अन्नं वै प्राणा: (७)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मेरा काट कलेजा दिल्ली, ले गयी काट कलेजा दिल्ली
मेरी जान भी ले जा दिल्ली
ससुरी काट कलेजा दिल्ली
मुई दिल्ली ले गई...

poliralism.jpg

चित्र क्र. १

काही दिवसांपूर्वी गिगी स्कारिआ या कलाकाराचं एक व्हिडिओशिल्प पाहण्यात आलं. पडद्यावर एक घर दिसतं. घराचे पुढचे दोन्ही दरवाजे बंद असतात. दरवाजे उघडतात तेव्हा आतलं दृश्य दिसतं. आत एक लहान कपाट आणि स्टूल. आणि जमिनीपर्यंत पोहोचणार्‍या दोन मोठ्या काचेच्या खिडक्या. कुठल्याशा मोठ्या शहरातलं हे उच्चमध्यमवर्गीय घर असावं. दोन्ही दरवाजे मिटतात, आणि क्षणभरानंतर पुन्हा उघडतात. त्या दोन खिडक्यांच्या मागून एक क्रेन जाताना दिसते. दारं बंद होऊन उघडतात तेव्हा ही क्रेन चक्क घरात आलेली दिसते. या क्रेनीनं एका पुतळ्याचं एक मुंडकं उचलून आणलं आहे. स्तालिनच्या पुतळ्याचा हा एक अवशेष. ते मुंडकं त्या घरात सोडून ती क्रेन निघून जाते. दारं बंद होतात. पुन्हा उघडतात तेव्हा ते मुंडकं गायब झालेलं, पण आता कुठल्याशा एका इजिप्शियन पुतळ्याचे अवशेष घरभर विखुरले आहेत. दारांची उघडमिट सुरूच राहते. त्या घरात कधी लेनिनच्या पुतळ्याचा पार्श्वभाग भोसकलेला, कधी सद्दाम हुसेनचा पुतळा पडलेला. मग नंतर दरवाजे उघडतात तेव्हा घरात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती उभ्या असतात. बंद होऊन दारं उघडल्यावर त्यात घरातच कोसळतात. या व्हिडिओशिल्पाचं नाव पॉलिटिकल रिअ‍ॅलिझम्.

या जगात सतत प्रचंड उलथापालथी होत असतात. तशा त्या हजारो वर्षांपूर्वीपासून होत आहेत. नैसर्गिक नव्हेत, माणसानं घडवून आणलेल्या. राज्यक्रांत्या, लढाया, बंडाळ्या, कारस्थानं, खून. नष्ट केलेले राजवाडे, उद्ध्वस्त केलेल्या इमारती, जमीनदोस्त केलेले पुतळे. जन्माला घातलेले नवे देश आणि नकाशावरून पुसून टाकलेले प्रांत. हे सारं जन्माला येतं ते महत्त्वाकांक्षा, हेवेदावे, मत्सर, स्वार्थ, अहंगंड यांतून. बाबिलॉन, पामिरा, अथेन्स, रोम, दिल्ली या शहरांत तर मानवी भावभावनांचे हे खेळ शतकानुशतकं चालले. कित्येक राज्यं आली आणि गेली. अनेक राजांची अनेक घराणी. काही तिथल्या मातीतली, तर काही बाहेरून आलेली. या राजांनी आधीच्या खुणा पुसून स्वतःचं साम्राज्य उभारण्याचे प्रयत्न केले. त्यांच्यानंतर आलेल्यांनीही तेच केलं. हा विध्वंस फक्त राजवाडे आणि युद्धभूमी यांपुरताच मर्यादित राहिला नाही. सत्तासंघर्ष, वर्चस्ववाद सामान्यांच्या घरात पोहोचला. काहीएक थेट संबंध नसताना अनेकांनी आपली घरं गमावली. अनेकांना आपला देश सोडावा लागला. जिथे आपला जन्म झाला त्या मातीशी जुळलेला संबंध तोडणं कठीण असतं. जुनं सारं सोडून पुन्हा नवीन सुरुवात करायची. नव्या मातीशी नव्यानं संबंध जुळवायचा प्रयत्न करायचा.

१९४७ साली भारताची फाळणी झाली आणि नव्यानं निर्माण झालेल्या पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात आले. दिल्ली ही स्वतंत्र भारताची राजधानी, त्यामुळे अनेकांनी दिल्लीच्या रस्त्यांवर, छावण्यांमध्ये आपले संसार मांडले. जवळ पैसा नव्हता. नातलग, स्नेही गमावल्याचं दु:ख होतं. त्यातच आपण या देशात उपरे आहोत, ही भावना. सर्वस्व गमावून भारतात आलेल्या या मंडळींना आपल्या पायांवर पुन्हा उभं राहण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. दिल्लीतलं वातावरण वेगळं. संस्कृती वेगळी. पाकिस्तानातून आलेले सिंधी, पंजाबी इथलं वातावरण बिघडवतील अशी मूळच्या दिल्लीकरांना भीती होती. भारतात आपलं नवं घर उभं करण्याच्या प्रयत्नांत असणारे मात्र या सार्‍याला न जुमानता जिद्दीनं उभे ठाकले. एकेकाळी लाखोंचे व्यवहार करणारे व्यापारी, शेतकरी दिल्लीच्या रस्त्यांवर खेळणी, भाजी विकू लागले. दहापाच नोकरांकडून कामं करून घ्यायची सवय असणार्‍या स्त्रिया नोकरीला लागल्या. पण कोणीही पैशासाठी हात पसरले नाहीत. भीक मागितली नाही.

Red Fort 1copy.jpg

पाकिस्तानातून भारतात आलेल्या अनेक पंजाब्यांनी दिल्लीत आणि इतरत्र खाद्यगृहं सुरू केली. या खाद्यगृहांनी भारतीय खाद्यसंस्कृतीचा चेहरामोहरा बदलला. जुन्या दिल्लीच्या दर्यागंज भागामध्ये मोतीमहल या नावाचं एक खाद्यगृह आहे. श्री. कुंदनलाल गुजराल यांनी फाळणीनंतर भारतात आल्यावर सुरू केलेलं हे रेस्तराँ भारतात आणि भारताबाहेरही बरंच प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षं जगभरातले राजकीय नेते, पुढारी, नटनट्या, उद्योगपती आणि दर्दी खवय्ये इथे हजेरी लावत आले आहेत. अनेक मानाचे पुरस्कार या रेस्तराँनं पटकावले आहेत. 'मोतीमहल हे भारतीय खाद्यपरंपरेचं एक लखलखतं दालन आहे', असं असंख्यांचं म्हणणं आहे. कुंदनलालजींची आणि त्यांच्या रेस्तराँची जगभरात घेतली जाणारी दखल याला कारणीभूत आहे ते तंदुरी चिकन. तंदुरी चिकन आणि त्याचे आप्त असलेले बटर चिकन, दाल मखनी, काठी कबाब रोल हे पदार्थ कुंदनलालजींनी शोधून काढले. सुरुवातीच्या काळात मोतीमहलमध्ये मिळणारे हे पदार्थ नंतर जगभरात लोकप्रिय झाले. इतके की भारतीय पाककला म्हणजे तंदुरी पदार्थ असं समीकरण परदेशात रूढ झालं.

कुंदनलाल गुजरालांचा जन्म १९१० साली सध्याच्या पाकिस्तानातल्या झेलम जिल्ह्यातल्या चकवाल या गावी झाला. ते लहान असतानाच त्यांचं कुटुंब पेशावरला स्थायिक झालं. तिथे त्यांच्या वडिलांचं कापडाचं दुकान होतं. कुटुंब खाऊनपिऊन सुखी. एकुलते एक असल्यानं कुंदनलालांचे बरेच लाड होत. अभ्यासात लक्ष कमी, शिवाय चारदोन यत्ता झाल्या की दुकानांत काम करून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा हाच शिरस्ता असल्यानं वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एका दुकानात काम करायला सुरुवात केली. या दुकानाच्या मालकाचं नाव होतं मुखा सिंग. पेशावराच्या गोरा बाजारातल्या एका लहानशा गल्लीत हे दुकान होतं. दोनचार प्रकारचे कबाब आणि जोडीला नान एवढंच इथे मिळायचं. ग्राहकांना बसण्यासाठी जागा नसल्यानं कबाब पत्रावळींत बांधून दिले जात. सुरुवातीला कुंदनलाल भांडी घासणं, मटण साफ करणं, कबाब बांधून देणं ही कामं करत. मग हळूहळू ते वेगवेगळ्या प्रकारचे कबाब करायला शिकले. हे कबाब कोळशाच्या शेगड्यांवर भाजले जात. कबाबांबरोबरची नान रोज सकाळी मुखा सिंग विकत आणत.

मुखा सिंगांच्या दुकानात दोनतीन वर्षं काम केल्यावर कुंदनलालांच्या लक्षात आलं की, नान विकत आणण्यापेक्षा आपणच दुकानात तयार केले तर थोडेफार पैसे वाचू शकतील. पण हे नान भाजायचे कसे आणि कुठे? रोज घरी लागणारे नान आणि रोट्याही विकत आणल्या जात किंवा चौकाचौकांत असणार्‍या सार्वजनिक तंदुरांमध्ये भाजल्या जात. जिथे नान / रोट्या विकत मिळत त्या दुकानांमध्ये भाजायला फुर्न नावाच्या मोठाल्या भट्ट्या असत. घरी किंवा होटेलांमध्ये तंदूर असण्याची पद्धत नव्हती. तेरा वर्षांच्या कुंदनलालांच्या आग्रहावरून मुखा सिंगांनी मग दुकानासमोर तंदूर खणला. पेशावरच्या गोरा बाजारातला हा पहिला तंदूर. कुंदनलाल लवकरच नान भाजायला शिकले.

वर्षभरानंतरची गोष्ट. त्या दिवशी मुखा सिंगांची तब्येत फारशी बरी नव्हती. रात्री जेवायला जरा हलकं काहीतरी कर, असं ते कुंदनलालांना म्हणाले. कुंदनलालांनी कबाब करण्यासाठी आणलेली अख्खी कोंबडी घेतली आणि तिखट, आलंलसूण घातलेल्या दह्यात अर्धा तास मुरवून ठेवली. दुकानाच्या मागे कपडे वाळत घालायची जाड लोखंडी तार होती. कोंबडीला मीठ, मिरपूड लावून या तारेत खोचली. सोबत एक कांदाही खोचला आणि कोंबडीची रवानगी तंदुरात झाली. नीट भाजून कुंदनलालांनी तारेत खोचलेली कोंबडी बाहेर काढली आणि लिंबू पिळून मुखा सिंगांसमोर ठेवली. मुखा सिंगांना ही भाजलेली कोंबडी प्रचंडच आवडली. नेहमीच्या कबाबांपेक्षा हा वेगळा प्रकार. तेलकट नाही, शिवाय चविष्ट आणि हलका. पुढचे तीन दिवस मुखा सिंग आणि कुंदनलाल या दोघांनी हा नवीन पदार्थ अधिक चवदार कसा करता येईल, यासाठी अनेक प्रयोग केले, आणि गोरा बाजारातल्या त्या दुकानात १९२४ साली तंदुरी मुर्ग हा नवीन पदार्थ विक्रीसाठी ठेवला गेला.

तंदुरी मुर्ग पेशावरातल्या शौकिनांना भलतंच आवडलं. नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ, आणि खाताना नान विकत घ्यायला नको. चव फर्मास आणि पोत इतकं तलम की कोंबडी जिभेवर विरघळे. त्यापूर्वी मसाले लावून अख्खी कोंबडी तंदुरात कोणी भाजली नव्हती, म्हणून या पदार्थाचं अप्रूप होतं. तंदुराचा वापर इजिप्त, पर्शिया आणि अरब देशांमध्ये शतकानुशतकं सुरू होता. पण या तंदुरांचा वापर केला जाई तो रोट्या किंवा नान भाजण्यासाठी किंवा फार तर केक करण्यासाठी. भाज्या आणि व्हिनेगरात घातलेले मटणाचे तुकडे मातीच्या भांड्यात घालून तंदुरात शिजत ठेवत. सिकबज नावाचा हा पदार्थ करण्यासाठी, किंवा मेंढ्या भाजण्यासाठी तंदूर वापरले जात. तंदुराच्या धगीवर पक्षी क्वचित भाजले जात. मसाल्यांमध्ये घोळवलेली कोंबडी तंदुरात भाजायची कुंदनलालांनी शोधलेली पद्धत मात्र पूर्णपणे नवीन होती.

तंदुरी मुर्ग खाण्यासाठी दुकानासमोर ग्राहकांची गर्दी वाढू लागली पण कुंदनलाल अजूनही समाधानी नव्हते. पेशावरातल्या त्या बाजारात शहरातले प्रतिष्ठित येत नसत. आपलं नाव सर्वदूर व्हायला हवं असेल, तर थोरामोठ्यांनी आपला पदार्थ नावाजायला हवा. कुंदनलालांनी मग तंदुरी मुर्ग पत्रावळींत बांधून शहरातल्या नामांकितांच्या घरी नेऊन द्यायला सुरुवात केली. ’हा मी तयार केलेला नवीन पदार्थ आहे, तुम्ही याची चव घ्यावी, अशी इच्छा आहे. तुमचे आशीर्वाद मिळाले तरच मी पुढे जाऊ शकेन’, असंही सांगत. एवढ्या लहान वयात या मुलानं नवीन पदार्थ केलाय, याचंच सगळ्यांना कौतुक वाटे. कोंबडीची चव तर अफलातून होतीच. पेशावरातले वकील, व्यापारी, राजकीय नेते मुखा सिंगांच्या दुकानातून तंदुरी मुर्ग मागवू लागले. पेशावरकरांना तंदुरी मुर्गनं जिंकलं आणि लवकरच त्या गोरा बाजारात इतर दुकानांबाहेरही तंदूर उभे राहिले. मुखा सिंगांच्या दुकानातली गर्दी मात्र कायम राहिली. 'ओर्जिनल तंदुरी मुर्ग' अशी पाटीच त्यांनी दुकानाबाहेर लावली.

मुखा सिंगांना तंदुरी मुर्ग विकून भरपूर नफा व्हायला लागला तसे कुंदनलाल पुन्हा अस्वस्थ झाले. त्या छोट्याशा दुकानात त्यांचं मन रमेना. स्वतःचं रेस्तराँ असावं, असं त्यांना वाटू लागलं, आणि त्यांनी मुखा सिंगांच्या गळी ही कल्पना उतरवली. आपल्याला मिळालेलं यश हे केवळ कुंदनलालांमुळे आहे, याची मुखा सिंगांना जाणीव होती. त्यांनी कुंदनलालांना भागीदार केलं, आणि १९२७ साली पेशावरातल्या गोरा बाजारात मोतीमहल नावाचं रेस्तराँ उभं राहिलं. कुंदनलाल तेव्हा फक्त सतरा वर्षांचे होते. पुढची वीस वर्षं कुंदनलालजींनी आपल्या रेस्तराँच्या बळावर भरपूर पैसा मिळवला. शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांत त्यांची गणती होऊ लागली. लोक त्यांना मान देत असत. ज्यांनी कुंदनलालजींचा प्रवास बघितला होता, त्यांना तर त्यांच्याबद्दल विशेष कौतुक होतं.

फाळणीची चाहूल लागल्यावर मात्र परिस्थिती बदलली. पेशावरात पठाण आणि पंजाबी समुदाय तसा एकोप्यानं राहत होता. पण हे काही फार काळ टिकणार नाही, आणि आपल्याला लवकरच हिंदुस्थानात जावं लागेल, याची त्यांना खात्री होती. आणि झालंही तसंच. ४७ साली सप्टेंबर महिन्यात मुखा सिंग, पत्नी प्रकाश देवी, आई माया देवी आणि मुलगा नंदलाल यांना घेऊन कुंदनलालजी दिल्लीला आले. खिशात बारा हजार रुपये तेवढे होते. इतक्या वर्षांत जमवलेलं सगळं मागे राहून गेलं होतं. आता सगळं नव्यानं उभं करायचं. कुंदनलालांनी दर्यागंजमध्ये राहणार्‍या एका लांबच्या नातेवाइकाचं घर गाठलं. मुखा सिंग आल्याआल्या आजारी पडले. त्यांची एक लांबची बहीण देहरादूनला राहत असे. तिच्याकडे ते गेले, आणि कधी परत आलेच नाहीत. त्यांचं पुढे काय झालं हेही कुंदनलालजींना कधी कळलं नाही.

कुंदनलालजींना नवीन शहरात पैसे मिळवण्यासाठी करण्यासारखं आणि जमण्यासारखं एकच काम होतं, आणि ते म्हणजे स्वयंपाक. लोकांना खाऊ घालण्यात आयुष्य गेलेलं. दुसर्‍या दिवशी सकाळीच कुंदनलालजी बाहेर पडले. जवळ थोडेफार पैसे होते. त्यांतून भांडी विकत घ्यायची आणि सरळ रस्त्यावर दुकान थाटायचं असा त्यांचा बेत होता. दर्यागंजमध्ये फिरताना त्यांना एक रिकामा ठेरा दिसला. ते जसं आपलं रेस्तराँ मागे सोडून आले होते, तसंच कोणीतरी तो ठेरा सोडून गेलं असावं. कुंदनलालजींनी तो ठेरा स्वच्छ केला, जमिनीत एक तंदूर खणला. दोन दिवसांत तंदूर तयार झाला आणि त्यांनी दर्यागंजातल्या त्या गल्लीत तंदुरी मुर्ग विकायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस कोणी कुंदनलालजींच्या ठेर्‍याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पेशावरातला हा पदार्थ तोपर्यंत दिल्लीकरांना अपरिचित होता. शिवाय फाळणी, दंगली, जाळपोळ यांमुळे बाहेर जाऊन खाण्यापिण्यात कोणाला तितकासा रसही नव्हता. पण परिस्थिती निवळली तसा त्यांचा जम बसला आणि दर्यागंजमधली ती गल्ली कुंदनलालांच्या दुकानासाठी ओळखली जाऊ लागली. पेशावरातल्या रेस्तराँची आठवण म्हणून कुंदनलालजींनी आपल्या नव्या ठेर्‍याचं नावही मोतीमहल ठेवलं. पेशावरापेक्षा दिल्ली अधिक सुशिक्षित, तिथे इंग्रजीचा प्रभाव अधिक. शिक्षण फारसं झालं नसल्यामुळे कुंदनलालजींना खूप शिकलेल्यांबद्दल, फाडफाड इंग्रजी बोलणार्‍यांबद्दल मनापासून आदर वाटत असे. म्हणून तंदुरी मुर्गचं तंदुरी चिकन असं नामकरण त्यांनी करून टाकलं.

वर्षभरात पैसा गाठीशी आल्यावर, पेशावरची आठवण येणं कमी झाल्यावर कुंदनलालजींमधला सेल्समन जागा झाला. आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांची नक्कल करत तंदुरी चिकन विकायला सुरुवात केली होती. चव अर्थातच मोतीमहलच्या चिकनची उजवी असली तरी स्पर्धेला तोंड देणं आवश्यक होतं. एके दिवशी सकाळी कुंदनलालजींनी एका डब्यात तंदुरी चिकन भरलं आणि मेहर चंद खन्नांच्या बंगल्यावर पाठवलं. हे मेहर चंद खन्ना मूळचे पेशावरचे. मोतीमहलच्या तंदुरी मुर्गचे चाहते. फाळणीच्या आधीच ते दिल्लीला आले होते, आणि आता पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. डबा उघडताक्षणीच मेहर चंद पेशावरला पोहोचले, आणि त्यांनी ताबडतोब कुंदनलालजींना घरी बोलावणं धाडलं.

पुढच्या आठवड्यात मेहर चंदांकडे पं. नेहरू आणि मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी जेवायला येणार होते. स्वयंपाकाची जबाबदारी कुंदनलालजींवर सोपवली गेली. वायव्य सरहद्द प्रांताची खासियत असलेले कबाब शिवाय मुर्ग मुसल्लम, बिर्याण्या, कुलचे, नान असा बेत होता. सुरुवातीला अर्थातच तंदुरी चिकन. सौम्य चव, लुसलुशीत चिकन. पंडितजींना हा पदार्थ फारच आवडला. त्यांचे सहकारी तर चिकनवर तुटूनच पडले. नेहरू उद्गारले - 'सावकाश, मित्रांनो, सावकाश.. ती कोंबडी शिजवलेली आहे. पळून जाणार नाही'. या मेजवानीला महम्मद युनुस खान उपस्थित होते. हे सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांचे स्वीय सचिव होते. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य प्रोटोकॉल ऑफिसर. अगोदर पेशावरला मुक्काम असल्यानं त्यांची कुंदनलालजींशी मैत्री होती. खानसाहेबांनी त्यांना पं. नेहरूंसमोर हजर केलं. कुंदनलालजी पंडितजींच्या पाया पडले. पंडितजीही शून्यातून विश्व उभारू पाहत होते.

१९५२ साली कुंदनलालजींनी दर्यागंजमध्ये मोतीमहल याच नावानं रेस्तराँ सुरू केलं. पेशावरला होतं तसंच हे साधंसं रेस्तराँ होतं. फार थाटमाट नव्हता. एकावेळी फक्त पंधराजण आत बसू शकत. रेस्तराँबाहेर मोठा तंदूर होता. दिल्लीतले खाण्याचे दर्दी इथे हजेरी लावत. कुंदनलालजींना गाण्याबजावण्याची आवड. उत्तमोत्तम कव्वाल संध्याकाळी रेस्तराँमध्ये आपली कला सादर करत. इंदिरा गांधी पंतप्रधान होण्याआधी आठवड्यातून एकदातरी मोतीमहलला जेवण्यासाठी येत. लाल बहादुर शास्त्री, मौलाना अबुल कलम आझाद, फक्रुद्दीन अली अहमद, दिलीपकुमार, नर्गिस असे कितीतरी मान्यवर कुंदनलालजींच्या हातचं खाण्यासाठी, कव्वाली ऐकण्यासाठी इथे अड्डा जमवत. वसंत साठे सुप्रीम कोर्टात केस लढवून झाली की रात्री उशिरापर्यंत मोतीमहलमध्ये गप्पा मारत बसलेले असत. कुंदनलालजींचं व्यक्तिमत्त्वच असं की या थोरामोठ्यांशी त्यांचं मैत्र जुळलं. पं. नेहरूंच्या ओठांतली सिगारेट कुंदनलालजी लायटरनं शिलगावत असतानाचं छायाचित्र आजही मोतीमहलच्या दर्शनी भागात लावलं आहे. पंडितजींच्या घरी किंवा १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हैद्राबाद हाऊसला होणार्‍या प्रत्येक मेजवानीसाठी स्वयंपाक कुंदनलालजींनी केला. राजीव गांधी हयात होते तोपर्यंत नेहरूगांधी कुटुंबाशी असलेला हा स्नेह टिकून राहिला. संजय गांधी, राजीव गांधींची लग्नं असो, किंवा त्यांनी आयोजित केलेल्या शाही मेजवान्या, जेवण मोतीमहलचंच असे. फक्त भारतीयच नव्हे, तर परदेशी नेतेही मोतीमहलच्या प्रेमात पडले. 'भारतात आल्यावर तुम्ही ताज महाल पाहिला, पण मोतीमहलचं तंदुरी चिकन खाल्ल्याशिवाय तुमची भारतयात्रा पूर्ण होऊ शकत नाही', असं म्हणत मौलाना अबुल कलम आझाद इराणच्या शाहाला मोतीमहलला घेऊन आले होते. निक्सन, बुल्गानिन, ख्रुश्चेव यांनीही दर्यागंजच्या त्या गल्लीत तंदुरी चिकन चाखलं. ख्रुश्चेव यांनी तर मॉस्कोमध्ये मोतीमहलची शाखा उघडण्यासाठी कुंदनलालजींना खास आमंत्रण दिलं. कुंदनलालजींनी मॉस्कोत सहा महिने राहून तिथे नवं मोतीमहल उघडलंही.

motimahalimagescollage copy1.jpg

मोतीमहलचं तंदुरी चिकन खाल्लेल्यांना या स्वर्गीय चवीमागचं रहस्य जाणून घ्यायचं असतं. इथल्या तंदुरी चिकनची चव इतकी अफलातून कशी, कोंबडी इतकी मऊसूत कशी, हे प्रश्न अनेकांना पडतात. मोतीमहलमध्ये वापरले जाणारे मसाले खुद्द कुंदनलालजी तयार करत. त्यांनी पेशावरात शोधलेल्या पाककृतीबरहुकूम आजही मोतीमहलमध्ये तंदुरी चिकन केलं जातं. मसालेही तेच, आणि मुरवण्याची पद्धतही तीच. अर्धा किलोची कोंबडी असेल तर सुरीनं कोंबडीला दोनतीन ठिकाणी चीर द्यायची. दीड टेस्पू लिंबाचा रस, एक टीस्पू लाल तिखट आणि एक टीस्पू मीठ एकत्र करून या रसात कोंबडी तासभर फ्रीजमध्ये मुरवत ठेवायची. मग अर्धा कप घट्ट दह्यात दोन टेस्पू आलंलसूण पेस्ट, एक टीस्पू गरम मसाला, अर्धा टीस्पू तंदुरी मसाला, अर्धा टीस्पू मीठ, अर्धा टीस्पू कसुरी मेथी हे जिन्नस एकत्र करून या मिश्रणात कोंबडी निदान तीन तास फ्रीजमध्ये मुरवत ठेवायची. ही कोंबडी तंदुरात (किंवा अव्हनमध्ये) भाजताना एक कांदा आणि लिंबाची चकती सोबत ठेवायची. तंदुरी चिकन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. कोंबडी शक्यतो थंड जागी मुरवत ठेवावी, नाहीतर जीवाणूंची लगेच वाढ व्हायला सुरुवात होते. दह्यात मुरवताना दही घट्ट हवं. आवश्यकता भासल्यास त्यात थोडं चण्याच्या डाळीचं पीठ घालावं. शिवाय दह्यात मुरवण्याआधी लिंबाच्या रसात मुरवणं उत्तम. लिंबात आणि दह्यात असलेल्या आम्लांमुळे कनेक्टिंग टिश्यू तुटतात. मांस शिजल्यावर या टिश्यू जिलेटिनात परिवर्तित होतात. त्यामुळे लिंबात, दह्यात मांस मुरवणं आवश्यक असतं. तंदूरमध्ये जास्तीत जास्त तापमान साधारण ४०० अंश से. असतं. मुरवलेली कोंबडी तंदुरात टाकताच बाहेरचं मांस शिजतं आणि एक किंचित जाड थर तयार होतो. नंतर कोंबडी थोड्या कमी तापमानाला, म्हणजे साधारण २०० अंश से.ला भाजली जाते. बाहेरच्या थरामुळे आतलं मांस कमी तापमानाला शिजतं आणि त्यामुळे ते चिवट होत नाही.

मोतीमहलची ही यशोगाथा फक्त तंदुरी चिकनपुरती मर्यादित नाही. बटर चिकन, दाल मखनी, काठी कबाब रोल हे पदार्थ शोधून कुंदनलालजींनी मोतीमहलचं नाव दुमदुमतं ठेवलं आहे. या तिन्ही पदार्थांचा शोध मात्र गरजेतून लागला. झालं असं की, मोतीमहलची लोकप्रियता फारच वाढल्यावर एक मोठी समस्या निर्माण झाली. त्या काळी शीतकपाटं नसल्यानं दह्यात मुरवलेलं चिकन फार काळ तसंच ठेवता येत नसे. जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती होती. शिवाय रेस्तराँमध्ये कायम गर्दी असे, आणि त्यामुळे ग्राहकानं ऑर्डर दिल्यानंतर तंदुरात चिकन भाजणं शक्य नसे. गर्दीचा हिशोब ध्यानी घेऊन काही कोंबड्या अगोदर भाजाव्याच लागत. पण गार झालेलं तंदुरी चिकन तितकंसं मऊ राहत नसे. हे तंदुरी चिकन ग्राहकांना देणं किंवा वाया घालवणं शक्य नव्हतं. कुंदनलालजींनी यातून मार्ग काढला. त्यांनी हे भाजलेलं तंदुरी चिकन स्वतः तयार केलेल्या मखनी ग्रेव्हीत घातलं. थोडं चिवट झालेलं चिकन मखनी ग्रेव्हीमुळे लगेच मऊ झालं आणि बटर चिकन उर्फ मुर्ग मखनी या पदार्थाचा जन्म झाला.

मखनी ग्रेव्ही तयार केली तेव्हा एखादा शाही पदार्थ तयार करण्याचं कुंदनलालजींच्या डोक्यात होतं. मुघल किंवा पर्शियन खाद्यपरंपरेत सुक्यामेव्याचा वापर भरपूर. त्यामानानं दुधादह्याचा वापर फारसा नसे. पंजाबात मात्र दूधदुभतं मुबलक असल्यानं शाही पदार्थ म्हणजे भरपूर दूधदहीलोणी असलेला, असं समीकरण सगळीकडेच होतं. कुंदनलालजींच्या मखनी ग्रेव्हीत साय, लोणी तर होतेच, शिवाय टोमॅटो प्यूरेही होती. किलोभर लाल टोमॅटो आणि एक कांदा तेलात शिजवून ही प्यूरे करायची. मग तुपात आलंलसूण पेस्ट, गरम मसाला, जिरेपूड, तिखट, टोमॅटो प्यूरे, तंदुरी चिकनचे तुकडे घालून परतायचं. नंतर भरपूर लोणी आणि साय घालून एक वाफ आणली की बटर चिकन तयार.

मग पुढे मोतीमहलमध्ये शाकाहार्‍यांची कुचंबणा होते, अशी तक्रार त्यांच्या कानी आली. शिवाय इतकं सगळं मसालेदार जेवणात असल्यावर शेवटी भाताबरोबर खायला एखादा सौम्य शाकाहारी पदार्थ हवा. कुंदनलालजींच्या पेशावरमधल्या धाब्यांमध्ये अख्ख्या उडदाचं वरण करीत. पश्चिम पाकिस्तानातला हा कडधान्यांचा वापर दक्षिण भारताच्या प्रभावातून आला होता. दक्षिण भारतात स्वयंपाकात अख्ख्या उडदाचाच वापर होत असे. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी काळे उडीद खावेत, असं सांगितलं जाई. त्यामुळे इडल्यासुद्धा काळ्या उडदाच्याच करत. उत्तर भारतात मात्र डाळींचाच वापर जास्त होता. दक्षिणेशी संपर्कात असणार्‍या पर्शियन व्यापार्‍यांमुळं आणि नंतर औरंगजेबामुळं उत्तरेत कडधान्यांचा थोडाफार वापर सुरू झाला. तर, पेशावरातलं उडदाचं वरण आणि मखनी ग्रेव्ही एकत्र करून कुंदनलालांनी दाल मखनी तयार केली. टोमॅटो प्यूरे, साय आणि दूध यांचा वापर हे या दाल मखनीचं वैशिष्ट्य. कारण टोमॅटोचा वापर पंजाबी स्वयंपाकात फारसा केला जात नसे. आंबटपणा आणण्यासाठी दही वापरत. शिवाय वरणात कोणी दूध आणि साय घालण्याचा प्रयत्नही कधी केला नव्हता. कुंदनलालजींनी दाल मखनीत उडदाच्या जोडीला राजमा आणि चण्याची डाळही घातली. राजम्यामुळे दाल मखनीला थोडा चिकटपणा येतो आणि डाळीमुळे फक्त उसळ खाल्ल्यासारखी वाटत नाही.

motimahalcuisine.jpg

कुंदनलालजींच्या मोतीमहलमुळे आणि त्यांनी शोधलेल्या पदार्थांमुळे सर्वाधिक भलं पाकिस्तानातून आलेल्या पंजाबी विस्थापितांचं झालं. तंदुरी चिकन, बटर चिकन हे पदार्थ त्यांच्या धाब्यांमध्ये मिळू लागले, शिवाय मखनी ग्रेव्हीत पनीर, भाज्या घालून पनीर मखनी / पनीर माखनवाला, व्हेज माखनवाला अशा पदार्थांचा जन्मही झाला. मेनूकार्डावर तंदुरी आयटेम्स असं छापणारे कुंदनलालजी पहिले. त्यांच्या पदार्थांची झाली, तशी त्यांच्या मेन्यूकार्डाची नक्कलही भारतभर झाली.

आज मोतीमहलच्या शाखा जगभर आहेत. असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार या रेस्तराँला मिळाले आहेत. कुंदनलालजी १९९७ साली वारले. त्यापूर्वी खुशवंत सिंगांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती. कुंदनललाजी म्हणाले होते - 'पेशावरात वीस वर्षं रेस्तराँ चालवूनही माझं तंदुरी चिकन इतर ठिकाणी प्रसिद्ध नव्हतं. दिल्लीत आलो आणि माझं नशीब फळफळलं. माझ्या आईला दिल्लीला यायचं नव्हतं. हे मकबर्‍यांचं, अतृप्त मृतात्म्यांचं शहर आहे, असं तिला वाटत होतं. पण आम्हांला आमचं घर नव्हतं. दिल्लीत येणं भाग होतं. जाणार कुठे? पण दिल्लीनं आम्हांला आसरा दिला, घर दिलं, पैसा दिला. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इज्जत दिली. अजून काय हवं सांगा?'

दिल्लीनं विस्थापितांना आसरा दिला, तशी अनेकांना दिल्ली पारखीही झाली. हजारो वर्षांपासून हा खेळ इथे सुरू आहे. खरं म्हणजे दिल्लीचा बराचसा पूर्वेतिहास धुक्यात हरवला आहे. इतिहासापेक्षा मिथकंच अधिक. आपणच जिगसॉचे तुकडे जुळवतो तसे संदर्भ जुळवायचे, पिढ्या मोजत उलटीसुलटी कालगणना करायची. प्राचीन काळी यमुनेच्या काठी वस्ती झाली आणि इंद्रप्रस्थ हे शहर वसलं. या शहरावर पांडवांचं आणि त्यांच्या वंशजांचं राज्य होतं. पुढे मौर्यांनी या प्रदेशावर राज्य केलं. या वंशातल्या धिलु राजाच्या नावावरून ही राजधानी दिल्ली या नावानं ओळखली जाऊ लागली. इसवी सनाच्या आठव्या शतकात तोमर वंशाच्या अंगपाल राजानं लाल कोट ही आपली राजधानी सध्याच्या कुतुब मिनाराजवळ स्थापन केली. राजस्थानातल्या चौहान राजांनी बाराव्या शतकात लाल कोट ताब्यात घेऊन तिचं किला राय पिठोरा असं नामकरण केलं. काही वर्षांनंतर तिसर्‍या पृथ्वीराज चौहानाच्या राजवटीत दिल्लीवर परकीय आक्रमणांना सुरुवात झाली. तुर्क काय, किंवा युरोपीय काय, प्रत्येकालाच आपापल्या तिजोर्‍या भरायच्या होत्या. हिंदुस्थानात भरपूर पैसा होता. सुपीक बंगालात वर्षाला दोनतीन पिकं घेतली जात होती. उत्तरेत गहू, ऊस, कापूस आणि दक्षिणेत मसाले, तांदूळ होते. इथल्या जंगलांतून लाख, हस्तीदंत आणि रेशीम मिळत होतं. इथल्या खाणींत, देवळांत आणि राजवाड्यांमध्ये सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नं होती. भारतात अफाट संपत्ती होती, आणि ही सर्व संपत्ती उघड्यावर होती. इथल्या लहानसहान राज्यांचे राजे आपसांत लढण्यातच मग्न होते.

मूर्तिपूजकांवर हल्ला केला तर जन्नत मिळेल, शिवाय आपल्या तिजोर्‍याही भरता येतील या विचारानं घझनीनं आपण दरवर्षी हिंदुस्थानावर हल्ला करू, अशी शपथ घेतली आणि त्यानं पृथ्वीराजाचा थानेसरच्या युद्धात पराभव केला. पुढे कुतुबुद्दीन ऐबक, रझिया बेगम, जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी या राज्यकर्त्यांनंतर १३२१ साली तघलक घराणं सत्तेवर आलं. ग्यासुद्दीन तघलकानं दिल्लीपासून चार मैल दूर तघलकाबाद ही नवी राजधानी उभारली. त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या महंमद तघलकानं किला याय पिठोरा आणि सिरीच्या मध्ये जहाँपनाह या नावानं नवी राजधानी वसवली. पण नंतर तिथल्या हिंदूंना शिक्षा म्हणून त्यानं आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला, म्हणजे देवगिरीला नेण्याचा तीनदा प्रयत्न केला. केवळ आकसापोटी त्यानं दिल्लीतल्या सगळ्या रहिवाशांना देवगिरीला हलवलं. दिल्ली निर्मनुष्य झाल्यावर त्यानं परत इतर शहरांगावांतल्या रहिवाशांना दिल्लीला स्थायिक होण्यास भाग पाडलं.

landscape copy.jpg

महंमद बिन तघलक गादीवर असताना इब्न बतुता भारतात आला. हा मूळचा मोरोक्कोचा रहिवासी. वयाच्या एकविसाव्या वर्षी मक्केला जायला घराबाहेर पडला आणि पुढची तीस वर्षं त्यानं आफ्रिका, युरप, आशिया खंडांतले अगणित देश पालथे घातले. या प्रवासाचं तपशीलवार वर्णन करणारं रिहला (प्रवास) या नावाचं पुस्तकही त्यानं लिहिलं. इब्न बतुता भारतात सिंधहून आला. त्यानं लिहिलं आहे - मुलतानहून दिल्लीला पायी जायला पन्नास दिवस लागतात. पत्र मात्र चार दिवसांत पोहोचतं. सुलतानाची कुरिअर सेवा आहे. हे सेवक घोड्यांवर किंवा पळत दिल्लीला जातात. पर्शियातल्या खुरासानहून फळं सुलतानाला अशीच मिळतात. सुलतान फक्त गंगेचं पाणी पितो, आणि त्याला हे पाणी त्याच्या कुरिअर सेवेमार्फत पोहोचवलं जातं'.

इब्न बतुता भारतात सहा वर्षं होता. महंमद बिन तघलकानं त्याला दिल्लीचा काझी नेमला होता. त्यामुळे त्याचा मुक्काम दिल्लीत आणि अनेकदा राजवाड्यात असे. राजवाड्यातल्या चालीरीतींवर, घडामोडींवर, जेवणावळींवर त्यानं बरंच लिहून ठेवलं आहे. राजवाड्यात जेवणासाठी जमिनीवर मोठ्ठा गालिचा अंथरला जाई. याला सिमत असं म्हणत. या गालिच्याजवळ उभं राहून प्रमुख हुजर्‍या सुलतानाच्या दिशेनं खिदमत, म्हणजे मुजरा करी. इतर उपस्थितही मग सुलतानाला मुजरा करत. गुडघे जमिनीला टेकवून, कमरेत वाकून केलेला हा मुजरा असे. सुलतान मग गालिच्यावर जेवायला बसे. त्यानंतर इतर उपस्थितही गालिच्यावर येऊन बसत. सोन्याचांदीच्या आणि काचेच्या नाजूक पेल्यांमध्ये गुलाबाच्या फुलांपासून केलेलं सरबत सर्वांना देण्यात येई. सरबत पिऊन झाल्यावर हुजर्‍या बिस्मिल्ला अशी आरोळी ठोके, आणि सर्वजण जेवायला सुरुवात करत. जेवणाच्या शेवटी पुन्हा एकदा सरबत दिलं जाई. आणि बसल्या जागी हात धुतले की पानसुपारी. हुजर्‍या पुन्हा एकदा बिस्मिल्लाचा गजर करी, आणि सुलतानापाठोपाठ सर्वजण उठून उभे राहत. सुलतानाला मुजरा केल्यावर मेजवानी संपे.

सुलतानाच्या दरबारात पाहुणे आले की त्यांच्यासाठी खास मेजवानी आयोजित केली जाई. या मेजवानीसाठी अनेक आमीर, इमाद - उल - मुल्क सारतेझ हा सुलतानाचा चुलत भाऊ आणि अनेक मान्यवर (अझीझ) उपस्थित असत. उपस्थितांपैकी कोणाचा सन्मान करायचा असेल तर सुलतान त्या व्यक्तीला बोलावून तिच्या डाव्या हातावर नान ठेवत असे. उजव्या हातानं मुजरा करून ती व्यक्ती आपल्या जागेवर जाऊन बसे. मेजवानीला उपस्थित नसलेल्यांनाही सुलतान नान पाठवत असे. सणासुदीला किंवा सुलतानाच्या वाढदिवशी सार्वजनिक मेजवानी आयोजित केली जाई. राजवाड्याबाहेर या मेजवान्यांसाठी मोठा मांडव घातला जाई. राजवाड्यातले अधिकारी बिस्मिल्ला म्हणत हातात मोठाली भांडी घेऊन मांडवात येत. सुलतान आधीच तिथे जाऊन बसलेला असे. हे अधिकारी येताच सुलतानवगळता इतर सर्व उभे राहत. नंतर जमिनीवर घातलेल्या गालिच्यांवर ताटं मांडली जात. मग राजवाड्यातला मुख्य अधिकारी सुलतानाच्या गौरवार्थ एक मोठ्ठं भाषण ठोके. हे भाषण सुरू असताना स्तब्ध उभं राहण्याचा दंडक होता. मग इतर अधिकारी अशीच भाषणं करत. समोर सुग्रास जेवण, पुढ्यात ताटं असूनही बराच वेळ सुलतानाची स्तुती ऐकत सर्वांना उभं राहावं लागे. ही भाषणं संपली की सर्वजण खाली बसत. मग मुख्य अधिकारी सुलतानाला एक खलिता देई. या खलित्यात 'जेवण तयार आहे, स्वारीने जेवायला यावे', अशा अर्थाचा मजकूर असे. खरं म्हणजे, सुलतान तिथेच बसलेला असे. त्याच्यासमोरच सगळी भांडी आणि ताटं मांडलेली. पण तरीही त्याला आदरपूर्वक बोलावलं जाई. मग सुलतान जागेवरून न उठता एखाद्या सरदाराला देखरेख करण्याची आज्ञा देई, आणि नंतर स्वतः मात्र जेवायला राजवाड्यात जाई. जेवताना सर्वांची बसण्याची जागा ठरलेली असे. न्यायाधीश (काझी), सुलतानाचे प्रवक्ते (खातिब), सय्यद आणि दरवेश पुढे बसत. त्यांच्या मागे सुलतानाचे कुटुंबीय आणि त्यांच्या मागे इतर नागरीक. जेवण सुरू करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर बिस्मिल्ला म्हटल्याशिवाय कोणी उठत नसे. सुलतानाच्या सान्निध्यात सरदारांनी, नागरिकांनी जास्तीत जास्त वेळ घालवावा, त्यांना कोणत्याही कटकारास्थानात सामील होण्यासाठी फारसा वेळ मिळू नये, यासाठी ह्या इतक्या वेळखाऊ मेजवान्या आयोजित केल्या जात.

अफगाणिस्तानाहून आलेल्या एका काझीच्या सन्मानार्थ महंमद बिन तघलकानं एक मेजवानी दिली होती. इब्न बतुत्यानं या मेजवानीचं वर्णन केलं आहे. मुलतानहून आलेल्या वीस आचार्‍यांनी या मेजवानीसाठी स्वयंपाक केला होता. दुपारी जेवण तयार असावं म्हणून आदल्या रात्रीपासून स्वयंपाकाला सुरुवात झाली होती. जेवणात सुरुवातीला शेळीचं भाजलेलं मांस आणि खुबी (तूप लावलेल्या पातळ पोळ्या) हे पदार्थ होते. नंतर जाड रोट्या आणि त्यांवर सुबुनिया (मध, बदाम आंणि तीळ घातलेला गोड पदार्थ) व खिश्ती (कणकेची साखर घातलेली वडी). या गोड पदार्थांनंतर आलंलसूण घालून शिजवलेली कोंबडी चिनी मातीच्या ताटल्यांतून वाढण्यात आली. पुढे हुजर्‍यांनी प्रत्येकाला पाच समुसाक (खिमा, कांदा, बदाम, अक्रोड, पिस्ते यांचं सारण असलेले समोसे) वाढले. नंतर मुर्ग मुसल्लम आणि पुलाव व शेवटी खास कैरोहून आलेल्या आचार्‍यानं केलेलं अल्-काहिरिया या नावाचं पुडिंग.

सुलतानाच्या राज्यात कडक दारुबंदी होती. दारू पिणार्‍याला भर चौकात फटके मारले जात. वेगवेगळ्या प्रकारची सरबतं मात्र उन्हाळ्यात सर्वांना फुकट मिळत. दुष्काळ पडल्यास धान्याचं वाटप केलं जाई. दुष्काळात उपयोगी पडावं म्हणून खट्टीत धान्य साठवलं जाई. खट्टी म्हणजे एक मोठा खड्डा. या खड्ड्यात आधी गवत जाळलं जाई. नंतर या खड्ड्याच्या आतल्या बाजूंना ओल्या मातीत मिसळलेली वाळलेली पानं लिंपत. खड्ड्यात धान्य ठेवून माती आणि शेणानं खड्डा बुजवला जाई. या खड्ड्यांमध्ये साठवलेलं धान्य वर्षानुवर्षं खराब होत नसे, असं इब्न बतुता आणि अमिर खुस्रो या दोघांनीही लिहून ठेवलं आहे.

आमिर खुस्रोचं बरंचसं आयुष्य दिल्लीत गेलं. दिल्ली सल्तनतेतल्या सात सुलतानांच्या पदरी तो राजकवी म्हणून होता. शरबत - इ - लबगीर (अनेक मसाले, सुगंधे द्रव्यं घालून केलेलं सरबत), नान - इ- तुनुक (पोळी), नान - इ - तनुरी (रोटी), समोसे (कांदा, खिमा घालून), मटण, कबाब, मासे, कबुतरं, चिमण्या (कुंजशक्क), हलवा असे पदार्थ दिल्लीतल्या सुलतानांना, सरदारांना आवडत असं त्यानं लिहून ठेवलं आहे. जेवणानंतर तांबुल खाण्याचीही पद्धत होती.

महंमद बिन तघलकाच्या राजवटीत तैमुरानं दिल्लीवर हल्ला केला, आणि अमाप संपत्ती लुटून नेली. हिरेमाणकं नेण्यासाठीच त्याला नव्वद हत्ती लागले, असं म्हणतात. तैमुरानं दिल्ली बेचिराग केली. तघलकानंतर सत्तेवर आलेल्या लोदी घराण्यानं उद्ध्वस्त दिल्ली पुन्हा वसवण्याऐवजी आग्र्याला आपली राजधानी हलवली. १५२६मध्ये तैमुराचा सहावा वंशज बाबर हिंदुस्थानात आला आणि इब्राहिम लोदीचा पराभव करून दिल्लीला आपल्या बादशाहीचा पाया घातला. बाबरानं दिल्ली जिंकली तरी आपला मुक्काम त्यानं आग्र्यालाच ठेवला. बाबराच्या मृत्यूनंतर हुमायूं सत्तेवर आला. त्यानं आग्र्याहून दिल्लीला राजधानी नेली, आणि इंद्रप्रस्थाच्या प्राचीन भूमीवर दीनपनाह या नावानं नवीन शहर वसवायला सुरुवात केली. दीनपनाह म्हणजे पुराना किला आहे, तो परिसर. हुमायूंनं बांधकामास सुरुवात केली, आणि अनेक भव्य इमारतींचे आराखडे तयार केले. मात्र शेर शाह सुरीनं त्याचा युद्धात पराभव केला, आणि दीनपनाहचं नाव शेरगढ असं ठेवलं. हुमायूंनं अगोदर काबुल आणि नंतर पर्शियात आश्रय घेतला. त्याचं कुटुंबही काबुलला स्थायिक झालं. पर्शियाच्या शाहाशी त्याची मैत्री होती. त्यानं शाहाला खिचडी खाऊ घातली आणि आपल्या आचार्‍यांना पर्शियन पदार्थ शिकवले. इस्लाम शाह सुरीच्या मृत्यूनंतर हुमायूं दिल्लीला परतला तेव्हा त्याच्यासोबत पनास पर्शियन आचारी होते. या आचार्‍यांनी भारतात आणलेला सर्वांत प्रसिद्ध पदार्थ म्हणजे हलवा - इ - झरदाक. अर्थात गाजराचा हलवा.

पुढे अकबरानं दिल्लीहून आग्रा आणि फतेहपूर सिक्रीला मुक्काम हलवला आणि दिल्लीचं महत्त्व पुन्हा कमी झालं. राजधानीतच सर्व व्यवहार एकवटले गेल्यानं दिल्लीतली बाजारपेठही आग्र्याला हलली. अकबराच्या कारकिर्दीत त्यानं दिल्लीकडे फारसं लक्ष दिलं नाही. जहांगीरही काश्मीरला जातायेता फक्त दिल्लीला थांबे. त्याला दिल्लीबद्दल फारसं ममत्व नव्हतं. शाहजहाँ सत्तेवर आल्यावर त्यानं मात्र दिल्लीला आपली राजधानी हलवण्याचं ठरवलं. त्याच्या आजोबांनी आणि वडिलांनी आग्र्याला आणि सिक्रीला बर्‍याच इमारती बांधल्या होत्या. या दोन्ही शहरांशी त्यांचं नाव आणि कर्तृत्व जोडलं गेलं होतं. शाहजहाँच्या महत्त्वाकांक्षेला आणि स्वाभिमानाला हे मानवण्यासारखं नव्हतं. त्यानं आग्र्याच्या ऐश्वर्याला, लखलखाटाला लाजवेल असं नवं शहर वसवायचं ठरवलं. लोकांना सांगताना मात्र त्यानं आपल्याला आग्र्याची हवा मानवत नाही, म्हणून दिल्लीला राजधानी हलवत असल्याचं सांगितलं. आपल्या या नव्या शहरातल्या इमारती आग्र्याच्या आणि सिक्रीच्या इमारतींपेक्षा सुंदर असाव्यात, अशी शाहजहाँची इच्छा होती. हुमायूंनं वसवलेल्या दीनपनाहच्या जागीच नवं शहर वसवण्याचा बूट आधी निघाला होता. मात्र कमनशिबी हुमायूंच्या स्मृती नवीन शहरात नको, असा विचार पुढे आला आणि यमुनेच्या काठी जागा शोधली गेली. या नव्या राजधानीचं नाव ठेवलं गेलं शाहजहानाबाद. म्हणजे हल्लीची जुनी दिल्ली.

लाल किल्ला, जामा मशीद आणि शहर असे (तेव्हाच्या) नवी दिल्ली उर्फ शाहजहानाबादचे तीन भाग होते. या शहराभोवती साडेपाच मैल परिघाचा एक मोठा कोट होता. किल्ल्याचा कोट दीड मैल होता. १६३८ साली लाल किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. स्वत: शाहजहाँने किल्ल्याच्या बांधकामात लक्ष घातलं होतं. अंतर्गत रचनेचा पूर्ण आराखडा त्याने स्वत: तयार केला होता. आतले चौक, तिथली कारंजी, आयताकृती व्हरांडे, उंच दरवाजे हे सारं त्याच्या कल्पनेतून उतरलं होतं. दिवान - इ - आम आणि दिवान - इ - खास ही या किल्ल्यातली मुख्य आकर्षणं होती. दिवान - इ - आमची सजावट सोनेरी वेलबुट्टीनं केली होती. या महालाच्या छतावर चांदीची कलाकुसर केली होती. महालाच्या मध्यभागी दहा फूट उंचीचा संगमरवरी चौथरा होता. या चौथर्‍यावर जगप्रसिद्ध मयुरासन, म्हणजे तख्त - इ - तौस ठेवलं जाई. किल्ल्यातल्या बागाची भव्य होत्या. मेहताब आणि हयातबक्ष अशी त्यांची नावं होती. किल्ल्याला दोन दरवाजे होते. लाहोर दरवाजा आणि दिल्ली दरवाजा अशी त्यांची नावं. लाहोर दरवाजालगत शाहजहाँच्या सरहदी बेगम नावाच्या बायकोनं बांधलेली सरहदी मशीद होती. किल्ल्यातून दिल्ली शहरात प्रवेश करायचा असल्यास लाहोर दरवाजातून जावे लागे. आत शिरल्यावर एक मोठा प्रशस्त रस्ता लागे. रस्त्याच्या पश्चिम टोकाला फतेहपुरी बेगमेनं बांधलेली फतेहपुरी मशीद होती. या तस्त्याची लांबी १५२० यार्ड होती, आणि रुंदी ४० यार्ड. हा रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चांदनी चौक या नावानं ओळखला जाई.

chandnichouk.jpg

चित्र क्र. २

कोणे एके काळी चांदनी चौकाची शान काही औरच होती. लाल किल्ल्याच्या लाहोरी दरवाजापासून फतेहपुरी बेगमच्या मशिदीपर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या मध्ये कालवा होता. या कालव्यात पडणार्‍या चांदण्यांच्या प्रतिबिंबामुळे या चौकाला चांदनी चौक असं नाव मिळालं होतं. या भागात सावली देणारी मोठाली, डेरेदार झाडं होती. श्रीमंत व्यापार्‍यांच्या आणि सराफांच्या दुकानांची रेखीव आखणी केली होती. हत्तीघोड्यांवर स्वार होऊन सरदार, राजपुत्र या रस्त्यावरून हिंडत. दुकानांतून खरेदीही खाली न उतरता केली जाई. या परिसरातच शहाजहाँनं जामा मशीद बांधली. जवळच रोशनुद्दौल्यानं बांधलेली सुनहरी मशीद होती. या टुमदार मशिदीच्या घुमटांना सोन्याचा मुलामा दिला होता. पलीकडे जहाँआरा या शहाजहाँच्या मोठ्या मुलीनं बांधलेली मोठी बाग होती. ही बाग बेगम बाग या नावानं ओळखली जाई (ब्रिटिशांनी या बागेचं नाव 'विक्टोरिया गार्डन' असं बदललं). फतेहपुरी मशिदीच्या अलीकडे, जिथे आता घंटाघर आहे, एक मोठा हौद होता. या हौदात कमळं होती. युरोपीय प्रवाशांनी इथल्या वैभवाची, सौंदर्याची तुलना लंडन आणि पॅरिसशी केली होती.

शाहजहाँच्या खजिन्यात प्रचंड पैसा होता. लाल किल्ल्यातल्या त्या खजिन्यात शाहजहाँ तासन् तास आपली संपत्ती न्याहाळत बसून असे. उरलेला वेळ गाणं, खाणं, शिकार, नव्या इमारतींचं बांधकाम यांत जाई. या बाबतींत त्याच्यावर प्रभाव होता जहाँआरा या त्याच्या सगळ्यांत मोठ्या मुलीचा. जहाँआरा अतिशय कुशाग्र बुद्धीची आणि रसिक होती. लाल किल्ला आणि चांदनी चौकातल्या अनेक इमारतींचं, बागांचं, रस्त्यांचं बांधकाम तिच्या देखरेखीखाली झालं. राजवाड्यातल्या रोजच्या व्यवहारांवर तिचं लक्ष असे. रोजचा स्वयंपाकही तिच्या आदेशानुसारच होई. जहाँआराला मद्य आणि गांजाचं जबरदस्त व्यसन होतं. काबुल, शिराझ या ठिकाणांवरून खास तिच्यासाठी उत्तम मद्य मागवलं जाई. लाल किल्ल्यातल्या तिच्या महालात जमिनीत खोदलेल्या छोट्या टाक्या होत्या. या टाक्यांमध्ये ती मद्य भरून ठेवत असे. पुढे औरंगजेबानं या टाक्यांमध्ये लिंबाचं सरबत भरायला सुरुवात केली. बाबुराव गणपतराव आपट्यांप्रमाणं शाहजहाँनंही आपल्या महालातल्या टाक्यांमध्ये मद्य भरायची आज्ञा केली होती. पण असफ खान या त्याच्या मामाच्या सल्ल्यावरून त्यानं आपला हा बेत रद्द केला. पुढे मग त्याचं व्यसन कमीच झालं.

१६१० साली जहाँगीर गुजरातेत गेला, तेव्हा त्याची गाठ लझीझा नावाच्या पदार्थाशी पडली. हा लझीझा म्हणजे बाजरीची गुजराती खिचडी. जहाँगीर या खिचडीच्या प्रेमात पडला. प्रवासात वेळीअवेळी खाण्यामुळे होणारा पोटाचा त्रास ही खिचडी खाल्ली की होत नाही, हा शोध त्याला लागला. गुजरातेतून तो परतला ते एका गुजराती आचार्‍याला बरोबर घेऊनच. ही गुजराती खिचडी जहाँगीराच्या राजवाड्यात रोजच बनू लागली. रविवार आणि गुरुवार असे दोन दिवस तो उपास करत असे. यां दिवशी तो फक्त बाजरीची खिचडी खाऊन राही. खिचडीची ही आवड शाहजहाँतही उतरली. वेगवेगळ्या डाळी, कडधान्यं वापरून खिचडी केली जाई. त्याला आवडणारी खिचडी मुगाची डाळ आणि तांदूळ वापरून केली जाई. तुपात अगोदर डाळ परतून बोटचेपी शिजवून घेत. दालचिनी, तमालपत्र, लवंग, वेलदोडा हे मसाले तुपात परतून त्यांची पूड करत. मग एका मोठ्या भांड्यात तुपाची फोडणी करून हिरव्या मिरच्या, बटाटे, गाजर आणि कांदा परतून घेत. त्यात दही आणि लवंग, वेलदोडा, जायफळ आणि काळी मिरी हे अख्खे मसाले आणि अगोदर केलेली पूड घालून बासमती तांदूळ परतून घेत. नंतर त्यात शिजवलेली डाळ आणि दुधात भिजवलेलं केशर घालून वाफ आणत. या खिचडीला अर्थातच शाहजहानी खिचडी असं नाव मिळालं. आपल्या भरल्या वांग्यांप्रमाणे मसाल्यात परतलेला खिमा भरून वांग्याची भाजी करत. खिचडीबरोबर ही भाजी खाल्ली जाई. खरं म्हणजे अरबांना वांगी अतिशय प्रिय. त्यामुळे अनेक पर्शियन पदार्थांमध्ये वांग्यांचा उपयोग केला जाई. मुघलांना मात्र वांगी फारशी आवडत नसत. भारतात आल्यावर इथल्या फळांप्रमाणेच इथल्या भाज्या आवडून घ्यायला काही पिढ्या जाव्या लागल्या. जहाँगीर आणि नंतर शाहजहाँ यांनी मुघलांच्या दस्तरख्वानावर वांग्यांना स्थान दिलं.

Shahjahan.JPG

चित्र क्र. ३

युरोपीय आणि मुघल भारतात साधारण एकाच वेळी आले आणि जहांगीराच्या काळात मिरची, बटाटे, टोमॅटो या भाज्यांनी तसंच अननसानं मुघलांच्या राजवाड्यात प्रवेश केला. एका हकिमानं पोटदुखीवर इलाज म्हणून जहांगीराला हिरव्या मिरच्या खायला सांगितल्या होत्या. टोमॅटो वगळता इतर फिरंगी भाज्यांच्या भरपूर वापर लवकरच सुरू झाला. लाल किल्ल्यात तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या वापरल्या जात. मिरच्यांमध्ये मसाले भरून लोणची घातली जात. युरोपीय भाज्या आल्या तसे केक, पुडिंग यांसारखे अनेक युरोपीय पदार्थही केले जाऊ लागले. या पदार्थांमध्ये अननस घालता यावा म्हणून आग्र्याजवळ अननसाची लागवड करण्याचे आदेश शाहजहाँनं दिले होते. लौझिना हे ब्रेडचं पुडिंग शाहजहाँचं आवडतं होतं. लौझिना करण्यासाठी अगोदर ब्रेडचे तुकडे तुपात तळून घेत. मग हे तुकडे, दूध, अंडी, साखर, दालचिनी, जायफळ असं एकत्र करून भट्टीत भाजत.

शाहजहाँच्या कारकिर्दीत अनेक युरोपीय प्रवासी, व्यापारी भारतात आले, आणि मुघलांच्या ऐश्वर्यानं प्रभावित झाले. भारतातल्या प्रवासाचे, इथल्या श्रीमंतीचे वृत्तांतही अनेकांनी लिहिले. आपल्याबद्दल कोणी वाईट लिहू नये, याबद्दल शाहजहाँ अतिशय दक्ष होता. त्यानं त्याच्या क्रौर्याबद्दल, लिंगपिसाट वृत्तीबद्दल लिहिणार्‍या अनेकांना कैदेत टाकलं, त्यांची हस्तलिखितं नष्ट केली. निकोलाओ मनुची, जाँ-बातिस्त तावर्निए, फ्रे सेबास्तिअन मॅनरिक, बर्निए यांनी मात्र मुघल बादशाहांबद्दल, त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल आणि सामान्य नागरिकांबद्दल बरंच लिहून ठेवलं आहे. मनुचीचं जवळपास संपूर्णं आयुष्यच भारतात गेलं. दारा शिकोहच्या व नंतर शाह आलमाच्या सेवेत असताना त्यानं तैमुरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल बादशाहांचा इतिहास लिहून काढला होता. शाहजहाँनं कैदेत टाकलेल्या दोन जेसुइट मिशनर्‍यांच्या सुटकेसाठी याचना करायला मॅनरिक भारतात आला होता, तर जगप्रवास केलेल्या तावर्निएला हिर्‍यांमध्ये रस होता. बर्निए औरंगजेबाचा खाजगी डॉक्टर होता. मुघलांचं क्रौर्य, त्यांची अफाट श्रीमंती, 'रासवट मुसलमान राजांची विलक्षण सौदर्यदृष्टी', खाण्याबाबतचा त्यांचा चोखंदळपणा यांमुळे हे चौघंही चकीत झाले होते.

मनुचीला राजवाड्यात प्रवेश होता. तिथे मोकळेपणानं फिरण्याची मुभा होती. शाहजहाँनं त्याला अनेकदा महागड्या भेटी पाठवल्या होत्या. उत्तम तांदुळाची दोन पोती ही त्याला बादशाहाकडून मिळालेली पहिली भेट. आग्र्याच्या दक्षिणेस पिकणारा हा तांदूळ शाहजहाँला अतिशय आवडे. या तांदुळाचा दाणा बासमतीपेक्षा आकारानं लहान असला तरी अतिशय शुभ्र होता. शिवाय या तांदुळाला म्हणे कस्तुरीसारखा सुवास होता. या तांदुळाचा भात चिकट होत नसे. प्रत्येक दाणा मोकळा असे. पर्शियातल्या राजांना खास भेट म्हणून हा तांदूळ पाठवला जाई. हा तांदूळ वापरून राजवाड्यातले आचारी अनेकदा पुलाव करत, असं मनुचीनं लिहिलं आहे. लाल, पिवळ्या, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगांचे हे पुलाव असत. या तिन्ही लेखकांनी बादशाहांबरोबर प्रवासही केला. मनुची आणि मॅनरिक शाहजहाँबरोबर लाहोर आणि मध्य भारतात येऊन गेले, तर तावर्निए शाहजहाँ आणि औरंगजेबाबरोबर मोहिमांवर जाऊन आला. राजा तिथे राजधानी असा मुघलांचा खाक्या होता. बादशाहा प्रवासास निघाला म्हणजे त्याचे सर्व सरदार, अधिकारी, सेवक, नोकरचाकर, सैन्य त्याच्याबरोबर जाई. शहरातले व्यापारी, दुकानदारही यानिमित्तानं आपला माल घेऊन बादशाहाबरोबर निघत. ज्या शहरात मुक्काम असेल तिथे मोठाले तंबू उभारले जात. १६४१ साली शाहजहाँबरोबर मॅनरिक लाहोरला गेला तेव्हा त्यानं लिहिलं - 'जवळपास अर्धं शहर रंगीबेरंगी तंबूंनी व्यापलं होतं. हे सारे तंबू अगदी शिस्तबद्ध उभे होते. या तंबूंच्या शहरात मोठाल्या तंबूंमध्ये बाजार भरला होता. या बाजारात निरनिराळे खाद्यपदार्थ विकायला ठेवले होते. या पदार्थांची मांडणी अगदी सुरेख होती. बघताक्षणी विकत घ्यावेसे वाटावेत, असे ते पदार्थ होते. सगळ्यांत जास्त गर्दी बिर्याणी विकणार्‍या तंबूंपाशी होती. शिवाय निरनिराळ्या रंगांचे आणि चवींचे पर्शियन पुलावही होते. बाजारात एतद्देशीय, अंधश्रद्धाळू मूर्तिपूजकांच्या भोजनाचीही व्यवस्था होती. त्यांच्यासाठी अनेक शाकाहारी खाद्यपदार्थ होते. चुलीवर मातीचे तवे ठेवून त्यांवर गरिबांसाठी कणकेच्या पोळ्या भाजल्या जात होत्या. पोळ्यांबरोबर खायला तूप होतं. फिरत्या शहरातल्या या तंबूंमध्येच जर खाण्याची इतकी चंगळ असेल तर लाहोर, दिल्लीसारख्या श्रीमंत शहरांमध्ये काय मजा असेल, याची वाचकांनी कल्पना करावी. मला सगळ्यांत मौज वाटली ती इथल्या स्वस्ताईची. दोन चांदीच्या नाण्यांमध्ये एक माणूस दोन दिवस भरपेट जेवू शकतो'.

फिरतीवर असताना बादशाहाचं रात्रीचं जेवण होऊन तो आपल्या तंबूत परतला की रात्री दहा वाजता आचारी दुसर्‍या दिवशीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागत, असं मनुचीनं लिहिलं आहे. रात्रभर खपून आचारी दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता बादशाहासाठी नाश्ता तयार ठेवत. भांड्यांच्या आवाजाचा झोपलेल्यांना त्रास होऊ नये, म्हणून हे स्वयंपाकघर जरा लांब असे. स्वयंपाकासाठीचं वाणसामान वाहून न्यायला पन्नास उंट असत. संपलेले जिन्नस नव्यानं मागवले जात. कुठलाही जिन्नस कुठूनही जास्तीत जास्त चार दिवसांत पोहोचेल, अशी व्यवस्था होती. सोन्याचांदीची, चिनीमातीची ताटं वाहून न्यायला दोनशे कुली असत. शिवाय दुधासाठी शंभर गायी, स्वयंपाकाची भांडी वाहून न्यायला अनेक खेचरं अशी व्यवस्था केली जाई. तावर्निए भारतात आल्यावर इथल्या जेवणामुळे त्याचं पोट बिघडलं होतं. बाजारात विकत मिळणार्‍या नान आणि रोट्यांवर बसलेली धूळ आणि घोंघावणार्‍या माशा पाहून त्याला वैताग आला होता. इथलं नद्यांमधलं पाणी अशुद्ध असल्याची त्याची तक्रार होती. औरंगजेब गंगेचं पाणी पित असे. त्यानं मात्र गंगेचं पाणी प्यायला साफ नकार दिला. दारूतही हे पाणी त्यानं कधी मिसळलं नाही. औरंगजेबाबरोबर तो फिरतीवर असताना स्वतःचा स्वयंपाक वेगळा करत असे. तशी त्यानं बादशाहाकडून परवानगी मिळवली होती. मग एक दिवस त्याला खिचडीचा शोध लागला. बादशाहाचे सैनिक खिचडी खात असत. मग त्यानंही रोज खिचडी खायला सुरुवात केली. त्यानं लिहिलं आहे - 'इथले सैनिक मुगाची डाळ आणि तांदूळ वापरून केलेली खिचडी खातात. चव यावी म्हणून वाटीतल्या तुपात बोटं बुडवून ती चोखतात. खिचडीबरोबर लोणची असतात. पण ती फार तिखट असल्यानं मी खात नाही. मागे मी स्वतःच स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला होता. पण ज्या गावांमध्ये हिंदू जास्त तिथे मात्र फक्त तांदूळ, तूप आणि दूध हेच मिळे. मुसलमान वस्तीत बकर्‍या, कोंबड्या, कबुतरं सहज विकत मिळत. पण नेहमी बाजारात जाणं शक्य नसे. शिवाय कोंबड्या भाजायला निखार्‍यांची व्यवस्था करणं आलं. इथे बादशाहाच्या ताफ्यात मोठ्या शेगड्या आहेत. या शेगड्यांमध्ये रोट्या भाजतात. काही सैनिक त्यांच्या ज्वाळांवर कोंबड्याही भाजतात. मीही एकदोनदा तसा प्रयत्न केला होता. पण नुसती भाजलेली कोंबडी मला आवडली नाही'.

तावर्निएनं उल्लेखलेल्या मोठ्या शेगड्या म्हणजे तंदूर. घोड्यावर, उंटावर लादून नेण्यासारखे हे लहान तंदूर सर्वप्रथम जहांगीरानं वापरले होते. गुजरातेत असताना त्याला हे पोर्टेबल तंदूर पहिल्यांदा दिसले. एरवीचे तंदूर जमिनीत गाडलेले असत. त्यामुळे प्रवासात असताना या लहान तंदुरांचा उपयोग होईल, असं त्याला वाटलं. हे पोर्टेबल तंदूर भट्टी जमातीतल्या लोकांनी तयार केले होते. गुजरात, राजस्थानातल्या वाळवंटांत भटकंती करणारी ही जमात. रोजच्या स्वयंपाकासाठी ते या तंदुरांचा उपयोग करत. जहांगीरानं या मंडळींकडून पोर्टेबल तंदूर करून घेतले आणि प्रवासात असताना वागवायला आणि वापरायला सुरुवात केली. या लहान तंदुरांना मग त्यांचा शोध लावणार्‍यांवरून भट्टी हेच नाव मिळालं. पुढे शाहजहाँ आणि औरंगजेबानंही हे लहान तंदूर वापरले. शाहजहाँ मध्य आशियात मोहिमेवर जाताना हे तंदूर बरोबर घेऊन गेला होता. त्याच्यामुळे अगदी पार इराण, मंगोलियापर्यंत या लहान तंदुरांचा वापर सुरू झाला.

शाहजहाँची ही मध्य आशियातली मोहिम अयशस्वी झाली. सर्वस्वी अपरिचित वातावरणात त्याच्या सैनिकांना तग धरता आला नाही. मजा म्हणजे, शाहजहाँ आणि त्याचे सरदार हे सगळे मूळचे याच प्रदेशातले. बाबर भारतात आल्यावर इथल्या फळांची आठवण काढून उसासत असे. मध्य आशियात गेल्यावर शाहजहाँ आंब्याच्या आठवणींनी व्याकुळ झाला. भारतातल्या समृद्धीला चटावलेले त्याचे अधिकारी मध्य आशियातला जिंकलेला प्रदेश ताब्यात ठेवू शकले नाहीत, आणि त्यामुळे शाहजहाँला जबरदस्त आर्थिक नुकसान सोसावं लागलं. त्याच्या स्त्रीलंपटपणामुळे त्यानं अनेक सरदारांचा, नातेवाइकांचा रोष ओढवून घेतलाच होता. त्याच्या तब्येतीबरोबरच साम्राज्यही ढासळू लागलं, औरंगजेबानं बंड पुकारलं आणि शाहजहाँची रवानगी कैदेत झाली.

आपल्या वडिलांनी केलेल्या चुका निस्तरण्याचा पुरेपूर प्रयत्न अतिशय धार्मिक असलेल्या औरंगजेबानं केला. मुघल दरबारातून नाहीशा होत चाललेल्या इस्लामचं पुनरुज्जीवन करण्याचे त्यानं अनेक प्रयत्न केले. दरबारात पाळल्या जाणार्‍या हिंदू चालीरीतींवर निर्बंध घातले. चित्रकलेची त्याला फारशी आवड नव्हतीच, संगीतामुळे मन वाहवतं, अल्लापासून माणसाला दूर नेतं या समजुतीतून त्यानं संगीतावरही बंदी आणली. आपलं खाण्यावरचं प्रेम मात्र त्यानं अजिबात कमी होऊ दिलं नाही. स्वयंपाकघरातल्या खर्चासाठी त्यानं एक हजार रुपये रोज मंजूर केले होते. स्वयंपाकासाठी त्यानं आचार्‍यांची संख्या वाढवली. जगभरातले उत्तमोत्तम आचारी त्यानं भरपूर पगार देऊन नोकरीवर ठेवले. या आचार्‍यांची नेमणूक तो स्वतः त्यांची परीक्षा घेतल्यानंतरच करत असे. इतर मुघल बादशाहांप्रमाणे त्याचंही खिचडीवर विशेष प्रेम होतं. त्याच्या मोठ्या मुलाच्या, मुहम्मद अकबराच्या पदरी सुलेमान नावाचा एक आचारी होता. या सुलेमानाच्या हातची खिचडी आणि बिर्याणी औरंगजेबाला अतिशय आवडत असे. त्यानं अकबराला एका पत्रात लिहिलं होतं - 'मी जोधपूरहून सुखरूप येऊन पोहोचलो. तिथल्या हिवाळ्यात खाल्लेल्या सुलेमानच्या हातच्या खिचडीची आणि बिर्याणीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सुलेमानाला माझ्याबरोबर घेऊन येण्याची माझी खूप इच्छा होती, पण तू त्याला येऊ दिलं नाहीस. सुलेमानाच्या हाताखाली काम करणारा कोणी आचारी आहे का? असल्यास त्याला माझ्याकडे ताबडतोब पाठव. नसल्यास एखाद्या उत्तम आचार्‍याला सुलेमानाकडून खिचडी कशी करायची ते शिकून घ्यायला सांग. महिनाभरात हा आचारी माझ्याकडे पाठव'. बासमती तांदूळ, मुगाची डाळ, कांदे, काजू, बदाम, दालचिनी, लवंग, वेलदोडा, तूप घालून केलेल्या औरंगजेबाच्या महालातल्या खिचडीला मग खिचडी आलमगिरी हे नाम मिळालं.

कुबुली हा पदार्थही त्याचा विशेष लाडका होता. खरं म्हणजे कुबुली हा बिर्याणीचा एक खास दख्खनी शाकाहारी अवतार. बासमती तांदूळ, चण्याची डाळ, दालचिनी, लवंग, तमालपत्र, वेलदोडा हे मसाले, दही आणि केशर घालून केलेली कुबुली औरंगजेबानं उत्तरेतही नेली. दाल आलमगिरीवरही त्याचं प्रेम दख्खनेत असतानाच जडलं. अख्खे काळे उडीद आधी भिजत ठेवायचे. मग रात्रभर मंद आचेवर शिजवून लोणी, दही, मसाले घालायचे. बिजापूरला असताना त्याच्या कोण्या एका आचार्‍यानं अख्खे उडीद वापरून ही शाही दाल बनवली, आणि ती त्याला आवडली म्हणून त्याचंच नाव या पदार्थाला दिलं गेलं. कोफ्ते अंगुरी म्हणजे दुधी भोपळ्याचे कोफ्ते हा औरंगजेबाचा आणखी एक लाडका पदार्थ. कोफ्त्यांना हिरवा रंग येण्यासाठी पालकाचा रस घालत. रश्श्यात मसाले, सुका मेवा, साय असत. औरंगजेबाचा दक्षिणेतला मुक्काम वाढला तसं त्याला तिथल्या भाकरी आवडू लागल्या. नंतर कुठेही असला तरी नान, पराठ्यांऐवजी तो ज्वारी आणि बाजरीची भाकरीच खात असे.

औरंगजेब शाकाहारी होता. जेवताना इतर कोणी मांसाहार केलेलाही त्याला चालत नसे, म्हणून रोज तो एकटाच जेवी. शिकार करणार्‍यांवर त्याचा राग होता. शिकार करणं हे रिकामटेकडेपणाचं लक्षण आहे, असं त्याचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत होतं. मद्यपानाबद्दलही त्याला तिटकारा होता. बर्‍हाणपूरजवळच्या झैनाबादहून आलेल्या, आणि म्हणून झैनाबादी या नावानं ओळखल्या जाणार्‍या एका नर्तिकेवर त्याचं खूप प्रेम होतं. तिनं आग्रह केला म्हणून एकदाच त्यानं दारूचा एक घोट घेतला होता. इस्लाममध्ये मद्यपानाला परवानगी नाही म्हणून त्याच्या राज्यात संपूर्ण दारुबंदी होतीच. पुढे त्याचा धर्माकडे ओढा वाढल्यानंतर त्यानं मद्यपानाविरुद्ध मोठी मोहीमच उघडली. त्याला भेटायला येणार्‍यांनीही मद्यपान करून येऊ नये, अशी त्यानं ताकीद दिली होती. मद्यपान करणार्‍यांचे हात तोडून टाकण्याची शिक्षा त्यानं फर्मावली होती.

साहित्य, संगीत यांची आवड नसली तरी त्यानं आपल्या राजवटीत अनेक सुंदर इमारती बांधल्या. लाल किल्ल्यातली प्रसिद्ध मोती मशीद, सफदरजंगका मकबरा, झफर महल, हिरा महल, झीनत-उल्-मशीद ही दिल्लीतली वास्तुशिल्पं औरंगजेबाच्या काळातली. पुढे त्यानं महामार्गांवर (गुझर) आकारला जाणारा टोल (रहदारी) रद्द केला. उत्पन्नातली ही तूट भरून काढण्यासाठी आणि बांधकामावर होणार्‍या खर्चासाठी त्यानं राजवाड्यातले खर्च कमी केले. सोन्याचांदीच्या भांड्यांऐवजी पितळ आणि मातीची भांडी आली. मेजवान्यांमध्ये वाढल्या जाणार्‍या पदार्थांची संख्या कमी झाली. खुद्द औरंगजेबानंही मातीची भांडी वापरायला सुरुवात केली तरी त्यानं आपल्या जिभेचे चोचले पुरवणं कायम ठेवलं. त्याचं बरचंसं आयुष्य लढायांमध्ये, फिरस्तीत गेलं. लाल किल्ल्यात त्याचं वास्तव्य फार थोडा काळ होतं. पण त्यानं खाण्याच्या बाबतीत स्वतःची आणि आपल्या सैन्याची गैरसोय कधीच होऊ दिली नाही. शिधा कमी पडल्यास आपल्या सरदारांना दटावणारी, किंवा दख्खनेत असताना उत्तरेहून खास पदार्थांची मागणी करणारी त्याची अनेक पत्रं आहेत. गंमत म्हणजे यांपैकी अनेक पत्रांत त्यानं आंब्याबद्दल अतिशय जिव्हाळ्यानं लिहिलं आहे. उत्तम आंबे मिळाले नाहीत की तो अस्वस्थ होई. तो कुठेही असला तरी उत्कृष्ट आंबे मिळावेत, याची त्यानं सोय करून ठेवली होती. आंब्याच्या नवनवीन जाती विकसित करायला त्यानं उत्तजेन दिलं. एकदा त्याच्या मुलानं त्याला दोन नवीन जातींचे आंबे पाठवून त्यांचं नामकरण करायला सांगितलं. औरंगजेबानं त्या जातींची नावं सुधारस आणि रसिमविलास अशी ठेवली. औरंगजेबाला खूश करायचं असेल, त्याच्याकडून काही मिळवायचं असेल, तर त्याला आंबे आणि इतर फळ पाठवण्याची पद्धतच रूढ झाली होती. अफगाणिस्तानातल्या बाल्ख प्रांताच्या राजानं एकदा आपल्या राजदूताबरोबर त्याला नजराणा म्हणून भरपूर कलिंगडं आणि सुका मेवा शंभर उंटांच्या पाठीवर लादून पाठवले. शिवाय कुजलेल्या माशांच्या पन्नास पेट्या होत्या. औरंगजेबाचा मुक्काम तेव्हा दिल्लीला होता. तिथे पोहोचल्यावर राजदूताला आपण आंबे आणले नसल्याचं लक्षात आलं. लगेच शंभर पेट्या आंबे लखनऊहून मागवले गेले, आणि राजदूत बादशाहासमोर हजर झाला. बादशाहानं फळं स्वीकारली, पण फळांबरोबर असलेल्या कुजवलेल्या माशांच्या पेट्या नंतर सरदारांमध्ये वाटून टाकल्या. कुजवलेले मासे म्हणजे अफगाणिस्तानातल्या राजांचं व्हायाग्रा. बादशाहानं फळं ठेवून घेतली आणि मासे वाटले, याचं त्या राजदूताला बरंच आश्चर्य वाटलं होतं.

१७०७ साली औरंगजेबाचं निधन झालं, आणि मुघल साम्राज्य कमकुवत होण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर दिल्लीपदावर बसलेले राजे आक्रमक नव्हते. परिणामी दक्षिणेत मराठे, निझाम यांनी आपली सत्ता वाढवली. उत्तरेत अनेक नवाबांनी, शिखांनीही मुघलांविरुद्ध आघाडी उघडली होतीच. मराठ्यांचे प्रधान बाळाजी विश्वनाथ आणि त्यांचे पुत्र बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर स्वार्‍या केल्या आणि तिथल्या बादशाहांकडून मराठ्यांसाठी चौथ सरदेशमुखीच्या सनदा मिळवून आणल्या. अठराव्या शतकात नादिरशाह आणि अहमदशाह अब्दाली यांनी दिल्लीवर हल्ला चढवला, आणि प्रचंड संपत्ती लुटून नेली. १७७१ साली महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण बिनिवाले यांनी दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा फडकावला. पुढे अठरा वर्षांनी दिल्लीवर मराठ्यांनी पूर्ण वर्चस्व गाजवलं आणि मराठी सैन्य दिल्लीच्या संरक्षणार्थ तिथेच राहू लागलं. महादजी शिंद्यांचे जावई लाडोजी शितोळे देशमुख हे काही काळ दिल्ली शहराचे सुभेदार होते. इंग्रजांनी नंतर दौलतराव शिंद्यांचा पराभव केला आणि १४ मार्च, १८०३ रोजी लॉर्ड लेक यांनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. १८०४ साली दुसर्‍या शाह आलमानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं संरक्षण स्वीकारलं. दिल्लीवर इंग्रजांची सत्ता सुरू झाली. कंपनीनं शाह आलमाचा दिल्लीचा राजा असा उल्लेख करायला सुरुवात केली. मुघल सैन्य रद्द केलं. लाल किल्ल्याभोवती शाह आलमाचे काही सैनिक तेवढे ठेवले. कंपनीनं संपूर्ण राज्यकारभार ताब्यात घेतला.

दुसरा बहादूर शाह हा शेवटचा मुघल बादशाह. दुसर्‍या अकबराच्या मृत्यूनंतर १८३७ साली, वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तो सत्तेवर आला. त्याच्या वडिलांच्या काळात संपूर्ण सत्ता ब्रिटिशांनी बळकावली होती. नाण्यांवरूनही त्यांनी बादशाहचं नाव काढून टाकलं होतं. बहादूर शाहची सत्ताही लाल किल्ल्यापुरतीच मर्यादित होती. आजूबाजूच्या काही प्रदेशातून कर गोळा करण्याचा मात्र त्याला अधिकार होता. शिवाय बादशाहाला खर्चासाठी ब्रिटिशांकडून दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळे. त्यामुळे बादशाह तसा निश्चिंत होता. ब्रिटिशांनाही त्याच्यापासून काही धोका वाटत नसे, कारण त्याला मुळातच राज्यकारभारात रस नव्हता, सत्तेची आकांक्षा नव्हती. त्याचा सगळा ओढा साहित्याकडे आणि धर्माकडे होता. अत्यंत रसिकवृत्तीचा बहादूर शाह उत्कृष्ट शायर होता. ज़फ़र हा त्याचा तखल्लुस.

सुफी पीर म्हणून बहादूर शाहाची महती असली तरी त्याला खाण्यागाण्यात भलताच रस होता. तुर्की, फारसी, भारतीय पदार्थांवर त्याचं मनापासून प्रेम होतं. हरणाच्या मांसाचे कबाब, भाजलेल्या पाणकोंबड्या, मटण आणि फ्लॉवरचा रस्सा, खिमा भरलेली वांगी, बेसनीरोटी, समोसा, खांडवी, फलुदा, खीर, बाकरखानी हे पदार्थ त्याच्या विशेष आवडीचे होते. भारतीय आचारी चपाती करताना कणकेत तूप घालत नसत. भारतात आलेले पर्शियन आचारी मात्र कणीक भिजवताना भरपूर तूप, दूध घालून पराठे करत. बाकरखानी म्हणजे तव्याऐवजी तंदुरमध्ये भाजलेले पर्शियन पद्धतीचे पराठे. कारल्याचा हलवा, बेसनीरोटी, दाल शाहपसंद, राहतजानी चटणी हे पदार्थ बहादूर शाहाच्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगांतून जन्मले होते. आपल्या आचार्‍यांना मग त्याने ते शिकवले. कारल्याचा कीस करून, त्यातलं पाणी काढून, खवा, सुकामेवा घालून कारल्याचा हलवा करत. राहतजानी चटणी आलूबुखार वापरून करत. मुगाची डाळ शिजवून, त्यात मऊ शिजवलेलं मांस, घट्ट दही, दालचिनी, सुंठ, आमचूर आणि डाळीइतकं तूप घालून दाल शाहपसंद केली जाई. बेसनीरोटी करण्यासाठी चण्याच्या डाळीच्या पिठात भरपूर तूप आणि किसलेला कांदा घालत. कांद्याच्या किसातलं पाणी आधी काढून घेत. मग हे पीठ दुधात भिजवत. हा घट्ट गोळा दहा मिनिटं कापडाखाली झाकून ठेवला जाई. या पिठात चक्का, कोथिंबीर, हिरवी मिरची, केशर घालून जाडसर पोळ्या लाटत. बहादूर शाहाला ही बेसनीरोटी प्रचंड आवडे. राहतजानी चटणी आणि दाल शाहपसंदबरोबर तो ही रोटी रोज खात असे. मिर्झा गालिबही या पदार्थांचा चाहता होता. बादशाहाच्या दरबारातून त्याच्या चांदनी चौकातल्या घरी वरचेवर हे पदार्थ पोहोचवले जात.

बहादूर शाहाला आपल्या मित्रांना, दरबारातल्या मान्यवरांना खायला घालायला खूप आवडे. अनेकदा तो स्वतः त्यांच्यासाठी स्वयंपाक करी. एकट्यानं जेवण्याची इतर मुघल बादशाहांची पद्धत त्यानं मोडीत काढली. मित्रांबरोबर गप्पा मारत, शायरी ऐकतऐकवत जेवायला त्याला आवडे. रात्री आपल्या आवडत्या बायकोबरोबर, झीनत महल बेगमेबरोबर तो जेवत असे. रात्रीही भरपूर पदार्थ असत. जेवणाची सुरुवात लावा पक्ष्याच्या शोरब्यानं होई. बेसनीरोटी असेच. शिवाय भाज्या, मटण घातलेला पुलाव, वेगवेगळ्या खिरी असत.

वय वाढलं तसं हे चमचमीत खाणं त्याला सोसेना. मुळव्याधीचा त्रासही सुरू झाला होता. हकिमांनी बादशाहाला सकाळी आणि रात्री फक्त दाळरोटी खायला सांगितलं. तेलतिखटमीठमसाले पूर्ण वर्ज्य. हे बेचव जेवण त्याला काही आवडेना. मग रोज सकाळी त्यानं नेहमीप्रमाणे जेवायला सुरुवात केली. हकिमांच्या दालरोटी खाण्याच्या सल्ल्याचा मान ठेवायचा म्हणून रात्री मात्र बेसनीरोटी आणि दाल शाहपसंद. ब्रिटिशांची वाढती सत्ता, आजूबाजूची झपाट्यानं बदलणारी परिस्थिती आणि गमावलेलं ऐश्वर्य यांमुळे तो अतिशय दु:खी होता. आश्रितासारखं जगणं, खर्च करताना काटकसर करावी लागणं हे काही त्याला म्हातारपणी रुचण्यासारखं नव्हतंच. खाताना आणि खाण्याविषयी बोलताना तो आपली ही दु:खं विसरे, आणि मग खाण्यावर त्याचा अजिबात ताबा उरत नसे. एकदा एका ब्रिटिश रेसिडेण्टानं भेट म्हणून त्याला पंधरा आंबे पाठवले. बादशाहानं ते एका बैठकीत संपवले आणि दुसर्‍या दिवशी आजारी पडला. हकिमांनी औषध दिलं आणि महिनाभर हलका आहार घेण्यास बजावलं. पंधराव्या दिवशी जरा बरं वाटू लागल्यावर त्यानं आपल्या आवडत्या बेसनीरोटीवर ताव मारला आणि परत आजारी पडला. नंतरचं आजारपण त्याला चार महिने पुरलं.

Bahadurshah.jpg

चित्र क्र. ४

११ मे, १८५७ रोजी बंडखोर भारतीय शिपायांनी आत्ता जिथे राजघाट आहे तिथून दिल्लीत प्रवेश केला. लाल किल्ल्याच्या बाहेर उभं राहून या शिपायांनी बहादूर शाहाला त्यांचं नेतृत्व करण्याची विनंती केली. ब्रिटिशांना, दारिद्र्याला कंटाळलेले बहादूर शाहाचे कुटुंबीय लगेचच शिपायांना जाऊन मिळाले. बहादूर शाहाची मात्र मोठी पंचाईत झाली. त्याचं वय झालं होतं. शिवाय ब्रिटिशांकडून मिळालेल्या पैशावर त्याची गुजराण होत होती. त्याला काही सत्ता मिळवण्याची, ब्रिटिशांशी लढण्याची इच्छा नव्हती. ब्रिटिशांनी दिल्ली सोडल्यानंतर १२ मेला मात्र त्यानं शिपायांच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या दबावापुढे झुकून आपला पहिला दरबार भरवला आणि आपण हिन्दुस्थानाचे बादशाह असल्याचं जाहीर केलं. जामा मशिदीत खुतबा पढण्यात आला आणि सर्वांनी 'खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल बहादूर शाह का' अशा घोषणा दिल्या. महिन्याभरात बहादूर शाहाच्या नावाची नाणीही काढली गेली. मात्र बंडखोर शिपायांचा वरचष्मा फार काळ टिकला नाही. १७ सप्टेंबराला ब्रिटिशांनी लाल किल्ल्याला वेढा घातला. ब्रिटिशांनी दिल्लीत प्रवेश करण्याची लक्षणं दिसताच बादशाहानं लाल किल्ल्यातून पलायन केलं होतं. हुमायूंच्या मकबर्‍यात त्यानं आश्रय घेतला होता. १९ तारखेला ब्रिटिश सैन्यानं दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. दोन दिवसांनी मौलवी रजब अलीनं बहादूर शाहाचा ठावठिकाणा ब्रिटिशांना कळवला. बादशाहाला त्याच्या कुटुंबासह पकडण्यात आलं. २२ तारखेला बादशाहाच्या दोन मुलांना आणि एका नातवाला चांदनी चौकातल्या कोतवालीसमोर गोळ्या घालण्यात आल्या. पुन्हा कोणी बंड करण्याचं धाडस करू नये म्हणून त्यांचे मृतदेह तिथेच चोवीस तास टांगून ठेवले होते. बंडाचा पूर्ण बिमोड केल्यानंतर बंडात सहभागी झालेल्यांना आणि त्यांच्या पुढार्‍यांना फाशी देण्यासाठी चांदनी चौकात खांब उभारण्यात आले. झज्जरच्या नवाब अब्दुर रेहमान खानांना आणि वल्लभगडाच्या राजा नहार सिंगांना इथेच फाशी दिली गेली. लुटुपुटूच्या कोर्टानं बहादूर शाह आणि झीनत महल बेगमेची रंगूनला रवानगी केली. आयुष्याची शेवटची चार वर्षं बादशाहानं मोठ्या हलाखीत काढली. दिवसचे दिवस त्याला उपाशी ठेवलं जाई. लिहिण्यासाठी त्याला लेखणी आणि कागद वापरण्याची परवानगी नव्हती. मेहरोलीत आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या शेजारी आपल्याला पुरावं, ही त्याची इच्छा अपूर्णच राहिली.

कितना है बदनसीब 'ज़फ़र' दफ़्न के लिए
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में

हे लिहिणार्‍या या शेवटच्या मुघल बादशाहाचं १८६२ साली निधन झालं.

ब्रिटिशांनी बादशाहाला शिक्षा दिली तशी त्याच्या अनेक सहकार्‍यांना, सेवकांनाही ठार मारलं. काहींनी मात्र ब्रिटिशांनी लाल किल्ल्याला वेढा घालण्यापूर्वीच पळ काढून आपले प्राण वाचवले. मियाँ रफिकुद्दीन त्यांपैकीच एक. रफिकुद्दिन लाल किल्ल्यात आचारी होते. बहादूर शाहासाठी ते स्वयंपाक करत असत. त्यांचे वडील अणि आजोबाही लाल किल्ल्यातल्या त्याच स्वयंपाकघरात काम करत. बहादूर शाहानं लाल किल्ला सोडला आणि मियाँ रफिकुद्दीन यांनीही हल्लीच्या उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यातलं फारुखनगर गाठलं. आपली ओळख लपवत, मिळतील ती काम करत आपल्या भल्यामोठ्या कुटुंबाचं पोट ते कसंबसं भरत होते. बादशाहासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी शाही जेवण तयार करणं, एवढंच काय ते त्यांना अवगत होतं. त्या छोट्याशा गावात त्यांच्या पाककलेला कोण विचारणार? शिवाय बादशाहाचं, लाल किल्ल्याचं नाव घेण्याचीही चोरी. पोलिसांना कळलं असतं तर जीव गमवावा लागला असता. आपल्या मुलांना मात्र त्यांनी आपलं संपूर्ण ज्ञान दिलं. शेकडो वर्षांपासून मुघल राजवाड्यांमध्ये रांधले जाणारे पदार्थ त्यांनी आपल्या मुलांना शिकवले.

१९११ साली ब्रिटिशांनी आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात पंचम जॉर्ज राजाचा राज्यारोहण सोहळा दिल्लीत आयोजित केला जाणार होता. या दिल्ली दरबारात भारतातले तमाम संस्थानिक, सैन्यातले अधिकारी हजेरी लावणार होते. फारुखनगरात राहणार्‍या मियाँ करीमुद्दीन यांना या दरबाराची माहिती कळली. मियाँ करीमुद्दीन हे मियाँ रफिकुद्दीन यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांच्याच तालमीत तयार झालेले. फारुखनगरासारख्या लहान गावात आपली खरी ओळख लपवत राहिल्यामुळे त्यांना आपल्या पाककलेचा कुठे वापर करता आला नव्हता, पण दिल्ली दरबाराच्या निमित्तानं या छोट्या गावातून बाहेर पडून आपल्याला चार पैसे मिळवता येतील असं त्यांना वाटलं आणि सप्टेंबर महिन्यात त्यांनी दिल्ली गाठली. दरबार भरण्यास जेमतेम तीन महिने उरले होते. दिल्लीत युद्धपातळीवर तयारी सुरू होती. नव्या इमारती बांधल्या जात होत्या. रस्त्यांचं सुशोभीकरण सुरू होतं. राजधानीच्या नव्या शहराला जॉर्जाबाद असं नाव देण्याचं घाटत होतं. करीमुद्दीन चांदनी चौकात पोहोचले. तिथे ओळखीचं कोणीच नव्हतं. जामा मशिदीजवळच्या एका सराईत मुक्काम केला, दोन दिवस आजूबाजूला फिरून परिस्थितीचा अंदाज घेतला, आणि जामा मशिदीजवळ गली कबाबियाँत चूल मांडून धाबा थाटला. धाबा म्हणजे बसायला एक बाकडं, आणि जाड सतरंजीचं छत. आलू गोश्त, दाल आणि रुमाली रोटी एवढेच पदार्थ या धाब्यात मिळत. कारण हाताशी मदत नव्हती आणि वाणसामान, मटण आणायलाही फारसे पैसे नव्हते.

करीमुद्दीनांच्या या धाब्यात लवकरच लोकांची वर्दळ सुरू झाली. झणझणीत आलू गोश्त, सौम्य दाल आणि लुसलुशीत रुमाली रोट्या लोकांना भलत्याच आवडल्या. डिसेंबरात दरबार भरला तेव्हा तर महिनाभर त्यांच्या धाब्यात नुसती गर्दी उसळली होती. खिशात पैसे खुळखुळू लागले आणि करीमुद्दीनांनी एकेक नवीन पदार्थ लोकांसमोर आणायला सुरुवात केली. निरनिराळे शाही कबाब, बिर्याण्या, कोर्मे आणि रुमाली रोट्या व नान. कोणे एके काळी मुघलांच्या राजवाड्यात खाल्ले जाणारे हे पदार्थ दिल्लीतल्या त्या गजबजलेल्या गल्लीत मिळू लागले. करीमुद्दीनांनी लवकरच आपलं संपूर्ण कुटुंब दिल्लीला आणलं, आणि १९१३ साली धाब्याच्या जागी करीम'स् हे रेस्तराँ सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वजांची खरी ओळख जाहीर केली आणि त्यांच्या रेस्तराँमध्ये मिळणार्‍या पदार्थांना वेगळंच महत्त्व मिळालं. आज या रेस्तराँच्या भारतभरात असंख्य शाखा आहेत. मुघल पाककलेचं विशुद्ध स्वरुप करीमुद्दीनांच्या वंशजांनी अजूनही राखलं आहे. मटन बर्रा, सिग कबाब, मुर्ग मुसल्लम हे पदार्थ इथली खासियत. मुघल राजांच्या काळात रेड्यात मेंढी, मेढीत शेळी, शेळीत बदक, बदकात कोंबडी आणि कोंबडीत अंड घालून भाजत असत. हा पदार्थ करीम'स्मध्ये आजही मिळतो. करीमुद्दीनांच्या खाद्यगृहाप्रमाणेच चांदनी चौकात अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली असंख्य खाद्यगृहं आजही आहेत. चांदनी चौकातल्या त्या अरुंद गल्लीबोळांत अनेक बल्लवाचार्यांनी आपलं कसब दाखवलं, नवनवीन पदार्थ शोधले. गुणवत्ता आणि चव यां बाबतीत तडजोड न करता वर्षानुवर्षं खवय्यांना खूश करणारी ही खाद्यगृहं आपलं सांस्कृतिक संचित आहेत. या खाद्यगृहांच्या आणि ती सुरू करणार्‍या बल्लवाचार्यांच्या कहाण्या खरोखर भन्नाट आहेत.

चांदनी चौकात घंटेवाला कन्फेक्शनर्स आहे. पूर्वीचं नाव घंटेवाला शाही हलवाई असं होतं. या मिठाईच्या दुकानाला यंदा दोनशे एकवीस वर्षं पूर्ण होतील. हे दुकान स्थापन करणारे सुख लाल जैन राजस्थानातल्या आमेरचे. तिथे त्यांचं एक लहानसं मिठाईचं दुकान होतं, पण व्यवसाय काही फार चांगला चालत नव्हता. लहान गावांमध्ये दुकानांतून मिठाई विकत घेणार्‍यांचं प्रमाण कमीच. दिल्ली राजधानीचं शहर, लोकांकडे पैसाही जास्त म्हणून सुख लाल १७९० साली दिल्लीला आले. नव्या दिल्लीतला चांदनी चौकातला व्यापारी भाग त्यांना दुकानासाठी योग्य वाटला. एक चुल्हाणं आणि मोठी कढई या सामग्रीवर त्यांनी व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात ते फक्त कलाकंद विकत असत. मग हळूहळू वेगवेगळ्या स्वादांतल्या बर्फ्या विकायलाही त्यांनी सुरुवात केली. दुसरा शाह आलम बादशाह हत्तीवर बसून येताजाता सुख लालांच्या दुकानातून मिठाई घेत असे. दिल्लीतल्या प्रतिष्ठितांमध्ये या दुकानातली मिठाई बरीच आवडती होती. सुख लालांच्या दुकानासमोर एक शाळा होती. या शाळेच्या घंटेचा आवाज थेट लाल किल्ल्यात ऐकू जाई. मिठाई खायची तल्लफ आली की दुसरा शाह आलम 'त्या घंटेवाल्या मिठाईच्या दुकानातून' मिठाई आणायला सांगे. या दुकानाचं नाव मग घंटेवाला हलवाई असंच रूढ झालं.

collagechandni.jpg

ओल्ड फेमस जलेबीवाला हे चांदनी चौकातलं अजून एक प्रसिद्ध दुकान. नेमीचंद जैन यांनी हे दुकान १९०५ साली सुरू केलं. नेमीचंदजी मूळचे आग्र्याचे. घरच्यांशी वादविवाद झाला आणि घरी कोणालाही न सांगता ते दिल्लीला आले. आग्र्याला त्यांच्या घराशेजारी एक हरयाणवी हलवाई राहत असे. या हलवायाचे पूर्वज गोहाना गावी जिलब्यांची दुकानं चालवत. नेमीचंदजींनी या शेजार्‍याकडून जिलब्या बनवण्याची दीक्षा घेतली होती. दिल्लीत आल्यावर चांदनी चौकात त्यांनी हाच व्यवसाय सुरू केला. दुकानाचं नाव नेमीचंद जलेबीवाले. हे दुकान म्हणजे एक छोटंसं खोपटं होतं. बसायला जागा वगैरे नव्हती. गरम जिलबी द्रोणात घ्यायची आणि चालू लागायचं. एका आण्याला द्रोणभर जिलबी मिळत असे. पुढे दोन वर्षांनी नेमीचंदजींनी जिलबीच्या जोडीला समोसे विकायला सुरुवात केली. मुघलांच्या काळात समोशांमध्ये खिमा भरला जाई. बटाट्याचं भारतात आगमन झाल्यावर शाकाहार्‍यांना हा उत्तम पर्याय मिळाला. नेमीचंदजींच्या समोशांमध्ये बटाटा आणि ओल्या मटारांचं सारण असे. बरोबर कोथिंबीर-पुदिन्याची चटणी. १९५० साली नुतनीकरण झाल्यानंतर ओल्ड फेमस जलेबीवाला असं नवीन नाव या खाद्यगृहाला मिळालं. दुकानाचं नाव बदललं तरी जिलबीची पाककृती आणि चव तशीच राहिली. समोशाच्या सारणातून ओले मटार मात्र गायब झाले. नेमीचंदजींचे सुपुत्र श्री. कैलाश जैन आता हे दुकान सांभाळतात.

चांदनी चौकातल्या मिठाया प्रसिद्ध तशीच इथली परांठेंवाली गलीही. छोटा दरिबा किंवा दरिबा कालान या नावानं हा भाग ओळखला जाई. फारसी भाषेत दूर - इ - बे - बाहा म्हणजे अतुलनीय शुभ्र मोती. अशा मोत्यांचा मार्ग म्हणजे दरिबा कालान. या गल्लीत पूर्वी, म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी चांदीच्या वस्तू बनवणार्‍यांची आणि मीनाकाम करणार्‍यांचीच बहुतेक सगळी दुकानं होती. पं. कन्हैय्यालाल दुर्गाप्रसाद दीक्षितांचं घरही याच गल्लीत होतं. कन्हैय्यालालांचे आजोबा आग्र्याजवळच्या एका लहान गावातून दिल्लीत आले होते. १७६१ साली आप्पा गंगाधरपंतांनी चांदनी चौकाच्या परिसरात गौरिशंकराचं मंदिर बांधलं होतं. कन्हैय्यालाल या मंदिराचे वंशपरंपरेनं पुजारी होते. त्यांच्या पत्नी उत्तम स्वयंपाक करत. आसपासचे मारवाडी आणि ब्राह्मण व्यापारी सकाळी कन्हैयालालांच्या घरी शिधा आणून देत. त्यांच्या पत्नी पराठे, भाजी असा स्वयंपाक दुपारी या मंडळींसाठी तयार ठेवत. या स्वयंपाकात कांदालसूण नसे. चव उत्कृष्ट, शिवाय कन्हैयालाल या कामाचे पैसेही खूप कमी घेत. दीक्षित कुटुंबाचं एक लहानसं दुकानही दरिब्यात होतं. रबडी, मालपुआ आणि बालुशाही असे तीन पदार्थ या दुकानात मिळत.

कन्हैय्यालालांच्या पत्नींच्या हातच्या स्वयंपाकाची कीर्ती पसरू लागली, तशी त्यांच्या घरी शिधा आणून देणार्‍यांची संख्याही वाढली. इतक्यांचा स्वयंपाक त्यांना एकटीला करणं जमेना, म्हणून त्यांनी अनेकांना नकार द्यायला सुरुवात केली. असंच एकदा एका व्यापार्‍याला त्यांनी नकार दिला तेव्हा त्या व्यापार्‍यानं त्यांना पराठे आणि भाजीचं दुकान सुरू करण्याबद्दल सुचवलं. एकदा दुकान सुरू केलं म्हणजे ग्राहकाला परत पाठवायला नको, प्राप्तीही अधिक. कन्हैय्यालालांना ही कल्पना आवडली. त्यांच्या पत्नी या दुकानात स्वयंपाक करणं शक्यच नव्हतं. त्यांनी कन्हैय्यालालांना आणि आपल्या एका मुलाला पराठे करायला शिकवलं आणि १८७४ साली मिठाईच्या दुकानात हे पराठे विक्रीकेंद्र सुरू झालं. सुरुवातीला तीन प्रकारचे पराठे दुकानात तयार होत असत. साधा पराठा, आलू पराठा आणि दाल पराठा. पराठ्यांबरोबर मेथीदाण्यांची चटणी असे. एका पराठ्याची किंमत एक पैसा होती. दुकानाचा लवकरच जम बसला, हाताशी नोकर आले आणि वर्षभरातच दहापंधरा प्रकारचे पराठे पं. कन्हैय्यालाल दुर्गाप्रसाद दीक्षित परांठेंवाले यांच्याकडे मिळू लागले.

कन्हैय्यालालांच्या दुकानाची कीर्ती सर्वदूर पसरली तशी आग्र्याहून काही कुटुंबं दिल्लीत स्थायिक झाली आणि त्यांनी दरिब्यातच पराठ्यांची दुकानं सुरू केली. १९१० साली दिल्ली दरबाराची तयारी सुरू असताना या रस्त्याचं सुशोभीकरण केलं गेलं. तोपर्यंत या रस्त्यावर पराठ्यांची पंधरा दुकानं उभी राहिली होती. चांदीची दुकानं हळूहळू बंद पडली होती. बंडाच्या वेळीच त्यांपैकी बरीच लुटली गेली होती. या महागड्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसेच शिल्लक नसल्यानं उरल्यासुरल्या दुकानांनीही गाशा गुंडाळला होता. इंग्रजांनी मग या गल्लीचं परांठेंवाली गली असं अधिकृत नामकरण करून टाकलं.

या गल्लीच्या बाहेर कँवरजी भागीरथमल दालबीजीवाला हे मिठाई आणि नमकीन विकणारं दुकान आहे. १८६० साली सुरू झालेलं हे दुकान दालबीजी, म्हणजे दालमोठेसाठी प्रसिद्ध आहे. हरयाणातल्या बहादूरगढहून आलेल्या कँवरजींनी हे दुकान सुरू केलं तेव्हा बालुशाही, दालबीजी, बर्फ्या हे पदार्थ मिळायचे. पुढे बटाटा, वाटली डाळ असं सारण भरलेले समोसे या दुकानात मिळू लागले. या दुकानासमोरच १९८४ साली दिल्लीत शिखांविरुद्ध दंगल सुरू झाली. हे दुकान उद्ध्वस्त झालंच, पण परांठेंवाली गलीतली दुकानंही नष्ट झाली. पं. गयाप्रसाद शिवचरण परांठेंवाले (१८८२), पं. बाबुराम देवीदयाल परांठेंवाले (१८८६) आणि पं. कन्हैय्यालाल दुर्गाप्रसाद दीक्षित परांठेंवालेही जुन्या दुकानांपैकीची तीन दुकानं फक्त नंतर परत उभी राहिली. जुन्यांपैकी काहींनी पहाडगंजला आपला बाडबिस्तरा हलवला. आज या गल्लीत जुनी तीन आणि गेल्या वर्षी नव्यानं सुरू झालेलं एक, अशी पराठ्यांची चार दुकानं आहेत. कँवरजी भागीरथमल दालबीजीवाला हे दुकानही पुनर्बांधणीनंतर आजपर्यंत सुरू आहे.

सामान्य नागारिक, देशोदेशीचे पंतप्रधान, राष्ट्रपती अशा अनेकांनी चांदनी चौकातल्या या पदार्थांचा आस्वाद घेतला. या दुकानांनी असंख्य खवय्यांना तृप्त करून त्यांचे आशीर्वाद मिळवले. एक परंपरा जिवंत ठेवली. या दुकानांत गेलं की दर्शनी भागात पं. नेहरू, जयप्रकाश नारायण, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी बाजपेयी अशांचे फोटो दिसतात. पं. कन्हैय्यालाल दुर्गाप्रसाद दीक्षित परांठेंवाले यांच्या दुकानात मागे गेलो होतो. आता हे दुकान जे चालवतात ते श्री. अभिषेक दीक्षित म्हणाले, "आमचे पूर्वज लोकांचं पोट भरण्यात समाधान मानायचे. ते महत्त्वाचं. पैसे कमी मिळाले तरी त्यांना दु:ख नव्हतं. त्यांच्या मनात असलेलं समाधान त्यांच्या पदार्थांमध्येही उतरलं. नेहरूजी असोत किंवा इथेच राहणारा कोणी रिक्शावाला, खातिरदारी सर्वांची सारखीच. म्हणून तर आमच्याकडे इतकी गर्दी असायची. इंदिराजी, शास्त्रीजीसुद्धा इथे दुकानासमोर उभं राहून पराठे खायचे. दुकानात आता जो रबडीपराठा मिळतो, त्याची आयडिया आम्हांला इंदिराजींनी दिली होती. आम्ही केलेला पहिला रबडीपराठा इंदिराजींनी खाल्ला होता. खूप रसिक होते लोक तेव्हा. नेतेसुद्धा आणि सामान्य लोकसुद्धा. मन साफ असायचं. आम्ही असे अनेक किस्से आमच्या वडिलांकडून, आजोबांकडून ऐकले आहेत. पंतप्रधानांनी स्वयंपाकासाठी बोलावलं तरी त्यांना मानाची वागणूक मिळत असे. आता तसं होत नाही. आमच्या दुकानात आता कोणी नेतेमंडळी येत नाहीत. फक्त कलामसाहेबांनी आम्हांला दोनदा राष्ट्रपती भवनात बोलावलं होतं. आमच्याशी गप्पा मारल्या. आम्हांला भेटवस्तू दिल्या. नंतर एकदा त्यांच्याकडे राहायला आर. के. लक्ष्मण आले होते, तेव्हा कलामसाहेबांनी आमच्याकडून पराठे मागवले होते. दिल्ली बदलली, चांदनी चौकही बदलला आहे. लोक मात्र अजूनही समाधानानं आमच्याकडे खातात, आमच्या पूर्वजांची परंपरा आम्ही सुरू ठेवली आहे, याचा आनंद आहे. पण लोकांच्या आवडी बदलल्या आहेत. आम्ही किती दिवस तग धरू, हे काही मला माहीत नाही. लेकीन एक बात सच है, चांदनी चौक में खाने और जिने की जो मौज हैं, वो और कहीं नहीं|"

दिल्लीचा काही शतकांचा इतिहास चांदनी चौकातल्या या दुकानांनी पाहिला आहे. इथल्या बर्‍यावाईट बदलांचे ते साक्षीदार आहेत. किंबहुना दिल्लीच्या इतिहासाशी यांचं जीवनही जोडलं गेलं आहे. मियाँ करीमुद्दीन दिल्लीला आले त्या वर्षी कलकत्त्याहून राजधानी दिल्लीला हलली. शंभर वर्षं पूर्ण होतील यंदा या घटनेला. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी कुंदनलालजी इथे आले. दिल्लीप्रमाणेच ही मंडळीही परिस्थितीशी झगडत उभी राहिली. आपलं अस्तित्व टिकवलं. लादलं गेलेल्या प्राक्तनाशी दोन हात केले.

राज्यकर्त्यांनी दिल्लीला आपल्या मर्जीप्रमाणं वागवलं. पण तरीही तिचा दरारा कायम राहिला. राज्यकर्त्यांना, सामान्यांना तिच्याबद्दल वाटणारं आकर्षण कधीच कमी झालं नाही. किलोखेरी, सिरी, तुघलकाबाद, फिरोझाबाद, दीनपनाह, शेरगढ, शाहजहानाबाद अशी अनेक शहरं दिल्लीनं आपलीशी केली. नवं शहरं उभं राहिलं की आधीचं शहर आपोआप जुनं होतं असे. नवंकोरं शाहजहानाबादही नंतर जुनं झालं. आधीच्या जुन्या शहराच्या जागी मग नवी दिल्ली उभी राहिली. राज्यकर्त्यांनी तिला आपली नावं देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर, तिच्या रहिवाशांवर आघात केले. पण दिल्लीनं आपलं अस्तित्व कायम ठेवलं. इथे आलेल्यांना सामावून घेतलं.

चांदनी चौकानंही इतिहासाचं हे ओझं कधी बाळगलं नाही. दिल्लीप्रमाणेच इथलं वर्तमानही कधी इतिहासात गोठून राहिलं नाही. एकेकाळी चांदनी चौकातल्या रस्त्यांवर रोज संध्याकाळी गुलाबपाण्याचा सडा घातला जाई. बादशाहाचा हत्ती जाणार असेल तर फुलांचे गालिचे घातले जात. शाहजहाँपासून बहादूर शाहापर्यंत प्रत्येक बादशाहाची मिरवणूक याच रस्त्यावरून गेली. आठवा एडवर्ड आणि पंचम जॉर्ज भारतावर आधिपत्य गाजवायला इथूनच मार्गस्थ झाले. इथे मिर्झा गालिब, बेगम समरू यांच्या हवेल्या होत्या. सौंदर्य, ऐश्वर्य, पराक्रम इथे एकवटले होते. पण याच चांदनी चौकानं अनेक युद्धंही पाहिली. रक्ताचे पाट या रस्त्यांवरून वाहिले. दारा शिकोहचं शीर भाल्यावर लावून याच रस्त्यावरून मिरवत नेलं गेलं. नादिरशाहनं चांदनी चौकातल्या सुनहरी मशिदीच्या छतावरून दिल्ली लुटण्याचे आणि दिल्लीकरांना मारून टाकण्याचे आदेश दिले. इथल्या कत्तली बघत तो खदाखदा हसत होता. ज्या शाहजहाँनं चांदनी चौक बांधला, त्याच्याच वंशजांना इथे फासावर लटकवलं गेलं. गुरू तेग बहादूरांनीही इथेच आपलं बलिदान दिलं.

चांदनी चौकानं हे क्रौर्य आणि दु:ख कुठेतरी खोल दाबून टाकलं आहे. इथे आलं की आपल्या आत जाणवणारं जड काही नाहीसं होतं. मसाल्यांची, अत्तरांची, बांगड्यांची, साड्यांची, खाद्यपदार्थांची दुकानं माणसांनी भरलेली असतात. आत पाय ठेवायला जागा नसते. पण तरीही त्या दुकानात आपण सहज सामावून जातो. इथल्या गर्दीत गंध, रंग तेवढे जाणवत राहतात. आपल्या आत खूप खोल दडलेला असा आनंद एकदम उफाळून वर येतो. मग आधी सिसगंज साहेब गुरुद्वार्‍यात जाऊन माथा टेकायचा. मनाला आणि पायांना गार वाटलं की तिथला प्रसादाचा शिरा खायचा. मग जामा मशीद. तिथे कबाब खायचे. नंतर पराठेवाले गली. करीम'स्ची बिर्याणी खाल्ली की पान खायला प्रिन्स पान सेंटर. सर्वत्र घमघमाट सुटलेला असतो. सगळे चेहरे आनंदी असतात. किंवा आपल्याला तसे ते दिसतात. इथून बाहेर पडलं की नंतर बराच काळ हा आनंद तसाच टिकून राहतो. चांदनी चौक म्हणजे आनंद. फूड पॉर्न अ‍ॅट इटस् बेस्ट!

***

टिपा -

१. मोतीमहलचा गरम मसाला - २५० ग्रॅम जिरं, ३५० ग्रॅम काळी मिरी ११ काळे वेलदोडे, अडीच टेस्पू हिरवे वेलदोडे (दाणे), १२ टेस्पू धणे, ४ टेस्पू लवंगा, इंचभर लांबीच्या वीस दालचिनीच्या काड्या, २ टेस्पू जावित्री, ७ तमालपत्रं, ६ टेस्पू सुंठ, एका जायफळाची पूड हे जिन्नस वेगवेगळे भाजून घेऊन एकत्र करायचे आणि बारीक पूड करायची.

२. मोतीमहलचा तंदुरी मसाला - ४०० ग्रॅम धणे, ४०० ग्रॅम जिरं, १०० ग्रॅम शहाजिरं, २५० ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या, १५० ग्रॅम जावित्री, १५० ग्रॅम दालचिनी, १०० ग्रॅम काळी मिरी, ६० ग्रॅम चक्रफूल, अडीच टेस्पून हिरवा वेलदोडा, १२ काळे वेलदोडे, ६ टेस्पू लवंगा, ३ टेस्पू जायफळाची पूड हे जिन्नस वेगवेगळे भाजून एकत्र करायचे आणि बरीक पूड करायची.

३. दाल मखनी करण्यासाठी अर्धा किलो उडीद, पाव किलो राजमा आणि पाव किलो चणाडाळ एकत्र करून रात्रभर भिजत घालायचे. दुसर्‍या दिवशी एका जाड बुडाच्या भांड्यात दुप्पट पाण्यात मंद आचेवर हे मिश्रण शिजवायचं. पाणी आटून मिश्रण घट्टसर झालं की हे धान्यडाळीचं मिश्रण नीट घोटून घ्यायचं. मग त्यात एक लिटर दूध घालून ते आटेपर्यंत शिजवायचं. नंतर पाच कप टोमॅटो प्यूरे, पाच चमचे जिरेपूड, तिखट, पाच चमचे गरम मसाला घालून अर्धा तास शिजवायचं. मग एक किलो लोणी घालून ते वितळल्यावर तीन कप साय घालून एकजीव करायचं. दाल मखनी तयार.

४. दिल्ली दिल्ली - शब्द - अमिताभ भट्टाचार्य (नो वन किल्ड जेसिका)

******

विशेष आभार - सबिना सहगल सैकिया, सॅण्ड्रा पॉलेट (ब्रिटिश लायब्ररी, लंडन), श्री. कैलाश जैन (ओल्ड फेमस जलेबीवाला), श्री. अभिषेक दीक्षित (पं. कन्हैय्यालाल दुर्गाप्रसाद दीक्षित परांठेंवाले), श्री. मोनीश गुजराल (मोतीमहल डिलक्स होटेल्स प्रा. लि.), श्री. झहिमुद्दीन अहमद (करीम होटेल्स प्रा. लि.), श्री. वीर संघवी, श्रीमती सलमा हुसेन (आयटीसी वेलकम ग्रूप)

******

लेखात वापरलेल्या चित्रांचे तपशील -

१. चित्र क्र. १ - पॉलिटिकल रिअ‍ॅलिझम् - गिगी स्कारिआ, २००९, सिंगल चॅनेल व्हिडिओ विथ साउंड, ३ मिनिटे ३५ सेकंद

२. चित्र क्र. २ - डावीकडून घड्याळाच्या दिशेने - १. लाहोर दरवाजावरून दिसणारा चांदनी चौक - सीताराम, १८१४. २. चांदनी चौक (१८६०) - ग्रेग बोर्न यांनी काढलेलं छायाचित्र, ३. चांदनी चौक (१८७०) - फ्रिथ यांनी काढलेलं छायाचित्र, ४. दिल्ली दरबाराप्रित्यर्थ निघालेली मिरवणूक (१९०३), जेम्स रिकाल्टन यांनी काढलेलं दुर्बिणीतून पाहण्यासाठीचं त्रिमितीय छायाचित्र, ५. चांदनी चौक (१९१३) - ए. मिर्झा यांनी काढलेलं छायाचित्र.
सर्व छायाचित्र ब्रिटिश लायब्ररी, लंडन यांच्या सौजन्याने. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन

३. शाहजहाँ - सतरावे शतक, मुघल शैली, चित्रकार अज्ञात. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन

४. डावीकडे - लाल किल्ल्यातल्या सिंहासनावर बसलेला दुसरा बहादूर शाह, दिल्ली, १८३८, जलरंग, ३०.८ X ३६.८ सेंमी., चित्रकार अज्ञात. नेलिंग्टन संग्रहातून साभार. © हार्वर्ड युनिव्हर्सिटी आर्ट म्यूझियम, केंब्रिज.
उजवीकडे - रंगूनला स्थानबद्ध असलेला दुसरा बहादूर शाह, १८६०, छायाचित्रकार अज्ञात. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

श्री. कुंदनलाल गुजराल आणि मोतीमहल, दिल्ली, यांची सर्व छायाचित्रे श्री. मोनीश गुजराल यांच्या सौजन्याने.
© मोतीमहल डिलक्स होटेल्स प्रा. लि.

******

मुख्य संदर्भ -

१. जहाँआरा : लेन गियाम, मूळ फ्रेंच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद - उमा नारायणन आणि प्रेमा सीतारामन, ईस्ट वेस्ट बूक्स, २००३.

२. मुघल इंडिया - स्टडीज इन पॉलिटी, आयडिआज, सोसायटी अ‍ॅण्ड कल्चर : एम. अथर अली, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००६.

३. एम्परर्स ऑफ द पीकॉक थ्रोन - द सागा ऑफ द ग्रेट मुघल्स : अब्राहम एराली, पेंग्विन बूक्स, १९९७.

४. देल्ही अ‍ॅण्ड इट्स् मॉन्यूमेण्ट्स् : सुरेन्द्र नाथ सेन, ए. मुखर्जी अ‍ॅण्ड कं., कलकत्ता, १९४८.

५. इब्न बतुता - ट्रॅव्हल्स इन एशिआ अ‍ॅण्ड अफ्रिका (१३२५ - १३५४) - एच. ए. आर. गिब यांनी केलेलं भाषांतर, जॉर्ज रुटलेज अ‍ॅण्ड सन्स लि., लंडन, १९२९.

६. ट्रॅव्हल्स इन द मोगल एम्पायर (१६५६ - १६६८) - फ्रान्स्वाज बर्निए, इरविंग ब्रॉक्स यांच्या हस्तलिखितांवरून आर्किबाल्ड कॉन्स्टेबल यांनी केलेलं भाषांतर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १८९१.

७. तावर्निए'ज ट्रॅव्हल्स इन इंडिया - बॉल अ‍ॅण्ड क्रूक, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९२५.

८. द हिस्टरी ऑफ इंडिया अ‍ॅस टोल्ड बाय इटस् ओन हिस्टॉरियन्स - एच. एम. इलियट यांच्या नोंदी आणि कागदपत्रं, संपा. प्रो. जॉन डॉसन, सुशील गुप्ता (इंडिया) लि., कलकत्ता, १९५४.

******

स्रोत -

भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय आणि ब्रिटिश लायब्ररी, पुणे

******

या लेखातील कोणतेही चित्र अथवा (संक्षिप्त वा संपूर्ण) मजकूर इतरत्र वापरण्यास परवानगी नाही.

क्रमशः
प्रकार: 

अप्रतिम लेख चिनूक्स! तुझी लेखामध्ये कथा गुंफण्याची शैली अचाट आहे.. मानलं!
आता सावकाशीने चव घेत वाचेन परत..

अजून पूर्ण वाचले नाही आहे, कुंदनलालजींपर्यंत वाचून झालंय.
क्षला अनुमोदन तुझ्या लिखाणाच्या शैलीबद्दल.
आता सावकाशीने वाचतो.

खूप सही!!
मोतीमहलला जावेसे वाटू लागले आहे. निदान त्या रेसीपीने तंदूरी व बटर चिकन करावेसे वाटतेय!! Happy

उत्तम दर्जेदार. नेहमी प्रमाणेच. आधाश्यासारखे सर्व काम बाजूला ठेऊन वाचले. आता आरामात परत वाचणार.
सर्व पदार्थ आवडीचेच आहेत अगदी. औरंगजेबचे वर्णन आवडले. सध्या जे सांगतात कि फळे व भाज्या खाव्यात तसेच तो आचरित होता. लेखातील डिटेलिंग अतिशय सुरेख व माहितीपूर्ण आहे. कधीतरी आपल्या हाताने चिकन ६५ बनवून तुम्हास खाया घालणार नक्की.

अ प्र ति म!
तंदुरकहाणी ग्रेट. ऐतिहासिक,जुन्या दिल्लीचं वर्णन, इतिहास अतिशय इंटरेस्टींग.
"तुझसे मिलना पुरानी दिल्ली में-छोड आये निशानी दिल्ली में-बल्लीमारांसे दरिबे तलक, तेरी मेरी कहानी दिल्लीमें" आठवत राहिलं. Happy

अरेरे एवढी दिल्ली आग्र्याला जाउन आले आणि इकडे नाही गेले.

चिनुक्स, तुम्ही खूप छान लिहीता. तुमचा अभ्यास, परी़क्षण अवाक करुन जातात.
पुस्तक काढणार आहात का? मला कळवा, मी नक्की घेइन Happy

धन्यवाद एवढ्या सुंदर लेखाबद्द्ल!!

अप्रतिम,जतन करुन ठेवावा असा लेख!!!! गेले अनेक वर्ष मी मायबोलीवर रोमात असते.पण हे असे लेख आले की
डोक्याला प्रचंड खाद्य मिळते (आणि अर्थातच तोंपासु).

चिनूक्स, अप्रतिम लेख. हा लेख ईतर लेखांपेक्षा जरा जास्तच आवडलाय. कारण सगळेच पदार्थ माहितीतले आहेत आणि त्यांचा इतिहास आहे. नेमकी आज दाल माखनी आहे आणि आपण बादशाहाच्या रोजच्या जेवणातले पदार्थ खातोय असे वाटतेय.

शाही झालाय हा भाग! Happy

तुझं लेखन नॉन-फिक्शन असलं, तरी तुझी ते लिहायची, विस्तारायची शैली फार रसाळ आहे. मेहनत तर दिसतेच! ग्रेट!

सुरेख लेख !!!!!! खूपच भारी.. दिल्लीला ३ वेळा जाऊन आलो पण एकदाही निवांतपणे चांदनी चौक / पराठे गल्लीत खादाडी करायला जाता आलं नाही ! आता जमवायला पाहिजे..

ह्या वेळी वेळ असल्याने पूर्ण लेख एका दमात वाचला.. नाहितर नेहेमीचीच गोष्ट परत सांगितली असती.. काय पूनम? Happy

मस्तच. आताशी कुंदनलालांपर्यंत वाचून झालं आहे, पुढचं वाचते आहे हळूहळू. ही संपूर्ण लेखमालिकाच अप्रतिम झाली आहे. पुन्हा पुन्हा वाचताना कंटाळा येत नाही आणि दर वेळेला आधी काहीतरी नजरेतून सुटलेले असते ते लक्षात येते, नव्याने वाचल्याचा आनंद मिळतो! Happy

Pages