"भारतीयः कसा मी? असा मी!" Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

Submitted by sudhirkale42 on 1 February, 2011 - 04:01

"भारतीयः कसा मी? असा मी!"
Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

अनुवादकाचे निवेदन
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.

माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.
"न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक मी खूपच अलीकडे वाचले. पण ते वाचल्यावर जसा मी प्रभावित झालो तसाच मी Being Indian वाचल्यावरही झालो होतो. पण त्यावेळी मी मराठीत लिहायला सुरुवात केली नव्हती. पुढे "ई-सकाळ", "उत्तम कथा" व त्यानंतर 'मिसळपाव'वर लिहायला लागल्यावर 'आपलं लिहिणं कांहीं अगदीच टाकाऊ नसावं' असे जाणवले. मग चांगल्या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला पाहिजे हे मनाने घेतले. जमेल कीं नाहीं याची खात्री नव्हती. म्हणून भीत-भीतच "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाचे रूपांतर मी करू लागलो. त्याला वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून 'सकाळ'ला याबाबत विचारायची मी हिंमत केली. 'सकाळ'ने हे लेखन मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी निवडले व दर आठवड्याला एक प्रकरण असे तिथे हे रूपांतर प्रसिद्ध होऊ लागले. सकाळच्या प्रचंड वाचकांपुढे आपल्या लिखाणाचा काय परिणाम होतो हे पहाताना मी माझा श्वास रोखूनच धरला होता. पण तिथे प्रचंड प्रतिसाद लाभला. मला चक्क "फॅन मेल्स" येऊ लागल्या व 'फेसबुक'वर मला अनोळखी लोकांची मैत्रीची आमंत्रणे येऊ लागली!
"न्यूक्लियर डिसेप्शन" संपल्यावर "आता नवा प्रकल्प कुठला" अशी विचारणा 'सकाळ'च्या वाचकांकडून होऊ लागली व जर मूळ लेखकाची परवानगी मिळाली तर Being Indian चा अनुवाद करायचा हा मनसुबा मी जाहीर करून टाकला.
श्री. वर्मांचा पत्ता शोधायला सुरुवात केली. त्यात खूप प्रयास पडले पण सुदैवाने इथल्या 'जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर'चे (JNICC) प्रमुख श्री. सिंग यांच्याशी बोलतांना या पुस्तकाचा मी गप्पात उल्लेख केला व वर्मांबद्दल कौतुकाचे शब्द काढले. हा उल्लेख केल्यावर श्री. सिंग म्हणाले की ते श्री. वर्मांना 'गुरू'स्थानी मानतात व ते माझ्या वतीने शब्द टाकतील. दरम्यान Being Indian या मूळ पुस्तकाच्या 'पेन्ग्विन इंडिया' या प्रकाशकांना मी लिहिले तिथून मला वर्मांच्या एजंट श्रीमती मीता कपूर यांचा ID मिळाला. मग त्यांना लिहिले.
तेवढ्यात मला वृत्तपत्रातील एका बातमीवरून कळले कीं श्री. वर्मा सध्या थिंपूला आपले राजदूत आहेत. 'गूगल'वरून मी तिथल्या दूतावासाचा फोन नंबर शोधून तिथे फोन केला. श्री. वर्मा रजेवर होते पण त्यांच्या स्वीय सचिवाकडून मला त्यांचा ई-मेल ID मिळाला. मग मी श्री वर्मांना थेट लिहिले. मला होकार देण्यापूर्वी त्यांना प्रकाशकाकडून मिळालेला होकार पहायचा होता. 'सकाळ'च्या श्री. सम्राट फडणीस यांच्याकडून होकाराची मेल आल्याबरोबर मी ती श्री वर्मांना पाठवली. त्यानंतर एका तासात वर्मांनी मला परवानगी दिली!
शेवटी काल रात्री बसून मी प्रस्तावना अनुवादित केली. आता जसजशी प्रकरणे लिहून होतील तसतशी मी ती प्रथम "मिसळपाव"वर आणि मग इतर संस्थळांवर प्रकाशित करेन.
"न्यूक्लियर डिसेप्शन"ला जसा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसा या मालिकेलाही देतील अशी आशा करून सुरुवात करतो.
------------------------------------------------
"भारतीयः कसा मी? असा मी!"
Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
प्रस्तावना

मूळ लेखकः श्री. पवनकुमार वर्मा, भूतान येथील भारताचे राजदूत,
अनुवादः सुधीर काळे
©सुधीर काळे (मूळ लेखकांच्या वतीने)
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकाची आहेत.)

'Being Indian' picture.JPG
------------------------------------------------
गंगा नदी हिमालयातून वहात जिथून खाली येते त्या हरिद्वारला सर्वच हिंदू लोक अतीशय पवित्र स्थान मानतात. इथून खाली उतरून आणि मध्य भारतातील अनेक मैलांचा सपाट प्रदेश पार करून गंगा शेवटी समुद्राला मिळते. हरिद्वारला चाललेल्या धार्मिक पूजा-अर्चा आणि प्रार्थना यांच्या गजबजाटात कांहीं लोक ऐन हिंवाळ्यातसुद्धा गंगेच्या बर्फासारख्या गार आणि उथळ प्रवाहात अनवाणी उभे असलेले दिसतात.
त्यांच्या हातात एक पारदर्शक काचेचे छोटेखानी तावदान असते आणि या वेगाने वहाणार्‍या गंगेच्या उथळ प्रवाहाकडे ते त्या तावदानातून अनिमिष नेत्रांनी तासन् तास पहात उभे असतात. त्यांच्या या पापण्यांची उघडझापही न करता गंगेच्या प्रवाहाकडे पहाणार्‍या दृष्टीची एकाग्रता शेजारीच दर्शनासाठी व उपासनेसाठी जमलेल्या भाविकांपेक्षा जास्त उत्कट वाटते. पण या एकाग्र दृष्टीचा हेतू कांहीं वेगळाच असतो. कारण हे लोक प्रार्थनाही करत नसतात किंवा मृतात्म्यांसाठी मोक्षसाधनेसाठी कुठली कर्मकांडे वगैरेही करत नसतात. त्यांची एकाग्रता केवळ गंगेच्या प्रवाहाबरोबर वहात येणार्‍या नाण्यांवर असते आणि वहात येणारी अशी नाणी दिसली कीं आपल्या पायांनी ते ती नाणी चापल्याने उचलतात (व म्हणूनच ते अनवाणी उभे असतात).
एक "राष्ट्र" म्हणून भारताच्या गुणदोषांचे व वैशिष्ट्यांचे चित्रण करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. भारतीयांची व्याख्या करणेही महाकठिण. आणि आता हा समाज इतिहासाच्या काळोखातून जागतिकीकरणाच्या प्रखर प्रकाशझोतात येण्याच्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असल्याने हे काम अधीकच कठिण झाले आहे. भूतकाळाच्या संदर्भात आणि भविष्यकाळाच्या जडण-घडणीत आपण खरोखर कोण आहोत हे समजून घेण्याचा एक प्रयत्न या पुस्तकात करण्यात आलेला आहे. या प्रयत्नात अनेक धोके आहेत. भारत हा अतीशय विशाल व वैविध्यपूर्ण देश असल्यामुळे आणि प्रत्येक सामान्य (किंवा ढोबळ) विधानाला उल्लेखनीय अपवाद असल्यामुळे भारताचे वर्णन सोयिस्कर अशा ढोबळ व्याख्येने करणे अशक्यच आहे. शिवाय सारख्या वाटणार्‍या प्रत्येक गोष्टीत कांहीं तरी ठळक निराळेपण दिसते. म्हणून या पुस्तकातील एकाद्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा स्वतःबद्दलच्या समजांना धक्का देणारे वर्णन इथे दिसले तर त्याबद्दल अशा वाचकांची मी आधीच माफी मागू इच्छितो.
माझा उद्देश भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल शक्य होईल तितके खरेखुरे चित्र रंगविणे हा आहे पण मला हेही माहीत आहे कीं सगळीकडे लागू होईल असे कुठलेच सत्य नसते, त्याला अपवादही असू शकतात.
मी इथे हेही नमूद करू इच्छितो कीं मी कित्येक ठिकाणी मी हिंदू आणि भारत हे शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत ते कुठल्या आंधळ्या श्रद्धेपोटी किंवा दुरभिमानापोटी वापरलेले नसून केवळ भारत हा हिंदूंची प्रचंड बहुसंख्या असलेला देश आहे म्हणून वापरले आहेत. त्यातले कांही स्वभावविशेष असे आहेत की ते सर्व धर्माच्या सर्व भारतीयांना लागू होतात.
भारत आज आकाशात झेप घेण्यासाठी धावपट्टीवर सज्ज असलेल्या विमानासारखा उभा आहे पण या प्रगतीमागची कारणे सध्याच्या "Feel Good"च्या हर्षोन्मादाच्या लाटेपलीकडे जाऊन तपासली पाहिजेत. इतिहासाच्या मुशीत हजारो वर्षें राहिलेल्या आपल्या समाजाच्या वागणुकीचे पृथःकरण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे कीं याबाबतीतले कुठलेच चित्र पूर्णपणे काळे किंवा शुभ्र नसते. प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बरोबरही नसते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे चूकही नसते. म्हणूनच अशा देशाचे आणि नागरिकांचे चित्र रंगवताना आणि आपल्या ताकतीच्या पायावर आधारित जमा-खर्चाची कीर्दवही लिहिताना आपल्या सामर्थ्याबद्दल एक तर्‍हेचा समतोल साधून आपल्यातील कांहीं उघड दिसणार्‍या दौर्बल्याची नोंद घेऊन शेवटी आपल्या सामर्थ्यांमुळे आपला विजय होईल अशा विश्वास ठेवणे जरूरीचे आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपल्या समाजाची बांधणी यासारख्या गोष्टी जमा-खर्चाच्या कीर्दवहीत महत्वाची भूमिका बजावतात. याशिवाय आपली अथक चिकाटी, लवचिकपणा, आपल्या आकांक्षा व महत्वाकांक्षा याही महत्वाच्या भूमिका बजावतात. भारतीयांचे विनाकारण गोंधळ निर्माण करण्याचे "कौशल्य", एकाद्या कमजोरीचे सामर्थ्यात रूपांतर करण्याची हातोटी आणि आपले सुदैव यांचाही या जमा-खर्चात समावेश केला पाहिजे.
या पुस्तकाबद्दलचे संशोधन अनेक वर्षें चालू आहे पण या पुस्तकाचा बराचसा भाग मी सायप्रसला भारताचा राजदूत असतानाच्या काळात लिहिलेला आहे. मला अत्यंत प्रिय असलेल्या या विषयावर लिहिण्यासाठी सायप्रस या सुंदर बेटाने मला एक सुरेख पार्श्वभूमी आणि गजबजाटापासून दूर ठेवणारे अंतर मिळवून दिले. या पुस्तकाची कल्पना सुचविल्याबद्दल (त्यावेळी) पेन्ग्विन कॅनडाचे श्री डेव्हिड डेवीडार यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच पेन्ग्विन इंडियाचे श्री रवी सिंग आणि श्री व्ही. के. कार्तिक आणि या पुस्तकाचे संकलन केल्याबद्दल नंदिनी मेहता यांचेही मी आभार मानतो. या पुस्तकातील संदर्भाबाबत दिलेल्या त्रासाबद्दल मालिनी सूद यांच्याकडे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. लिखाण करताना तनमनधन विसरून त्यात मग्न होण्याची माझी कामाची पद्धत हसतमुखाने सोसण्याची माझ्या कुटुंबियांना आता संवय झाली आहे. भारतीय संस्कृतीबद्दल खूप ज्ञान असलेल्या माझ्या दिवंगत आईची मदत मला संदर्भाबाबत होत असे. मुलगा वेदांत आणि माझ्या मुली मानवी आणि बताशा आणि त्यांचा मित्र रिषभ पटेल या सर्वांनी संशोधनकार्यातील माझे मदतनीस म्हणून उत्साहात काम केले आहे. माझी पत्नी रेणुका हिची सहनशक्ती आणि तिची मदत तसेच या पुस्तकाच्या विविध बाजूंवरील तिची मते यांबद्दल मी तिचाही ऋणी आहे.

गुलमोहर: 

काळेसाहेब,

संपूर्ण अनुवाद वाचण्याची उत्सुकता लागली आहे. मायबोलीवर भाषांतर प्रसिध्द करताना मला काही सूचना कराव्याशा वाटतात.

(१) "न्युक्लिअर डिसेप्शन" ची प्रकरणे खूप मोठी होती. त्यामुळे एक प्रकरण वाचताना खूप वेळा स्क्रोल करायला लागत होते व प्रकरण वाचून संपवायला खूप वेळ लागत होता. या नवीन पुस्तकाचा अनुवाद प्रसिध्द करताना छोटी प्रकरणे लिहिता येतील का? किंवा एक मोठे प्रकरण २-३ भागात प्रसिध्द करता येईल का?

(२) सुरवातीला लेखकाचा संपूर्ण परिचय, त्यांची पार्श्वभूमी, कोणत्या परिस्थितीत त्यांना हे पुस्तक लिहावेसे वाटले इ. जमल्यास लिहावे.

मास्तुरेसाहेब,
यावेळी मी सर्व लेख १६००-१७०० शब्दांचे ठेवत आहे. साधारणपणे मूळ पुस्तकाची ४-५ पाने!
श्री वर्मांचा परिचय करून द्यायची कल्पना चांगली अहे. पण मूळ इंग्लिशमध्येच देईन. परिचय हा Operative part नसल्यामुळे भाषांतर करणार नाहीं.

ह्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे करून तुम्ही फार महत्वाचे काम करत आहात यात शंकाच नाही.. पुढल्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.. अतिशय जवळचा व जिव्हाळ्याचा विषय नक्कीच..