चक्र /वर्तुळ भाग ४

Submitted by कविन on 10 February, 2011 - 02:03

http://www.maayboli.com/node/12890 चक्र/ वर्तुळ भाग 3

चक्र /वर्तुळ भाग ४

"आईSS, आता लहान आहे का मी? लग्न होऊन मला एक मुलगी पण झालेय ..! मी बघेन ग काय नी कसं मॅनेज करायचं सगळं ते. तू कशाला पण आईंना असं बोललीस..."

"अगंSS.. पSण..."

"पSSण काय पण, तू नको मधे पडूस ह्यात, मला करुदे ना हॅन्डल माझ्या पद्धतीने. तू पडतेसच कशाला ह्या घरातल्या गोष्टींमधे?"

"अगं.. पण सहज बोलले मी. कुणी काही बोललं का तुला त्यावरुन?"

"रामायण झाल्यावर मगच तुला पटणार का माझं म्हणणं? आणि मी फोन ठेवतेय आता, अख्या बिल्डींगला कळेल ह्या आवाजात अजून बोलले तर ..कोण कोणास काय म्हणाले ते"

फोन कट केला नी अभिची एंट्री झाली. शेवटची तारसप्तकातली वाक्य कानावर पडली त्यावरुन त्याला कल्पना आलीच काय झालं असेल त्याची.

"फोन मधुन धूर येतोय मनु" त्याने तरिही विनोदाचा क्षीण प्रयत्न केला आणि चुकीच्या वेळी चुकीचा विनोद केल्याची शिक्षा म्हणून एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे फेकला गेला.

"तू ना तुझ्या आईवरच गेल्येस बहुतेक. काय कुठे बोलावं ते कळतच नाही तुला" मुद्दाम खवट बोलणं होतं की अजून एक विनोदाचा फुटकळ प्रयत्न ह्यात न पडता तिने..."होSS ना! तुम्हाला कळतं नाSS???" म्हणत वार परतवला त्याचा.

ह्यातलं तुम्हाला हे "आदरार्थी एकवचन" नसून "अनेकवचन" होतं हे लक्षात येऊन विषय बदलला नाही तर आज तिसरं महायुद्ध नक्की घडणार ह्याची जाणिव होऊन तो शहाण्या नवर्‍याची भुमिका पार पाडण्यासाठी गप्प बसून तिला कामात मदत करत राहिला.

तिने पुन्हा फोन लावायला घेतला तेव्हा गोंधळून त्याने "आता पुन्हा काय..?" असा चेहरा केला त्यावर "तुम नही समझोगे, लडकीया होती ही ऐसी है" असा डायलॉग, त्याला तिने न बोलताच ऐकू आला

-------

"म्हणे ह्या घरातल्या गोष्टींमधे कशाला पडतेस?" " हे घर... म्हणजे?" "काल परवा पर्यंत माझी लेक होती ना ही शेखर?" "आता एकदम परक्यासारखी तोडून बोलली? का? काय केलं मी इतकं? तिची काळजी वाटून सहज बोलले ना मी?"

"हो पण निमाबाई ती आहे की समर्थ. ठेवा की तिच्यावर विश्वास. आता लेक सासरी गेलेय आपली. तिला तिचा संसार तिच्या चुक बरोबर सकट करुद्यात की. काळजी ठिक आहे पण… इतकंही गुंतणं योग्य नाही"
"तुला काय जातय बोलायला? म्हणे गुंतणं योग्य नाही. जीवाला घोर लागतो तो जाणायला आईच व्हायला हवं"

"आता गेली का गाडी पुन्हा त्याच ट्रॅक वर...! चला विषय बदला..."

"असं म्हंटलं की झालं तुझं, तरी पण चूक नाहीये म्हणणं तुझं. कळतय पण नाही वळत असं काहीसं होतय"

"फोन वाजला निमाबाई, घ्या लेकीचाच असणार.. बोला जरा ते डोळे पुसून.."

"हम्म! बोल... नाही ग रागावले नाही मी..बSरं.... होS अगं SS...... चल बाळा काळजी घे. फोन ठेवते आता"

------------

"बरं राणिसरकार, तुमचा क्राईंग एपिसोड संपला असेल तर आपण जेवून घेवुयात का आता? आई बाबा पण आलेत आत्ताच"

"मला नव्हतं रे दुखवायचं तिला असं, मी आधी तेच व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होते तिला. पण.. तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं आणि मग गेलं माझ्या तोंडून निघून तसं... पण वाक्य बोचरं असलं तरी फॅक्ट आहे ना ती..?

सल्ला देणं एखादवेळेस ठिक आहे पण उठसुट अशी काळजी वाटून ‘मी खाते किती, झोपते किती, काम किती करते’ असं प्रत्येक बाबतीत विचारत राहिली ... बर विचारणं पण ठिक म्हणते मी, पण मला विचार ना काय विचारायचं ते.

"कित्ती काम पडतं ना मनुला" टाईप वाक्य डायरेक्ट आईंना ऐकवायचं म्हणजे...! वादाला कारण नाही होणार? मSग, तेच सांगत होते तिला. मी आहे ना समर्थ माझ्या स्वत:साठी बोलायला! एकतर कानाला यंत्र लावत नाही, इथुन घसा फ़ोडून सांगावं लागतं त्यातही भेटल्यावर बोलू म्हंटलं तरी तिलाच रहावत नाही मग विषय जातो वाढत आणि फट्ट दिशी तुटतो.. रबर ताणलेला"

"तू बघशील अभी, मी खूप चांगली आई होईन. म्हणजे माझी आई खूप चांगली, प्रेमळ आहेच रे पण मी ना पिल्लूला एकदम वेगळं वाढवेन, पुर्ण मोकळेपणा देईन, तिची मैत्रिण होईन. तिच्या बाबतीत बिलकूल पझेसिव्ह रहाणार नाही...."

"मातोश्री आता सध्या जेवायची कृपा कराल का? तुमचं पिल्लू सध्या तुमच्या करता थांबलय जेवायचं"

"तू हो पुढे मी आलेच.."

----------

पिल्लू - वय वर्ष २/३ - "आई...आऽई आऽऽई आऽऽऽई आणि फक्त आई"

पिल्लू - वय वर्ष ४ "आई... आमच्या बाईऽऽ किनई..... बाईं म्हणतात... बाई अशा नी बाई तशा" आणि तरिही ऍट द एण्ड ऑफ़ द डे "आऽई तू कोणाची आहेस? फक्त माझी आहेस ना?" "माऽऽझी आई..मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही"

- वय वर्ष ५ "आई, मी तनु कडे जाऊ आज पुर्ण दिवस रहायला? तनू माझी बेस्ट फ्रेंड आहे तुला माहितेय!...... प्लीऽऽज"

- वय वर्ष ७ "आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..."

- वय वर्ष …. - ब्लाऽऽऽऽब्लाऽऽऽऽ ब्लाऽऽऽह ……

- वय वर्ष …. - "........................"?????

----------------

खोटं का बोलू आधीची सगळी वाक्य मनाला कुठे तरी सुखावून जायची. मी पझेसिव्ह नाही असं म्हंटलं तरिही मला सुखवायची. आणि तिच्याकडून मी कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये हे स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितलं वेळोवेळी तरी देखील .."आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..." हे वाक्य कुठेतरी सुक्ष्मसी कळ देऊन गेलं....एका क्षणापुरतं का होईना, गेलं काहीतरी दुखावून.

का? माहित नाही. कदाचित माझा पदर सोडून पिल्लू आता वेगळं वर्तुळ तयार करतय ह्याची जाणिव एकाच वेळी सुखावणारी आणि आता असा आणि इतका फक्त आमचा आमचा असा सहवास रहाणार नाही ह्या जाणीवेने दुखावणारी ... त्यातूनच आलं असेल ते खट्टूपण.

गोष्ट खरं तर तीळा येव्हढी छोटीशी... अजून पुढे जाऊन ह्या गोष्टीचं काही वाटणार नाहीच, तसच कशाला ते खट्टुपण देखील फ्रॅक्शन ऑफ़ सेकंद म्हणतो तसं तरळलेलं. ह्यालाच पझेसिव्ह नेस म्हणतात का? पण मी अजिबात पझेसिव्ह होणार नाहीये हे मी किती तरी वेळा घोकलय की मनाशीच माझ्या.

अजून "दिल्ली बहोत दूर है …" बरच काही घडणारे ह्यापुढेही, टिन एज जसं येईल तसं बर्‍याच उलथापालथी होतीलच म्हणा. आणि मग वय वर्ष अमुक तमुक - च्या पुढे ते ब्लाऽऽह ब्लाऽऽह ब्लाऽऽह वाले रिकामे रकानेही भरले जातील.

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच" चा अंक प्रक्षेपीत करत मी...." मग मी पण एकदिवस काळजी वाटून तिला असाच फोन करेन का? आणि मग काय म्हणेल ती "माझ्या घरामधे तू लक्ष नको देऊस ग ममा?" असच म्हणेल का? काय असेल माझी तेव्हा रिअ‍ॅक्शन?"… हा सगळा विचार करत नाहीये आणि तसही हे वर्तुळ असलं तरिही असच ह्याच क्रमाने होणार नाही काही सगळं. पण प्रत्येक वेळी त्या त्या फेज मधून जाताना कुठेतरी मनामधे ह्या वर्तुळाकार नात्यातल्या जुन्या गोष्टी एक क्षण डोळ्यापुढून जातील.

शेवटी काहीही म्हणा, पटकन मान्य करा किंवा करु नका, नाती आपापली फ्रेम घेऊन येतात. काळाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावा प्रमाणे ह्या फ्रेमचं रंगरुप थोडं थोडं बदलतं इतकच.

माझी आई आणि आजी, मी आणि आई आणि आता पिल्लू आणि मी चक्र तर चालूच रहाणार. काही गोष्टी बदलतील, काही बदलल्यात असं वरुन तरी भासेल पण शेवटी चक्र ते चक्रच, काही गोष्टी ह्या कालातीत असतात. नात्यांमधल्या व्यक्तींच्या जागा बदलतात पण नातं तसच असतं वर्तुळासारखं हेच खरं.

गुलमोहर: 

कवे , कितीतरी दिवसांनी माबो वर आले, आणि पहिली तुझीच गोष्ट वाचली, धडाधड सगळे भाग वाचुन काढले. मी पहिली गोष्ट वाचल्याची आठवत्ये, पण बाकिच्या कशाकाय नाही वाचल्या याचंच आश्चर्य वाटतय. किती सुरेख लिहीलयस.

माझ्या नेहमीच्या प्रतिसादापेक्षा दुसरं काही समर्पक मला सुचत नाहीये... Proud

धन्यवाद लोक्स Happy

लले, तू टॉवर जिलबी आयडी घे Proud

माझ्या नेहमीच्या प्रतिसादापेक्षा दुसरं काही समर्पक मला सुचत नाहीये>>> अग आई ग... अजून डीटेल्स टाकू म्हणजे अजुन किबोर्ड बडवू??? नको ग राहुदेत हा अ‍ॅन्सर इन शॉर्ट टाईपचा प्रश्न होता Wink Proud बर बघुयात जमलं तर अ‍ॅडेन, मग भोआकफ Proud

कवे....मस्तच गं..मागचे सगळे भाग आठवले आणि आता माझ्या आयुष्यातही पुढे येणार्‍या ह्या सगळ्या पर्वांची सध्या तरी गंमत वाटतीये...जेव्हा येतील तेव्हा माहित नै Happy