'मार्च, एप्रिल आणि मे' किंवा कसंही

Submitted by nikhilmkhaire on 14 March, 2011 - 02:55

जुना इतिहास, आत्ताचा भूगोल
किंवा अस्तित्वातच नसलेलं नागरिकशास्त्र
असं कुठेही बघा...
तीनच नावं सापडतील बेईमानी न करणारी!

बहुतेकदा मार्च, बर्‍याचदा एप्रिल आणि
त्यांचा राजा मे.
या तिघांनी बेईमानी केल्याचा एकही उल्लेख नाही
हवं तर जुना इतिहास, आत्ताचा भूगोल
किंवा अस्तित्वातच नसलेलं नागरिकशास्त्र
असं कुठेही बघा...
(खरं तर नकाच बघू, एखादा पुतळा नाही बांधायचा त्यांचा)

बाकी सारे चोर आणि चुकार
कपटी आणि भिकार!
मला राग आहे तो याचाच!

अज्ञातील दोन योनी
देव आणी दानव!
दानवांचं वागणं ठरलेलं, तरी त्यांना घाबरायचं
आणि देवांचं? इंद्राची भिती नाही वाटत तुम्हाला?

खरं तर माणूस हा द्विपाद प्राणी पृथ्वीवर जन्माला घालण्याआधी
परमेश्वराला लागल्या होत्या कन्फ्युजनच्या प्रसवकळा!
याला जन्माला घालू की नको... घालू की नको!
सारे अभिमन्यूचे वंशज असल्याने
कानपाडेपणा आईच्या पोटातच शिकतो आम्ही.
तसंच कन्फ्युजनही शिकलो.

थेट देवाकडून कन्फ्युजन मिळालेल्या
माणूस प्राण्याच्या काही प्रार्थना येणप्रमाणे:

पावसाळ्याचं कौतुक
हिरवे हिरवे गार गालिचे....
आहाहा... आहाहा... काय ती हिरवळ
खंडाळ्याच्या घाटात बाई बटाटे वड्यांचा दरवळ!

हिवाळ्याची ओढ
धुक्यात हरवली । वाट थंडीचा थाट
असा की धरावी खाट । कुणातरी संगे ॥

ग्रीकांच्या नाटकांमधले देव असतात मजेशीर
ते मान्य करतात, ते मजा लूटत असतात
माणूस या प्राण्यांच्या दु:खात.
पण ग्रीक संस्कृती बुडाली!

आणि उरलो आम्ही आर्यानार्यांचे वंशज
मार्च, एप्रिल आणि मेसोडून दरवेळेस फसवणार्‍या अनेकांना पूजत!

नियमाने वागणार्‍याची पूजा बांधल्याचं ऐकलं का कुणी?
मग मान्य करा आणि म्हणा...
मार्च, एप्रिल आणि मे झिंदाबाद!
कारकूनवर्ग झिंदाबाद!

पण अशा आरोळ्या मारल्यात का कुणी?
अशा आरोळ्या मारल्या जाणार नाहीत हे गृहितकंच आहे
या सृष्टीच्या संतूलनाचं मूळ!

ग्रीक थोर होते, म्हणून वेळेच संपले
आणि आम्ही उरलो पूजत अज्ञाताला आणि घाबरत ज्ञाताला.

--
निखिल

गुलमोहर: