simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच. कारण स्त्रीविषयीची जीवशास्त्रीय सत्यं, तिचा इतिहास, मिथ्यके, जडणघडण, तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचा तिचा वावर, त्या भुमिका आणि तिच्या मानसिक अवस्था या सगळ्याच गोष्टींचा तर्कसंगत आणि सविस्तर उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
आता, इथे हा लेख वाचणार्या बर्याच स्त्रिया खर्या अर्थाने स्वतंत्र व्यक्ती म्हणुन जगत/वावरत असल्या आणि पुरुष स्त्रियांनी माणुस म्हणुन जगण्याच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते असले तरी या सर्वांची सुरुवात कुठे झाली? काय, कसे व कधी? या सर्वांची उत्तरं मिळवायला, घडणार्या परिस्थितीचे मानसशास्त्रीय विश्लेषण करायला हे पुस्तक वाचण अपरिहार्य आहे.
'Woman is not born but made' पुस्तकातील अर्पणपत्रिकेच्या जागी असलेलं हे वाक्य. या वाक्यावरच थांबुन आपण विचार करु लागतो आणि त्यानंतर मांडलेल्या प्रत्येक सिद्धांतावर, स्पष्टीकरणवर थांबुन, विचार करुन, स्वतःचं परिक्षण करुन मगच पुढे जाणं ह क्रम बनुन जातो.
माझ्याविषयीच बोलायचं झालं तर, आमच्या घरात कधीच मुलगा-मुलगी असा भेद नाही केला गेला आम्हा भावंडांमध्ये, परंतु पितृसत्ताक पद्धती नक्की पाहिली. कुटुंबप्रमुख म्हणुन वडिलांची ठेवली जाणारी बडदास्त लक्षात येण्याइतकी उघड होती. खरतर त्यांची निर्णयक्षमता आणि तो निर्णय प्रत्यक्षात आणण्याची हातोटी आईच्या तुलनेत डावी असतानादेखिल त्यांना निर्णयस्वातंत्र्य सहज मिळते ज्यासाठी आईला झगडावं लागतं हे कळ्त होतं. किंबहुना हे असं का, ही परिस्थिती का घडली याचं विश्लेषण करण्यात मी माझ्या बालपणाचा बराच काळ खर्ची केला. पण ही परिस्थिती घडण्यामागची मानसशास्त्रची एक धूसरशी कल्पना जी मनात येत होती ती धडधडीतपणे, सुर्यप्र्काशासारखी लख्ख समोर आली या पुस्तकाच्या निमित्ताने. आणि पुन्हा एकदा वैश्विक सत्याचा सा़क्षात्कार झाला म्हणायला हरकत नाही.
घरात मुलं वाढवताना तरी समानता असल्यामुळे यातल्या बर्याच गोष्टी वाचताना अपरिचित वाटल्या पण थोडाच वेळ. लगेचच आपल्या आजुबाजूला, ऐकिव आणि माहितीतल्या गोष्टी आठवतात आणि सहजपणे दिलेल्या स्पष्टीकरणाचं समर्थन करतात.
पुस्तकाचं एवढं कौतुक ऐकुनही खरतर वाचायला घेताना मनाच्या कोपर्यात कुठेतरी धाकधुक होतीच की परदेशी स्पष्टीकरणं, तिथल्या सामाजिक परिस्थितीच्या आणि सुधारणवादी कल्पनांच्या अनुषंगाने केलेला उहापोह भारतीय समाजाला कितपत लागु होईल? पण स्त्रीचा हा धांडोळा वैश्विक आहे. बर्याचशा गोष्टी वाचताना तर ती भारतीय समाजाविषयीच बोलतेय किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीची पुर्ण जाणिव असलेल्या माणसाचंच हे लिखाण आहे असं वाटतं.
मला आठवत नाही नक्की केव्हापासून पण १२-१३ वर्षांची असल्यापासून, जेव्हापासून स्त्री-पुरुष भेदाची सामाजिक जाणिव व्हायला लागली तेव्हापासून स्वत:ला माणुस म्हणुनच वागणुक मिळावी या बाबतीत मी आग्रही आहे माझ्या संपर्कात येणार्या प्रत्येकच व्यक्तीकडून. गेलं एक तप स्वतःचं हे भान जाणिवपुर्वक सांभाळलय मी आणि इतरांनाही सांगितलय. हो, जाणिवपुर्वकच. कारण तुम्ही जरा बेसावध राहिलात तरी लगेच हे फरक, ही विषमता आग्रही/मोठी होऊन बसते. स्त्रियांवर केले जाणारे टिपिकल विनोद जेव्हापासून ऐकले तेव्हापासुन आपल्याला असं व्हायचं नाही हे पक्कं ठरवलेलं मनाशी. कारण त्या विनोदांत अतिशयोक्तीचा भाग असला तरी त्याची थोडी थोडी झलक मी आजुबाजूच्या बायका-मुलींच्यात बघतच होते. पण त्यावेळी स्त्री-पुरुष समानतेपेक्षापण आपल्याला दोन्हीचे चांगले गुण घेवुन जास्तीत जास्त चांगलं, पुर्ण आणि स्वतंत्र व्हायचं आहे हे ठरवलं होतं. त्यामुळे समारंभ असो की ऑफिस, ५-७ मिनिटात तयार होवुन बाहेर पडणं किंवा खरेदीचा कंटाळा, तिसर्या व्यक्तीविषयी चर्चा चाललेली असते अशा ग्रूपमध्ये न जाणं या गोष्टी माझ्या नैसर्गिक आहेत की त्या ऐकलेल्या, वाचलेल्या विनोदांवर प्रतिक्रिया म्हणुन आल्यात याचा शोध घेणं अवघड आहे. (आत्ममग्नतेमधून इतरांच्या खाजगी गोष्टींविषयी असलेली अलिप्तता किंवा स्वभावात असलेला मृदूपणाचा किंवा गोडव्याचा अभाव या गोष्टी मात्र १००% नैसर्गिकच..
असो..)
पुस्तकातल्या बर्याचशा गोष्टी तर मला अशा वाटल्या की अगदी माझ्यावरुनच लिहिल्यात की काय? निसर्गाकडे लहानपणीपासूनच ओढा होता पण निसर्गाच्या प्रेमात पडावं, त्याच्याशी एकरुप होण्याची ओढ वाटावी याचं माझ्यापुरतं कारण मी १५व्या वर्षी शोधलेलं की ते एक असं ठिकाण आहे जिथे मला माझ्या स्त्री असण्याची बंधनं किंवा वेगळेपणा भोगावा लागणार नाही.. एक असं ठिकाण जिथे माझं स्त्री असणं आड येत नाही. जिथे माझी ओळख स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन फक्त एक माणुस म्हणुन असेल. आता १५ वर्षांच वय म्हणजे स्त्री म्हणुन मिळणारी वेगळी वागणुक लक्षात येण्याचं आणि त्याचा अतीव राग, चीड मनात दाटण्याचं वय. आणि स्त्रियांच्या निसर्गाकडे असण्याच्या ओढ्याचं स्पष्टीकरण पुस्तकात पाहिलम तेव्हा स्वतःविषयीच नविन शोध लागल्यासारखं वाटलं मला. आणि अशा शोध लागण्याच्या आणि अचंबित होण्याच्या वेळा पुस्तक वाचताना अनेकदा येतात.
अजुनही मला माझ्या आयुष्यातले काही क्षण अगदी प्रकर्षाने आठवतात ज्या क्षणी मी विचार केला होता की,"बर्याच मुली इतकही नाही करत", किंवा "बर्याच मुली इतकाही विचार नाही करत, मी तरी बरी!" आणि पुढच्याच क्षणी पाल अंगावर पडल्यासारखी सटपटले होते. मुली?? माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का? की एका क्षणासाठी का होईना पण असा विचार माझ्या मनात यावा? कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या अंतर्मनावर होणारे संस्कार, परिणाम दूर ठेवणं जड जातं. अष्टोप्रहर जागृत रहावं लागतं त्यासाठी, कारण मोठं झाल्यावर क्वचित का होईना पण माझ्या सातमजली हसण्याबद्दल किंवा आडदांड वागण्याबद्दल भुवया वर गेलेल्या पाहिल्यात मी.
मी एक प्रवास सुरु केलाय आणि मला नक्की माहित आहे की त्यात सुख, सोय फारशी नसली तरी स्वातंत्र्य आणि समाधान नक्कीच आहे. या टप्यावर मला हे पुस्तक वाचायला मिळालं ही व्यक्तिशः माझ्या फायद्याची गोष्ट वाटते मला. या पुस्तकाने माझ्या संकल्पना अधिक सुस्पष्ट आणि स्वच्छ झाल्या आहेत, घटनांच्या, सवयींच्या कारणमीमांसा अधिक आशयघन झाल्यात हे नक्की. प्रत्येक स्त्री-पुरुषाने नक्की वाचावं असं पुस्तक आहे हे. त्या निमित्ताने आपल्या वागण्याचं आणि आपल्या आजुबाजूच्या सर्वच व्यक्तींच्या वागण्याचं परिक्षण अधिक चांगल्या प्रकारे करु शकू आपण.
पुस्तकाच्या सुरुवातीला सिमोनचा परिचय आणि अल्पचरित्र दिलय. त्यातल्या मतमतांतरात काही पटतं, काही नाही पटत. अगदीच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तिच्यावर झालेला आरोप की 'ती वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत हॉटेलात राहिली. पुरुषांसारखं सडेफटींग रहाणं म्हणजेच चांगलं असा चुकीचा आदर्श तिने घालुन दिला' पण मला वाटतम की अशा intellectual किंवा philosophical पातळीच्या माणसाचं ते लक्षन असु शकतं. त्या उंचीला तिचं स्त्री असणं किंवा पुरुष असणं याचा काही फरक पडत नाही. ही गोष्ट सगळ्यात कमी महत्वाची असते अशा ठिकाणी. त्यामुळे तिचं तसं वागणं हा तिच्या त्य स्वभावाचा भाग झाला, पुरुषी अनुकरणाचा नाही. असो.. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथेच पुस्तकाच्या गुणदोषांचीपण समीक्षा केली आहे. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की या सगळ्या गुणदोषांसह हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल.
याहीपुढे जाऊन 'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने "Man is not born but made" म्हणत पुरुष जर त्यांच्या घडणीचा विचार आणि विवेचन करु शकले तर खूप चांगलं होईल.
'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने..
Submitted by मी मुक्ता.. on 19 March, 2011 - 04:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान ललिता-प्रीती..
खूप छान ललिता-प्रीती..
मस्त.. सगळ्यांनी जरुर हा लेख वाचा...
विचारप्रवर्तक लिखाण. निवडक १०
विचारप्रवर्तक लिखाण. निवडक १० मध्ये नोंद.
खूप खूप आभार मोहिनी. पुस्तकही
मुक्ता, सहज ओघवत्या प्रांजळ
मुक्ता, सहज ओघवत्या प्रांजळ भाषेत एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिली आहेस. नक्की वाचेन आणि कळवेन. धन्स गं
छान परिचय करून दिला आहेस
छान परिचय करून दिला आहेस मुक्ता.... ललिता प्रीतीनं दिलेल्या लिंकच्या लेखालाही वाचले. सगळीकडे वाचताना मनात फक्त ''अनुमोदन'' हाच शब्द येत होता. आचार, विचार, उच्चारांतून स्त्री वा पुरुषांचे सर्वसामान्य वर्गीकरण करणे आपण थांबवू, त्यांच्याकडून तशा अपेक्षा करणे थांबवू व मुख्य म्हणजे स्वतःकडून आपल्या स्त्री/पुरुष असण्यानुसार ठोकताळ्यांप्रमाणे गृहित अपेक्षा करणे थांबवू तेव्हा ती एक वेगळ्या प्रवासाची सुरुवात असेल.
लोकरंगच्या 'त्याच' पानावरचा
लोकरंगच्या 'त्याच' पानावरचा हा पुस्तक परिचयपर लेख
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=143...
स्त्रीमिती/ निवडक मिळून साऱ्याजणी
संपादक : डॉ. निलिमा गुंडी
मौज प्रकाशन गृह
धन्यवाद भरत... देवदासी या
धन्यवाद भरत...
देवदासी या विषयावरची बरीच माहिती वाचनात आलिये. राजन गवस यांची चौडकं नावाची कादंबरीपण अत्यंत प्रभावी आहे.
लेख वाचला. त्यात माहिती सांगितलेले सगळेच विषय महत्वाचे आहेत. जरुर वाचायचा प्रयत्न करेन. माहितीबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अरुंधती कुलकर्णी, अगदी हाच विचार डोक्यात, मनात ठेवुन लिहिलय आणि वागायचा प्रयत्न करतेय..
आपला प्रतिसाद पहुन छान वाटलं. धन्यवाद..
dreamgirl, खूप खूप आभार..
न आवडण्याचा प्रश्नच येऊ शकत
न आवडण्याचा प्रश्नच येऊ शकत नाहि. खुप छान
धन्यवाद Mansi Salunkhe..
धन्यवाद Mansi Salunkhe..
मुक्ता, खूपच सुंदर लिहीलंय!
मुक्ता, खूपच सुंदर लिहीलंय! अभिनंदन!!
या लेखावरून नेमाड्यांची ही कविता आठवली नाही तरच नवल...
कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो,
कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा.
कशी सजवता तुळशीवृंदावनाची दर्शनी बाजू
खुडता मंजि-या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी
रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता
माझ्या पाताळघरातला अंधार प्रार्थणारी
देवघरातील आंदणाची उभी समई.
आत बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आरत्या
पुसट शब्दांच्या, सुरांच्या वेणीत अर्थ गुंफून टाकून.
तो अर्थ मी चाचपू पाहतो. पाहतो तेव्हा -
भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची
फांदी फांदी ओरडणा-या कावळ्यांनी काळीकुट्ट लदलेली असते.
कुणासाठी ही अबोल संथ वाटपाहणी.
उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी
तुमच्या आंगठ्यांची लवलव कुणासाठी?
किती दिवस हे आरशालाच माहित असलेले
तुमचे कोरीव कुंकवाच्या चांदणीखालचे
पहाटचे फटफटीत कपाळ...
मलाही कळू द्या तुमची उभार दृष्टीघोळ जवळीक.
न्हाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि
परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण
मलाही कळू द्या.
का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ
सदा कपाळापर्यंत, ह्या आपल्याच आपल्याच घरात.
चेहराच नसलेल्या अपु-या शिल्पासारख्या बेसूर बायांनो
माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी.
धन्यवाद... अशक्य लिहिलय
धन्यवाद...
अशक्य लिहिलय नेमाड्यांनी... ही कविता माहित होती मला. वापरायला का सुचलं नाही. रादर अजुनपर्यंत आठवलीच नव्हती. विसरल्यासारखी झालेली. खूप आभार...
पुस्तक अज्जीबात वाचनिय
पुस्तक अज्जीबात वाचनिय नाहिये.
भूतलावर एकाही पुरुषाने हे पुस्त़ संपुर्ण वाचलं नसावं असा माझा दावा आहे.
प्रत्येक पान महा बोअरीग.... उगीच कुठल्यातरी फ्रांसच्या दोन चार लेखकांचे संदर्भ घेऊन लेखिकेने उहापोह केली आहे. तीला स्वत: स्त्रीच्या आई, सुन, बायको या छटांचा अनुभव नसताना काल्पनेतली स्त्री रेखटली आहे.
सिमोन स्वतः विवाहित नाही, स्वतः वयाच्या ४० वर्षा पर्यंत होटेलात राहुन जीवन जगते. अगदी तरूण वयातच आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे घरच्यांपासुन दुर होते. तीला स्वतःला स्वयंपाक करता येत नाही. स्वतःच्या आई सोबत तीच पटत नाही. म्हणजे स्त्रीच्या मुख्य भुमिका तिनी जगल्याच नाही. ती स्वतः कामचुकार असल्याचा दाखला त्याच पुस्तकात मिळतो. थोडक्यात स्त्रीत्व न जगणारी हि लेखि़का स्त्रीत्वावर स्वैर लिखान करते, जगभरातुन तिच्यावर याच धाग्याला धरुन टिका झाल्याचही पुस्तकात दिलं आहे.
प्रेमात पडलेली स्त्री: या विभागातिल लेखन मात्र अप्रतिम आहे.
विवाहित स्त्री सदरातील लेख सुद्धा भारतीय स्त्रीच्या आसपासही भटकत नाही.
पोटच्या पोराला आईचं सेक्सुअल आकर्षण असतं हे मतं मांडणा-या लेखकांच मत मोडणारं लिखानही तोकडं आहे. मुलगी व बाप या नात्या बद्दलही तोकडेपणाच आहे.
हे पुस्तक १९४९ मधे प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यावेळच्या व आजच्या स्त्रीच्या एकुन जीवनमानात जो फरक अलाय तो पुस्तकातल्या लिखानाशी बरीच तफावत दाखवतो.
स्त्रीयाना समलिंगी समागमाच आकर्षण असण्याचं कारणही पटण्यासारखं नाहीये.
थोडक्यात हे पुस्तक फ्रेंच बायाना तंतोतंत लागु होतही असावं, पण भारतीय बायाना ७०% लागु पडत नाही.
तीला स्वतःला स्वयंपाक करता
तीला स्वतःला स्वयंपाक करता येत नाही. म्हणजे स्त्रीच्या मुख्य भुमिका तिनी जगल्याच नाही. ती स्वतः कामचुकार असल्याचा दाखला त्याच पुस्तकात मिळतो. <<<
बकासूर, सविस्तर प्रतिसाद
बकासूर,
सविस्तर प्रतिसाद देणार होते पण तुमच्या प्रोफाईलमध्ये हे वाचलं तुमच्याबद्दल.
आता आज काल माणसं खायला आवडात नाहीये. ती फार घाणेरडी झालित, म्हणुन सध्या डोकं खाणे चालु केलं. आता एक एक माबोकराचं डोकं खायला सुरुवात करणारे.
त्यामुळे आता प्रतिसाद देण्याची तसदी घेत नाही. निखळ चर्चेला येणारे आणि खुसपट काढुन वाद घालणारे यात फार फरक असतो. आणि नसते वाद घालण्याइतका रिकामा वेळ नाही माझ्याकडे. आपण कोणाशी वाद घालतो यावरुन पण आपलीच योग्यता दिसते. असो.
आपण कोणाशी वाद घालतो यावरुन
आपण कोणाशी वाद घालतो यावरुन पण आपलीच योग्यता दिसते. असो.>>
मी मुक्ता,
त्या लेखिकेवर जागातील कित्येकानी केलेली टिका व टिकेची कारण दिली आहेत. त्या बद्दल तुमचं मत काय आहे ?
आपण माझा लेख खरच वाचलाय का?
आपण माझा लेख खरच वाचलाय का? जगभरातून झालेल्या या टीकेचा उल्लेख मी आधीच केला आहे आणि असंही म्हटलय की पुस्तकातल्या सगळ्या त्रुटी ल़क्षात घेवुनही नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे कारण बर्याच का? व कसं? ची उत्तरं त्यात मिळतात. प्रतिक्रियांमध्ये काही लिंक दिल्या आहेत. त्याही जरुर वाचा.
बर्याच का? व कसं? ची उत्तरं
बर्याच का? व कसं? ची उत्तरं त्यात मिळतात.>>
ओके, त्या पुस्तकात लेखिका लग्न न करण्याचं कारण असं सांगते, की एके दिवशी सायंकाळचा स्वयंपाक चालु अस्तना ती भांडे विसळीत किचनमधे असते. तेंव्हा कॉलनितील सर्व घरातील किचनचे लाईट्स चालु असतात व प्रत्येक किचन मधे एक बाई स्वयंपाक करताना दिसते.
लग्न केल्यावर आपल्यालाही हेच करावे लागेल म्हणुन ती लग्न न करण्याचं ठरवते व आयुष्यभर अविवाहित राहते. पण प्रियकराची मात्र सोबत हवी असते.
आता मला सांगा, जी बाई स्वयंपाक व भांडी कारणावरुन लग्न नकारते ती स्त्री विश्वाचं लेखन करताना स्त्रीला न्याय देऊ शकते का?
हे तर आयुष्यात एकदाही पाण्यात उडी न टाकता "पोहण्याचं गमक" नावाचं पुस्तक लिहल्यागत नाही का होणार?
अजुन एक संदर्भ असा आहे की मुलाचे व आईचे नाते फार फार तर ४ वर्षा पर्यंतच गोड गुमान असते. नंतर मूल व आईच्या नात्यातला ओलावा सुकतो. याच धर्तीवर लेखिका आपल्या आईशी फटकुन वागल्याचही आहे. तिने याच कारणास्तव मुलं होऊ दिली नाहीत.
पण आपल्या देशात ४ काय, ४४ वर्षाचा माणुसही (बायकोच्या धाकानंतर सुद्धा) आईशी ज्या प्रकारे जुडलेला असतो त्याला तोड नाही.
पण लेखिका बाई म्हणते ते नातं ४च वर्षातच हवेत विरतं. हे सगळं मला खरच नाही पटलं.
------------
नीरजा,
अगं खरच ती कामचुकार असल्याचं सिद्ध होतं. भांडे विसळताना दिसलेल्या स्त्रियाना बघुन, हे काम करायचं नाही एवढ्या कारणासाठी तिनी लग्न न केल्याचं वाचुन मी हहगलो. अन ते पुस्तक म्हणे स्त्रीयांच बायबल... कैच्या कै.....
बकासुर, ओके, त्या पुस्तकात
बकासुर,
ओके, त्या पुस्तकात लेखिका लग्न न करण्याचं कारण असं सांगते, की एके दिवशी सायंकाळचा स्वयंपाक चालु अस्तना ती भांडे विसळीत किचनमधे असते. तेंव्हा कॉलनितील सर्व घरातील किचनचे लाईट्स चालु असतात व प्रत्येक किचन मधे एक बाई स्वयंपाक करताना दिसते.
लग्न केल्यावर आपल्यालाही हेच करावे लागेल म्हणुन ती लग्न न करण्याचं ठरवते व आयुष्यभर अविवाहित राहते. पण प्रियकराची मात्र सोबत हवी असते. >>
१. प्रियकर आणि पार्टनर यात गल्लत नका करु. मी माझ्या लेखात आधीच नमूद केलय की काही गोष्टी या बुद्ध्यांकावर पण अवलंबुन असतात. आयन रँड वाचलिये का तुम्ही? वाचली असेल तर तिच्या या वर्तनाचा अर्थ तुम्ही लावु शकाल...आणि आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत किंवा जमत नाहित ते अस्तित्वातच नाहि असं तुम्ही नाही म्हणु शकत..
----------------------------------------------------------------------
आता मला सांगा, जी बाई स्वयंपाक व भांडी कारणावरुन लग्न नकारते ती स्त्री विश्वाचं लेखन करताना स्त्रीला न्याय देऊ शकते का?>>>
२. पुन्हा तेच, तिचं हे नाकारण्यामागे वेगळं कारण आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचय का की फक्त लग्न करुन भांडीकुंडी केली तरच बाईपणा कळतो? किंवा त्याचे अनुभव येतात? आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या स्त्रियांना स्त्रीपणा माहित नसतो का? आणि तिने इतिहासाच्या, साहित्याच्या, सामाजिक परिस्थितीच्या केलेल्या एवढ्या अभ्यासाचं काय? ते सगळं कुठुन आलय असं आपल्याला वाटतं?
----------------------------------------------------------------------------
अजुन एक संदर्भ असा आहे की मुलाचे व आईचे नाते फार फार तर ४ वर्षा पर्यंतच गोड गुमान असते. नंतर मूल व आईच्या नात्यातला ओलावा सुकतो. याच धर्तीवर लेखिका आपल्या आईशी फटकुन वागल्याचही आहे. तिने याच कारणास्तव मुलं होऊ दिली नाहीत.
पण आपल्या देशात ४ काय, ४४ वर्षाचा माणुसही (बायकोच्या धाकानंतर सुद्धा) आईशी ज्या प्रकारे जुडलेला असतो त्याला तोड नाही.
पण लेखिका बाई म्हणते ते नातं ४च वर्षातच हवेत विरतं>>>
३. ती असं वागली याची कारणं, त्याचा तिला झालेला पश्चाताप आणि आईच्या शेवटच्या का़ळात तिने तिची केलेली सेवा या गोष्टी वाचल्या नाहित का आपण? असो, ती तिच्या आयुष्यात कशी वागली याच्याशी तिच्या लिखाणाचा काय संबंध? तिचं लेखन फक्त लेखन म्हणुन बघता येवु शकत नाही का? ती चुकीची वागली म्हणुन तिचं लिखाण टाकाऊ ठरतं का? तिची सगळीच मतं चुकीची ठरतात का?
मी पुरुष असल्यामुळे कदाचित
मी पुरुष असल्यामुळे कदाचित तुम्हाला जाणवणार्या अनुभूतीना मुकलो असेन.
प्रियकर आणि पार्टनर यात गल्लत नका करु.>>हे कसं काय? अहो तिचीच एक शिष्या नंतर याच्या प्रेमात पडते. मग या दोघात खडगे उडाले की ते दोघेही सिमोन कडेच गार्हाण मांडातात. नंतर तिनी आपल्या आत्मचरित्रामधे हिचा खुन करण्याचा काल्पनिक प्रसंग रंगविल्याचाही संदर्भ आहेच की. आता हे प्रियकर अन पार्टनर मधला फरक मला खरच नाही कळलं.
हो.. पडते ना प्रेमात. अजुन एक
हो.. पडते ना प्रेमात. अजुन एक जण सिमोन च्या प्रेमात पण पडतो.. आणि शेवटपर्यंत ही सगळी मंडळी सिमोन्-सार्त्र च्या परिघातच रहातात. मग??? याचा काय संबंध इथे..
पुन्हा सांगतेय सिमोन समजुन घ्यायची असेल तर आयन रँड वाचा जरा. तुमच्या कक्षेतून विचार कराल तर समजणार नाही. काही गोष्टी समजायला वेगळी नजर आणि वेगळी विचार करायची पद्धत लागते.
पुन्हा सांगतेय सिमोन समजुन
पुन्हा सांगतेय सिमोन समजुन घ्यायची असेल तर आयन रँड वाचा जरा.>> नक्की नक्की.
त्या निमित्ताने याचही परिक्शण येऊदया. पुण्यात कुठे मिळेल तेवढं सांगाल का प्लिज...
आयन रँड सगळ्या दुकानात मिळेल.
आयन रँड सगळ्या दुकानात मिळेल. तिच्यावर खूप लिहुन झालय. सगळ्या भाषेतुन. हे पुस्तक मला नविन, मराठीसाठी अजुन अनोळखी वाटलं म्हणुन लिहिलं.
हे वाचा...
http://en.wikipedia.org/wiki/Ayn_Rand
http://en.wikipedia.org/wiki/The_Fountainhead
धन्यवाद मुक्ता.
धन्यवाद मुक्ता.
मुक्ता, प्रामाणिक लिहिलं
मुक्ता, प्रामाणिक लिहिलं आहेस. ललिताने दिलेली लिंकही फार आवडली. आवर्जून वाचेन आता पुस्तक.
मी मुक्ता, जरा मनातले बोलतो.
मी मुक्ता,
जरा मनातले बोलतो. पण लेख आवडला नाही.
१. पुस्तकाचा परिचय करताना आपण स्वतःच्य आयुष्याबाबत आवश्यकतेपेक्षा अधिक सांगितलेलं आहेत असे वाटले.
२. लेखन 'चला पुढचंही वाचूच' असे वाटायला लावणारे वाटले नाही.
या मतांबाबत क्षमस्व! चुभुद्याघ्या!
================================================
पुस्तकाबाबतः
१. या पुस्तकाचे शीर्षक सेकंड सेक्स असे का आहे हे समजले नाही. (पुस्तकाचे की अनुवादाचे?)
२. अ वूमन इज नॉट बॉर्न बट मेड हे वाक्य स्त्रीचा आत्मविश्वासच घालवणारे वाक्य आहे. या वाक्याचा मी निषेध करतो. एकीकडे स्त्री मुक्तीवर आपण एकमेकांना खो देत आहोत. या पुस्तकात मात्र असे म्हंटलेले आहे की स्त्रीला स्त्री बनवले जाणे हेच अधिक होते. येथेच नकारात्मकता सुरू होते असे मला वाटते. आणि या विधानाचे नकळत काहीसे उदात्तीकरण झाले आहे असे वाटले. वास्तव रेखाटणे हा उद्देश नक्कीच ते विधान न्याय्य ठरवेल, पण मग आपला लेख न्याय्य ठरणार नाही. फक्त पुस्तकाचा वास्तव रेखाटण्याचा उद्देश तेवढा पटणेबल राहील.
===============================================
माझी ही मते आपण चर्चा करण्यास योग्य मानाल व माझ्या मतांमध्ये कोणताही गैर हेतू नाही याबाबत निश्चींत राहाल अशी आशा!
-'बेफिकीर'!
बेफिकीरजी, १. पुस्तकाविषयी
बेफिकीरजी,
१. पुस्तकाविषयी सांगतेय असं मी म्हटलय का? माझ्या लेखाचं नाव आहे 'द सेकंड सेक्स' च्या निमित्ताने. आणि माझ्या लेखात मी त्या पुस्तकाच्या निमित्ताने मनात आलेले विचार (माझ्याच आयुष्याबद्दलचे) लिहिलेत. माझा तोच उद्देश होता. हे पुस्तक परिक्षण नाहिये.
२. आपल्याला वाचावसं वाटलं नाही. इट्स ओके.
३. सेक्स चा अर्थ जेंडर असा आहे. पुरुष हे प्रथम लिंग आहे आणि स्त्री हे द्वितीय. ते का, कसं, त्याची कारणं याचा उहापोह आहे यात. इट्स ऑल अबाऊट द सेकंड सेक्स इन दिस सोसायटी.. पुस्तकाचे आणि अनुवादाचे पण नाव द सेकंड सेक्स असच आहे.
४. हो ते आत्मविश्वास घालवणारं वाक्य आहे. आणि त्याचा अर्थ लावुन स्वतःचं परिक्षण करु शकलात तर मार्गदर्शक ठरणारं वाक्य पण आहे. तुम्ही कसं घेता त्यावर अवलंबुन. वास्तव रेखाटणे हा पुस्तकाचा उद्देश आहे. त्याला पुस्तक न्याय देते आणि स्वतःकडे, माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघुन मतं मांडणे हा माझा उद्देश होता आणि मी त्याला न्याय दिलाय.
आपल्या सगळ्या शंकांना माझ्या अल्पमतीला जमतील तशी उत्तरं दिलीयेत. याउपर आपण पुस्तक वाचुनच मत बनवावं. माझं लिखाण आवडलं नसेल तर या प्रतिसादात काही लिंक दिल्यात त्या पहा. कदाचित आपलं मत वेगळं होईल. माझा लेख वाचुन पुस्तकाविषयी गैरसमज होत असेल तर दोष सर्वस्वी माझा आहे.
धन्यवाद.
स्वातीताई, खूप खूप आभार..
स्वातीताई, खूप खूप आभार..
मी एक प्रवास सुरु केलाय आणि
मी एक प्रवास सुरु केलाय आणि मला नक्की माहित आहे की त्यात सुख, सोय फारशी नसली तरी स्वातंत्र्य आणि समाधान नक्कीच आहे.>>>>हे खूप खूप आवडलं.. सुरेख लिहिलंय मुक्ता.. उशिरा का होईना विचारात सुरुवात झाली आहे आणि आचरणात पण ..:)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रित,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रित,

उशिरा नाही हो.. खूप आधीच झालिये सुरुवात पण आता त्याची जपणुक करण्याला अधिक बळ, अधिक कारणं, अधिक पैलु आणि व्यापक अर्थ लाभलाय..
Pages