्याआधी आपण झेलायचा आहे' ही कैकेयी-राम-दशरथ या ऐतिहासिक संवादातील प्रभू रामचंद्रांची भूमिका मी घेतलेली होती.

"काय केलंवतं ताईनी???"

"भजी"

"दुसरं आवडतंच काय भाईंना... सारखी तिन्ही त्रिकाळ भजीच..."

हेच ते! हेच ते वाक्य होतं ज्यापासून माझी भूमिका सूक्ष्मपणे प्रदर्शित करता येणार होती.

"ते स्वकष्टाची भजी खातात..."

खट्ट! फरशी पुसणारा हात थांबणे, मान मागे फिरून दोन भेदक डोळे माझ्यावर रोखले जाणे आणि मी थरथर कापणे या प्रक्रिया एकाच क्षणी घडल्या.

"कुणाशी बोलतोयस??"

'तू कोण आहेस, मी कोण आहे आणि आपण दोघे एकमेकांचे कोण आहोत' या सर्व प्रश्नांना पर्यायी शॉर्टफॉर्म म्हणून आई हा प्रश्न वापरायची. मी अजून साबरमतीलाच!

"मी खरं ते बोललो... रागावली असलीस तर राहू देत..."

आता फरशी पुसणे पूर्ण थांबले. आईला आपल्या मुलाच्या वागण्यातील सूक्ष्म बदलांवरूनच डोक्यात काय खुळ असू शकेल याचा अंदाज येत असावा.

"अभ्यासाला बस.. " एक 'दरार्‍याने ओतप्रोत भरलेली' विनंती!

'तेच करतोय' हे पारंपारिक चिडचिडे उत्तर न देता मी म्हणालो..

"बसतोय.. "

आईला असलेले काम आणि तिला माझ्यात जाणवणारा बदल यातील काम या बाबीला तिने तूर्त अधिक प्राधान्य दिले.

चटईवर बसून हातात पुस्तक घेतले तरी अभ्यास होईना! कारण आजवरची पॉलिसी अशी, की जे सहज समजत आहे तेवढेच वाचायचे. जे समजत नाही ते परिक्षेच्या आदल्या दिवसावर सोडायचे.

पण गांधीवादातील सत्याचा आग्रह मला स्वस्थ बसू देईना! एक प्रकरण समजतच नव्हते. हे समजल्याशिवाय पुढचे प्रकरण वाचायला घेणे हा 'अगांधीवाद' होईल हे मला माहीत होते. मग मी 'अभ्यास' हे क्षेत्र बाजूला ठेवून 'वागण्यातील साधेपणा' हे क्षेत्र निवडले. 'वागण्यातील साधेपणा' या अंतर्गत अनेक बाबी येत होत्या. कंपॉसवरील अनेक स्टीकर्स, बॅगमधील अनेक अनावश्यक कागद, संपलेल्या पेन्सिली अशा बाबी वेगळ्या काढून 'यांचे काय करावे' यावर तीर्थरुपांचा सल्ला घेणे योग्य ठरेल असा एक विचार केला. यामागे 'या त्यांच्या स्वकष्टार्जित दौलतीतून आलेल्या वस्तूंचे अवशेष आहेत' ही भूमिका होती. यावर आपला हक्क केवळ कर्तव्यपुर्तीचाच! हे स्वतःला पूर्ण पटल्याची खात्री झाल्यावर मग मला अनेक वस्तू अनावश्यकच वाटू लागल्या. त्याचा परिणाम म्हणून मी शोकेसमधील एक कापडी वाघ गॅलरीतून खाली फेकून दिला. हा वाघ आपल्या शोकेसमध्ये असावा असा हट्ट म्हणे मी कधीतरी लहानपणी केलेला होता. तसा मी हट्टी नव्हतोच, उलट माझ्यात एक नैसर्गीक गांधीपण होते. 'त्या वाघाकडे बघून नुसती मान खाली घालणे' ही माझी कीव आणणारी कृती असायची व त्यावर आई बाबांना म्हणायची..

'कध्धीनव्वद मागतोय तर द्या की घेऊन..."

आणि मग वाघ वगैरे गोष्टी घेतल्या जायच्या. हा वाघ १९७८ साली इंदौरला घेतलेला होता. हे १९८६ साल चालू होतं! वाघाला काय लाईफ लिमिट आहे की नाही?

तो वाघ मी फेकून दिला. मला वाटले संपला आता वाघ! आता कसला वाघ?? मला एक सात्विक आनंद मिळाला. आयुष्यात अजिबात आवश्यक नसलेली अशी एक गोष्ट मी स्वतःहून त्याजलेली होती. ती त्यागताना 'ही गोष्टही वडिलांच्या स्वकष्टानेच आलेली आहे' हे लक्षात आलेले असले तरी 'या गोष्टीचे आजच्या वयात काहीही मूल्य नसून शोकेसमधील काही सेन्टिमीटर स्क्वेअर जागा अडवणे व घराला भयावह स्वरूप आणणे' या व्यतिरिक्त त्या वस्तूमधून काहीही निघत नाही हे लक्षात येणे अधिक तीव्र ठरले होते.

पाचव्या मिनिटाला अंबवणेकर आजी नावाच्या एक आजी घराच्या दारात उभ्या! आणि त्यांच्या हातात तोच वाघ!

"हे भूषणने फेकलं खाली..."

वाघाचा लिंगबदल त्यांनी फार सहजपणे केला.

'भूषण रोज एक वस्तू खाली फेकतो' अशा आविर्भावात त्यांनी ते वाक्य अतिशय शांतपणे उच्चारलेलं होतं! आईच्या डोळ्यांमधील भाव वर्णिण्यास एक लेखक किंवा कवी म्हणून मी अपयशी ठरत आहे हे कबूल करतो.

तिने फक्त माझ्याकडे पाहिले. आता मला बोलणे व भूमिका मांडणे अत्यावश्यक होते.

"अनावश्यक वस्तूंच्या मोहाचा त्याग करत होतो मी.. अशी काय बघतीयस???"

"थोबाड फोडीन"

माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी तो वाघ घरातून दिसेनासा करण्यातील गांधीवादाचे आईने व्यक्त केलेले मूल्य फारच अधिक असल्याचे जाणवल्याने मी तो वाघ पुन्हा शोकेसमध्ये ठेवला. तरी ठेवताना पुटपुटलोच!

"चूक माझीच आहे.. मला प्रायश्चित्त घ्यायलाच हवे... "

मी लगेच चटईवर ध्यान लावून बसलो. ते ध्यान लावलेले असतानाच एक विचार प्रकर्षाने माझ्या मनात आला. तो म्हणजे 'भाईंना' विचारणे की 'थोबाड फोडीन' या उक्तीचे गांधीवादातील स्थान काय!

"चल रे जेवायला... "

अर्ध्या तासाने ही हाक ऐकू आली तेव्हा मी बुद्धासरखा ब्रह्मानंदी स्मितहास्य असलेला चेहरा करून सर्व जगाला उगाचच माफ करत होतो. अत्यंत सावकाश उठून मी हात, पाय व तोंड धुतले व टेबलवरील ताट हातात घेऊन खाली बसलो. आई टेबलवर ताट ठेवून खुर्चीवर बसलेली होती.

"हे काय??"

"इथेच बसतो"

"मला वाढायला सारखं उठावं लागेल.. वर बस..."

आता साधेपणा म्हणून खाली बसणे कन्टिन्यू करण्याचा प्रयत्न करावा की आईची आज्ञा म्हणून वर बसावे या डिलेमामध्ये मी शेवटी वरच बसलो. एक पोळी खाऊन झाल्यानंतर विचारले..

"एक पोळी घेऊ का??"

"नादारीवर आहेस???"

'पोळी घे' या दोन शब्दांना हे दोन शब्द पर्यायी आहेत हे ज्ञान मिळताक्षणी मी एक पोळी वाढून घेतली व तिचा पहिला घास खातानाच मला जाणवले की 'आई असताना गांधीवाद साधणं अशक्य असावं"!

'आई की गांधी' या विचारांच्या तुंबळ युद्धात असतानाच मला चटईवर वामकुक्षी घेण्याचा मोह झाला. गांधीजी दुपारी काय करायचे यावर चर्चाच झालेली नव्हती. 'दुपारी झोपणे' यात अहिंसा, सत्याग्रह, स्वावलंबन यापैकी कशाचा भंग वगैरे होतो का यावर मी विचार सुरू केला. आता मी दुपारचा झोपणार यात 'मी अभ्यास करावा ही आईची इच्छा' सोडली तर कुणाचीच हिंसा होणार नव्हती हे माझे मला पटले. बरं! स्वावलंबन नसण्याचा काही प्रश्नच नव्हता. माझा मी झोपणार, घरातील एक पांघरुण अंगावर घेणार, पंखाही लावणार नाही (थॅन्क्स टू त्या काळातले पुणे) मग परावलंबित्व काय? उरता उरली बाब सत्याग्रहाचा भंग होतो की काय याची! तर 'मी जर झोपूनही झोपलोच नाही म्हणणार असेन' तरच तो भंग होईल असे मानून मी आडवा झालो.

लगेचच उभा झालो. कारण बेल वाजली आणि आईचा हुकूम आला.

"दार उघड रे"

दार उघडले तर दारात एक पन्नाशीचा गरीब माणूस हातातील ताटात काही चमत्कारीक देवादिकांचे फोटो ठेवून दान मागत होता. हा मुळात (त्यावेळेस जुने घर होते) तिसर्‍या मजल्यावर आला कसा याचा संताप मनात आला. मात्र तो लगेच मागे ढकलत मी नम्रपणे अती सस्मित चेहर्‍याने म्हणालो.

"काही नाही ... जा तुम्ही..."

"कोणेरे??"

आईला मी उत्तर दिले.

"हे भीक मागायला आलेत..."

तरातरा आई तिथे आली आणि म्हणाली..

"दुपारी सरळ घरी कसले येता??? जा???"

मला फार वाईट वाटले तो अपमान बघून! मी पुन्हा नम्रपणे त्या माणसाला म्हणालो..

"खरच जा.. इथे काही नाही..."

तर आई मलाच डाफरली.

मी ते डाफरणे ही देवाघरची फुले मानून चटईवर आडवा झालो. मगाचचे 'वाघ' प्रकरण आत्ता निघेल याची मला यत्किचिंतही कल्पना नव्हती. दार आपटून आई तिथे आली.

"भूषण?? मगाशी वाघ का फेकलास??"

सात्विक चेहरा करून मी म्हणालो..

"काय उपयोग त्या वाघाचा??"

"मग घेतला कशाला?? पंधरा रुपयांचा वाघ आहे तो.. काय उपयोग म्हणजे काय?? डोकं ठिकाणावर आहे का? "

"चुकलं"

अजूनही आईला त्या नम्रपणामागची भूमिका समजत नव्हती. तीही झोपली. मीही झोपलो.

डास!

एक डास कानाशी गुणगुणू लागला तसा माझा हात हिंसक इच्छेने घोंघावला. मात्र तत्क्षणी अहिंसा तत्वाची जाण होऊन मी शांतपणे उठून बसलो. आईलाही जाग आली. मी त्या डासाला फक्त हाताने घालवत राहिलो. मारायची इच्छाच होईना!

"काय रे??"

"काही नाही"

"मग हातवारे काय करतोयस??"

"डास आहे"

"मार तो"

"छे छे"

"छे छे म्हणजे काय?"

"ती हिंसाय"

"डोंबल्याची हिंसा"

आई उठली आणि परस्पर हिंसा झाल्याचे आणि त्याचे पाप मला न लागल्याचे सुख मनात उपभोगत मी पुन्हा आडवा झालो.

संध्याकाळी पाच वाजता खेळायला निघालो. (अगेन थॅन्क्स टू दॅट टाईम पुणे ज्यात खेळायला मैदाने असायची).

"भूषण आज खेळायला जाऊ नकोस... आत्ता महाजन येणारेत"

हे महाजन पुर्वी कधीतरी ज्या वाड्यात आई बाबा होते, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी, त्या वाड्यातील एक भाडेकरू होते. उगाचच त्यांच्याशी संबंध राहिलेले होते. अत्यंत बोअर कुटुंब होते ते! गांधीवादाची बेभानता जर मनात नसती तर मी 'ह्यॅ.. महाजन येणार म्हणून मी थांबू.. काहीही.. " असे म्हणून निघूनही गेलो असतो. पण थांबावे लागले.

आणि आले महाजन! काका, काकू आणि राजश्री नावाची एक पाच वर्षाची मुलगी! ही मुलगी भयंकर होती. ती चोवीस तास धिंगाणाच घालायची. 'तिच्या धिंगाण्यातून आपली सुटका व्हावी' या उद्देशानेच महाजन कुटुंबीय रोज संध्याकाळी कुणा ना कुणाकडे जायचेच! एकदा कुणाकडेतरी गेले की मग 'तो धिंगाणा' ही त्या कुटुंबाची चिंता असायची. हे आरामात!

राजश्री! एक महाभयंकर प्रकरण होते ते! एकदा तिने तिच्याच वडिलांच्याच पानात पाण्याचा ग्लास ओतला होता. तिच्यावर तिची आई ओरडल्यावर खाली बसून भोकाड पसरले होते. ती येता जाता कुणालाही थपडा मारायची. म्हणजे मोठ्या माणसांनाही! तिला काही बोलले तर ते महाजन काका किंवा काकू फुरंगटायचे. 'आमच्या मुलीला सगळेच शिव्या देतात' असे एक वाक्यही मी मागे ऐकलेले होते. 'मी घरात थांबणे' हे 'कुणी येणार असल्यावर आपण बाहेर निघून जाऊ नये' या संस्कारांचा भाग नसून 'राजश्री घरात आल्यावर माझी आईला मदत' या स्वरुपाचे कार्य होते हे मला माहीत होते.

'पिया तू अब तो आजा' हे हेलनचे गाणे तिला नुसते तोंडपाठच नव्हते तर त्यावर त्या वयातही ती अगदी तश्शीच नाचायची. आमच्या शेजारी असलेल्या दोन मुलांना तिने एकदा सरळ कानाखाली लावलेली होती. त्याचा परिणाम त्यांनीही तिला मारण्यात झाला आणि वाद झाले. वाद महाजन व आमचे शेजारी यात झाल्यामुळे आईला कोणती बाजू घ्यावी हेच समजेना! राजश्री मात्र ज्वलंत भोकाड पसरायची. आमच्याकडच्या एका सोफ्याचे कुशन तिच्या नखांमुळे सोललेले होते. अख्खी शोकेस ती खाली काढून बसायची.

महाजन आमच्याकडे आले की काही काही नेहमीच्या पातळ्या असायच्या. पहिल्या पातळीत खूप दिवसांनी भेटणे व राजश्री सर्वात लहान असल्यामुळे तिचे तोंडभरून कौतुक या बाबी असायच्या. खूप खूप आनंद व्यक्त करून झाला की मग राजश्रीने सुरू केलेल्या पसरापसरी व तोडफोड या कार्याला लाडे लाडे 'हे बघ हे बघ.. त्याच्या ऐवजी हे घे... हे मस्तंय' वगैरे सूचना देऊन नियंत्रणात आणण्याचे अशक्त प्रयत्न सुरू व्हायचे. 'पेशन्स संपायला लागणे' हा प्रकार पहिल्या पाच मिनिटांतच सुरू व्हायचा. राजश्री वाट्टेल तिथे नाचू लागायची. कशालाही हात लावायची. मग तिसर्‍या पातळीत 'भूषण.. तू जरा खेळव रे तिला' ही स्टेप घेऊन आई स्वतःचे पूर्ण लक्ष महाजन दांपत्यावर देता येईल का हे तपासायची. मात्र त्यात माझा बळी जातो हे तिला लक्षात येऊनही त्याबद्दल ती वाईट वाटून घ्यायची नाही. माझा बळी गेला तरी चालेल अशी माझी तर्‍हा व्हायची. मी तिच्या हातातली एखादी वस्तू 'अगं फुटेल ते' म्हणून हातातून घेईपर्यंत ती तिसरीच वस्तू घेऊन नाचत सुटायची. ती वस्तू मौल्यवान (निदान माझ्यासाठी) असल्यामुळे मी तिच्यामागे धावायचो. तिला हा खेळ पळापळीसारखा वाटल्यामुळे ती खिदळत धावायची आणि शेवटी ती वस्तू फेकून द्यायची. ती मी हस्तगत करेपर्यंत वेगळ्याच वस्तूचा ती ताबा घ्यायची. ती वस्तू मात्र मी खेचूनच घ्यायचो. 'शक्ती प्रदर्शन केले' याची बोंब मात्र ती जोरात मारायची. 'हा मला ते घेऊ देत नाही' अशी एकदा तक्रार तिने केली की तिच्या आई वडिलांना काय वाटेल असे वाटून मीच ती वस्तू तिच्या हातात द्यायचो.

चवथ्या पातळीत मी मनातून प्रचंड भडकलेला असणे व आईला अशक्य कलकलाट झालेला असणे या पार्श्वभूमीवर आई महाजन कुटुंबाशी 'राजश्री खूप खेळते नाही' असे बोलून आडवळणाने 'बघा की जरा स्वतःच्या मुलीकडे' हे सुचवून पाहायची. परिणाम उलट व्हायचा आणि तिची आई तिची कौतुकेच सांगायला लागायची. 'राजू.. ते हे करून दाखव, ते ते करून दाखव' असे सुरू व्हायचे. ते जे काय अर्धवट केले जायचे ते बघून स्तुती करण्याची शिक्षा आम्हाला मिळायची. खरे तर ते लोक आले की मी घरात थांबायचो कारण मला माझ्या वस्तू सांभाळायच्या असायच्या. हेही एक होतेच म्हणा!

पाचव्या पातळीत मात्र आई त्या लोकांसमोर खाद्यपदार्थ व चहा ठेवून सारखे 'बाकी काय, बाकी काय' असे विचारत व नि:श्वास सोडत 'बरं झालं बाई आज आपण भेटलो, नाही का, आता येत जा बर का' असे काहीतरी आविर्भाव करू लागायची. राजश्री या पातळीला 'अर्धवट खाणे व बरीचशी सांडासांड करणे' या कार्यात मग्न असायची.

"काका येतीलच नं आता?"

या महाजन काकूंच्या प्रश्नामुळे 'बाईगं, म्हणजे हे येपर्यंत हे तिघं थांबतायत की काय' हा धोका आईला पाचव्याच पातळीला जाणवायचा.

खाणे पिणे झाल्यानंतर सहावी पातळी सुरू व्हायची. आता राजश्रीच 'चला घरी' असा आग्रह करत असायची. त्यावर आम्हाला लटकेच 'काय गं?? कंटाळलीस इतक्यात' असे विचारून प्रेम व्यक्त करावे लागायचे. मग महाजन काका आणि काकू विविध विषय आणि अनुभव सांगायचे. कुणीकडून 'आपल्या दिव्य मुलीचा जास्तीत जास्त वेळ इतरांच्या घरी निघावा' ही सुप्त इच्छा त्यात असायची. मी तर सरळ गॅलरीत उभे राहून खाली खेळणार्‍या मुलांशीच गप्पा मारायचो. यातून 'माझा तुमच्यातला इन्टरेस्ट व तुमच्याप्रती असलेली कर्तव्ये आता संपलेली आहेत' असा संदेश मी इफेक्टिव्हली देत राहायचो.

सातव्या पातळीला मात्र आईच घरकमाला लागायची आणि लक्ष काहीसे कमी करायची. तो संदेश जाणवल्यामुळे मग निरोपा निरोपी, राजश्रीचे अमाप कौतुक, कुंकू लावणे वगैरे प्रकार! शेवटी एकदाचे ते जायचे!

आज माझा गांधीवादाचा पहिलाच दिवस असल्यामुळे 'राजश्री येणे' हा माझ्यासाठी एक मोठाच प्रयोग ठरणार होता. मी थांबलो. आणि ते लोक आले.

हातातला चॉको बार मला दाखवत आणि खिजवत नाचत नाचत राजश्री आत आली. 'माझ्याकडे तसा चॉकोबार नाही' हा तिचा निरागस आनंद मी तिला मिळू दिला. जणू आपल्याच अपत्याकडे पाहात आहोत असा मी चेहरा केला त्याही वयात!

काकू - दादाला नाही आणलास ना??

राजू - न्ना!

काकू - रडायलाच लागली अहो.. भूषणलाही घेऊ म्हंटल्यावर...

आई - छे हो.. काहीतरी काय.. याला कशाला..

मी - छे छे.. मला नकोय...

माझ्यातील गांधी बोलले.

'मला नकोय' या दोन शब्दांमुळे राजश्रीला 'माझ्याकडे चॉकोबार नसल्याचा' मिळत असलेला आनंद लोप पावला. तिने त्याक्षणी तो चॉकोबार जमीनीवर फेकला आणि तोंडात जेवढा काही त्याचा भाग होता तो डायनिंग टेबलवर रिता केला.

प्रचंड संताप ही पातळी हे लोक आल्याच्या दुसर्‍याच मिनिटाला आमच्या घरात गाठली जायची. पण 'आपण सगळ्यांशी चांगलेच वागावे' हा आईचा विचार तिच्या धाकामुळे मुरलेला होता.

डायनिंग टेबल व खाली अर्पण करण्यात आलेल्या चॉकोबारचे काय करायचे याचा तसुभरही विचार न करता काका व काकू राजश्रीला लाडात 'असं काय राजू... असं करतात का' वगैरे म्हणू लागले. आईने दोन्ही ठिकाणे पुसून घेईपर्यंत राजश्रीने गॅलरीतल्या कुंडीत ठेवलेली एक गारगोटी भिरकावून दिली. ती एका शिंप्याच्या दुकानाच्या टपावर पडलेली पाहून मी दचकून राजश्रीला मागे ओढले. त्याच क्षणी तिने आकांडतांडव सुरू केले. मी गांधीवादातच!

"असं रडू नकोस.. तू दगड फेकलास की नाही.. मग आता तो माणूस वर येऊन आपल्याला शिक्षा द्यायला लागला तर... त्याला तू दिसू नयेस म्हणून मी तुला मागे घेतले" वगैरे! मला माझ्याच समजावणीच्या स्वराचे पराकोटीचे नवल वाटत होते.

राजश्रीने फडाफडा मला चार थपडा लगावल्या. "हां.. असं मारायचं नाही' असं तिला सौम्यपणे शिकवून तिचे बाबा फरसाण खाऊ लागले. माझे हात आता शिवशिवू लागलेले होते. गांधीवादाची ऐशी की तैशी म्हणावेसे वाटत होते. पण संयम!

"हे काये???"

राजश्री घरी आल्यानंतर हा प्रश्न ती किमान एक्कावन्न वस्तू पाहून तरी विचारतेच! आजचा हा पहिलाच होता.

"वॉल पीस.. माझ्या आईने केलाय"

"मला..."

मला तो वॉल पीस तिच्या हातात देण्यातील धोका जाणवला. त्यावर काचांचे लहान तुकडे होते. ते तर फुटले असतेच वर वॉलपीसचे वाटोळे झाले असते ते वेगळेच!

"अंहं... तो नाही घ्यायचा हं हातात???"

मी म्हणजे अगदी पाळणाघरातील मावशींइतका गोड बोललो.

"मSSS लाSSSSSS"

वॉलपीस अर्थातच तिला द्यायला लागलाच. कारण न दिल्याचे परिणाम दिल्याच्या परिणामांपेक्षा भीषण असतील असे नेहमीच वाटायचे.

एक एक काचेचा तुकडा वेगळा निघू लागला. मी वक्तृत्वकलेतील सफाईची परमावधी गाठू लागलो.

"असे नको काढूस ते तुकडे... ते काकूने फेविकॉलने चिकटवलेत की नाही?? अं?? .. मग ते निघाल्यावर काहीतरीच दिसेल नं?? अं??? .. हे घे... हा बघ बॉल.. क्रिकेट खेळुयात?? .. राजू... अगं ते तुकडे नको काढूस... "

खुद्द राष्ट्रपिताही असे बोलू शकले नसते. पण तिचे ते काम थांबेना

मग मी अगदी सस्मित चेहर्‍याने स्वयंपाकघरात जाऊन महाजन काकाकाकूंना माझ्या आईसमोर म्हणालो.....

"राजश्रीला वॉलपीस खूप आवडतो वाटतं.. खेळतीय घेऊन... "

"अरे विचारू नकोस... वॉलपीस म्हणजे तर जीव की प्राण...."

मात्र माझ्या म्हणण्याचा व 'कोड लॅन्ग्वेज'मधील संदेशाचा आईवर परिणाम झालेला होताच. ती तरातरा हॉलमध्ये आली. वॉलपीसचे भर राजदरबारात होत असलेले वस्त्रहरण पाहून तीळपापड झाला तरी लाडात म्हणाली..

"अरे बापरे... राजूने तर अगदी कामालाच लावले काकूला.. अं??? ... "

असं म्हणून बिचारी ते सगळे आवरू लागणार तोवर राजू रडायला लागली. तो आवाज ऐकून काका काकू बाहेर आले.

"काय झालं???"

"काही नाही... हे घे... खेळ... हं???"

गेला वॉलपीस... !!

राजश्री ही व्यक्ती लोकांना गांधीवादी बनवू शकत नसली तरी अध्यात्मिक नक्कीच बनवू शकत होती. भौतिक गोष्टींचा, तेही आपणच निर्मिलेल्या वॉलपीससारख्या भौतिक गोष्टींचाही मोह सोडायला लावण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी होते.

तोवर दारातून कुणाचीतरी हाक ऐकू आली.

"ओ ताई... "

दारात गेलो तर शिंपी उभा, हातात गारगोटी! महाजन कुटुंबीय, मी आणि आई असे सगळे तिथे!

"हे कोन फ्येकलं???"

खरे तर गांधीवादात सत्याची कास धरली जायला हवी. माझा काहीतरी भयंकर गैरसमज झाला ऐनवेळी! मी गांधीवादावरून 'सगळ्या वर्गाचे नुकसान होऊ नये म्हणून काहीतरी त्याग करणारे जे कुणी थोर व्यक्तीमत्व होते' त्यांच्या 'वादा'वर शिफ्ट होत एकदम राजश्रीवर होऊ शकणार्‍या भडिमाराला स्मरून बोलून गेलो...

"मी... मी टाकली ती गारगोटी... चुकून टाकली... माफ करा..."

वयाच्या सोळाव्या वर्षी मुलाला मारू नये याच दृष्टीने केवळ आईने मारले नाही इतकेच! अन्यथा रात्री मला कसे झापण्यात येईल हे मला आत्ताच लक्षात आले. शिंप्याची माफी मागून, त्याला फरसाण आणि चहा देऊन आणि त्याच्याशी खूप नम्रपणे बोलून आईने त्याची बोळवण केली.

इकडे राजश्रीने आता खुद्द माझेच कपाट उघडलेले होते. जमवलेले स्टॅम्प्स, कॉईन्स आणि अक्षरशः मिळेल ती वस्तू हातात घेऊन, निरखून तिने काही वस्तूंवर हक्कही दाखवायला सुरुवात केली. एका खोट्या लॉकेटला तिच्या गळ्यात स्थानही मिळाले. माझा गांधीवाद तिच्या प्रत्येक कृत्याबरहुकूम प्रखर होऊ लागला. अधिकाधिक सात्विक स्मितहास्य आणि 'अगं?? असं कशाला केलंस??' असे बुळचट प्रश्न माझ्या तोंडातून यायला लागले. त्यातच आईने बटाटेवडे खायला या असा आदेश अत्यंत रुक्षपण केला. त्या रुक्षपणामागे गारगोटी होती हे फक्त मलाच माहीत होते. काका आणि काकू तर उलट मलाच विचारत होते.

"अशी कशी काय रे फेकलीस गारगोटी?? लागली असती ना कुणालातरी???"

हाच प्रश्न तिसर्‍यांदा विचारला गेल्यावर माझ्या गांधीवादाला हळूहळू सुरुंग लागायला सुरुवात झाली.

माझे स्मितहास्य करणारे फाकलेले ओठ आता कोपर्‍यात कडवटपणा साठवू लागले. 'भाई' या माणसाला दोन तास भेटून भजी खाताना ऐकलेली अनेक सुत्रे प्रत्यक्ष व्यावहारिक जगात जगण्यास उपयुक्त नाहीतच तर उलट अन्यायकारक आहेत हे बटाटेवडे खाताना जाणवायला लागले. आता मी 'राजूने गारगोटी फेकलेली होती' असे म्हणणे हा धड गांधीवादही झाला नसता अन कुठलाच वाद झाला नसता. वाद एकच होणार होता जो हे लोक निघून गेल्यानंतर होणार होता. आणि तो वाद कोणता पक्ष जिंकणार हे आधीच ठरलेले होते.

तेवढ्यात राजूने रिकामी झालेली तिची स्टीलची डिश (तिला हमखास स्टीलचीच डिश देण्यात यायची) टेबलवर आपटायला सुरुवात केलेली होती. पुढचा बटाटेवडा त्यात पडेपर्यंत हा ध्वनी येत राहणार हे जाणवल्याच्याच क्षणी आईने एक वडा त्यात टाकला. तो गरम लागल्याने एक स्वतंत्र भोकाड पसरून झाले तेव्हाही मी कसाबसा 'रडू नकोस... फुंकर मारून देऊ का??" असेच म्हणत होतो. आईकडे तर पाहण्याचे धाडसच उरलेले नव्हते. आज पहिल्यांदाच असे वाटत होते की हे महाजन कुटुंबीय जितके जास्त थांबतील तितके चांगले कारण बोलणी खाणे तितकेच लांबणार होते.

"मला सॉस' असे म्हणून राजश्रीने हातात घेतलेली सॉसची बाटली अर्ध्याहून अधिक ताटलीत ओतली. सॉस टेबलवरही सांडला. मला आणखीन एक वेगळेच नवलही वाटले. साली ही बाटली मी हातात धरून सॉस ओतायचा प्रयत्न करायचो तेव्हा मिनिटभर उलटी करून धरून ठेवावी लागायची, वरून थपडा मारायचो मी! या पोरीने नुसती उलटी काय धरली तर पार उपडी???

आत्ता तिचे प्रताप हसण्यावारी नेण्याची पातळी असूनही तसे घेतले गेले नाहीत याचे कारण 'मी व गारगोटी' हे होते हे मला त्यातही जाणवले.

मी सराईत वेटरप्रमाणे टेबलावर फडके बिडके मारले. त्यातही राजश्रीने मला उगाचच्या उगाच चार सहा थपडा लगावल्या. आता मात्र सर्व संस्कार आणि गांधीवादाचे भूत फेकून देऊन तिच्या एक कानफडात वाजवण्याची वेळ आलेली आहे हे माझ्या मेंदूने माझ्या शरीराला सांगितले.

ऐन संसारात असलेल्याला सन्यासाची प्रबळ कामना व्हावी इतपत क्षमता राजश्रीमध्ये नक्कीच होती.

मला नंतर वडाच नकोसा झाला. राजश्रीने अचानक खुर्चीवर उभे राहून एक पाय टेबलवर ठेवून नेपोलियनच्या थाटात हात वर करून वड्याचा एक तुकडा अचूक खिडकीतून बाहेर फेकला. मला नेम धरूनही फेकता आला नसता, हिचे सगळेच ठोकताळे सहज बरोबर येत होते. तो वड्याचा तुकडा 'राजश्रीच्या हातातून निघून खिडकीपर्यंत पोचताना' आईच्या कानाजवळून 'सुम्म' असा आवाज करत गेला.

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून दचकून आईने मागे पाहिले तेव्हा राजश्री खुर्चीवरून खाली पडत होती. मोठा गदारोळ! काहीही झालेले नसताना 'केवळ आपण पडल्याचा अपमान' म्हणून तिने सातमजली भोकाड पसरलेले होते. महाजन काकू 'काय खुर्च्यायत' असे म्हणून या अतिरेकी कृत्याची जबाबदारी शासनावर ढकलू पाहात होत्या. काका राजश्रीला उचलून 'उंदीर पळाला, गोळी खा, काहीच झालेलं नाहीये, पाणी देऊ का' असे सांत्वन करत होते. आई साखर, पाणी, हळद असा मिळेल तो पदार्थ हातात घेऊन राजश्रीकडे धावत होती.

"याने खुर्ची हालवली"

रडता रडता माझ्याकडे रेड्याच्या हिंसक नजरेने पाहात राजश्रीने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्याशिवाय बाकीचे अवाक झालेले असतानाच्याच क्षणी माझ्यातील गांधीवाद गळून पडला. घशाच्या शिरा ताणून मी एकच वाक्य बोललो...

"चालती हो.. आमच्या घरात नासधूस करतेस तू आणि तुझे आई बाबा तुला पाठीशी घालतात"

माझा रुद्रावतार बघून आईसुद्धा थक्क झालेली होती. त्यातच माझे पुढचे वाक्य कानावर आपटले.

"हिला कुणी बोलू नये म्हणून मी गारगोटी फेकल्याचे सांगितले.. गारगोटी हिने फेकलेली होती.. मेला असता तो शिंपी मगाशी"

राजश्रीच्या आईबाबांची आता अपेक्षा अशी होती की माझ्या आईने मधे पडून मला चांगली समज द्यावी. पण आई अवाक होऊन माझ्याकडेच बघत होती. त्यातच मी तिसरे वाक्य बोललो.

"माझी आई तुमच्यासाठी राब राब राबते.. हिचे वाट्टेल ते वागणे आम्ही सहन करतो.. आम्ही कधी येतो का तुमच्याकडे?"

यावेळेस मात्र मला धपाटा मिळालाच!

पण त्याचा आवाज व वेदना मलाही जाणवल्या नाहीत कारण महाजन कुटुंबीय काहीतरी पुटपुटत बाहेर निघालेले होते. आता राजश्री अजिबात रडत नव्हती कारण तिच्या आईबापांचीच जिथे खरडपट्टी निघाली तिथे ती काय बोलणार?

ते निघून गेल्यावर मी खेळायला न जाता आईला मदत म्हणून डिशेस वगैरे आवरायला लागलो. आईने गॅस बंद केलेला होता. बाबा आल्यावर त्यांना ती दोन तीन वडे त्याचवेळेस करून देणार होती. मूकपणे आम्ही दोघे स्वयंपाक घरात वावरत होतो.

"खरच तिने फेकली गारगोटी??"

आईच्या या प्रश्नाचा मला खूप राग आला. तुच्छ कटाक्ष टाकून मी म्हणालो..

"मी कशाला खोटं बोलू??"

"ते राहूदेत... मी आवरते... खेळायला जा.. अजून वडा हवाय का??"

"अंहं.. नको.."

"तू शिंप्यासमोरच का सांगितलं नाहीस की तिने फेकली म्हणून....??"

"ते आपल्याकडेच आलेले लोक होते... शिंपी तरीही आपल्यालाच बोलला असता ना?"

खूप क्षण गेल्यानंतर हळूच आई पुटपुटली...

"एकदा त्यांना हे ऐकवायलाच हवे होते... जा रे तू खेळायला... आवरीन मी..."

आईचे ते ओल्या शब्दांचे वाक्य गांधीवादाच्या खुळापेक्षा बरेच सुखद वाटले. खूप मोठ्या समुदायाचा पाठिंबा असला तरच गांधीवाद अंगी बाणलेला दाखवणे परवडते हे तात्पर्य काढून मी खेळायला गेलो.

========================================

(वरील कथेतील 'आम्ही तुमच्याकडे कधी येतो का' या उतार्‍यातील सर्व वाक्ये काल्पनिक आहेत व घरी येणार्‍यांशी 'तुम्हा सर्वांप्रमाणेच' आमच्याकडचे कुणी कधीच असे बोलत नाही. मात्र मावशी, तिचे मिस्टर, त्यांचे 'जयप्रकाश कारावास प्रकरण', गांधीवाद, माझ्या मनातील खुळ व 'राजश्री' हे सत्य प्रकार आहेत.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अरे वा... खुप सुंदर... Happy

भूषणजी आपण खुप जवळ आलो आहोत, काकांना आणि नलिनी ताईंना साष्टांग नमस्कार सांगा, आम्ही वाट बघत आहोत म्हणा... कालच त्यांच्या घरावरुन चक्कर मारतांना 'आता मार्च संपत आलेला आहे...' हे मी बायकोला सांगितले.

खुप शिकण्यासारखे आहे यांच्याकडुन.

ओह, ते भजी प्रकरण तिला सांगू नका हां! बिचारी खूप प्रेम करते माझ्यावर! आई तिची सर्वात आवडती बहिण होती. मला ती आईच्याच स्थानी आहे.

गझल मुशायर्‍याच्या आधिच्या प्रकाशन समारंभात मी त्यामुळेच तिला स्टेजवर बोलावले होते. आपण फोटो पाहू शकाल श्री भुंगा यांनी वृत्तांत लिहील्यावर!

धन्यवाद उदयराव!

-'बेफिकीर'!

मस्त ...
वाघ मागण्याची पद्धत तर अतिशय सुरेख होती ... वरून "मी कुठे मागितला होता !" अस म्हणायलाही वाव. Proud
अश्याच एका राजश्रीला मी स्वयंपाक घरात नेऊन आख्खी हिरवी मिरची खाऊ घातली होती लहानपणी.
डेंजर तमाशा झाला होता तेंव्हा. Proud

गांधीवादाचे भूतही मस्तच

मस्त '.' आईचे ते ओल्या शब्दांचे वाक्य गांधीवादापेक्षा सुखद वाटले .''अशा वाक्याने लेख संपवला तर
लेखन अती उत्तम .
''माझी आई तुमच्यासाठी राब राब राबते..वाट्टेल ते वागणे आम्ही सहन करतो ,आम्ही कधी येतो का तुमच्याकडे ''अस पण बोलावस वाटत होत पण तेवढ बोलवल नाही .कदाचीत एका दिवसाच्या आचरणामुळे सहिष्णुता जागली असावी .अस वाचायला जास्त प्रशस्त वाटल असत .
एकूण लेखनातील विनोद ,द्वाड मुलगी ,तिचे उपद्व्याप्,त्या त्या वेळी मनात आलेले विचार ,आईची शिस्त,
सगळ सगळ छान चित्रीत झाल आहे .पु.ले.शु.

छान आहे.
`त्यांच्या अपरोक्ष, अल्पोपहार' हे वाचून `माझे मराठी, हिंदी आणि इंग्रजी यावर सुरुवातीपासूनच प्रभुत्व असल्याचा माझा ग्रह असल्यामुळे' हे पटले! Happy

आजही हयात असलेले ज्योतिषी एम कटककर : हा पण विनोद आहे का?

हयात असलेल्या व्यक्तीचा(मावशीचे पती) उल्लेख ते गांधीवादी होते असा का आहे ? म्हणजे आता ते गांधीवादी नाहीत की काय?

शेवटचे कंसातले स्पष्टीकरण अनावश्यक वाटले.

अरे!!! सही लिहिलंय की हे!!! Biggrin
धम्माल आली वाचतांना Happy
ऐन संसारात असलेल्याला सन्यासाची प्रबळ कामना व्हावी इतपत क्षमता राजश्रीमध्ये नक्कीच होती. >>> Rofl
आमच्याकडेही एक अस्सेच वात्रट बाळ येते. माझ्या नवर्‍याला त्याला लीला अगदी सहन होत नाहीत. पण मी मात्र त्याला त्याच्या आईबाबांदेखत धपाटे घालत असते... बाकी कोणाला जुमानत नाही तो. फक्त माझेच ऐकतो. जेवणपण माझ्याच हाताने करत असेल तर ताटातले अगदी सगळे संपेस्तोवर पोटभर जेवतो. त्यामुळे बहुतेक त्याचे आईबाबा माझ्या ऋणात असावेत आणि मी त्यांच्या पोराला धोपटते तरी सहन करत असावेत..:खोखो: .आणि पोराचापण माझ्यावर खुप जीव... कितीही मार खाल्ला तरी त्याचे माझ्यावरचे प्रेम कमी होतच नाही Happy

Pages