केल्याने भाषांतर - प्रवेशिका ४ (लालू)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:12

मूळ कथा - The Lady, or the Tiger?
मूळ लेख - Frank Stockton
मूळ भाषा - English

स्त्री की वाघ?

फार फार पूर्वी एक राजा होता. त्याला 'अर्धवट रानटी' म्हणता येईल, कारण त्याच्या काही कल्पना दूरच्या लॅटीन शेजार्‍यांच्या सुधारणावादावर तासून काहीश्या सभ्य झाल्या असल्या तरी भव्यदिव्य, अचाट आणि अनिर्बंध होत्या.

त्याचा कल्पनाविलास तर अफाट होताच शिवाय त्याच्याजवळ निर्विवाद सत्ता असल्याने त्याने त्याच्या विविध कल्पना प्रत्यक्षात आणल्या होत्या. तो स्वतःशीच संवाद साधत असे आणि एकदा का एखादी गोष्ट त्याच्या मनात आली तर ती झालीच म्हणून समजा! त्याचे कुटुंबीय आणि प्रजाजन त्याने ठरवून दिलेल्या मार्गावर सुरळीतपणे चालत असत तेव्हा तो अगदी साधा आणि मनमिळाऊ असे. पण जेव्हा कुठे थोडा धक्का बसे आणि गोष्टी त्या कक्षेबाहेर जात, तेव्हाही तो अजूनच साधा आणि मनमिळाऊ असे कारण बिघडलेल्या गोष्टी मार्गी लावण्यात आणि सरळ करण्यातच त्याला आनंद मिळत असे.

त्याला 'अर्धवट रानटी' म्हणण्यामागे एक चालत आलेला समज होता. तो म्हणजे त्याचे सर्वांसाठी खुले असलेले रिंगण, जिथे रांगड्या आणि क्रूर अश्या शौर्य प्रदर्शनाने त्याच्या प्रजेचे मन शुद्ध आणि सुसंस्कृत बनवले जाई!

पण इथेसुद्धा त्या रानटी आणि अफाट कल्पना ठळकपणे समोर येत. ते रिंगण काही प्रेक्षकांना मृत्यूच्या दारातल्या योद्ध्यांचे विव्हळणे ऐकवायला बांधले नव्हते की एखाद्या धार्मिक वादाची परिणती पहायला बांधले नव्हते. तर लोकांच्या हिंमतीच्या कक्षा आणि उत्साह वाढवायला चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतील अश्या हेतूंसाठी बांधले होते. हे प्रचंड प्रेक्षागृह, त्यातले सज्जे, चोरमार्ग, तळघरे यासकट एका अनोख्या न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करीत होते. ज्या व्यवस्थेत नीतीचा विजय होऊन दुर्गुणाला शिक्षा मिळत असे. किंवा सद्गुणाला तटस्थ आणि प्रामाणिक निवाड्याच्या संधीने मोबदला मिळत असे.

जेव्हा त्याचा एखादा प्रजाजन राजाच्या दृष्टीने पुरेसा महत्त्वाचा गुन्हा करी तेव्हा निवाड्याचा दिवस ठरवून लोकांना कळवला जाई. त्या दिवशी राजाच्या रिंगणात त्या आरोपीच्या प्रारब्धाचा निर्णय होई. त्या इमारतीचे नाव अगदी यथार्थ होते. तिचे स्वरुप आणि रचना जरी उसनी घेतली असली तरी त्या इमारतीचा उद्देश हा फक्त एकट्या राजाच्या मेंदूतूनच आला होता. त्याच्या शरीरातल्या कणाकणाला स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यापलिकडे कोणतीही परंपरा माहीत नव्हती. त्याचा फोफावणारा रानटी कल्पनावाद त्याने त्याच्या प्रत्येक मानवी विचारावर आणि कृतीवर रुजवला होता.

एकदा का सर्व लोक रिंगणाच्या सज्ज्यांमध्ये जमले की रिंगणाच्या एका बाजूला उंच आसनावर राजा विराजमान होई. बाजूला त्याचे दरबारी बसत. राजाने इशारा करताच त्याच्या खालच्या बाजूचा दरवाजा उघडून आरोपी रिंगणात येई. त्याच्या थेट समोर, रिंगणाच्या दुसर्‍या बाजूला, दोन अगदी सारखे दिसणारे आणि एकमेकांच्या बाजूला असलेले दरवाजे होते. आरोपीने चालत जाऊन त्यातला एक दरवाजा उघडायचा. हे आरोपीचे काम किंवा त्याला दिलेला अधिकार. तो त्याला वाटेल त्याप्रमाणे कोणताही एक दरवाजा उघडू शकत असे. त्याच्यावर कसलेही दडपण आणले जात नसे किंवा त्याला कोणतेही मार्गदर्शन केले जात नसे. आधीच नमूद केल्याप्रमाणे ही तटस्थ आणि प्रामाणिक संधी होती.

एक दरवाजा उघडला तर त्यातून भुकेलेला वाघ बाहेर येई. जितका क्रूर आणि भीतीदायक म्हणून सापडेल तो वाघ तिथे आणून ठेवत असत. वाघ ताबडतोब झडप घालून आरोपीला फाडून काढत असे. हीच गुन्ह्याची शिक्षा. अश्या प्रकारे निवाडा झाला तर खिन्नपणे लोखंडी घंटा वाजवल्या जात. रिंगणाच्या बाहेरच्या कडेवर बसवलेल्या रुदालींचे करुण रुदन चढत जात असे. प्रचंड संख्येने आलेले प्रेक्षक भरल्या अंतःकरणाने आणि शिर झुकवून घराच्या दिशेने चालू लागत. एखाद्या तरुण आणि सभ्य किंवा वृद्ध आणि आदरणीय व्यक्तीला अश्या भीषण दैवाला सामोरे जावे लागले याचा शोक करत.

आरोपीने जर दुसरा दरवाजा उघडला तर त्यातून आरोपीच्या वयाला आणि पदाला साजेल अशी, राजाने प्रजाजनांतून निवडलेली एक स्त्री बाहेर येई. तो निर्दोषी ठरल्याबद्दल सन्मान म्हणून या स्त्रीशी त्याचा ताबडतोब विवाह करवला जाई. त्याची आधीची पत्नी आणि कुटुंब असेल किंवा स्वतःच्या पसंतीच्या एखाद्या स्त्रीवर त्याचे प्रेम जडले असेल इत्यादी दुय्यम गोष्टींना राजा आपल्या शिक्षा आणि सन्मान देण्याच्या अचाट योजनेत ढवळाढवळ करु देत नसे. आधीच्याप्रमाणे हेही काम ताबडतोब उरकले जाई. राजाच्या आसनाखालील दुसर्‍या एका दरवाजातून धर्मगुरु, गायकांचा ताफा, सोनेरी कर्ण्यातून आनंदी स्वर फुंकत नाचणार्‍या तरुणी एकमेकांशेजारी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या जवळ येत. लगेचच यथाविधी विवाह संपन्न होत असे. पितळी घंटा आनंदाने घंटानाद करत. लोक हर्षभराने दाद देत आणि तो निर्दोष पुरुष वाटेत फुले पसरणार्या मुलांच्या मागोमाग चालत आपल्या वधूला त्याच्या घरी नेई.

ही झाली त्या अर्धवट रानटी राजाची न्याय देण्याची पद्धत. तिचा वाजवीपणा तर उघडच आहे. गुन्हेगाराला कोणत्या दरवाजातून स्त्री येणार आहे हे माहीत असणे शक्य नव्हते. त्याला वाटेल तोच दरवाजा तो उघडत असे, पुढच्या क्षणी त्याचे भक्षण केले जाणार आहे की विवाह होणार आहे याची काडीमात्र कल्पना नसताना! काहीवेळा वाघ एका दरवाजातून बाहेर येई, काहीवेळा दुसर्‍या. या न्यायव्यवस्थेचा निर्णय केवळ वाजवीच नव्हता तर खात्रीशीर होता. आरोपीने स्वतःला गुन्हेगार ठरवले तर तत्काळ शिक्षा होत असे आणि निर्दोष सिद्ध केले तर त्याक्षणी मोबदलाही दिला जात असे, मग तो त्याला मान्य असो वा नसो. राजाच्या निवाड्यापासून आणि रिंगणातून...सुटका नव्हती.

ही न्यायव्यवस्था अगदी लोकप्रिय होती. निवाड्यादिवशी जेव्हा लोक एकत्र जमत तेव्हा त्यांना रक्तरंजित हत्या बघायला मिळणार की विवाहसमारंभ हे कधीच माहीत नसे. हा अनिश्चिततेचा घटक या प्रसंगाबद्दल उत्सुकता निर्माण करी जी अन्यथा निर्माण झाली नसती. अश्या रितीने जमावाची करमणूक होऊन त्यांना समाधान मिळे आणि समाजमनाचा वाईट परिणाम या योजनेवर होण्याची शक्यता नसे. तश्या सगळ्या गोष्टीं त्या आरोपीच्या स्वतःच्याच हातात होत्या, नाही का?

या अर्धवट जंगली राजाला एक मुलगी होती. ती त्याच्या कल्पनांइतकीच भराभर वाढणारी, त्याच्याइतकीच उत्साही आणि हुकूम चालवणारी होती. अर्थातच ती त्याची लाडकी होती आणि त्याचे तिच्यावर जगापलिकडे प्रेम होते. पारंपारिक प्रेमकहाण्यांतला नायक जसा एका चांगल्या कुळातला पण हलक्या पदावर काम करणारा तरुण असतो आणि राजघराण्यातल्या स्त्रीच्या प्रेमात पडतो, तसा एक तरुण या राजाच्या दरबारी होता. राजकन्याही त्याच्या प्रेमात होती आणि त्याच्यावर खूष होती कारण तो राज्यातला सर्वात देखणा आणि शूर तरुण होता. तिने त्याच्यावर उत्कटतेने प्रेम केले त्यामुळे प्रेम वाढत जाऊन दृढ झाले होते. राजाला याचा सुगावा लागेपर्यंत हे प्रेमप्रकरण काही महिने सुखाने चालू राहिले. घराच्या कक्षेतली कर्तव्ये पार पाडतानाही राजा डगमगला वा डळमळला नाही. त्या तरुणाला ताबडतोब तुरुंगात टाकण्यात आले आणि राजाच्या रिंगणात त्याचा निवाडा करण्यासाठी दिवस निश्चित करण्यात आला. अर्थातच हा विशेष महत्त्वाचा प्रसंग होता. राजाला आणि प्रजेलाही या खटल्याच्या कामाबद्दल आणि पुढे काय होईल याबद्दल उत्सुकता होती.

अशी घटना पूर्वी कधी घडलेली नव्हती. राजाच्या मुलीवर प्रेम करण्याचे धाडस साध्या प्रजाजनाने आधी कधीच केले नव्हते. नंतरच्या काळात ही गोष्ट इतकी सामान्य झाली की त्यात नाविन्य आणि आश्चर्य मुळीच उरले नाही.

राज्यातले सगळे वाघांचे पिंजरे सर्वात क्रूर आणि निर्दयी वाघ शोधण्यासाठी धुंडाळले गेले. यातूनच रिंगणासाठी एक भयानक पशू निवडला गेला असता. आणि कदाचित आरोपीच्या दैवाने हे वेगळे नशीब ठरवले नसते तर त्याच्यासाठी योग्य वधू असावी म्हणून लायक परीक्षक तरुण स्त्रियांचा दर्जा आणि सौंदर्याचे मोजमाप करत होते. अर्थात सर्वांना कल्पना होती की आरोपीवर ज्या कृत्याचा आरोप आहे ते कृत्य घडून गेले आहे. त्याने राजकन्येवर प्रेम केले आहे. तो तरुण, राजकन्या किंवा इतर कोणीही हे सत्य नाकारत नव्हते. पण राजा या वस्तुस्थितीला त्याच्या न्यायव्यवस्थेच्या कामात ढवळाढवळ करु देत नव्हता. त्याला त्या न्यायव्यवस्थेतून अतिशय आनंद आणि समाधान मिळत असे. कोणत्याही प्रकारे निवाडा झाला तरी तो तरुण मार्गातून दूर होणार होता. आणि राजकन्येवर प्रेम करुन त्या तरुणाने गुन्हा केला की नाही हे ठरवणारा घटनाक्रम बघण्याचा आनंद राजा लुटणार होता.

ठरवलेला दिवस उजाडला. दूरचे आणि निकटचे लोक जमले. रिंगणाचे सज्जे गर्दीने फुलून गेले. ज्यांना आत प्रवेश मिळाला नाही त्यांनी बाहेरच्या भिंतीकडेला गर्दी केली. राजा आणि त्याचे दरबारी आपापल्या जागी बसले... त्या दोन जुळ्या, आणि भीतीदायक साम्य असलेल्या दोन दरवाजांच्या समोर.

सगळी तयारी झाली होती. इशारा दिला गेला. राजा आणि दरबारी यांच्या आसनाच्या खालच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि राजकन्येचा प्रियकर रिंगणात आला. त्या उंच, सुंदर, देखण्या पुरुषाला पाहून प्रेक्षकांत कौतुकमिश्रित आणि अस्वस्थ अशी कुजबुज झाली. अर्ध्याअधिक लोकांना असा रुबाबदार तरुण आपल्यात आहे हेच माहीत नव्हते. राजकन्येने त्याच्यावर प्रेम केले यात नवल ते काय! त्याचे या जागी असणे मात्र अगदी दुर्दैवी होते.

तो तरुण रिंगणात आल्यानंतर रिवाजाप्रमाणे राजाला अभिवादन करण्यासाठी वळला. पण त्याच्या मनात राजाविषयी विचार नव्हताच. त्याचे डोळे राजाच्या उजव्या बाजूला बसलेल्या राजकन्येवरच खिळले होते. तिच्या स्वभावात अर्धा जंगलीपणा नसता तर ती तिथे आलीच नसती. तिला या प्रसंगाबद्दल इतके कुतूहल होते की तिच्या तीव्र जिज्ञासेने तिला अनुपस्थित राहू दिले नाही.

ज्या क्षणी तिच्या प्रियकराने राजाच्या रिंगणात आपले प्रारब्ध ठरवावे असा हुकूमनामा निघाला तेव्हापासून रात्रंदिवस तिने हा प्रसंग आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती याशिवाय दुसर्‍या कश्याचाच विचार केला नव्हता. या प्रसंगातून गेलेल्या इतर लोकांपेक्षा तिच्याकडे सत्ता, प्रभाव आणि स्वभाव यांची ताकद जास्त होती. त्याच्या जोरावर तिने आत्तापर्यंत कोणी केली नव्हती अशी गोष्ट केली. तिने त्या दरवाजांचे गुपित जाणून घेतले! दरवाजांच्या मागे असलेल्या दोन खोल्यांपैकी कोणत्या खोलीत वाघाचा पिंजरा आहे आणि कोणत्या खोलीत स्त्री आहे हे तिला माहीत होते. त्या जाडजूड आणि आतून चामड्याचे पडदे लावलेल्या दरवाजातून कोणताही आवाज किंवा खूण दरवाजा उघडायला येणार्या व्यक्तीपर्यंत पोचणे शक्य नव्हते. पण संपत्ती आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते गुपित राजकन्येकडे आले होते.

तिला कोणत्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर ती शालीन, तेजस्वी स्त्री बाहेर येणार आहे एवढेच नव्हे तर ती स्त्री कोण आहे हेसुद्धा माहीत होते. ती राजपरिवारातल्या सुंदर आणि सुशील युवतींपैकी एक होती. आरोपीच्या निर्दोषत्वाचा मोबदला म्हणून तिला निवडले होते आणि राजकन्या तिचा अतिशय द्वेष करत होती. तिच्या डोळ्यासमोर आणि कल्पनाविश्वात तिला ती स्त्री तिच्या प्रियकराकडे कौतुकमिश्रित कटाक्ष टाकताना दिसे, तर कधी त्या नजरेची भाषा समजून ते कटाक्ष प्रियकराकडून परतवले जात आहेत असेही वाटे. काही वेळा तिने त्यांना बोलतानाही पाहिले होते, अगदीच क्षणभर. पण थोड्या वेळात बरेच काही बोलता येऊ शकते. ते बोलणे कदाचित महत्त्वाचे नसेलही पण ते राजकन्येला कसे काय माहीत असू शकेल? ती मुलगी सुरेख होती पण तिने राजकन्येच्या प्रियकराशी नजर देण्याचे धाडस केले होते. पूर्णपणे रानटी असलेल्या पूर्वजांच्या रक्तातून तिच्यापर्यंत आलेल्या रानटीपणाच्या तीव्र भावनेतून राजकन्या त्या दरवाजामागे लाजून कांपत उभ्या असलेल्या स्त्रीचा द्वेष करत होती.

तिच्या प्रियकराने राजकन्येकडे पाहिले. ती अगदी रंगहीन, कळाहीन अशी दिसत होती. त्यांची नजरानजर होताक्षणी त्याने ताडले की कोणत्या दरवाजामागे वाघ आणि कोणत्यामागे स्त्री आहे हे तिला माहीत आहे. ज्यांची मने जुळलेली आहेत त्यांना असे सामर्थ्य प्राप्त झालेले असते. तो तिला व्यवस्थित ओळखत होता. राजाला आणि इतर प्रेक्षकांना जे गुपित माहीत नाही ते जाणून घेतल्याशिवाय राजकन्या स्वस्थ बसणार नाही हे त्याला माहीत होते. राजकन्येला ते गुपित जाणून घेण्यात यश येणे हे त्या तरुणासाठी भरवश्याची मदार असलेले एकमेव आशास्थान होते. ज्याक्षणी त्याने राजकन्येकडे पाहिले त्याक्षणी त्याच्या लक्षात आले की ती यशस्वी झाली आहे. त्यालाही मनातून ती यशस्वी होणार हे माहीतच होते.

त्याने झटकन आणि अस्वस्थपणे प्रश्न केला, "कोणते?" जणू काही त्याने उभ्या जागेवरुन मोठ्याने विचारला असल्याप्रमाणे तिला तो स्पष्ट कळला. एका क्षणाचाही विलंब होऊन चालणार नव्हता. प्रश्न अगदी उतावीळपणे विचारला गेला होता आणि उत्तरही तसेच देणे भाग होते.

तिचा उजवा हात समोरच्या कठड्यावर विसावला होता. तिने हात उचलून उजवीकडे किंचित आणि झटकन हालचाल केली. तिच्या प्रियकरानेच फक्त तिला पाहिले. तो सोडल्यास बाकीचे सर्व लोक रिंगणातल्या तरुणाकडेच बघत होते.

तो वळला आणि जलद पण ठामपणे पावले टाकत रिकाम्या जागेतून चालू लागला. सर्वांच्या हृदयाचे ठोके थांबले. प्रत्येक श्वास रोखून धरला गेला. प्रत्येक नजर त्याच्यावर खिळली होती. जराही न अडखळता तो गेला आणि त्याने उजवीकडचा दरवाजा उघडला...

आता गोष्टीतला मुद्दा असा आहे: त्या दरवाजातून वाघ बाहेर आला की स्त्री?

या प्रश्नावर जेवढा जास्त विचार करु तेवढे उत्तर मिळणे अवघड होत जाते. मानवी मनाच्या अभ्यासाचा यात समावेश होतो जो आपल्याला भावनांच्या चक्रव्यूहात भरकटवतो आणि त्यातून मार्ग सापडणे कठीण. प्रामाणिक वाचकहो, तुम्हीच विचार करा. प्रश्नाचे उत्तर तुमच्यावर अवलंबून नसून रानटी, रागीट अश्या राजकन्येवर आहे. तिचा आत्मा निराशा आणि मत्सर यांच्या आगीत पोळून निघत आहे. तिने तर त्याला गमावलेच आहे, पण मग तो कोणाला मिळावा?

जागेपणी किंवा स्वप्नात आपल्या प्रियकराला क्रूर वाघाचा दरवाजा उघडताना पाहून किती वेळा तिने आपला चेहरा भीतीने झाकून घेतला असेल?

..पण कितीवेळा तिने त्याला दुसर्‍या दरवाजाजवळ पाहिले असेल? कितीदा तिने आपल्या दु:खी मनाच्या खेळात त्याला आनंदाने दुसरा दरवाजा उघडताना पाहून आपले दात-ओठ खाल्ले असतील? केस उपटले असतील? विजयोन्मादात त्या स्त्रीकडे जाताना पाहून वेदनेच्या आगीत तिचा आत्मा कसा जळाला असेल? त्याचे पूर्ण शरीर जीव वाचल्याचा आनंद साजरा करताना पाहून, आनंदाचा घंटानाद ऐकून, धर्मगुरु आणि लवाजम्यासह तिच्या डोळ्यांसमोर त्या दोघाना पती-पत्नी घोषित होताना पाहून, फुलांच्या मार्गावरुन ते दोघे चालत असता जमावाच्या जल्लोशात तिची हताश किंकाळी विरुन जाताना पाहून..!
त्याने तत्काळ मरुन जाणे आणि कोण्या एका भविष्यकाळातल्या अर्धवट रानटी सुखी प्रदेशात तिच्यासाठी वाट पहाणेच चांगले नाही का?

..आणि मग तो भयानक वाघ, त्या किंकाळ्या, ते रक्त!

तिचा निर्णय तिने क्षणार्धात दर्शवला असला तरी तो अनेक दिवसरात्र ताणतणावात आणि विचारांत घालवून घेतला गेला आहे. तिला विचारले जाणार हे तिला माहीत होते. काय उत्तर द्यायचे याचा निर्णय तिने घेतला होता आणि न डळमळता तिने तिचा हात उजव्या बाजूला हलवला होता.

तिच्या निर्णयाचा प्रश्न हा क्षुल्लक नाही. मी स्वतः ते उत्तर देऊ शकेन असे म्हणण्याचे धाडस मी करत नाही आणि म्हणून मी हे तुम्हां सर्वांवर सोपवत आहे: उघडलेल्या दरवाजातून कोण बाहेर आले, स्त्री की वाघ?

----------------------------------------------------------
मूळ कथा खालील धाग्यांवर वाचता येईल.
http://www.classicshorts.com/stories/tiger.html
http://www.gutenberg.org/catalog/world/readfile?fk_files=1442286

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू, कथा आणि अनुवाद दोन्ही आवडलं.
माझ्या मते, राजकन्येनी त्याला वाघाचे दार उघडायला लावले असणार.
जन्मभर त्याला त्या दुसर्‍या बाईबरोबर बघण्यापेक्षा तो मेलेलाच बरा असा विचार तिनी ती पण अर्धी रानटी असल्यामुळे केला असणार.

Pages