पाउस ... !!

Submitted by रुपाली अलबुर on 10 March, 2011 - 05:06

मुसळधार पाउस कोसळत होता .. पावसाचा तो आवाज ... आणि सोबत गाणी ... गारवा ssssss .. एकटेपण खाऊन टाकेल असे वाटले कि गाणीच तिला सोबत करत. मग ते घर असो , गर्दी असो कि ऑफिस , सगळीकडे गाण्यांची तिला सोबत .. आज तर पाउस पण सोबत करत होता. उगाच लग्नाचा अल्बम चाळत बसलेली ती . अगदी हरवून गेलेली कुठेतरी...

" तांदूळ खाऊ नको लग्नात पाउस पडेल .." .. " अगं आई मी न जानेवारीत लग्न करेन मग पाउस कसा पडेल ?" .. हा संवाद आठवला आणि स्वतःशीच हसली . मुठभर कच्चे तांदूळ घेऊन ते तासभर खात राहणे हे काही कधीच सुटले नव्हते न ?? खरेच काही संबंध आहे का तांदूळ आणि पाउस यांचा ?? नेमके जून मध्ये लग्न ठरले आणि ते हि जोरदार पावसाने वरातीचे स्वागत करून ..घोड्यावर बसून नवरा येणार हे स्वप्न स्वप्नच राहिले ..... तो असाहि घोड्यावरून आला नसताच . " मला छान छौकी आवडत नाही . उगाच का दिखावा करायचा ?? सरळ सही करून लग्न करायचे. आणि सप्तपदी झाली नाही तर तू माझी नाही का होणार ? हे नवीन खूळ घेऊन नको येउस ग . आपण सहीचे लग्न करायचे ..एकदम सही आयडिया आहे हि " असा उगाच शब्दांची कोटी करून हसायचा तो . पण तिची इच्छा होती म्हणून मोजकी १०० माणसे बोलावून लग्न करायचे ठरले. त्यात पण यादी करताना नेमके कोणाचे नाव गाळावे हा चर्चेचा विषय बनला होता त्या काळात . आई आणि तो किती टाळ्या देत हसायचे एकमेकांना .. ते चित्र क्षणभर समोर आले आणि मी किती भाग्याची असे वाटून गेले तिला.

" हा पाउस आलाच हम्म .. खरा मित्र आहे तुझा हा .. लग्नाला हजेरी लावलीच .. " असे म्हणत तिच्यावर हसलेला तो , मग कुठेच फिरायला न जाता आल्यामुळे चिडलेला तो , आणि मग रुसवा गेल्यावर तिच्यासाठी फुले आणणारा तो ... सगळेच सुंदर , अकल्पित. त्याच्या नंतर खरा सखा वाटेल असा पाउसच तर होता . त्याच्याशिवाय जर ती कोणाला कवेत घेत असे तर तो पाऊसच होता . तो पण म्हणायचा कि " पाउस बनून बरसेन मी तुझ्यासाठी . पण फक्त मलाच या मिठीत जागा हवी . " वाटायचे कि किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. प्रेम कि वेड हे तेव्हा उमजलेच नाही. निव्वळ हट्टी होता पण तो .

सुरुवातीला तिचे मित्र घरी येणे बंद केले आणि मग त्याचे मित्र पण ?? आईच्या शेवटच्या दिवसात तर मावस भाऊ सोडायला येतो म्हणून आईला घरी आणून ठेवलेले त्याने . हे पण त्याने मावस भावाला हाकलून लावले तेव्हा समजले . तोवर वाटत होते कि किती प्रेमळ आहे हा .. अगदी स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेतो आईची . आई गेली तेव्हा पण पाउस बरसला . आभाळाला पण दुक्ख झालेले .. इतके ..कि रात्रभर धाय मोकलून आभाळ रडत राहिलेले.

माहेरची नाती तर त्याने कधी जुळू दिली नाहीत आणि सासरच्या कोणाला ती पसंतच नव्हती म्हणून कधी त्यांच्याशी संबंधाच नाही आला. पण तिने तिचे जग बनवलेले. त्यात होते ती , तो आणि वर्षातून चार महिने आवर्जून तिच्यासाठी बरसणारा पाउस. पाउस गेला कि उरलेले ८ महिने तिच्यासाठी कधी बोचरे वारे सुद्धा नसायचे . असायचे ते फक्त रखरखते उन . घरातही आणि घराबाहेरही !!

पण मग कधी कधी वळवाच्या पावसासारखा तो तिच्यावर बरसायचा आणि मग ' आणखीन काय हवे त्याच्याकडून ?? ' असा विचार मनात चमकून जायचा .' कोणाची दृष्ट लागू नये या संसाराला 'असे वाटून जायचे. हि भावना होती म्हणूनच तर त्याच्याबद्दलची ओढ , प्रेम अजूनही तशीच होते . मनातली भावना अगदी तशीच होती जशी पहिल्या भेटीतच त्याच्या प्रेमात पडल्यावर होती .. 'ह्याच्याशिवाय दुसरे कोणीच नसले तरी चालेल. पण तो नसला कि आयुष्याला काहीच अर्थ नसेल ' हीच भावना तिला व्यापून होती. आणि त्याच्या मनात तर तिच्याशिवाय कोणत्याच गोष्टीला स्थान नव्हते. म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम होते म्हणण्यापेक्षा त्याला तिचे वेड होते असे म्हणणे योग्य वाटेल !! वेड्यासारखा प्रेम करायचा तो. आणि तिच्यासाठी ... तोच तिचे सर्वस्व होता . त्याच्या संतापासकट प्रत्येक गोष्टीवर ती कायम मनापासून प्रेम करायची .

खिडकीतून तळवा बाहेर काढत तिने पावसाचे चार थेंब हातावर झेलले आणि जणू कोणीतरी हसत टाळी देत आहे असा भास झाला. वाटले पावसाने सोबत आईला आणले आहे. तोच स्पर्श , तोच ओलावा .. मायेचा !! अचानक एक वीज कडाडली आणि समोरच्या झाडावर पडली . झाड जाळून खाक झाले. त्यानेच पावसाला टाळी देताना तिला पहिले कि काय असे वाटून घाबरून तिने खडकी बंद करून घेतली. इतके दिवस मनाच्या खिडक्या देखील अशाच बंद केल्या होत्या तिने ... तो जिवंत असेपर्यंत ..

यांना blood cancer झाला आहे . हे शब्द आई गेल्यावर अगदी वर्षभरातच कानावर आले आणि आई गेल्यावर रात्रभर बरसणारे आभाळ त्या वेळी तिच्यावर कोसळले ... त्याच्या सोबतचे शेवटचे ते क्षण किती छान होते . जाताना " एकदाच मला तुझ्या कुशीत घे " हि त्याची विनवणी आणि मग डोळ्यात तरळून गेलेले पाणी. तो दिवस .. ती संध्याकाळ .. आणि आजची संध्याकाळ यात साम्य एकच होते . पाउस ... !! तो गेला त्या दिवशी बरसला , आई गेली त्या दिवशी बरसला तोच पाउस .

आज तिला कोणाच्या तरी मिठीची नितांत गरज वाटली . ठीक एक महिन्याने.... त्याच्या मिठीची तहान लागली पण आता पावसाच्या थेम्बानेच फक्त ती भागणार होती . मनाच्या ..घराच्या खिडक्या उघडून तिने बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पहिले. दाराकडे धावत गेली . पावसाला कवेत घेतले आणि तिच्याच नकळत तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले. तिने हावरट सारखे पावसाच्या प्रत्येक थेंबाला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला . आणि गुडघ्यांवर खाली बसून आभाळा कडे पाहत ती जोरात ओरडली ... " आनंद मला नको रे सोडून जाउस .... मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय ... आनंद ...." ...........प्रतिसाद म्हणून आभाळात एक वीज कडाडली .....

गुलमोहर: 

सहीच..
एकदम मस्त लिहिलय..
शेवटच para खुप सही जमलाय..
चित्र नजरेसमोर उभ रहीला.. Happy