सुकलेल्या मातीवर...

Submitted by निनाव on 24 February, 2011 - 16:33

माझ्या गल्ली च्या मागेच होते त्या कुंभाराचे घर
तसे फारसे मोट्ठे नव्ह्ते, तरी घडवले होते
त्याच हातानं..गोल फिरणार्या..
वेळे च्या चाकावर..निरंतर
मुले होती त्याला दोन..
त्या दोघानाही नव्हते रस
माती पिळण्यात..
त्यांची तोंडं बाहेर दिशेस बघणारी
कालांतरानं माती ही झाली होती कडक
नव्हती वळत...

त्याची बायडी मात्र धीर द्यायची त्याला
म्हणायची,
घडले ते घडले हातानं आपल्या
आता जीव नका वळवू चाकावर
अन मग धरायची हाथ
त्याच्या घामाळलेल्या माथ्या वर
चाक थांबायचेच जणू क्षण भर
आपल्या पदरानं त्याचा घाम पुसून उठायची ती
अन हसायची अलगद..
चेहर्यावरच्या तिच्या रेगा पसरायच्या
अन चाकावरच्या भेगा अजुनच उठून दिसायच्या..

आत्ता थांबले आहे चाक तिथे..
कुलुपच लागले आहे त्या पड्क्या घराला..
आम्ही बघतो अजुन अधुन मधून भिंत्यांवर चढून
आंगणात पसरलेली अर्ध-वळलेली भांडी..
काही तुटलेली.. अन काही उन्हाने तडतडलेली
आता कोणी जात नाही तिथे..
चाकही फिरत नाही...
मात्र अजुनही दिसतात त्यांचे चेहरे
सुकलेल्या मातीवर...
चाक फिरण्याची वाट बघणारे....

गुलमोहर: