द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - १०

Submitted by बेफ़िकीर on 28 February, 2011 - 02:49

आत्ता कुणी 'मारू का' असे विचारले असते तरीही पाचही जणांनी होकारार्थी मुंड्या हालवल्या असत्या अशी परिस्थिती झालेली होती.

ट्रकमधल्या त्या ब्लॅन्केट्समध्ये एकतर गुदमरत होतेच! पण एक हवालदार चक्क ट्रकच्या आसपास नुसता उभाच राहिलेला होता. तो हालतच नव्हता. अर्थात ट्रककडे एक दोनदा पाहून त्याने पाठ केलेली होती. त्याला इन्स्ट्रक्शन बहुधा अशी होती की लाँड्रीच्या बाजूला कुणी येत नाही ना हे तपास!

करायचे काय? अख्ख्या जेलमध्ये आवाजाचे थैमान चालू झालेले होते. शिट्या, भोंगे, केन्स, स्पीकरवरून सूचना आणि त्यातच तो मोठा अलार्म!

एक आणि एक हवालदार अ‍ॅलर्ट! नुसता अ‍ॅलर्ट नाही तर जीवाच्या आकांताने जेलचा कोपरा अन कोपरा शोधतोय!

नसीम कुजबुजला.

"यड्यांनो.. एखाद मिनिटातच त्यांना समजेल.. ट्रक शोधायला हवा हे! कुत्रा हाल खाणार नाही आपले कुत्रा"

अर्थात, नसीम कुजबुजला इतकेच! मनात प्रत्येकाच्या हेच येत होते. हा क्षण किंवा फार तर पुढचा आणखीन एखादा क्षण! त्यानंतर आपण सापडणे, खोचक आणि छद्मीपणे आपल्याला पाहून स्टाफ हासणे, त्यानंतर चेंबर आणि मरणाची भीक मागावीशी वाटेल अशी मारहाण!

आशा सोडूनच दिली होती प्रत्येकाने! सर्वात भावनाप्रधान होता नसीम! त्याने तिथेच गळा काढायला सुरुवात केली तशी बाबून खण्णकन त्याच्या डोक्यात थप्पड लगावली. आकाशला तर कुठून जास्त शहाणपणा करून मॅक्डोवेल क्वार्टरवरची चित्रे उलगडवून सांगीतली असे होऊ लागले होते. डोळ्यासमोर खरोखरच अंधेरी पसरू लागली होती त्याच्या!

सर्वात भानावर होते तिघेच! मुल्ला, बाबू आणि वाघ!

सदोदीत निगेटिव्हच विचार करणारा वाघ आज थक्क करणारा आत्मविश्वास बाळगून होता. अचानक त्याने विधान केले कुजबुजत!

"गपा रे... अजून धरले गेलो नाही आहोत... आणि हा एक हवालदार सोडला तर इथे कुणाचं लक्षही नाहीये.. आपण सुटणार म्हणजे सुटणार"

आशा! आशा दाखवणे हे आशा वाटण्यापेक्षाही महत्वाचे आहे. वाघने आत्मविश्वास निर्माण केला होता. याही क्षणी!

पण संजयबाबू नेमके काय करतोय हेच कुणाला समजत नव्हते. तो सरकत सरकत ट्रकच्या उघड्याबाजूपर्यंत पोचला तेव्हा बाहेरच्या प्रकाशामुळे लक्षात आले.

जॅक!

त्याच्या हातात जॅक होता.

सर्रकन काटाच आला सगळ्यांच्या अंगावर!

हा मारतोय की काय हवालदाराला?

हो!

खरच मारणार होता बाबू त्याला!

शिट्या फुंकणारे हवालदार काहीसे इतर बाजूला पांगलेले पाहून केवळ एका क्षणात बाबूने ट्रकबाहेर उडी मारली आणि त्या आवाजाने दचकून मागे पाहणार्‍या हवालदाराच्या छातीत जॅक बसला! बसला म्हणजे असा बसला की त्याच्या घशातून काही घुसमटलेले आवाज निघण्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही. तो केवळ जागच्याजागी आडवा झाला.

हे खरे तर वाईट होते. पण पर्यायच नव्हता. तो हवालदार किमान दोन महिने हॉस्पीटलमध्ये पडणार होता. किमान दोन तीन तरी फासळ्या तुटलेल्या असणार होत्या.

बाबूने अर्धा क्षणही वाया न घालवता हवालदाराला अक्षरशः तसेच उचलले. दोन तीन दिवसांपुर्वीच मार खाल्लेला असल्याने बाबूचा चेहरा त्या वजनाने पिळवटला. पण आज सुटायचेच होते. बाबूने जसे त्याला उचललेल तसा झेप घेऊन वाघ पुढे आला. वाघ आणि मुल्लाने हवालदाराला वर ओढून घेतले... आणि..

.... जेलमधील एक हवालदार गंभीर जखमी होऊन ब्लॅन्केट्सच्या उबेत पहुडला.. इच्छेविरुद्ध!

जेलमधील गणवेषाला खिसे नसतात. बेशुद्ध हवालदार नागडा असताना कसा दिसतो आणि नसीम कपडे काढून कसा दिसतो यात कुणालाही स्वारस्य नव्हते. पुन्हा ट्रकमध्ये चढलेल्या बाबूच्या धमकीमुळे मुल्ला आणि आकाशने हवालदाराचे कपडे काढले. त्या हवालदाराची अंगयष्टी त्यातल्यात्यात नसीमशी जुळत असल्यामुळे केवळ चवथ्या मिनिटाला नसीमच्या अंगावर हवालदाराचा युनिफॉर्म तसाच्या तसा होता. फक्त छातीवर काहीसे रक्त! इतकेच! हे भयंकर कृत्य इतक्या कमी अवधीत पार पडल्यामुळे सगळ्यांचाच आत्मविश्वास दुणावला. आता फक्त हवालदार कण्हत नाही ना इतकेच बघायचे होते.

जेलमध्ये रिव्हॉल्व्हर तीनच जणांकडे होते. नवले, राजासाब आणि कोकिळ! पण आज स्टोअरमधून आणखीन दोन वेपन्स रिलीज केली गेली. दोन अधिकार्‍यांना दिली गेली. दिसताक्षणी गोळ्या हा आदेश नवलेने केवळ बाराव्या मिनिटाला जाहीर केलेला होता.

पण आता? आता मगाचच्या हवालदाराच्या जागी, पण काहीसा अंधारात नसीम उभा होता. लांबून पळणार्‍या हवालदारांना हा सेन्ट्री वाटणे सहज शक्य होते. पण त्याच लांबून पळणार्‍या हवालदारांना पाहून नसीम मात्र जागच्याजागी प्रातर्विधी करण्याच्या बेतात आलेला होता.

आणि एकदाची ती घटिका आलीच! आलीच ती घटिका!

दैत्यासारखा नवले क्वार्टरच्या बाहेर पडला. पण घोळ झाला. तिकडून काहीतरी रिपोर्ट करायला पठाण वादळासारखा उगवला आणि नवलेला सामोरा आला.

या पाचजणांनी जे दृष्य आजवर पाहिलेले नव्हते आणि कधी पाहू असे त्यांना वाटलेही नव्हते ते दृष्य पाहायला मिळाले. नवलेला पाहून कडक उभा राहून खाडकन सॅल्यूट ठोकणार्‍या पठाणच्या कानाखाली एक जबरदस्त प्रहार केला नवलेने! हे कधीही होणे शक्य नव्हते. कधीच! एक शासकीय अधिकारी दुसर्‍या शासकीय अधिकार्‍याला तोवर मारणे अशक्य आहे जोवर काही ना काही व्यक्तीगत कारण नाही. पण ऑफिशियल कारणासाठी मार खाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पठाणची मान एक इंचसुद्धा इकडे तिकडे हालली नाही त्या थपडीने! तो एक अजस्त्रच होता.

नवलेची अस्सल शिवी ऐकूनही पठाणच्या चेहर्‍यावरची माशीही हालली नाही.

नवले - किधर है वो पाच हरामी *****??????

पठाण - अभीतक मिले नही स्सर... लेकिन जेलका अब एक कोना ऐसा नही है जहां जाच नही हो रही!

नवले - **** नसीम उसी बरॅकमे कैसे क्या था?? शिफ्ट कैसे नही हुवा??

नवलेचा आवाज सर्व कर्णे आणि शिट्यांच्या वरताण ऐकू येत होता. इकडे नसीमला अक्षरशः स्वतः तिथे जाऊन स्वाधीन व्हावेसे वाटू लागले होते. भीतीने त्याचा पुतळा झालेला होता.

पठाण - राजासाबने बोला.. इधरही रखनेको...

पुढचा फटका देण्यासाठी उचललेला हात मात्र वरच राहिला नवलेचा! पठाणने सरळ तो हात हवेत धरला होता. नवलेच्या डोळ्यांमधून अंगार बरसत होता.

पठाण - उपरकी पोझिशनके साहब हो इसलिये खैर कररहा था... मुंडी मरोडदुंगा एक हाथसे दुबारा हाथ उठाया तो... समझे???

क्षणभर स्तब्ध झालेल्या नवलेला अधिकारांची जाणीव झाली आणि त्याने रिव्हॉल्व्हरच हातात घेतले. मात्र ते रोखण्याआधीच तिकडून बुलेटचा आवाज ऐकू आला.

मुहम्मद कादिर... उर्फ राजासाब तुफान वेगाने येत होता..

राजासाब - स्सर.. बाहर जाही नही सकते वो लोग... अंदरही है..

नवले - अंदर है तो कुत्तेकी तरहा मुंह क्या देख रहे हो?? नसीमको शिफ्ट ना करनेकी ऑर्डर किसने दी?? ***** तेरेको सस्पेन्ड करदुंगा... एक मिनिट नही लगेगा मुझे..

आता राजासाबही भडकलाच!

राजासाब - नवले साहब.. आप जो यहां रंगरेलिया मनाते है.. वो अगर किसीको मैने बोलदिया ना... आप खुदही नही रहेंगे नौकरीपर.. फिलहाल हमारे साथ चलिये ऑफिसमे.. वहां रिपोर्टिंगके लिये आपका होना जरूरी है....

रिहाई! फ्रीडम!

समोर दिसणार होता आता! दोन चार सेकंदांमध्येच!

नवले ऑफीसमध्ये जाणार होता. कारण शेकडो फोन यायला सुरुवात झालेली असणार होती. ते अटेन्ड तर करायलाच हवेत. कारण मालपुरेला ही बातमी सांगितल्या सांगितल्या त्याने किमान डझनभर अधिकार्‍यांना ते इन्फॉर्म केलेले असणार होते.. आता त्या सगळ्यांचे फोन काय राजासाब घेत बसणार??

तिघेही निघाले. कुणाच्याच मनात आता कुणाचबद्दल आदरभाव उरलेला नव्हता. फक्त ड्यूटी म्हणुन ते साथ देणार होते एकमेकांची! पठाण आणि राजासाबने आपला उतरवलेला नक्षा त्यांना सोसायला लावायचाच ही सूडभावना मनाच्या एका ठेवणीतल्या कप्यात कुलूपबंद करत नवले ऑफीसकडे धावला. राजासाबने बुलेट वायूवेगाने १८० मध्ये फिरवली. आता पठाणही निघणार तोच..

.... सर्रकन राजासाबची बुलेट पुन्हा १८० मध्ये फिरली... आणि आता लाईट होता..

... ट्रकवर..

"कौन?????"

हा प्रश्न लांबवर उभा असलेल्या नसीमला उद्देशून होता. दोन महाभयंकर देहाचे राक्षस लांबून ट्रककडे पाहात होते. राजासाब आणि पठाण!

"मेस्त्री... "

"ध्यान रख..."

"स्सर...."

नसीमला एका हवालदाराचे नाव कसे काय सुचले आणि तीन स्टार नसलेल्यांना सॅल्यूट न करता नुसते कडक कसे उभे राहतात हे कसे काय आठवले हे त्याचे त्यालाही समजेना! आतले चौघे तर हतबुद्धच झालेले होते. तेवढ्यात पठाणने लांबूनच वाक्य टाकले.

"अभी क्या देखा???"

खरे तर ही बाब राजासाबलाही माहीत नव्हती की पठाण 'मेस्त्री'ला काय विचारतो आहे.

आता काय सांगायचे? की तुम्हाला नवलेसाहेबांनी मारले? की पुन्हा मारायला लागले तेव्हा नवलेसाहेबांचा हात तुम्ही हवेत धरलात?? दोन्ही केसेसमध्ये हवालदाराची साक्ष होणार! अशा हवालदाराने साक्षीत काय सांगावे असे पठाणला अभिप्रेत असेल याचा अंदाज काही नसीमला येईना! आणि परिस्थिती अशी होती की त्या प्रश्नाचे उत्तर फार तर दोन अडीच सेकंदात द्यायलाच हवे होते नाहीतर पठाण जवळ आला असता आणि आपण नसीम आहोत हे त्याला समजले असते.

नसीमने टेन्शन सहन न होऊन उत्तर दिले..

"नवले कुत्ता है साहब.. उसकी तो नौकरी गयी कबकी..."

राजासाबच्या बुलेटच्या उजेडात पठाण गाल उडवून आनंदाने हासलेला नसीमला दिसला आणि त्याने मनातच हात वर करून अल्लाचे आभार मानले. राजासाबने पठाणकडे काहीतरी चौकशी केली आणि दोघे बुलेटवरच बसून निघून गेले.

त्या थंड हवेतही घामाने निथळत असलेला नसीम मटकन खालीच बसला. आतून काहीतरी कुजबूज ऐकू आली तरी आपण उठून कडक उभे राहायला हवे याची बुद्धीही सुचेना आणि ताकदही जमा होईना!

आणि त्याचवेळेस तो चक्क उठवून उभा केला गेला. विदीर्ण नजरेने त्याने मागे पाहिले तर...

... संजयबाबू...

बाबू त्याच्या पाठीवर थोपटत असतानाच इतर तिघेही धाडधाड खाली उतरले आणि जणू ठरल्याप्रमाणे नवलेच्या क्वार्टरकडे धावले... बाबू अजूनही नसीमला 'तिकडे चल, तिकडे चल' अशा खुणा करत होता. पण नसीमच्या पायातले बळ गेलेले होते. बाबूने त्याला धरून ओढायला सुरुवात केली. त्या क्षणी मात्र लांबून काही आवाज जवळ येऊ लागले. बाबूने नसीमच्या कानात वाक्य ओतले..

"अभी तू अगर भागा नही... तो कुत्ते की मौत मरेगा.. खुदभी.. और हमेभी मरवायेगा..."

बाबू नवलेच्या क्वार्टरमध्ये पोचायच्या आधीच नसीम पोचला... इतका भयाने तो धावला..

आणि बाहेर ते लांबचे आवाज जव येऊन पोचत होते...

.... तेव्हा ....

... नवलेच्या क्वार्टरचे दार .... आतून बंद होत होते...

बाहेर एका भयानक नाट्याला सुरुवात होती... तर आतमध्ये एका आणखीनच भयानक नाट्याला..

=======================

एखाद्या दोन तास ठोकून काढलेल्या कैद्याचा चेहरा पडणार नाही इतका नवलेचा चेहरा पडलेला होता..

मालपुरेने त्याच्या पन्नास पिढ्यांचा उल्लेख करून त्यांचे संबंध निसर्गातील प्रत्येक सजीव योनीशी जोडून दाखवलेले होते. नवलेने अशा शिव्या खाणे दूरच, ऐकलेल्याही नव्हत्या. जेलमध्ये नुसता हल्लकल्लोळ चाललेला होता. मगाशी हे पाचजण ज्या ट्रकमध्ये होते त्या ट्रकच्या बाजूला आता दोन हवालदार उभे असलेले यांना नवलेच्या क्वार्टरमधील दाराला असलेल्या भोकातून दिसत होते. त्या दोघांपैकी एक जरी आत ट्रकमध्ये चढला असता तरी बेशुद्ध पडलेला हवालदार सापडून आपला सत्यानाश झाला असता हे पाचहीजणांना समजून चुकलेले होते. काहीही होवो पण त्यांनी तो ट्रक तपासू नये व हवालदार कण्हू नये अशी प्रार्थना करत होते सगळे!

राजासाबने केव्हाच दोन व्हॅन्स भरून स्टाफ बाहेर पाठवलेला होता. बंडगार्डन आणि मरी आई पोलिस स्टेशनचा यच्चयावत स्टाफ चारही दिशांना पांगून कैदी कुठे दिसतात का ते पाहात रस्त्यांवरून फिरत होता. ऑफीसमध्ये नवलेबरोबर फक्त एकच हवालदार थांबलेला होता. कैद्यांची स्पेशल हजेरी चाललेली होती. पाचच जण पळालेत की आणखी काही आणि हे पाच जण पळायच्या ऐवजी दुसर्‍या एखाद्या बरॅकमध्ये तर नाहीत ना हे तपासले जात होते हजेरीमधून! शेजारच्या बरॅकमधील चार कैद्यांना आणि या पाचजणांशी नेहमी बोलणार्‍या तीन कैद्यांना चेंबरमध्ये नेऊन चौकशीसाठी बेभान मारहाण चाललेली होती. ते काम आज पठाण करत नव्हता. कारण पठाण जेलमध्ये चित्यासारखा धावत होता. राजासाब स्वतः जेलच्या सर्व बॉर्डर्स तपासत होता सहाजणांना हाताशी घेऊन! प्रत्येक सरत्या मिनिटाला प्रत्येक जण त्याच निष्कर्षाप्रत येत होता. 'बाहेर कुणीही जाणे शक्य नाही'! 'पाचहीजण आतच असणार'!

मात्र ते नवलेसमोर बोलून दाखवण्याची हिम्मत त्याही परिस्थितीत एकाच्यातही नव्हती. कारण नवले कितीही भ्रष्ट असला तरी कामात वाघ होता! त्याने जर स्वतः जेल शोधायला सुरुवात केली तर आपल्या डोक्यातही येणार नाहीत ते स्पॉट्स तो शोधेल आणि कैदी मिळतील आणि मग आपली चंपी होईल हे जाणून प्रत्येक जण नवलेसमोर जायच्याऐवजी नव्याने शोधमोहीम हाती घेत होता.

पण नवलेला रिपोर्ट तर मिळायलाच पाहिजे ना? तेही त्याला रॅन्कमध्ये नेक्स्ट असलेल्याकडूनच! त्यामुळे राजासाब आणि गांधी नावाचा एक असे दोन अधिकारी मोबाईलवरून सतत नवलेच्या टचमध्ये होते. पण नवलेला त्याच मोबाईलवर इतके फोन येत होते की यांचे फोन सारखे मिस्ड कॉलच होत होते.

तिकडे मालपुरे स्वतःची टूर रद्द करून तातडीने पुण्याला निघाला होता. इकडे दोन वार्ताहर गेटपाशी घुटमळू लागलेले होते. त्यातच ती रिक्षा आली. 'मिनीची'!

गेटवरचा स्टाफ तर अवाकच झाला मिनीला पाहून! ती जणू काहीच विशेष नसल्याप्रमाणे, नेहमी यायची त्याच्यापेक्षा कितीतरी आधीच उगवलेली होती. अर्थातच, तिचे आत जाणे आता अशक्यच होते. राष्ट्रपतींनी परवानगी दिली तरीही!

मिनीचा तिथे वाद सुरू झाला. दोन्ही वार्ताहरांनी गेटवर धाव घेतली. मिनीचे भांडण ते स्वतः पाहू लागले. वार्ताहर आल्यामुळे मिनीला उत्तरे देणार्‍या पोलिसांनी ताबडतोब महिला पोलिसांना पाचारण केले गेटवर! त्यांना यायला लागलेल्या दोन तीन मिनिटात मिनीने वार्तहरांना काहीतरी भयंकर सांगितले.

त्या वार्ताहरांचे तर करीअरच होणार होते या बातम्या देऊन!

इकडे नवलेच्या क्वार्टरमध्ये वाघने नवलेचा वाळत टाकलेला अर्धवट ओला युनिफॉर्म अंगावर चढवला. बाकीच्यांनी नवलेचे इतर शर्ट्स व पॅन्ट्स घातल्या. स्वतःचे कपडे एक बोचके करून माळ्यावर टाकले. अद्भुत वेगाने हे चालू होते. तेवढ्यात बेल वाजली.

गळाठून चौघे भिंतीला चिकटले. आत्ता कोण आले इथे??

कुणाला नवलेसारखा आवाजही काढणे शक्य नव्हते. दुसरे म्हणजे 'इथे नवलेचा आवाज येतोय तर नवले ऑफीसमध्ये कसा काय' हा प्रश्न काही वेळाने लगेचच बाहेरच्याला पडणार होता. त्यामुळे स्तब्ध झालेल्या चौघांचे प्राण गळ्यापाशी आलेले असतानाच कुणीतरी बोलल्याचा आवाज ऐकू आला.

"साब तो ऑफीसमे है.. चल्ल चल्ल... पहिला भाग उधर..."

बुटांचे आवाज लांब गेले तसे बाबूने डोळे पोलिस आयला लावले. माय गॉड!

ट्रकपाशी एकही हवालदार उभा नव्हता. अर्थ सरळ होता. ट्रकमध्ये बेशुद्ध पडलेला हवालदार त्या दोघांना दिसलेला होता. तेच रिपोर्ट करायला ते ऑफीसमध्ये गेलेले असणार होते. मिनिट! फार तर एक मिनिट होते सुटका करून घ्यायला! त्यानंतर गळफास, किंवा गोळी किंवा अमानुष मारहाण!

पहिल्यांदाच बाबूचाही धीर खचला! इतका वेळ नसीम आणि आकाश हे कच्चे खिलाडी होते. आता तर बाबू स्वतःही हादरलेला होता. ते पाहून मुल्ला मटकन खाली बसला. आता फक्त काही क्षणच वाट पाहायची होती मृत्यूची! बाकी काही नाही. कधी येतात आणि आपल्याला पाहून गोळ्या घालतात किंवा चेंबरमध्ये जातात इतकाच प्रश्न उरलेला होता.

आणि अशा वेळेस पुन्हा वाघची चाणाक्षता मदतीला धावली. सगळेच अवाक झाले वाघचे डोके पाहून! नवलेच्या रूममधील इन्टरकॉमवर नंबर्स लिहिलेले होते. ऑफिस, मुहम्मद कादिर, गांधी, कोकिळ, पठाण, गेट, अ‍ॅडमिन, कॅन्टीन वगैरे वगैरे!

वाघने सरळ ऑफिसचा नंबर फिरवला. एंगेज! पुन्हा फिरवला एंगेज! तिसर्‍यांदा फिरवला तेव्हा रिंग!

"स्सर... ओपन लॅन्डमे मिले स्साले.. ला रहे है चेंबरमे..."

कुणाचा आवाज आहे आणि कुठून येतोय याच्याकडे लक्षही न देता नवले ऑफीसमधून बाहेर धावला. समोरून धावत आलेले पोलिस म्हणाले..

"लाँड्री ट्रकमे गोपीकी बोडी मिली सर.. उसको मारके भागगये है वो प्रिझनर्स..."

आत्ता या बातमीचे नवलेला काहीही अप्रूप नव्हते. नवले म्हणाला..

"भागो.. पहिले भागो.. ओपन लॅन्डमे है वो.. सब मिलगये... हर एक को खतम करनेका है.."

'आपण आणलेल्या बातमीपेक्षाही भारी बातमी साहेबाकडे आहे' यामुळे हिरमुसलेले दोन्ही हवालदार मागची सर्वच्या सर्व गस्त फाट्यावर टाकून पार लांबवर, अगदी जेलच्याही पलीकडे असलेल्या ओपन लॅन्डच्या दिशेने धावू लागले.

इकडे पाचजणांना काहीही समजलेले नव्हते की काय झाले. ऑफीसमध्ये असलेल्या इन्टरकॉमवर नशीबाने कुठून फोन आला ते एक्स्टेन्शन दिसायचे नाही. नवलेच्या रूमवर असलेल्या फोनमध्ये दिसायचे. पण ते या पाचजणांना माहीत नव्हते. वाघला वाटले की आपण इथे आहोत हे सगळ्यांना आता समजलेले आहे. त्याने हताश नजरेने बाबूकडे पाहिले. तोवर मुल्ला म्हणाला..

"इस *****ने आयडिया निकाला.. इसकी वजहसे सब मारे गये..."

आकाशची धुलाई सुरू झाली. तेवढ्यातच बाहेर आवाज आले. नसीमने डोळे लावले दाराला! जवळपास बारा पंधरा हवालदार विरुद्ध दिशेलाच धावत होते.

नसीम घुसमटल्यासारखा ओरडला..

"अबे वो च्युतिये सहीमे मजूरी प्लॉट्पे जा रहे है.. भागो यहांसे..."

फटाफटा प्रत्येकाने आळीपाळीने डोळे लावले दाराला!

तोवर मार खाल्लेल्या आकाशने पहिल्यांदा इन्टरकॉमची वायर तोडली. चारही खोल्यांमद्ये फिरून पाहिले. अजून एक एक्स्टेन्शन होते. त्याचीही वायर तोडली.

आकाश काय करतोय हे समजल्याबरोब्बर बाबूने नवलेच्या कपाटातून कॅश घेतली. तेथेच त्याला एक केनही मिळाली. बाहेरचे पळणारे आवाज वाढू लागले होते. वाघने सांगितलेल्या बातमीत दम नाही हे कळायला अजून फार तर पाचच मिनिटे लागणार होती. त्यातच राजासाब किंवा गांधी ओपन लॅन्डवर असले तर ती बातमी खोटी असल्याचे तर त्याच मिनिटाला मोबाईलवरून समजणार होते.

'नेमके करायचे काय' हेच कुणाला समजत नव्हते. काहीही करून डायरेक्ट जेलच्या बाहेर जाणारा मार्ग नवलेच्या क्वार्टरमध्ये तरी अजिबात दिसत नव्हता. दहा वेळा चित्र आठवूनही इतकेच आठवत होते की नवलेच्या क्वार्टरमध्ये किंवा क्वार्टरच्या अगदी बाहेरच एक अस मार्ग आहे जो डायरेक्ट जेलच्या बाहेर जातो. ड्रेनेज??

डोळे ताणून पाहिले तरी ड्रेनेजचे कव्हर किंवा काहीच दिसत नव्हते. बाहेर पळावे तर कदाचित अलगद पोलिसांच्या तावडीत सापडणार हे ज्ञात होतेच!

कपडे कैद्यांचे नव्हतेच अंगावर! पण इतके काही कुणी दुधखुळे नव्हते. वाढलेल्या दाढ्या आणि ओळखीचे चेहरे! हजारांमध्येही आणि तेही बाहेरच्याही पोलिसांनी क्षणात ओळखले असते! जेलमधल्या पोलिसांची तर कथाच नाही.

एकमेकांकडे हतबुद्ध नजरेने पाहतानाच....

.... मुल्ला... मुल्ला अत्यानंदाने चिरकला.. तो खिडकीबाहेर काय पाहतोय ते चार वेळा पाहूनही समजेना..

समजले....

.... लाँड्री...!!!

पाच कैदी पळाल्याची अपवादात्मक घटना घडल्यामुळे रात्री आठ वाजता सुरू होणारी लाँड्री आज सुरू होणारच नव्हती.

आणि आत्ता वाजलेले होते सव्वा सात!

लाँड्रीबाहेर एक मोठा पाईप येऊन जमीनीत जात होता. हा पाईप चक्क उघडा.... चक्क उघडा होता???

एक काय, दोन माणसे एका वेळेस सहज जाऊ शकतील असा पाईप! पण त्या स्पॉटपर्यंत कैदी पोचणेच शक्य नव्हते. म्हणजे, एरवी पोचणे शक्य नव्हते. आज तर कैदी त्या स्पॉटच्या कितीतरी जवळ पोचलेले होते.

आनंदाच्या भरात क्वार्टरच्या बाहेर पडून, क्वार्टरला वळसा घालून बाहेर जाणे याचा दुसरा अर्थ मरण असा होता. त्यामुळे अर्धा मिनिटभरच विचार झाला. अंधार आणि संधी पाहून एकेकाने सटकायचे आणि पकडले गेलो तर सरळ मार खायचा किंवा मरायला तयार व्हायचे. जीवावरच उदार झाले पाचही जण!

इकडे नवले घामाच्या धारांनी निथळत जेल पार करून ओपन लॅन्डपासून शंभर एक फुटांवर पोचला होता. बॅटरी आणि भोंगे घेऊन शोधाशोध करणार्‍या पथकाव्यतिरिक्त कुत्रेही दिसत नव्हते लांबून! नवले थबकला. हे काय झाले? राजासाबला त्याने फोन लावला.

"कादिर... किधर है प्रिझनर्स.."

"मै लोहगाव साइड पे हूं सर.."

"अबे ओपन लॅन्डमे है प्रिझनर्स मिलगये ना??"

"मिलगये??"

"मै तुझे पूछ रहा हूं..."

"नही तो?? किसीने बताया नही मुझे... मै अभी आया सर.. आप वही रुकिये..."

हार्ट अ‍ॅटॅक यायचा बाकी राहिला होता नवलेला!

आपल्याला आपल्याच राज्यात इतके मूर्ख कुणी आणि कसे बनवले असेल हे समजेना!

तीन ते चार क्षण लांबूनच ओपन लॅन्डकडे बघत तो मागे वळला आणि तीरासारखा ऑफीसकडे धावू लागला.. तेव्हा... त्याच्या मागून धावणार्‍य हवालदारांची छाती दमून फूटायला आलेली होती आणि.....

..... असह्य दुर्गंधी येत असलेल्या लाँड्रीच्या पाईपमधून...

... पाचही कैदी... पसार झालेले होते... आत्ता या क्षणी जर त्यांना कुणी आहेत तिथूनच जमीनीच्या वर काढले असते तर...

... जेलच्या सर्वात बाहेरील भिंतीपासून साधारण पंधरा फुटांवर ते बाहेर निघाले असते...

पण ते बाहेर निघणार होते खूप खूप लांब.. खूपच लांब.. जेथे... चित्रात दाखवल्याप्रमाणे... सूर्य उगवत होता... हा पाईप किती लांबपर्यंत असाच असेल ते सांगता येत नव्हते.. पण निदान.. यातून आता पुन्हा जेलमध्ये तरी जायचेच नव्हते....

आपल्याच क्वार्टरचा आणि लाँड्रीच्या ट्रकचा व त्यातील बेशुद्ध हवालदाराचा कस्सून शोध घेताना मूर्ख नवलेला हेही समजले नाही की....

.... त्याचा वाळत टाकलेला युनिफॉर्म, कपाटातील कॅश आणि चार ड्रेस पळवले गेलेले आहेत..

डॉग्ज! तेवढ्यात श्वानपथक तेथे पोचले...

क्वार्टरमध्ये सर्वत्र फिरले ते दोन कुत्रे... त्यांच्याबरोबर हालचाली करणे कुणालाही शक्य नसूनही करतच होते...

तेवढ्यात नवलेला ते दिसले.. इन्टरकॉम.. इन्टरकॉम डेड झालेला होता..

गॉश.. पाचहीजण इथेच होते हे नक्की.. आता जाणार कुठे???

काही सूचना देणार तेवढ्यात नवलेचा सेलफोन वाजला... नंबरही न बघता नवलेने तो कानाशी लावला..

"नवले?????"

त्या स्वरातला शांत आणि खोचक उर्मटपणा ऐकताच नवलेला जाणवले... स्थानिक नेता.. त्याचाच फोन असणार हा.. ज्याला आपण नसीम पळालेला असताना कानाखाली वाजवून येथे जबरदस्तीने बसवलेले होते...

नवले काही कमी उर्मट नव्हता. आजही वेळ आली असती अन या नेत्याने अधेमधे शानपत्ती केली असती तर आज तर नवलेने त्याला आतच घेतला असता...

"हा..."

नवलेचा टर्रेबाज आवाज ऐकून तिकडून आणखीनच खोचक प्रश्न आला..

"अरे जेलच्या आत घेतो का नाय आम्हाला?? आ?? लेडिजची कंप्लेन आहे तुझ्याबाबत.. तिला हिते बोलावतोयस क्येव्हाही.. आ?? ती स्वतः घेऊन आलीय आम्हाला.. "

नखशिखांत हादरणे म्हणजे काय त्याचा आयुष्यात पहिल्यांदा अनुभव आला नवलेला! संपूर्ण हादरणे!

मिनी! दुसरे कुणी असूच शकत नव्हते. फोनवर उत्तर काय द्यावे हेच नवलेला समजेना.. तेवढ्यात गेटवरच्या एका हवालदाराचा आवाज नवलेला ऐकू आला फोनवर..

"स्सर.. हे साहेब म्हणतात आत येऊ द्या... एक म्याडमबी आहेत..."

"त्यांच्यायच्ची **.... गेटपासून पन्नास फुटांवर कुणी दिसलं तर लाठ्या घाल"

हवालदाराने फोन ठेवून जसाच्या तसा निरोप नेत्याला सांगितला. गेटच्या आत जितका हल्लकल्लोळ चालला होता तितकाच आता बाहेर सुरू झाला. नेत्याने आणलेल्या पाच दहा बायका, वार्ताहर वगैरे बोंबाबोंब करू लागले. नेत्यने तर सरळ मालपुरेलाच फोन लावला. मालपुरेने शांतपणे सगळे ऐकून घेतले आणि नवलेला फोन लावला..

"नवले... हे बाईचं काय लफडं आहे गेटबाहेर???"

"ह्यॅ... स्साले नाटकं करतायत.. ह्यांना बातम्या पाहिजेत.. बाकी काही नाही..."

"पहिला त्याला जेलच्या आत घे... काय म्हणतोय ते समजून घे.. चुचकार... आणि शांत कर त्याला.. नाहीतर तुझा आजा तुला वाचवू शकणार नाही... आणि एक लक्षात ठेव.. मला पुण्याला पोचेपर्यंत दर अर्ध्या तासाला रिपोर्ट पाहिजे काय झालं याचा.. आणि शेवटचं म्हणजे... राजीनामा तयार कर स्वतःचा.. मी करीन सही आल्यावर.. तेवढा चांगुलपणा आहे माझ्यात..."

जेलच्या आतले कर्णे अन शिट्या! त्या चालूच असताना जेलच्या बाहेर गोंगाट वाढू लागला. आजूबाजूची माणसेही थांबून प्रकार पाहू लागली. नवलेच्य पायाखालची वाळू सरकलेली होती. त्याला जातीने गेटपाशी यावे लागले. कैदी कुठे गेले तो प्रश्नच बाजूला ठेवून!

नवले बाहेर आला आणि आजवर होऊ शकली नव्हती ती घटना घडली. त्याने पाय बाहेर टाकला अन मिनीने पुढे होऊन त्याच्या कानाखाली वाजवली. महिला पोलिसांनी ताबडतोब तिला धरले. स्थानिक नेता घोषणा देऊ लागला. वार्ताहर फोटो काढू लागले. आता तर नेता आत जायलाही तयार नव्हता. तितक्यात त्याची पोरं आली. ती म्हणजे नुसतेच पोसलेले गुंड होते. नवलेचा आवाज टीपेला पोचला. तो आता शिवीगाळ करू लागला. आपण अधिकाधिक अडकतोय हे त्याला समजेना! आणि मिनीने लाजलज्जा सोडून ओरडून आरोप केला..

"ह्याने माझ्यावर वीस वेळा रेप केलाय... ह्या राक्षसाला खलास करायला पाहिजे..."

आतलं सांभाळावं का बाहेरचं निस्तरावं नवलेला समजेना! त्यातच राजासाबने ऑफीसमधल्या इन्टरकॉमचा ताबा घेतला. कारण नवले आता बाहेरच अडकणार हे त्याला समजलं! कुणालातरी सुचलं की कैदी कदाचित त्या पाईपमधून गेलेले असणार!

आणि इकडे?? जमेल तितक्या वेगाने त्या घाणीतून, त्या मिट्ट काळोखातून, कसेबसे धावत पाचही जण ओरडत, कल्ला करत नुसते निघालेले होते.

'द वर्ल्ड ऑफ डिफरन्स'! त्यांच्या डोक्यावरच होते. आत्ता त्यांना कुणी वर खेचले असते तर ते जेलपासून दिड किलोमीटर अंतरावर निघाले असते... गुंजन थियेटरपाशी कुठेतरी!

नवलेविरुद्धच्या मिनीच्या तक्रारीचे नेत्याने जमेल तितके भांडवल करत रीतसर कंप्लेन्ट दाखल करून घेतली. नवले आता जेलमध्ये नव्हताच! तो होता बंडगार्डन चौकीवर! आणि मालपुरेच्या शिव्या खात होता राजासाब!

आणि त्याचवेळेस.... पाचही जणांना ते दिसले...

ते दृष्य! पाईपच्या आत! त्या अंधारातही! कारण... समोरून चार बॅटरीचे झोत येत होते.. चांगल्या सामर्थ्यवान बॅटरीजचे!

हबकलेले चौघे खिळून उभे राहिले..

तेवढ्यातच त्या गुदमरवणार्‍या घाणेरड्या पाईपात हाक घुमली..

"आकाSSSSSSSSSSSश... "

आकाशच्य डोळ्यांमधून घळाघळा पाणी वाहू लागले होते... हृदय भरून आलेले होते...

मिनीने 'ज्यांची मदत घेण्यास सांगितले होते' त्या तीन माणसांबरोबर.... या पाचही जणांना एस्कॉर्ट करण्यासाठी.... समोरून..... त्याच पाईपमधून ...

...आकाशची बहीण सरिता आलेली होती...

गुलमोहर: 

मस्तच.... जीव मुठीत घेऊन वाचला हा भाग.... पळून जायच्या प्रसंगाचे वर्णन अप्रतिम झालय... पुढच्या भागाची वाट पहातेय... पु.ले.शु

जबराट..............
सहिच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च......

काय पण राव तुम्ही !!!!!!!!!!!!!!
एकीकडे घरात रडवता................एकीकडे जेलात श्वास रोखुन धरायला लावता..............
लय झ्याक बघा.................
आता...बोका दावा बिगिबिगि....................

अमित

लिहायला घेतला आहे. आज गुरुवार असल्यामुळे वीज जाईल एखादवेळेस, तसे झाल्यास उशीरा किंवा उद्या प्रकाशित होऊ शकेल.

धन्यवाद श्वेता