कान पकडू नये... (तर ही...)

Submitted by अभय आर्वीकर on 17 February, 2011 - 13:15

कान पकडू नये

आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये

ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये

शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये

निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

म्हणतात वाहवा, व्वा! स्त्रीरम्य वेड ते
सच्चा विचार सहसा का आवडू नये?

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये

सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

आता कुठे जरासा झालोय मुक्त मी
पायास साखळ्यांनी परत जखडू नये

माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये

शेरात प्राण माझा मी घट्ट बांधला
पाळीव उंदरांनो रे कुरतडू नये

हे अन्न सात्त्विकाचे ये ’अभय’ भोजना
मंगल अशा प्रसंगी सहसा दडू नये

--------------गंगाधर मुटे------------------

गुलमोहर: 

मस्त Happy

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये

हे विशेष आवडले... मस्तच... Happy

शेरात प्राण माझा मी कचकचून बांधला
पाळीव उंदरांनो रे कुरतडू नये.............मुटेजी,पहिल्या ओळीत वृत्तभंग झालाय. Sad

माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये.... हा शेर फार आवडला.

Happy

एकाहून एक शेर, सर्व मस्त.

पाळीव उंदरांनो रे कुरतडू नये- येथे 'रे' च्याजागी
तो पाहिजे आहे का? किंवा- ' असा' ?

(पाळीव उंदरानी तो कुरतडू नये - असां मी अर्थ
घेतला आहे.)

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

मुटेजी,
अगदी अचुक कान उघडणी !
Happy

अलकाजी,
अर्थ सारखाच आहे. फक्त

जर अपेक्षा व्यक्त करायची झाल्यास
"पाळीव उंदरानी तो कुरतडू नये"
असे लिहावे लागेल.

पण
जर थेट उंदरांनाच विनंती/सुचना/आवाहन/आदेश द्यायचा झाल्यास

पाळीव उंदरांनो रे कुरतडू नये.

असेच योग्य होईल, असे वाटते.

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?>>>

हा शेर आवडला

आवडेश Happy