डोळ्यावरील पडदा

Submitted by निशिकांत on 3 March, 2011 - 00:44

डोळ्यावरील पडदा हटल्यावरी कळाले
तो श्वासही न माझा रुकल्यावरी कळाले

का व्यर्थ भीत होतो मरणास जीवनी मी ?
मृत्त्यू सुखांत आहे जळल्यावरी कळाले

जीवन असून माझे हाती लगाम नाही
जे जे घडूनये ते घडल्यावरी कळाले

हेवा मला फुलांचा देवास वाहिलेल्या
आहे क्षणीक वैभव सुकल्यावरी कळाले

ते गोड बोलणे अन लडिवाळ भाव त्याचे
सारा बनाव, तिजला वरल्यावरी कळाले

धोकाधडीस आता आलाय ऊत इतका
वर्दीत चोर होते लुटल्यावरी कळाले

सुख हे क्षणीक आहे, मृगजळ सदैव फसवे
भोगून भोग सारे विटल्यावरी कळाले

देवास शोधताना का मेनका दिसावी ?
विषयात मग्न, डोळे मिटल्यावरी कळाले

सन्यास घेतला तू "निशिकांत" ढोंग आहे
स्वप्नी तिला बघूनी रडल्यावरी कळाले

निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गुलमोहर: 

व्वा....!!! मस्त.. मला आवडली सगळीच्या सगळी.

मतला खूप छान आहे पण रुकना हा हिंदी शब्द का वापरलाय? Sad त्याऐवजी मराठी शब्द असता तर अजुन प्रभावी झाला असता. Happy

जीवन असून माझे हाती लगाम नाही
जे जे घडूनये ते घडल्यावरी कळाले>> मस्तच.. Happy

छान आहे!!

ते गोड बोलणे अन लडिवाळ भाव त्याचे
सारा बनाव, तिजला वरल्यावरी कळाले>>> हजलेचा शेर वाटला!!