थरारक जंगल भ्रमंती (भैरवगड)-३

Submitted by आशुचँप on 28 February, 2011 - 15:42

काल रात्रीच्या त्या घाबरगुंडीनंतर एकदम डोळे उघडले ते सकाळीच. अमेय, स्वप्नील आधीच उठले होते. पटकन बाहेर येऊन पाहिले..सगळे काही ठिक व्यवस्थित...ती बाटलीपण कुणीतरी पिउन संपवून दुसरीकडे ठेवली होती.
आयला मग रात्री नक्की झाले तरी काय होते????

आमचे तंबु आणि ती 'बाटली'

मी सगळ्यांना तो किस्सा सांगितला..वाह्यातपणा हा आमच्या ग्रुपचा मूलमंत्र असल्याने कुणीच ते गांभिर्याने घेतले नाही. पण मला काही चैन पडेना..मला नक्की खात्री होती की वार्‍यामुळे ती बाटली पडली नव्हती..पण कुणी प्राणी आला म्हणावं तर त्याच्या पाऊलखुणा तर दिसायला हव्यात...तसेही काही नाही..
(मला मान्य आहे,भाग दोन वाचून आलेल्यांची जबरदस्त निराशा होईल..पण काय करणार..माझीही निराशाच झाली होती कारण काहीही ठाम कळले नव्हते)..
दरम्यान, त्या शिक्षकांनाही हा सगळा प्रकार सांगितला. त्यांची तर एकदमच टरकली.
"बघा आम्ही सांगत होतो आत झोपा म्हणून..रात्रीच्याला काय झालं असतं, जनावर शिरलं असतं तर तुमच्या तंबुनी काय केलं असतं.?"

हा तो शिक्षकांचा ग्रुप

दरम्यान, प्रातर्विधीसाठी गेलेला प्रणव धावत धावत आला..त्याने एक धक्कादायक बातमी दिली..त्याला म्हणे बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसले. आम्ही धावतच त्या दिशेला गेलो. पाहतो तर खरंच..
तिथल्या मातीत छानपैकी पावले उमटलेली.

शपथ्थ, म्हणजे छोट्या साहेबांची फेरी इथपर्यंत होते म्हणायची. थोड्या बाजूला अस्वलसदृश्य प्राण्याचीही पावले दिसली..

आकार अगदीच लहान होता त्यामुळे काय कळत नव्हते...
(फोटो- प्रणव)
तसाच पावलांचा मागोवा घेत पुढे गेलो तर अजून एक जबरदस्त धक्का...
अगदी उघड्यावरच एक रेडकू मरून पडलेले. जबरदस्त दुर्गंधी पसरलेली..तसेच नाक दाबून पुढे गेलो आणि लक्षात आले हे नुसते मेलेले नाही तर ही चक्क शिकार आहे...

(याचे अजुन वेगळ्या अँगलने फोटो आहेत माझ्याकडे पण मुद्दाम टाकले नाहीयेत..).

देवाशप्पथ सांगतो त्यावेळी जो काही शहारा आला अंगावर..रात्री उघड्यावर (तंबुत असलो तरी उघड्यावरच) झोपण्यात काय धोका पत्करला होता ते जाणवले. बापरे आणि मग काल रात्री साहेब तर नव्हते ना आले तंबुजवळ...ह्या, आपण या जंगलाला फारच साधे सोपे समजलो...धीस इज रियल जंगल..
दरम्यान, शक्य तितक्या जवळ जाऊन रेडकाची पाहणी केली. चांगले वाढ झालेले रेडकू होते आणि अर्धेअधिक खाल्ले होते. मांस फाडल्याच्या आणि चावल्याच्या खुणा दिसत होत्या. पण मला कळत नव्हते की शिकार करून उघड्यावर कशी काय टाकली आणि मग बाकीचे पक्षी गिधाडे वगैरे त्याचा फन्ना उडवायला कशी काय नाही आली.
लहानपणापासून जीम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसनच्या शिकारकथांची पारायणे केलेली. ती आठवायचा प्रयत्न केला आणि एक शक्यता एकदम जाणवली..जर शिकार करणारे जनावर जवळपास असेल तर गिधाडे लांबच राहतात. एकदम पोटात गोळा आला. घाबरलेल्या नजरेने आजूबाजूची झाडी न्याहाळली..कुठुन काही आवाज येतोय का ऐकण्याचा प्रयत्न केला. पण काहीसुद्धा नाही...
शिकार ताजी नव्हती...किमान दोन एक दिवस झाले असावेत असे वाटत होते. त्यामुळे ही शक्यता बाद ठरत होती पण काही खात्री वाटेना.
मग सगळ्यांना माझ्या शक्यता बोलून दाखवल्या. समोरच शिकार असताना कुणी त्या चेष्टेवारी नेल्या नाहीत आणि शक्य तितक्या सावधगिरीने तिथून आम्ही काढता पाय घेतला.
याच धास्तावलेल्या मनस्थितीत गडाची फेरी उरकली. जंगली जयगडप्रमाणेच हा मुख्य डोंगरधारेशी एका छोट्या सोंडेने जोडला गेला आहे. अपेक्षेप्रमाणेच किल्ल्यावर काहीच नव्हते पण जंगली जयगड इतका उजाड बोडकाही नव्हता..

गडावरून दिसणारे मंदीर

या फुलाचे नाव कुणी सांगू शकेल का

दिनेशदा हे खास तुमच्यासाठी Happy

पुन्हा मंदिरापाशी आलो तर एक वेगळाच सीन..मंदीराशी चक्क एक जीप...आयला हे काय नाटक..
मग चौकशी केल्यावर कळले की भैरवगडापाशी यायला कोयनानगरहून एक गाडी रस्ता येतो. रस्ता खराब आहे पण जीप येऊ शकते. आणि आज कसलातरी नवस फेडायला म्हणून एक कुटुंब आले होते. आम्ही कुतुहल म्हणून आत गेलो तर त्या कुंटुंबातील एका बाईच्या अंगात आलेले आणि ती जोरजोरात घुमत आणि नाचत होती..
बाई गावाकडची असली तरी साडी आणि अन्य पेहरावावरून शहरी छाप जाणवत होती पण आत्ता मात्र बेभान होऊन नाचत होती...
तिच्या अंगात आलेल्या देवीचा आणि एका भगताचा संवाद लई विलक्षण होता..
सगळे काही आठवत नाही पण असे काहीतरी होते
देवी - हुँ हुँ हुँ..साडी-चोळी आणलीया काय... हुँ हुँ हुँ...रातच्याला कोंबडं काप... हुँ हुँ हुँ...
त्यावर तो भगत सांगत होता..
माय, आमी गरीब लोक..एवढे पैकं कुटुन आनू..साडी-चोळी नाय देऊ शकत...थोडे खण आणि नारळ आणलाय..तोच पदरात घे माय...कोंबडं नाय थोडे तांदूळ देतो...
देवी - हुँ हुँ हुँ...चालंल..हुँ हुँ हुँ...
आयला, किती कन्सेशन. Happy .माझ्या मनात विचार आला. मग मी हळूच मोबाईल काढून बाकी कुणाच्या लक्षात येणार नाही असा त्या बाईचा व्हिडीओ रेकॉर्डींग करून घेतले...

उग्र भैरोबा दैवत

दरम्यान, तंबुची आवरा-आवर करून झाली होती आणि आम्ही निघायला सज्ज झालो..
आमचा पुढचा टप्पा होता पाथरपुंज गाव...हा रस्ता अतिशय देखणा आहे..दोन्ही बाजूने गर्द झाडी आणि मधोमध प्रशस्त लाल मातीचा रस्ता....चालायला धमाल येत होती...पण मध्येच त्या शिकारीच्या आठवणीने भितीपण मनात दाटून येत होती.

साधारण तासा-दीड तासाच्या चालीनंतर आम्ही गावात पोहोचलो..गाव अपेक्षेपेक्षा बरेच मोठे निघाले..सगळ्या गावात असतो तसा मोठा पार ही होता आणि त्यावर बसलेली रिकामटेकडी मंडळीही...

आम्ही जाऊन प्रचितगडला जायच्या वाटेची चौकशी केल्यावर एकाने तंबाखूची पिंक मारत नुसतेच नाही नाही असा हात हलवला...
तोंड मोकळे झाल्यावर म्हणे..अलाऊड नाय इकडून जायला..
परत एक नाटक...हे काय आता नविन...
हा भाग चांदोली अभयारण्यात समाविष्ट झाल्याचे माहीती होते पण इथून जायला आता परवानगी नाही म्हणजे अवघड होते..
"असे कसे अलाऊड नाही??.."
"अवं, फारेष्टची परमीशन लागती त्याला.."
"मग कुठे आहे फॉरेस्टचे ऑफीस??"
"हापीस काय थकडं, पन आज कुनी नाय तिथ..बबन्या गेलाय खाली गावात...उद्याच्याला येईल.."
"मग आता आम्ही कसे जाऊ.??"
"आमी एक वाट दावतो तुम्हान्सी...फारेष्टलापन ठावकी नाय...गडावर जाती डायरेक्ट..".
आधीच्या अनुभवामुळे पोळले गेलेलो आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर आलो...
"किती पैसे घेणार??"
"आता पघा, लई रिस्क हाय त्यात..फारेष्टनी पकडलं म्हंजी तुम्हाला काय नाय आमाला डायरेक्ट जेल..."
"पैसे किती घेणार.??."
"अठराशे रुपये द्या..."
चला एवढेच बाकी होते...
"आणि आमचे आम्ही गेलो तर??"
"ते तुमाला माहीती..पन सांगून ठिवतो...रस्ता लई ब्येकार..आसवली हायती..आणि एकदा का मानूस हरवला रानात की गेलाच..."
"ते आमचं आम्ही बघून घेऊ...फारेष्ट काय करील आम्हाला???..."
"ते आमाला काय माहीती..ते तुमचं तुमी पगा..."
मनातल्या मनात शिव्या हासडत आम्ही तसेच पुढे निघालो..जाऊ आपले आपण म्हणत..
एक विचार आला की आपण बिनापरवाना शिरत आहोत जंगलात..पण आम्हाला किल्ल्यावरच जायचं असल्याने एवढा काय विशेष वाटलं नाही...
काय होईल जास्तीत जास्त असा विचार करत चालू लागलो...

दुपारची वेळ होती आणि गरम झळा जीव नकोसा करत होत्या...त्यात आमच्या सॅक्स..गळ्यात कॅमेराचे लोढणे...कुठून मरायला आलो असे होत होते...त्यातल्या त्यात बरे एवढेच होते की चढ-उतार नव्हते..सरळसोट रस्ता...दोन्ही बाजूला करपलेली जमिन..त्यातून रेषेसारखी चाललेली पाऊलवाट आणि जिकडे नजर जाईल तिकडे झाडी...

चालून चालून दमलो की विसावा घ्यायचा कि पुन्हा चालायला सुरूवात..जमिनही आता इतकी तापली होती की बुटांमधूनही तिचा तप्तपणा जाणवत होता...वाराही गरम..डोक्यावर सूर्य अक्षरश आग ओकत होता..डोक्यावर रुमाल ओला करून ठेवला तरी काही वेळातच तो ठक्क कोरडा व्हायचा आणि पुन्हा घामाने ओला...
तासांमागून तास उलटून जात होते तरी रस्ता काय संपायचे नावच घेत नव्हता...

दरम्यान, एक गम्मत झाली...असेच जात असतानाच स्वप्नीलला एका झाडीत घोणस (रसेल्स व्हायपर) दिसली..तो सर्पमित्र असल्याने त्याला एकदम साप बघून आनंदाचे भरते आले आणि तो सामान टाकून तिच्या मागे धावला...
चला त्याने घोणस पकडली तर तिचे फोटो काढता येईल अशा विचारात मी कॅमेरा काढला आणि टेलीलेन्स बसवायला लागलो तोच...
बाजूच्या जंगलातून एकदम फुल स्पीडमध्ये एखादी जीप घुसावी आणि फांद्या तोडत निघावी तसा आवाज व्हायला लागला. जमिन हादरली आणि काय प्रकार चाललाय तेच समजेना...त्या दिशेने पाहिले तर एक भला थोरला काळा आकार जंगलात आत घुसत चालला होता...
गवा....
येस, तो गवा होता...
गंमत अशी झाली होती की डाव्या बाजूच्या जंगलात महाशय शांतपणे चरत होते...आम्ही त्याच्या बाजूने गेलो तरी त्याला नोटीस केले नव्हते..पण स्वप्नीलला घोणस दिसल्यावर तो नेमका त्याच दिशेने धावत गेला..
आता एकदम तो गव्याच्याच दिशेने गेल्यावर महाशयांनी एकदम पोबारा केला...आणि वाटेत येणारी झाडे-झुडपे बेगुमान वेगाने तुडवत तो जंगलात पसार झाला...
ही गोष्ट जेमतेम काही सेकंदात घडली पण कितीतरी वेळ छाती धडधडत होती..
पुन्हा एकदा त्या कंटाळवाण्या वाटेने चालू लागलो..आता तर दिवस उलटून चालला होता तरी किल्ला कुठे जवळपास असल्याची चिन्हे दिसत नव्हती...सांगातीमध्ये दिल्यानुसार सडा लागला होता पण तिथून थोड्याच अंतरावर किल्ला होता..आम्हाला सडा मागे टाकून एक तास उलटला होता तरीपण किल्ला काय नाही...वाट चुकली म्हणावी तर एकही फाटा नव्हता..एकच सरळसोट वाट...चालून चालून प्राण अगदी कंठाशी आले होते...पाणीही संपायला आले होते..आता जर किल्ला किंवा पाणी यापैकी काहीतरी सापडले नाही तर अवघड होते...कहर म्हणजे थोडे पुढे वणवा लागला...सुकलेला पाचोळा धडाडून पेटला होता आणि झाडे-झुडपे त्यात करपून जात होती...आम्ही बाजूच्या दोन-तिन फांद्या तोडल्या आणि आग विझवायचा प्रयत्न केला पण ती आग आमच्या आटोक्याबाहेरची होती..धुराने जेव्हा अगदी जीव नकोसा केला तेव्हा नाद सोडून पुढे निघून आलो...

दरम्यान, रस्त्याच्या डाव्या बाजूला गर्द झाडी दिसली..थोडा विसावा घ्यावा म्हणून त्या दिशेला गेलो आणि चमकलोच...तिथे एक मस्तपैकी पाणवठा...लई भारी...कामंच झालं...

तुडुंब पाणी प्यालो...घामाजलेली तोंडे धुतली...आणि बराच वेळ नुसतेच बसून राहीलो..
अजुन किल्ला किती लांब आहे काहीच कल्पना नव्हती...अजुन किती चालावे लागेल..किल्ला जरी सापडला तरी तिथे पाणी असेल किंवा नसेल...त्यापेक्षा इथेच मुक्काम केला तर...
माझ्या मनात आलेले हे विचार स्वप्नीलच्या कानावर घातले..त्याला ही आयडीया एकदमच आवडली..
ती जागाच भारी होती...सगळ्याबाजूने गर्द रान आणि मधोमध छानसा नितळ पाण्याचा पाणवठा...मुक्काम ठोकण्यासाठी आदर्श ठिकाण...
पण इथे जंगलात उघड्यावर मुक्काम ठोकायचा म्हणल्यावर प्रणवची तंतरली...पण त्याने तसे न दाखवू देता हजार कारणे पुढे केली..
अरे यापेक्षा आपल्याला किल्ल्यावर जास्त चांगला व्ह्यू मिळेल, तिथे असेल पाणी..वाटल्यास रात्री आपल्याला प्राणी बघायला म्हणून येता येईल परत...
पण आम्ही ढिम्म ऐकले नाही त्याचे आणि खुशाल जागेची साफसफाई करून तंबु उभारायच्या उद्योगाला लागलो.
मला खूप वाईट वाटतंय मी त्या जागेचे शब्दात वर्णन नाही करू शकत पण मी माझ्या मोबाईलवर त्या जागेचा शक्य तितका व्हिडीयो काढायचा प्रयत्न केलाय..तो इथे पाहू शकता..

http://www.youtube.com/watch?v=Xn8uJFWKJkg

दरम्यान, आम्ही सुकी लाकडे जमा करून रात्रीच्या जेवणासाठीची तयारी सुरू केली. तो भाग इतका गर्द झाडीचा होता की अंधार पडल्यावर काही म्हणजे काही दिसले नसते आणि धोकादायकही ठरले असते..
दोन गोष्टी कटाक्षाने केल्या म्हणजे...पाणवण्याच्या वाटेवर किंवा त्याच्या जवळपास तंबु उभे केले नाहीत..थोडे दूरवर जरा झाडीत असे केले..रात्री गव्यांचा कळप वगैरे आला तर त्यांच्या वाटेत नको म्हणून आणि तसेच आमच्यामुळे बुजुन जाऊन इतर प्राण्यांना पाण्यापासून लांब रहायला नको म्हणून..
दिवस उन्हाळ्याचे होते आणि जवळपासच्या भागात हाच एक पाणवठा असण्याची शक्यता होती...
आणि दुसरे म्हणजे रात्रभर जळेल असा लाकूडफाटा जमा केला..या भागात अस्वलांची संख्या मोठी आहे..आणि आजच सकाळी साहेबांनी त्यांची करामत दाखवल्यामुळे रिस्क घेणे शक्य नव्हते...
पण ते वगळता जंगल कँपींगचा अनुभव आम्ही मनमुराद लुटला...
शेकोटी पेटवण्यापूर्वी खबरदारी म्हणून आजूबाजूची जमीन स्वच्छ केली त्यावर पाणी शिंपडून मगच लाकडे रचली. (रात्री आग पाचोळ्यामुळे इकडे तिकडे पसरून वणवा लागू नये यासाठीची खबरदारी...या सर्व गोष्टींचा आम्हाला काय फायदा झाला ते कळेलच पुढच्या भागात)..
अमेयने मस्तपैकी मुगाची खिचडी, त्याबरोबर नॉरचे सूप आणि निखाऱ्यांवर भाजलेला पापड असा फर्मास मेनू केला होता.
विशेष म्हणजे त्या दुर्गम जंगलात आयडीयाला फुल्ल रेंज होती. (आयडीयाला शिव्या घालणाऱ्यांनी प्लीज नोट)त्यामुळे बायकोला फोन करून गप्पा-बिप्पापण मारून घेतल्या.
तिला जेव्हा सांगितले असा जंगलात मुक्काम केलाय तर म्हणे ह्या, तिथे कशी असेल रेंज, काय पण फेकू नको..
आता बोला..
असो.
जेवण उरकून बाहेर शेकोटीच्या उजेडात मस्त गप्पा मारत बसलो..प्रणवची इतकी .... होती की तो तंबु टाकल्यावर जे आत जाऊन बसला ते डायरेक्ट दुसर्या दिवशी सकाळपर्यंत...
रात्री उठून जावे लागू नये म्हणून त्या माणसाने पाणीपण कमी प्यायले...
आदले दिवशीचा तो बाटलीचा प्रसंग, आज सकाळी पाहीलेल्या बिबट्याच्या पाऊलखुणा, शिकार हे पाहूनही आम्ही बिनघोर चांदोली टायगर रिझर्वमध्ये ऐन जंगलात, जंगली श्वापदांच्या सानिध्य्यात, मनुष्यवस्तीपासून कित्येक किमी अंतरावर रात्र घालवणार होतो पण खरे सांगतो त्या जंगलाने इतकी मोहीनी घातली होती की कसलीही भिती आमच्या मनाला स्पर्श करत नव्हती..
एखाद्या निसर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आम्हीही त्या सर्वशक्तीमान निसर्गाला शरण जात, सर्व काही त्याच्या हवाली करत निद्राधीन झालो.
अर्थात दुसर्‍या दिवशी आमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची आम्हाला त्यावेळी तरी अजिबात कल्पना नव्हती...

http://www.maayboli.com/node/24056
भाग -४

गुलमोहर: 

मस्त.
पावलांचे ठसे लई भारी!! असे बघायला मिळाले म्हणजे ग्रेटच.

<<सगळ्याबाजूने गर्द रान आणि मधोमध छानसा नितळ पाण्याचा पाणवठा...मुक्काम ठोकण्यासाठी आदर्श ठिकाण...>> Uhoh

लवकर पुढचा भाग टाक.

मस्तच, फारच थरारक अनुभव,
पुढिल भाग येउद्या लवकर...

रच्याकने, >>आता काय करू...सगळा व्यवहार उधारीत केला...टाईप म्हातारा.>> हे नाही आवडले.

खतरनाक! आशिष, मस्त आणि थरारक आहे हे प्रवासवर्णन...प्रत्येक भागात उत्सुकता ताणली जात आहे...

अजुन किती भाग आहेत ? Happy

थ रा र क
आशु, पुढिल भागाची उत्सुकता वाढलींय. लवकर पुढचा भाग येऊ देत.

आज सकाळी पाहीलेल्या बिबट्याच्या पाऊलखुणा, शिकार हे पाहूनही आम्ही बिनघोर चांदोली टायगर रिझर्वमध्ये ऐन जंगलात, जंगली श्वापदांच्या सानिध्य्यात, मनुष्यवस्तीपासून कित्येक किमी अंतरावर रात्र घालवणार होतो पण खरे सांगतो त्या जंगलाने इतकी मोहीनी घातली होती की कसलीही भिती आमच्या मनाला स्पर्श करत नव्हती..
एखाद्या निसर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आम्हीही त्या सर्वशक्तीमान निसर्गाला शरण जात, सर्व काही त्याच्या हवाली करत निद्राधीन झालो.>>>>>>>>>मस्तच!!! Happy

खरच थरारक अनुभव....
तुम्हाला मानल बुवा.... आधीच्या रात्रीचा घडलेला प्रसंग,ते ठसे पाहुनसुद्धा जंगलात उघड्यावर राहीले...
सलाम तुम्हाला ... Happy

सर्वांना धन्यवाद...
गौतम - झाला पुढचा शेवटचा...अगदी थोडासाच राहीला आहे...
एकदा विचार आला होता दोन्ही दिवस एकत्रच करावेत पण फारच लांबला असता म्हणून...
हेम - टाकतो रे लवकर...शक्य झाल्यास आजच..
आनंदयात्री, रोहीत, जिप्सी -- तुम्हीही जाऊन या लवकरात लवकर...हा भाग ट्रेकर्सना बंद होण्यापूर्वी...
बहुदा आता बंद झालासुद्धा आहे...:(

टिल्लू - ते वाक्य सहज गमतीत टाकले होते..कुणाला हिणवण्याचा हेतू नव्हता...तरी तुमच्या मताचा आदर म्हणून काढून टाकत आहे..

हे सर्व करायला मनाची कणखरता पाहीजे नाही?
तुला हे कसे शक्य होते याचे नवल वाटते
(एकुणच कौटुंबीक जबाबदारी असताना, घरदार सोडुन भटकत जाणे*

जबरदस्त. या सगळ्यावे व्हीडिओ शुंटींग करायला हवे होते. ति मधली पायवाट आहे, ती एक प्रकारे वरदान असते. तिला ओलांडून वणवा जात नाही.
आणि उंबरेच नाही तर हा सगळा लेखच भेट आहे माझ्यासाठी !

खूपच छान लिहीत आहेस.. माझ्यासाठी ऑनलाईन ट्रेक चालू आहे.. थँक्स Happy फोटोज तर अव्वल आहेत

जबरदस्त... जबरदस्त...जबरदस्त...

सगळे भाग म्हणजे थरार, उत्कंठतेचे पिरॅमिड्स आहेत अगदी...

आतातर भैरवगड आणी प्रचितगडाचा ट्रेक करायची ईच्छा बळावलीच... या वर्षी तरी जमवयाल हवे....

मुकु हे तु नक्की कौतुकानेच म्हणतोयस ना...
दिनेशदा - हो बरोबर...आणी अशाच रेषा असतात त्यांना जाळरेषा म्हणतात...
धन्यवाद..
शशांक, सुनिल, यो, अरुंधती, इंद्रा आणि आडो..आभारी आहे..
मनोज - जमवाच जमवा...
Happy

अरे चँप तुला जंगलातुन बाहेर काढ सांगितले तु तर अजुन आत नेलेस..
पन लय भारी वाटेचे फोटो बघुन तर मोगली आठवला.

भैरवगड , प्रचितगडाची वारी डिस्कवरी पेक्षा भारी ......

चँप, भारी झाली रे जंगल सफारी Happy
सगळे प्रचि आवडले.

एखाद्या निसर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आम्हीही त्या सर्वशक्तीमान निसर्गाला शरण जात, सर्व काही त्याच्या हवाली करत निद्राधीन झालो.>>> हा विचार खुप आवडला रे.....!

इथे फिरायला कसली मज्जा येईल नाआआ scared0008.gif02-amazon.jpg

by the way,
लहानपणापासून जीम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसनच्या शिकारकथांची पारायणे केलेली>>
यासाठी मिलाओ हाथ!! जिम कॉर्बेट माझाही आवडता लेखक आहे... एका दमात लहानपणी 'रूद्रपयागचा नरभक्षक चित्ता' वाचून काढलं होतं... (आणि मग रात्री झोप लागली नव्हती, हा भाग वेगळा.. :D)

थरारक आणि रोमांचकारी.

उघड्यावर तंबू लावल्यावर कसला प्रसंग येणार होता हे जाणूनही दुस र्‍या रात्री तुम्ही उघड्यावरच तंबू लावला....??????? धन्य आहे मित्रा.

तुमच्या धाडसाला सलाम. Happy

पुढच्या भागाची वेगळीच उत्कंठा लागलिय.

आशु, अशक्य लोकं आहात तुम्ही. किती रे धोका पत्करता?!! आमच्याच्याने नाही बाबा असलं काही होणार. आम्ही आपले वर्णनं वाचण्यात आनंद मानणारे.

तरी पण तुमचं कौतुक आहेच Happy

पुढच्या भागाची वाट बघतोय.

इनमिनतीन - झालेच रे..आता शेवटचाच भाग..इनमिन अर्धा दिवस अजून की आपण शहरी भागात...
चातक - भारी आहे रे..एकदा आत गेलो की परत बाहेर यायचेच नाही...

Pages